Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 11 September 2018

रामभाऊ लांडे म्हणजेच... ✍️नितीनराजे अनुसे

रामभाऊ लांडे म्हणजेच,
धनगर समाजाला मिळालेला "कोहिनुर हिरा"
        सामाजिक चळवळीमधील माझ्या दृष्टीक्षेपातील आजपर्यंतचं अनन्यसाधारण, मनमिळाऊ, अभ्यासू तसेच परखड व्यक्तिमत्त्व म्हंटलं तर नकळतपणे रामभाऊंचेच नाव येते. धनगर समाजाचे प्रबोधन आणि समाजजागृती यामध्ये त्यांनी खरंतर जीव ओतून दिला आहे. होळकरशाहीचे अभ्यासक म्हणून महाराष्ट्र राज्यभर आज त्यांची ओळख आहे. जेष्ठ साहित्यीक आदरणीय होमेश भुजाडे सर तसेच थोर साहित्यिक संजय सोनवणी सर यांच्या पाठोपाठ होळकर शाहीचा इतिहास उकरून समाजाच्या पुढ्यात मांडण्यासाठीच जणू काय रामभाऊंनी शपथ घेतलेली असावी. शिवाय धनगर आरक्षण चळवळीमध्ये देखील आदरणीय रामभाऊ लांडे यांचे मोलाचे योगदान आहे. सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा असो अथवा समाजावर जिथे कुठे अन्याय होत असेल तर रामभाऊ लांडे साहेब तिथे पोहचून शहानिशा करत असतात व समाजावर, समाजातील माता-भगिनींवरती होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडतात. प्रगल्भ बुद्धिमत्ता लाभलेल्या या परखड व्यक्तिमत्त्वाबद्दल अर्थातच कोहिनूर हिऱ्याबद्दल मी लिहावे तेवढे कमीच आहे कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील समाजबांधवांना निस्वार्थीपणाने समाजासाठी लढणाऱ्या, झटणाऱ्या आणि झगडणाऱ्या या कोहिनूर हिऱ्याची चांगलीच पारख आहे. अशा या व्यक्तिमत्वाचा आज जन्मदिवस त्या निमीत्ताने त्यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५ ३००० ४१२३
https://nitinrajeanuse123.blogspot.com

Saturday, 8 September 2018

शिक्षकांना संरक्षणाची मागणी का करावी लागते? :नितीनराजे अनुसे

शिक्षकांना संरक्षणाची मागणी का करावी लागते?
                       लेखन :- ✍️नितीनराजे अनुसे
     काल परवाच्या वर्तमानपत्रात मला वाचायला मिळाले की ५ सप्टेंबर रोजी जो शिक्षकदिन देशभर साजरा झाला त्यामध्ये शिक्षकांनी सरकारकडे संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. खरंतर भारत देशाव्यतीरिक्त अन्य काही देशांमध्ये गुरूंना (शिक्षकांना) सर्व क्षेत्रात व्ही आय पी दर्जा दिला जातो  परंतु त्याउलट भारतातील शिक्षकांना संरक्षण मिळावे अशी मागणी का करावी लागली? याचा विचार करत असतानाच गुलामांचा मुक्तिदाता म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे असे अमेरिकेचे ख्यातनाम माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहाम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना एक राष्ट्राध्यक्ष नव्हे तर एका वडिलांच्या नात्याने लिहलेले पत्र मला आठवले आणि त्यातील उपदेशात्मक शब्द आजच्या काळात उचित ठरणारे आहेत. ते पुढीलप्रमाणे...
        "अजून त्याला खूप शिकायचे आहे. प्रत्येक माणूस प्रामाणिक आणि सत्यवचनी असू शकत नाही हे मी जाणतो; पण शक्य असेल तर, पुस्तकांमध्ये किती जादू असते हे त्याच्या लक्षात आणून द्या. तसेच, निसर्गाच्या अनाकलनीयतेबद्दल विचार करायला त्याला वेळ द्या. पक्षी कसे उडतात, सूर्यप्रकाशात मधमाशा कशा गुणगुणतात आणि हिरवाईने नटलेल्या डोंगरावर फुले कशी फुलतात, याचा विचार करायला त्याला प्रवृत्त करा. दुसऱ्याची फसवणूक करून, लबाडी करून यश मिळवण्यापेक्षा अपयशी झालेले चांगले, हे त्याला शिकवा. त्याचे विचार सगळ्या जगाने जरी मान्य केले, तरीही त्याला मनापासून काय वाटते यावरच विश्वास ठेवायला त्याने शिकलेच पाहिजे. सभ्य माणसांशी सभ्यतेने वागायचे आणि असभ्य माणसांशी कठोरपणे वागायचे, हे त्याला शिकवा. सामान्य लोकांच्या कळपात मेंढरासारखे न राहता, त्या गर्दीपासून वेगळा एकटेपणाने तो ताठ उभा राहू शकेल, एवढा त्याला कणखर बनवा. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यायचे; पण त्यातले जे म्हणणे सत्याच्या कसोटीवर उतरणारे आणि योग्य असेल, तेच स्विकारायचे हे त्याला शिकवा.
         समोर उभ्या ठाकलेल्या संकटाचा हसतमुखाने सामना करायचा आणि डोळ्यातून आपसूकच ओघळणाऱ्या अश्रूंची शरम बाळगायची नाही, हे त्याला शिकवा. तऱ्हेवाईक माणसांशी जशास तसे वागायला आणि साखरपेरणी करत बोललेल्या शब्दांपासून सावध राहायला त्याला शिकवा. त्याचे सामर्थ्य आणि त्याची बुद्धी त्याला त्याने महत्त्वाचे स्थान दिलेच पाहिजे; पण कुठल्याही परिस्थितीत त्याने आपले मन आणि आत्मा यांची फसवणूक करता कामा नये. स्वतःचे म्हणणे, वागणे बरोबर आहे याची त्याला खात्री असेल, तर त्याविरुद्ध उठवल्या जाणाऱ्या गदारोळाकडे त्याने दुर्लक्ष करायला हवे, हे त्याला समजावून सांगा. त्याच्याशी हळूवारपणे वागा; पण त्याला अवाजवी संरक्षण देऊ नका; कारण फक्त दु:खात आणि कठीण प्रसंगातच माणसातले उत्तम गुण झळाळून उठू शकतात.
       त्याला इतका धीट, निर्भय बनवा की, प्रसंगी तो त्याचा आवाज उठवू शकेल आणि स्वतःची मर्दुमकी गाजवण्यासाठी निश्चयपूर्वक  प्रयत्न करेल. त्याला हेही शिकवा की, त्याने स्वतःवर विश्वास ठेवायला हवा, म्हणजे 'माणुसकी'वर तो विश्वास ठेवेल.
       माझ्या मुलाच्या बाबतीत माझ्या खूप आकांक्षा आहेत, त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या बाबतीत तुम्ही मला काय मदत करू शकता, हे पाहण्याची मला उत्सुकता आहे.
      माझा मुलगा हा एक गोड आणि उत्तम मुलगा आहे, यात शंकाच नाही."
                     -अब्राहम लिंकन
         कधीकाळी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनुसेवाडी (निंबवडे) ता.आटपाडी जि.सांगली या शाळेत असताना गुरूजींनी भिंतीवर टांगलेल्या भल्यामोठ्या चार चार्टवरतीचं हे अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना लिहलेले पत्र आणि त्यावरची अक्षरे आज नकळतपणे आठवली. एक पालक अर्थातच वडील या नात्याने राष्ट्राध्यक्ष असताना अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना उपदेश केला होता. मात्र  दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखणाऱ्या, गावोगावी भटकंती करणाऱ्या आमच्या आई-वडिलांनी खरंतर शाळेचे तोंड कधीच पाहिले नव्हते अथवा अशाप्रकारचे पत्र त्यांना कोणी ऐकवले नव्हते तरीही त्यांचा शाळेतील गुरूजींवरती/मुख्याध्यापकांवरती एवढा विश्वास होता की गुरूजीच आपल्या पाल्याला उत्तम ज्ञान देऊ शकतात जे आपल्या पाल्याला व्यवहारीक जीवनात उपयोगी पडेल. त्या काळात जर पाल्याने अर्थातच मुलाने/मुलीने घरी अथवा इतरत्र कुठेही आणि काहीही चूक केली, बेशिस्तपणे वागला/वागली तर पालक स्वतःहून शाळेत येऊन गुरूजींकडे तक्रार करून त्या पाल्याला शिक्षा द्यायला सांगत होते. शिक्षकांनी शिक्षा दिल्यानंतर पाल्य पुन्हा तशी चूक करणे अथवा बेशिस्तपणे वागणे शक्यच नव्हते  कारण त्या काळात शिक्षकांना(गुरूजींना) पालकांचा पाठिंबा होता आणि त्यातूनच शिस्तबद्ध विद्यार्थी घडत होते. परंतु त्या तुलनेत आजच्या काळात शिक्षणाच्या बाबतीत काही बदल झाल्याची जाणीव न कळतपणे होऊन जाते. आजकाल जर शिक्षकांनी (सरांनी) जर विद्यार्थ्यांना केलेल्या चुकीबद्दल शिक्षा दिली अथवा अभ्यासासंदर्भात विद्यार्थ्यांनी काहीतरी नवीन शिकावे म्हणून शिक्षा दिली तर तो विद्यार्थी पालकांकडे तक्रार करतो आणि पाल्यांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांला का शिक्षा केली असा जाब विचारला जातो. शिवाय कधीकधी 'आमचा मुलगा शिकू अथवा न शिकू तुम्हाला पगार मिळतोय ना? कमी तर होत नाही ना? पुन्हा जर आमच्या मुलाल/मुलीला हात लावाल तर बघा? अशी धमकी देखील दिली जाते तेव्हा शिक्षक हा नावासाठीच 'गुरू' म्हणून शिल्लक राहतोय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. कारण आजच्या पालकांचा जर शिक्षकांना पाठिंबा नसेल आणि स्वतःच्या पाल्यांना पाठिंबा असेल तर मग  शिक्षकांनी (गुरूंनी) काय फक्त पगारासाठी नोकऱ्या करायच्या का? असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात गोंधळ घालून बसलाय...
🙏माझ्या सर्व गुरूजनांना आणि सर्व पालकांना समर्पित🙏
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
https://nitinrajeanuse123.blogspot.com  

