Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday 28 January 2017

स्मृति एका अविरत झंजावाताची...

आज स्मृतिदीन स्व.बी.के.कोकरे साहेबांचा
       एकेकाळी या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रस्तापित भामट्यांनी गोरगरीबांवरती, शेतकर्यांवरती आणि दुबळ्या समाजावरती अन्याय करण्याचा अगदी नंगानाच चालवला होता. या प्रस्तापितांनी चालवलेल्या अन्यायामध्ये सर्वसामान्य जनता अगदी होरपळून निघत होती. त्यातल्या त्यात ज्या धनगर समाजातील महापुरुषांनी राष्ट्रासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली रक्त सांडून बलिदान दिले, ज्या धनगर समाजाने सम्राट अशोकासारख्या राजांना जन्माला घातलं, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणार्या, या भारतभुमीवर अन्याय अत्याचार करणार्या फिरंग्यांना अक्षरश: कापून  काढले त्या महाराजाधिराज शुरवीर राजा यशवंतराव होळकरांना, क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांसारख्या शुरविरांना जन्म दिला त्याच धनगर समाजाची स्वातंत्र्यानंतर अवहेलना झाली. महाराष्ट्रातले परिणामी भारताचे राजकारण हे ठराविकच माजलेली प्रस्तापित घराणेशाही धनगर समाजाला डावलून करत होती. ज्यांना हे  सर्व  काही समजत होते ते मात्र  स्वताच्या ह्रदयावर भला मोठा दगड ठेवून प्रस्तापितांच्या नपुसंकतेचा नंगानाच उघड्या डोळ्यांनी बघत होते. हे थांबवायचं कसं? अन्याय संपवायचा कसा? हे प्रत्येकाला वाटत होते पण पुढे येणार कोण? लढणार कोण? यासाठी आवाज उठवणार तरी कोण? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत होते. प्रत्येकाला कळत होते पण वळत नव्हते.
अशातच एका सर्वसामान्य मेंढपाळ असलेल्या धनगर समाजातील कुटंबामध्ये १ जून १९६० रोजी अन्यायाने आणि अज्ञानाने ग्रासलेल्या समाजाला प्रखरतेचा प्रकाश देणारा सुर्य जन्माला आला ज्याचे नाव ऐकले तर प्रस्तापितांना आजही घाम फुटतो. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील कोकरेवाडी पो. उंडवडी येथील एक निर्भीड, नीडर व्यक्तिमत्व असलेले तरूण तडपदार युवक केमीकल इंजिनीयरींग मधील गोल्ड मेडल हासिल करणारे समाजावरती होणार्या अन्यायाची जाण असलेले यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेब ज्यांनी धनगर समाजाच्या एस.टी. (अनुसुचित जमाती) आरक्षणाच्या चळवळीला जन्म दिला. ज्या माणसानं धनगर समाजासाठी स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करुन निद्रावस्थेत गाढ झोपी गेलेल्या धनगर समाजाला जागं केलं, चालतं केलं, बोलतं केलं माजलेल्या प्रस्तापितांच्या विरोधात दंड थोपटण्यास प्रवृत्त केलं, आजच्या धनगर समाजातील तरूणांच्या नसानसात, रक्तात नवचैतन्य उभं केलं अशा एका अविरत झंजावातास २८ जानेवारी २००५ रोजी माझा धनगर समाज मुकला असेच मला म्हणावेसे वाटते.
