Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday 19 July 2018

आतातरी धनगर नेते एकत्रित येऊन सत्ता स्थापन करतील का? ✍️नितीनराजे अनुसे

            २०१४ च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकी दरम्यान भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल भाषणबाजी करून धनगरांची मते खेचून घेतली. मोदींच्या त्या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप सुद्धा आमच्याकडे आहेत. भाषण करताना नरेंद्र मोदी म्हणाले होते की "या महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाने माझा यथोचित सन्मान केला त्या धनगर समाजाच्या पाठीत (अप्रत्यक्षरीत्या पवारांनी) सुरा  खुपसला" असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. शिवाय "कमीत कमी धनगर समाजाची मागणी काय आहे हे तरी ऐकून घ्यायला हवे होते." असेही ते म्हणाले होते. त्यावेळी सभामंचावर बाळासाहेब (तात्या) गावडे, ना.महादेवजी जानकर साहेब तसेच अन्य धनगर नेते देखील उपस्थित होते आणि सर्वजण मोदींच्या या डायलॉग वरती उभे राहून समाजाला हातवारे करत होते.
         जेव्हा १५ जुलै २०१४ ला पंढरपूर मधून बारामतीकडे आरक्षण दिंडी निघाली तेव्हा बघता बघता २१ जुलै पर्यंत पाच ते सहा लाख धनगर समाज त्या आरक्षण दिंडीत सामील झाला. बारामतीमध्ये पिवळे वादळ घोंघावत उठले, पवारांच्या घराला सुरक्षा यंत्रणेने छावणीचे स्वरूप दिले होते. धनगर समाजात क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या खंबाटकी घाटातील आरक्षण लढ्यानंतर पहिल्यांदाच कुठेतरी आरक्षणासंदर्भात असंतोषाची लाट उसळली होती. युवा वर्ग पेटून उठला होता परंतु धनगर समाजाची मागणी नक्की काय आहे हे ऐकून घ्यायला कोणताच प्रस्तापित नेता पुढे येत नव्हता. शेवटी धनगर समाजातील युवा वर्ग उपोषणाला बसला, काहीजणांची तब्येत ढासळू लागली शेवटी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे आले आणि म्हणाले की आम्हाला तुम्ही सत्तेत बसवा. सत्ता आल्यावर १० दिवसांत आम्ही आरक्षण देणार, पहिल्याच कैबिनेट मध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू असे सांगून उपोषण सोडायला लावले. मग सुरू झाला आश्वासनांचा खेळ धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालोय असे सांगून १५ दिवसांत निर्णय घेतो, TISS नेमल्यानंतर ९ महिन्यांत निर्णय घेऊ, अजून अभ्यास चालू आहे. असे सांगून सत्तेचा उपभोग घेत सत्तापिपासू भाजप सरकारने समाजावरती अन्याय करण्याचा अगदी नंगानाच चालवला. सोलापूर विद्यापीठ नामांतरण प्रकरणात देखील तीच अवस्था.  धनगर समाजातील नेत्यांचा वापर करून चार वर्ष सत्ता भोगली आणि शेवटी धनगर समाजाच्या हाती काय दिले तर धनगर आरक्षण विरोधी असणारा "से".
           मग अखंड धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजातील नेत्यांना मला विचारायचे आहे की तुम्ही मोठमोठ्या स्टेजवरून जाहीर भाषणं केली त्यांच्या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप आम्ही सांभाळून ठेवल्या आहेत गरज पडल्यावर त्या सोशल मीडियावरून प्रकाशित करू. समाजबांधवांना आणि त्या त्या नेत्यांच्या समर्थकांनी कृपया गैरसमज करून घेऊ नयेत कारण इथे माझ्या घरचा नव्हे तर अखंड धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि अखंड महाराष्ट्र राज्यातून ज्या प्रतिक्रिया मला येतात त्या सर्वसामान्य धनगर समाजाला जे प्रश्न पडलेले आहेत तेच प्रश्न मी इथे मांडलेत.
● नागपूर येथील सभेत बोलताना ना.महादेवजी जानकर साहेबांनी स्टेजवर बसलेल्या  मुख्यमंत्र्यांना ठासून सांगितले होते की जर धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर फडणवीस साहेब तुमचा आम्ही अजित पवार करू.... मग आता त्यांचा कधी अजित पवार करणार? हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य जनतेला पडलाय.
●आरेवाडीच्या दसरा मेळाव्यात ना.राम शिंदे साहेबांनी सांगितले होते की आम्ही आरक्षणासाठी प्रयत्न करतोय आणि भाजप सरकार आरक्षण देण्यासाठी अनुकूल आहे... मग आता सरकारची अनुकूलता कुठे गेली?  आता सरकारच्या विरोधात कधी बोलणार की RSS च्या पायाखलचं मांजर बनून राहणार?
●त्याच मेळाव्यात महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणारे मा.गोपीचंद पडळकर साहेब बोलले की जर भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण दिले नाही तर धनगर समाजाच्या सोबत राहून भाजप सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊ... आज "अखेरचा आरक्षण लढ्यासाठी" त्यांच्या ठिकठिकाणी बैठका सुरू आहेत पण अजून किती दिवस गप्प राहायचे? कधी आक्रमक पवित्रा घ्यायचा? सरकारला कधी जाब विचारायचा?
● खासदार विकास महात्मे साहेबांनी डिसेंबर २०१५ ला जो मोर्चा आयोजित केला होता त्याचे फलित काय झाले तर TISS चे भूत धनगरांच्या मानगुटीवर बसवले आणि अगोदरच राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या यादीत असलेला धनगर समाज अनुसूचित जमातीचे (आदिवासींचे) निकष पूर्ण करतो की नाही यासाठी त्या संस्थेमार्फत अहवाल मागवले त्याचा परिणाम म्हणजेच धनगर आरक्षण विरोधी "से". मग TISS चांगले आहे आणि भाजप सरकार आरक्षण द्यायला सकारात्मक आहे असे जाहीर सभांमधून सांगणाऱ्या महात्मे साहेबांनी सांगावे की आता काय करायचे?
● गणेश(दादा) हाके हे देखील शनिवारवाड्यावर बोलायचे फक्त भाजप सरकार आरक्षण देईल म्हणून छाती ठोकायचे आता कुठे गेले? आता सांगा कधी देईल भाजप सरकार धनगर समाजाचे हक्काचे आरक्षण?
●असे कितीतरी धनगर नेते आहेत ज्यांची यादी वाढेल तेवढी वाढवता येईल, कितीतरी सामाजिक कार्यकर्ते आहेत जे म्हणत होते की आरक्षण दिले तर फडणवीस सरकारच देईल मग आता काय? कुठे गेले राज्यघटनेत दिलेले अनुसूचित जमातीचे धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण? कुठे गेली पोकळ आश्वासने?
            समाज नोकऱ्या सोडून, आपापला छोटा-मोठा धंदा सोडून, मेंढपाळ हे शेळ्या-मेंढ्या वाड्यात कोंढून, शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले-मुली, समाजातील माझ्या माताभगिणी आरक्षणासाठी एकत्रित येतात आणि रस्त्यावर उतरतात. पण ते सर्वजण धनगर नेते कधी एकत्रित आलेत का? सर्वांनी मिळून हा प्रश्न सोडवण्यासाठी कधी चर्चा केली का? एकमेकांची जिरवाजिरवी करण्यासाठी जेवढी ताकद पणाला लावली तेवढीच ताकद सर्वांनी मिळून लावली असती तर भाजप सरकारचं काय घेऊन बसलाय? पौराणिक कथेतील ३३ कोटी देव जरी आडवे आले असते तरी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात 'से' दाखल करायची हिम्मत कोणाची झाली नसती. समाजामुळेच धनगर समाजातील नेते आहेत, नेत्यांमुळे समाज नाही हे धनगर नेते आतातरी लक्षात घेतील का?  आणि विशेष म्हणजे 'इगो' सारखा महाभयानक राक्षस बाजूला ठेवून धनगर नेते ज्या भाजप सरकार बद्दल गोडगोड बोलत होते त्या भाजप सरकारला याचा जाब विचारतील का? नाहीतर पुन्हा कोणाचेतरी दलाल होऊन समाजाला कोण्या लांडग्यांच्या दावणीला बांधतील? आतातरी धनगर नेते एक होतील नेक होतील, सत्ताकारणापासून डावलेल्या विषम समाज घटकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करतील आणि समाजाला न्याय मिळवून देतील. जोपर्यंत हाताची पाच बोटं सोबत असतात तोपर्यंत त्या हाताची मूठ बळकट/मजबूत राहते. आणि मूठ बळकट/मजबूत असेल तरच अन्याय करणाऱ्यांचे थोबाड वाकडे करता येते. नाहीतर विस्कटून राहिलात तर तुमची दखल कोणी घेणार नाही आणि तुमचं आस्तित्व देखील कोणी शिल्लक राहू देणार नाही यावरती जरा आत्मचिंतन करुन इतर जाती-जमातींना धनगर नेते एकत्रित येऊन खरोखर सत्या स्थापन करतील.... असा आशावाद माझ्यासारख्या सर्वसामान्य समाजमनात घुमतोय...
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
 nitinrajeanuse123@gmail.com

