Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Monday, 12 October 2015

धनगर समाजाचे नेतृत्व दिशाहीन...


एकेकाळी राजा समाज असणारी आमची जमात आज दिशा नसल्यामुळे भरकटलेली दिसते आहे. अंधार्या रात्री अथांग समुद्रात भरकटलेल्या नौकेसारखी अवस्था माझ्या धनगर समाजाची झाली आहे. प्रस्तापितांची चमचेगीरी अन् गुलामगीरी करण्यात धनगर नेते मग्न आहेत, त्या प्रस्तापित नेत्यांची धोतरं सांभाळायला त्यांनी समाज गहाण ठेवला आहे असे म्हणायला मला काही वावगं वाटत नाही.
अरे कमीत कमी आपल्या धनगर समाजातील महापुरुषांचा इतिहास तरी आठवायला पाहिजे. सामर्थ्यशाली अन् शक्तीशाली भारताचे स्वप्न पाहणारे आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, आशिया खंडावर प्रभुत्व गाजवणारे राजा सम्राट अशोक, अटकेपार झेंडे फडकवणारे राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी राजमाता महाराणी अहिल्यामाई होळकर, जगातला दुसरा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ज्यांना ओळखले जाते असे महाराजाधिराज शुरवीर लढवय्ये राजे यशवंतराव होळकर ज्यांनी इंग्रज अधिकार्यांना अगदी तलवारीने कापून काढून कधीही न हारता एकूण १८ लढाया जिंकल्या, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारी वीरांगणा भिमाई अशा एक ना अनेक लढवय्यांच्या, शुरवीरांच्या जातीत जन्माला आलेल्या तुम्ही आम्ही औलादी आज हक्क मागतोय की भिक मागतोय तेच समजत नाही.
यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांनी जी क्रांतीवरी चळवळ उभा केली होती तेव्हा धनगर समाजासाठी स्व बी के कोकरे साहेब एक दिशादर्शक आणि खरे मार्गदर्शक होते. त्यांच्या पाश्चात्य धनगर समाजाला दिशा देणारं एकही नेतृत्व समोर आल्याचे दिसत नाही. म्हणूनच मा.गोपीचंद पडळकर साहेब त्यांच्या भाषणातून नेहमीच सांगतात की कोणत्या नेत्याचे अथवा देवाचे फोटो भिंतीवरती लावण्यापेक्षा स्व बी के कोकरे साहेबांचे फोटो आपापल्या घरात लावा कारण त्या माणसानं धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात म्हणून घरादाराचा विचार न करता अफाट संघर्ष केला होता. खंबाटकीच्या घाटात लाखो यशवंत सैनिकांना सोबत घेऊन तीव्र रास्तारोखो केला होता तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री पवारांनी दखल घेतली पण धनगर समाजातील धनडांडग्या नेत्यांना जवळ करुन पवारांनी एस.टी ऐवजी एन.टी मध्ये टाकले. आज धनगर समाज जो एन.टी. च्या सवलती घेतोय त्याच्यापाठीमागे स्व.बी.के. कोकरे साहेबांचा संघर्ष आहे. खरंतर मागणी अनुसुचित जमातीची होती पण पवारांनी ज्या ज्या नेत्यांना जवळ करुन स्व बी के कोकरेंची राजकीय हत्या केली त्यावेळी पवारांच्या मागे-पुढे घुटमळणार्या धनगर समाजाच्या दलालांनी अनुसुचित जमातीबद्दल एक ब्र सुद्धा काढला नाही. जर त्या धनगर नेत्यांनी स्व बी के कोकरे साहेबांना साथ दिली असती तर आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू करा अशी भीक मागायची वेळ आली नसती.
आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी धनगर समाजातील नेते (खरंतर प्रस्तापितांचे चमचे म्हटलं तरी हरकत नाही)  जो काही खटाटोप करताहेत त्याच्या पाठीमागे त्या त्या नेत्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य धनगर समाज जाणतोच आहे. तळागळातील गोरगरीब आणि सर्वसामान्य धनगर समाजाला न्याय व हक्क मिळावेत म्हणून बुद्धीजीवी वर्ग हाच समाजासाठी आई-बाप असणार आहे कारण नेत्यांवरचा विश्वास उडालेला असून उगाच नेत्यांनी जास्त खटाटोप करण्यात काही अर्थ नाही. जर नागपूर विधानभवनावर जर एकच मोर्चा निघाला तरच महाराष्ट्रातील धनगर समाज बांधव नागपूर मध्ये मोर्चासाठी उपस्थित राहील अन्यथा जर वेगवेगळे मोर्चे निघाले तर महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांच्या भावना दुखावणार्या कोणत्याही नेत्यांच्या मोर्चामध्ये कोणीही सहभागी होणार नाही अशी भुमिका बुद्धीजीवी वर्गाची राहील. आणि यासाठी २० अॉक्टोबर पर्यंतची मुदत दोन्ही मोर्चे आयोजकांना राहील. एकच झेंडा एकच दिवस एकच मोर्चा आणि आरक्षण अंमलबजावणीची एकच मागणी जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू होण्याचा अद्यादेश निघत नाही तोपर्यंत माघार नाही असा जर अजेंडा घेऊन धनगर नेते एकत्रित आले तरच धनगर समाजाच्या संघर्षाला यश मिळेल आणि स्व बी के कोकरे साहेबांचे स्वप्न पुर्ण होईल. नाहीतर जोपर्यंत स्व बी के कोकरे साहेबांची विचारधारा या महाराष्ट्रातील तमाम युवकांच्या डोक्यात पेरली जात नाही तोपर्यंत धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणारे हजारो बी के कोकरे तयार होणार नाहीत. ज्यादिवसी समाजातून हजारो बी के कोकरे पेटून उठतील आणि खरोखर त्यावेळी सवलती लागू करून अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र हासील करूनच शांत बसतील. त्यामुळे नेत्यांनी स्वताचे स्वार्थ, मोठेपण, आरक्षणासंदर्भातला श्रेयवाद तसेच गटतट, पक्ष संघटना बाजूला ठेऊन एकत्रित यावे. दि.२० अॉक्टोबर २०१५ पर्यंत दोन्ही मोर्चै आयोजकांनी एकत्रित यावे. तद्नंतर बुद्धीजीवी वर्ग जो निर्णय घेईल तो धनगर नेत्यांच्या भविष्याला धोका असेल आणि धनगर समाजाच्या हीताचा असेल. यासाठी धनगर समाजाला योग्य दिशा देण्याचे काम बुद्धीजीवी वर्ग प्रामाणिकपणाने करत असून समाजबांधवांचा विश्वास हा फक्त बुद्धीजीवी वर्गावर आहे हे नेत्यांनी विसरू नये. नाहीतर मग धनगर समाजाचं वाटोळं करायचा प्रयत्न कराल तर याद राखा आमच्यातला लढवय्या यशवंतराव होळकर आता जागा झाला आहे आणि आम्ही कदापी शांत बसणार नाही.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
             -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
........................................................