स्व बी के कोकरे साहेब धनगर समाजाला सोडून गेले नाहीत तर धनगर समाज स्व बी के कोकरे साहेबांना मुकला असे म्हणणे योग्य वाटते कारण ना.सि.इनामदार यांची झुंज कादंबरी वाचल्यानंतर स्व बी के कोकरे साहेबांना  समाजावारती होणार्या अन्यायाची चीड येऊ लागली झुंज कादंबरीतून प्रेरित होऊन ते पेटून उठले पुढे ते इंदौर ला गेले समाजभुषण स्व.पांडुरंग गडदे मास्तर, स्व श्रीरंग वाघमोडे, मा.दुर्योधन रूपनवर साहेब, मा.रामभाऊ वाघमोडे साहेब, मा.देविदास (बापुसाहेब) हटकर सर, मा.राजू जांगळे साहेब, मा.गोरे मास्तर, धनगर समाजाची मुलुखमैदानी तोफ, सुप्रसिद्ध व्याख्याती अहिल्या कन्या प्रियदर्शनी कोकरे हिचे वडिल मा.नंदकुमार कोकरे सर तसेच अन्य लहान-थोर , नोकरदार वर्ग, अशी कितीतरी वीस-एकविसीतली मिसूरडी न फुटलेली पोरं गोळा करून समाजाला संघटित करून क्रांतीचा मार्ग अवलंबण्यासाठी यशवंत सेनेचा आराखडा बनवला फलटण जि.सातारा येथील धुळोबाच्या यात्रेमध्ये धुळदेवाचे दर्शन घेऊन भंडारा उधळला यशवंत सेनेची स्थापना करून क्रांतीची मशाल पेटवली. कोणतीही दळणवणाची व्यवस्था नसताना प्रतिकुल अशा परिस्थीतीत धनगर समाजाच्या प्रत्येक घराघरात यशवंत सेना पोहचवण्यासाठी स्व.बी.के.कोकरे साहेबांनी आणि जिवास जीव लावणाऱ्या यशवंत मावळ्यांनी महाराष्ट्र राज्यभर धुमाकुळ घातला होता. कोणत्याही पासशिवाय मंत्रालयाचे गेट धाडकन उघडणारा  उरात जिगर बाळगणारा नेता प्रस्तापितांना गुडघे टेकवण्यास भाग पाडणारा हाच तो वाघ धनगर समाजावरती अन्याय करणार्या आणि धनगर समाजाचा शत्रु असलेल्या बारामतीच्या बोक्याला खूले आवाहन करत ताठ मानेनं जगायचा आणि तरण्याबांड पोरांना सोबत घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात जाऊन धनगर समाजाला जागं करायचा. पण नियतीला हे मान्य नव्हतं प्रस्तापित मस्तावलेली यंत्रणा या ढाण्या वाघाला पुढे येऊ देत नव्हती कदाचित स्व बी के कोकरे साहेबांची आर्थिक परिस्थीती कमजोर असल्याचा फायदा घेत तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी धनगर समाजातीलच धनसंपत्तीने मजबूत असलेल्या माजी मंत्री स्व शिवाजी (बापू) शेंडगे यांना हाताला धरून स्व बी के कोकरे साहेबांची राजकीय हत्याच केली. स्व बी के कोकरे साहेबांची लढाई ही अन्यायाविरोधात होती, त्यांचा विरोध कोण्या एका व्यक्तिला नव्हता तर धनगर समाजाच्या जीवावरती राजकारण करून सत्ता-संपत्ती बळकावणार्या सत्तापिपासू प्रस्तापित व्यवस्थेला त्यांचा विरोध होता.
गाढव आणि कुत्र्याच्या गोष्टीप्रमाणे माझ्याच धनगर समाजातील समाजबांधवांनी एकमेकांचे पाय न ओढता, विरोध न करता स्व बी के कोकरे साहेबांना साथ दिली असती तर आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री धनगर समाजाचा असता अन् गांधी पवार पाटील देशमुख ठाकरे यांसारखी प्रस्तापित घराणे रस्त्यावर आली असती पण खैर आमच्या समाजात आजही एकी नाही त्यामुळेच घोडं पेंड खात बसलंय. आजही तीच अवस्था आहे धनगर समाजातील तरुणांच्या हातात क्रांतीची मशाल देणारे आमचे रणझुंजार दैवत स्व.बी के कोकरे साहेब आज धनगर समाजात नाहीयेत याचंच मनोमन दुख होत आहे. जरी प्रस्तापितांनी स्व बी के कोकरे साहेबांना संपवले असले तरी त्यांची विचारधारा अजूनही जिवंत आहे. स्व.बी.के.कोकरे साहेबांनी स्थापण केलेली यशवंत सेना कधीच पंढरपूर येथिल मेळाव्यात लोप पावली त्या मेळाव्यात स्व.शिवाजी बापू शेंडगे यांनी यशवंत सेना काॅंग्रेस मध्ये विलीन झाल्याचे जाहीर केल्याने यशवंत सैनिकांत गोंधळ उडाला त्यापाठीमागे पवारांचे कपट कारस्थान होते पण यशवंत सेना तिथेच विस्कळीत झाली पुन्हा नव्याने कितीतरी संघटना स्थापण झाल्या पण त्या स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या संघटनेच्या नावानेच स्थापण झाल्या.
