Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 28 November 2017

माझ्या छत्रपती यशवंतराव होळकरांना परत पाठव...


*चक्रवर्ती सम्राट छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमीत्त*
*दि.३ डिसेंबर २०१४ चा माझा ब्लाॅग मी पुन्हा शेअर करतोय...*  *-नितीनराजे अनुसे*
      
          पहाटे पहाटेची वेळ होती, गाढ साखर झोपेत असताना अचानक कोणीतरी गालावर जोरदार चपराक मारण्याचा भास झाला, कोण?? कोण ?? असं म्हणत गालावर हात फिरवत डोळे चोळत उठून बसतो तोच समोर एक आकृति दिसली. धिप्पाडच्या धिप्पाड शरीरयष्टी, अंगावर जरदारी रेशमी वस्त्रे परिधान केलेली, भरदार दाढी आणि कोरीव मिशा, डोक्यावर शिलेदार हिरेजडित टोप आणि त्यामध्ये खोचलेला मानाचा तुरा असा वेष धारण केलेल्या व्यक्तिच्या डोळ्यात एकदम तेज निखार होता, कमरेला हिरेजडित म्याणात तलवार लटकत होती. मी त्या व्यक्तिला पटकन ओळखलं... अहो मीच काय भारत राष्ट्रातील कोणीही व्यक्ति ओळखणारच... मी चक्रवर्ती सम्राट छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांना ओळखलं तोच माझ्या तोंडातून शब्द फुटले की महाराज तुम्ही?? आणि इथं कसं काय???
       खरंतर ती व्यक्ति दुसरी तिसरी कोणी नव्हती तर इंग्रजांविरुद्ध कधीही न हारता एकूण १८ लढाया जिंकणारे आणि वीठोजीराव होळकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी  पुण्यात येवून शिंद्यांना-पेशव्यांना ताणून ताणून मारणारे मुत्सद्दी लढवय्ये महाराजाधिराज शुरवीर अजिंक्यवीर ज्यांना जगातील दुसरा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते ते छत्रपती राजे यशवंतराव होळकर होते.
   मी केलेल्या प्रश्नाचं मला खडसावतच महाराजांनी उत्तर दिलं की होय मीच यशवंतराव होळकर, "अरे तिकडं माझा धनगर समाज डोळ्यांवरती अज्ञानाचं घोंगडं पांघरुन गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय त्या माझ्या धनगर समाजाला कोण जागं करणार? त्यांचे समाजप्रबोधन कोण करणार? समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊन समाजाचा सर्वांगीण विकास कोण करणार?
एकामागोमाग एक अशाप्रकारे महाराज माझ्यावर प्रश्नांचा भडिमार करू लागले. महाराजांना काय उत्तर द्यायचं मलाच सुचत नव्हतं. गोंधळून गेलो, बावचळलो, आता काय आणि कसे उत्तर द्यायचे.... माझे ओठ पुटपुटत होते तेवढ्यात महाराज पुन्हा गरजले "अरे काय दातखीळी बसली की काय? मी विचारलेल्या प्रश्नाची मला उत्तर हवी आहेत...
       मी बोललो की महाराज आजचा धनगर समाज अजून गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय ही गोष्ट खरी आहे याची मला खंत देखिल वाटते आणि त्यांना जागं करायचा मी पुरेपूर प्रयत्न सुद्धा करतोय. पण काहीजण जागे आहेत पण महाराज त्यांनी मात्र झोपेचं सोंग घेतलंय. महाराज एक म्हणसुद्धा आहे की "एकवेळ झोपलेल्यांना जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना कधी जागं करता येत नाही."
तेवढ्यात महाराज ओरडले "अरे झोपेचं सोंग घेणाऱ्यांना लाथा घालून उठवायचं असतं, एवढीपण अक्कल नाही का?  "वेड्याला जोड्याचा मार अन शहाण्याला शब्दांचा मार द्यायचा असतो." महाराज खरं बोलत होते तसं त्यांनी  त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध देखिल करून दाखवले होते.
मी पुन्हा बोललो "महाराज हा आपला पुर्वीचा धनगर समाज नाही राहिला की ज्याला अन्यायाची जाण, लढण्याची हिंमत आणि स्वाभिमानाची किंमत होती. आज या महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज प्रस्थापितांच्या दावणीला बांधला गेलाय. या धनगर समाजातील नेते प्रस्तापितांना फितूर झालेत जसे  तुमच्या काळात हिंदुस्तानातील राजे फिरंग्या इंग्रजांच्या भितीने फितूर होऊन त्यांचेच गुलाम होऊन बसले होते. महाराज आजचा धनगर समाज स्वाभिमानाची भाषाच विसरून गेलाय. अन्यायाच्या विरोधात कसे पेटून उठायचे तेच आजच्या मावळ्यांना समजत नाही. का आजच्या धनगर समाज बांधवांमध्ये लढण्याची हिंमतच नाही तेच मला समजत नाही. जो धनगर समाज बांधव स्वतःचा स्वाभिमान दुसऱ्यांच्या बुटाखाली गहाण टाकतोय त्याला मी कसं जागं करू? ज्या धनगर समाजाला आपला इतिहासच माहीत नाही ते काय खाक इतिहास घडविणार का? महाराज आता तुम्हीच सांगा की आम्ही नेमकं कमी कुठे कमी पडलो? आणि आता आम्हाला काय करायला हवं?
पहाटेचे वातावरण एकदम शांत असताना महाराज एकाएकी कडाडले शांतता दुभांगल्यागत झाले आणि आगीचे लोळ जसे बाहेर पडावेत तसे महाराज आग ओकू लागले "अरे आम्ही घडवलेला इतिहास जर तुम्हाला आठवत नसेल तर मग तुम्ही धनगरांचे वारसदार कशासाठी म्हणवून घेता? हाडाची काडं करून आपले वंशज ते बहाद्दर लढले होते अन आम्हीसुद्धा तलवारीच्या टोकावर दुश्मनांना नाचवलं होतं तेव्हा रक्ताचं पाटच्या पाट पाण्यासारखं वाहत होतं एवढं बलिदान नेमकं कोणासाठी होतं? अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज फौजांची इभ्रत आम्ही जगाच्या वेशीवर टांगली होती. माल्कम, डूडरनेक सारखे इंग्रज अधिकारी आमच्या तलवारींचे पाणी चाखून गुडघे टेकले होते. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटावर मोजण्याइतपत मराठी सैन्यांना सोबत घेऊन जंगलातून, डोंगरदऱ्यांतून गणिमी काव्याने मोघलांना जेरीस आणलं होतं ते आमच्यासाठी आदर्श होते. परंतू जंगलदऱ्या दूरच राहिल्या सपाट मैदानासारख्या प्रदेशात मल्हारतंत्र वापरून आम्ही इंग्रजांना कसे ताणून ताणून मारले होते ते इंग्रजांनीच लिहून ठेवलंय पण तुम्हाला मात्र आमच्या शोर्याची काहीच कदर नाही. इंग्रज सैन्यांना कापून काढत छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर लढलेल्या महापुरुषांची अन पुर्वजांनी सांडलेल्या रक्ताचीच जाणीव जर आजच्या धनगर समाजाला नसेल तर या गोष्टीची आपल्या पुर्वजांना देखिल लाज वाटत असेल की आरे आपण कोणत्या समाजात जन्माला आलो? आणि याचा खरोखरंच त्यांना खेद देखिल वाटत असेल"
महाराजांचे डोळे लालबुंद झाले होते आणि महाराज खरोखरच जाम चिडले होते.
धनगर समाजानं हजारो वर्षापेक्षाही अधिक काळ या हिंदुस्थानावर केलेलं राज्य मग आद्यचक्रवर्ती सम्राट ययाति राजा पासून भारताच्या इतिहासाची सुरवात ज्यांच्या महान कर्तृत्वाने ओळखली जाते त्या आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्या पासून राजा बिंदुसार, राजा सम्राट अशोका ते राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी अहिल्यामाई होळकर, शुरवीर राजे यशवंतराव होळकर तुकोजीराव होळकर विरांगणा भिमाई होळकर यांचा राष्ट्राप्रती बलिदान दिलेला सुवर्णाक्षरात कोरलेला धनगर समाजाचा इतिहास ते माझ्यासमोर मांडत होते. तलवारीच्या जोरावर मिळवलेल्या यशाच्या गाथा गिरवत होते. स्वातंत्र्यासाठी लढणारे आद्यप्रणेते राजे यशवंतराव होळकरच होते, हे आम्हापासून जाणूनबुजून लपवून ठेवलं गेलं आणि चुकीचा इतिहास लिहला गेला कारण इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते.