Wednesday, 7 October 2015

वेगवेगळे मोर्चे पण नुकसान समाजाचे...


जय मल्हार योद्ध्यांनो
पाठीमागे राज्यभरातील सर्व समाजबांधवांच्या प्रतिक्रीया मिळवून मी एक सर्वे केला होता त्यामध्ये ९३.७५% समाजबांधव वेगवेगळ्या मोर्चात सहभागी होणार नसून एकच मोर्चा असावा असे त्यांचे मत होते. आज अशा प्रतिक्रीया देणार्या समाजबांधवांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून त्यांची सरासरी ९६% वरती पोहचली आहे. वेगवेगळे मोर्चे आयोजित करणार्या नेत्यांनी याची दखल घ्यायला हवी कारण भविष्यात तुमचं नेतृत्व धोक्यात येण्याची चिन्हे आज दिसू लागली आहेत. डोळ्यावरती नव्हे तर नेत्यांनी स्वताच्या इगोवरती (अहंकारावरती) घोंगडी पांघरूण घालून डोळे उघडे ठेवून पुढे वाटचाल करावी तरच तुमचं आणि समाजाचं भविष्य उज्वल ठरेल अन्यथा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थीती होईल.
धनगर समाजातील सर्व समाजबांधवांनी व नेत्यांनी एकत्रित येऊन आरक्षण अंमलबजावणीसाठी संघटनातून संघर्ष करावा यासाठी प्रबोधनाच्या आणि समाजजागृतीच्या माध्यमातून आज बुद्धीजीवी वर्ग पोटतिडकीने आणि तळमळीने काम करतो आहे. सर्व बुद्धीजीवी वर्ग हा निस्वार्थीपणे समाजासाठी झटत आणि झगडत असल्याने आजच्या ९६% धनगर समाजबांधवांचा विश्वास हा बुद्धीजीवी वर्गावर असून समाजातील विचारवंत, तज्ञ, लेखक जो निर्णय घेतील तो समाजाच्या हीताचा असणार आहे. म्हणून वेगवेगळे मोर्चे काढणार्या नेत्यांनी या गोष्टीची दखल घ्यायला हवी.
  यशवंत सेनेचे संस्थापक स्व बी के कोकरे साहेब यांच्या क्रांतीकारी चळवळीनंतर समाजाला योग्य दिशादर्शक नसल्याने समाज अंधार्या रात्रीच्या दिशाहीन जहाजाप्रमाणे वाटेल तिकडे भरकटत गेला आहे. प्रस्थापितांची चमचेगीरी अन् गुलामगीरी करत धनगर समाजाच्या नेत्यांनी समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचं महापाप केलेले आहे. आज खरंच समाजामध्ये स्व बी के कोकरे साहेबांची उणीव भासते आहे. जोपर्यंत या महाराष्ट्रातील युवकांच्या डोक्यात स्व. बी के कोकरे साहेबांची विचारधारा पेरली जाणार नाही तोपर्यंत हा समाज पेटून उठणार नाही अन् एकत्रितही येणार नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. ज्यादिवसी हा अखंड धनगर समाज पेटून उठेल तेव्हाच आपली कुठेतरी दखल घेतली जाईल. एवढंच नव्हे तर सांगलीमध्ये कार्यक्रमात बोलताना मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी सुद्धा स्व.बी.के.कोकरे साहेब आज समाजात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
समाजाचे नुकसान.....
८ आणि १० डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर दोन वेगवेगळे मोर्चे घेऊन जाण्यासाठी धनगर नेते कंबर कसून उभे राहीलेत खरे पण या वेगवेगळ्या मोर्चातून काही साध्य होणार नाही उलट धनगर समाजाचे  आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे याचा अभ्यास बुद्धीजीवी वर्गासोबत नेत्यांनी सुद्धा करायला हवा.
१)आर्थिक नुकसान:- महाराष्ट्रातून धनगर समाजबांधव वेगवेगळ्या मोर्चात सहभागी झालाच तर पश्चिम महाराष्ट्रातून नागपूरमध्ये येण्यासाठी एका समाजबांधवाला कमीत कमी २००० रुपये खर्च येतो.
१ समाजबांधव =२०००
१००×२०००=२०००००
१०००×२०००= २००००००
१००००×२०००= २०००००००
फक्त दहा हजार समाजबांधव पश्चिम महाराष्ट्रातून नागपूरमधील वेगवेगळ्या मोर्चात सहभागी झाला तर येण्या-जाण्याचे दोन कोटी रुपये खर्च होतील. मग लाखो समाजबांधव फक्त पश्चिम महाराष्ट्रातून गेले तर २० कोटी रुपये खर्च होतील मग उर्वरीत कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून समाजबांधव नागपूरमध्ये आला तर अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होईल आणि त्याशिवाय समाजबांधवांच्या जेवणखाण्याचा खर्च, समाजबांधवांनी घेतलेल्या रजा(सुट्ट्या), त्यांच्या कामांचे खाडे याचा हिशोब केला तर हा आकडा कुठच्या कुठे जाईल ते सांगता येणार नाही.
२) सामाजिक नुकसान:- वेगवेगळे मोर्चे काढल्याने शेता-मळ्यात तसेच रानावनात शेळ्या मेंढ्यांची राखण करून तळहातावरती पोट भरणारा समाजबांधव आरक्षणाच्या नावाखाली नागपूर मध्ये येणार पण त्यांच्या पदरात नेमकं पडणार तरी काय?? नेत्यांचीच अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य समाजबांधवांच्या नशीबी नुसती निराशाच येईल आणि नेत्यांच्या या विश्वासघातकी प्रवृत्तीमुळे पुढे भविष्यात होणार्या सामाजिक कार्यक्रमात, मोर्चे असो अथवा आंदोलन त्यामध्ये सर्वसामान्य धनगर समाज सामील होणार नाही हे सामाजिक नुकसान पुन्हा कधीही भरून काढता येणार नाही.
३) राजकीय नुकसान:- वेगवेगळे मोर्चे आयोजित केल्याने नक्की कोणत्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं असा समाजबांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित नेत्यांनी इगो बाजूला ठेवून आरक्षणाचा श्रेयवाद, राजकीय स्वार्थ, मोठेपणा तसेच त्यांच्या पक्षश्रेष्ठींना खूश करण्याची उठाठेव बंद करून एकच मोर्चा आयोजित करावा अन्यथा कोणत्याच मोर्चात सहभागी होणार नाही असे ९६% समाजबांधवांचे मत आहे. मग पुढच्या विधानसभा/लोकसभा निवडणूकीत मत मागताना नेमकं काय म्हणून मत मागणार?? जिथे धनगर समाज तुमच्या सोबत नसेल तर बाकीच्या समाजाकडे काय म्हणून भिक मागणार? आणि अशामुळे त्या संबंधित नेत्यांचेच नव्हे तर सर्व धनगर नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येणार हे सर्वात मोठे राजकीय नुकसान आहे.
अशा प्रकारे आर्थिक, समाजिक आणि राजकीय नुकसान फार मोठ्या प्रमाणात होईल पण तसे त्यातून वेगवेगळे मोर्चे काढले तर एक-दोन तासापुरती सभा अन् तद्नंतर  निवेदन घोषणा दिल्या की तिथंच समारोप करुन मोर्चा संपला असं जाहीर करणार असाल तर Output=Zero असणार आहे. समाजाचं भांडवल करून तुम्ही स्वताच्या नावावर जर समाजाचा बाजार मांडत असाल तर समाज तुम्हाला साथ देणार नाही. आणि कधी माफही करणार नाही. आज धनगर समाजातील युवा तरूण वर्ग सुशिक्षित सुज्ञ आणि जागृत झालेला असून बुद्धीजीवी वर्ग जो निर्णय घेईल तो मान्य करून संघर्ष करण्यासाठी तयार आहेत पण श्रेयवादापोटी आणि राजकीय स्वार्थापोटी समाजात विभाजन करू पाहणार्या नेत्यांना अद्दल घडवली पाहीजे. वेगवेगळ्या मोर्चाचे नेतृत्व करणार्यांपैकी कोणीतरी वैयक्तिक स्वार्थ आणि श्रेयवाद बाजूला ठेवून दोन पाउले मागे घ्यावीत आणि एकाच मोर्चाचे आयोजन करून समाजकार्यात भर घालावी असे माझे वैयक्तिक मत असून यात समाजाचे परिणामी धनगर नेत्यांचे भले आहे अन्यथा "मलाही नको अन् नको तुला तर घाल कुत्र्याला" अशी अवस्था होईल. धनगर समाजातील नेत्यांनी वरील सर्व गोष्टींचे भान ठेऊन विचारविनीमय करावा. आज राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात मीटींग घेऊन तुमचे पैसे खर्च करण्यात काही अर्थ नाही फक्त तुम्ही एकत्रित येऊन एकाच मोर्चाचा एकच दिवस निश्चित करा तर आम्ही पंचवीस लाखाच्या वरती नागपूरमध्ये पोहचू हवं तर मी ती सर्व जबाबदारी घेतो अन्यथा वेगवेगळ्या मोर्चात सहभागी होणे म्हणजे समाजाचे विभाजन करणे होय. मोर्चे जर वेगवेगळे असतील तर मी सुद्धा कोणत्याच मोर्चात सहभागी होणार नाही.
जय मल्हार जय!! अहिल्या!!!
            -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
........................................................

