Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Saturday, 28 September 2019

समाजाबरोबरच धनगर नेत्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करावे ✍️नितीनराजे अनुसे




         भारत देश हा खरंतर लोकशाही प्रदान देश असून इथे प्रत्येकाला सरकारविरोधात न्यायासाठी आवाज उठवण्याचा, अन्यायाविरुद्ध लिहण्याचा आणि बोलण्याचा देखील अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत दिला आहे. गेल्या ७२ वर्षांपासून धनगर समाज आपल्या न्याय व हक्कासाठी लढतोय झगडतोय, संघर्ष करतोय पण सत्ताधाऱ्यांना याचे काहीच सोयरसुतक नाही. आजच्या या संघ पुरस्कृत हिटलरशाहीत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल असे मला तरी वाटत नाही.... असो.
          एकेकाळी राजा समाज असणारी ही जमात आज गुलामगीरीचं जगणं जगत आहे. मनगटाच्या जोरावर अन् तलवारीच्या धारेवर या मातीवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या चारी मुंड्या चित करणाऱ्या थोर महापुरुषांच्या जमातीत जन्माला आलेल्या औलादी आज आपला दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहास विसरून निमूटपणे अन्याय सहन करत बसले आहेत. इथे मेंढपाळांवरती अन्याय होतोय, समाजातील माता-भगिनींवर अन्याय अत्याचार होतोय, समाजातील विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय हे सांगायचे कोणाला आणि बोलायचे तरी कोणाला? धनगर समाजातील नेते मात्र स्वार्थासाठी समाजाला प्रस्थापितांंच्या दावणीला बांधायचे काम करताहेत मग तिथे कोणीही असो... सत्तेमध्ये असलेले आणि नसलेले देखील सर्व सारखेच, सर्वजण एकाच माळेचे मणी.
        घशात घातलेली चराऊ कुरणे, गायरानं मेंढपाळांसाठी सरकारने मोकळी केली असती तर रोज मेंढपाळांना भटकंती करावी लागली नसती ना कोणा शेतकऱ्यांचा मार खावा लागला असता. अन् नाही समाजातील माता-भगिनी वासनाधीन लांडग्यांच्या शिकार बनल्या असत्या. मेंढपाळांची भटकंती थांबली असती तर मेंढपाळांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची वाताहत झालीच नसती. मेंढपाळांना पुढे करून त्यांच्याच जीवावर आणि आरक्षण प्रश्नावर राजकारण करणारे आणि करू पाहणारे आज कुठेतरी प्रस्थापितांच्या ताटाखालचे मांजर होऊन बसलेत असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात धनगर समाजाचे दोन दोन मंत्री असताना देखील समाजाचे प्रश्न सुटत नसतील तर लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. नुसत्या योजना जाहीर केल्या परंतु त्या किती धनगर बांधवांपर्यंत पोहचल्या अथवा किती धनगरांना त्याचा लाभ झाला? सत्ताधारी पक्षाची आणि प्रस्थापित नेत्यांची धोतरं सांभाळण्यासाठी दाखवलेल्या गाजराच्या (१००० कोटी रुपये आणि त्या घोषित केलेल्या २२ योजनांच्या) जाहिराती सोशल मिडियावरून चांगल्याच प्रकाशित झाल्या आणि त्यांचा प्रचार सुद्धा झाला पण त्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रशासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवता झिजवता पायातील पायथान कधी झिजले ते माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला कळलेच नाही. परंतु तेच पायथान हातात घेऊन प्रस्थापितांच्या आणि त्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या धनगर नेत्यांच्या मुस्काटात मारली असती तर कदाचित त्या सोशल मिडियावरून पसरवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचून त्याचा लाभ समाजबांधवांना झाला असता.
        गेल्या कित्येक वर्षांपासून एमपीएससी, युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार त्यांचे दुखणे मांडून मांडून थकले पण त्यांची साधी दखल कोणत्याही नेत्याने घेऊ नये एवढे दुर्दैव समाजाचे... लोकसंख्येच्या मानाने दोन नंबरची जमात असलेल्या धनगर जमातीसाठी महाराष्ट्र राज्यापुरते केवळ आणि केवळ ३.५% आरक्षण असताना त्यातही अनेक कुरघोड्या... ओपन मधून जरी अर्ज केला तरी पुन्हा जातीच्या आधारावरच त्या जागा भरल्या जातात मग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या इतर उमेद्वारांनी करायचे काय? गेल्या पाच-सहा वर्षांपासून मी माझ्या डोळ्याने पाहतोय आणि त्यांचे दुखणे ऐकतोय. धनगर समाजातील तरुण हजारो-लाखो रूपये खर्चून सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या आणि प्रशासकीय सेवेच्या हलगर्जीपणामुळे जागांच्या अभावी खचून जातोय याकडे धनगर नेत्यांनी दुर्लक्ष करावं ही किती लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. पदं भेटली, खुर्च्या भेटल्या म्हणून समाजाचा विकास झाला असे होत नाही तर समाजाचे दुखणे विधानभवनात, संसदभवनात मांडून समाजाच्या न्याय व हक्कासाठी कायदे बनवून घेणे आवश्यक आहे तरच समाजाचा विकास होईल नाहीतर ये रे माझ्या मागल्या... असेच होईल. ज्या ज्या पक्षांना लोकसभेसाठी धनगर उमेद्वार चालत नाहीत अशी प्रस्थापित व्यवस्था धनगर समाजाला काय न्याय देईल? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण होळकरांनी दान केलेल्या जमिनीवर जे संसद भवन आणि राष्ट्रपती भवन दिमाखात उभे आहे ती संसद ही देशाची तिजोरी तर आहेच परंतु जिथे कायदे बनवले जातात त्या कायदेमंडळात कायदे बनवण्यासाठी संघ पुरस्कृत सत्ताधारी सरकारला तसेच अन्य प्रस्थापित व्यवस्थेला धनगर समाजाची माणसं चालत नसतील तर ते काय धनगर समाजाला खाक न्याय देणार आहेत का?
       या गोष्टीचे समाजाबरोबरच धनगर नेत्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण तथा आत्मचिंतन करावे कारण गेल्या पाच-सहा वर्षांपासून मिळेल त्या वेळेत शक्य तेवढे समाजप्रबोधन करतोय. त्यामुळे जास्त काही सांगायचे नाही. तसे तुम्ही सुज्ञ आहातच....
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Friday, 27 September 2019

