Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday 29 December 2015

चांगभलं बिरोबा अन् आरक्षणाचा खेळखंडोबा...


               डॉ बाबासाहेबांनी धनगर समाजाला राज्यघटनेत कलम ३४२ च्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अ.क्र.३६ वरती आरक्षण दिलेले आहे. केवळ शब्दच्छल झाल्याने अर्थातच "धनगर" ऐवजी "धनगड" (र चा ड) झाल्याने सगळा राडा झाला आहे. गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाज अनुसुचित जमातीच्या सवलतींपासून वंचित असल्याने धनगर समाजाचे झालेले नुकसान पुढील ६०-७० वर्षातसुद्धा भरून न येणारे आहे. यास रानोमाळी डोंगरदरीतून भटकणार्या धनगर समाजाचे अज्ञान जरी कारणीभूत असले तरी संविधानाच्या/राज्यघटनेच्या आधारावरती राज्यकारभार चालवणारे सरकार त्याहून अधिक जबाबदार आहे. धनगर समाजाला जाणूनबुजून अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचं काम प्रस्तापित व्यवस्था आणि परिणामी राज्यसरकार करत आहे. धनगर समाज जर निद्रावस्थेतून जागा झाला तर या प्रस्तापितांना त्यांची लायकी दाखवून देईल. ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्या समाजाची सत्ताकारणात भागीदारी लोकसंख्येच्या आधारवर तितकीच असणार आहे परंतू धनगर समाज अज्ञानाच्या खाईत होरपळला गेल्याने सत्ताकारणापासून ही जमात थोडी नाही तर खूपच दूर राहीली.
गेल्या ६५ वर्षापासून या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती अन्याय करण्याचा नंगानाच या महाराष्ट्र राज्यातील प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरेंनी आणि सदरच्या राज्य सरकारने चालवला आहे. धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपर्यात कुठेही पहावयास भेटत नसताना, धनगड नावाची जमातच आस्तित्वात नसताना महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात धनगड जमातीचा उल्लेख करायला डॉ.बाबासाहेब आंबेडकर काय मुर्ख होते का? हा माझा खडा सवाल मुख्यमंत्र्यांना, धनगर समाजाच्या या मागणीचा विरोध करणार्या त्या त्या आदिवाशी मंत्र्यांना आणि मेंदूला वाळवी लागलेल्या त्या वळवीला विचारायचा आहे. त्या वळवीचे म्हणणे आहे की राज्यघटनेत ३४२ च्या अनुछैद वरती ९ व्या परिशिष्टातील ३६ नंबर वरतीची जमात ही धांगड आहे आणि धांगड ही ओरॉनची तत्सम जात आहे. मग त्या वळवीने अभ्यास करावा की धांगड अथवा धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्यात कधीही जन्माला आली नव्हती मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी राज्यघटना मसूदा समिती होती त्यांनी काय मुर्ख म्हणून अहवाल सादर केले होते का? एखादी जमात आस्तित्वातच नसेल तर मग राज्यघटनेत नमूद केलेल्या त्या जमातीबद्दल प्रतिवाद देखिल करता येतो.  Acre चे एकड होते, Chattisgarh चे छत्तीसगड होते, Gurgaon चे गुडगाव होते त्याचप्रमाणे Dhangar चे धनगड असे झाले आणि म्हणून त्याचाच परिणाम असा की महाराष्ट्र राज्यातील दीड ते दोन कोटी धनगर समाजबांधवांचे भविष्य अंधारातच राहिले. धनगर समाजाची हजारो पोरं आइ ए एस, आइ पी एस, डॉक्टर, इंजिनीयर, एडव्ह़केट होण्यापासून वंचित राहिली याला सर्वस्वी जबाबदार आजपर्यंतचे राज्य सरकार आहे राज्यघटनेचा अवमान करणार्या त्या त्या नेत्यांवरती देशद्रोहाचा देखिल खटला भरायला हवा.
आज इथे तर उद्या तिथे अशा प्रकारचे जीवन जगणारी धनगर जमात ही भटकी जमात असल्यामुळे १९९१ साली धनगर समाजाला अनुसुचित जमातीची मागणी डावलून महाराष्ट्र राज्यापुरतं भटक्या जमाती क मध्ये टाकण्याचे पाप पवारांनी केलं पण त्या पवारांना उचलू लागायला आमच्याच समाजाचे अज्ञानी महाबहाद्दर पुढे होते.
आदिवाशी असल्याचे निकष:
राज्यघटना मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि समितीकडून राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ ला अडॉप्ट केली होती आणि २६ जानेवारी १९५० साली आमलात आणली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर म्हणजे जवळ जवळ ३ वर्षाचाच कालावधी लागला होता भारतीय संविधान लिहायला. राज्यघटना लिहताना त्यावेळी धनगर जमात ही माळोरानी डोंगर दरीतून भटकंती करत शेळ्या-मेंढ्यांची परिणामी स्वताच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत असते याचा अभ्यास करूनच मसूदा समितीने आदिवाशी समाजबांधवांपेक्षा अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगणार्या या जमातीला राज्यघटनेच्या अनुसुचित जमातीच्या यादीत अगोदरच सामाविष्ट केलेली आहे.