Saturday, 26 September 2015

मला तुमच्याशी बोलायचंय...

जय मल्हार
आरक्षणासंदर्भात तुमचं मत मला जाणून घ्यायचे आहे म्हणून वैयक्तिकरित्या बोलायचं ठरवलं. खरंतर आजपर्यंत ग्रुपवरतून मी माझे विचार व्यक्त करत होतो आणि धनगर समाजाच्या ५४३ ग्रुपमध्ये असल्याने मला आपले वैयक्तिक मत जाणून घेता आले नाही.  प्रतिक्रीयांच्या स्वरुपात तुम्ही माझ्या विचारांना जी दाद दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
राज्यघटनेनुसार धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी तुम्ही आम्ही झटतो आहोत झगडतो आहोत. प्रत्येकाने या संघर्षासाठी किमान खारीचा वाटा उचलला आहे. पण सर्व संघटना राजकीय नेते यांनी एकत्रित येऊन नागपूर विधानभवनावर एक "विराट जन आंदोलन" काढायचं असं २१ जुलै रोजी बारामती मध्ये झालेल्या प्रेरणा दिनादीवसी रणशिंग फुंकण्यात आले होते. पण डिसेंबर मद्ये होणार्या अधिवेशनादरम्याण नागपूर विधानभवनावर वेगवेगळे मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत.
नागपूर विधानभवनावर वेगवेगळे मोर्चे काढले तरी काही हरकत नाही पण समाजबाधवांमध्ये अशा वेगवेगळ्या मोर्चाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. नेमके कोणत्या मोर्चात सहभागी व्हायचं ? असाही प्रश्न पडलेला आहे. प्रत्येक नेता आपलाच आहे आणि नेते पुढाकार घेताना दिसताहेत याचा मला सार्थ अभिमान सुद्धा वाटतो. पण प्रत्येक नेता आणि प्रत्येक समाजबांधव आपलाच असताना नेमकं कोणाच्या मोर्चात जायच?" का कोणाच्याच मोर्चामध्ये सहभागी व्हायचंच नाही अशा भरपूर प्रतिक्रीया मला समाजबांधवांकडून आल्या. मग नक्की काय करायचं असे वारंवार प्रश्न समाजबांधव करत आहेत. "धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ नये म्हणजे बरं...
मग सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांनी नेत्यांनी एकत्रित येउन चर्चा करायला हवी यासाठी सर्व समाजबांधवांनी सकारात्मक प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. तर तुमचं याबद्दल मत काय आहे हे सविस्तरपणे मला सांगितले तर खूप बरं होईल. धनगर समाजातील नेते आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी मागणी करण्याऐवजी आमदारकी मागत बसल्याचे आरोप आज समाजातून होत आहेत. त्यांनी आयोजित केलेले मोर्चे म्हणजे आमदारकीसाठीचा सर्व खटाटोफ असल्याचे अनेक समाजबांधवांनी सांगितले. खरंतर धनगर समाजाचे आमदार असायला पाहिजेतच पण आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यानंतर आमदारकीला राखीव कोट्यातून धनगर समाजाचे उमेद्वार कमी पडतील अशी वेळ येईल. त्यामुळे नेत्यांनी मोर्चा काढून आमदारक्या मागत बसणं म्हणजे भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा घात केल्यासारखा प्रकार होईल. तद्नंतर शेळ्या-मेंढ्यांची राखण करणारा माझा मायबाप कोणत्याच नेत्यांवर कधीही विश्वास ठेवणार नाही. त्यासाठी सर्व नेत्यांना एकत्रित करुन एकाच विराट मोर्चासाठी चर्चा घडवून आणायचा माझा मानस आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे??
सर्व नेत्यांनी व वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकार्यांनी सर्व मतभेद व मनभेद बाजूला ठेवून एकत्रित यावं यासाठी तुम्हालाही खारीचा वाटा उचलावा लागेल.
यावरती तुमचं जे काय म्हणनं आहे ते सविस्तर कळवावे. निशब्द राहून तुमचे विचार मला समजणार नाहीत तर तुम्हाला जे योग्य वाटते ते मला निसंकोचपणे सांगावे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!

      👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆
(तुमचं वैयक्तिक मत +917666994123 या नंबरवरती मेसेज, व्हाटसप अथवा कॉल करुन कळवावे)

Wednesday, 23 September 2015

आरक्षणाची अंमलबजावणी का आणि कशासाठी???

रविवार दि ४ अॉक्टोबर २०१५  रोजी  दु: २:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, पटेल चौक, गणपती पेठ सांगली येथे "आदिम जमात धनगर समाज एक सायंटिफिक प्रबोधन" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त युवा वर्ग महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केलेले आहे.
गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाजाला जाणूनबूजून अनुसुचित जमातीच्या सवलती दिल्या नाहीत पण आज सनातनी संस्थांच्या शिकवणीतून आणि प्रस्थापितांच्या नादाला लागून धनगर समाजातीलच काही समाजबांधव आम्हाला आरक्षणच नको समानता हवी असे म्हणत अज्ञानपणाच्या आणि मुर्खपणाच्या बाता करताना दिसून येताहेत. धनगर समाजाला अथवा अन्य इतर समाजाला स्वातंत्र्यानंतरच आरक्षण दिले गेले  अथवा राज्यघटनेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली अशातला विषय नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळातही आरक्षणाचे जनक छत्रपति राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरवात केली होती.
आरक्षण पद्धत बंद करुन या देशात समानता असायला हवी असं प्रत्येकाला वाटते यास मी सुद्धा अपवाद नाही. पण आजच्या घडीला शैक्षणिक संस्था, सोसायट्या, सुतगिरण्या, कारखाने, लघूउद्योग त्याचप्रमाणे मोठमोठे उद्योग, भांडवलशाहीत, प्रशासनात अन् राजकारणात कोणता समाज प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळतो याचा अभ्यास कधी केलात का?? प्रस्तापित नेते आणि सनातनी व्यवस्था व संस्था यांनी देशाची तिजोरी लूटून ते आज भांडवलदार बनले आहेत. मग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार प्रत्येकाला शैक्षणिक क्षेत्रात वाटा मिळेल असं म्हणनार्यांनी माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजातील शेळ्या-मेंढ्यांमागे भटकंती करणार्या माझ्या लहान बहिण-भावंडांचा कधी विचार केलात का?? आजचे माजलेले आणि मस्तावलेले शिक्षण सम्राट सहजासहजी माझ्या या भावडांना खरंच शिक्षण/न्याय देतील का?? या देशातील जनतेला बाबासाहेबांनी लोकशाहीचा मार्ग दाखवून दिला त्या राज्यघटनेनुसार या देशाचा राज्यकारभार सुरळितपणे चालला आहे आणि चालतही राहील पण जर आरक्षण पद्धत बंद केली असती तर आज देशात लोकशाहीची जागा ठोकशाहीने घेतली असती अन् तुम्ही-आम्ही या देशातल्या माजलेल्या धनदांडग्याची अन् सनातनी समजल्या जाणार्या औलादींची धुणी-भांडी करत बसलो असतो. हे तुम्हा-आम्हाला कधी समजणार?? कोणताही मागचा पुढचा विचार न करता नुसतंच उचलली जिभ अन् लावली टाळ्याला असंच करत बसला तर त्या सनातन्यांचे उद्दीष्ट साध्य व्हायला काही वेळ लागणार नाही. गुणवत्तेनुसार अथवा वार्षिक उत्पन्नानुसार आरक्षण असावं असं म्हणत असाल तर गेल्या ६७ वर्षापासून सतत डोंगरदरीत राहून वास्तव्य करणारा, पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरणारा, शैक्षणिक, राजकीय त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या अतिमागासलेपणा असलेला माझा धनगर समाज कधीच प्रवाहात येणार नाही अन् आमच्या उद्याच्या पिढीला शिक्षण, रोजगार, उद्योग यातील काहीच मिळनार नाही तसेच प्रशासनातून आणि राजकारणातून आम्ही शेकडो मैल दूर लोटलो जाऊ.
त्यासाठीच उद्याच्या भावी पिढीच्या भल्यासाठी आजचा युवा वर्ग जागरूक व्हाव हे उद्दीष्ट ठेवून दि ४ अॉक्टोबर रोजी सांगली येथे आदिम जमात धनगर समाज एक सायंटिफिक प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व विद्यालयीन, महाविद्यालयीन, विद्यार्थी-विद्यार्थीनींनी, समाजातील सुशिक्षित आणि सुज्ञ  युवक/युवतींनी, शिक्षकवर्ग त्याचप्रमाणे बुद्धिजीवी समाजबांधवांनी व राज्यातील सर्व संघटनांनी मतभेद विसरुन आणि राजकिय पक्षाच्या चपला बाहेर ठेवून सर्व पक्षातील नेत्यांनी सदरच्या कार्यक्रमास उपस्थीत राहून आरक्षणासंदर्भातील भ्रम दूर करून वास्तव काय आहे याचा अभ्यास करावा आणि अवलोकन करावे.
सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर तसेच आसपासच्या जिल्ह्यातून व राज्यभरातून या कार्यक्रमास येणार्या समाजबांधवांनी आपला सहभाग नोंदवावा जेणेकरून संयोजकांना उपस्थित राहणार्या समाजबांधवांची योग्य ती व्यवस्था करता येईल.
सहभाग नोंदणी आणि अधिक माहितीसाठी
संपर्क:-
अभिषेक  धडस 9021094360
नितिनराजे  अनुसे 7666994123
रेवाप्पा खोत 9623474597
मंगेश लंबाडे 8552854200
भारत  व्हणमाने 8806113906

जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।
जय यशवंत!! जय वीरांगणा भिमाई!!!

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Tuesday, 22 September 2015

धनगर समाजातील यूवकांनो जागृत व्हा...

आज एकविसाव्या शतकातसुद्धा माझा धनगर समाज अज्ञानी आणि भोळा-भाबडाच राहिलेला दिसून येतोय आणि हे नाईलाजानं म्हणावं लागतंय. आज आम्हाला आमच्या थोर महापुरुषांनी तलवारीशी खेळून प्रसंगी रणांगणात रक्त सांडून सुवर्णाक्षरात कोरून ठेवावा असा इतिहास घडवला असताना त्याचा आम्हास विसर पडतो. खरंतर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरु शकत नाहीत अन् इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. मग या देशावर ३५० वर्षाहूनही अधिक आमच्या महापुरुषांनी राज्यकारभार केला असताना आम्ही आमच्या इतिहासापासून अजूनही वंचित का??  का आम्हाला आमच्या महापुरूषांची ओळख झाली नाही?? का आम्हाला त्यांचा इतिहास माहितच पडला नाही.??? एकीकडे युरोप खंडासारख्या तंत्रज्ञान विकसित देशामध्ये रणरागीणी कर्मयोगीणी लोककल्याणकारी महाराणी अहिल्यामाईंच्या प्रशासनाचा आदर्श समोर ठेवून त्या त्या देशांचे प्रशासन/राज्यकारभार सुरळितपणे चालवला जातो. पण ज्या देशात अहिल्यामाई जन्माला आल्या त्या देशामधील प्रशासनाची गोष्ट दूरच ठेवा पण अहिल्यामाईंच्या वारसदारांनादेखिल याबद्दल काहीच माहित नसावं??  अरे अटकेपार झेंडे फडकवले ते अभिमानाने सांगतो, मल्हार आया मल्हार आया असं म्हणताच दुश्मनांना कापरं भरायचं. एवढी ताकद मल्हाररावांच्या नावातच होती. पानीपतची लढाई मराठ्यांच्या जीवावर बेतली आणि त्याला सर्वस्वी पेशवे जबाबदार होते कारण पेशव्यांनी मल्हारतंत्र वापरले नाही. ही लढाई जिंकणारा अफगाणिस्तानचा अब्दाली मल्हाररावांच्या तलवारबाजीवर फिदा होऊन मल्हाररावांवर कौतुकास्पद लिहून जातो. पण भारतातले परिणामी महाराष्ट्रातील अतिज्ञानी जातीयवादी इतिहासकार धुरंदर लढवय्ये राजे मल्हारराव होळकरांवरती पाणीपतमध्ये झालेल्या पराभवाचे खापर फोडत बसतात. मग आम्हाला मल्हाररावांच्या गणिमीकाव्याची अर्थातच मल्हारतंत्राची जाणीव का नसावी?? आजच्या एकविसाव्या शतकात सुद्धा धनगर समाजाला खरोखरच मल्हारतंत्राची उणीव भासते आहे हे नाकारू शकत नाही.
आमचा खरा इतिहास लपवून ठेवल्याचं आम्ही वारंवार म्हणतो, इतरांना सांगतो आणि भरसभेतून  बोंबलतो आणि प्रस्तापित आणि सनातनी व्यवस्थेला दोषी ठरवतो. पण खरंच आमच्या समाजातील युवकांना इतिहासाचा अभ्यास करायची आवड आहे का?? समाजातील युवकांना इतिहास अभ्यासायची सवय आहे का?? इतिहास खरा लिहलेला असो अथवा खोटा, त्या त्या इतिहासकारांनी त्यांच्या स्वार्थापोटी लिहलेला इतिहास खरा की खोटा हे तेव्हाच समजणार जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू. पण जर लिहलेला इतिहास खोटा वाटत असेल तर मग खरा इतिहास काय आहे याचं संशोधन करून खरा इतिहास समाजासमोर मांडता येईल. पण उठ की सुठ प्रस्तापित आणि सनातनींना नावे ठेवण्यात काय अर्थ आहे?? मान्य आहे की त्यांनी आम्हावर अन्याय केला, जाणूनबुजून आमच्या पुर्वजांचा इतिहास लपवून ठेवला.पण अन्याय करणार्यांपेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार ठरतो. मग सदैव असंच अन्याय सहन करत रडत बसायचं का अन्यायाच्या विरोधात मुठ उगारायची??  आज संजय सोनवनी सर यांच्या सारख्या थोर इतिहासकारांनी "धनगरांचा गौरवशाली इतिहास" लिहून ठेवला आहे. विख्यात लेखक तथा इतिहासकार आदरनीय होमेश भुजाडे सर यांनी देखिल धनगर समाजातील महापुरुषांचा खरा इतिहास समाजासमोर ठेवला आहे. धनगर समाजातील बुद्धिजीवी वर्ग समाजप्रबोधन करण्यासाठी लेखणीरुपी तलवार घेऊन एकेकाची काळीजं चिरुन टाकावीत अशा सडेतोड शब्दात समाजाच्या अज्ञानपणावर प्रत्यक्ष अप्रत्यिक्षरित्या वार करून समाज जागृती करताहेत पण माझ्या धनगर समाजातील युवक/युवती तो खरा इतिहास आणि समाजप्रबोधनात्मक विचार कीती गांभीर्यानं अभ्यासणार, वाचणार आहेत याची शंका वाटते. कारण आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाचन करायला कोणाकडे वेळ आहे?? सर्वांकडे स्मार्ट फोन आल्याने या स्मार्ट दुनियेत वाचन करणारा युवा वर्ग फार कमी प्रमाणात आहे. या अत्याधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाबरोबरच वाचन, चिंतन, मनन, आकलन व अवलोकन या पाच शस्त्रांचा दैनंदीन जीवनात वापर केला तर १००% आपल्या धनगर समाजातून लेखक/कवी/साहित्यिक तयार होतील, प्रत्येकामध्ये स्वाभिमानाची आग निर्माण होईल, प्रत्येकजण अन्यायाच्या विरोधात पेटून उठेल. थोर महापुरुषांचा इतिहास जर अभ्यासला तर प्रत्येकाच्या नसानसात थोर महापुरुषांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे धनगर समाजबांधवांची होणारी ससेहोलपटही थांबेल. धनगर समाजातील सुशिक्षित युवकांनी सुरवात स्वतापासून केली तर उद्या वाड्या वस्त्या, गाव तसेच शहरातील युवा वर्ग जागृत होईल अन् अन्यायाच्या विरोधात पेटून उठेल. यासाठी समाजबांधवांनी समाजोपयोगी पुस्तकं, कथा कादंबरी वाचाव्यात कारण जर मस्तकं सुधरायची असतील तर पुस्तकं वाचली पाहिजेत. तरच उद्या धनगर समाजातील पोरं देशाचं प्रशासन आणि राज्यकारभार चालवण्या लायक बनतील, अन्यथा दोन रूपयांची कवडी देणार्या नोकर्या आणि शेळ्या-मेंढ्यांची राखन करुन अविरत भटकंती करणं आमच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. धनगर समाजातील युवकांनी थोर महापुरुषांच्या जयंत्या आज डी जे लावून साजर्या करण्यापेक्षा अहिल्यामाईंसारख्या महान जगविख्यात प्रशासक कशा होत्या, त्यांच्या विचारांचा,प्रशासनाच्या आणि राज्यकारभाराच्या कार्यपद्धतीचा आजच्या दैनंदीन जीवनात अवलंब कसा करता येईल यादृष्टीनं अभ्यास करुन त्यासंबंधी प्रबोधन केलं तर भारताचं प्रशासन धनगर समाजातील युवक/यूवती चालवतील यात काही तीळमात्रही शंका नाही.