आज समाजात कितीतरी यशवंत सेना उदयास आल्या पण युवा पिढी संभ्रमावस्थेत आहे की स्व.बी.के.कोकरे साहेबांची खरी संघटना कोणती?? त्याचे उत्तर असे आहे स्व.बी.के.कोकरे साहेबांची अधिकृत अशी कोणतीच संघटना आज महाराष्ट्र राज्यात नाही. स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या जीवनचरित्र मध्ये संशोधनातून मी याबाबतीत उल्लेख केलेला आहे ते जीवनचरित्र प्रकाशित झाल्यानंतरच वाचकांसमोर येईल. कदाचित काहीजणांना ही गोष्ट खटकेल पण जे सत्य आहे ते कोणी नाकारू शकत नाही. ज्या संघटना आहेत त्या फक्त आमचीच स्व.बी.के.कोकरे साहेबांची संघटना असल्याचे लेबल लावून डंका पिटत आहेत त्याबद्दल माझे काही दुमत नाही पण समाजबांधवांच्या प्रश्नांचे निराकरण करताना त्याचे योग्य उत्तर देणे ही माझी जबाबदारी आहे. आज समाजप्रबोधनाच्या माध्यमातून स्व बी के कोकरे साहेबांच्या अविरत झंजावाताची विचारधारा हीच "महाराष्ट्राची विचारधारा" धनगर समाजातील लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या नसानसात आणि डोक्यात पेरण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. स्व बी के कोकरे साहेबांची विचारधारा समाजात पेरून "यशवंत युवा सेना" महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या माध्यमातून समाजाला जागृत करुन वैचारिक, आर्थिक, समाजिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या सक्षम आणि बलशाली करण्यासाठी प्राणपणाने सत्कार्य करीन हीच भंडारा उधळून शपथ घेतो व आज त्यांचा १२ वा स्मृतिदिन त्यानिमित्ताने माझे आदर्श धनगर समाजाचे क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेब यांना विनम्र अभिवादन करतो.
     आम्हा तरूनांच्या हातात क्रांतीची मशाल देणाऱ्या रणमर्दास माझा मानाचा आणि विनम्र जय मल्हार कोटी कोटी प्रणाम. क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांची विचारधारा समाजात पेरण्यासाठी आम्ही कटीबद्द आहोत हीच त्यांना माझ्यासारख्या त्यांच्याच विचारधारेतून पेटून उठलेल्या चिनगारी कडून श्रद्धांजली.
💐💐💐💐💐💐💐
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंत!
      ✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

Saturday 14 January 2017

रणसंग्राम पानिपतच्या युद्धाचा... ✍नितीनराजे अनुसे

पानिपतचे तिसरे युद्ध दि १४ जानेवारी १७६१
         आज मकर संक्रांत आपण सर्वजण हा सण अगदी उत्साहात साजरा करतो एकमेकांवरती शुभेच्छांचा वर्षाव करतो पण याच दिवशी १७६१ मध्ये महाराष्ट्रातील लाखों कुटुंबावर संक्रांत कोसळली होती. प्रत्येक माजघरातला कुंकवाचा करंड पानिपतावर लवंडला होता. जेव्हा शत्रु चाल करून येतो तेव्हा राष्ट्रसंकट उद्भवल्यावर शत्रुंशी लढायचे कसे? शत्रुंना भिडायचे कसे? याचा धडा ज्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी गिरवला त्या युद्धात महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला वीर कोसळला होता ती रक्ताने माखलेली पानिपतची माती पवित्र होऊन त्याचे आज पवित्र भस्मात रूपांतर झाले आहे. ऐन संक्रांतीदिवशी अफगाणिस्तानचा घुसखोर अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्याण १४ जानेवारी १७६१ ला झालेले पानिपत सारखे युद्ध त्यागोदर आणि त्यानंतरही कधीच इतिहासात घडले नाही. मध्यमयुगाच्या कालखंडात सकाळी नऊ वाजलेपासून ते सायंकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत एकाच दिवसाच्या अल्पावधीत असं आक्राळवीक्राळ, भयंकर, घनघोर, जीवघेणं युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही फौजांची दीड लाख माणसं आणि ऐंशी हजार जणावरं मेल्याचे दुसरे उदाहरण कोणते नाही. विसाव्या शतकाच्या पाचव्या दशकात अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या जापानी शहरांवर अणुबाँब फेकले तेव्हा त्या अणुबाँब हल्ल्यात किरणोत्साराचा परिणाम व्हायला आणि दीड लाख जीव मरायला दोन-तीन दिवस लागले होते. असे हे पानिपतचे तिसरे युद्ध इतिहासाच्या पटलावर वेगळाच ठसा उमटवून गेले. पानिपतच्या या तिसऱ्या युद्धात जरी मराठ्यांचा पराभव झाला असला तरी मराठे ज्या त्वेषाने लढले ज्यापद्धतीने लढले त्याचा उल्लेख करताना पानिपत जिंकलेल्या अफगाणिस्तानच्या अहमदशहा अब्दालीने सुद्धा लिहून ठेवले आहे की "मराठ्यांनी पानिपतच्या युद्धभुमिवर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी मराठ्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन:पुन्हा हल्ले चढवले होते. मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी आमचे रुस्तुम आणि इस्फिंदर (अफगाणांच्या काव्यातील कृष्णार्जून) सारखे वीर मौजूद असते तर मराठ्यांचा पराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटं घालून चावली असती! मराठ्यांसारखी अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य इतरांकडून होणं वा दिसणं अशक्यच!"
