Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday 4 September 2021

इंटरनेट एक 'माया'जाळ... ✍️नितीनराजे अनुसे

 


इंटरनेट एक 'माया'जाळ... ✍️नितीनराजे अनुसे

दि.०४ सप्टेंबर २०२१

           आजच्या एकविसाव्या शतकात अर्थातच तंत्रज्ञान विकसित युगात इंटरनेट हे एक महत्त्वाचे म्हणण्यापेक्षा दैनंदिन जीवनातील खूप गरजेचे साधन झालेले आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. इंटरनेटची कल्पना काय आताच जन्माला आली नाही तर १९६९ मध्ये अमेरिकन लष्कराने संदेशवहनासाठी आर्पानेट नावाचे पायाभूत नेटवर्क सुरू केले होते. कालांतराने नवनवीन संशोधन व माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी या नेटचा वापर करण्यात आला. म्हणजेच १९६९ साली इंटरनेट चा खरा जन्म झाला परंतु भारतात शिक्षणासाठी तसेच संशोधनासाठी इंटरनेटचा वापर १९८८ पासून सुरू झाला. तसे पाहिले तर इंटरनेट मुळे सर्व काही सोयिस्कर झाले आहे असे वाटते कारण इंटरनेट मुळे इ मेल - माहितीची देवाण घेवाण- जगभरच्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी वा नातेवाईकांशी आपण संपर्क ठेवू शकतो. जगातील कोणत्याही संगणकावर आपणास काम करता येते व तेथे आपले प्रोग्रॅम चालवून पहाता येतात. आपल्या संशोधन प्रबंधासाठी वा व्यापार उद्योगासाठी आपण इंटरनेटचा उपयोग करू शकतो. इंटरनेटमुळे जगातील वृत्तपत्रे, मासिके, लायब्ररीतील पुस्तके, म्युझियम, संगीत यांचा लाभ मिळू शकतो. शिवाय करमणुकीसाठी नवीन साधने देखील इंटरनेट वरती सहजपणे उपलब्ध होतात. काही सेकंदाच्या आतमध्ये ऑनलाईन पैसे देखील सहजपणे पाठवू शकतो.

          परंतु अलीकडच्या काळात इंटरनेट जेवढे फायद्याचे झाले आहे तेवढेच नुकसानदायक देखील ठरते आहे. आजची युवा पिढी या इंटरनेटच्या 'माया'जाळात सहजपणे अडकत चालल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. हल्ली कोरोना विषाणू रोगामुळे लॉकडाउन काळात तर इंटरनेटच्या वापराचा कहरच झाला. लॉकडाउनमुळे चार भिंतीत कंटाळवाणे जीवन जगण्याऱ्यांना करमणुकीसाठी म्हणून दूरदर्शन व्यतिरिक्त इंटरनेटचा वापर करणे स्वाभाविक होते परंतु यामध्ये भरडली गेली ती आजची युवा पिढी आणि उद्याच्या भारताचं उज्वल भविष्य... लॉकडाउनमुळे शाळा, विद्यालय, महाविद्यालयांना लॉक (टाळे) लागले मग विद्यार्थ्यांच्या भवितव्याला टाळे लागणार नाहीत तर आणखी काय होणार? बर लॉकडाउनमुळे ऑनलाईन शिक्षण पद्धत चालू केली चांगली गोष्ट आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातोय त्याबद्दल दुमत नाही. परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हातात स्मार्टफोन/लॅपटॉप/नोटपॅड आले आणि शिक्षण राहिले बाजूला परंतु विदेशी कंपन्यांनी भरमसाठ एप्लिकेशन्स बनवून ठेवलेल्या गेम्स खेळण्यात आणि नको ते व्हिडिओ पाहण्यातच भारताचं उज्वल भवितव्य व्यस्त झालेलं दिसून येते. तर दुसरीकडे आजची युवा पिढी नेट सर्फिंगमुळे भलतीकडेच जास्त आकर्षित झालेली दिसून येते. इंटरनेटचे फायदे बाजूला ठेवून सोशल मिडिया (समाज माध्यमा) वरती फालतू गोष्टींमध्ये अग्रेसर असल्याचे देखील दिसून येते. मग फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम याव्यतिरिक्त व्हिडिओ चॅटिंग च्या माध्यमातून लैंगिक शिक्षण व लैंगिक आकर्षणाकडे इंटरनेटच्या आहारी गेलेल्या किशोरवयीन युवक युवतींचे प्रमाण आपसूकच वाढले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम वरती रील्स/व्हिडिओ पोस्ट करून लाइक्स, फॉलोअर्स च्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याकडे आजच्या युवा पिढीचा कल जास्त आहे. रात्र रात्रभर जागरण करणे, व्हिडिओ चॅटिंग, व्हिडिओ सर्फिंग केल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक तथा शारिरीक संतुलन बिघडत असून शैक्षणिक ज्ञानावर भर देण्यापेक्षा किशोरवयीन मुला-मुलींचा लैंगिक आकर्षणाकडे जास्त भर असतो आणि सर्रास कंपन्या, वेबसाइट्स त्यांच्या अश्लीलतेच्या जाहिराती विकायला कुठेच कमी पडत नाहीत. इंटरनेट वरती महत्वाची माहिती पाहत असले तरी त्यावरती नको त्या जाहिराती दाखवल्या जातात. त्यामुळे पालकांनी जर आपल्या पाल्यांवरती वेळीच अंकुश ठेवला नाही तर पाल्यांचं उद्याचं भविष्य हे इंटरनेटच्या मायाजाळात अडकून अंधारातच राहील. कारण योग्य वापर केल्यास इंटरनेट जेवढे फायद्याचे आहे तेवढेच त्याचा गैरवापर केला तर ते खूप आणि खूपच नुकसानदायक आहे.सदरच्या ब्लॉगमधून समाजप्रबोधन व्हावे हीच प्रामाणिक तळमळ आहे. 

                         ✍️नितीनराजे अनुसे

                         अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली

                         nitinrajeanuse123@gmail.com