Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Wednesday 26 August 2015

खरंच धनगर असाल तर आताच पेटून उठा...


समाजातील माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजबांधवांच्या भावना व सद्य परिस्थिति लक्ष्यात  घेवून तसेच अनुभवातूनही माळरानावर आणि डोंगरदरीमध्ये वर्षानुवर्षे भटकंती करणार्या समाजबांधवांच्या भाषेत समाजातील सुशिक्षित शिकल्या सवरलेल्या सुज्ञ वर्गाला उद्देशुन रचलेलं हे काव्य आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक युवकांपर्यंत हे काव्य पोहचावं आणि त्यातून समाजप्रबोधन व्हावं हीच अपेक्षा. कदाचित माझे काही चुकत असेल तर समाजातील एक छोटासा समाजसेवक म्हणून मला माफ करावे ही विनंती.
  - नितीनराजे अनुसे
 
जिथं तिथं समाजाच्या नावावर घेऊनशान कोठा
खूप खूप शिकूनशान लय झाला रं तुम्ही मोठा
गडगंज पगार घेऊनशान जगताय तुम्ही आरामात
पण माझा भोळा समाज अजून माखतोय रं घामात

काय पाप केलं होतं रं या भोळ्या लोकांनी??
तुमचं कौतुक केलं रं समाजातल्या सगळ्यांनी
तुम्ही सगळीजण शिकूनशान गेला निघून तिकडं
आरं माघारी तर वळून बघा या माझ्या समाजाकडं

समाजातल्या नेत्यांनी फक्त वापरच करून घेतलाय
नुसतं "मत" नव्हं तर आमचा त्यांनी जीवच घेतलाय
निवडणूक जवळ येताच झोपडीत येवून हात जोडत्यातं
अन् निवडणूक झाली का पुन्हा पाच वर्सानंच दिसत्यातं

तुम्ही शिकलाय सवरलाय आता तुम्ही तर नीट वागा
कुणावर विस्वास ठेवायचा ते आता तुम्हीच सांगा
माझ्या समाजासाठी न्याय हक्क आतातरी मागा
नायतर आपल्या समाजाची अब्रू येशीवरच टांगा

बरं वाटतंय ना तुम्हाला असलं सगळं वाचायला??
समाजाचा पार तमाशा करून थायथाय नाचायला
अन्यायाविरोधात आवळा आता तलवारीच्या मुठा
लेकांनो खरंच धनगर असाल तर आताच पेटून उठा
           खरंच धनगर असाल तर आताच पेटून उठा

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Friday 7 August 2015

"बेफामपणा" नसेल...तर जगण्यात कार अर्थ?

