Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Friday 31 May 2019

डोळ्यांत अंजन घालणारी काव्यरचना ✍️कवी राजू झंजे

जय मल्हार.....
     आज  तुझी  जयंती  माउली  ,
      दाही  दिशा साजरी होणार ;
      बेंबीच्या देठापासून  ,
     " जय अहिल्या" नारे देणार !

       चौका-चौकात  अभिवादनाचे ,
        मोठं  मोठाले  बॅनर  लागतील ;
        वर्षभर  "झोपलेले  " ,
       आज  " जातीसाठी ?" जागतील !
 
       समाज  "माझा"च ,
        अशी स्पर्धा देखील लागतेय आता ;
       मीच "मालक" यांचा ,
        काही "मंडळी" अशी वागतेय आता !
 
        जयंतीच  "व्यासपीठ "माउली आता,
        "अस्तित्व" दाखवण्याचं ठिकाण झालंय;
         समाज तुझा काही  "व्यापारियांचे"
        ठरलेले "दुकान " झालंय !
 
          या  दुकानातूनच आम्हांला,
          कोणालाही  विकलं  जातंय  ;
           वापरून झालं कि ,
          पुन्हा कुठेही टाकलं जातंय !

           राज्यकर्ती जमात माउली ,
           आज  लाचारीच जिणं  जगतेय  ;
          देण्याची  दानत  ठेवणारी  ,
           आज  लाचार  होऊन  मागतेय !
   
          साधा भोळा समाज भरडला  जातोय
          काही  नसतानाहि  गुन्हा  ;
          प्रस्थापितांनीहि आरक्षणाचा ,
         मोडून ठेवलाय कणा ;
          शासनाचा  चालू  आहे  इथे  ,
         हुकूमशाही  बाणा ;
    हे माऊली ... प्रशासन  कसे असावे हे दाखवण्यासाठी तरी ,
          जन्म घे पुन्हा....जन्म घे  पुन्हा !

देवी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त विनम्र    अभिवादन!

                 कवी. राजु दादासाहेब झंजे
                       ९५९४८१५५८५

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची आज २९४ वी जयंती... ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या २९४ व्या जयंती निमित्त मानाचा जय मल्हार

       एक स्त्री असूनही तत्कालीन पुरूषप्रधान व्यवस्थेला चपराक देत सती प्रथेला न जुमानता एका हातात शास्त्र तर दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन भारताच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्षे राज्यकारभार करणाऱ्या प्रथम महिला राज्यकर्त्या, मायमाऊली अर्थातच लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना २९४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम...
       खरंतर जातीयवादी इतिहासकारांनी बहुजन समाजातील महापुरुषांचा इतिहास विकृत करून त्याचे विद्रुपीकरण केले असताना आमच्यातील विचारवंत मात्र त्यांच्या उपाधी बद्दल मतांतरे करत बसलेत हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. अशा उपाधींपेक्षा त्यांचे अफाट प्रशासकीय, राजकीय, सामाजिक तथा धार्मिक कार्य समाजासमोर यावे या विचाराचा मी असल्यामुळे त्या विचारवंतांच्या मतानुसार इतिहास गढूळ होणे हे असंभव आहे. उदा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राष्ट्रमाता, लोकमाता, राजमाता, महाराणी, रणरागिणी, महापराक्रमी अशा कितीतरी बिरुदावल्या वापरल्या तरी त्या अहिल्याईंनी केलेल्या प्रजाहितदक्ष कार्य तथा राष्ट्रहिताच्या कार्यासमोर कमीच आहेत. 
        जगाच्या इतिहासात अहिल्याईंना एक उत्तम तथा आदर्श राज्यकर्ती, प्रशासनकर्ती म्हणून ओळखले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. "प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा" एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. म्हणूनच की काय ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महाराणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महाराणी मार्गारेट यांच्यापेक्षाही अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या या महापराक्रमी महिलेने घरात एकही कर्ता पुरूष नसताना जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. अर्थातच चक्रवर्ती सम्राट राजा अशोकाच्या स्वप्नातील 'राष्ट्र' घडवण्यासाठी त्यांनी आपले जीवन व्यतीत केले म्हणून खऱ्या अर्थाने अहिल्याई होळकर या राष्ट्रमाता या उपाधीस सार्थ ठरतात. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्र निर्माण करणाऱ्या 'राष्ट्रमाता' अहिल्याई होळकर होत. ज्याप्रमाणे महान राजाला 'महाराजा' म्हंटले जाते त्याचप्रमाणे प्रजेसाठी महान कार्य करणारी, विकासाचा डोंगर रचणारी 'युवराज' शूरवीर राजे खंडेराव होळकर यांची राणी म्हणजेच 'महाराणी'  अहिल्याई होळकर होत.
      अहिल्याईंच्या प्रशासनाचा तथा राज्यव्यवस्थेचा आदर्श ठेवून विलायती राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली मात्र अहिल्याईंना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेतल्याने आणि अहिल्याईंचा इतिहास वाचण्यापेक्षा अहिल्याईंना नुसते पूजणाऱ्या आमच्या लोकांमुळे भारत नावाचा महा'राष्ट्र' अजूनही अधोगतीकडेच कूच करताना दिसतोय. लोक अहिंसावादी, शांतताप्रिय, प्रेमाची शिकवण देणाऱ्यांची पुजा करतात हे मान्य आहे तर मग महाभारतातील पांडव-कौरवांच्या महायुद्धात कुरूक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा आणि अर्जूनाचे मनोबल वाढवणारा श्री कृष्ण हा कोणत्या अहिंसेचे प्रतिक होता? अहिल्याई होळकर यांच्या उपाध्यांबद्दल चर्चा आणि संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आजच्या प्रशासकीय तथा राजकीय व्यवस्थेला जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन धर्मनिरपेक्षतेपणे राज्यकारभार करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची दूरदृष्टी किती महत्वाची आहे यावरती कटाक्ष टाकला तर अहिल्याईंचे स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही.
     अहिल्याईंनी दुष्काळ निर्मूलनासाठी त्यावेळी अनेक उपाय योजना केल्या होत्या. एकदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली तेव्हा अहिल्याईंनी भुकेने प्रजेचे हाल होत होते तेव्हा प्रजेच्या हाताला कामही मिळेल आणि दुष्काळावर मातही करता येईल म्हणून पाणी अडवण्यासाठी शेतांमध्ये बांध घालून घेतले होते. नद्यांवर बंधारे बांधले, याशिवाय धरणे, तलाव, शेततळी बांधून ठेवली होती, निसर्गचक्रात बाधा येऊ नये म्हणून त्यांनी ७/१२ पद्धतीने शेतकऱ्यांना झाडे लावण्यास प्रवृत्त केले शिवाय त्यामाध्यमातून सरकारी खात्यात महसूल देखील जमा होत असे.  अहिल्याईंच्या राज्यात प्रजा ही सुखी समाधानी तथा आनंदी होती. त्यांनी स्वतःच्या खाजगीतली रक्कम काढून अनेक विकास कामे केल्याने कोणत्याच गोष्टींची कमतरता नव्हती म्हणून त्यांना देवीचे स्थान दिले आहे. "पुण्यश्लोक" ही उपाधी त्याचेच एक द्योतक आहे.  गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाचा आरखडा बनवताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अहिल्याईंच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. यावरूनच समजायला हवे की अहिल्याईंना देवी मानून नुसते नतमस्तक होण्यापेक्षा अहिल्याईंचे विचार मस्तकात घेऊन, समाजाने तथा आजच्या प्रशासनाने जर अहिल्याईंच्या विचारांचा, अहिल्याईंच्या प्रशासन व्यवस्थेचा अवलंब केला तर भारत देश हा नक्कीच पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत जगात अव्वल क्रमांकावर राहील.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
 📧nitinrajeanuse123@gmail.com