Wednesday 11 July 2018

झु़ंज देण्या साथ द्या -📝किर्ती नितीनराजे अनुसे

झु़ंज देण्या साथ द्या
       -📝किर्ती नितीनराजे अनुसे

झुंज देत मृत्यूलाही राजे तुम्ही लढला
तुमच्या पराक्रमाचा पाढाही जगाने वाचला
झुंजारांची फौज घेउन राजे तुम्ही झुंज देत राहीला
मातीच रक्षन करण्यासाठी देह तुम्ही वाहीला
उजळुद्या परत एकदा ती होळकरशाही अन् उमलु द्या पुन्हा एकदा तुमच विर पुष्प
राजे यशवंत तुमच्या घामाचे थोडे दान द्या
पुन्हा एकदा झुंज देण्या हात द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या साथ द्या....

सिंहाची ती तुमची चाल अन्
गरुडाची ती नजर द्या
स्त्रीयांचा आदर अन् शत्रूचे मर्दन
करन्याची शक्ती द्या
ढाल चिरून शत्रुवर मात करनारी ती तुमची बळकट तलवार द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या

होळकरशाही संपली तशी माणसंही बदलली
स्वत:चं घर भरण्यासाठी सर्वांनी माणूसकी सोडली
राजे तुम्ही केला गणिमी कावा शत्रुंवरती
आता आपलेच करती आपल्यांवरती
किड्यामुंगीपरी जीवन जगत आहेत तुमचे मावळे
त्यांना स्वाभिमानाची शिदोरी द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या.

लाख हत्तींचे बळ असूनही तुमची धनगरशाही आज निष्क्रीय आहे
कारण इथे स्वतःला धनगर म्हणवून घ्यायची लाज आहे
त्यांच्या मुठीमध्ये तुमचे पोलादी बळ द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या

आपल्या हक्कासाठी राजे तुम्ही रात्रंदिवस झुरलात
जनतेच्या अंधारी दुनियेत तुम्हीच तर सुर्य ठरलात
आजच्या या मावळ्यांना सुर्याचे ते तेज द्या
आपल्या हक्कासाठी लढण्या त्यांना हिम्मत द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या

राजे तुम्ही एकटेच सगळ्या इंग्रजांना पुरून उरलात
परंतू आजचे तुमचे मावळे हे पक्षा -पक्षात विभागलेत
या युवा वर्गाला क्रांतीची मशाल द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या

घाबरून पळणारे शत्रु होते अन् घाबरवणारे राजे तुम्ही होतात
पण आज पळणारे ही आपलेच अन् पळवणारे ही आपलेच
तुम्ही आपल्या कुटुंबाची पर्वा न करता जनतेच्या न्यायासाठी लढलात
पण आज आपल्यांच्याच विरोधात आपलेच मोर्चा काढतात
त्यांना इतिहासाची आठवण अन् धनगरी ताकतीची जाण करुन द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या