धनगर समाज आणि सामाजिक प्रगल्भता : ✍️नितीनराजे अनुसे


     वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास असे लक्षात येईल की परिवर्तन हा एक निसर्गाचा नियम आहे. निसर्गात वारंवार बदल होत असतात त्यामुळे तर निसर्गाचा समतोल राखला जातो. त्याचप्रमाणे समाजात सुद्धा परिवर्तनाची नितांत आवश्यकता असून त्यावरच समाजाची प्रगल्भता अवलंबून आहे. मग तिथे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक असो अथवा राजकीय क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रांत बदल आवश्यक आहे अर्थातच परिवर्तन असायलाच हवे.
       आज समाजात वावरताना असे दिसून येते की इतर समाजाच्या तुलनेत धनगर समाजाची सामाजिक प्रगल्भता कुठेतरी कमी पडत आहे. सोशल मिडीयावर तर धनगर समाजातील तरूणांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्र राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे ते काही आज नवे नाही. या अगोदर सुद्धा जेव्हा जेव्हा लोकसभा, विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या तेव्हा तेव्हा राजकारणात अनेक घडामोडी घडल्या अन् त्यांवरती अनेक कुरघोड्या देखील झाल्या.
       नुकतेच गोपीचंद पडळकर हे वंचितला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार असल्याच्या बातम्या वर्तमानपत्र तसेच टीव्ही न्यूजप्रमाणे सोशल मिडियावरून देखील वाऱ्यासारख्या वायरल झाल्या. परंतु गोपीचंद पडळकर यांच्यावरती मात्र टिकेची झोड उठवण्यात आली त्याचे कारण असे की अखेरच्या धनगर आरक्षण लढ्यात त्यांनी आरेवाडीच्या बिरोबा बनात भाजपला मतदान न करण्याची शपथ घेतली होती आणि म्हणूनच गोपीचंद पडळकर टिकेस बळी पडले.
          खरंतर इथे मी कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही अथवा कोणत्याही नेत्यांच्या निर्णयाचे समर्थन करणार नाही आणि विरोध सुद्धा नाही. कारण प्रत्येकाला संवैधानिक अधिकार आहे जसा मला लिहण्याचा... आज धनगर समाजात अनेक नेते आहेत शिवाय नवनवीन नेतृत्व उदयास येत आहेत. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पक्षात कार्यरत आहे. परंतु समाजासाठी एकत्रित यायचे कोणी नाव घेत नाही. तसे झाले असते आज चित्र काही वेगळेच दिसले असते, असो... आमची सामाजिक प्रगल्भता तेवढी नाहीये जेवढी असायला हवी होती. आम्ही मात्र सोशल मिडियावरच एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढत असतो आणि आपल्याच हाताने समाजाच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असतो. थोडक्यात काय तर तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ....
        खरंतर टिका करणाऱ्या युवकांमध्ये (मग तो कोणीही असो तो कोणत्याही पक्षाचा असो) सामाजिक प्रगल्भता असती तर तेव्हाच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ना.महादेवजी जानकर हे खासदार झाले असते. रिडालोसमधून गोपीचंद पडळकर हे २००९ साली खानापूर-आटपाडी विधानसभा लढले, २०१४ ला भाजपमधून लढले तर २०१९ ला सांगलीची लोकसभा निवडणूक वंचित मधून लढले होते मग सामाजिक प्रगल्भता असती तर ते सुद्धा आमदार खासदार झाले असते. २०१४ ला बाळासाहेब गावडे बारामती मधून आणि प्रकाश शेंडगे जत मधून आमदार झाले असते ना.... आता २०१९ ला डॉ यशपाल भिंगे आणि सखाराम बोबडे हे सुध्दा परभणीमधून खासदार झाले असते. असे कितीतरी धनगर समाजातील उमेद्वार सहज निवडून आले असते पण काय करणार यास सर्वस्वी जनतेबरोबरच नेत्यांची सुद्धा प्रगल्भता महत्त्वाची आहे. इतर समाजातील कितीतरी नेते पक्ष बदलतात, कोणाचा जावई दुसऱ्या पक्षात, तर कोणाचा भाऊ, साडू, मेव्हणा, पुतण्या तिसऱ्या चौथ्या पक्षात असतो. तेव्हा मात्र ते ज्या जातीत जन्माला आले आहेत त्या जातीतील लोकांनी त्यांना कधी विरोध केला नाही त्यांच्यावर टिका केली नाही. यावरून तरी त्यांच्या सामाजिक प्रगल्भतेचा अभ्यास करायला हवा. मग धनगर समाजातच हा एवढा उपद्व्याप का?
       म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे की एक तर एकत्रित या नसेल तर कोणीही कोणत्याही पक्षात जात असेल तर जाऊद्या, संधी मिळत असेल तिथून विधानसभा लोकसभा लढू द्या आपण सर्वांनी सामाजिक प्रगल्भता जोपासून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विधानभवनात आणि संसदभवनात समाजाचा टक्का वाढवूया. परंतु आपल्याच समाजातील नेत्यांवर टिकेची झोड उठवून समाजाचेच वाभाडे काढू नका एवढीच नम्र विनंती.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Tuesday, 13 August 2019