Wednesday 29 May 2019

उठ धनगरा आतातरी जाग। ✍️नितीनराजे अनुसे


उठ धनगरा आतातरी जाग।
तूच आहेस रे खरा ढाण्या वाघ ।।
उसळत्या लाव्हारसाची तूच तप्त आग।
खूप झाला रे अत्याचार येवू दे आता राग ।।
उठ धनगरा आतातरी जाग ॥धृ॥
         लखलखत्या विजेचा तूच कडकडाट ।
         बेभान ढगांचा तूच रे गडगडाट।।
         अन्यायाच्या विरोधात दे रे आता आरोळी।
         अंगी शुरता सिंहाची फोड तू डरकाळी।।
         कसा झालास तू इतका षंढ? येवू दे आता राग।
         उठ धनगरा आतातरी जाग॥१॥
शञूवरची चाल तू।
निधड्या छातीची ढाल तू।।
अहिल्यामातेची तलवार तू।
तळपत्या तलवारीची धार ही तू।।
पेटू दे तुझ्या नसानसात आग।
उठ धनगरा आतातरी जाग॥२॥
         आठव तुझ्या पुर्वजांचा इतिहास ।
         रचली होती त्यांनी शत्रूंच्या देहांची रास।।
         मनगटाच्या जोरावर लढले ते बहाद्दर खास ।
         तलवारीला असायची शत्रूच्या रक्ताची आस।।
         नडणाऱ्यांना एकदाचेच तू बजावून सांग।
         उठ धनगरा आतातरी जाग॥३॥
जाण असुदे सदैव धनगरांच्या इतिहासाची।
जरातरी लाज राख रे सळसळत्या रक्ताची।।
क्षणमाञही नकोस करू तू विचार ।
उपस आता तू म्याणातील तलवार ।।
राजा आहेस ना तू तर राजासारखंच वाग ।
उठ धनगरा आतातरी जाग॥४॥
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
         ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
        +91 853 000 4123
📧 nitinrajeanuse123@gmail.com

Tuesday 28 May 2019

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर (पुष्प चौथे) ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर

राज्यकारभार/सामाजिक कार्य/आर्थिक तथा सांस्कृतिक दूरदृष्टी
          माळवाधिपती थोरले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सून अहिल्याई होळकर यांस युद्धनीती सोबतच राजकारणाचे धडे देखील शिकवल्यामुळे तथा पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मालेराव यांच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली होती. पुरूषप्रधान मानसिकता असलेल्या काहींनी अहिल्याईंनी शासन करण्यास (राज्य कारभार करण्यास) माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले,  हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली, माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.
           भारतीय संस्कृती कोशात धार्मिक कार्याबद्दल अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे.
आर्थिक दूरदृष्टी:- भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात आजपर्यंत अहिल्याई होळकर एकमेव अशा राज्यकर्त्या होत्या की ज्यांना सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता. अहिल्याईंची दुरदृष्टी पाहिल्यावर व्यावसायिक क्षेत्रात देखील त्या काही कमी नव्हत्या कारण आर्थिक क्षेत्रात राज्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी सुरू केली होती.
सामाजिक कार्य : राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी अनेक जनविकासाची कामे अखंड भारतभर केली. अठराव्या शतकात अहिल्याईंचे तत्त्वज्ञान किती महान होते हे त्यांच्या त्यावेळच्या शासन काळावरून लक्षात येते. दारूमुळे कितीतरी संसार उध्वस्त होत असल्याने अहिल्याईंनी दारूबंदी केली शिवाय हुंडाबळी थांबवण्यासाठी हुंडा पद्धत बंद करण्यासाठी कडक कायदे करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर या पहिल्या राज्यकर्त्या होत्या. दुष्काळ परिस्थितीमुळे अन्नाशिवाय लोक भुकेने मरत होते तेव्हा त्यांच्या हाताला कामे देऊन अहिल्याईंनी दुष्काळाला आवाहन देण्यासाठी वायपट पाणी अडवून ठेवण्यासाठी शेतामध्ये बांध घातले, अनेक शेततळी, विहिरी, बारवे बांधून घेतले, वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जागोजागी पाणपोई बांधून घेतल्या शिवाय वाटसरूंची गैरसोय होऊ नये म्हणून धर्मशाळा उभारल्या अन्नछत्र सुरू केली . दुष्काळात पशूपक्षांसाठी धान्याच्या अनेक शेती मोकळ्या करून ठेवल्या होत्या. याव्यतिरिक्त अहिल्याईंनी जगातील पहिल्यांदाच न्यायव्यवस्था सुरू केली. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी त्या मंत्र्याला कडक शासन करून दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्याई होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला. अहिल्याईंच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर असे नाव दिलेले आहे एवढेच नव्हे तर इंदौर हवाई अड्ड्याला (विमानतळाला) सुद्धा अहिल्याई होळकर यांचे नाव मध्यप्रदेश सरकारने दिले आहे.
           भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (ब्रिटिश लेखक) 'माल्कम' यांच्या मतानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.
सांस्कृतिक ठेवा:-  राष्ट्रमाता अहिल्याईंचे सांस्कृतिक कार्य म्हणाल तर महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. सदरची संस्कृती आणि संगीत व कलेचा वारसा जतन करण्यात अहिल्याईंचे फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. 
          एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. पृथ्वीवरील ज्या पाच लोकांना "पुण्यश्लोक" ही उपाधी दिली त्यात अहिल्याई होळकर यांचेही नाव सन्मानाने घेतले जाते. तर राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी फक्त एकाच राज्यापुरते, एकाच जाती-धर्मापुरते काम केले नाही तर त्या पलीकडे जाऊन त्यांनी धर्मनिरपेक्षतेने अखंड भारतभर काम केले आहे. प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महारानी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महारानी मार्गारेट यांच्यापेक्षा अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या राष्ट्रमातेने जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्रमाता रणरागिणी महाराणी अहिल्याई होळकर होत.
     राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी इंदौर राज्याव्यतिरीक्त काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तर गुजरात पासून आसाम पर्यंत विकासाचा अफाट डोंगर रचून ठेवला आहे. काही इतिहासकार, संशोधक, होळकरशाहीचे अभ्यासक त्यावरती संशोधन करत आहेत तथा समाजातील युवक-युवतींनी पुढे येऊन संशोधन करावे त्यामुळे येणाऱ्या काळात नव्याने काही घटनांची भर इतिहासात पडेल...
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Sunday 26 May 2019

माळवाधिपती थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर ✍️नितीनराजे अनुसे

माळवाधिपती थोरले श्रीमंत राजे मल्हारराव होळकर


#होळकरशाहीची_स्थापना
दि.२६ मे १७२९
    मराठेशाहीचा इतिहास म्हणजे खरंतर ती एक अंधाधुंदीच होती. त्या अंधाधुंदीच्या काळात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात होता हे कळायलाच मार्ग नव्हता. तमाम मराठ्यांचीच काय तर अखंड हिंदूस्थानातील राजा-महाराजांची देखील हीच अवस्था होती. परंतु हिंदूस्थानातील काही राजांनी केवळ स्वतःचेच राज्य न पाहता राष्ट्रप्रेमाने जो काही अद्भूत इतिहास रचला त्याला मुळात तोडच नव्हती. परंतु जातीयवादाच्या आणि श्रेयवादाच्या नादात "ज्याच्या हाती ससा तोच पारधी" अशा प्रचलित म्हणीप्रमाणे शिकल्या सवरलेल्या जातीयवादी इतिहासकारांनी मातृभूमीतीलच महापराक्रमी योद्ध्यांना उपेक्षित ठेवले त्यातीलच एक म्हणजेच अटकेपार झेंडे फडकवणारे तथा छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य अबाधित राखणारे स्वबळावर आपले स्वराज्य उभा करणारे माळवाधिपती होळकरशाहीचे संस्थापक थोरले श्रीमंत राजे मल्हारराव होळकर.
            स्वताची स्वतंत्र फौज उभा करून आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर मल्हाररावांनी माळवा प्रांतांत स्वताच्या हिंमतीवर आणि स्वकर्तृत्वावर अनेक लढाया गाजवल्या बड्या बड्या शत्रुंना मल्हाररावांनी तलवारींचे पाणी पाजले हे पाहून बाळाजी विश्वनाथांनी (पेशव्यांनी) मल्हाररावांशी तह करून माळवा प्रांतांची जबाबदारी सोपवली. त्याचे कारण असे होते की दयाबहादूर हा एकेकाळी माळव्याचा सुभेदार असताना शेतकरी रयतेस नाहक त्रास देत असे दयाबहादूर व त्याच्या हाताखालचे मुनीम शेतकऱ्यांना रयतेला पिळत होते. तेव्हा मराठ्यांना बोलवले तर ते प्रजेची मदत करतील असा सल्ला जयपूरच्या राजाने दिल्यावर माळवा प्रांतात उतरून धारजवळील तिर येथे मल्हाररावांनी फौजेसरशी लढाईला आलेल्या दयाबहादूराचा सामना करत त्याला आस्मान दाखवले व माळवा प्रांत हस्तगत केला त्यांच्या शौर्याची दखल घेत बाजीराव पेशव्यांनी २६ मे १७२९ ला त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. तोच आजचा हा गौरवशाली दिवस त्याला २९० वर्षे पूर्ण झालीत आणि तोच होळकरशाहीचा गौरवशाली तथा जाज्वल्य इतिहास आज इतिहासाच्या पानावरती सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलाय.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Monday 20 May 2019

आज स्मृतीदिन मुत्सद्दी तथा धुरंधर योद्ध्याचा... ✍️नितीनराजे अनुसे

माळवाधिपती श्रीमंत थोरले मल्हारराव होळकर

         सळसळत्या रक्ताच्या आणि मनगटाच्या जोरावर तसेच धारदार तलवारीच्या टोकावर दुश्मनांना तोलून टाकणाऱ्या, स्वकर्तृत्वावर आणि स्वबळावर स्वतःचे साम्राज्य उभे करत करत मराठ्यांचे साम्राज्य अबाधित राखणाऱ्या आणि अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या रणमर्दाचा अर्थातच थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा आज स्मृतीदिन त्यानिमीत्त माळवाधिपती सुभेदार थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मानाचा जय मल्हार कोटी कोटी प्रणाम. घोड्यांच्या टापांनी अख्खा हिंदूस्तान ढवळून काढणाऱ्या मल्हाररावांना युद्धतंञात पारंगत असलेला एक धुरंदर लढवय्या म्हणून ओळखले जाते ते त्यांच्या अंगी असलेल्या कुशल "मल्हारतंत्र" आणि "मल्हारनीती"मुळेच...
                एके दिवशी मामाच्या मेंढ्या चारायला घेऊन गेल्यानंतर मल्हाररावांनी पाहिले की मामाच्या शेतामधून सजवलेल्या अंबारीचे हत्ती, घोडे सैनिक शेतातील पिकाची नासधूस करत पिक तुडवत चालले होते तेव्हा त्यांनी त्याच रानातील एक ढेकुळ उचलला तो सरळ सजवलेल्या हत्तीवर अंबारीत बसलेल्या पेशव्याच्या पाठीत मारला. धनगरांच पोर ते रक्तातच धनगरी बाणा जसाच्या तसाच.... डोळ्यात निखारा जसाच्या तसाच....  निर्भिडही तेवढाच.... मल्हारवांनी पेशव्यांस ढेकुळ मारला तसे सर्वजण अवाक् झाले एवढी हिम्मत झाली तरी कोणाची? असा प्रश्न पेशव्यांच्या सरदारांना पडला, पेशव्याचे काही सैनिक मल्हाररावांकडे धावून गेले पण त्या धनगराच्या पोराचे धाडस पाहून पेशवा देखिल हडबडून गेला होता. त्याचे हे धाडस पाहून त्याला सरदार बारगळांनी स्वताच्या सेवेत सामिल करून घेतले ती टोळी होती दाभाड्यांच्या कंठाजी कदमबांडेंची आणि तेथूनच शिपाईगिरी करत असतानाच स्वताची स्वतंत्र फौज उभा करून आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर मल्हाररावांनी माळवा प्रांतांत स्वताच्या हिंमतीवर आणि स्वकर्तृत्वावर अनेक लढाया गाजवल्या बड्या बड्या शत्रुंना मल्हाररावांनी तलवारींचे पाणी पाजले हे पाहून बाळाजी विश्वनाथांनी (पेशव्यांनी) मल्हाररावांशी तह करून माळवा प्रांतांची जबाबदारी सोपवली. त्याचे कारण असे होते की दयाबहादूर हा एकेकाळी माळव्याचा सुभेदार असताना शेतकरी रयतेस नाहक त्रास देत असे दयाबहादूर व त्याच्या हाताखालचे मुनीम शेतकऱ्यांना रयतेला पिळत होते. तेव्हा मराठ्यांना बोलवले तर ते प्रजेची मदत करतील असा सल्ला जयपूरच्या राजाने दिल्यावर माळवा प्रांतात उतरून धारजवळील तिर येथे मल्हाररावांनी फौजेसरशी लढाईला आलेल्या दयाबहादूराला मारून माळवा प्रांत हस्तगत केला त्यांच्या शौर्याची दखल घेत बाजीराव पेशव्यांनी २६ मे १७२९ ला त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. अशा प्रकारे एक धनगरांचे पोर काठीने मेंढ्या हाकता हाकता स्वराज्यासाठी तलवारीने शत्रुंना कधी हाकू लागले तेच समजले नाही.
          मल्हार आया मल्हार आया म्हटलं तरी उत्तर भारतालाच नव्हे तर अफगाणिस्तानच्या अब्दालीला देखील कापरं भरायचं. मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापांचे जरी आवाज ऐकायला आले तरी कित्येक गावंच्या गावं ओस पडायची हीच त्यांची धमक होती अन् हाच त्यांचा दरारा. आजही उत्तर भारतीयांच्या कानात मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापाचे आणि येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजराचे आवाज निनादत असतील... लढाईत सर्वात पुढे राहून राहून, सैन्यांचे नेतृत्व करून मुसंडी मारत शत्रुंना वायूवेगाने कापत सुटणाऱ्या मल्हाररावांचा दबदबा एवढा होता की शत्रुपुढे "मल्हार" जरी नाव उच्चारले तरी त्यांची पळता भुई थोडी व्हायची. मल्हाररावांचा स्वभाव जितका प्रेमळ होता तितकाच राकटसुद्धा. एकदा कुंभेरीच्या लढ्यामध्ये सुरजमल जाटाने किल्ल्याला वेढा घातला होता मल्हाररावांचे सुपुत्र शुरवीर खंडेराव होळकर माचावर लढत सैन्यांचे नेतृत्व करत शत्रुंना तोंड देत होते इतक्यात सुरजमल जाटाकडून जेजाल्याचा गोळा आला आणि खंडेरावांच्या छाताडावर आदळला , खंडेराव धारातीर्थी कोसळले. स्वतःच्या मुलाला डोळ्यासमोर ठार केलेलं पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली नसानसात रक्त सळसळू लागले डोळे लालबुंद झाले हाताच्या मुठी आवळल्या गेल्या अन् त्यांनी मल्हारी मार्तंडाची शपथ घेतली की या सुरजमल जाटाचा शिरच्छेद करून, कुंभेरीची माती खणून यमूनेत टाकेन तरच दक्षिणेला (महाराष्ट्रात) परत जाइन. पण भयभीत झालेल्या सुरजमल जाटाला काय करावे सुचत नव्हते तेवढ्यात सुरजमल जाटाची पत्नी हंसिका हिने जयाप्पा शिंद्यांशी बोलणी करून सुरजमल जाटाचा पेशव्यांसोबत सुलुख घडवून आणला. तेव्हापासूनच मल्हाररावांचा  पेशव्यांवरील अन् पेशव्यांचे हुजरे असलेल्या शिंद्यावरील विश्वास उडाला होता त्याचा प्रत्यय १७ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणि १८ व्या शतकाच्या पहिल्या दशकात येतो जेव्हा महाराजाधिराज शुरवीर योद्धा यशवंतराव होळकर राष्ट्रासाठी स्वतंत्रपणे इंग्रजांशी झुंज देत होते तेव्हा पेशवे आणि शिंदे हे दोन्ही होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी खटाटोप करत होते. एवढेच नव्हे तर यशवंतराव पुण्यावर चालून आले तेव्हा शेपटी गुंडाळून पळपुटा पेशवा जेव्हा कोकणात पळून गेला आणि कोकणातून पत्रव्यवहार करून त्यांनी यशवंतराव होळकरांना सांगितले होते की होळकरांचं राज्य या राष्ट्राच्या मातीवरती अन्याय व अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश सरकारकडे विलीन करावं. याचाच अर्थ मल्हाररावांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली ती म्हणजे "एकवेळ दुश्मनांवरती विश्वास ठेवला तरी चालेल पण पाठीत खंजीर खूपसणाऱ्या शिंद्यांवरती अन् पेशव्यांवरती कधीच विश्वास ठेवायचा नाही". सांगायचा मथित अर्थ एवढाच की आजही आम्ही विनाकारण शेंडीने गळा कापणाऱ्या मॉडर्न पेशव्यांच्या आहारी जाऊन समाजाचे आणि परिणामी देशाचे वाटोळे करून घेतोय हे आम्हाला अजूनही कळत नाही आणि कळले तर वळत नाही.
         पानीपत युद्धाच्या संदर्भात आजही लोकांमध्ये संभ्रम आहे तो म्हणजे जातीयवादी इतिहासकारांनी मल्हारराव होळकर यांच्यावर केलेले खोटे आरोप. पानीपतच्या युद्धात शेवटपर्यंत मल्हारराव होळकर प्राणपणाने लढल्याचे पुरावे संशोधनातून पुढे आले आहेत. पानीपत मध्ये होळकरांची फौज अब्दालीच्या सैन्याशी अगदी चुरशीने आणि शेवटपर्यंत लढल्याचे दाखले असताना काही मराठी तर काही अमराठी इतिहासकारांनी मुत्सद्दी लढवय्या यांच्यावर आरोप करत पानीपतच्या पराभवाचे खापर फोडून मराठ्यांच्या इतिहासाचा एकप्रकारे विपर्यास केला आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत मल्हारराव होळकर हे मराठ्यांचे स्वराज्य अबाधित राखण्यासाठी लढत राहिले झुंजत राहिले परंतु एक हत्या की मृत्यू याचे गुढ आजही उकलले नाहीच अशा मुत्सद्दी योद्ध्याने २० मे १७६६ आपल्या प्राणांची आहुती दिली. आज दि.२० मे सतराव्या शतकात आजच्या पाकिस्तानमधील अटकेपार मराठेशाहीचा  झेंडा डौलाने फडकवणाऱ्या रणझुंजार रणमर्दाचा आज २५३ वा स्मृतीदिन त्यानिमीत्त थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा विनम्र जय मल्हार🙏
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
         ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
https://nitinrajeanuse123.blogspot.com

Saturday 18 May 2019

राष्ट्रमाता अहिल्याईंच्या शौर्याची गाथा पोवाड्यातून...


        राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या शौर्याची गाथा आपल्या भारदस्त आवाजाने शाहीरीतुन मांडणारे, महाराष्ट्र राज्यभर तथा दिल्ली दरबारी गाजलेले युवा शाहीर मा.डॉ. अमोल रणदिवे सर (एम ए,  नेट, पीचडी, संगीत विराशद).
       राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची आपण जयंती साजरी करतोय तर पोवाड्याच्या माध्यमातून अहिल्याईंच्या शौर्याची गाथा अखंड महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येक माणसा-माणसाच्या मस्तकात भिनायला हवी व त्यासाठी युवा शाहीर डॉ. अमोल रणदिवे सर यांच्याशी आजच संपर्क साधून तारीख ठरवून घ्या.
संपर्क : +917776861888, +919766293702
जय मल्हार। जय अहिल्याई। जय यशवंतराजे।

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर (पुष्प तिसरे) ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर

💐पुष्प तिसरे 🎯युद्धनीती🏇
         तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक तसेच घोडेस्वारी यामध्ये नैपुण्य मिळवलेल्या जागतिक दर्जाच्या महाराणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर या युद्धनीतीमध्ये पारंगत होत्या. तसे पाहता अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांनी अहिल्याईंना राजनीती सोबत युद्धनीतीचे देखील धडे शिकवले होते. मल्हारराव होळकर यांना सुद्धा अहिल्याईंच्या युद्धनीतीवर राज्यकारभारवर पूर्ण विश्वास होता इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.
"चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."
              त्या युद्धनीतीचा फायदा अहिल्याईंना घरातील सर्व वीर पुरूषांच्या मृत्यू पाश्चात्य झाला. पती खंडेराव होळकर यांना कुम्हेरीच्या किल्ल्यावर वीरमरण आल्यानंतर अवघ्या काही वर्षातच माळवाधिपती सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचाही मृत्यू झाला. खरंतर त्यांचा मृत्यू की हत्या? त्यामागचे गुढ अजूनही इतिहासकारांना उकलले नाही हे सुद्धा एक दुर्देवच म्हणावे लागेल. मल्हारराव पाठोपाठ अहिल्याई व खंडेरावांचे पुत्र राजे मालेराव होळकर हे सुद्धा गादीवर आल्यानंतर अवघ्या एका वर्षात देवाघरी निघून गेले. घरातील सर्व कर्त्या पुरूषांच्या एकापाठोपाठ एक जाण्यानं राज्यकारभाराची, लष्कराची जबाबदारी एकट्या अहिल्याईंवरतीच येऊन पडली होती परंतु अहिल्याई ना खचल्या ना डगमगल्या... पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, पती खंडेराव, सासरे मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले.
             एकदा राज्यातील कारभारी गंगोबातात्यांनी परस्परचच पेशवा राघोबादादा यास पत्र लिहून त्यांचे मनोबल वाढवताना सांगितले की अहिल्याई होळकर या स्त्री असून त्या राज्यकारभार कसे काय करु शकतात? त्यांच्या राजगादीला आता कोणीही वारसदार राहिला नसून होळकरांचे राज्य महाल, परगणे, दौलत आपल्या पदरात पाडून घ्यावेत. अहिल्याईंच्या राज्यातील सर्व बारीक सारीक हलचालींवरती लक्ष असायचे त्यातून गंगोबाचा हा पत्रव्यवहार चव्हाट्यावर आला. तिकडे कोणताही मागचा पुढचा विचार न करता राघोबा पेशवा इंदौर वरती आपला फौजफाटा घेऊन चालून येऊ लागला होता तोपर्यंत अहिल्याईंनी राघोबांना पत्र लिहून सरळसरळ इशारा दिला की, "मला एक अबला स्त्री समजून तुम्ही माझ्या राज्यावर चालून येत असाल तर लक्षात ठेवा माझ्याकडे तलवार बाजी मध्ये तरबेज असणाऱ्या दहा हजार महिलांची फौज तुमच्या स्वागतासाठी हजर असेल. जर यामध्ये माझी हार झाली तर मला काहीच वाटणार नाही परंतु एका स्त्री कडून तुमची जर हार झाली तर अखंड हिंदूस्थानात तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. हे राज्य काही भाट-भडवेगिरी करून मिळवलेले नाही तर आमच्या पूर्वजांनी होळकरांच्या फौजांनी प्रसंगी रक्त सांडून मिळवलेले हे राज्य आहे. त्यामुळे हे राज्य सहजासहजी मी तुम्हाला देणार नाही प्रसंगी माझा जीव गेला तर बेहत्तर. तरीही तुम्ही मला एक अबला स्त्री समजून इंदौर वर चालून येऊन हे राज्य जर तुम्ही स्वताच्या घशात घालायचा प्रयत्न कराल तर याद राखा तुम्हाला साखळदंडाने बांधून हत्तीच्या पायी देऊन स्वागत करेल नाहीतर तुमच्या हातात बांगड्या भरून तुम्हाला सुळावर लटकवेल ....तरच मी मल्हारराव होळकरांची सून म्हणवून घेईन." अशा परखड शब्दांत पेशव्यांना खडसवणाऱ्या अहिल्याई युद्धनीतीमध्ये इतक्या पारंगत होत्या की त्यांच्या या आवाहनाला राघोबा पेशवे घाबरले आणि आम्ही लढाईसाठी येत नसून तुमचे सांत्वन करण्यास येत असल्याचे सांगितले. अशा परखड व्यक्तिमत्वामुळे अहिल्याईंनी जवळजवळ २८ वर्षे राज्यकारभार केला त्यामुळे त्यांच्या राज्याकडे वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमत झाली नाही.
        आजचे जातीयवादी इतिहासकार एकोणिसाव्या शतकातील झाशीच्या राणीचे गुणगान गाताना तिला आद्यक्रांतीकारी महिला म्हणून संबोधतात असे दिसून येतात पण त्यागोदर अठराव्या शतकात होऊन गेलेल्या दूरदृष्टी ठेवून पारदर्शक राज्यकारभार तथा प्रशासन चालवणाऱ्या महापराक्रमी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा विसर त्यांना पडतो हे भारताच्या इतिहासकारांचे आणि भारताचे दुर्दैव म्हणावे लागेल.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Friday 17 May 2019

एक गतिमान नेतृत्व सुरेश(भाऊ) होलगुंडे ✍️नितीनराजे अनुसे

महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश (भाऊ) होलगुंडे

       भरकटलेल्या तथा विखुरलेल्या धनगर समाजाला एकत्रित आणण्यासाठी ज्या माणसाने यशवंत सेना स्थापन करून त्या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली, महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाजाला जागृत केले आणि क्रांतीची धगधगती मशाल युवकांच्या हातात दिली तीच क्रांतीची मशाल हातात घेऊन आज एकविसाव्या शतकातील अनेक युवक समाजाच्या न्याय व हक्कासाठी झटताहेत झगडताहेत त्यातीलच एक उमदे आणि तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र यशवंत सेनेचे प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे होत.
        सुरेश(भाऊ) होलगुंडे एक हसतमुख चेहऱ्याचे व्यक्तिमत्त्व असून धनगर आरक्षण लढ्यातील एक संघर्षमय नेतृत्व सुद्धा आहे. १४ ऑगस्ट २०१४ रोजी धनगर आरक्षण संदर्भात महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले सुरेश(भाऊ) होलगुंडे हे निस्वार्थीपणे या आंदोलनात धनगर समाजाचे नेतृत्व करत केले होते. याच धनगर समाजाच्या आंदोलनात मुंबईची Life Line अर्थातच जीवन रेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे आडवण्यात मा.सुरेश भाऊ यांचा सिंहाचा वाटा होता. अधिवेशन काळात विधानभवनाला घेराव घालून प्रत्येक आमदारांना गुलाब पुष्प देत आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवण्याचे गांधी मार्गाने केलेल्या आंदोलनात शिवाय त्यानंतरच्या अधिवेशन काळात विधानसभेत घुसून सरकार विरोधात आरक्षणाच्या घोषणा देऊन यळकोट यळकोट जय मल्हार चा गजर करण्यात देखील ते हिरारीने सहभागी झाले होते. धनगर आरक्षण संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मधुकर पिचड याचा निषेध करत राष्ट्रवादी भवनावर जे आंदोलन झाले होते त्यातही मधुकर पिचड च्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलनात मा.सुरेश भाऊ होलगुंडे सहभागी होते. अशा एक ना अनेक आंदोलनात मोर्चात सहभागी होऊन समाजहितासाठी निस्वार्थीपणे कार्य करणारे नेतृत्व, गावभागातून मुंबई मध्ये येणाऱ्या तरूणांना मार्गदर्शन तथा मदत करणाऱ्या सर्वच जाती-धर्मातील युवकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा सांभाळणाऱ्या सुरेश भाऊंच्या खांद्यावर महाराष्ट्र यशवंत सेनेची जी जबाबदारी दिली ती योग्यच आहे असे मला वाटते.
       क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांची विचारधारा आणि त्यांच्या क्रांतीची मशाल हातात घेऊन "नवे पर्व युवा सर्व" हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र यशवंत सेनेच्या शिलेदारांनी सुरेश भाऊ यांना प्रमुखपदाची जबाबदारी देऊन जो बेलभंडारा उधळला आहे त्यासाठी महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश (भाऊ) होलगुंडे  हे स्वतःला सिद्ध करून भविष्यात समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी पूर्वीप्रमाणेच प्राणपणाने झटतील व झगडतील अशी आशा मी बाळगतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मल्हारी मार्तंड त्याच्या बाहुत बळ देवो, बुद्धी व चातुर्य देवो ही एक मल्हार चरणी प्रार्थना...
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
 📧nitinrajeanuse123@gmail.com

Thursday 16 May 2019

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर (पुष्प दुसरे) ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई होळकर

क्रमशः....  पुष्प दुसरे💐 दि.१६ मे २०१९
महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण
       अहिल्याई तशा हुशार होत्या. ज्याकाळी बुरसटलेले विचार समाजात रूजवणाऱ्या सनातनी व्यवस्थेने स्री शिक्षणासाठी निर्बंध लादले होते त्याकाळी म्हणजे अठराव्या शतकात माणकोजी शिंदे यांनी अहिल्याईंना थोडेफार का होईना पण लिहायला वाचायला शिकवले होते. त्यामुळे अहिल्याईंकडे ज्ञानाचे जणू भांडारच होते त्यामुळे आत्मविश्वास असणे साहजिकच होते. मल्हारराव होळकरांना अहिल्याईंच्या डोळ्यातील ते तेज पाहून, तो करारी बाणा, धाडसीपणा आणि पेशव्यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराचा स्पष्टपणा आणि निडरपणा पाहून मल्हारराव होळकर प्रभावित झाले आणि हीच मुलगी आपल्या राज्याचे/साम्राज्याचे रक्षण/पालन/पोषण करेल अशी खात्री त्यांना झाली म्हणून अहिल्याईंना सून करून घेण्याचे ठरवले. लागलीच माणकोजी शिंदे यांच्याशी बोलणी करून मारूतीच्या मंदिरात सुपारी फोडली. पुण्यात मोठ्या धुमधडाक्यात अहिल्याई व युवराज खंडेराव होळकर यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. तो सोहळा पाच दिवस चालला होता. त्यासाठी खुद्द सवाई बाजीराव पेशवे स्वतः जातीने हजर राहून लक्ष घालत होते. मराठी साम्राजाचे तसेच अनेक प्रमुख सरदार येऊन त्यांना शुभेच्छा व भेटवस्तू देऊन जात होते. छोट्याशा चौंडी गावची, सीना नदीच्या वाळूत खेळणारी बागडणारी अहिल्या आता माळवाधिपती सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांची सून तथा युवराज खंडेराव होळकर यांची धर्मपत्नी झाली होती.
           सासरी गेल्यानंतर अहिल्याईंना सर्वांचे प्रेम मिळाले. मनमिळाऊ स्वभावामुळे अहिल्याईंनी सासरकडच्या सर्वांचीच मने जिंकून घेतली होती. वडील माणकोजी शिंदे यांच्याप्रमाणेच मल्हारराव होळकर यांनी अहिल्याईंना सुनेप्रमाने नव्हे तर पोटच्या पोरीसारखा जीव लावला. वाचन लेखन याप्रमाणेच अहिल्याईंना मल्हारराव होळकर यांनी राजनीती व युद्धनीतीचे धडेही शिकवले शिवाय भालाफेक, तलवारबाजी, दांडपट्टा तसेच घोडेस्वारी शिकवली आणि विशेषतः हे सर्व शिकणाऱ्या अहिल्याई या प्रथम महिला होत. आज एकविसाव्या शतकात आपले सरकार अनेक योजना राबवत असते परंतु त्या आमलात आणण्यासाठी कोणीच सकारात्मक पाऊले उचलत नाही. "बेटी बचाओ, बेटी पढाओ", महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण या योजना आणि घोषणा मात्र हवेतच विरून जातात. एखाद्या मुलीवर, माता-भगिनीवर अन्याय अत्याचार झाला तरच या गोष्टी हळूच वरती डोकावतात, सोशल मीडियावर तर अशा गोष्टींना उधानच येते परंतु जशी एखादी घटना घडून भूतकाळात जाईल तसा त्या घटनांचा विसर पडतो मग जोपर्यंत दुसरी एखादी घटना घडत नाही तोपर्यंत सगळीकडेच शांतता आणि शांतताच... मात्र अठराव्या शतकात माणकोजी शिंद्यांनी आपल्या मुलीला शिकवले, सासरे मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेला पोटच्या पोरीसारखा जीव लावून तलवारबाजी, भालाफेक, दांडपट्टा, घोडेस्वारी असे मर्दानी खेळ शिकवले आणि अहिल्याईंनी देखील तज आत्मसात केले, शिवाय एक आदर्श पती या नात्याने युवराज खंडेराव होळकर यांनी देखील सततच्या मोहिमांतून अहिल्याईंना सहकार्य करून त्यांच्या राजनीतीचा, युद्धनीतीचा सन्मानच केला. जर खरोखरच महिला सबलीकरणासाठी आणि महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्न करायचे असतील तर प्रत्येकाने माणकोजी शिंदे, सुभेदार थोरले मल्हारराव होळकर, युवराज खंडेराव होळकर यांच्यासारखेच स्वतःच्या घरातून सुरुवात केली तर "बेटी बचाओ, बेटी पढाओ" म्हणायचे दुर्दैव भारतासारख्या विशाल देशावर ओढवणार नाही.
क्रमशः.....
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Tuesday 14 May 2019

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर (पुष्प पहिले) ✍️नितीनराजे अनुसे