भाऊबंधावर झालेल्या अन्यायामुळे राजे तुम्ही पेटून उठलात
पण आज भाऊबंधांच्या विरोधातच कट रचले जातात
या सर्वांना धनगरी तांड्याच्या एकजुटीची शिकवण द्या
राजे पुन्हा एकदा झुंज देण्या तुमची साथ द्या...
        📝किर्ती नितीनराजे अनुसे
                    प्रकाशक
           राजे प्रकाशन सांगली
📩rajepublications@gmail.com

Friday 6 July 2018

बोकड निर्यातबंदी म्हणजे धनगरांच्या अधोगतीसाठीची घंटा... ✍️नितीनराजे अनुसे

                प्राचीन काळापासून धनगर जमातीचा व्यवसाय हा मुख्यत्वेकरून शेळी-मेंढी पालन हाच आहे हे आजच्या शेंबड्या पोराला सुद्धा माहीत आहे. मग बोकड निर्यातबंदीचा निर्णय घेणारे अधिकारी आणि सरकार कुठे शेण खात बसलंय कोणास ठाऊक? जैन धर्म अथवा धनगर ही आदिम जमात आजकाल नव्यानेच जन्माला आली नसून त्यांना हजारो वर्षाचा इतिहास आहे. आदिम काळापासून पशुपालक हे पशूंचा वापर दुध, मांस, शेती, व्यापार तथा दळणवळण इ.चे साधन म्हणून करत होते. हे इतिहासातच नव्हे तर भूगोलात देखील सर्वांनी अभ्यासले आहे. आजही गवळी-धनगर समाज हा गाई-बैल, म्हैस, घोडा यांचा दुधासाठी, व्यापारासाठी, शेतीच्या कामासाठी तसेच दळणवळण करण्यासाठी वापर करतो तर शेळ्या-मेंढ्यांचा विशेषतः दुध, मांस तथा व्यापारासाठी वापर करतो. हजारो वर्षाची ही परंपरा प्राणपणाने जपत आजही बहुतांश धनगर समाज शेळी-मेंढीपालन या व्यवसायावरती अवलंबून आहे.
             काही वर्षांपूर्वी जातीयवादी सरकारने कुरघोड्या करून गवळी-धनगर यांच्या वहिवाटीच्या जमिनी, गाईराने, चराऊ कुरणे घशात घातली तर काही माजलेल्या प्रस्तापित नेत्यांनी दादागिरी, गुंडगिरी करून शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुंड्या मुरगळून त्या जमिनी घशात घातल्या तर सत्तेचा गैरवापर करून गाईराने, चराऊ कुरणे ही देखील स्वताच्या तसेच पाहुण्या-राऊळ्यांच्या घशात घातली आणि पशुपालन करणाऱ्या समाजावर भटकंती करण्याची वेळ आली. त्यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांचा शिव्याशाप खात तर कधीकधी वेळप्रसंगी प्रसाद (मार) खात गपगुमानं शेळ्या-मेंढ्यांची राखण करून पायाच्या नडग्या वाळेपर्यंत गावंच्या गावं पालथी घालून शेळ्या-मेंढ्यांसोबत स्वताच्या देखील पोटाची खळगी भरण्यासाठी माझा धनगर समाज बांधव वणवण फिरून व्यवसाय करू लागला, वाडवडिलांची बापजाद्यांची परंपरा तशीच पुढं चालवू लागला, दुष्काळाशी दोन हात करून आस्मानी संकटांना आवाहन करत टीचभर पोटाची कशीबशी खळगी भरून लेकरा-बाळांना शिकवू लागला. मागच्या एक-दोन महिन्यापूर्वी यूपीएससी चे निकाल लागले त्यामध्ये मेंढपाळांची चार पोरं परिस्थितीशी झगडून झगडून आय ए एस झाली, मागच्याच आठवड्यात एमपीएससी चे निकाल लागले त्यात आरक्षण नसताना देखील मेंढपाळांची २७ पोरं आणि एक मेंढपाळाचीच मुलगी असे एकूण २८ जण राज्यसेवेच्या परिक्षेत यशस्वी झाले. म्हणजे धनगर समाजाच्या विकासाचा आराखडा दिवसेंदिवस जसजसा वाढत जाईल तसतसा