"बेफामपणा नसेल...तर जगण्यात काय अर्थ?
ज्या धनगर जमातीत आम्ही जन्माला आलो. शेळ्या-मेंढ्या राखत, खेळत-बागडत लहानाचे मोठे झालो शिकलो सवरलो म्हणून लिहायला लागलो अन् बोलायलाही. थोर महापुरूषांच्या आणि राजा महाराज्यांच्या जातीत जन्माला यायला नशिब नव्हे तर सळसळत्या रक्तासोबत वाघाचं काळीज असावं लागतं. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. ज्या धनगर समाजात मी जन्माला आलो त्या धनगर समाजाचं मी काहीतरी देणं लागतो. समाजासाठी मला काहीतरी करायला पाहिजे असा विचार प्रत्येक धनगर बांधवांनी करायला हवा. काहीजण सहज म्हणून जातात की समाजानं मला काय दिले??  माझे एक सांगणे आहे त्या समाजबांधवांना की समाजानं तुम्हाला काय दिलं त्यापेक्षा तुम्ही समाजाला काय दिले?? याचा विचार करा. मगच समाजाकडून अपेक्षा ठेवा. आपण सर्वजण प्रत्येकजन समाजातील एक घटक आहोत मग आपल्या जातीसाठी आपण माती खाऊ शकत नसेल तर मग दुसरा कोणी थोडीच आपल्या समाजासाठी धाऊन येणार आहे.
धनगर जमातीतील राजा महाराजांच्या इतिहासाचा वारसा असणारे आम्ही आज कोणतं जगणं जगतोय तेच आम्हाला कळत नाही. इंग्रजांनी फक्त १५० वर्ष भारतावर राज्य केले तर इंग्रजांनी भारतीयांना गुलाम बनवलं असे म्हणतात. आरे मग धनगर समाजातील राजा महाराजांनी ३५०  वर्षहून अधिकतम राज्यकारभार या देशावर केला होता मग आमची जागा काय असायला पाहिजे? आणि आमची सध्याची अवस्था काय आहे?? याचा अंदाज प्रत्येकाला घेता आला पाहिजे. ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्या इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारणारे महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर हे आद्य स्वातंत्र्यसेनानी म्हणून ओळखले जातात. स्वतः इंग्रजांशी लढा देत असताना देशातील इतर संस्थानांच्या राजा-महाराजांना इंग्रजांच्या विरोधात लढण्यास प्रवृत्त करत होते पण इतर संस्थानातील राजांनी मातृभूमिशी गद्दारी केली आणि इंग्रजांशी मुकाबला न करता त्या त्या राजांनी आपापले संस्थान ब्रिटिश पार्लमेंटकडे स्वाधीन केले. तरीही राजे यशवंतराव होळकर न खचता इंग्रजांच्या विरोधात लढत होते. शस्त्र सज्ज आणि शिस्तबद्ध फौजफाटा असणार्या इंग्रजांच्या विरोधात कधीही न हारता एकूण १८ लढाया जिंकणारे आणि इंग्रजांना रणांगणात कापून काढत ताणून ताणून मारणारे खरे भूमिपुत्र आणि आद्यस्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांची ओळख असताना त्यांचा हा खरा इतिहास राष्ट्रापासून आणि