।। जय मल्हार।। जय अहिल्या।।

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Thursday, 17 September 2015

रणरागीणी वीरांगणा भिमाई होळकर


भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आद्यमहिला स्वातंत्र्यसेनानी सेनानी विरांगणा भिमाई होळकर यांना पुर्वीच्या इतिहासकारांनी जाणूनबुजूण उपेक्षित ठेवलं असा आरोप करायला मला वावगं वाटणार नाही. खरंतर त्यावेळचे इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते. भारताच्या आधुनिक इतिहासामद्ये झाशीच्या राणीचा उदो उदो करून तिचा इतिहास आम्हासमोर ठेवला पण झाशीची राणी कधीच तलवार घेऊन रणांगणात उतरली नाही तर इंग्रजांशी बंड करुन झुंज देणारी  ती राणी लक्ष्मीबाई नसून  विरांगणा झलकारीबाई होती हा खरा इतिहास आहे. आणि या झलकारीबाईंना देखिल उपेक्षित ठेवायचं काम इतिहासकारांनी जाणूनबुजूनच केलेलं आहे.
दुसरा नेपोलियन बोनापार्ट म्हणून जगभर ओळखले जाणारे आणि राजा शिवछत्रपति नंतर स्वताचा राज्याभिषेक करून घेणारे महाराजाधिराज शुरवीर धुरंदर लढवय्ये राजे यशवंतराव होळकर यांना धर्मपत्नी लाडाबाई पासून १७ सप्टेंबर १७८५ कन्यारत्न झाले त्याच विरांगणेची म्हणजेच रणरागीणी भिभाई होळकर यांची आज २२० वी जयंती. पुण्यात असताना मल्हारराव दुसरे, राजे यशवंतराव व विठोजी होळकर यांच्या डेर्यावर दौलतराव शिंद्यांनी काशीरावच्या मदतीने अचानकपणे पहाटेच्या सुमारास हल्ला केला त्यात मल्हारराव दुसरे गंभीर जखमी झाले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला. यशवंतराव होळकर त्या अंधार्या रात्री गर्दीतून कसेबसे बाहेर पडले होते या हल्ल्यात त्यांच्या हातातून तलवार निसटून पडली होती पण यशवंतरावांच्या मातोश्री यमुनाबाई, पत्नी लाडाबाई व कन्या भिमाई, तसेच मल्हारराव दुसरे यांचे पुत्र खंडेराव यांना शिद्यांनी कैद करून पुण्यात ठेवले. भिमाईंचे बालपण कैदेतच गेले. राजे यशवंतराव होळकर हे त्यांचे सावत्र भाऊ मल्हारराव दुसरे यांच्यावरील हल्ल्याचा बदला आणि पेशव्यांनी शनिवारवाड्यापुढे केलेल्या सख्ख्या भावाच्या म्हणजे विठोजी होळकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी पुण्यावर चालून आले. पुण्याच्या वाणवडी पासून हडपसर पर्यंत दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन बेभान होऊन शिंद्यांच्या सैनिकांना कापत सुटले आणि ती हडपसरची लढाई जिंकून त्यांनी मातोश्री यमुनाबाई, पत्नी लाडाबाई व भिमाई यांची सुटका केली पण ज्याच्या नावाने सुभेदारीची वस्त्रे घेऊन राज्यकारभार करायचा होता त्या मल्हारपुत्र खंडेरावांना सोबत घेऊन पेशवे कोकणात पळून गेले होते याचं दुख यशवंतरावांना होतं.
भिमाईंस वडिलांप्रमाणे म्हणजेच यशवंतरावांसासरखे घोड्यावर बसून तलवारबाजी, बाणभाले चालवायची आवड होती. कधीकधी तर फजरफटका मारण्यासाठी मुद्दामहून अट्टहास धरून भिमाई आपल्या वडिलांसोबत जायच्या. यशवंतराव होळकर पेशव्यांच्या दौलतीचा कारभार अमृतरावावर सोपवून इंदौरला निघून गेले त़च पुण्यातून पेशव्यांनी पत्र पाठवून होळकर संस्थान फिरंगी लेकसाहेबाकडे विलीन करावं असं सांगितलं होतं पण लेक साहेब नावाच्या फिरंग्याने उत्तरेत पाय पसरायला सुरवात केली होती आणि हिंदुस्थानातली अनेक संस्थाने ताब्यात घेऊन भारतावर राज्य करण्याचा फिरंग्यांचा डाव यशवंतराव होळकर ओळखून होते. पण इंग्रजांना शरण न जाता प्रत्येक लढाया जिंकत ते इंग्रजांना कापून काढायचे. कधीकधी इंग्रज अधिकारी रणांगणातून माघारी पळ काढायचे. भिमाई होळकर ही बुळे घराण्याची सून झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षाच्या आतच त्यांच्या पतीचे निधन झाले. अशा प्रकारे त्यांच्या पदरी दुख वाढून ठेवलं असताना भिमाई आपल्या वडिलांच्या सैन्यात दाखल होऊन सैन्यांचं नेतृत्व करू लागल्या. कालांतराने यशवंतरावांचे निधन झाल्यानंतर मल्हारराव (तिसरे) यांना गादीवर बसवून यशवंतरावांची दुसरी पत्नी तुळसा राज्यकारभार बघू लागल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली  विरांगणा भिमाई व मल्हारराव तिसरे हे सैन्यांचं नेतृत्व करू लागले.