१) धनगर समाज ही आदिम जमात आहे शेळ्या मेंढ्या राखणे गाई-म्हैसी पाळणे हे आदिम जमातीचे व्यवसाय आहेत.
२)आदिम वैशिष्ट्ये/प्राचीन जीवनमान याचा अभ्यास केला तर डोंगरदरी माळरानावर जाऊन बघा शेळ्या-मेंढ्या राखणार्या समाजबांधवांची एकदा विचारपुस करून बघा मग समजतील आदिम वेशिष्ट्ये.
३)संस्कृति: धनगर जमातीची आदिवाशी जमातीसारखीच संस्कृति आहे खंडोबा, बिरोबा, धुळोबा हे धनगरांचे देव तसेच ढोल वाजवणे, धनगरी गजी नृत्य, धनगरी ओव्या यातून धनगर समाजाच्या संस्कृतिचा अभ्यास करता येतो. ओरॉन धनगर जमातीचे देव सुद्धा सारखेच आहेत.
४)भौगोलिक पृथक्करण: आदिवाशी जमात डोंगरदरीमध्ये जंगलामध्ये पाड्यावरती एकाच ठिकाणी स्थायिक राहते पण धनगर जमात ही डोंगर दरीमध्ये रानोमाळी, जंगलामध्ये आज इथे तर उद्या तिथे असे मुक्काम करत, अख्खा संसार घोड्याच्या पाठीवर लादून कोकरा-करडांचं आणि लेकराबाळाचं लटांबण घोड्याच्या पाठीवरील माचोळीवर मांडून तळहातावर पोट भरणारी धनगर जमात अभ्यासून पाहा.
५) लाजरे बुजरेपणा धनगर समाजातील बांधव जास्त लोकवस्तीत येत नाहीत समूहाने राहतात नागरी वस्तीत मिळत नाहीत मिसळत नाहीत कारण दिवसभर मेंढ्यांच्या पाठी पायाच्या नडग्या वाळवण्यातच कितीतरी पिढ्या बरबाद झाल्या त्यामुळे धनगर जमातीत अजूनही लाजरे बुजरे पणा तसाच आहे.
संघटितपणे लढाई महत्वाची:
धनगर समाजाला राज्यघटनेत अधिकार दिला असताना आदिवाशी पेक्षाही अत्यंत बिकट आणि हालाखीचे जीवन जगणारी धनगर जमात ही अनुसुचित जमातीमध्ये मोडत नाही असे ओरडून सांगणार्या अर्धवटांचे मला हसू येते. धनगर जमात ही भटकी जमात आहेच आहे आणि महाराष्ट्र राज्यात फक्त (केंद्रात नव्हे) धनगर जमात ही भटक्या जमाती -क मध्ये आहे. ते पण वक्रतुंडाच्या अवकृपेने १९९१ पासून पण आमच्या धनगर समाजाचं संघटन मजबूत असतं तर आज यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांच्या प्रयत्नातून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती कधीच मिळाल्या असत्या आणि आजच्या प्रस्तापितांचे तळवे चाटणार्या नेत्यांना भिक मागायची वेळ आली नसती.
आज आदिवाशी समाजातील काही पोरं लिहू लागतात की धनगर समाजातील लोक र चा ड झाला असे सांगत रडत बसलेत पण त्या वळवी ला माझे सांगणे आहे की आम्ही रडणार्यांपैकी नाहीये जर मनात आणलं तर क्षणात एकेकाला पायाखाली घ्यायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आजपर्यंत अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकणारे फक्त धनगरच आहेत याचा विसर कोणास पडू नये. धनगर समाजात अज्ञान पसरवण्यास प्रस्तापित व्यवस्थाच जबाबदार असून धनगर समाजाने यास बळी न पडता सर्वानी एकजुटीने/संघटितपणे आपले हक्क हिसकावून घ्यायला हवेत नाहीतर पुढची पीढी आपल्या तोंडात शेण घालेल याचा विचार करा.
खरी चूक कोणाची??
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनगर समाजावरती सतत अन्याय होत आला आहे. आदीवाशीपेक्षाही धनगर समाज आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असताना धनगड नावाची जमात महाराष्ट्रात नसताना राज्यघटनेत धनगड नावाचा उल्लेख करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चुकीचे ठरवायचे की सर्वानुमते २६ जानेवारी १९५० ला आमलात आणलेल्या राज्यघटनेवरती आजचा राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार चुकीचे ठरवायचे? धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात नाही शिवाय धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे संशोधकीय अहवाल असताना देखिल धनगर समाज आदिवाशींचे निकष पुर्ण करतो की नाही यासाठी टाटा इंन्सटीट्यूट अॉफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेला ६५ वर्षानंतर सर्वे करायला सांगणारे फडणवीस सरकार धनगर समाजाचे आरक्षण घशातून काढण्याचा प्रयत्न तरी करत नाही ना.??? अशी शंका कोणाच्याही मनात गोंधळ निर्माण करणारी आहे. यामुळे मागले तसेच म्होरले ही म्हण सार्थ ठरते की काय याचाच विचार सतत मनात घोळत असतो.