समाजासाठी आक्रमक होऊन नेहमीच आंदोलन करणारे सुरेश होलगुंडे,शांततेच्या मार्गाने उपोषण करत जीवाची बाजी लावताहेत, सुरेश होलगुंडे आणि सर्व उपोषणकर्त्यांंना सलाम.....

महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे


            समाजाच्या न्याय व हक्कासाठी आमदार-खासदारांच्या गाड्या आडवणारे, न्याय व हक्कासाठी भांडणारे महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे हे एक हसतमुख चेहऱ्याचे व्यक्तिमत्त्व असून धनगर आरक्षण लढ्यातील एक संघर्षमय नेतृत्व सुद्धा आहे. १४ ऑगस्ट २०१४ रोजी धनगर आरक्षण संदर्भात महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले सुरेश(भाऊ) होलगुंडे हे निस्वार्थीपणे या आंदोलनात धनगर समाजाचे नेतृत्व केले होते. याच धनगर समाजाच्या आंदोलनात मुंबईची Life Line अर्थातच जीवन रेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे आडवण्यात मा.सुरेश भाऊ यांचा सिंहाचा वाटा होता. अधिवेशन काळात विधानभवनाला घेराव घालून प्रत्येक आमदारांना गुलाब पुष्प देत आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवण्याचे गांधी मार्गाने केलेल्या आंदोलनात शिवाय त्यानंतरच्या अधिवेशन काळात विधानसभेत घुसून सरकार विरोधात आरक्षणाच्या घोषणा देऊन यळकोट यळकोट जय मल्हार चा गजर करण्यात देखील ते हिरारीने सहभागी झाले होते. धनगर आरक्षण संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मधुकर पिचड याचा निषेध करत राष्ट्रवादी भवनावर जे आंदोलन झाले होते त्यातही मधुकर पिचड च्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलनात मा.सुरेश भाऊ होलगुंडे सहभागी होते. अशा एक ना अनेक आंदोलनात मोर्चात सहभागी होऊन समाजहितासाठी निस्वार्थीपणे कार्य करणारे नेतृत्व, गावभागातून मुंबई मध्ये येणाऱ्या तरूणांना मार्गदर्शन तथा मदत करणाऱ्या सर्वच जाती-धर्मातील युवकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा सांभाळणाऱ्या महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे यांच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र यशवंत सेनेच्या शिलेदारांनी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि पुरंदरच्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी विधानभवनाच्या प्रांगणात गोंधळ घालून घोषणाबाजी केली होती त्याच महाराष्ट्र यशवंत सेनेचे प्रमुख मा.सुरेश (भाऊ) होलगुंडे हे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पंढरपूर येथे सलग पाचव्या दिवशीही सहकाऱ्यांसह केवळ आणि केवळ समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अन्न त्यागून आमरण उपोषणात ते देखील कोणत्याही उपचाराशिवाय बसले आहेत. सुरेशभाऊ सलाम तुमच्या कार्याला
        सरकार या आंदोलनाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असले तरी धनगर समाजाने आणि समाजातील नेत्यांनी गांभीर्याने लक्ष घालून त्या ९ योद्ध्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Sunday, 11 August 2019

लढाई हक्काच्या आरक्षणाची... ✍️नितीनराजे अनुसे

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषणास बसलेले वाघ

   भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होत आली तरी राज्यघटनेने बहाल केलेला घटनादत्त अधिकार अर्थातच धनगर जमातीच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे आरक्षण आजपर्यंत समाजाला मिळू शकले नाही हे भारत नावाच्या महा'राष्ट्रा'तील सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. वर्षानुवर्षे इथल्या प्रस्थापित औलादी आश्वासने देऊन, धनगर समाजाच्या मतांच्या जोरावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर पुन्हा त्याच समाजाची ससेहोलपट करतात हे कधीपर्यंत चालायचं?
        आजपर्यंत जे झाले गेले ते इतिहासात जमा झाले परंतु इथून पुढे तरी सर्वांनी कंबर कसून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लढायला सज्ज व्हायला हवे. नाहीतर धनगर समाजाची आणि समाजातील नेत्यांची "एक ना धड भाराभर चिंध्या" अशीच अवस्था होईल.  धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र हवे आहे जेणेकरून पुढच्या पिढ्या तरी स्वाभिमानाने जगतील नाहीतर आजच्या पिढीच्या तोंडात शेण घालायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले तरच समाजाची प्रगती होऊ शकते. १००० कोटी रूपयांचे गाजर दाखवून धनगर समाजाची बोळवण केली जात आहे जे राज्यघटनेत नाही.
        जुलै २०१४ च्या बारामतीच्या आंदोलनात तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते ते फडणवीस यांनी पाळले नाही उलट पुन्हा अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अन्य आश्वासनांचे, सवलतींचे गाजर दाखवले आहे त्याविरोधात ९ ऑगस्ट या क्रांतीदीवशी धनगर समाजातील पांडुरंग मेरगळ (दौंड), सुरेश होलगुंडे(मुंबई), विजय तमनर (राहुरी), सतीश झंजे(माळशिरस), प्रकाश थाडके (नांदेड), धनाजी बंडगर (सांगोला), गंगाप्रसाद खारोडे (हिंगोली), राजेंद्र तागड (अ.नगर) आणि नागुराव बारसे(नांदेड) ९ लढवय्ये पंढरपूर येथे आमरण उपोषण करत आहेत. धनगर समाजाला आणि समाजातील प्रत्येक नेत्यांना, कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्या ९ योद्ध्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. आजच गंगाप्रसाद खारोडे या उपोषणकर्त्यास पोलिस जबरदस्तीने उपचारासाठी घेऊन गेले त्यावरून असे दिसते आहे की हे आंदोलन चिरडण्यासाठी फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे परंतु जोपर्यंत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवायची जबाबदारी तुमची आमची आहे. त्यासाठी पेटून उठणे ही काळाची गरज आहे अन्यथा भविष्यात कोणीही धनगर समाजाची दखल घेणार नाही हे लक्षात ठेवा.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Saturday, 6 July 2019