इंग्रजांनी भारतावर आक्रमण केलं होतं. अनेक संस्थानांच्या राजांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, महाराज प्रत्येक संस्थानाच्या राजांना पत्र लिहून इंग्रजांविरूद्ध एकत्र लढण्याचे आवाहन करत होते. एवढेच नव्हे तर शिख राजांना शिख धर्म आणि मुस्लिम राजांना इस्लाम धर्म स्विकारणार असे महाराजांनी पत्राद्वारे कळवून जाहिर केले होते ते फक्त त्या त्या धर्माच्या राजा-महाराजांनी फीरंग्यांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्रित यावे म्हणून पण प्रत्येक संस्थानच्या राजा महाराजांना राष्ट्राबद्दल काहीच सोयरसुतक नव्हतं तर प्रत्येकजण स्वतापुरतं पहात होता. अख्खा हिंदुस्थान इंग्रजांपुढे झुकला गेला होता पण माझा राजा छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर कोणापुढे न झुकता ताठ मानेनं कोरीव मिश्यांना ताव देत स्वाभिमानानं जगत होता, झुंजत होता १८ लढायामध्ये इंग्रजांना पराभूत करत वायूवेगाने इंग्रजांच्या सैन्याना कापत सुटत होता, कधीकधी इंग्रज अधिकारी देखिल यशवंतराव होळकरांपुढे नतमस्तकी व्हायचे तर कधी काही इंग्रज अधिकारी रणांगणातून माघारी पळ काढायचे.
हीच ती धमक होती आणि हाच त्यांचा शूरबाणा आणि मनगटाच्या जोरावर शत्रुंना चारीमुंड्या चीत करणारी त्यांची ती तलवार माझ्या मातीवर अत्याचार करणार्यांना कापत सुटायची.
महाराज बोलत होते मी मात्र सुन्न होऊन त्यांच्या शौर्यगाथा ऐकत होतो, एकाएकी अंगावर रोमांच उठायचे, अंग शहारून निघायचे माझ्याही हाताच्या मुठी आवळल्या जायच्या पुन्हा एकदा हातात तलवार घेऊन रणांगणात उतरावं, जो माझ्या मातीवरती समाजावरती अन्याय करतोय त्याला तिथेच आणि उभाच चिरून टाकावं अशी माझी अवस्था झाली होती.
माझ्या ओठातून शब्द फुटले "महाराज मला आज्ञा द्या मी आता नेमकं काय करु??"
महाराज मला खडसावतच बोलले अरे शिकलेले सवरलेले तुम्ही आन् काय करायला पाहिजे म्हणून इचारता कशाला?  "आज समाजावरती अन्याय करणाऱ्या प्रस्थापितांना जर धाक दावायचा असेल तर धनगर समाजाला जागं कर, जे जागे आहेत त्यांना उठवून उभा कर, जे उठलेत त्यांना चालतं कर बोलतं कर आणि लेखणीरूपी धारदार शब्दांच्या तलवारी प्रत्येकाच्या हातात दे की जे शब्द एकेकाची काळीजं कराकरा चिरत जातील.
       एखाद्या पिकाची मशागत करायची असेल तर अगोदर शेत नांगरावं लागतं, पिकाला वेळेवर खत पाणी द्यावं लागतं तरच पिक जोमानं वाढतं त्याचप्रमाणे अगोदर माझ्या धनगर समाजाचं डोकं तुझ्या धारदार लेखणीरूपी तलवारीने या समाजाची डोकी नांगर आणि वेळेवर समाजप्रबोधनाचं खतपाणी घाल तर भविष्यात माझ्या धनगर समाजाला कोणाकडेही गहाण पडायची वेळ येणार नाही."
जो समाज आपला इतिहास विसरतो त्या समाजाची कधीच प्रगती होत नाही. कारण इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाहीत अन् इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत हा एक फार मोठा इतिहास आहे. त्यासाठी आपला इतिहास सर्वांसमोर यायला हवा. आजच्या समाजाला जर जागं करून एकत्रित करायचे असेल तर इतिहासाचीच सांगड घालून द्यावी लागेल अन्यथा या स्वार्थी आणि मतलबी प्रवृत्तीच्या जगात समाजासाठी धडपडणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. प्रत्येकजण स्वतापुरतं जगतोय, आपले पुर्वज देखिल जर राष्ट्रासाठी लढण्यापेक्षा स्वतासाठी लढले असते तर आज त्यांचा इतिहास समोर आलाच नसता. आणि इतिहासकारांनी याची दखल घेतली नसती. पण पुरोगामी विचारांच्या आणि पाखंडी पंडितांसारख्यांनी आपल्या पुर्वजांचा आणि राजा महाराजांचा इतिहास आम्हापासून दूर ठेवण्याचे कुटिल कारस्थान केले.
आज समाजावरती अन्याय व अत्याचार होत असताना माझ्याच समाजातील काही लोक हाताची घडी घालून तमाशा बघत बसताहेत तर काहीजण अवर्जून या तमाशाचे आयोजन करतात हे सांगायला देखिल मला खंत वाटते आणि खरोखरच मला त्या समाजद्रोह्यांची कीव येते. राजा महाराजांच्या जातीत जन्माला आलेल्या औलादी आज समाजावर अन्याय व अत्याचार करत असलेल्या प्रस्थापित नेत्यांच्या दावणीला कसे काय बांधले जातात तेव्हा महाराज म्हणाले... खरा इतिहास जर वेळीच समोर आला असता तर आज ही वेळ आली नसती. इतिहासाचे अज्ञान असल्याने समाजाची अधोगती झाली त्यासाठी आता समाजातील युवकांसमोर आवाहन आहे आपल्या पुर्वजांचा इतिहास समाजासमोर आणि अखंड महाराष्ट्र राज्यातील मराठी माणसांसमोर मांडायला हवा. थोर महापुरूषांच्या जयंत्या साजर्या करून समाजाला एकत्रित करून इतिहासाची माहीती द्यावी. नुसतंच डीजे लावून धांगडधिंगा घालून जयंत्या साजऱ्या करायच्या असतील तर एकवेळ जयंत्या नसलेल्याच बरे. कारण त्या माध्यमातून समाजप्रबोधन होणे फार गरजेचे आहे. महाराजांचे शब्द ना शब्द मी मनात साठवून घेत होतो. महाराज जेवढे राकट स्वभावाचे होते तेवढेच राष्ट्रापती बलिदान देणारे  प्रेमळ स्वभावाचे होते. राजे यशवंतराव होळकरांचे नाव ऐकले तर इंग्रज अधिकाऱ्यांना कापरं भरायचं एवढंच नव्हे तर काहीजण लघूशंकाच करायचे.... भांबुर्ड्याच्या लढाईत मल्हारतंत्राचा अवलंब करत लाखो माल्कमच्या सैन्यांना कापूण काढले होते तेव्हा एक इंग्रज अधिकारी त्याच्या सोबत्यांना म्हणाला की "ये यशवंतराव हुलकर आसमान से तो नहीं ना गिरा??" अशा पद्धतीने इंग्रजावरती मल्हारनीतीचा अवलंब करत हल्ले करणारे राजे यशवंतराव यांनी दुश्मनांवरती वचक बसविली होती. महाराज बोलतच होते आणि मी फक्त होतो. मात्र आता ऐकण्याची मनस्थीती नव्हती तर पुन्हा तीच तलवार घेऊन माझ्या समाजावर अन्य्य व अत्याचार करणाऱ्यांची डोकी उडवायची होती पण अगोदर समाजाची डोकी माझ्या लेखणीरूपी तलवारीने नांगरांयला हवी. म्हणून महाराजांना सांगितले महाराज मी आज शपथ घेतोय की, "आज धनगर समाजाला जागं करून प्रत्येकाची डोकी नांगरल्याशिवाय मी शांत बसणार नाय. मग तिथं मला कोणीही आडवा तर त्याला तिथंच उभा चिरणार अन जर कोणी हात जोडून येत असेल तर त्याला लोटांगण घालेल.
कारण जर आमच्या वाटेला कोणी आला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतनार नाय हा आमुचा इतिहास आहे."
युवकांनी समाजबांधवांनी इतिहास जाणून घेण्यासाठी
1) झुंज : ना.सि.इनामदार
2) स्वातंत्र्य प्रणेते: संजय सोनवनी सर
3) वीरांगणा भीमाई: होमेश भुजाडे सर
4)धनगरांचा गौरवशाली इतिहास: संजय सोनवनी सर
5) होळकरांची कैफीयत: प्रा.निलेश शेळके सर
6)क्रांतीची मशाल पेटवा: ए.एस.बरींगे सर
7) थोरले सुभेदार मल्हारराव होळकर: संजय सोनवनी सर
8) The Vintage of Indore.
तसेच होळकरशाहीचा इतिहास अन्य पुस्तकांतून, संदर्भातून अभ्यासावा ही विनंती.
दि.३ डिसेंबर रोजी महापराक्रमी शुरवीर लढवय्या राज राजेश्वर सिहासनाधिष्ट महाराजाधिराज राजे श्रीमंत छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची २४१ वी जयंती आहेत त्यानिमीत्त राष्ट्रापती बलिदान देणारे स्वातंत्र्याचे प्रणेते आद्य क्रांतीवीर राजे यशवंतराव होळकर यांना विनम्र जय मल्हार!!!
 कोटी कोटी प्रणाम!!!
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
          ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
http://nitinrajeanuse123.blogspot.com

Monday 27 November 2017

३ डिसेंबर रोजी वाड्यावस्तीवर जयंती साजरी करा...

अजिंक्य मानल्या जाणाऱ्या बलाढ्य इंग्रज फौजेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या आणि इंग्रज अधिकाऱ्यांना गुडघे टेकायला भाग पाडणाऱ्या तसेच इंग्रज सैन्यांना सळो की पळो करून त्यांना रणांगणात अक्षरशा कापून काढणाऱ्या आद्यस्वातंत्र्यसेनानी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची ३ डिसेंबर रोजी २४१ वी जयंती अाहे. ज्या महायोद्याने स्वतर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण केले, ज्या पेशव्यांनी हे भारत राष्ट्र देशोधडीस लावायचे षड्यंत्र रचले होते त्या पेशव्याला छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांनी कोकणात पळून जाण्यास भाग पाडले. इंग्रज फौजा हळूहळू भारतभर पाय पसरवताहेत याचा गांभीर्याने विचार करून स्वकर्तृत्वावर इंग्रजांशी दोन हात करणारा लढवय्या त्यांच्या हयातीत एकही युद्ध कधीही हरला नाही असे एकमेवाद्वितीय ठरलेले, छत्रपती शिवरायानंतर स्वताचा राज्याभिषेक करून घेणारे ज्यांना भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते ते म्हणजेच धुरंदर लढवय्ये छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर होत. इंग्रजांच्या विरोधात सर्वप्रथमता तलवार उपसून सलग एकूण १८ लढायांमध्ये इंग्रजांना हरवून जिंकणारा महायोद्धा, इंग्रजांना गुडघे टेकायला भाग पाडून सळो की पळो करून सोडत, इंग्रजांना रणांगणात कापून काढणाऱ्या आद्यस्वातंत्र्यसेनानी छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांतील गावगाड्यात, वाड्यावस्तीवर जिथे शक्य आहे तिथे रविवार दि.३ डिसेंबर साजरी करून छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास तळागळापर्यंत पोहचवण्यासाठी यशवंत सैनिकांनी कंबर कसावी. मोडक्या-तोडक्या भाषेत का होईना पण त्यांचा दैदिप्यमान आणि गौरवशाली इतिहास अखंड भारतभरातील प्रत्येक माणसाच्या मनामनात आणि मस्तका-मस्तकात गिरवा.
तरच माझ्या छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांना खरे अभिवादन ठरेल. नुसतंच सोशल मिडीयावरती फोटो इमेजेस बनवून व्हायरल केल्यानेच जयंती साजरी होते अथवा अभिवादन ठरते असे नाही तर लोकांच्या मस्तकात आणि मनामनात जर महाराजांचा इतिहास गिरवला तर तो इतिहास जिवंत राहतो आणि पुन्हा दुसरा इतिहास घडवण्यासाठी त्याच त्वेषाने त्याच उर्मीने त्याच उमेदीने सळसळत्या रक्ताचे वारसदार असणारे यशवंत युवा सैनिक पुन्हा अन्यायाच्या विरोधात लढायला तयार होतील.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!
आपलाच,
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.in

Saturday 4 November 2017

संबंधित मंत्र्यांनीच आत्मचिंतन केले तर बरे होईल


एकमेव अद्वितीय लढवय्या, महापराक्रमी शुर योद्धा ज्यांनी अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज फौजेची इभ्रत जगाच्या वेशिला टांगली अशा छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांच्या नावाने महामेष योजना सुरू करून नक्की काय साध्य करायचे आहे? स्वातंत्र्याचे प्रणेते असणाऱ्या छत्रपती महाराजा यशवंतराव होळकरांच्या दैदिप्यमान, जाज्वल्य आणि नेत्रदीपक इतिहासाचा, राष्ट्रभक्तिचा आणि त्यांच्या दूरदृष्टीचा विचार करून तरी भारतीय फौजेच्या एखाद्या बटालियन अथवा इन्फंट्री ला त्यांचे नाव द्यायला हवे होते पण तसे न करता राजे यशवंतराव होळकर महामेष योजना असे त्या योजनेस नाव देऊन शेवटी त्यांना धनगर समाजाच्याच पंगतीत आणून बसवण्याचे हे महापाप नव्हे का?
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Thursday 2 November 2017

आरक्षणाच्या विकासाचं महात्म्य...

आजकाल राजकारणात, सत्ताकारणात एक क्रेझ झाली आहे ती म्हणजे शक्तिप्रदर्शन करणे आणि त्याच शक्तिप्रदर्शनाच्या जोरावर राजकारणात सत्ताकारणात चांगले पद मिळवणे. पण विकासाचं महात्म्य काय? ज्यांच्या जोरावर शक्तिप्रदर्शन केले चांगली पदे मिळवली त्या जनतेचं त्या त्या नेत्यांनी किती दायित्व राखले? खरंतर विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे खासदार पद्मश्री विकास महात्मे साहेब. साहेबांनी अनेक नेत्र चिकित्सक शिबीरं घेतली. मोफत डोळ्यांची आॅपरेशन केली आणि त्यानुषंगानेच पद्मश्री हा पुरस्कार त्यांना बहाल केला गेला. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच...
            जेव्हा १५ जुलै २०१४ ला पंढरपूर-बारामती आरक्षण दिंडी निघाली २१ जुलै ला पाच ते सहा लाख धनगर समाजबांधव बारामतीमध्ये एकत्रित आला होता. त्याठिकाणी फडणवीसांनी सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये १५ दिवसांत अंमलबजावणी करण्याची मागणी असताना आरक्षण देणार असल्याचे वचन दिले. पुढे सरकार सत्तेत आले १५ दिवस झाले, महिना झाला दोन महिने झाले तरीही फडणवीसांचे तोंड उघडेना आणि निर्णय काय होईना. दिवसेंदिवस आरक्षणाची चळवळ वाढीस लागल्यानंतर ४ जानेवारी २०१५ रोजी विकास महात्मेंनी नागपूर मध्येच धनगर आरक्षणाचा मोर्चा आयोजित केला. महाराष्ट्र राज्यातील लाखोंच्या संख्येने समाजबांधव नागपूरात एकवटला होता. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वता पुढील एक महिन्याच्या आत निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्याच स्टेजवरून सध्याचे कॅबिनेट ना.महादेव जानकर साहेब यांनी देखिल आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर फडणवीसांचा अजित पवार करू असे खडसावले होते. परंतू पुढेही फसणवीसांचे तेच धोरण धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झाल्याचे सांगत समाजाला भावनिक केले आणि तिथेच धनगर समाज फसला. नागपूर मेळाव्यानंतर देखिल महिन्यात निर्णय घेऊ म्हणणाऱ्या फडणवीस यांनी दोन तीन नव्हे तर तब्बल सहा महिने उलटून गेले तरी निर्णय घेतला नाही अजून अभ्यासच चालू असल्याचे ढोंग केले. २१ जुलै २०१५ रोजी बारामती मोर्चाच्या धर्तीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रेरणा दिवस आयोजित केला. एक मोठे जनआंदोलन आयोजित करण्याचे त्या प्रेरणा दिवशी ठरविले त्यास सर्व मातब्बर नेते, विकास महात्मे सह महाराष्ट्र राज्यातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी जनआंदोलनासाठी हो मध्ये हो मिळवला परंतू विदर्भात गोव्यानंतर महात्मेंनी सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता समाजाचे भांडवलीकरण करण्यासाठी ८ डिसेंबर २०१५ रोजी मोर्चा आयोजित केला. विश्वासात न घेतल्याने त्यांच्या या निर्णयास विरोध महाराष्ट्र राज्यभरातून विरोध होऊ लागला. त्यातच १० डिसेंबर २०१५ च्या दुसऱ्या मोर्चाची डाळ शिजू लागली. दोन्ही मोर्चे वेगवेगळे न करता एकत्रित व्हावेत असे समाजाचे मत होते. परंतू वेगवेगळे मोर्चे काढले तर त्याचे श्रेय कोणाच्या पारड्यात पडणार? असा श्रेयवादाचा प्रश्न निर्माण निर्माण झाला. एकत्रित आणि एकच मोर्चा व्हावा यासाठी मी स्वता दोन्ही मोर्चाच्या आयोजकांशी बोललो होतो त्याचे पुरावे देखिल आहेत, त्यासंदर्भातील नोव्हेंबर व डिसेंबर २०१५ मधील ब्लाॅग देखिल खालील Nitinraje Anuse ब्लाॅग स्थळावर जाऊन तुम्ही वाचू शकता. ना नेता ना संघटना फक्त आणि धनगर समाजाच्या वतीने मोर्चाचे आयोजन व्हावे ही सर्वांची प्रामाणिकपणे अपेक्षा होती. परंतू हेच विकासांचे महात्मे ऐकायला तयार नव्हते पाठपुरावा कोण करणार म्हणून ते त्यांच्या संघटनेच्या बॅनर खालीच मोर्चा निघणार या मतावर ठाम होते. शेवटी त्यांनी तेच केले आणि धनगर समाजाचे विभाजन झाले पाच-पन्नास हजार समाजबांधव नागपूर मध्ये ८ डिसेंबर २०१५ रोजी एकत्रित आला. १० डिसेंबर रोजी देखिल हजारांच्या संख्येत लोक उपस्थित राहिले होते. परंतू ८ डिसेंबर रोजीच्या मोर्चात मुख्यमंत्री निवेदन स्विकारण्यासाठी आलेच नव्हते. त्या मोर्चातून खरंतर काहीच निष्पन्न झाले नाही उलट आरक्षणाची अंमलबजावणी दूरच राहिली पण पदरात पडले ते म्हणजे TISS संशोधनाचे गाजर. जर एखाद्या जाती/जमतीला अनुसुचित जाती/जमातीमध्ये सामाविष्ट करायचे असल्यास त्यासंदर्भातील अहवाल सादर करावा लागतो आणि तो अहवाल तयार करण्यासाठी त्या ८ डिसेंबरच्या मोर्चातून TISS या संस्थेची नेमणूक करण्यात आली. परंतू धनगर समाज मात्र अगोदरपासूनच अनुसुचित जमातीच्या यादीत असताना अहवाल सादर करायला लावून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवायचे फार मोठे षड्यंत्र फडणवीसांनी रचले आणि धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी त्यास सहखुशीने अनुमोदनही दिले. दोन टप्प्यांत अर्थातच सहा महिने ते नऊ महिन्यांच्या कालावधीमध्येच धनगर समाजाला आरक्षण (असताना) देऊ म्हणणाऱ्या फडणवीस सरकारचे नऊ दहा महिन्यांतर नव्हे तर एका वर्षांनंतरही अजून आरक्षणाचे बाळंतपणच झाले नाही हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. मध्यंतरीच्या काळात या दोन्ही मोर्चाच्या पार्शभूमीवर ३१ मे २०१६ याच दिवशी महात्मेंना खासदारकी देऊन राज्यसभेवर घेतले. मग ती खासदारकी धनगर समाजामुळेच मिळाली हे कोणीही नाकारू शकणार नाही. पुढे सध्याचे कॅबिनेट मंत्री ना.प्रा.राम शिंदे व ना.महादेवजी जानकर यांना मंत्रीपद देऊन धनगर समाजाला गप्प बसवायचा प्रकार केला. परंतू धनगर समाज असा कसा गप्प बसेल? आणि शांत बसेल तो धनगर कसला? खासदारकी मिळाल्यानंतर विकास महात्मे मात्र गप्प बसले २०१५ नंतर २०१६ मध्ये त्यांनी एकाही मोर्चाचे आयोजन केले नाही. परंतू आपण स्वता एक समाजाचे प्रतिनिधी आहोत याची जाण असताना देखिल खासदार विकास महात्मे यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या स्टेटमेंटची पाठराखण केली. धनगर आरक्षणास मोदींचा नकार अशा बातम्या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडीया वरतून झळकल्या, सोशल मिडीयावरती त्या वायूवेगापेक्षाही जास्त गतीने व्हायरल झाल्या. त्याचवेळी खासदार विकास महात्मे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की मोदींनी घेतलेल्या खासदारांच्या शाळेत धनगर आरक्षणाचा धडा नव्हताच. मग त्या विकास महात्मेंना माझे प्रश्न आहेत ते म्हणजे...
1. त्या खासदारांच्या शाळेत आरक्षणाचा धडा नव्हता तर मग हे त्या मोदींनी कबुल करायला पाहिजे होते तुम्हीच का पत्रकार परिषद घेऊन कबुल केले?
2. खासदार साहेब तुम्हाला त्या शाळेत समाजाचे प्रतिनिधी म्हणून बसवले आहे ते नेत्यांची पाठराखण करायला नव्हे तर जनतेचे समाजाचे प्रश्न सोडवायला. मग धनगर समाजामुळे तुम्हाला खासदारकी मिळाली आहे हे तुम्ही कार्यक्रमांमधून जाहिर केलेलेच आहे. मग धनगर आरक्षणाबद्दल तुम्ही त्या शाळेत शंका का उपस्थित केली नाही?