पर्यायानं धनगर समाजापासून दूर ठेवला. खरंतर धनगर समाजाचा इतिहास चुकीचाच लिहला गेला होता. कारण इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते. या पाठीमागे काहीतरी कपट होते आणि त्यामुळेच धनगर समाजात जागृति होऊ शकली नाही. आज थोर विचारवंत/इतिहासकार मा. संजय सोनवणी सर यांच्यामुळे धनगर समाजाचा खरा इतिहास समाजासमोर आला.
राजे यशवंतराव होळकर इंदौरहून पुण्याकडे येत असताना थाळनेर येथे तापी नदीच्या तीरावर मुक्काम पडला होता. पाराजीपंतांनी पुण्याहून एका चित्रकाराला पाठवून यशवंतरावांचे चित्र काढायला सांगितले होते. तेव्हा त्या चित्रकाराने शिकारीसाठी एक डोळा मिटून यशवंतराव बंदुकीचा नेम धरत असल्याचे चित्र रंगवले होते. तेव्हा महाराज तुळसाला म्हणतात की चित्रकार खूप चतुर आहे. कारण माळव्यातील खरोखरच्या  शिकारीत यशवंतराव होळकरांच्या एका डोळ्याला इजा झाली होती आणि तो दोष त्या चित्रामध्ये चित्रकाराने कुशलतेने टाळला होता.  त्यावेळी तुळसा राजेंना म्हणाली लहानपणी इकडची स्वारी खूप बेफामपणे वागत असे आणि या चित्रावरुन तोच गुण कायमचा दिसतो आहे. तेव्हा महाराज जे वाक्य बोलले ते आजच्या धनगर समाजबांधवांना प्रेरित आणि प्रोत्साहित करणारं वाक्य होतं. चौरंगावरून उठत महाराज म्हणाले "हा बेफामपणा कधीच जाणार नाही, कारण बेफामपणा आहे तोपर्यंतच आमच्या जगण्याला काही अर्थ आहे. तो बेफामपणा जेव्हा संपेल त्या क्षणी जगणंच नकोसं वाटेल".
आज धनगर समाजातील पोरं शिकली सवरली तेव्हा बेफामपणे लिहायला लागली अन् बोलायला लागली समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढू लागली. मग धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या सवलतीसाठीचा संघर्ष असो, समाजातील आई-बहिणींवरती होणारा अत्याचार, मेंढपाळ बांधवांवरती होणारा अन्याय असो अथवा विद्यार्थ्यांना बंद झालेल्या शिष्यवृत्तीचा मुद्दा असो त्या त्या ठिकाणी धनगर समाजातील यूवक बेफामपणे न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरू लागले. या संघर्षात जीव द्यावा आणि घ्यावा लागला तरी धनगर समाजातील यूवा वर्ग शांत बसू शकत नाही आणि माघारही घेऊ शकत नाही कारण माघार घेणं आमच्या रक्तातच नाही हा एक बार मोठा इतिहास आहे आणि त्याचं कारण म्हणजे राजा-महाराजांपासून थोर महापुरुषांपासून वारसानं आलेला हा "बेफामपणा" आमच्या रक्तात आणि नसानसात आहे म्हणूनच आज आमच्या जगण्याला अर्थ आहे. तो बेफामपणाच जर आमच्यात नसेल तर मग आमच्या जगण्यात तरी काय अर्थ???