पानिपतच्या या घनघोर युद्धात जगातील बलाढ्य योद्ध्यांपैकी एक प्रबळ सेनानी आणि राजकारणी असलेला अब्दाली हा मराठ्यांचा शत्रु होता त्याच्या विरोधात मराठे वीर त्वेषाने लढले तर काही पानिपतच्या मातीत मिसळून गेले आजही पानिपतची माती त्यांची साक्ष देते. मराठ्यांच्या फौजेत सदाशिवरावभाऊ (पेशव्यांचे चुलतबंधू), विश्वासराव (बाजीराव पेशव्यांचे जेष्ठ चिरंजीव), अटकेपार झेंडे फडकवलेले सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार, समशेरबहाद्दर, दमाजी गायकवाड, विंचूरकर, पुरंदरे, इब्राहिमखान गारदी, बळवंतराव मेहेंदळे, गोविंदपंत बुंदेले, अंताजी माणकेश्वर असे खासे शुर सरदार होते. अब्दाली पंजाब उतरून फौजेनिशी कधीच दिल्लीजवळ  दाखल झाला होता. तेथेच त्याने मुक्काम रोवला. मराठी फौजादेखिल तत्परतेने दक्षिणेहून पानिपतमध्ये दाखल झाल्या होत्या. युद्ध लढायांतील पारंगत असणारे योद्धे अनुभवी मल्हारराव होळकर यांच्याकडे जरी पानिपतच्या युद्धाचे नेतृत्व दिले असते तर पानिपत हे मराठ्यांच्या डाव्या हातचा मळ होता किंवा जेवढी जिवीत हानी त्या युद्धात झाली तेवढी झालीच नसती कारण "मल्हारतंत्र" तेवढे शक्तीशाली होते. अब्दालीकडे सैन्यबळ जास्त होते, मग लढाईसाठी व्यूहरचना आखायच ठरलं  दक्षिणदेशी निजाम जसा लढायचा, जसा बुसी लढायचा, जसे फ्रेंच युद्ध करतात त्याचप्रमाणे युद्ध लढलो तर आपला बचाव होऊ शकतो. सोबत असलेले बायकाबुणगे आणि स्वारशिपाई यांना सांभाळायचे असेल तर गोलाच्या लढाईला पर्याय नाही असा सल्ला इब्राहिमखान गारधी यांनी भाऊसाहेबांना दिला मात्र त्यास अंताजी माणकेश्वर, दमाजी गायकवाड, विंचूरकर व सुभेदार मल्हारराव होळकर यांना ते मान्य नव्हते. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी गनिमी काव्यानेच उत्तरेत दबदबा निर्माण केला होत एवढेच नव्हे तर आता पाकिस्तान मध्ये असलेल्या अटकेपार त्यांनी झेंडे फडकवले होते.