Wednesday, 5 September 2018

माझा महाराष्ट्र तरसला... ✍️किर्ती नितीनराजे अनुसे

हा हा म्हणता म्हणता
तु केरळमध्येच बरसला....
        पावसा तुझ्या एका थेंबासाठी
        माझा महाराष्ट्र तरसला,
        माझा महाराष्ट्र तरसला....
नको नको म्हणता म्हणता
तु इथे बेभान होऊन पडला...
पण पाण्यावाचून माझा महाराष्ट्र
तिथे धाय मोकलून रडला...
        असला कसला रे न्याय तुझा
        करितोस उगाचि भेदभाव
        आता तुच सांग पावसा मला
        काय ठेऊ मी तुझे नाव...?
डोकं खूपसून गुडघ्यामध्ये
ढसा-ढसा रडतोय शेतकरी बाप...
मग तूच सांग आता आम्हाला
आमच्याकडून काय झाले रे पाप....
        बरसलास तु इथे असा...
        विस्कळीत केलेस जनजीवन
       मग कसे काय आम्ही म्हणू
       पाणी हेच आहे जीवन....
अवखळ होऊन एकाच ठिकाणी
बरसनं तुझं झालं आहे अति,
एकदा जरा जाऊन बघ माझी शेती
अजूनही कोरडीच आहे तेथील माती....
      भेगाळलंय रान सारं,
      थेंबासाठी तरसून झालंय तप्त...
      तरीही तु घेतली उडी इकडे,
      अन् देवाची नगरी तु केलीस उध्वस्त....
                -किर्ती नितीनराजे अनुसे
                     नितीनराजे अनुसे

Sunday, 2 September 2018

आमखासवरील धनगरांच्या भुकंपाचे दिल्लीला हादरे : नितीनराजे अनुसे


औरंगाबाद येथील आमखास मैदानावर ऐतिहासिक मोर्चाला संबोधित करताना महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब.
आमखासवरील धनगरांच्या भूकंपाचे  दिल्लीला हादरे...
                         ✍️नितीनराजे अनुसे
        एकेकाळी महाराष्ट्र राज्याच नव्हे तर अखंड भारत देशभर प्रशासन आणि राजकारभार करणारी अर्थातच राजा समाज असणारी धनगर जमात आज आपल्या न्याय व हक्कासाठी लढत आहे झटत आहे आणि झगडत आहे. कोणीही उठले की सुटले आंदोलन मोर्चे करायला काही दुधखुळे नाहीत... त्यापाठीमागे प्रचंड तळमळ आणि अन्यायाच्या विरोधातील प्रचंड चीड असते आणि त्याचेच ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे औरंगाबाद येथील आमखास मैदानावर एकच वज्रमुठ घेऊन एकवटलेला महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज. धनगरांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन गेल्या ७० वर्षांपासून या जमातीवर विनाकारण  वारंवार अन्याय व अत्याचार होत राहिला त्यास आजपर्यंतचे राज्य सरकार परस्पर कारणीभूत असून धनगर जमातीला त्यांच्या न्याय व हक्कापासून दूर ठेवणे यासारखा दुसरा मोठा देशद्रोह कोणताच नाही. 
समतेच्या पिवळ्या झेंड्याचे ध्वजारोहण करताना जेष्ठ समाजबांधव बल्लाळ महाराज

        शुक्रवारी ३१ ऑगस्ट २०१८ रोजी औरंगाबाद येथे जो ऐतिहासिक मोर्चा झाला त्या मोर्चाच्या अगोदर उलट-सुलट चर्चा होताना दिसत होत्या कोणी महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ गोपीचंद पडळकर साहेब व मा.उत्तम जानकर साहेब यांना भाजपचे दलाल म्हणून संबोधत होते तर कोणी भाजपची तितरं म्हणून त्यांचा उल्लेख करत होते. असो,  प्रत्येकाला आपापले मत व्यक्त करण्याचा संविधानिक अधिकार आहे. परंतु त्यांच्या आरोपाचे खंडन करण्याची मला काही गरज वाटत नाही कारण ते मोर्चा पाहून अथवा मोर्चामधील भाषण आणि उपस्थित जनसमुदाय यातून त्याचे उत्तर संबंधित समाजबांधवांना मिळालेच असेल. धनगरांचा मोर्चा रोखण्यासाठी राज्यसरकारला प्रशासकीय व्यवस्थेची गरज भासते असे का? मग तिथे रेल्वे विभाग असो, पोलिस सेवा अथवा प्रशासन विभाग असो... त्या विभागात धनगर समाजाची पोरं/पोरी जर IAS/IPS असती तर धनगर समाजाला आंदोलन करायची गरज कधी पडली नसती आणि आंदोलकर्त्यांना रोखायची देखील गरज सरकारला भासली नसती. दुसरा कोणता अभ्यास करत बसता वरील गोष्टीचा आणि घटनेचा अभ्यास त्या (सुज्ञ?) मुख्यमंत्र्यांनी करावा ज्यांनी औरंगाबादला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करायला रेल्वे प्रशासनाला भाग पाडले.
ड्रोन कैमरा द्वारे घेतलेले छायाचित्र
आमखास मैदानावर उपस्थित असलेला विराट धनगर समाज

      खरंतर औरंगाबादच्या आमखास मैदानावर जेवढा धनगर समाज उपस्थित राहिला होता तो एकूण लोकसंख्येच्या १०% देखील नव्हता कारण धनगर समाजातील जवळपास ५०% धनगर जमात आजही शेळ्या-मेंढ्या राखतेय तर ३०% धनगर समाज शेतीवरती अवलंबून आहे, १६-१७% धनगर समाज  छोट्या मोठ्या नोकऱ्या तर ३% धनगर समाज शासकीय नोकरी आणि व्यवसाय या क्षेत्रात कार्यरत आहे. कोणत्याही मोर्चात माझा सर्वच मेंढपाळ बांधव सहभागी होऊ शकत नाही तर नोकरदार वर्ग महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहणार होता परंतु आंदलनाची दाहकता, पार्श्वभूमी तथा आक्रमता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याच्या दळभद्री सरकारने मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक तसेच नागपूर वरुन औरंगाबादच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करून आंदोलन हानून पाडण्याचा प्रयत्न केला त्यासाठी वाटेल त्या कुरघोड्या केल्या. हे आंदोलन भाजप पुरस्कृत असल्याचे थोतांड देखील त्यांनी माजवले परंतु प्रसतापितांचे ऐकून हार मानतील ते धनगर कसले? मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या बसने, मोटारसायकलवरुन धनगर समाजबांधव औरंगाबाद येथील आमखास मैदानावर पोहचले आणि महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ मा.गोपीचंद पडळकर साहेब व मा.उत्तमराव जानकर साहेब यांच्या प्रयत्नाला त्यांच्या तळमळीला यश आले आणि अखेरच्या धनगर आरक्षण लढ्याचा औरंगाबाद येथील आमखास मैदानावरील मोर्चा यशस्वी झाला. त्याबद्दल प्रत्येक स्वाभिमानी धनगर समाजबांधवांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. तरीही एवढ्यावरच भागणार नाही तर धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसूचित जमातीच्या सवलती जोपर्यंत धनगर समाजाला मिळत नाहीत आणि अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (S T Certificate) जोपर्यंत धनगर समाजातील शेवटच्या व्यक्तीला मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार. तोपर्यंत सरकारला बेजार करून त्यांच्या नाकीनऊ आणून सोडा. महाराष्ट्र राज्याच्या नवव्या परिशिष्टात अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर जी जमात आहे ती दुसरी तिसरी कोणती धनगड जमात नसून ती फक्त धनगर हीच जमात आहे त्यामुळे लक्षात ठेवा या भारतामध्ये भिक मागून तुम्हाला कधीही काहीच मिळत नाही जर पाहिजेच असेल तर लाथ घालून हिसकावून घ्यायची सवय धनगर समाजाने लावून घेतली पाहिजे. 
महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब

            गेल्या दोन महिन्यांपासून घरदार सोडून गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तमराव जानकर साहेब अहोरात्र तळमळीने पोटतिडकीने समाजासाठी पायाला भिंगरी लावून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ते झटले आणि झगडले प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समाजबांधवांनी देखील हा मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून तन मन धनाने मदत केली. धनगर समाजाचं दैवत असलेले आदरणीय आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब हे त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत त्यांच्या ऐवजी मोर्चाला उपस्थित असलेले धनगर समाजातील जेष्ठ व्यक्ति आदरणीय शिवाजी बल्लाळ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली धनगर आरक्षणाचा मोर्चा पार पडला हे मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कोणत्याही जाती-धर्माला न दुखवता, कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय मालमत्तेला हानी न पोहचवता अद्भुतरम्य तथा ऐतिहासिक मोर्चा पार पडला याचे श्रेय प्रत्येक धनगर समाजबांधवांना जाते. महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या रूपाने समाजाला खरंतर पुन्हा एक क्रांतीसुर्य मिळाला थोडक्यात सांगायचे झाल्यास युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्यामध्ये आम्ही क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांना पाहतोय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. काही जण म्हणत होते की गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तम जानकर साहेब यांना आमदार खासदार व्हायचे असेल म्हणून त्यांना आता समाज आठवला. अरे मग तुम्ही त्यांच्याच भोवती घिरट्या मारुन कशाला भुंकत बसताय, होऊ द्या ना त्यांना आमदार खासदार आणि तुम्ही पण व्हा. या महाराष्ट्र राज्यात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत तुम्हाला वाटेल त्या मतदारसंघातून निवडणूक लढवा सर्व धनगर समाज तुमच्या पाठीशी आहे. कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त १०० तरी आमदार आणि खासदार धनगर समाजातून विधानसभा आणि संसदभवन मध्ये जायला हवेत. आपल्याच माणसांचे पाय ओढत बसण्यापेक्षा खेकडा प्रवृत्ती बाजूला ठेवून आपल्याच माणसांना सपोर्ट करा तरच समाजावरील अन्याय व अत्याचार थांबेल.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

