
धनगर म्हंटलं की रांगडा गडी, एकेकाला लाल मातीत लोळवणारा बलशाली, पैलवान (ताकदवान), बुद्धिमान, चपळ अशी कितीतरी विशेषणे लावली तरी कमीच पडतील, शत्रूंशी लढताना निधड्या छातीवर तलवारींचे वार झेलणारा लढवय्या आणि तितकाच सर्वांशी आपुलकीने वागणारा एक प्रेमळ आणि मनमिळावू व्यक्ति अशीच ओळख असणारा धनगर हा मुक्या जनावरांची शेळ्या-मेंढ्यांची तहान-भूक जाणू शकतो तर आम्हांसारख्या चालत्या बोलत्या माणसाच्या भावना समजणे त्याला काहीच अवघड नाही. पण हल्ली धनगर समाजातील संवेदनशीलताच लोप पावत चाल्लीय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
खरंतर हे इतर दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या समाजाला उद्देशून लिहीत नाहीये तर मतलबी दुनियेमध्ये स्वताचा स्वाभिमान विसरणाऱ्या धनगर समाजातील समाजबांधवांना हे उद्देशून लिहतोय कदाचित काहीजनांच्या हे जिव्हारी लागेल पण त्यागोदर मी त्यांची जाहीर माफी देखिल मागतो. कारण माफी न मागण्याइतपत तरी मी काही निर्दयी आणि निष्ठूर नाहीये. खरंतर दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे वारसदार असलेल्या जमातीला उद्देशून लिहायची गरज पडायला नको होती पण आपल्याच धनगर समाजाने मला मजबूर केले म्हणून लिहावेसे वाटले त्याचे कारण असे सोमवार दि.१२ जून २०१७ रोजी घडलेली घटना ही सर्वांना माहीतच असावी. कारण आजकालची जवळपास ७५ ते ८० % युवा पिढी फेसबुक/व्हाटसप सारख्या सोशल मिडीयामध्येच रमलेली दिसते. असो... "श्रीमंत थोरले मल्हारराव होळकर प्रतिष्ठान पुणे"चे श्री.संतोष वाघमोडे साहेब यांनी त्यांच्या फेसबुक अकौंट वरतून तसेच व्हाटसपच्या माध्यमातून सदरच्या घटनेचा सविस्तर असा वृत्तांत दिला होता शिवाय त्या पिडीत कुटूंबियांना मदत करण्याचे त्यांनी आवाहन देखील केले होते. घडलेली घटना खरंतर घडायलाच नको होती अशी अगदी ह्रदय पिळवटून टाकणारी ती घटना ह्रदयाचे पार ठोके बंद पाडणारी होती. अरे पोटच्या पोरासारखं ज्यांना जपलं, तळहातावरच्या फोडासारखी ज्यांची काळजी घेतली, चराऊ कुरणे सरकारच्या घशात गेली म्हणून ज्यांच्या चाऱ्याच्या शोधात दरवर्षी सहा-सात महिने घरदार सोडून वणवण केली, पोरंबाळं शिकून मोठे होतील खुर्चीवरची नोकरी करून चार पैसे मिळवतील म्हणून ऊन-वारा-पाऊस यांचा विचार न करता पायाच्या नडग्या वाळेपर्यंत ज्यांची राखण केली अशा काळजाच्या तुकड्यासारख्या बाळू गोपाळा शिंगटे व आबू गोपाळा शिंगटे या कुटूंबियांच्या एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ४५ शेळ्या आणि मेंढ्यांवरती निसर्गाने घाला घातला. डोळ्यादेखत पोटच्या लेकराचा मृत्यू व्हावा अशी काळजाच्या तुकड्यासारखी जपलेली जितराबं वीज पडून एका क्षणात मृत्यूमुखी पडत असतील तर काळजाचा ठोका चुकणार नाही तर आणखीन काय होणार? डोळ्यादेखत त्या वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेळ्या-मेंढ्या जेसीबी मशीनच्या साहाय्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढतानाचा तो शिंगटे कुटूंबियांचा आक्रोश कदाचित तुमच्या कानावर पडला नसावा... ज्यांच्या घरात आजपर्यंत शेळ्या-मेंढ्या नाहीत त्यांना या घटनेबद्दल कदाचित काहीच वाटले नसेल असे मी मानतो पण ज्यांच्या घरात कधीतरी शेळ्या मेंढ्या होत्या किंवा आजही आहेत त्यांची ह्रदयं नक्कीच पिळवटली असतील. पण आजची परिस्थिती जणू अशी झाली आहे की माझ्या धनगर समाजातील संवेदनशीलताच कमी झाली अाहे मग कशी काय पिळवटतील कोणाची ह्रदयं? कसे काय चुकतील कोणाच्यातरी काळजाचे ठोके?