           या जगाच्या पाठीवर अनेक रत्नांनी जन्म घेतला त्यातीलच एक अनमोल रत्न म्हणजेच राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई होळकर होत. विविधतेतून नटलेला, ज्या देशात अनेक जाती-धर्माची लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत अशा अतुलनीय भारत देशातील महाराष्ट्र राज्यात, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुकास्थित चौंडी गावचे पाटील माणकोजी शिंदे व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी जगविख्यात आदर्श प्रशासक तथा राज्यकर्ती असलेल्या अहिल्याईंचा जन्म ३१ मे १७२५ रोजी झाला. चौंडी हे सीना तीरावरील छोटेसे गाव आणि अहिल्याईंचे वडील माणकोजी शिंदे हे गावचे पाटील असल्याने त्यांच्याकडून व आई सुशिलाबाई यांच्याकडून अहिल्याई यांच्यावर संस्कार करण्यात काहीच कसूर झाली नव्हती.
       अहिल्याईंच्या बाल जिवनातील विसंगत अख्यायिका सांगितल्या जातात. त्या कितपत खऱ्या/खोट्या यावरती लेखक/व्याख्याते/विचारवंत यांचे एकमत होणे आवश्यक होते ते अजूनही झाले नाही हे एक इतिहासाबाबतचे दुर्देवच म्हणायला हरकत नाही. त्यापैकीच एक अख्यायिका म्हणजे एकदा चोंडी गावात थोरले बाजीराव पेशवे यांच्या सैन्याचा तळ पडला होता. सीना नदीच्या काठी असलेल्या एका देवालयात दर्शनासाठी म्हणून छोटी अहिल्या आपल्या आईबरोबर गेली होती. तेथे नदीच्या वाळूत खेळताना अहिल्येने वाळूचे एक शिवलिंग बनविले. तेवढय़ात सैन्यदलातील एकाचा घोडा उधळला. उधळलेला घोडा आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहून अहिल्याबरोबरच्या मैत्रिणी भिऊन पळून गेल्या. मात्र अहिल्या मुळीच डगमगली नाही. तिने आपण तयार केलेल्या शिवलिंगावर पालथे पडून त्या शिवलिंगाचे रक्षण केले.
          तेवढय़ात पाठीमागून आलेल्या श्रीमंतांनी थोडय़ाशा जरबेच्या आवाजातच अहिल्येला म्हटले की, पोरी तुला घोडय़ाने तुडवले असते तर? त्यावर अहिल्याबाई आपले डोळे श्रीमंतावर रोखत म्हणाली की, हे शिवलिंग मी घडविले आहे व आपण जे घडविले आहे त्याचे प्राणपणाने रक्षण करावे असे थोरली माणसे सांगतात. मी तेच केले आहे. तिचे बाणेदार उत्तर ऐकूण श्रीमंत तर खूश झालेच परंतु त्यांच्याबरोबर असलेले सरदार मल्हारराव होळकर यांनी छोटय़ा अहिल्येला आपली सून करून घेण्याचे ठरविले. अख्यायिका काही असली तरी त्यातून अहिल्याईंचा धाडसीपणा, करारी बाणा लक्षात येतो आणि अहिल्याईंवरती झालेले संस्कार स्पष्टपणे नजरेस पडतात ज्याच्या जोरावर पुढील जीवनात अहिल्याई होळकर या जगातील एकमेव उत्तम प्रशासक म्हणून गणल्या गेल्या.
क्रमशः.....
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

आज वाढदिवस लाडक्या अभिनेत्याचा... ✍️नितीनराजे अनुसे



अभिनेता शरद गोयेकर (टिंग्या)


             मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला एक सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य अभिनेता, ज्याने "टिंग्या" या चित्रपटाच्या माध्यमातून अगदी कमी वयातच २००६-०७ च्या दरम्यान अखंड महाराष्ट्राला हसायला लावलं, रडायला लावलं आपल्या अभिनयाने भावनिक आणि हळवं करून सोडले. त्या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे शरद गोयेकरला माजी राष्ट्रपती मा.प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अशा माझ्या छोट्या भावाला अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या टिंग्याला जन्मदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा💐💐
💐

             मध्यतंरीच्या काळात राष्ट्रपती पुरस्कार विजेता कसलेला टिंग्या हा मराठी चित्रपट सृष्टीतील काही जातीयवादी समिकरणांमुळे मराठी पडद्यावरुन गायब झाला होता. कितीही धर्मनिरपेक्ष भारत देश म्हंटले तरी भारतात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक समाजात जातियवाद ठासून भरला आहे. आजकाल शैक्षणिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक तथा व्यवसायिक क्षेत्र जसे की चित्रपट सृष्टी असो प्रत्येक क्षेत्रात जातियवादाचा नंगानाच चालू असल्याने एका उत्कृष्ट अभिनेत्याला चित्रपटात अभिनय करण्यापासून कित्येक वर्षे वाट पहावी लागते. शरद गोयेकरला सुद्धा याचा सामना करावा लागला परंतु जवळपास ८-९ वर्ष प्रतिक्षा केल्यानंतर त्याने स्वतःचा बब्या चित्रपट चित्रपट प्रदर्शित करायचे ठरवले परंतु काही आर्थिक अडचणींमुळे टिंग्याला त्याचे चित्रीकरण नाइलाजाने थांबवावे लागले.
         शरद गोयेकर अर्थातच टिंग्या हा सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने संघर्ष त्याच्या वाट्याला आला आहे तरीही तो डगमगला नाही पुन्हा एकदा तो स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. येत्या २६ जून २०१९ रोजी शरद गोयेकरचा "माझ्या प्रेमा" हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यासाठी माझ्याकडून टिंग्याला आणि त्याच्या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
                    निकलता हुआ सूरज दुआ दे आपको,
खिलता हुआ फूल खुशबू दे आपको,

हम तो कुछ देने के काबिल नहीं

खुदा हज़ार खुशियां दे आपको.

!!हैप्पी बर्थडे टिंग्या!!


जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.com

Monday 13 May 2019

राष्ट्रमातेच्या जयंती निमित्त वेगवेगळे उपक्रम राबवावेत... ✍️नितीनराजे अनुसे

राष्ट्रमाता रणरागिणी अहिल्याई होळकर


           अठराव्या शतकातील जगातील एकमेव महान अशी आदर्श राज्यकर्ती तथा प्रशासनकर्ती म्हणून जगाने ज्या मायमाऊलीचा गौरव त्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची  जयंती जवळ येऊन ठेपली आहे. ३१ मे २०१९ रोजी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा २९४ वा जयंती उत्सव संपूर्ण भारतभर साजरा होत असला तरी जयंती साजरी करताना काही गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा असे मला वाटते.
            राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्यासारखे जगातील अनमोल रत्न भारतामध्ये जन्माला यावे हे एकट्या महाराष्ट्रातील जनतेलाच नव्हे तर विषेशतः अखंड भारतवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. अहिल्याई होळकर या नुसत्या राज्यकर्त्या/प्रशासनकर्त्या नव्हत्या तर त्या प्रजेच्या, मुक्या पशुपक्ष्यांच्या मायमाऊलीच होत्या. एखाद्या व्यक्त्तीची ओळख ही त्याच्या नावावरून होत नसते तर ती त्याच्या कार्यातून होत असते त्यापैकीच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर या एकमेव होत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे जागविती। या तुकोबारायांच्या अभंगातून बोध घेत राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी आपल्या राज्यात झाडे लावण्याचे व ती जगवण्याचे फर्मान काढले होते. वड, आंबा, चिंच, फणस अशा सावली देणाऱ्या शिवाय ज्यापासून उत्पन्न मिळेल अशी झाडे लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले होते त्याबदल्यात शेतसारा म्हणून १२ झाडापैकी ७ झाडांपासून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांनी स्वतःकडे ठेवायचे तर उर्वरित ५ झाडांचे उत्पन्न महसूल म्हणून सरकारी खात्यात जमा करायचे तीच ही आजची ७/१२ची पद्धत... अशी योजना राबवून राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी खऱ्या अर्थाने सृष्टीचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना राबवल्या होत्या आणि आमलात सुद्धा आणल्या होत्या. आजचे राज्यकर्ते/प्रशासनकर्ते हे एसी रूम मध्ये बसून कागदावरच अशा योजना राबवतात आणि कचरा कुंडीत फेकून देतात त्यामुळे आजची ही भयानक परिस्थिती उद्भवली आहे.
        राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी याव्यतिरिक्त अनेक जनविकासाची कामे अखंड भारतभर केली. दुष्काळ परिस्थितीमुळे अन्नाशिवाय लोक भुकेने मरत होते त्यांच्या हाताला कामे देऊन अहिल्याईंनी दुष्काळाला आवाहन देण्यासाठी वायफळ पाणी अडवून ठेवण्यासाठी शेतामध्ये बांध घातले, अनेक शेततळी, विहिरी, बारवे बांधून घेतले, वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जागोजागी पाणपोई बांधून घेतल्या शिवाय वाटसरूंची गैरसोय होऊ नये म्हणून धर्मशाळा उभारल्या अन्नछत्र सुरू केली . दुष्काळात पशूपक्षांसाठी धान्याची अनेक शेती मोकळ्या करून ठेवल्या होत्या. याव्यतिरिक्त अहिल्याईंनी जगातील पहिल्यांदाच न्यायव्यवस्था सुरू केली. विधवांना व निपुत्रिकांना मुल दत्तक घेण्याचा अधिकार दिला. स्वराज्यात अस्पृश्यतेचे उच्चाटन केले. सतीप्रथेस विरोध केला. राज्यात दारूबंदी हुंडाबंदी कायदा लागू केला.
     राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी फक्त एकाच राज्यापुरते, एकाच जाती-धर्मापुरते काम केले नाही तर त्या पलीकडे जाऊन त्यांनी धर्मनिरपेक्षतेने अखंड भारतभर काम केले आहे. प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महारानी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महारानी मार्गारेट यांच्यापेक्षा अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या राष्ट्रमातेने जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्रमाता रणरागिणी महारानी अहिल्याई होळकर होत. अशा राष्ट्रमातेची जयंती साजरी करत असताना समाजबांधवांनी, सामाजिक संघटनांनी पैशाची वारेमाप उधळपट्टी न करता, डीजे डॉल्बी अशा अवाजवी साधनांचा अवलंब न करता त्याच पैशाचा वापर करून राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर समाजोपयोगी उपक्रम राबवून सृष्टीचा समतोल राखण्यास मदत करावी व अहिल्याईंचे विचार लोकांच्या डोक्यात पेरावेत हीच नम्र विनंती.
कृपया व्याख्यात्यांनी/लेखकांनी/विचारवंतांनी विशेषतः या गोष्टींवर भर द्यावा.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Friday 10 May 2019