आम्हाला न्याय द्या... खेकड्यांची आर्त किंकाळी... ✍️नितीनराजे अनुसे


      गावाकडे आल्यावर काल वडिलांना पेरणीसाठी जायचे असल्याने मी मेंढरं घेऊन शेताकडे गेलो. काही दिवस अगोदर पडलेल्या थोड्याफार पावसामुळे शिवार हिरवंगार झालं होतं. ओल्या गवतामुळे तशी मेंढरांना लवकर तहान लागत नाही म्हणून दुपारपर्यंत मेंढरं चारून पाण्यावर घालायची म्हणून खाली विहीरीवर घेऊन गेलो. विहीर तशी फार खोल नव्हती अगदी परूसभर सुध्दा नाही आणि त्यात पाणी सुद्धा जेमतेमच होते. थोड्याफार तहानलेल्या मेंढ्या पळतच विहीरीत उतरल्या आणि गटागटा पाणी पिऊन बाहेर पडायला लागल्या. तेवढ्यात कसलातरी आवाज यायला लागला म्हणून कान टवकारून त्या दिशेने बघतो तर काय विहीरीच्या आसपास असलेल्या बिळांमधून एकेक खेकडा बाहेर पडू लागला. मला वाटलं की मुके प्राणी आहेत बिचारे, मेंढ्यांच्या पळण्याच्या आवाजाने घाबरले असतील नाहीतर अन्नाच्या शोधात बाहेर पडत असतील. पण वास्तविक पाहता तसे काही नव्हते. सर्व खेकडे माझ्या भोवती गोळा झाले. कसलातरी विचित्र आवाज करत ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करत करत होते. खरंतर त्यांच्या भावनेतूनच त्यांची भाषा आता स्पष्टपणे ऐकायला येत होती. काल परवाच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याच्या दुर्गम भागातील तिवरे (भेंडवाडी) गावानजीक असलेले तिवरे धरण फुटून जवळपास २४ जण बेपत्ता झाले त्यातील आतापर्यंत ६ जणांचेच मृतदेह सापडले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तेथील स्थानिकांनी त्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. परंतु त्यावर गांभीर्याने लक्ष न देता गावकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी म्हणून त्या धरणातील गाळ उपसून डागडुजी करण्यात आली होती. मात्र धरण कसे फुटले त्याबद्दलचा अहवाल मागितल्यानंतर जंलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी चक्क सांगितले की निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे नव्हे तर खेकड्यांच्या प्रादुर्भावामुळे तिवरे धरण फुटले. माझ्या अंदाजानुसार जगाच्या इतिहासातील ही एकमेव घटना असावी की खेकड्यांमुळे धरण फुटले थोडक्यातच त्याचा अर्थ असा होतो की खेकड्यांनीच तिवरे धरण फोडले.
         म्हणूनच की काय ते सर्व खेकडे माझ्या भोवती गोळा झाले होते. त्यांच्या जमातबांधवांवरती धरण फोडल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे प्रत्येकजण जणू काय आपले जमातबांधव निर्दोष असल्याची विनवणी करत माणसं कशी स्वार्थी आहेत ते सांगत होता. तेवढ्यात मध्येच एकजण म्हातारा खेकडा समोर आला आणि सांगू लागला की "हे बघा, आमच्या बापजाद्यांपासून आमची खेकडा जमात ही अखंड भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात आहे. तिथे तिथे आमची ही जमात सुखासमाधानाने जगत आहे. जगभरात असंख्य धरणे आहेत. एवढेच काय तर भारतात सुद्धा आहेत. राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी सुद्धा धरणे बांधून ठेवली आहेत. तद्नंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा राधानगरीचे धरण बांधले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या