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Thursday 6 August 2015

धनगर समाजातील न्यूनगंड कसा दूर होईल?


ज्या धनगर समाजानं ५००० वर्षापुर्वी अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरं आज धनगर समाजापर्यंत पोहचली नाहीत हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. ती अक्षरं आमच्यापर्यंत का पोहचली नाहीत? याचा उलगडा आम्ही कधी केलाच नाही. तितका विचार करण्याइतपत आम्ही सक्षम आहोत तरी कुठे? इंडोनेशिया मध्ये धनगर समाजातील एका मेंढपाळाने लोहचुंबकाचा शोध लावला त्या  चुंबकीय शक्तीच्या आधारे आजच्या तंत्रज्ञानाने जगात एवढी प्रगति केली की प्रत्येक क्षेत्रात लोहचुंबाकाचा सर्रास वापर केला गेला आणि वैज्ञानिक क्षेत्रात एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवला.
खरंतर धनगर समाजाने अक्षरांचा शोध लावला, लोहचुंबकाचा शोध लावला, जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावृत्त करणारा आद्य मौर्य सम्राट राजा चंद्रगुप्त मौर्य यांनी समृद्ध आणि शक्तिशाली भारताचे स्वप्न पाहिले, तद्नंतर राजा बिंदुसारा यांचा पुत्र म्हणजेच राजा चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू राजा सम्राट अशोक यांनी भारताच्या दक्षिणेकडील काही भाग वगळता आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर अफगानिस्तान सह इशान्येकडील नेपाळ, भूटानपर्यंतचा प्रदेश एका छत्रीखाली एकत्रित आणला होता. पाकिस्तानातील अटकेपार झेंडे फडकवणारे राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी कर्मयोगिणी महाराणी अहिल्यामाई होळकर, इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे व शिवाजी महाराजानंतर राज्याभिषेक करून घेणारे महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर अर्थातच भारतीय नेपोलियन बोनापार्ट. वीरांगणा भिमाई होळकर, धनगर समाजाला हाक देऊन जागे करणारे लढवय्ये स्व बी के कोकरे साहेब व अन्यायाविरोधात आसूड उगारणारे आणि आजच्या तरूणांना लाजवणारे व्यक्तिमत्व म्हणजे सर्वांचे लाडके आप्पा अर्थातच बोरगावचा ढाण्यावाघ बापू बिरू वाटेगावकर.
धनगर समाजाचा असा सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास जर आम्ही अभ्यासला तर आजच्या धनगर समाजाबांधवांच्या मनातील न्यूनगंड दूर झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तितकेच सत्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "जो समाज आपला इतिहास विसरतो त्या समाजाचा कधीही विकास होत नाही". धनगर समाजाच्या बाबतीत अगदी असंच घडलंय. पण आमचा खरा इतिहास आमच्यासमोर का आला नाही?? याचा आम्ही कधी विचारच करत नाही. धनगर समाजातील अशा थोर महापुरुषांचा इतिहास अभ्यासू नये आणि याचा विचार धनगर बांधवांनी कधी करूच नये म्हणून समाजाला लाचार आणि गुलाम बनवनारी सनातनी आणि प्रस्थापित व्यवस्था या भारतात असल्यामुळेच धनगर समाजाचा विकास खुंटला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या भाषणात समाजाला केलेला उपदेश असा की, "देवाधिकाच्या भोदूबाबांच्या आणि भट-ब्राह्मणांच्या नादाला लागून तुमचा कधीच उद्धार होणार नाही. जर समाजाचा उद्धार करायचा असेल तर भारतीय संविधानानुसार जे कायदे बनवलेत त्या कायद्यांच्या आधारे राजसत्ता आणि राजपाठ हा मार्ग निवडला तरच समाजाचा उद्धार होऊ शकतो". आज धनगर समाज अज्ञानी असल्यामुळे अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे आणि विकासापासून शेकडो मैल दूर असलेल्या या धनगर समाजाला विकासाच्या प्रगतिपतावर यायचं/आणायचं असेल तर धनगर समाजबांधवांच्या डोळ्यावरील अज्ञानाचं घोंगडं झटकून अंधश्रद्धेपासून त्यांची सुटका केली पाहिजे.