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

⚡👉पुन्हा एक नवी दिशा...✨


अज्ञानाच्या खाईत लोटलेल्या आणि अंधकाराने ग्रासलेल्या माझ्या धनगर समाजाला खरंच एका नव्या दिशेची गरज आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या धनगर समाजाचं भट-ब्राह्मणांनी पार कंबरडंच मोडून ठेवलंय. भाकित सांगून आणि थापा मारुन भोळ्या भाबड्या धनगर समाजाला देवाधिकाच्या नादी लावायचं अन प्रशासनातील सर्व पदे काबूत ठेवायची हा त्या पाठीमागचा गणिमी कावा आज माझ्या धनगर समाजानं वेळीचं ओळखायला हवा.
५००० वर्षापूर्वी ज्या धनगर समाजानं अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरे आज धनगर समाजापासून शेकडो मैल दूर आहेत असं का?? का ही अक्षरं आमच्यापर्यंत पोहचू शकली नाहीत?? ब्राह्मण शिक्षित झाले पण अक्षरांचा शोध लावणारा धनगर समाज अडाणी कसा काय राहिला याचा विचार तमाम धनगर बांधवांनी करायला हवा.
भर उन्हाळ्यात दिवसभर आग ओकणार्या सुर्याची किरणे झेलत, अंगाची काहिली होत असताना तप्त उन्हात दगडधोंडे अन काटेकुटे तुडवत शेळ्या मेंढ्या राखणार्या आई-वडिलांची अवस्था काय होते याचा विचार माझ्या धनगर समाजातील विद्यार्थी बांधवांनी  कधी केला का? पावसाळ्यामध्ये कधी कधी अवकाळी पावसाचा फटका तर गारांचा सपाटा सहन करावा लागतो. भर हिवाळ्यातील कडक थंडीमध्ये सुद्धा मेंढ्यांची राखण करावीच लागते.  इयत्ता सातवी नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लगातार दोन महिने मी शेळ्या-मेंढ्याकडेच होतो मग आज या गावी तर उद्या त्या गावी असा रोजचा प्रवास मी स्वतः अनुभवलाय. त्यामुळे उन्हाळा असो पावसाळा अथवा हिवाळा असो तिन्ही ऋतु मध्ये भयंकर ऊन, धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस तसेच अंगाचा थरकाप उडवणारी कडक थंडी यांचा विचार न करता मेंढ्यामागे उभे ठाकायचे हे जणू काय धनगर समाजाच्या पाचवीलाच पुजलेलं, शिवाय इतरांसारखी कोणतीही साप्ताहिक अथवा मासिक सुट्टी माझ्या धनगर समाजातील आई-वडिलांना अनुभवता येत नाही त्यामुळेच शाळा असोत अथवा सरकारी कार्यालये यांपासून दूर राहिलेल्या धनगर समाजाला अंधकारातून प्रकाशात यायला तसा खूपच उशीर झाला आहे आणि अजूनही धनगर समाज म्हणावा तितका जागृत झालेला नाहीये.
आजचे विद्यार्थी अथवा पालक सहज बोलून जातात की शिक्षण घेवून अन् पदव्या हासिल करून काय फायदा?? नोकरीच मिळत नाही. पण त्या सर्वांना माझे एकच सांगणे आहे की बांधवांनो तुम्ही शिक्षण घेताना कधी तुमच्या आई-वडिलांच्या भावनांचा विचार केला होता का???  दिवसभर पायाच्या नडग्या दुखेपर्यंत शेळ्या-मेंढ्यांमागे उभे ठाकलेल्या आणि दुसर्यांच्या शेतात दिवसभर राबराब राबून घाम गाळून ५-५० रु कमविण्यासाठी अपार कष्ट करणार्या आपल्या आई-वडिलांच्या भावना काय असतील याचा विचार कधी केला का?? दिवसभर कष्ट करून थकून भागून घरी परतणार्या आई-वडिलांचा चेहरा अगदी सुकून जातो पण शाळेतून आपला मुलगा/मुलगी घरी आलेत की नाही याचा विचार करत ते झपाझप पावलं टाकत घरी येतात, शाळेतून आल्यानंतर घरासमोर अंगणात खेळत असलेल्या आपल्या मुलाला/मुलीला समोर पाहून त्या सुकलेल्या चेहर्यामध्ये एक विलक्षण आनंद दिसून येतो त्यांच्या ओठांवरती एक हलकसं स्मित हास्य उमटून दिसते, पण त्यांच्या त्या हास्यामध्ये भावना लपलेल्या असतात आणि त्यांना आपल्याकडून काही अपेक्षा देखिल असतात याची जाणीव तुमच्या-माझ्या सारख्यांना असायला हवी. जर तुम्ही आम्ही त्यांच्या भावना समजू शकत नसू तर मग आपल्या आई-वडिलांच्या कष्टाला अन् आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्या भावना आणि त्यांच्या  अपेक्षा ज्यांना पुर्ण करता येत नसतील तर स्वतःला त्याची लाज वाटायला हवी. आपल्या मुला/मुलीनं खूप शिकावं IAS/IPS/Engineer/Advocate/Doctor/BUSINESSMEN तसेच इतर उच्च पदावरती पोहचावं, स्वतःचं तसेच आई-वडिलांचं नाव रोषण करावं या त्यांच्या भावना असतात मग त्या भावना ज्यांना ज्यांना समजतात तेच यशस्वी होतात.
ज्यांना आई वडिलांच्या हाताला बसणार्या चटक्याची जाण असते त्याला समाजावरती होणार्या अन्यायाचं भान असतं हे नाकारता येत नाही.
 एकदा आजोळी गेल्यानंतर तेथील शेजारच्या आजीनं मला सांगितलेलं एक वाक्य आयुष्यभर माझ्या लक्षात राहील ते म्हणजे "आयबाप आडाणी हायत म्हणून मेंढरं राखत्याती. पोरांनो तुमी तर शिका खूप मोठं व्हा अन् आय-बा च्या पायातली कुरपं मुजवा नायतर तुमीपण मेंढरं राखत बसचाल" त्या आजीच्या वाक्यामुळं आज माझं जीवन बदलले आहे. माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही तर आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मला झाली होती कारण मी सुद्धा दोन-तीन महिने त्यांच्यासोबत गावोगावी फिरुन पोटाची खळगी भरण्यासाठी मेंढ्या राखलेत तर कधी कधी मला एकट्यालाही दिवसभर मेंढ्यासोबत राहायचा योग आला होता कधी कोण्या शेतकर्यांच्या शिव्या तर कधी मार सुद्धा खावा लागायचा. मला ते अनुभवलेले दिवस नको होते म्हणून मी सरळ बोर्डिंग गाठलं होतं. धनगर समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये ही उणीव  भासली नाही पाहिजे, आई-वडिलांच्या कष्टाची प्रत्येकाला जाण असेल तर उद्या भविष्यात धनगर समाजाची पोरं IAS/IPS/Doctor/Engineer/Advocate/Businessman या क्षेत्रात चमकतील, पुढच्या काही वर्षामद्ये भारताचं राजकारण आणि प्रशासन हे धनगर समाजातील पोरांच्या हातात येऊ शकते पण समाजातील तरुण-तरूणींना मार्गदर्शन आणि योग्य दिशा देणे गरजेचे आहे.जर पुन्हा एकदा समाजातील युवक युवतींना योग्य दिशा मिळाली तर मेंढ्यांच्या मागे नडग्या वाळवून घेणार्या आई-वडिलांना मेंढ्या राखायची गरज पडणार नाही.हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज पडणार नाही आणि ही एक दगडावरची रेषा आहे.
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
जय यशवंत!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३