महिदपूरच्या युद्धापूर्वी माल्कमने  यशवंतरावांचे सरदार गफुरखान याला फितवले व ९ नोव्हेंबर १७१७ रोजी होळकर कुटंबियांना ठार मारायचे ठरवले पण यशवंतरावांचा सुरवातीपासूनचा अनुयायी धर्मा याच्यामुळे तुळसाबाईंना ठार मारायचा माल्कमचा प्रयत्न फसला पण गफूरखानने धर्माला ठार करून त्याच्यावरच हा कट उलटवला. स्वातंत्र्यासाठी लढणार्या तुळसाचा अखेर शिरच्छेद करून माल्कमने मृतदेह नदीत फेकून दिला तिकडे महिदपूरचाया युद्धात विरांगणा भिमाई होळकर व ८ वर्षाचा मल्हारराव होळकरांच्या सैन्यांचं नेतृत्व करत सैन्यांना प्रोत्साहन देत होते त्यांचं कौतुक करताना माल्कमने लिहून ठेवलंय "आमच्या देशात असे लढवय्ये का जन्माला येत नाहीत आणि आलेच असते तर आम्ही या जगावर राज्य केलं असतं." महिदपूरच्या युद्धात होळकरांकडे पंधरा हजारांचं घोडदळ व दहा हजाराचे पायदळ होते पण ठरल्याप्रमाणे माल्कमने फितवलेल्या गफूरखानने आपले सैन्य बाजूला करून रणांगणातून पळ काढला. वाघीणीसारख्या भिमाईला फक्त ३००० पेढार्यांसोबत जीव मुठीत धरून रणांगणातून बाहेर पडावं लागलं. यशवंतराव व तुळसाबाई यांच्यानंतर भिमाई यांनी उत्तरेत इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. भिमाई लहानपणापासूनच निर्भिड होत्या त्यांच्यां डोळ्यात एक विलक्षण तेज होतं. त्या न डगमगता इंग्रजांशी लढायला सज्ज असायच्या. यशवंतराव  होळकरांप्रमाणे भिमाई सुद्दा शिस्तबद्ध आणि तोफासहित सज्ज असलेल्या इंग्रजांना वायूवेगानं कापत सुटायच्या. रणांगणात एक स्त्री सैन्याचं नेतृत्व करुन दुश्मनांना वायूवेगाने कापून काढते आहे हे पाहून माल्कम चक्क आश्चर्यानं तोंडात बोटं घालून बघत बसायचा. गफूरखानने गद्दारी केल्यानंतर विरांगणा भिमाईनं छुप्या पद्धतीनं माल्कमच्या तळावर हल्ले करून, लुटालुट करून माल्कमला अगदी हातघाईला आणलं होतं. माल्कमच्या लष्कराचा दाणागोटा लुटायच, तळावर हल्ले करायचे हे षडयंत्रच भिमाईने रचले होते. इंग्रज अधिकार्यांची पुरती दमच्छाक झाली होती. विरांगणा भिमाईनं हिंदुस्थानातील सर्व संस्थानाच्या राजांना पत्रव्यवहार करून इंग्रजाच्या विरोधात लढण्यास आवाहन केले परंतू सर्व संस्थाने इंग्रजांशी विलीन झाली होती. शेवटी भिमाई सोबत असलेले पेंढारीही माल्कमला फितुर झाले आणि त्यांनी भिमाईला कैद करून दिलं. माल्कमने अशा या रणरागीणीला तुरूंगात डांबून खून केला. रणांगणात कधीही भिमाईला इंग्रज हारवू शकले नव्हते अशा एका स्त्रीला कैद करून ठार मारणं याला कोणतं पौरूषार्थ म्हणायचं?? पण शेवटपर्यंत ही वाघिणी, रणरागीणी हातात तलवार घेऊन स्वातंत्र्यासाठी लढत राहीली. होळकरशाहीची दौलत ही रक्त सांडून मिळवलेली होती ती भिमाईंनी रक्त सांडेपर्यंत हातातून जाऊ दिली नाही. आजच्या भारतदेशवाशीयांना आध्यमहिला स्वांतंत्र्यसेनानी वीरांगणा भिमाईचा खरोखरच विसर पडला आहे ही  सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. आज अशा या विरांगणेला २२० व्या जयंतीनिमीत्त मानाचा मुजरा व विनम्र जय मल्हार!!
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।
जय यशवंत!! जय वीरांगणा भिमाई!!!