कोणीतरी माझ्या मदतीला येउन माझा उद्धार करेन हा न्यूनगंड जर मनातून काढून टाकला तर धनगर समाज यशाच्या वाटेवरती असेल. धनगर समाजाच्या मदतीला कोणीही धावून येणार नाही, धनगर समाजाचं नेतृत्व जर निस्वार्थी, सक्षम आणि सामर्थ्यशाली असेल तर धनगर समाजाची वाताहात होणार नाही. आजपर्यंत धनगर समाजाच्या मताधिक्याचा वापर परकियांनीच करून घेतला आणि आजही घेत आहेत पण धनगर समाजाच्या वाट्याला मात्र पाचवीला पुजलेलीच भटकंती आली आहे. राजकारण आपलं काम नव्हे असे म्हणून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष्य केल्याने प्रस्थापित जाती व्यवस्था धनगर समाजाच्या मताचा वापर करून स्वताची घरं भरू लागली. धनगर समाजाच्या मतावर प्रस्तापित आणि सनातनी लोक सरपंच, पं स. सभापति, जि.प. अध्यक्ष, आमदार, खासदार तसेच मंत्री झाले पण धनगर समाजाला या क्षेत्रात त्यांनी कधीच पुढे येवू द्यायचं नाही आणि या समाजावर सतत अन्याय करायचा असा त्यांनी डाव आखला.
दूरदृष्टी असलेले यशवंतराव चव्हाण त्यावेळी शरद पवारांना कानमंत्र देतात की धनगर समाजाला एकाऐवजी दोन घोंगडीने झोपवा कारण धनगर समाज जर जागा झाला तर या महाराष्ट्र राज्यात प्रस्तापितांना राजकारण करता येणार नाही. आज प्रस्तापितांचा एखादा उमेद्वार विधानसभा लढवत असेल तर आमचा भोळा-भाबडा धनगर समाज त्यांना मतदान करताना कधीही जातिभेद करत नाही पण धनगर समाजाचा एखादा उमेद्वार एखादी निवडणूक लढवत असेल तर प्रस्तापित आणि सनातनी व्यवस्थेतील लोक धनगर समाजाच्या उमेद्वाराला मतदान करत नाहीत हे वास्तव आणि सत्य आहे. कारण धनगर समाज्याच्या उमेद्वाराला मतदान करायला त्यांना लाज वाटतेय अशातला विषय नसून धनगर समाजाला विधानभवनात आणि संसदभवनेत पाठवायचं नाही हा त्यापाठीमागचा खरा उद्देश्य आहे. जिथं कायदे बनवले जातात तिथंच जर धनगर समाजाची माणसं नसतील तर मग काय खाक धनगर समाजाचा विकास होईल?? मग यावरून आतातरी धनगर समाजाला कळायला हवं की जातिभेद नक्की कोण करतंय? धनगर समाजाचा खरा शत्रु नक्की कोण आहे?
आज धनगर समाजाची अवस्था अशी आहे की आपापल्यातच एकमेकांचे पाय ओढायची सवय लागून गेली आहे. बरणीतल्या खेकड्यांसारखी प्रवृत्ति  जोपासल्याने धनगर समाजाची माणसं विधानभवनात आणि संसदभवनेत पोहचू शकत नाही आणि अशा प्रवृत्तीमुळे याचा फायदा प्रस्थापित आणि सनातनी व्यवस्थेला होतो, मग आम्ही आमच्यातल्या आमच्यात भांडायला सुरवात करतो. एकमेकांची जिरवाजिरवी अन् एकमेकांची डोकी फोडायला काठ्या कुल्हाडी हातात घेतो. महाराष्ट्र राज्यात परिणामी भारतात धनगर समाजाची लोकसंख्या अव्वल क्रमांकावरती असल्यामुळे प्रस्तापित पक्षांची मक्तेदारी संपवून धनगर समाजाच्या संघटना व पक्षाच्या उमेद्वारांना ग्रामपंचायतीपासून, सोसायट्या, कारखाने, मार्केट कमिटी, सुतगिरणी, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद, विधानसभा अथवा लोकसभा असो प्रत्येक ठिकाणी धनगर समाजाचा जर एखादा उमेद्वार निवडणूक लढवत असेल तर त्याच्या विरोधात निवडणूक लढवण्याऐवजी सर्वांनी त्या उमेद्वारास मतदान करून निवडून आणायला पाहिजे तरच धनगर समाजाला विविध पदे मिळतील. दक्षिण सोलापूर मध्ये मा. सिद्धेश्वर आवारे साहेब यांच्या "जय मल्हार युवा मंच महाराष्ट्र राज्य" या संघटनेनं हा उपक्रम राबविला आहे आणि असाच उपक्रम जर महाराष्ट्र राज्यभर राबविला तर २०१९ चा मुख्यमंत्री धनगर समाजाचा असेल हे मी अवर्जून आणि अभिमानानं सांगेन.
धनगर समाज जर एक झाला तर नेते आपोआप एकत्र येतील कारण कोणताही नेता हा समाजापेक्षा मोठा नसतो. त्यामुळे धनगर समाज कधीच एकत्रित येणार नाही अशी वायफळ आणि फालतू बडबड करण्याऐवजी प्रत्येकांनी सकारात्मक विचार करून, आजपर्यं चालत आलेला पारंपरिक विचार आणि मनातील न्यूनगंड दूर करुन स्वतःपासून १% जरी समाजजागृतीचे कार्य केले तर धनगर समाज १००% प्रगतिपथावर असेल. राज्यात धनगर समाजाच्या भरपूर संघटना आणि पक्ष सुद्धा आहेत पण राज्य पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवरती त्या सर्व संघटना व पक्ष समाजहितासाठी/समाजरक्षणासाठी एकत्रित आले तरच राजा सम्राट अशोकांचं स्वप्न साकार होईल नाहीतर मग धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा असंच म्हणत बसायची वेळ येईल.