nitinrajeanuse.blogspot.com

Wednesday 16 December 2015

धनगर सारा एक होऊ दे...

धनगर सारा एक होऊ दे....
पुस्तकं वाचली तर मस्तकं सुधरतील आणि मस्तकं सुधरली तर क्रांती घडेल. पण आज एकविसाव्या शतकामध्ये पोट-जातींच्या विळख्यात अडकलेला धनगर समाज एकत्रित येऊन क्रांती घडवेल असे मला यथकिंचितही वाटत नाही. कारण पोटजातीमध्ये विखूरला गेलेला धनगर समाज कधीही यशाचे शिखर गाठू शकणार नाही त्यासाठी समाजातील पोट-जातींचे साखळदंड तोडावे लागतील. पोट-जातीच्या नावाखाली विखुरल्या गेलेल्या धनगर समाजाला एकत्रित केलं तर नक्कीच क्रांती घडेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज पडणार नाही. राजा महाराजांच्या, थोर महापुरूषांच्या समाजात जन्माला आलेली आम्ही माणसं आज पोट-जातींचा विचार करत बसल्याने इतर समाजापेक्षा ५०-६० वर्ष पाठीमागे आहोत हे नाईलाजानं सांगायची वेळ येतेय.
धनगर समाज ही आदिम जमात असून अश्मयुगीन कालखंडात मानवाने सुरवातीला शेळ्या-मेंढ्या राखायला सुरवात केली होती तद्नंतर जोड धंदा म्हणून शेती, शेतीसाठी/शिकारीसाठी लागणारी हत्यारे अवजारे बनवणे अशा प्रकारे व्यवसाय हळूहळू वाढत गेले मग कालांतराने शेळ्या-मेंढ्या राखणारे - धनगर, शेती करणारे -कुणबी, शेतीसाठी लाकडाची अवजारे बनवणारे -सुतार, लोखंडाची अवजारे बनवणारे -लोहार, मातीपासून भांडी बनवणारे -कुंभार, गाई-म्हैसी सांभाळून दुधाचा व्यवसाय करणारे -गवळी अशा एक ना अनेक प्रकारच्या व्यवसायानुरूप त्या त्या जाती तयार झाल्या आणि प्रचंड लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचं विभाजन झालं.
आज एकविसाव्या शतकाचा जर विचार केला तर धनगर समाजातही पोट-जाती असल्याचे चित्र दिसून येते. एकाच रक्ताची अन् हाडामांसाची माणसं पोटजातीचा उदो उदो करत आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हेच सांगत सुटलेत पण नुकसान माझ्याच समाजाचं होतंय हे त्यांच्या ध्यानीमनी देखिल नाही. आजची प्रस्तापित व्यवस्था मुद्दामहून जाणूनबुजून धनगर समाजातील पोटजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय कारण पोटजातीमध्ये विखूरलेल्या धनगर समाजबांधवांची जर जनगनना झाली तर महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत एक नंबरची जमात ही धनगर जमात आहे हे सिद्ध होईल. आणि जर धनगर समाजाला आपली खरी ताकद कळली तर तर जगातील कोणतीही अशी व्यवस्था कोणतीही अशी शक्ती नाही की ती धनगर समाजाला अडवू शकेल.
धनगर समाजातील सुशिक्षित युवा वर्गानं गांभीर्यानं विचार-विनीमय करायला हवा. पोटजाती बाजूला ठेवून फक्त धनगर म्हणून जगायला शिकलो तर धनगर समाजातील मुलं-मुली आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगीरी बजावतील यात तीळमात्रही शंका नाही. रणरागीणी महाराणी अहिल्यामाई होळकर स्वताच्या मुलीचा विवाह इतर जातीमधील युवकाशी करून देतात, महाराजा यशवंतराव होळकर आणि कोल्हापुरचे राजे छत्रपति राजर्षी शाहू महाराज या दोन्ही घरचे नातेसंबंध जुळून येते तर मग आजचा धनगर समाज आपापल्याच पोट-जातीमध्येच का गुरफटून राहिलाय?? हा प्रश्न साहजिकच कोणाच्याही डोक्यात गोंधळ निर्माण करू शकतो. धनगर समाजात पोट-जातीच्या प्रथा पडल्याने समाजातील उच्चशिक्षित मुलामुलींना आपला जीवनसाथी निवडण्यासाठी कधीकदी इतर जाती-जमातींचा आधार घ्यावा लागतो हे एक फार मोठे सामाजिक नुकसान आहे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत पण धनगर समाजातील रूळलेल्या पोटजातींचे दरवाजे जर खूले झाले तर मग आजच्या युवक-युवतींना इतर जातीमधील जीवनसाथी शोधण्याची गरज पडणार नाही.
यासाठी धनगर समाजातील युवकांनी समाजाच्या न्याय व हक्कासाठी आणि सामाजिक संतुलनासाठी पोटजाती बाजूला ठेवून एकत्रित येणं आवश्यक आहे. आजचा ज्वलंत प्रश्न आरक्षण अंमलबजावणीचा असो, अन्याय अत्याचाराचा असो अथवा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न किंवा विवाह बाबतीचा प्रश्न असो समाजबांधवांनी आणि समाजातील युवकांनी पोटजाती बाजूला ठेवुन एकत्रितपणे समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी.
 जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत
आणि गुजरातपासून आसामपर्यंत,
सह्याद्रीच्या दरी-खोर्यांतून एकच नाद घुमू दे
 प्रत्येकाच्या नसानसात ठसू दे
 आणि धनगर सारा एक होऊ दे.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Sunday 13 December 2015

आश्वासन मुख्यमंत्र्याचे पण नुकसान समाजाचे...