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुकास्थित ढवळपुरी गावचे हे शिंगटे हे मेंढपाळ कुटूंब करडा-कोकऱ्यांचे आणि लेकरांचे लटांबणे घोड्याच्या पाठीवर लादून चाऱ्याच्या शोधात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका येथे पोहचले असताना सोमवार दि.१२ जून २०१७ रोजी सायंकाळी सुदवडी येथे मेंढ्या चारत असतानाच निसर्गाचा कोप झाला आणि एका क्षणात हे शिंगटे कुटूंब उघड्यावर आले. पारंपरिक व्यवसाय असला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी उदरनिर्वाचा एकमेव पर्याय म्हणून जवळपास ६ ते ७ लाखाची मालमत्ता असलेल्या शेळ्या-मेंढ्यांची डोळ्यांसमोर अगदी माती माती होऊन जात असेल कोणाचा टाहो फुटणार नाही ओ?? पण आजकाल धनगर समाजातील ह्रदय एवढी असंवेदनशील होतील असे स्वप्नातदेखील वाटले नाही त्याचे कारण असे की संतोष वाघमोडे साहेब यांनी "श्रीमंत थोरले मल्हारराव होळकर प्रतिष्ठान पुणे" यांच्यावतीने १०००० रूपये देणार असल्याचे सांगितले शिवाय समाजबांधवांनी ज्यांना जमेल त्या पद्धतीने १००, २००, ५००, १००० अशी आर्थिक मदत करून त्या उघड्यावर पडलेल्या शिंगटे कुटूंबियांना आधार द्यावा असे आवाहन केले होते. शासकीय मदत मिळेलच परंतु सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी गत असते हे सर्वांना ठाऊकच आहे परंतू धनगर समाजबांधवांना मदतीसाठी आवाहन करणारी ती पोस्ट आजपर्यंत १००० पेक्षा जास्त व्यक्तींनी व्हाटस/फेसबूकच्या माध्यमातून शेअर व फाॅरवर्ड केली शिवाय कमीत कमी ५०००० (पन्नास हजार) पेक्षाही जास्त व्यक्तींनी सदरची घटना फेसबुक/व्हाटसपच्या माध्यमातून पाहिली व ती पोस्ट आवडली म्हणून दर्शवले (किती निर्लज्जपणाचा कळस म्हणावा). शिवाय आतापर्यंत ५०० पेक्षाही जास्त फोन सदर घटनेतील पिडीत कुटूंबातील संतोष आबू शिंगटे यांच्या संपर्क क्रमांकावरती आले व मदत करण्याचे आश्वासन दिले. पण १२ जून पासून आतापर्यंत या शिंगटे कुटूंबियाच्या अकौंट वरती अवघे २४ हजार रूपये जमा झालेत. यालाच संवेदनशील समाज म्हणायचे का? नुसताच फोन करून पुळका दाखवणे आणि फेसबुक/व्हाटसप च्या माध्यमातून भावनिक आणि अतिसंवेदनशील असल्याचे दाखवणे हे कितपत योग्य आहे.?

