Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 21 June 2022

"झुंज" दिलीस तु आता "झेप" घे ... ✍️नितीनराजे अनुसे


हेमंत बिरा मुढे इयत्ता दहावी मध्ये ९१.८०% गुण मिळवून समाजासमोर आदर्श ठेवणारा शेंडगेवाडी ता.आटपाडी जि.सांगली येथील होतकरू विद्यार्थी 

        तसं पूर्वीपासूनच आमच्या हातात लगाम आलेत, मग ते परंपरेने असो अथवा स्वकर्तृत्वावर, स्वबळावर, जिद्ध तथा चिकाटीच्या जोरावर आमच्या पूर्वजांनी इथल्या जुलमी व्यवस्थेला लावलेले लगाम असोत... आणि हो त्याला इतिहास साक्षी आहे. तद्नंतर आमच्या बापजाद्यांच्या अज्ञानामुळे, भोळ्याभाबड्या स्वभावामुळे आज इथे तर उद्या तिथे अशाप्रकारे पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेल्या भटकंती दरम्यान अर्ध्या आयुष्याचं ओझं वाहणाऱ्या घोड्यांचे लगाम तेवढे हाती राहिले. पण आम्हाला कधी लगाम खेचायची गरजच भासली नाही कारण घोड्यावर मांड टाकली तर घोडे देखील आपोआपच उधळतात आणि वायू वेगाने धुरळा उडवत पाहतो न पाहतो तोच क्षणात ध्येयाकडे झेप घेऊन निघून जातात.
         हेमंत बिरा मुढे आज परिस्थितीशी "झुंज" देत इयत्ता दहावी मध्ये ९१.८०% मिळवून तु सुध्दा अशीच एक ध्येयवेडी "झेप" घेतली आहेस की तुझ्या यशाकडे पाहून सर्वांच्याच माना उंचावल्या आहेत. शेळ्या -मेंढ्यांची पोटं भागली तर आपली पोटं भागतील आणि आपली लेकरं दोन शब्द शिकली तर आईबापाला सुख लावतील हे स्वप्न उराशी बाळगून काट्याकुट्याच्या वाटा तुडवून, अनवाणी पायानं दगडधोंड्यातून, कड्याकपाऱ्यांतून डोंगरदऱ्यांतून रक्तबंबाळ पायानं ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता दिवसरात्र मेंढ्यांचे रक्षण करणाऱ्या आई बापांनी पायाच्या पार नडग्या वाळवून घेतल्या त्यांची आणि त्यांनी केलेल्या कष्टाची आज तु किंमत राखलीस गड्या... 
         शेळ्या -मेंढ्या घेऊन भटकंती करताना कधी काय परिस्थिती ओढवेल त्याचा काही नेम नसतो हे मी देखील स्वानुभवातून चांगलेच ओळखतो. परिस्थिती माणसाला कसं जगायचं ते शिकवते हे ओळखून तु आज दहावीच्या परिक्षेतून दाखवून दिले आहेस. पण एवढ्यावरच आता थांबायचं न्हाय गड्या, तुला अजून खूप संघर्ष करायचाय. तसाही संघर्ष आपल्या पाचवीलाच पुजलाय आणि तो आपण कोळून प्यायलो आहे. आज तु जे यश संपादन केले आहेस त्याचे तुझ्या आईवडिलांच्या कष्टाला, शाळेतील शिक्षकांच्या कष्टाला, मार्गदर्शनाला आणि तुझ्या प्रचंड जिद्धीला मिळालेलं फळ आहे. अज्ञानी परंपरेने चालत आलेल्या काळोख्याच्या वस्तीत परिस्थितीच्या छाताडावर नाचून भविष्यात तु अशीच उज्वल तथा उत्तुंग भरारी घेऊन यशाच्या शिखरावर तुझ्या ज्ञानरूपी उजेडाचा झेंडा डौलाने फडकव जेणेकरून हा भोळा भाबडा समाज, समाजातील युवा पिढी तुझ्या पाऊलांवर पाऊल ठेवून त्या यशाच्या शिखरावर पोहोचेल. तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, परंतु यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी अथांग पसरलेल्या आकाशाला पायदळी तुडवण्यासाठी तुला भरभरून शुभेच्छा 💐💐💐
         ✍️नितीनराजे अनुसे
(तुझ्यासारखाच एक मेंढपाळ पुत्र)
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली