Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday 14 November 2019

वासुदेव आला हो वासुदेव आला... ✍️नितीनराजे अनुसे


समाजाच्या भल्यासाठी जय मल्हार बोला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

जागा हो धनगरा, आता संधी ही अनमोल।
तुझ्या प्रगतीला पूर्वजांच्या इतिहासाचं रं मोल।।
मनगटाच्या जोरावर कसा इतिहास घडविला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

अंधारल्या दाही दिशा, गोंधळला समाज।
घालूनि झडप, धावून येते हो सावज।।
समाजाच्या हाती आता ज्ञानरूपी कंदील दिला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

अज्ञानाचं लक्षण, आलंय समाजाच्या नशिबी।
समतेचे गणित सारं झालंय बेहिशोबी।।
आजपर्यंत धनगरांचा नुसता वापरच झाला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

धनगर जमात, तशी आहे इमानदार।
आजपर्यंत दुसऱ्यांचीच भरली हो घरं।।
बुद्धिजीवी वर्ग आतातरी शहाणा झाला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

नेत्यांच्या अहंकारातून झाली समाजाची दशा।
द्यावी म्हणतोय आता पुन्हा एक नवी दिशा।
क्रांतीच्या मशाली इथूनच पेटवायला आला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।

समाजाच्या भल्यासाठी जय मल्हार बोला।
अन् वासुदेव आला हो वासुदेव आला।।
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
            ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Wednesday 6 November 2019

आक्रोश मेंढपाळांचा... ✍️नितीनराजे अनुसे

 

         खरंतर नैसर्गिक आपत्ती कधी कोणाला सांगून येत नाही तर धुडगूस घालून निघून गेल्यावर नैसर्गिक आपत्ती आल्याचे समजते. या घटना घडू नयेत आणि घडल्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी भारतामध्ये आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)ची स्थापना करण्यात आली आहे. एकूण ११ ठिकाणी  बीएसएफ (BSF), सीआरपीएफ(CRPF), सीआयएसएफ(CISF), आणि आयटीबीपी (ITBP) यांच्या टीम आहेत. महाराष्ट्र राज्यात पुणे येथे तळेगाव जवळ सीआरपीएफ ची National Disaster Responce Force म्हणून टीम काम करते तर विदर्भातील नागपूर येथे National Disaster Management Training Institute आहे. ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येते त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या अखत्यारीत येणारी एनडीआरएफ ची टीम धावून येते. हे खरंतर सर्वांना माहीत असावे म्हणून लिहिले आहे. महाराष्ट्र राज्यात कितीतरी वेळा नद्यांना पुर येऊन गेला, भूकंप झाले, कधी मानवीकृत आपत्ती आली तर कधी नैसर्गिक परंतु अशा आपत्ती मध्ये श्रीमंत घराण्यात जन्माला आलेल्यांना काही फरक पडत नाही तर फरक त्यांना पडतो ज्यांचा संसार हातावर चालतो. म्हणजे कष्ट केल्यानंतरच एक वेळची भाकरी ज्यांच्या नशिबी असते त्याच संसाराला हातावर चालणारा संसार म्हंटलं जातं. प्रामुख्याने इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या, सत्ताधाऱ्यांच्या कृपेने देशोधडीला लागलेला शेतकरी, एकवेळच्या अर्ध्या-कोर भाकरीच्या तुकड्यासाठी मिळेल ते काम करणारा गोरगरीब मजूर/कामगार आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याच्या शोधात वणवण भटकणारा मेंढपाळ यांचे संसार हे हातावरती चालणाऱ्या संसारापैकी आहेत.

         अशाच हातावर पोट भरणाऱ्या मेंढपाळ कुटूंबांवरती नैसर्गिक आपत्तीने घाला घातला आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील गणेशपुर, लाखनवाडा, हिवरखेड या भागातील मेंढपाळ बांधवांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. एकीकडे प्रशासन व्यवस्था ही शेतीचे पंचनामे करण्यात व्यस्त आहे तर दुसऱ्या बाजूला मेंढपाळांवरती संकट आ वासून उभे राहिले आहे. आज इथे तर उद्या तिथे अशी भटकंती करत जीवन जगणारे मेंढपाळ बांधव हे फिरस्ते आहेत घरदार सोडून ते भटकंती करत असतात. चाऱ्याच्या शोधात ते सतत भटकत असतात त्यातूनच त्यांच्या पोटाची खळगी भरली जातात, लेकरांबाळांचे शिक्षण सुद्धा याच व्यवसायावर अवलंबून आहे. त्या भागात सततच्या पावसाने झालेल्या चिखलातून मेंढ्यांना चालणं तर मुश्कील झालेच होते त्यात पाऊस पडत असताना चारा न मिळाल्याने शेकडोंच्या वरती मेंढ्या उपासमारीने मेल्या तर पोटात अन्नाचा कण नसलेल्या मेंढ्या मुसळधार पावसातून वाहून सुद्धा गेल्या. ज्यांच्या जीवावर पोट भरायचं त्याच मेंढ्या डोळ्यासमोर तडफडून मरून जात असतील आणि शेकडो मेंढ्या वाहून जात असतील तर खरोखरच मेल्याहून मेल्यासारखे आहे. त्यांच्यासाठी कोणती एनडीआरएफ टीम धावून येऊ शकत नाही आणि नाही त्यावरती कोणते व्यवस्थापन...  कारण काही टग्यांच्या (ज्यांना धनगरांनी बहुमताने निवडून दिले अशा मस्तावलेल्या नेत्यांच्या) मते ती कोंबड्या-गाढवे-कुत्री आहेत म्हणूनच की काय जवळच्याच नागपूरच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण विभागाला सुद्धा जाग आली नसावी हे मात्र दुर्दैवच म्हणावे लागेल. तरीही सुशिक्षित मेंढपाळ आनंद कोकरे यांचे सहकारी मेंढपाळपुत्र आंदोलनातील लढवय्ये आमचे मित्र सौरभ हटकर, डॉ. संतोष हटकर शिवाय अन्य सुशिक्षित मेंढपाळपुत्रांनी मेंढपाळांच्या हाकेला  धावून जात घटनास्थळी पोहचून संबंधित मेंढपाळ बांधवांना आधार दिला आहे, जिल्हाधिकारी कार्यालय गाठून सद्यस्थितीचा आढावा दिला आणि पंचनामे करून घेण्यास प्रशासनाला भाग पाडले. त्यांच्याच माध्यमातून शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष ना.बाळासाहेब दोडताले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पिडीत मेंढपाळ बांधवांना दिलासा दिला. त्याबद्दल या सर्वांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत...

      असो याच धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे ही प्रस्थापित नेत्यांनी, सरकारने स्वताच्या घशात घालून घेतलीत एकीककडे जंगलच्या जंगल उध्वस्त करून लवासा सारखी सिमेटची जंगले वसवली आहेत, कारखाने, सुतगिरण्या तर रासायनिक प्रकियेमुळे जिवित हानी पोहचवणाऱ्या केमीकल कंपन्या उभारल्या जातात तर दुसरीकडे शेळ्या-मेंढ्यां, गाई-म्हैसीसाठी असलेली चराऊ कुरणे औद्योगिक संस्थांसाठी वापरली जातात मग शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करून पोट भरण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो मग धनगर समाजातील मुलं-मुली आई-वडिलांसोबतच जातात त्यांच्या शिक्षणासाठी, राहण्यासाठी निष्क्रीय सरकार काही करू शकत नाही पण करोडो अब्जो रूपयांची राखरांगोळी करणाऱ्या, एका धनगर समाजातील मंत्र्याचा पराभव केला म्हणून ३०-३० जेसीबी मधून गुलाल उधळणाऱ्यांनी आणि त्याच्या घरातील राज्यकर्त्यांनी पूर्वीच लक्ष घातले असते तर आज धनगर समाजावर ही वेळ आलीच नसती, धनगर समाजातील नेत्यांनी सुद्धा मी धनगर मी धनगर म्हणून उदो उदो करत बसण्यापेक्षा तुमच्या आंदोलनात, मोर्चात साध्या चहाची सुद्धा अपेक्षा न ठेवता प्राणपणाने झटणाऱ्या आणि झगडणाऱ्या भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना अशा नैसर्गिक तथा मानवीकृत आपत्तीमध्ये नुकसान भरपाई म्हणून थोडाफार का होईना मदतीचा हात द्यावा, प्रशासनाच्या वतीने जेवढा निधी उपलब्ध करता येईल त्यासाठी प्रयत्न करावेत शिवाय शेळ्या-मेंढ्यासाठी चराऊ कुरणे राखीव केली आणि मेंढपाळांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली तर सोन्याहून पिवळं...
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
     एक मेंढपाळपुत्र...
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123