आरक्षणाचे नाव काढले की माझ्या तळपायाची आग अगदी मस्तकापर्यंत जाते अशीच अवस्था झाली आहे. आम्ही नक्की आमचे हक्क मागतोय की भिक मागतोय तेच आम्हाला कळेना आणि नेत्यांनाही समजेना. ज्याने त्याने उठायचे मोर्चे काढायचे आपल्या पाठीमागे कीती समाजबांधव आहे याचे शक्तिप्रदर्शन करायचे अन् मंत्र्यांना संत्र्यांना निवेदन द्यायचे त्या त्या सत्तापिपासू लोकांकडून आश्वासन घेतले की मोर्चा संपला असे जाहिर करत घराकडच्या दिशेने बोंबलत सुटायचे हेच आजपर्यंत चालत आले आहे यात वेगळे असे काहीच नाही.
आरक्षण अंमलबजावणीसाठी मोर्चे आंदोलने करणार्यांना मी विरोध करतोय अशातला विषय नाही तर राज्यघटनेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनादत्त अधिकार मिळवण्यासाठी धनगर  समाजाला ६५ वर्षानंतरही संघर्षच करावा लागतोय याचे दुख वाटते. आज स्व.बी.के.कोकरे साहेबांची खरोखरच खूप आठवण येते कारण तोच झंजावात जर आज असता तर आम्हाला भिक मागायची वेळ आलीच नसती हे शतप्रतिशत सत्य आहे आणि कोणीही नाकारू शकत नाही. १९८९ साली खंबाटकीच्या  घाटात लाखो यशवंत सैनिकांसोबत तीव्र रास्तारोखो आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांना याची दखल घ्यावी लागली आणि अनुसुचित जमातीच्या अंमलबजावणीची मागणी असताना पवारांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवत अज्ञानी नेत्यांना सोबत घेऊन धनगर समाजाला फक्त महाराष्ट्र राज्यापुरतंच भटक्या जमाती (क) NT-C मध्ये घातलं. पण केंद्रामध्ये असलेलं हक्काचं आरक्षण जाणूनबुजून डावलले गेले कारण धनगर समाजातील पोरं शिकली सवरली, आइ ए एस, आइ पी एस झाली तर भारताचं प्रशासन धनगर समाजातील पोरांच्या हातात जाईल या भीतीने वक्रतुंडाने खेळ मांडला आणि धनगर समाजातील लाखो युवकांना याचा फटका बसला.
२०१३ पासून पुन्हा नव्याने आरक्षण अंमलबजावणीसाठीची चळवळ महाराष्ट्रात पुन्हा थैमाण घालू लागली मग डिसेंबर २०१३ चे नागपूर अधिवेशन असो, १५-२१ जुलै २०१४ दरम्याणची पंढरपूर-बारामती आरक्षण दींडी आणि तद्नंतर ५-६ लाख समाजबांधवांचा बारामती येथिल ठिय्या आणि ९ दिवसाचे आमरण उपोषण, महाराष्ट्र राज्यभर आयोजित केलेला चक्काजाम, रास्तारोखो, तहसिल/जिल्हाधिकारी कार्यालयावरील आंदोलने मोर्चे, मुंबई मधील १ अॉगस्ट रोजीचा आझाद मैदानवरचा मोर्चा, १४ अॉगस्ट २०१४ रोजी धनहर समाजबांधवांनी केलेला रेल्वे रोखो, ४ जानेवारी २०१५ ची धनगर परिषद, २३ मार्च चा मोर्चा, ९ जुलै रोजी सर्व आमदारांना  व १५ जुलैला सर्व सर्व तहसिल/जिल्हाधिकार्यांना दिलेले निवेदन त्याचप्रमाणे १५ जुलै रोजी मंत्रालयासमोर गांधीगीरी मार्गाने केलेले आंदोलन. २१ जुलै चा बारामती येथील प्रेरणा दिवस आणि त्यानंतर ८ व १० डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावरील मोर्चा. अजून कीती मोर्चे काढायचे?? अजून कीती आंदोलने करायची?? तळहातावरती पोट भरणारे धनगर समाजबांधव उन वारा पाउसाचा विचार न करता आरक्षणाची अंमलबजावणी होईल माझ्या पोराला/पोरीला चांगलं शिक्षण देईल, समाजाला पुरेसा निधी मिळेल, मुलं/मुली शिकली सवरली तर आइ ए एस, आइ पी एस होतील डॉक्टर, इंजीनीयर होतील, यापेक्षा धनगर समाजालाच राजकीय क्षेत्रात आरक्षणामुळे संधी मिळेल व समाजाची प्रगती होईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी समाजव्यवस्थेतील समानता आणि डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचे महासत्ता देश बनण्याचे स्वप्न साकार होईल या अनुषंगाने पोटात अन्नाचा कण नसताना नागपूरच्या त्या स्टेडियममध्ये कडाक्याच्या थंडीत कुडकुडत आरक्षणाची अंमलबजावणी होईल म्हणून चातकासारखी वाट पाहणार्या माझ्या समाजबांधवांवरती शेवटी आश्वासनांचीच टांगती तलवार आली.
सरकार आल्यावर १० दिवसात देतो, १५ दिवसात निर्णय घेतो, अजून अभ्यास करतोय आणि आज चक्क ९ महिन्याने निर्णय घेतो म्हणजे बाळंतपण करायचा विचार आहे की काय यांचा? स्वार्थी विचाराने बरबटलेले आरक्षणाचे श्रेय लाटण्यासाठी खटाटोप करणारे आमचे नेते जर शहाणे असते तर १० दिवसाचा १५ दिवसाचा जाब विचारला असता पण त्यांना समाजाशी आणि आरक्षण अंमलबजावणीशी काहीही घेणेदेणे नाही. पुन्हा ९ महिन्याची वाट बघायची का? TISS चे अहवाल नक्की काय सांगतील?? TISS वाले पुणे-मुंबई सारख्या ठिकाणच्या धनगर बांधवांचा सर्वे करून अहवाल सादर करणार की पोटाची खळगी भरण्यासाठी रानोमाळी, डोंगरदरीतून उन वारा पाउसाचा विचार न करता पायाच्या नडग्या वाळेपर्यंत मेंढ्यांची राखण करणार्या धनगर समाजाचा सर्वे करणार?? असे असंख्य प्रश्न सर्वसामान्य समाजबांधवांच्या डोक्यात गोंधळ करून बसलेत. जिथं अन्याय दिसेल तिथे लाथ मारणार्या राजामहाराजांच्या समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी आज मुकाटपणे अन्याय सहन करतोय याचीच खंत वाटतेय. आश्वासनांवरती आश्वासने देऊन धनगर समाजाची चक्क दिशाभूल केली जात आहे हे नेत्यांच्या ध्यानीमनी येत नाही प्रत्येकजण स्वार्थाने बरबटलेल्या विचारांची पेरण करत बसतोय मग बुद्धीजीवी वर्गाने नेमकी कोणती भुमिका घ्यावी यातच सगळा राडा होतोय आणि मग प्रस्थापितांचे फावतेय. सुशिक्षीत अर्थात शिकला सवरलेला धनगर समाजबांधव बिनढोक नेत्यांची ओझी वाहत बसल्यामुळे धनगर समाज अजूनही अंज्ञानाच्या खाईत ढकलला जातोय. त्यासाठी सुशिक्षीत सुज्ञान युवा वर्गाने समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी.