Thursday, 30 August 2018

परिक्षा धनगरांच्या एकीच्या बळाची : नितीनराजे अनुसे

परिक्षा धनगरांच्या एकीच्या बळाची : नितीनराजे अनुसे
       गेल्या ७० वर्षापासून आजपर्यंत माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती विनाकारण अन्याय व अत्याचार होत आला आहे ते आम्ही निमूटपणे सहन करत आलो पण जातीचा धनगर आता शांत बसणार नाही.  आर नाहीतर पार ही भूमिका घेऊन धनगर समाजातील युवा वर्ग आक्रमकपणे अखेरच्या आरक्षण लढ्यात तन मन धनाने सहभागी होतोय.  धनगर समाजाचा स्वाभिमान जागा झाला असून आता प्रस्थापितांची खैर नाही हे निश्चित आहे.
      आजपर्यंत धनगर समाज हा गटातटात विभागल्याने लढाईला यश आले नाही याला इतिहास देखील साक्ष आहे परंतु उद्या दि.  ३१ ऑगस्ट रोजी होणार्या औरंगाबाद येथील आमखास मैदानावर महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज एकत्रित येणार आहे. कधी काळी शाळेत असताना गुरूजींनी "एकीचे बळ" यावरती एक गोष्ट सांगितलेली आठवते ती गोष्ट आज मुद्दामहून तुम्हा सर्वांना सांगतोय.  "एका आश्रमात गुरू आचार्य त्यांच्या शिष्यांना शिक्षण देत असताना ते पाचही शिष्यांना आश्रमाबाहेर बोलावतात. शिष्य गोंधळून जातात की आज गुरूंनी आपल्याला बाहेर का बोलवलं असावं?  पाचही शिष्य बाहेर आल्यानंतर गुरूवर्य प्रत्येकाच्या हातात एकेक काठी देतात व ती हाताने तोडायला सांगतात.  तेव्हा एकेक करून प्रत्येकजण ती काठी गुडघ्यावर वाकवून तोडून दाखवतात.  तेव्हा शिष्यांना काहीच विशेष वाटत नाही परंतु हे झाल्यावर आता गुरूवर्यांनी एका काठीऐवजी पाच काठ्यांचा गठ्ठा तयार करून पहिल्या शिष्याच्या हातात दिला व तो गठ्ठा तोडायला सांगितले. आता मात्र खरी कसोटी होती. पहिल्या शिष्याने हवे तसे खूप प्रयत्न करून देखिल तो गठ्ठा तुटला नाही.  एवढेच नव्हे तर तो दुसर्या तीसर्या चौथ्या पाचव्या शिष्यांना देखिल तुटला नाही. शेवटी त्यानी गुरूवर्य आचार्यांना विचारले की गुरूजी आम्ही एकेक काठी सहजपणे तोडली पण हा पाच काठ्यांचा गठ्ठा आम्ही खूप प्रयत्न करूनही तुटला नाही असे का? तेव्हा गुरूवर्य आचार्य म्हणाले की तुम्ही जर जीवनात एकटेच लढत बसाल तर तुम्ही त्या एकट्या काठीप्रमाणे तुटून पडाल आणि जर तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन लढाल तर तुम्ही कधीच तुटून जाणार नाही.
       धनगर समाजातील तमाम समाजबांधवांना मला एवढंच सांगायचे आहे की आजपर्यंत आपण वेगवेगळे गटातटात लढत बसलो होतो म्हणुन आपली दखल कोणी घेतली नाही आणि इथून पुढेही घेणार नाहीत. पण उद्याच्या ३१ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील आमखास मैदानावर लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून धनगर समाजाची एकी दाखवून दिली तर जगातील कोणतीच शक्ति आपल्याला पराभूत करू शकणार नाही ही काळ्या दगडावरील रेखा आहे. एकजुटीचा नेहमी विजय होत असतो एवढी त्यामध्ये असते म्हणून एकीचं बळ महत्वाचं आहे. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळायला हवे यासाठी सर्वांनी एकत्रित येणे काळाची गरज आहे. उद्याच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करूनच धनगर समाजातील तळागळातील धनगर समाजबांधवांनी उद्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. वेगवेगळ्या चुल्हा मांडून वेगवेगळा संसार मांडत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित या.  सळसळत्या रक्ताचे वारसदार असणारा धनगर समाज कधीच षंढ होणार नाही हे अख्खा जगाला कळू द्या आणि महत्वाचं म्हणजे थंड राहून षंढ राहण्यापेक्षा बंड करून गुंड झालेले अधिक बरे.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंराजे!!
           नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        +918530004123
nitinrajeanuse123@gmail.com