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

Wednesday, 16 September 2015

हक्कासाठी सघर्ष...एक कट्टर धनगर

हक्कासाठी संघर्ष...एक कट्टर धनगर
काल परवाची "समजेना हक्क मागतोय की भिक??" ही पोस्ट आज महाराष्ट्रभर फिरत आहे. मी स्वत: धनगर समाजातील व्हाटसपच्या ५१५ ग्रुपवरती आहेच आहे त्याप्रमाणे व्हाटसप च्या अन्य ग्रुपवरतून, ब्लॉग्स आणि फेसबूक च्या माध्यमातून ही पोस्ट लाखो समाजबांधवांपर्यंत पोहचली. परवापासून मला हजारोंच्या वरती समाजबांधवांनी फोन केले आणि माझे अभिनंदन केले. व्हाटसपद्वारे तसेच फेसबूक वरतुन देखिल समाजबांधवांनी कौतुक करून सत्य परिस्थिती असल्याचं सांगितलं. खरंतर मला माझं कौतुक करवून घ्यावयाचे नाही, मला कोणाची शाबासकी मिळवायची आहे अथवा मला प्रसिद्धी मिळवायची आहे अशातला विषय नाही. समाजकार्यासाठी प्रोत्साहन देणं गैर नाही त्यामुळे खरंतर सर्वांचे मी आभार मानतो. पण माझी तळमळ आणि माझा संघर्ष हा माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी व प्रसिद्धीसाठी नसून सर्व तळागळातील धनगर समाजबांधवांसाठी आहे. धनगर समाजातील नेत्यांचा मला खरोखरच अभिमान वाटतो आणि धनगर समाजातून जास्तीत जास्त युवक राजकारणात कसे पुढे येतील त्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो. कोणत्याही नेत्यांच्या विरोधात लिहावं असं मला मुळीच वाटत नाही पण समाजाच्या न्याय व हक्कासाठी सर्व नेत्यांनी एकत्रित यावं आणि संघटित होऊन संघर्ष करावा यासाठी मी समाजप्रबोधन करतोय. जर नेत्यांना समाजाशी काही घेणं देणं नसेल आणि ते संबंधित नेते धनगर समाजाचा फक्त त्यांच्या स्वार्थासाठी वापर करत असतील तर त्या त्या माजलेल्या नेत्यांचे कपडे फाडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आज महाराष्ट्रात धनगर समाजाच्या अनेक संघटना उदयास येवू लागल्यात. सामाजिक संघटन असायला पाहिजे त्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण एखाद्या समाजबांधवांवरती अन्याय होत असताना, समाजातील आई-बहिणींवरती अत्याचार होत असताना त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जर तुमच्या संघटना पुढे येत नसतील तर मग जाळायला संघटना काढल्यात का?? गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाजावरती अन्याय होत आला आहे आणि आजही होतोय. पण धनगर समाजाच्या नावावरती काढण्यात आलेल्या संघटना स्वार्थासाठी चालवल्या जात आहेत असा आरोप करायला मला काही वावगं वाटणार नाही. जर तुमच्या संघटनेचं उद्दिष्ट हे समाजाच्या हितासाठीचंच असेल तर मग राज्य पातळीवर आणि राष्ट्र पातळीवर सर्व संघटना व त्यांचे पदाधिकारी यांनी एकत्रित येवून चर्चा, विचार-विनीमय करावा. अन्यथा स्वताचिच जाहिरातबाजी अन् बैनरबाजी करून तुमच्या स्वार्थासाठी समाजाचा वापर तुम्ही करायचा प्रयत्न करत असाल तर ते होऊ देणार नाही. समाजाचं बाजारीकरण करून समाजाला लांडग्यांच्या अर्थातच प्रस्थापितांच्या दावणीला नेऊन बांधायचा प्रयत्न कराल तर त्या बाजारबुणग्यांचा समाचार घ्यायला मी खंबीर आहे अन् त्यांना राजकीय संन्यास घ्यायला लावून घरात बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. आज व्हाटसप फेसबुक वरतुन पाहायला भेटतंय की जो तो उठतोय अन् म्हणतोय मी मी धनगर समाजाचा नेता आहे. समाजातून नवनवीन नेते उदयास येताहेत त्याबद्दल काही वाद नाही पण प्रत्येकाने अखंड धनगर समाजाचा नेता म्हणवून घेणं म्हणजे समाजात विभाजन करत असल्याचं चित्र दिसून येतंय. जर समाजात विभाजन करायचं नसेल तर त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या विभागातून तालुक्याचे, जिल्ह्याचे नेतृत्व करून राज्यपातळी अन् राष्ट्रपातळीवरती एकत्रित यावे तरच समाज संघटित झाल्याचं दिसून येईल. अन्यथा प्रत्येकजण आरक्षणाचं श्रेय आपल्याच पारड्यात पडावं म्हणून उपद्व्याप करत बसला तर पुढच्या १०० पीढ्या जरी बरबाद झाल्या तरी आरक्षण मिळणार नाही हे सुद्धा तितकच सत्य आहे. यासाठी धनगर समाजातील पोटजाती बाजूला ठेऊन, धनगर समाजाच्या नेत्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता आजी/माजी आमदारांनी एकत्रित येऊन चर्चा करावी आणि एखादा दिवस निश्चित करून नागपूर विधानभवनावर "विराट जन आंदोलन" उभा करावं. २५००००० लाखांच्या वरती धनगर समाजाला नागपूर विधानभवनावर एकत्रित आणायची जबाबदारी माझी राहील पण वेगवेगळे मोर्चे आयोजित करून राजकिय पोळी भाजून घ्यायचा तुमचा डाव हाणून पाडल्याशिवाय सोडणार नाही अर्थातच तुमचा स्वार्थापोटीचा मोर्चा यशस्वी होऊ दिला जाणार नाही. ही विनंती समजा नाहीत धमकी. कारण प्रस्तापितांची खेळी आहे की तुम्ही वेगवेगळे मोर्चे आयोजित करून समाजात विभाजन घडवून आणावं जेणेकरुन धनगर समाजाला आपल्या ध्येयापर्यंत सहजासहजी पोहचता येणार नाही. हे प्रस्तापितांचे राजकारण आज तरी समजून घ्या तुम्ही वेगवेगळे मोर्चे काढून जर विधानभवनावर गेला तर आपलंच हसू होईल यासाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एकाच दिवसी संघटितपणे निश्चित केलेला मोर्चा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक समाजबांधव प्राणपणाने कार्य करेल पण वेगवेगळे मोर्चे जर विधानभवनावर घेऊन जात असाल तर तुमच्या स्वार्थीपणाचं उद्दीष्ट कधीही साध्य होऊ देणार नाही.

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