3. खासदार साहेब तुमचे समर्थक म्हणतात की राज्यसभेत/लोकसभेत आपले संख्याबळ कमी पडते मग महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आमदार बच्चू कडू हे अपक्ष असताना देखिल अपंगासाठी किती लढतात आणि झटतात हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलंय. मग त्याप्रमाणेच धनगर आरक्षणाचा मुद्दा तुम्ही का उपस्थित करू शकला नाही.?
बर असो एवढे सगळे करून देखिल तुम्ही पुढच्या २०१९ च्या लोकसभा डोळयासमोर ठेऊन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ५ नोव्हेंबर २०१७ ला निर्णायक मेळावा आयोजित केला. त्याबद्दल माझे काही दुमत नाही परंतू आजपर्यंत नागपुरातील तुम्ही घेतलेल्या मोर्चाचे काय पारिपत्य केले? काय निर्णय झाला? म्हणून निर्णायक मेळावा आयोजित केला याचे स्पष्टीकरण तरी द्या. उठ की सुठ नुसतंच तुम्ही आरक्षण मेळावा पुकारला की आमच्या शेळ्या-मेंढ्या वाडग्यात कोंडून आम्ही नागपूरला यायचं का? हजारो नोकरदारांनी नोकऱ्या सोडून तरूनांनी ट्रेन मधून आदळआपट करत, हजारो लिटर डिजेल जाळत आणि करोडो रूपयांचा चुराडा करत तुमच्या भावी खासदारकीसाठी आम्ही तिथं नागपूरला यायचं का? आरक्षणाचा निर्णयच न झाल्याने मानसिक आणि शारिरिक नुकसान, आर्थिक नुकसान हे कधीही भरून न येणारे आहे. निर्णय झालाच नसताना मग निर्णायक मेळावा कसे काय म्हणायचे बरं? तसे प्रा.विष्णू कावळे सर यांनी देखिल तुम्हाला आवाहन केले आहे की आरक्षणाचा निर्णय करूनच तुम्ही मोर्चाला या आम्ही तुमचे स्वागत करू.
           नाहीतर सातारच्या मारूती जानकर यांनी ५ नोव्हेंबरचा नागपूरचा मोर्चा उधळण्याचे ठाण मांडलेच आहे. परंतू काहीतरी ठोस निर्णय घ्यायचा सोडून लोकशाही आहे म्हणून तुम्ही फोनवरून धमक्या देता मग त्यास काय म्हणावे? मारूती जानकर यांच्या निर्णयास आम्ही चालना देतोय असा विषय नाही परंतू त्यांचे उद्दीष्ट स्पष्ट आणि निस्वार्थीपणाचे आहे एक सामाजिक बांधिलकी या नात्याने मुख्यमंत्री यांना ते जाब विचारणारच कारण आंबेडकरांनी जनतेला लोकशाही बहाल केली आहे ना... तो त्यांचा मुलभूत अधिकार असून खोटी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनीधींना फसवणूक केल्याबद्दल जाब विचारणारच कारण गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाज हा अनुसुचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे आणि माझ्या मते तब्बल ६७ वर्षे एखाद्या समाजावर राज्यघटनेत अधिकार दिले असताना देखिल विनाकारण अन्याय करणाऱ्यांवरती देशद्रोहाचा खटला का भरू नये? धनगर आरक्षण हा माझ्या एकट्याचा अथवा मारूती जानकर यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असा विषय नसून अखंड महाराष्ट्र राज्यातील एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या धनगर समाजबांधवांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, जन्मापासूनच घोड्याचा लगाम हातात धरून अणवानी पायानं भटकंती करणाऱ्या भोळ्या-भाबड्या मेंढपाळांच्या मुला-बाळांचा हा प्रश्न आहे त्यामुळे न्याय हा मिळालाच पाहिजे. मग तोंड वाजवून जर न्याय मिळत नसेल त्यांच्या तोंडात वाजवून तरी न्याय मिळवा पण न्याय मात्र मिळालाच पाहिजे.
           खासदार विकास महात्मे यांनी ५ नोव्हेंबर ला मोर्चा घ्यावा अथवा घेऊ नये किंवा समाजबांधवांनी त्या मोर्चाला जावं कि जाऊ नये याबद्दल आमचे दुमत नाही. ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न परंतू माझ्या अज्ञानी असलेल्या आणि भोळ्या-भाबड्या मेंढपाळ बांधवांच्या नावावर भांडवलीकरण करून समाजाला कोणाच्यातरी ऐऱ्यागैऱ्यांच्या दावणीला बांधायचा प्रयत्न करू नये ही विनंती...
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com
nitinrajeanuse123.blogspot.com