एकीकडे अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचे हक्क मिळवण्यासाठी याच मेंढपाळ बांधवांना आणि त्यांच्या पोटच्या पोरासारख्या असलेल्या शेळ्या-मेंढ्यांना दाखवून सरकार दरबारी आरक्षणासाठी भिक मागता आणि दुसरीकडे याच मेंढपाळ बांधवांवरती आणि शेळ्या-मेंढ्यावरती जर निसर्गाचा कोप झाला, निसर्गाने घाला घातला तर प्रसिद्धी माध्यमातून तुम्ही स्वता प्रसिद्ध होता पण त्या त्या पिडीत कुटुंबाकडे दुर्लक्ष करता एवढे स्वार्थी कसे काय झाला तुम्ही? ज्या धनगर समाजाची ओळख ही शेळ्या-मेंढ्या राखणारा समाज म्हणून होते त्याच शेळ्या-मेंढ्या राखणाऱ्या या मेंढपाळ बांधवांना आपल्याच समाजातील काहीजण स्वताला ब्राह्मण समजणारे धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांना वाऱ्यावर सोडून दुय्यम दर्जाची वागणूक देत असतील तर समाज एकत्रिकरणाला काय अर्थ आहे? आंदोलनात मेंढपाळ पाहिजेत, मोर्चासाठी, रास्तारोखोसाठी त्यांच्या शेळ्या-मेंढ्या पाहिजेत पण जेव्हा याच शेळ्यामेंढ्या महामार्गावर ट्रकच्या खाली मुंगीसारख्या चिरडल्या जातात तेव्हा त्या मेंढपाळ बांधवांला साधं विचारायलाही कोणी धजत नाही किंवा पुढे येत नाही किती निर्लज्जपणाची ही गोष्ट म्हणायची? जर शेळ्या-मेंढ्यांसाठी चराऊ कुरणे उपलब्ध नसतील तर भटकंती करण्याशिवाय माझे वडिलधारे असलेल्या मेंढपाळांकडे पर्यायच नाही मग अनुसुचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ काय नुसते मुंबई-पुणे सारख्या शहरात राहणाऱ्यांना आणि कोणताही डाग न पडलेले पांढरे कपडे घालून समाजाचे लेबल लावणाऱ्यांनाच आरक्षण पाहिजे का? तसे असेल तर मग आरक्षणाच्या लढाईत माझ्या मेंढपाळ बांधवांचा आणि पोटच्या लेकरासारखं जपलेल्या शेळ्या-मेंढ्यांचा वापर करू नका तुम्हाला आरक्षण कसे मिळते तेच बघूया....
एकीकडे दारूसाठी, गुटखा, तंबाखू, विमल, पान, सिगारेट यांच्या व्यसनासाठी दिवसा हजारों रूपये खर्च करणारी भरपूर मंडळी धनगर समाजात आहेत, मित्रांना बोलावून पार्टीमध्ये एका रात्रीत ५० हाजरांपेक्षा जास्त पैसे उधळणारे देखिल धनगर समाजात आहेत, लाखो करोडों रूपयांच्या अलिशान वातानुकुलीत गाड्यांतून फिरणारे देखिल धनगर समाजात आहेत पण अतिक्रमणात घरं उध्वस्त झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीमधून रस्त्यावर आलेल्या माझ्या बेघर आणि आधारहीन गोरगरीब मेंढपाळ बांधवांना जर तुमच्याकडून १००-२०० रूपयाची मदत मिळत नसेल तर त्याच मेंढपाळ बांधवांच्या नावावर स्वताची प्रसिद्धी करणारे आणि त्यांच्याच नावावर आरक्षणाची भिक मागणारे तुमच्या सारखे स्वार्थी आणि निर्लज्ज या जगात कोणी नसतील.

अजूनही समाजात जर संवेदनशीलता शिल्लक असेल तर खालील पिडीत कुटूंबाच्या अकौंट वर तुम्हाला शक्य होईल तसे १००, २००, ३००, ५०० अथवा १००० किंवा त्यापेक्षा अधिक ज्यांच्या त्यांच्या परीने शक्य असेल त्यांनी पाठवून सामाजिक बांधिलकी जोपासावी अन्यथा समाज एकत्रितकरणाची भाषा वापरू नये.
Account Holders Name:-
Santosh Abu Shingate
ICICI Bank
Acc.No. 032101646506
IFSC code - ICICI0000321
आपल्यातीलच एक सर्वसामान्य मेंढपाळ कुटूंबातील पोरगा...
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com