आराखड्यानुसार गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण असो अथवा त्याव्यतिरिक्त इंग्रजांच्या काळात बांधलेली अनेक धरणे आहेत. अगोदरच्या बांधलेल्या धरणाजवळ देखील आमची खेकडा मोठ्या प्रमाणात जमात वास्तव्यास आहे हवे तर त्यासंदर्भात तुम्ही अहवाल मागवू शकता. मात्र विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की त्याकाळी बांधलेली धरणे अजून जशीच्या तशीच आहेत मग आता २००४ साली कार्यान्वित करण्यात आलेले तिवरे धरणच आम्ही कसे काय फोडले? निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून माणसांच्या जीवाशी खेळ चाल्लाय हे माणसांना कसं काय दिसत नाही?"
          तेवढ्यात दुसरा एक खेकडा मध्येच उभा राहिला आणि म्हणाला की, "आम्ही बोलू शकत नाही हे मान्य आहे त्यामुळे आमच्यावर आरोप प्रत्यारोप होतील परंतु बोलत्या-चालत्या ज्या माणसांचे जीव गेले आहेत, त्यांचे काय? काही गुन्हा नसताना त्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे ते सुद्धा बोलत्या-चालत्या माणसांमुळेच... मग आमच्यावर आरोप करण्यागोदर कमीत कमी माणूसकीची लाज वाटून तरी संबंधितांनी स्वतःच्या हलगर्जीपणाची लाज बाळगायला हवी होती. परंतु माणूसकी हरवलेल्या या जगात मुक्या प्राण्यांवर आरोप करून बाजूला होणारी हीच माणूसकी आज आम्ही नव्याने पाहतोय. हेच का ते कलियुग? जर आम्हा खेकड्यांना धरणे फोडायची असती तर आजपर्यंत एकही धरण ठेवले नसते सगळी धरणे फोडली असती. तसंही त्या तिवरे (भेंडवाडी) गावच्या ग्रामस्थांनी आमचे काही बिघडवले नव्हते. त्यामुळे संबंधित जलसंधारण मंत्र्यांनी जबाबदार अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार जे कोणी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. माणसांचा जीव काय असतो हे आम्हाला चांगलंच माहीत आहे कारण आम्हीच त्यांच्या आजारावर उपयोगी येतो, माणसांच्या आरोग्यासाठी आम्ही आमचे जीव देतो. मग आम्ही कशाला त्या गोरगरिबांचे जीव घेऊ? माणसातील माणूसकी शिल्लक राहिली नसल्यानेच माणसंच माणसांचा जीव घेत आहेत, खून करत आहेत, अन्याय अत्याचार करत आहेत. मग त्यांच्या चुकीसाठी आम्हाला का जबाबदार धरले जातेय...? जनाची राहीली कमीत कमी मनाची लाज बाळगून आम्हा मुक्या प्राण्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनवणी आहे."
     खेकड्यांच्या त्या विनवण्या ऐकून खरंतर मलाच माणूसकीची लाज वाटायला लागली. स्वतःच्या नपुंसकतेमुळे मुक्या प्राण्यांवर आरोप करून स्वतःला सुरक्षित ठेवणाऱ्या औलादी खरंच माणूसकीच्या नावाला लागलेला एकप्रकारचा कलंक आहे. मेंढरामागेच या गावावरून त्या गावाला भटकंती करत असताना तत्कालीन परिस्थिती पाहून आमचे तात्या कधीकधी एक गाणं गुणगुणत होते त्या गाण्याच्या पहिल्या ओळी आज स्पष्टपणे आठवताहेत त्या म्हणजे "कलियुगात झाली भेळ, लावली रताळं आली केळं" या वरून तरी असंच वाटतंय की सध्याच्या युगात माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला जबाबदार धरेल आणि काय करेल हे सांगणे अशक्य आहे. कारण या जगात माणूसकी शिल्लक राहिली आहे की नाही? असा प्रश्न पडतोय....
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Monday, 17 June 2019