मल्हारराव होळकरांचे मल्हारतंत्र एवढे प्रभावशाली होते की त्याची धास्ती अब्दालीलादेखिल होती. गोलाच्या लढाईबद्दल बोलताना सुभेदार मल्हारराव होळकर बोलले  की "भाऊसाहेब आम्ही बघतो आहोत कित्येक दिवसांपासून गारध्यांच्या तालावर तुम्ही नाचत आहात. आपल्या मराठी जातकुळाच्या लढाया कशा होत्या? लढावे, भिडावे, हमला चढवून प्राणाची बाजी लावावी, नाही तर पडतो आहोत असे वाटले तर दऱ्याडोंगरात पळून जावे, शत्रुला खिंडीत गाठून बेदम मारावे, बैलाच्या शिंगांना पोतं बांधून चकवा ध्यावा, तर कधी किल्ल्याच्या कड्यावरून उकळते तेल ओतून शत्रुंना भाजून काढावे, ह्या आमच्या तऱ्हा, ह्या आमच्या खोडी, त्यालाच कोणी धावपळीच्या लढाई तर कोणी गनिमी कावा म्हणत, लष्करांच्या भोवती खंदक खोदून (गोल बनवून) मराठ्यांच्या सात पिढ्यांत कोणी अवघडून बसले होते का?? अनादि काळापासून झुंजाचा मराठी बाणा विसरू नका भाऊसाहेब. अविंधांच्या रिती वापपून जन्माची माती व्हायची." पुढे ते म्हणाले की "भाऊसाहेब, व्हटावर मिसूरडी न फुटलेल्या पोरांच्या नादाला लागून लष्कराचे वाटोळे करू नका. तुमच्या वयाच्या दुप्पटीपेक्षाही सात-आठ वर्षाने हा म्हातारा थोर आहे. ह्या लढायांमध्येच आमचे काळ्याचे पांढरे झाले त्यामुळे गोलाची लढाई लढण्यापेक्षा गनिमी काव्याने लढूया. गनिमी काव्याच्या लढाया खेळून आमची हयात गुदरली आहे म्हणून तुम्ही आमचे जरा ऐका."
भाऊसाहेब ऐकायला तयार नव्हते त्याचा परिणाम पानिपतच्या युद्धातून जगासमोर आलाच, पण मल्हारराव होळकरांच्या वक्तव्याला दाद देत विठ्ठल विंचूरकर, दमाजी गायकवाड, अंताजी माणकेश्वर ओरडून ओरडून सांगत होते की "आम्हाला गोलाची लढाई मान्य नाही आम्हाला गनिमी कावाच हवा आणि आम्ही गनिमी काव्यानेच लढणार." त्यामुळे लष्करात दोन भाग पडले, शिंदे-होळकरांत उघड उघड भांडण जुंपले त्याचे पडसाद महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कार्यकिर्दीतही दिसून आले अगदी एकोणिसाव्या शतकाच्या पुर्वार्धातही.... पण भाऊसाहेब यावरती म्हणाले की "गोलाची लढाई कोणाला आवडो न आवडो सर्वांनी एकदिलाने एकत्रित लढायचे त्याची व्यूहरचना रात्री सांगितली जाईल." पण ही व्यहरचना ठरवताना सुभेदार मल्हारराव होळकरांच्या मल्हारतंत्राला जाणूनबुजून डावलण्यात आले कारण इतर सरदारांच्या पुढे मल्हारराव होळकर हा भोळा धनगरच होता पण कोणी मल्हारनीती समजून घेतली नाही त्याचा परिणामही युद्धात दिसून आला. पानिपतवर युद्धासाठी अख्खा महाराष्ट्र अवतरला होता त्यामध्ये होळकर, शिंदे, धायगुडे, शेडगे, मोरे, पांढरे, पायगुडे, कोतकर, मिसाळ, पिसाळ, शिर्के, लोखंडे, हटकर, घुगरे, शिंगाडे, बरगे, बोधे, खराडे, वाघमारे, भिसे, रजपुत, रणदिवे, बागल, कोकाटे, आयरेकर, कडमकर, माने, दाभाडे, साटम, वाघ, थोरात, पालेकर, पोळ, चव्हाण, धुळप, जाधव, पवार, भोसले, गुजर, डफळे, घाटगे, कदम, लिंगाडे, यादव, खरात, शेवाळे, वाबळे, आंग्रे, भापकर, काकडे, जगदाळे, रसाळ, गाढवे, काटकर, जगताप, धुमाळ, गजरे, फाळके, निकम, गोडसे, दुधे, काटे, कडू, पडवळ, राणे, शिरोळे, शितोळे, शेळके, बोळके, जिरगे, काळे, गाजरे, राजे, गायकवाड, मोहिते, पाटकर, रास्ते, पटवर्धन, तळेकर, ढमढेरे, पलांडे, कितुरकर, देसाई, मांजरे, अळगे, कापसे, घोगले, कोणसे, साळवी, मुरगे, बांडे, बांडगे, कुराडे, भोईटे, वाळके, चवळे, भालेकर, मोचळे, सुर्वे, गोडे, रासळे, नलावडे, चोपडे, कोल्हटकर, शिंगटे, गोफणे, दुधे, नवरे, म्हस्के, टकले, कामथे, मुठे, हरफळे, नाईक-निंबाळकर, चव्हाण, धायबर अशी कितीतरी आडणावे असलेले मराठी पठारावरचे असे एकही गाव नाही, एकही घर नाही, एखादा उंबरा नाही, जात-पोटजात, बलुता नाही तर सारा महाराष्ट्र पानिपतावर मौजूद होता. मारू किंवा मरू, तोडू किंवा तुटू ह्या बाण्याने, झपाट्याने गिलच्याशी दोन हात करून दिल्ली गाठू, हुशार ताजेतवाने होऊन शत्रुशी भिडू आणि झेंडेबावटे फडकावित दक्षिणेला निघून जाऊ असे सर्वांनी ठरवले.