Monday, 27 August 2018

...तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. :नितीनराजे अनुसे


...तर तोंडात वाजवून न्याय मिळवा. 
             📝नितीनराजे अनुसे
     केरळमध्ये झालेल्या भयानक नैसर्गिक आपत्तिजनक पूरामुळे सोशल मिडीया (फेसबुक/व्हाटसएप) पासून मी काही काळ दूर होतो. त्यामुळे खूप दिवसानंतर समाजकार्याच्या प्रवाहात पुन्हा त्याच तळमळीने, त्याच जिद्दीने, त्याच तडफडतेने तुमच्याशी संवाद साधतोय. धनगर समाजाच्या आरक्षणाचा अखेरचा लढा आज महाराष्ट्र राज्यभर चांगलाच तापलाय, त्याबरोबरच महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज देखील पेटुन उठलाय. प्रत्येक समाजबांधव स्वताला या अखेरच्या आरक्षण लढ्यात तन मन धनाने झोकून देतोय ते फक्त उद्याच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करूनच...
       धनगर समाजाने या देशाच्या विशाल भूभागावर जवळजवळ हजारो वर्ष राज्यकारभार केला त्या धनगर समाजाच्या डोक्यावर प्रस्थापित राजकीय नेत्यांनी गेल्या ७० वर्षापासून अन्यायाची तलवार सदैव टांगतीच ठेवली आहे. म्हणजेच गेल्या ७० वर्षापासून त्या प्रस्थापित औलादींचा नंगानाच चालू असताना हा समाज निमूटपणे सहन करत होता पण आता ते शक्य नाही. धनगर समाजाच्या सहनशीलतेचा आता अंत झाला असून धनगर समाजातील युवा वर्ग आता पेटून उठला आहे आणि अन्याय करणार्या प्रस्थापित औलादींना पेटवून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही असे चित्र आज महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळतेय. विश्वरूपी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीचा, धनगर जमातीच्या संस्कृतिचा, देवदेवतांचा,  राहणीमानाचा,  अभ्यास करूनच धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये सामाविष्ट केले होते तरीदेखील ७० वर्ष उलटली तरी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू केल्या नाहीत एवढा प्रचंड मोठा अन्याय धनगर जमातीव्यतिरीक्त इतर कोणत्याही जातीजमातीवर झाला नाही त्याचे कारण म्हणजे धनगर समाजाचे शैक्षणिक मागासलेपण होय. सर्वप्रथम १९८९ मध्ये  क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेब यांनी धनगर आरक्षण चळवळीला जन्म दिला त्यानंतर हळूहळू ही चळवळ फोफावत गेली परंतु स्व बी के कोकरे साहेब आपल्यात असते तर धनगर समाजाला एवढा संघर्ष करावा लागलाच नसता.
       संसदीय वाद-विवाद राज्यसभा प्रतिवेदन दि २२ डिसेंबर  १९८९ हे भारत सरकार मार्फत प्रसिद्ध होणारे राज्यसभेचे प्रतिवेदन अभ्यासले तर कळेलच की राज्यसभेमध्ये खा. सुर्यकांता पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तत्कालीन  राज्यसभेचे  सभापति महोदय  रामविलास पासवान  यांनी सुद्धा कबूल केले होते की राज्यघटनेत  महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये  अ. क्र. ३६ वरती नमूद केलेली जमात ही धांगर अथवा धनगड नसून ती धनगर अशी आहे. महाराष्ट्र राज्यातील संबंधित धनगर समाजाला राज्यघटनेनूसार अनुसूचित जमातीच्या सवलती मिळायला हव्यात त्यासाठी राज्यसरकारने केंद्र सरकारला तसे शिफारस पत्र पाठवायला हवे.  याशिवाय महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार दि १२ जुलै १९९६ व महाराष्ट्र शासन राजपत्र सोमवार दि १९ मार्च २००१ त्याचप्रमाणे जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००७-०८ व जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००९-१० या सर्व शासकीय राजपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये अ. क्र. ३६ वरती ओरॉन, धनगर असा स्पष्ट आणि शुद्ध उल्लेख आहे. परंतु आदिवासी विकास संस्था आणि आदिवासी मंत्रालय सांगते की  तो उल्लेख धनगड असा आहे आणि धनगड ही जमात आजही महाराष्ट्र राज्यात आहे. तर बुद्धि पाजळणारे पुण्यातील काही प्राध्यापक बरळतात की "धनगड जमात महाराष्ट्र राज्यात नसून नमूद केलेली जमात ही धनगर हीच आहे" हा धनगर समाजाचा दावा चुकीचा आहे. पुढे तेच दिडशहाणे स्पष्टीकरण देताना म्हणतात की पूर्वी महाराष्ट्र राज्यात धनगड ही जमात होती ती १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याचे विभाजन झाल्याने ती जमात मध्य प्रदेश मध्ये गेली त्यामुळे महाराष्ट्र राज्यात धनगड जमात सापडत नाही. मग त्या प्राध्यापकांनी आदिवासी विकास संस्थेचा अहवाल वाचला आहे का नाही कोणास ठाऊक ज्यांच्या रेकॉर्डनूसार एका व्यक्तिपासून १० वर्षात ७० हजाराच्या वरती धनगड जमात तयार होते हे काय गौडबंगाल आहे?  ही कोणती प्रजनन क्षमता असलेली जमात आहे.  बर १९६० साली जर धनगड जमात मध्यप्रदेशात गेली तर मग १९९६,  २००१, २००७-०८,  २००९-१० या शासकीय राजपत्रांमध्ये ओरॉन, धनगर हा उल्लेख कसा काय येतोय?   सरकार काय भांग पिऊन राज्यकारभार करतंय का? की त्या त्या विभागाचे सचिव दुधखुळे आहेत? जर खरंच धनगड ही जमात मध्य प्रदेशात गेली असेल अथवा नामशेष झाली असेल तर मग महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जो काही कोट्यवधींचा शैक्षणिक, सामाजिक विकास निधी येतोय त्यामध्ये धनगर/धनगड जमातीसाठी सुद्धा निधी येत असेल तर मग गेल्या ७० वर्षापासून त्या  धनगर/धनगड जमातीच्या निधीचे नक्की काय झाले?  कोणाच्या घशात तो निधी गेला?  गेल्या ७० वर्षापासून आजपर्यंत आदिवासी विकास मंत्रालय विभागातील सर्व आजी/माजी मंत्र्यांची आणि आयुक्तांची यादी काढून त्यांना जाब विचारला तर सत्य बाहेर पडेल. आणि जर खरंच धनगड जमात महाराष्ट्र राज्यात असेल तर धनगर समाज आपली मागणी माघारी घेईल नसेल तर संबंधित आदिवासी विकास संस्था, आदिवासी विकास मंत्रालय आणि धनगर समाजाची फसवणूक करणार्या आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांवरती देशद्रोहाचा खटला धनगर समाजाच्या वतीने दाखल करण्यात येईल. कारण थोर समाजसुधारक अब्राहम लिंकन म्हणतात की लोकांनी लोकांच्या हीतासाठी, लोकांकरीता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय.  मग लोकशाहीत एखाद्या जमातीवर वर्षानुवर्ष विनाकारण अन्याय अत्याचार होत असेल,  एखाद्या जमातीला ७० वर्ष न्याय मिळत नसेल तर त्या त्या राज्याचा प्रतिनिधि त्यासाठी जबाबदार ठरतो. म्हणुन आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांवरती देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा.
         गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाचा अखेरचा लढा युवकह्रदय सम्राट मा गोपीचंद पडळकर साहेब व मा. उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर चालू आहे. त्याला महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून धनगर समाजाचा, युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज आता अन्यायाच्या विरोधात पेटून उठला असून सर्व समाजबांधवांनी समज गैरसमज, राजकीय/सामाजिक मतभेद बाजूला ठेऊन या आंदोलनात सहभागी व्हावे. कोणी म्हणतील त्यांना आमदार खासदार बनायचं आहे म्हणून हा उद्योग चालू आहे तर मग होऊ द्या ना... दोन कोटी धनगर समाजातून कमीत कमी १०० आमदार तरी होऊद्या त्यात हे दोघे झाले तर काय बिघडेल? तुम्ही पण आमदार व्हा खासदार व्हा परंतु अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळायला हवे यासाठी रस्त्यावर उतरा. ३१ ऑगस्ट रोजी होणार्या औरंगाबाद येथील आमखास मैदानावर लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा आणि महत्वाचं म्हणजे तोंड वाजवूून जर न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंराजे
           नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
          +918530004123
   nitinrajeanuse123@gmail.com

