Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday 6 July 2019

आम्हाला न्याय द्या... खेकड्यांची आर्त किंकाळी... ✍️नितीनराजे अनुसे


      गावाकडे आल्यावर काल वडिलांना पेरणीसाठी जायचे असल्याने मी मेंढरं घेऊन शेताकडे गेलो. काही दिवस अगोदर पडलेल्या थोड्याफार पावसामुळे शिवार हिरवंगार झालं होतं. ओल्या गवतामुळे तशी मेंढरांना लवकर तहान लागत नाही म्हणून दुपारपर्यंत मेंढरं चारून पाण्यावर घालायची म्हणून खाली विहीरीवर घेऊन गेलो. विहीर तशी फार खोल नव्हती अगदी परूसभर सुध्दा नाही आणि त्यात पाणी सुद्धा जेमतेमच होते. थोड्याफार तहानलेल्या मेंढ्या पळतच विहीरीत उतरल्या आणि गटागटा पाणी पिऊन बाहेर पडायला लागल्या. तेवढ्यात कसलातरी आवाज यायला लागला म्हणून कान टवकारून त्या दिशेने बघतो तर काय विहीरीच्या आसपास असलेल्या बिळांमधून एकेक खेकडा बाहेर पडू लागला. मला वाटलं की मुके प्राणी आहेत बिचारे, मेंढ्यांच्या पळण्याच्या आवाजाने घाबरले असतील नाहीतर अन्नाच्या शोधात बाहेर पडत असतील. पण वास्तविक पाहता तसे काही नव्हते. सर्व खेकडे माझ्या भोवती गोळा झाले. कसलातरी विचित्र आवाज करत ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करत करत होते. खरंतर त्यांच्या भावनेतूनच त्यांची भाषा आता स्पष्टपणे ऐकायला येत होती. काल परवाच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याच्या दुर्गम भागातील तिवरे (भेंडवाडी) गावानजीक असलेले तिवरे धरण फुटून जवळपास २४ जण बेपत्ता झाले त्यातील आतापर्यंत ६ जणांचेच मृतदेह सापडले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तेथील स्थानिकांनी त्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. परंतु त्यावर गांभीर्याने लक्ष न देता गावकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी म्हणून त्या धरणातील गाळ उपसून डागडुजी करण्यात आली होती. मात्र धरण कसे फुटले त्याबद्दलचा अहवाल मागितल्यानंतर जंलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी चक्क सांगितले की निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे नव्हे तर खेकड्यांच्या प्रादुर्भावामुळे तिवरे धरण फुटले. माझ्या अंदाजानुसार जगाच्या इतिहासातील ही एकमेव घटना असावी की खेकड्यांमुळे धरण फुटले थोडक्यातच त्याचा अर्थ असा होतो की खेकड्यांनीच तिवरे धरण फोडले.
         म्हणूनच की काय ते सर्व खेकडे माझ्या भोवती गोळा झाले होते. त्यांच्या जमातबांधवांवरती धरण फोडल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे प्रत्येकजण जणू काय आपले जमातबांधव निर्दोष असल्याची विनवणी करत माणसं कशी स्वार्थी आहेत ते सांगत होता. तेवढ्यात मध्येच एकजण म्हातारा खेकडा समोर आला आणि सांगू लागला की "हे बघा, आमच्या बापजाद्यांपासून आमची खेकडा जमात ही अखंड भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात आहे. तिथे तिथे आमची ही जमात सुखासमाधानाने जगत आहे. जगभरात असंख्य धरणे आहेत. एवढेच काय तर भारतात सुद्धा आहेत. राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी सुद्धा धरणे बांधून ठेवली आहेत. तद्नंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा राधानगरीचे धरण बांधले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या आराखड्यानुसार गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण असो अथवा त्याव्यतिरिक्त इंग्रजांच्या काळात बांधलेली अनेक धरणे आहेत. अगोदरच्या बांधलेल्या धरणाजवळ देखील आमची खेकडा मोठ्या प्रमाणात जमात वास्तव्यास आहे हवे तर त्यासंदर्भात तुम्ही अहवाल मागवू शकता. मात्र विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की त्याकाळी बांधलेली धरणे अजून जशीच्या तशीच आहेत मग आता २००४ साली कार्यान्वित करण्यात आलेले तिवरे धरणच आम्ही कसे काय फोडले? निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून माणसांच्या जीवाशी खेळ चाल्लाय हे माणसांना कसं काय दिसत नाही?"
          तेवढ्यात दुसरा एक खेकडा मध्येच उभा राहिला आणि म्हणाला की, "आम्ही बोलू शकत नाही हे मान्य आहे त्यामुळे आमच्यावर आरोप प्रत्यारोप होतील परंतु बोलत्या-चालत्या ज्या माणसांचे जीव गेले आहेत, त्यांचे काय? काही गुन्हा नसताना त्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे ते सुद्धा बोलत्या-चालत्या माणसांमुळेच... मग आमच्यावर आरोप करण्यागोदर कमीत कमी माणूसकीची लाज वाटून तरी संबंधितांनी स्वतःच्या हलगर्जीपणाची लाज बाळगायला हवी होती. परंतु माणूसकी हरवलेल्या या जगात मुक्या प्राण्यांवर आरोप करून बाजूला होणारी हीच माणूसकी आज आम्ही नव्याने पाहतोय. हेच का ते कलियुग? जर आम्हा खेकड्यांना धरणे फोडायची असती तर आजपर्यंत एकही धरण ठेवले नसते सगळी धरणे फोडली असती. तसंही त्या तिवरे (भेंडवाडी) गावच्या ग्रामस्थांनी आमचे काही बिघडवले नव्हते. त्यामुळे संबंधित जलसंधारण मंत्र्यांनी जबाबदार अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार जे कोणी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. माणसांचा जीव काय असतो हे आम्हाला चांगलंच माहीत आहे कारण आम्हीच त्यांच्या आजारावर उपयोगी येतो, माणसांच्या आरोग्यासाठी आम्ही आमचे जीव देतो. मग आम्ही कशाला त्या गोरगरिबांचे जीव घेऊ? माणसातील माणूसकी शिल्लक राहिली नसल्यानेच माणसंच माणसांचा जीव घेत आहेत, खून करत आहेत, अन्याय अत्याचार करत आहेत. मग त्यांच्या चुकीसाठी आम्हाला का जबाबदार धरले जातेय...? जनाची राहीली कमीत कमी मनाची लाज बाळगून आम्हा मुक्या प्राण्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनवणी आहे."
     खेकड्यांच्या त्या विनवण्या ऐकून खरंतर मलाच माणूसकीची लाज वाटायला लागली. स्वतःच्या नपुंसकतेमुळे मुक्या प्राण्यांवर आरोप करून स्वतःला सुरक्षित ठेवणाऱ्या औलादी खरंच माणूसकीच्या नावाला लागलेला एकप्रकारचा कलंक आहे. मेंढरामागेच या गावावरून त्या गावाला भटकंती करत असताना तत्कालीन परिस्थिती पाहून आमचे तात्या कधीकधी एक गाणं गुणगुणत होते त्या गाण्याच्या पहिल्या ओळी आज स्पष्टपणे आठवताहेत त्या म्हणजे "कलियुगात झाली भेळ, लावली रताळं आली केळं" या वरून तरी असंच वाटतंय की सध्याच्या युगात माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला जबाबदार धरेल आणि काय करेल हे सांगणे अशक्य आहे. कारण या जगात माणूसकी शिल्लक राहिली आहे की नाही? असा प्रश्न पडतोय....
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
📧nitinrajeanuse123@gmail.com