षंढ लोकप्रतिनिधींकडून समाजाने काय अपेक्षा ठेवाव्यात? ✍️नितीनराजे अनुसे

पुरंदर येथे मेंढपाळाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अतिप्रसंग घटनेबद्दल....


       खरंतर लहान तोंडी मी मोठा घास घेतोय... परंतु आसपासच्या वातावरणातील वस्तुस्थिती पाहीली तर माझ्याच काय प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. ज्या सह्याद्रीच्या कुशीत आणि मुशित असलेल्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शंभूराजांचा जन्म झाला ती पुरंदर तालुक्याची माती खरंतर पवित्र असायला हवी होती परंतु कसली पवित्र म्हणायची? त्याच मातीत दि.१० जून २०१९ रोजी एका मेंढपाळाच्या एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग होतो आणि शिवछत्रपतींचा वारसा सांगणारा, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा म्हणवून घेणारा एकही मर्द पुढे येऊन निषेध करू शकला नाही. यासारखी दुसरी लाजीरवाणी गोष्ट काय असावी? या घटनेची तक्रार नोंदवण्यासाठी एका मेंढपाळास पुढे यावे लागते मग बाकीचे लोक, नेते, समाज काय झोपा काढताहेत का?  म्हणजे कोपर्डी सारखे प्रकरण घडल्यावरच सबंध महाराष्ट्र मूक मोर्चे काढणार आणि मेंढपाळांच्या पोरी काय रस्त्यावर पडल्यात काय म्हणून तुम्ही हातात बांगड्या भरून षंढ होऊन घरात बसणार? जातीयवादाचे बुरखे पांघरूण बसणाऱ्या औलादी आज इतरांना धर्मनिरपेक्षतेचे धडे शिकवतात हाच का महाराष्ट्रातील मावळ्यांना लाभलेला शिवछत्रपतींचा वसा आणि वारसा? कारण ज्या मतदारसंघात ही घटना घडली त्या मतदारसंघाची खासदार ही सुद्धा एक महिला असूनसुद्धा साधी चौकशी करायला येत नसेल तर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे की असे जातीयवादी लोकप्रतिनिधी आरोपींना पाठीशी घालताहेत.
          आज इथे तर उद्या तिथे असे भटके जीवन जगत पोटाची खळगी बडवणाऱ्या मेंढपाळांनी आता जगायचं कसं आणि मरायचं तरी कसं? असा प्रश्न पडतोय. समाजातील संघटना नुसत्या प्रसिद्धीसाठीच स्थापन करण्यात येतात काय? ज्या समाजाच्या न्याय हक्कासाठी म्हणून डंका पिटला जातोय त्या संघटनांकडून आणि ज्या मेंढपाळांच्या नावाने जे नेते आरक्षण मागताहेत ते नेते जर एका मेंढपाळाच्या मुलीला न्याय देऊ शकत नसतील तर त्या नेत्यांकडून समाजाने काय अपेक्षा कराव्यात? स्वतःची खळगी भरली म्हणून, पं.समिती सदस्य, जि.प.सदस्य, आमदार, खासदार, मंत्री झाला म्हणून समाजाला वाऱ्यावर सोडून देणार का? आज एका मेंढपाळाची मुलगी नव्हे तर तुमची आमची भगिनी अतिप्रसंगास बळी पडली आहे त्याविरोधात तुम्ही आवाज उठवू शकत नसाल तर उद्या तुमच्यापैकीच तुमच्या रक्ताची आई, बहिण, बायको, मुलगी अशा अतिप्रसंगास बळी पडू शकते त्यावेळी कितीही बोंबलत बसला तरी तुमचं कोणी ऐकून घेणार नाही ही गोष्ट नीट लक्षात ठेवा.
अधिक माहितीसाठी संपर्क
मेंढपाळ आनंद कोकरे : +91 87887 97032
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Friday, 31 May 2019

डोळ्यांत अंजन घालणारी काव्यरचना ✍️कवी राजू झंजे

जय मल्हार.....
     आज  तुझी  जयंती  माउली  ,
      दाही  दिशा साजरी होणार ;
      बेंबीच्या देठापासून  ,
     " जय अहिल्या" नारे देणार !

       चौका-चौकात  अभिवादनाचे ,
        मोठं  मोठाले  बॅनर  लागतील ;
        वर्षभर  "झोपलेले  " ,
       आज  " जातीसाठी ?" जागतील !
 
       समाज  "माझा"च ,
        अशी स्पर्धा देखील लागतेय आता ;
       मीच "मालक" यांचा ,
        काही "मंडळी" अशी वागतेय आता !
 
        जयंतीच  "व्यासपीठ "माउली आता,
        "अस्तित्व" दाखवण्याचं ठिकाण झालंय;
         समाज तुझा काही  "व्यापारियांचे"
        ठरलेले "दुकान " झालंय !
 
          या  दुकानातूनच आम्हांला,
          कोणालाही  विकलं  जातंय  ;
           वापरून झालं कि ,
          पुन्हा कुठेही टाकलं जातंय !

           राज्यकर्ती जमात माउली ,
           आज  लाचारीच जिणं  जगतेय  ;
          देण्याची  दानत  ठेवणारी  ,
           आज  लाचार  होऊन  मागतेय !
   
          साधा भोळा समाज भरडला  जातोय
          काही  नसतानाहि  गुन्हा  ;
          प्रस्थापितांनीहि आरक्षणाचा ,
         मोडून ठेवलाय कणा ;
          शासनाचा  चालू  आहे  इथे  ,
         हुकूमशाही  बाणा ;
    हे माऊली ... प्रशासन  कसे असावे हे दाखवण्यासाठी तरी ,
          जन्म घे पुन्हा....जन्म घे  पुन्हा !

देवी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त विनम्र    अभिवादन!

                 कवी. राजु दादासाहेब झंजे
                       ९५९४८१५५८५

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची आज २९४ वी जयंती... ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या २९४ व्या जयंती निमित्त मानाचा जय मल्हार