Thursday, 19 July 2018

आतातरी धनगर नेते एकत्रित येऊन सत्ता स्थापन करतील का? ✍️नितीनराजे अनुसे

            २०१४ च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकी दरम्यान भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल भाषणबाजी करून धनगरांची मते खेचून घेतली. मोदींच्या त्या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप सुद्धा आमच्याकडे आहेत. भाषण करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की "या महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाने माझा यथोचित सन्मान केला त्या धनगर समाजाच्या पाठीत (अप्रत्यक्षरीत्या पवारांनी) सुरा  खुपसला" असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. शिवाय "कमीत कमी धनगर समाजाची मागणी काय आहे हे तरी ऐकून घ्यायला हवे होते." असेही ते म्हणाले होते. त्यावेळी सभामंचावर बाळासाहेब (तात्या) गावडे, ना.महादेवजी जानकर साहेब तसेच अन्य धनगर नेते देखील उपस्थित होते आणि सर्वजण मोदींच्या या डायलॉग वरती उभे राहून समाजाला हातवारे करत होते.
         जेव्हा १५ जुलै २०१४ ला पंढरपूर मधून बारामतीकडे आरक्षण दिंडी निघाली तेव्हा बघता बघता २१ जुलै पर्यंत पाच ते सहा लाख धनगर समाज त्या आरक्षण दिंडीत सामील झाला. बारामतीमध्ये पिवळे वादळ घोंघावत उठले, पवारांच्या घराला सुरक्षा यंत्रणेने छावणीचे स्वरूप दिले होते. धनगर समाजात क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या खंबाटकी घाटातील आरक्षण लढ्यानंतर पहिल्यांदाच कुठेतरी आरक्षणासंदर्भात असंतोषाची लाट उसळली होती. युवा वर्ग पेटून उठला होता परंतु धनगर समाजाची मागणी नक्की काय आहे हे ऐकून घ्यायला कोणताच प्रस्तापित नेता पुढे येत नव्हता. शेवटी धनगर समाजातील युवा वर्ग उपोषणाला बसला, काहीजणांची तब्येत ढासळू लागली शेवटी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आले आणि म्हणाले की आम्हाला तुम्ही सत्तेत बसवा. सत्ता आल्यावर १० दिवसांत आम्ही आरक्षण देणार, पहिल्याच कैबिनेट मध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे सांगून उपोषण सोडायला लावले. मग सुरू झाला आश्वासनांचा खेळ धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालोय असे सांगून १५ दिवसांत निर्णय घेतो, TISS नेमल्यानंतर ९ महिन्यांत निर्णय घेऊ, अजून अभ्यास चालू आहे. असे सांगून सत्तेचा उपभोग घेत सत्तापिपासू भाजप सरकारने समाजावरती अन्याय करण्याचा अगदी नंगानाच चालवला. सोलापूर विद्यापीठ नामांतरण प्रकरणात देखील तीच अवस्था.  धनगर समाजातील नेत्यांचा वापर करून चार वर्ष सत्ता भोगली आणि शेवटी धनगर समाजाच्या हाती काय दिले तर धनगर आरक्षण विरोधी असणारा "से".
           मग अखंड धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजातील नेत्यांना मला विचारायचे आहे की तुम्ही मोठमोठ्या स्टेजवरून जाहीर भाषणं केली त्यांच्या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप आम्ही सांभाळून ठेवल्या आहेत गरज पडल्यावर त्या सोशल मीडियावरून प्रकाशित करू. समाजबांधवांना आणि त्या त्या नेत्यांच्या समर्थकांनी कृपया गैरसमज करून घेऊ नयेत कारण इथे माझ्या घरचा नव्हे तर अखंड धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि अखंड महाराष्ट्र राज्यातून ज्या प्रतिक्रिया मला येतात त्या सर्वसामान्य धनगर समाजाला जे प्रश्न पडलेले आहेत तेच प्रश्न मी इथे मांडलेत.
● नागपूर येथील सभेत बोलताना ना.महादेवजी जानकर साहेबांनी स्टेजवर बसलेल्या  मुख्यमंत्र्यांना ठासून सांगितले होते की जर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर फडणवीस साहेब तुमचा आम्ही अजित पवार करू.... मग आता त्यांचा कधी अजित पवार करणार? हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेला पडलाय.