एकूण लढाऊ मराठी लष्करांची संख्या फक्त पंचेचाळीस हजार होती आणि बाजरबुणग्यांची संख्या त्यापेक्षा जास्त होती. तर अहमदशहा अब्दालीकडे नुसते लष्करच सत्तर हजार होते. इब्राहिमखानाच्या सल्ल्यावरून मराठी लष्कराभोवती खंदक खोदायच्या सुचना सदाशिवरावभाऊंनी दिल्या, खंदक खोदून संरक्षण निर्माण केले होते. पठाणफौजेस काही करता येत नव्हते त्यामुळे अब्दालीसुद्धा जेरीस आला होता. मराठी फौज अन्न पाण्यावाचून तडफडत होती, उपासमार होत होती तरीही हिंमत करून सैन्य लढतच होते. शेवटी जेरीस आलेल्या अब्दालीने गुलिमाशी सलूख करावा यासाठी सांडणीस्वाराबरोबर पत्र पाठवले. भाऊसाहेबांकडे पत्र पोहचताच लढाई तहकूब करण्यास इब्राहिमखानास सांगितले व त्या पत्राचे प्रत्यूत्तर काय द्यावे यांवर विचारविनिमय झाला शेवटी "तुम्ही म्हणतां ते आम्हास कबुल आहे पण आम्ही सातशे कोस चालून आलो आहोत खर्च फार झाला आहे त्याचा सात कोटी रूपये खर्च तुम्ही द्यावा" अशी अब्दालीशी बोलणी चालू असतानाच फौजेत दाणागोटा आणावयास गेलेल्या गोविंदपंत बुंदेले  यांच्यावर अब्दालीने १७ डिसेंबर १७६० आताईखानास पाठवले. आताईखान व गोविंदपंत यांच्यात एक प्रहरपर्यंत तलवारीला तलवार भिडली शेवटी आताईखानाने पंतांचा शिरच्छेद केला व पंत वैकुंठवाशी गेले. इराणीच्या सैन्यांनी मराठ्यांचा दाणागोटा व खजिना लुटून नेला. सलूखाचा तह झाला होता त्यात पुन्हा बिघाड होऊन दोन्ही फौजा समोरासमोर आल्या त्यात मराठ्यांची सरशी होऊ लागली सुजायदौला व अब्दालीचे सैन्य माघारी पळू लागले शेवटी सुदायदौला व अहमदशहा अब्दाली या दोघात भांडण जुंपले व विष पिऊन मरावे असे ठरवू लागले पण मलकाजमानीने त्यांस समजाऊन सांगितले की शत्रुवर तुटून पडण्याऐवजी तुम्ही त्यांच्याशी विन्मुख होऊन विषप्रयोग करण्याची भाषा करता यात कोणता पुरूषार्थ आहे?? आणि माझ्यासारख्या एका स्त्री ने तुम्हाला समजाऊन सांगावे लागते. त्यानंतर सुजायतदौला व अब्दाली प्रेरित होऊन पुन्हा युद्धावर तोंड देतात तेव्हा अब्दालीच्या सैन्यांची सरशी होते.