खाकी वर्दीतही माणूसकी जपणारा अधिकारी ✒नितीनराजे अनुसे

API Namdev Shinde

        पोलिस म्हंटले की सर्वसामान्य माणसांच्या मनात एक विलक्षण भिती निर्माण होते, क्रुर, निष्ठुर, निर्दयी, दगडाच्या काळजाचा माणूस असे चित्र डोळ्यासमोर ठेऊन सर्वसामान्य माणसं पोलिसांबद्दल नाना तर्हेचे विचार करत बसतात.  परंतु सध्या जयसिंगपूर येथे कार्यरत असणारे सहायक पोलिस निरीक्षक मा. नामदेव शिंदे साहेब याला अपवाद आहेत. 
         व्हाटसप च्या माध्यमातुन समाजजागृती करत असताना २०१५ मध्ये शिंदे साहेबांशी माझी ओळख झाली.  तेव्हा ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात वेळापूर पोसिस स्थानकात सहायक निरीक्षक म्हणून कार्यरत होते. अधूनमधून फोन कॉल व्हायचे तेव्हा शिंदे साहेब मोठ्या भावाच्या नात्याने  मला म्हणायचे की वेळापूरला कधी आला तर अवश्य भेट घे. २९ मार्च २०१६ रोजी तसा योग आला. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी चौंडी ला जात असताना शिंदे साहेबांना फोन करून त्यासंदर्भात सांगितले आणि मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपून परत येताना साहेबांची भेट घ्यायला वेळापूर मध्ये थांबलो सायंकाळच्या साडेसात वाजून गेल्या होत्या तरी शिंदे साहेब अजूनही ऑफिस मध्ये होते.  शिंदे साहेबांनी पोलिस स्थानकात ऑफिस मध्ये यायला सांगितले.  सोबत मित्र विक्रम देवडकर, चुलत भाऊ सुनिल, आई-वडिल होते.  खरंतर आई- वडिलांनी कधी पोलिस स्टेशन अथवा कोर्ट कधी पाहिलेच नव्हते. परंतु आयुष्यात ते पहिल्यांदाच एका पोलिस अधिकारी सोबत त्यांच्या ऑफिसमध्ये  मनमोकळेपणाने दिलखुलास गप्पा मारत होते. माझ्या आई-तात्यांनी जसे परिस्थितिचे चटके खाऊन मला शिकवलं लहानाचं मोठं केलं तशाच परिस्थितितून शिंदे साहेब पुढे आले आहेत. ते शिंदे साहेब आज एक कर्तव्यदक्ष,  कार्यक्षम अधिकारी आहेत, तसा वेळापूर पंचक्रोशित त्यांचा दबदबा देखिल होता.  परंतु मनमोकळ्या स्वभावामुळे स्थानिक नागरिकांच्या मनात त्यांनी घर निर्माण केले होते.  सदैव हसतमुख राहणारे शिंदे साहेबांचे व्यक्तिमत्व हे लहान-थोरांना भाळवणारे आहे. जिथे जिथे शिंदे साहेब जायचे तेथील अवैध धंद्यांना ते पाबंदी लावत असत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळे. पोलिस हा जनतेचा शत्रु नसून मित्र आहे हे विचार त्यांनी नागरिकांच्या मनावर बिंबवले आहेत आणि त्या विचाराने ते प्रामाणिकपणे अविरत कार्य करत असतात. गडचिरोली सारख्या ठिकाणी नक्षलवादी भागात देखील मा. नामदेव शिंदे साहेब यांनी कर्तव्य बजावले  परंतु  त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांना तिथे कधीच त्रास झाला नाही. उलट शिंदे साहेबांनी पोलिस म्हणून नव्हे तर एक आदर्श नागरिक या नात्याने तेथील युवकांना चांगली शिकवन दिली आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित केले. वेळापूर नंतर शिंदे साहेबांची बदली मंगळवेढा (सोलापूर),  हुपरी (कोल्हापूर) व सध्या जयसिंगपूर येथे कार्यरत आहेत.  शिंदे साहेब कितीही मोठ्या पदावर असले तरी त्यांनी अजूनही माणूसकी जपून ठेवली आहे.  सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबातून पुढे आलेले हे व्यक्तिमत्व आहे.  आजपर्यंत त्यांनी कधीच पदाचा आणि वर्दीचा गैरवापर केला नाही शिवाय गर्वही केला नाही.  पोलिस प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातुन नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवतात. आजपर्यंत त्यांना अनेक सामाजिक संस्थांनी आदर्श पोलिस अधिकारी म्हणून सन्मानित केले आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दित त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखत त्यांच्या अखत्यारित येणार्या विभागातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे हा त्यांच्या यशाचा आलेख असाच दिवसें-दिवस वाढत राहो हीच त्यांच्या जन्मदिनानिमीत्त माझ्याकडून मल्हारी मार्तंड चरणी प्रार्थना... 
मा. नामदेव शिंदे साहेब तुम्ही औक्षवंत व्हा
तुमच्या यशाचे आभाळ दिवसें-दिवस वाढत जावो याच तुम्हाला जन्मदिनाच्या शुभेच्छा... 
       -नितीनराजे अनुसे 
        8530004123