●आरेवाडीच्या दसरा मेळाव्यात ना.राम शिंदे साहेबांनी सांगितले होते की आम्ही आरक्षणासाठी प्रयत्न करतोय आणि भाजप सरकार आरक्षण देण्यासाठी अनुकूल आहे... मग आता सरकारची अनुकूलता कुठे गेली?  आता सरकारच्या विरोधात कधी बोलणार की RSS च्या पायाखलचं मांजर बनून राहणार?
●त्याच मेळाव्यात महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणारे मा.गोपीचंद पडळकर साहेब बोलले की जर भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही तर धनगर समाजाच्या सोबत राहून भाजप सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊ... आज "अखेरचा आरक्षण लढ्यासाठी" त्यांच्या ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत पण अजून किती दिवस गप्प राहायचे? कधी आक्रमक पवित्रा घ्यायचा? सरकारला कधी जाब विचारायचा?
● खासदार विकास महात्मे साहेबांनी डिसेंबर २०१५ ला जो मोर्चा आयोजित केला होता त्याचे फलित काय झाले तर TISS चे भूत धनगरांच्या मानगुटीवर बसवले आणि अगोदरच राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या यादीत असलेला धनगर समाज अनुसूचित जमातीचे (आदिवासींचे) निकष पूर्ण करतो की नाही यासाठी त्या संस्थेमार्फत अहवाल मागवले त्याचा परिणाम म्हणजेच धनगर आरक्षण विरोधी "से". मग TISS चांगले आहे आणि भाजप सरकार आरक्षण द्यायला सकारात्मक आहे असे जाहीर सभांमधून सांगणाऱ्या महात्मे साहेबांनी सांगावे की आता काय करायचे?
● गणेश(दादा) हाके हे देखील शनिवारवाड्यावर बोलायचे फक्त भाजप सरकार आरक्षण देईल म्हणून छाती ठोकायचे आता कुठे गेले? आता सांगा कधी देईल भाजप सरकार धनगर समाजाचे हक्काचे आरक्षण?
●असे कितीतरी धनगर नेते आहेत ज्यांची यादी वाढेल तेवढी वाढवता येईल, कितीतरी सामाजिक कार्यकर्ते आहेत जे म्हणत होते की आरक्षण दिले तर फडणवीस सरकारच देईल मग आता काय? कुठे गेले राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण? कुठे गेली पोकळ आश्वासने?
            समाज नोकऱ्या सोडून, आपापला छोटा-मोठा धंदा सोडून, मेंढपाळ हे शेळ्या-मेंढ्या वाड्यात कोंढून, शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले-मुली, समाजातील माझ्या माताभगिणी आरक्षणासाठी एकत्रित येतात आणि रस्त्यावर उतरतात. पण ते सर्वजण धनगर नेते कधी एकत्रित आलेत का? सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडवण्यासाठी कधी चर्चा केली का? एकमेकांची जिरवाजिरवी करण्यासाठी जेवढी ताकद पणाला लावली तेवढीच ताकद सर्वांनी मिळून लावली असती तर भाजप सरकारचं काय घेऊन बसलाय? पौराणिक कथेतील ३३ कोटी देव जरी आडवे आले असते तरी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात 'से' दाखल करायची हिम्मत कोणाची झाली नसती. समाजामुळेच धनगर समाजातील नेते आहेत, नेत्यांमुळे समाज नाही हे धनगर नेते आतातरी लक्षात घेतील का?  आणि विशेष म्हणजे 'इगो' सारखा महाभयानक राक्षस बाजूला ठेवून धनगर नेते ज्या भाजप सरकार बद्दल गोडगोड बोलत होते त्या भाजप सरकारला याचा जाब विचारतील का? नाहीतर पुन्हा कोणाचेतरी दलाल होऊन समाजाला कोण्या लांडग्यांच्या दावणीला बांधतील? आतातरी धनगर नेते एक होतील नेक होतील, सत्ताकारणापासून डावलेल्या विषम समाज घटकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करतील आणि समाजाला न्याय मिळवून देतील. जोपर्यंत हाताची पाच बोटं सोबत असतात तोपर्यंत त्या हाताची मूठ बळकट/मजबूत राहते. आणि मूठ बळकट/मजबूत असेल तरच अन्याय करणाऱ्यांचे थोबाड वाकडे करता येते. नाहीतर विस्कटून राहिलात तर तुमची दखल कोणी घेणार नाही आणि तुमचं आस्तित्व देखील कोणी शिल्लक राहू देणार नाही यावरती जरा आत्मचिंतन करुन इतर जाती-जमातींना धनगर नेते एकत्रित येऊन खरोखर सत्या स्थापन करतील.... असा आशावाद माझ्यासारख्या सर्वसामान्य समाजमनात घुमतोय...
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
 nitinrajeanuse123@gmail.com