त्यादरम्यान भाऊसाहेब मल्हाररावांना बोलावून घेतात व त्यांना आज्ञा करतात की विश्वासराव व श्रीमंत बाईसाहेब या उभयंताना आपले जवळ घेऊन एका बाजूवर निघून जावे. तेव्हा भाऊसाहेबांच्या आज्ञेमुळे सुभेदार मल्हारराव होळकर यांना काही सुचेनासे झाले. नंतर भाऊंच्या आज्ञेनुसार सुभेदार मल्हारराव होळकर श्रीमंत बाईसाहेब व विश्वासराव यांना आश्वारूढ करून निघत असतात तेव्हा इब्राहिमखान गारदी भाऊंकडे येऊन बोलतो की हे कर्म तुम्ही उचित करता आहात, त्यांची नेमणूक पहिली दरोंगी तोफखान्याची केली होती. आणि इब्राहिमखान गारदी म्हणतो की सुभेदार मल्हारराव होळकर जर आमच्यासोबत असतील तर सात बादशाह जरी आमच्यावर चालून आले तरी त्यांना आम्ही तीन वेळा माघारी फिरवू मग अब्दालीचे तुम्ही काय विशेष घेऊन बसलात?. हे ऐकुन विश्वासराव युद्धात उतरतात भाऊसाहेबही तयारीनिशी युद्धात उतरतात व श्रीमंत थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांस निरोप पाठवतात की "तुम्ही हत्यार न लावणे, आमची व त्यांची तलवार लागली म्हणजे तुम्ही सहस्त्रयोगे न विचारतां बाईसाहेबांस घेऊन जावे अन्यथा अंतर कराल तर गोब्राह्मणवधाचे पातक कराल" असे भाऊंनी सांगितल्यामुळे पानिपतचा रणसंग्राम सोडून मल्हारराव निघून आल्याचा व शेवटचा रणसंग्राम पौष्य शुद्ध अष्टमी शके १६८२ रोजी झाला अर्थातच पानिपतचा रणसंग्राम १४ जानेवारी १७६१ ला झाला असा उल्लेख "होळकरांची थैली" मध्ये असल्याचे संपादक प्रा.निलेश शेळके सर हे अवर्जून सांगतात.
तर दुसरीकडे "पानिपत" सारख्या कादंबरीमधून हाच इतिहास विकृतपणे मांडला जातो. विश्वासराव ठार झाल्याची वार्ता ऐकुन फौजेत गोंधळ उडतो, सदाशिवराव भाऊ हत्तीवरुन घोड्यावर उडी मारून त्वेषाने लढतात पण मल्हारराव होळकर तीनच्या सुमारास अब्दालीचे पारडे जड होईल व आपला टिकाव लागणार नाही असा विचार रणांगणातून पळ काढतात असे चित्र रंगवले जाते तो इतिहास विकृतपणे का मांडला जातो तेच माझ्यासारख्या वाचकाला समजत नाही. थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर हे मुत्सद्धी लढवय्ये होते उत्तरेत मल्हार आया मल्हार आया म्हटले तरी गावंच्या गावं ओस पडायची असा महायोद्धा, लढवय्या रणांगण सोडून कसा काय पळ काढू शकतो?? बर मग मल्हारराव पाठोपाठ  विठ्ठल विंचूरकर, महादजी शिंदे हे सुद्धा रणांगणातून पळून गेल्याचे, निसटून गेल्याचेही सांगितले जाते पण पानिपतच्या पराभवाचे खापर एकट्या मल्हारराव होळकर यांच्यावरतीच का?? अलिकडचेच संजय क्षीरसागर, संजय सोनवणी सारखे मशहूर इतिहासकार सांगतात की मल्हारराव साडेचार वाजेपर्यंत रणांगणातच होते. मध्यप्रहारानंतरही सुभेदार मल्हारराव होळकर हे आघाडीवर होते अब्दालीच्या सैन्यांना ते मागे रेटत नेत होते त्यामुळे ते रणांगणातून पळून गेले हा त्यांच्यावर जो दोषारोप आहे तो खोटा आहे. जेव्हा सदाशिवराव भाऊंनी सुभेदार मल्हाररावांना श्रीमंत बाईसाहेब (गौतमीबाई) यांना घेऊन जाण्याची आज्ञा केली तेव्हा मल्हारराव होळकर रणसंग्राम सोडून बाहेर पडले असले (आजही भारतीय सैन्यदलांमध्ये मग नौसेना असो, वायुसेना अथवा भुसेना असो वरिष्ठांची आज्ञा (Order) आली तर ती चुकीची आहे की बरोबर हे पाहिले जात नाही कारण आज्ञा ती आज्ञाच असते व वरिष्ठांच्या आज्ञाचे पालन करणे यालाच Discipline म्हणतात). पण खरंतर गोलाची लढाई ही संकटात निसटून जाण्यासाठीच असते म्हणून सदाभाऊंनी विचार करूनच गोलाच्या लढाईचा निर्णय घेतला असेल असे इतिहासकारांचे मत आहे. शिवाय जर पानिपतमधून सुखरूपरित्या बाहेर पडलो तर त्यानंतर उत्तरेत आपण राज्य स्थापित करू शकतो दबदबा अबाधित राखू शकतो असा ठाम विश्वास असल्यानेच व मल्हारतंत्राच्या जोरावर गनिमी काव्याचा वापर करून श्रीमंत मल्हारराव होळकर सदाभाऊंच्याच आज्ञेने रणसंग्राम सोडून निघाले होते.