       एक स्त्री असूनही तत्कालीन पुरूषप्रधान व्यवस्थेला चपराक देत सती प्रथेला न जुमानता एका हातात शास्त्र तर दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन भारताच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्षे राज्यकारभार करणाऱ्या प्रथम महिला राज्यकर्त्या, मायमाऊली अर्थातच लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना २९४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम...
       खरंतर जातीयवादी इतिहासकारांनी बहुजन समाजातील महापुरुषांचा इतिहास विकृत करून त्याचे विद्रुपीकरण केले असताना आमच्यातील विचारवंत मात्र त्यांच्या उपाधी बद्दल मतांतरे करत बसलेत हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. अशा उपाधींपेक्षा त्यांचे अफाट प्रशासकीय, राजकीय, सामाजिक तथा धार्मिक कार्य समाजासमोर यावे या विचाराचा मी असल्यामुळे त्या विचारवंतांच्या मतानुसार इतिहास गढूळ होणे हे असंभव आहे. उदा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राष्ट्रमाता, लोकमाता, राजमाता, महाराणी, रणरागिणी, महापराक्रमी अशा कितीतरी बिरुदावल्या वापरल्या तरी त्या अहिल्याईंनी केलेल्या प्रजाहितदक्ष कार्य तथा राष्ट्रहिताच्या कार्यासमोर कमीच आहेत. 
        जगाच्या इतिहासात अहिल्याईंना एक उत्तम तथा आदर्श राज्यकर्ती, प्रशासनकर्ती म्हणून ओळखले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. "प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा" एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. म्हणूनच की काय ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महाराणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महाराणी मार्गारेट यांच्यापेक्षाही अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या या महापराक्रमी महिलेने घरात एकही कर्ता पुरूष नसताना जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. अर्थातच चक्रवर्ती सम्राट राजा अशोकाच्या स्वप्नातील 'राष्ट्र' घडवण्यासाठी त्यांनी आपले जीवन व्यतीत केले म्हणून खऱ्या अर्थाने अहिल्याई होळकर या राष्ट्रमाता या उपाधीस सार्थ ठरतात. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्र निर्माण करणाऱ्या 'राष्ट्रमाता' अहिल्याई होळकर होत. ज्याप्रमाणे महान राजाला 'महाराजा' म्हंटले जाते त्याचप्रमाणे प्रजेसाठी महान कार्य करणारी, विकासाचा डोंगर रचणारी 'युवराज' शूरवीर राजे खंडेराव होळकर यांची राणी म्हणजेच 'महाराणी'  अहिल्याई होळकर होत.
      अहिल्याईंच्या प्रशासनाचा तथा राज्यव्यवस्थेचा आदर्श ठेवून विलायती राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली मात्र अहिल्याईंना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेतल्याने आणि अहिल्याईंचा इतिहास वाचण्यापेक्षा अहिल्याईंना नुसते पूजणाऱ्या आमच्या लोकांमुळे भारत नावाचा महा'राष्ट्र' अजूनही अधोगतीकडेच कूच करताना दिसतोय. लोक अहिंसावादी, शांतताप्रिय, प्रेमाची शिकवण देणाऱ्यांची पुजा करतात हे मान्य आहे तर मग महाभारतातील पांडव-कौरवांच्या महायुद्धात कुरूक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा आणि अर्जूनाचे मनोबल वाढवणारा श्री कृष्ण हा कोणत्या अहिंसेचे प्रतिक होता? अहिल्याई होळकर यांच्या उपाध्यांबद्दल चर्चा आणि संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आजच्या प्रशासकीय तथा राजकीय व्यवस्थेला जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन धर्मनिरपेक्षतेपणे राज्यकारभार करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची दूरदृष्टी किती महत्वाची आहे यावरती कटाक्ष टाकला तर अहिल्याईंचे स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही.
     अहिल्याईंनी दुष्काळ निर्मूलनासाठी त्यावेळी अनेक उपाय योजना केल्या होत्या. एकदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली तेव्हा अहिल्याईंनी भुकेने प्रजेचे हाल होत होते तेव्हा प्रजेच्या हाताला कामही मिळेल आणि दुष्काळावर मातही करता येईल म्हणून पाणी अडवण्यासाठी शेतांमध्ये बांध घालून घेतले होते. नद्यांवर बंधारे बांधले, याशिवाय धरणे, तलाव, शेततळी बांधून ठेवली होती, निसर्गचक्रात बाधा येऊ नये म्हणून त्यांनी ७/१२ पद्धतीने शेतकऱ्यांना झाडे लावण्यास प्रवृत्त केले शिवाय त्यामाध्यमातून सरकारी खात्यात महसूल देखील जमा होत असे.  अहिल्याईंच्या राज्यात प्रजा ही सुखी समाधानी तथा आनंदी होती. त्यांनी स्वतःच्या खाजगीतली रक्कम काढून अनेक विकास कामे केल्याने कोणत्याच गोष्टींची कमतरता नव्हती म्हणून त्यांना देवीचे स्थान दिले आहे. "पुण्यश्लोक" ही उपाधी त्याचेच एक द्योतक आहे.  गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाचा आरखडा बनवताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अहिल्याईंच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. यावरूनच समजायला हवे की अहिल्याईंना देवी मानून नुसते नतमस्तक होण्यापेक्षा अहिल्याईंचे विचार मस्तकात घेऊन, समाजाने तथा आजच्या प्रशासनाने जर अहिल्याईंच्या विचारांचा, अहिल्याईंच्या प्रशासन व्यवस्थेचा अवलंब केला तर भारत देश हा नक्कीच पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत जगात अव्वल क्रमांकावर राहील.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
 📧nitinrajeanuse123@gmail.com