प्रस्तापितांच्या, मनुवाद्यांच्या पोटात भितीचा गोळा येऊ  लागला, त्यांच्या पोटात मळमळू लागले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर जेव्हा मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्या विमानातून आखाती देशांमध्ये जाऊ लागल्या तेव्हा धर्माचे पुजारी जागे झाले आणि धनगर समाजाची जी उत्तरोत्तर प्रगती होत चालली आहे ती कुठेतरी थांबायला हवी या कपटी भावनेने जैन धर्मातील काही मंडळींनी बोकड निर्यातीवर बंदी आणावी म्हणून आंदोलने केली निवेदने दिली त्यावरती आकलेचे तारे तोडणाऱ्या बेअक्कल अधिकाऱ्यांनी इतिहास/भूगोलात अभ्यासले असताना देखील धनगर समाजाचा मेंढपाळ व्यवसाय बंद पाडण्यासाठी जी काही पाऊले उचलली त्याबद्दल त्या त्या अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या पात्रतेची मला कीवच येते. शिवाय उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भाजप सरकारने देखील त्या बोकड निर्यातीवर तात्काळ बंदी आणली आणि धनगर समाजाला अधोगतिच्या दिशेने घेऊन निघाले. धनगर समाजाबद्दलची सरकारची अशी आत्मियता पाहून अक्षरशः हसू की रडू असेच झाले आहे.
    ★      मग त्या जैन धर्मातील मानवतेच्या पुजाऱ्यांना माझे काही प्रश्न आहेत...
१) तुम्ही शाकाहारी आहात तर शाकाहारीच रहा तुमच्यामुळे आम्ही का शाकाहारी व्हावे? राज्यघटनेत खाण्या-पिण्याच्या बाबतीत देखील स्वातंत्र्य दिले आहे. मग ही उठाठेव कशासाठी?
२) तुमच्यामुळे आम्ही शाकाहारी व्हायला हवे असे निर्बंध तुम्ही आणत असाल तर मग आमच्यामुळे तुम्ही देखील मांसाहारी व्हावे यासाठी आम्ही तुमच्यावर निर्बंध आणावा का?
३) जिवीत हानी होण्याचे भाकीत तुम्ही आज करता आहात मग जेव्हा मानवाची उत्पत्ती झाली तेव्हापासून म्हणजे हजारो वर्षांपासून माणूस मांसाहार करतोय. मग नेमकी आजच (बोकड निर्यातीवेळी) तुम्हाला कशी काय जाग आली?
४) जीव हानी (प्राणी हत्या) होतेय असे तुम्हाला वाटत असेल तर मग वनस्पती हे सुद्धा जीव आहेत. कारण जीव शास्त्रात (Biology) प्राणी शास्त्र (Zoology) आणि वनस्पती शास्त्र (Botany) हे विभाग येतात.)  मग शेतातील पिकवलेला भाजीपाला, धान्य, कडधान्य यांची हत्या करून तुम्ही सुद्धा धर्म भ्रष्ट करत आहातच ना?
५) एवढेच नव्हे तर तुम्ही जे दही एवढ्या आवडीने चवीने खाता त्या दह्यामध्ये सुक्ष्मदर्शीतून पाहिल्यावर लाखो Bacteria दिसतात त्या सुद्धा एक प्रकारच्या जीव आहेत. (हे Biology जीवशास्त्र सांगते एकदा अभ्यास करा) मग तुम्ही पण प्राण्यांची (जीवाची) हत्या केलीच ना?
६) आज तुम्ही बोकडांची निर्यातबंदी करून आनंदी झाला असाल? तुमच्या आनंदाला पारावर उरलाच नसेल... पण ज्या धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय शेळी-मेंढीपालन असताना त्यांच्या व्यवसायांवर गदा आणून तुमचा जैन धर्म खरोखरच पवित्र झाला का? म्हणजेच धनगर समाजाची अधोगती करण्यासाठी तुमचा जैन धर्म तुम्हाला शिकवतो का?