आज जेव्हा उत्तर भारतातील विशेषता दिल्लीजवळील, हरियाणा राज्यातील पानिपत, सोनपत, रोहतक, जींद, झज्जर, रेवाडी सारख्या भागातील मित्रांशी माझी पानिपत या विषयावर चर्चा होत असते तेव्हा "भाऊ तो भाग गया", "मराठे तो भगोडे है, जो पानिपत से भाग गये" अशा कमेंट्स मला ऐकायला भेटतात तेव्हा पानिपत युद्धातील मराठ्यांचा इतिहास कोणी विकृत केला असेल तर तो मराठ्यांनीच विकृत केला अाहे असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही. कारण इतिहासामध्ये नेहमीच होळकरांचा इतिहास विकृतपणे लिहून होळकरांच्या इतिहासाला, शौर्याला, राष्ट्रभक्तीला दुजा भाव द्यायचा प्रयत्न जातीयवादी इतिहासकारांनी जाणूनबुजून केल्यानेच "मराठे तो भगोडे है। अशा कमेंट्स माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला ऐकायला भेटतात. तेव्हा हे कुठेतरी थांबावे म्हणून मराठ्यांचा इतिहास मराठ्यांनीच सुधारून घ्यायला हवा नाहीतर मराठ्यांचीच बदनामी होत जाईल व जे थोरले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावर पानिपतच्या पराभवाचे जे खापर फोडले जाते ते होळकरांची थैलीसारखे संदर्भ घेऊन त्या आरोपांचे समूळ नष्ट करावे. पानिपतच्या मातीत युद्ध झाले आणि त्या युद्धात अखंड मराठे ज्या उमेदीने लढले त्याला तोडच नाही. जिकडे तिकडे जंबुरे, सुतरनाळा, साहिन, सहांग आणि गरनाळा उसळून, उखळून पेटत होत्या, दोन्ही बाजूला तांबडेभडक आगीचे लोळ पडत होते अंगावर आगीचे लोळ पडल्यावर माणसे-जनावरे उभ्या जागीच पेटत होती. पानिपतच्या मातीत रक्तात गडबडा लोळून जीव वाचयचा प्रयत्न करत होती. त्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातले मराठे पानिपतावर बेभान होऊन लढले पण एकमेकांचा विकृत आणि चुकीचा इतिहास लिहण्यामुळे अखंड मराठे बदनाम होत असतील तर मग मराठ्यांनी स्वताचा इतिहास सुधरवायला नको का?? आज काही इतिहास तज्ञांनी मल्हारराव होळकर यांच्यावरील आरोपाचे समूळ नष्ट करण्यासाठी "होळकरांची थैली" शोधून काढणारे का.ना.साने, वि.का.राजवाडे व शंकर गोविंद चिट्टे यांना त्याचे श्रेय जाते व संजय क्षीरसागर, संजय सोनवणी त्याचप्रमाणे होळकरांची थैली चे संपादक प्रा.निलेश शेळके सर यांच्या प्रयत्नांना माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाचा सलाम व पिवळा जय मल्हार.
जय मल्हार जय अहिल्याई जय यशवंतराजे
      ✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+918530004123
nitinrajeanuse123.blogspot.com