Wednesday, 29 May 2019

उठ धनगरा आतातरी जाग। ✍️नितीनराजे अनुसे


उठ धनगरा आतातरी जाग।
तूच आहेस रे खरा ढाण्या वाघ ।।
उसळत्या लाव्हारसाची तूच तप्त आग।
खूप झाला रे अत्याचार येवू दे आता राग ।।
उठ धनगरा आतातरी जाग ॥धृ॥
         लखलखत्या विजेचा तूच कडकडाट ।
         बेभान ढगांचा तूच रे गडगडाट।।
         अन्यायाच्या विरोधात दे रे आता आरोळी।
         अंगी शुरता सिंहाची फोड तू डरकाळी।।
         कसा झालास तू इतका षंढ? येवू दे आता राग।
         उठ धनगरा आतातरी जाग॥१॥
शञूवरची चाल तू।
निधड्या छातीची ढाल तू।।
अहिल्यामातेची तलवार तू।
तळपत्या तलवारीची धार ही तू।।
पेटू दे तुझ्या नसानसात आग।
उठ धनगरा आतातरी जाग॥२॥
         आठव तुझ्या पुर्वजांचा इतिहास ।
         रचली होती त्यांनी शत्रूंच्या देहांची रास।।
         मनगटाच्या जोरावर लढले ते बहाद्दर खास ।
         तलवारीला असायची शत्रूच्या रक्ताची आस।।
         नडणाऱ्यांना एकदाचेच तू बजावून सांग।
         उठ धनगरा आतातरी जाग॥३॥
जाण असुदे सदैव धनगरांच्या इतिहासाची।
जरातरी लाज राख रे सळसळत्या रक्ताची।।
क्षणमाञही नकोस करू तू विचार ।
उपस आता तू म्याणातील तलवार ।।
राजा आहेस ना तू तर राजासारखंच वाग ।
उठ धनगरा आतातरी जाग॥४॥
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
         ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
        +91 853 000 4123
📧 nitinrajeanuse123@gmail.com

Tuesday, 28 May 2019

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर (पुष्प चौथे) ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर

राज्यकारभार/सामाजिक कार्य/आर्थिक तथा सांस्कृतिक दूरदृष्टी
          माळवाधिपती थोरले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सून अहिल्याई होळकर यांस युद्धनीती सोबतच राजकारणाचे धडे देखील शिकवल्यामुळे तथा पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मालेराव यांच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली होती. पुरूषप्रधान मानसिकता असलेल्या काहींनी अहिल्याईंनी शासन करण्यास (राज्य कारभार करण्यास) माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले,  हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली, माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.
           भारतीय संस्कृती कोशात धार्मिक कार्याबद्दल अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे.
आर्थिक दूरदृष्टी:- भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात आजपर्यंत अहिल्याई होळकर एकमेव अशा राज्यकर्त्या होत्या की ज्यांना सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता. अहिल्याईंची दुरदृष्टी पाहिल्यावर व्यावसायिक क्षेत्रात देखील त्या काही कमी नव्हत्या कारण आर्थिक क्षेत्रात राज्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी सुरू केली होती.
सामाजिक कार्य : राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी अनेक जनविकासाची कामे अखंड भारतभर केली. अठराव्या शतकात अहिल्याईंचे तत्त्वज्ञान किती महान होते हे त्यांच्या त्यावेळच्या शासन काळावरून लक्षात येते. दारूमुळे कितीतरी संसार उध्वस्त होत असल्याने अहिल्याईंनी दारूबंदी केली शिवाय हुंडाबळी थांबवण्यासाठी हुंडा पद्धत बंद करण्यासाठी कडक कायदे करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर या पहिल्या राज्यकर्त्या होत्या. दुष्काळ परिस्थितीमुळे अन्नाशिवाय लोक भुकेने मरत होते तेव्हा त्यांच्या हाताला कामे देऊन अहिल्याईंनी दुष्काळाला आवाहन देण्यासाठी वायपट पाणी अडवून ठेवण्यासाठी शेतामध्ये बांध घातले, अनेक शेततळी, विहिरी, बारवे बांधून घेतले, वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जागोजागी पाणपोई बांधून घेतल्या शिवाय वाटसरूंची गैरसोय होऊ नये म्हणून धर्मशाळा उभारल्या अन्नछत्र सुरू केली . दुष्काळात पशूपक्षांसाठी धान्याच्या अनेक शेती मोकळ्या करून ठेवल्या होत्या. याव्यतिरिक्त अहिल्याईंनी जगातील पहिल्यांदाच न्यायव्यवस्था सुरू केली. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी त्या मंत्र्याला कडक शासन करून दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्याई होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला. अहिल्याईंच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर असे नाव दिलेले आहे एवढेच नव्हे तर इंदौर हवाई अड्ड्याला (विमानतळाला) सुद्धा अहिल्याई होळकर यांचे नाव मध्यप्रदेश सरकारने दिले आहे.
           भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (ब्रिटिश लेखक) 'माल्कम' यांच्या मतानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.
सांस्कृतिक ठेवा:-  राष्ट्रमाता अहिल्याईंचे सांस्कृतिक कार्य म्हणाल तर महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. सदरची संस्कृती आणि संगीत व कलेचा वारसा जतन करण्यात अहिल्याईंचे फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. 
          एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. पृथ्वीवरील ज्या पाच लोकांना "पुण्यश्लोक" ही उपाधी दिली त्यात अहिल्याई होळकर यांचेही नाव सन्मानाने घेतले जाते. तर राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी फक्त एकाच राज्यापुरते, एकाच जाती-धर्मापुरते काम केले नाही तर त्या पलीकडे जाऊन त्यांनी धर्मनिरपेक्षतेने अखंड भारतभर काम केले आहे. प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महारानी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महारानी मार्गारेट यांच्यापेक्षा अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या राष्ट्रमातेने जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्रमाता रणरागिणी महाराणी अहिल्याई होळकर होत.
     राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी इंदौर राज्याव्यतिरीक्त काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तर गुजरात पासून आसाम पर्यंत विकासाचा अफाट डोंगर रचून ठेवला आहे. काही इतिहासकार, संशोधक, होळकरशाहीचे अभ्यासक त्यावरती संशोधन करत आहेत तथा समाजातील युवक-युवतींनी पुढे येऊन संशोधन करावे त्यामुळे येणाऱ्या काळात नव्याने काही घटनांची भर इतिहासात पडेल...
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com