७) तुमच्या निवेदनाद्वारे बोकड निर्यातीवर बंदी आणली खरी पण जीव हत्या होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर मेंढपाळांनी या बोकडांचे करायचे काय? का सोडायची .......?
    ★    सत्ताधारी नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की, निर्यातबंदीवर तात्काळ निर्णय घेऊन तुम्ही कृतिशील असल्याचे दाखवून दिले खरे पण मेंढपाळांनी शेळी-मेंढीपालन करायचे सोडून मग आता करायचे तरी काय? का तुमच्या घरी आणून सोडू द्या? इतर छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांसाठी प्रत्येक मेंढपाळ बांधवांना करोडो रूपये देण्याची तरतूद तुम्ही करून ठेवली आहे का? नसेल तर मग नको तिथे मुर्खपणा करायला तुम्हाला कोण सांगते? एवढीच चपळता एवढीच निर्णय क्षमता तुमच्यात आहे तर मग धनगर आरक्षणाचे घोडे कुठे पेंड खात बसलंय? तिथे का चपळता कशी काय दिसून येत नाही.
            जिकडे तिकडे धनगर समाजालाच विरोध होताना दिसतोय. राजकीय क्षेत्रांत देखील धनगर समाजाला दोन मंत्री पदे मिळाली की काही प्रस्तापित नेत्यांना ते बघवले नाही, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हायला लागली की लगेच शिष्यवृत्त्या बंद करणे, वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षण रद्द करणे, राज्य सेवा परिक्षांमध्ये आरक्षण न देणे असे प्रकार घडत गेले आणि धनगर समाज एवढ्या मोठ्या संख्येने असूनही अन्याय सहन करत राहिला. काहीजरी केले तरी धनगर समाज सर्व सहन करू शकतोय असे धर्माचा डंका पिटणाऱ्या (अचानक जागे झालेल्या) मानवतेच्या पुजाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना, प्रस्तापित मस्तवाल नेत्यांना वाटू लागल्याने धनगर समाजाची होत उत्तरोत्तर प्रगती त्यांच्या डोळ्यात सलू लागली मग करायचे काय तर धर्माच्या नावाखाली, मानवतेच्या नावाखाली, प्राणी हत्या(जीव हत्या)च्या नावाखाली आखाती देशांमध्ये भारतातून होणारी बोकड निर्यात बंद करून धनगर समाजाला पोट भरण्यासाठीचे सर्व दरवाजे बंद करायचे ही कटूनिती येथील ब्राह्मणी व्यवस्थेबरोबरच जैन धर्माचे पाईक म्हणवून घेणारे करत आलेत आणि धनगर समाज, धनगर नेते, आमदार, खासदार, मंत्री मात्र आळी मिळी गूप चिळी अन् पार्टी करू संध्याकाळी असे म्हणत धनगर समाजाला अधोगतीसाठीच्या दिशेने घेऊन चाललेत यासाठी समाजाच्या नावाखाली ज्या संघटना काम करत आहेत त्या सामाजिक संघटनांनी जबाबदारी घ्यायला हवी, निर्यातबंदी उठवण्यासाठी आक्रमक पाऊले उचलायला हवीत नाहीतर उद्या कोणीही ऐरेगैरे उठून समाजाच्या डोक्यावर बसून लघूशंका करतील ते देखील सहन करणार आहात का? असेच जर चालत राहिले तर समाजाची होत चाललेली उत्तरोत्तर प्रगती थांबून अधोगति व्हायला वेळ लागणार नाही मग ये रे माझ्या मागल्या म्हणायची आवश्यकता सुद्धा पडणार नाही.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
           ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
       +91 853 000 4123
  nitinrajeanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.com