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Tuesday 4 August 2015

चेष्टा लावलीय का धनगर जमातीची?


मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस काय चेष्टा लावलीय का तुम्ही धनगर समाजाची?? आपण कायदेपंडित आहात, आपणास कायद्याचं उत्तम ज्ञान आहे त्यामुळे आपणास असं करणं शोभत नाही. या राज्यातील जनतेला परिणामी ज्या धनगर समाजानं तुम्हाला सत्तेत आणून बसवलं त्या धनगर समाजाला आपल्याकडून खूप अपेक्षा असताना तुम्ही वेडेपणाचे भोळेपणाचे सोंग घेऊन आम्हाला फसवायचे धोरण आखताय ते कशासाठी?? आणि कोणाच्या सांगण्यावरुन?? शरद पवारांचे जातियत्व  स्विकारुन तुम्ही धनगर समाजावरती अन्याय करत आहात याचं भान राहुद्या. एखाद्या जमातीवरती गेल्या ६५ वर्षापासून विनाकारण अन्याय होत असेल आणि त्या जमातीला जर त्यांच्या हक्कापासून दूर ठेवलं जात असेल तर तुमच्यावरती देशद्रोहाचा खटला भरायला पाहिजे का??
धनगर समाजाची स्पष्ट मागणी अशी आहे की, भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या कलम क्र ३४२ वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अ.क्र. ३६ वरती ओरॉन, धनगड (धनगर) असा स्पष्ट उल्लेख आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात प्रकाशित होणार्या २००७-०८ व २००९-१० या वार्षिक अहवालात ३६ क्रमांकावर ओरॉन, धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याशिवाय राज्यघटनेत धनगड असे टायप आहे त्यासाठी हिंदी शब्दकोश चाळा हिंदीमधील "ड" चा उच्चार मराठीत "र" असाच होतो आहे. म्हणून धनगड आणि धनगर या वेगळ्या जमाती नसून एकच "धनगर" नावाची जमात आहे. राज्यघटना अमलात आल्यापासून म्हणजे १९५० पासून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून दूर ठेवले आहे त्या सवलती धनगर समाजाला त्वरित लागू कराव्यात त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून केंद्र सरकारला फक्त अशी शिफारस पाठवायची आहे की "राज्यघटनेतील कलम ३४२ वरील अनुसुचित जमातीच्या महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टातील अ.क्र.३६ वरील ओरॉन, धनगड मधील "धनगड" ही जमात महाराष्ट्र राज्यात कोठेही वास्तव्यास नसून ती  "धनगर" हीच जमात आहे आणि गेल्या ६५ वर्षापासून या धनगर जमातीला "र" ऐवजी "ड" झाल्यामुळे सवलती देण्यात आल्या नाहीत त्या सवलती त्वरित लागू कराव्यात".
धनगर जमातीची मागणी साधी आणि सरळ असताना देवेंद्रजी फडणवीस तुमचे विधानभवनातील (पावसाळी अधिवेशनातील) विधान म्हणजे शरद पवारांचे जातियत्व स्विकारल्याचे समजून येते.  मुळात धनगर आणि धनगड या जमाती वेगवेगळ्या नसून धनगर ही नावाची एकच जमात आहे. (त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण  वाङमय खंड-१ दि ९ मे १९१६ हा संदर्भ तपासावा).  "भारत में जातिप्रथा संरचना, उत्पत्ति और विकास" या खंडामध्ये  डॉ बाबासाहेबांनी जातींच्या व जमातींच्या लोकसंख्येचा अहवाल सादर केला होता त्या अहवालामध्ये  पान क्र २३५ वरती "धनगर"  या जमातीचा स्पष्ट उल्लेख आहे याशिवाय धनगड या जमातीचा कोठेही उल्लेख नाही. महाराष्ट्र राज्यात परिणामी भारतात धनगड जमात आहे तरी कोठे?? काल-परवा बिहार सरकारने धनगड व धनगर वेगळे नसून एकच असल्याची घोषणा केली व बिहार मधील धनगर जमातीला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू केल्या.
महाराष्ट्र राज्यातील धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती न मिळाल्यामुळे धनगर जमातीची राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात पीछेहाट झाल्याने या जमातीचे पुढच्या ५०-६०  वर्षात सुद्धा न भरून येणारे नुकसान झाले आहे. आणि या सर्व नुकसानीस महाराष्ट्र राज्यातील प्रस्थापित व्यवस्था जबाबदार आहे आणि तुम्ही सुद्धा यास जबाबदार रहाल.
देवेंद्र फसणवीस तुम्ही विधानभवनात विधान केले की, "धनगर" आणि "धनगड' या जमाती एक आहेत की वेगवेगळ्या याची पडताळणी करण्यासाठी  टाटा रिसर्च इंन्स्टिट्यूट अॉफ सोशल सायन्स मुंबई आणि अदिवाशी विकास व प्रशिक्षण संस्था पुणे या दोन्ही संस्थांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्या त्या संस्थांनी अहवाल सादर केल्यानंतर अहवाल जर सकारात्मक आले तर धनगर जमातीला अनुसुचित जमातीमध्ये सामाविष्ट करण्यात येईल.  पण राज्यघटनेनुसार जर एखाद्या जमातीला अनुसुचित जमातीच्या यादीत सामाविष्ट करायचे असेल तर वरील संस्था अहवाल सादर करून ती संबंधित जमात त्या त्या प्रवर्गाचे निकष पुर्ण करते की नाही हे कळवतात तद्नंतर त्या जमातींना सामाविष्ट करायचे का नाही हा प्रश्न उपस्थित होतो.
पण एखादी जमात जर संविधानानुसार भारतीय राज्यघटनेत अगोदरच सामाविष्ट केली गेलेली असेल तर राज्य सरकारने केंद्र सरकारला फक्त शिफारस करायची आहे की ज्या जमाती अनुसुचित जमातीच्या यादीत सामाविष्ट आहेत त्या त्या जमातींना त्यांच्या सवलती व लाभ द्यायला पाहिजेत म्हणून धनगर ही जमात अगोदरच अनुसुचित जमातीमध्ये आहे त्याचे भक्कम आणि सबळ पुरावे उपलब्ध असताना मुख्यमंत्र्यांनी धनगर जमातीची घोर फसवणूक करू नये अन्यथा आम्हाला आमच्या औकातीवर यायला वेळ लागणार नाही.
आमची मागणी धनगर जमातीला आरक्षण द्या किंवा अनुसूचित जमातीमध्ये सामाविष्ट करा अशी नसून अगोदरच अनुसुचित जमातीमध्ये असलेल्या आमच्या धनगर जमातीला आमच्या हक्काच्या सवलती लागू कराव्यात आणि केंद्र सरकारकडे तशी शिफारस पाठवावी एवढीच आमची मागणी आहे. यासाठी
१) कोणत्याही संस्थेकडून अहवाल मागवण्याची गरज नाही.
२) यासाठी कोणतीही समिति नेमण्याची गरज नाही.
 मुख्यमंत्री महोदय तुम्ही वेळकाढूपणा करून धनगर समाजाला बोहल्यावर चढवण्याचा प्रकार करू नका आणि ते आता सहनसुद्धा केले जाणार नाही. आम्ही अगोदरच अनुसुचित जमातीमध्ये आहोत त्या अनुषंगाने त्वरित शिफारस करून आम्हाला आमच्या सवलती त्वरित लागू कराव्यात नाहीतर मग आम्हाला रस्त्यावर उतरायला क्षणमात्रही वेळ लागणार नाही. आतापर्यंत आम्ही शांत होतो पण तुम्ही आमचा अंत पाहू लागलात. आता आर या पार नाहीतर करो या मरो उद्धीष्ट डोळ्यासमोर ठेवून उद्या महाराष्ट्र पेटवायला आम्हाला वेळ लागणार नाही.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
             -नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com