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday 3 December 2015

महापराक्रमी योद्याची जयंती त्यानिमीत्त.....

आज

 पहाटे पहाटेची वेळ होती, गाढ साखर झोपेत असताना अचानक कोणीतरी गालावर जोरदार चपराक मारण्याचा भास झाला, कोण?? कोण ?? असं म्हणत गालावर हात फिरवत डोळे चोळत उठून बसतो तोच समोर एक आकृति दिसली. धिप्पाडच्या धिप्पाड शरीरयष्टी, अंगावर जरदारी रेशमी वस्त्रे परिधान केलेली, भरदार दाढी आणि कोरीव मिशा, डोक्यावर शिलेदार हिरेजडित टोप आणि त्यामध्ये खोचलेला तुरा असा वेष धारण केलेल्या व्यक्तिच्या डोळ्यात एकदम तेज निखार होता, कमरेला म्याणात तलवार लटकत होती. मी त्या व्यक्तिला ओळखलं तोच तोंडातून शब्द फुटले की महाराज तुम्ही?? आणि इथं कसं काय???
ती व्यक्ति दुसरी तिसरी कोणी नव्हती तर इंग्रजांविरुद्ध कधीही न हारता एकूण १८ लढाया जिंकणारे आणि वीठोजीराव होळकर यांच्या खूनाचा बदला घेण्यासाठी  पुण्यात येवून शिंद्यांना-पेशव्यांना ताणून ताणून मारणारे मुत्सद्दी लढवय्ये महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर होते.
मी केलेल्या प्रश्नाचं मला खडसावतच महाराजांनी उत्तर दिलं, "तिकडं माझा धनगर समाज डोळ्यांवरती अज्ञानाचं घोंगडं पांघरुन गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय त्या माझ्या धनगर समाजाला कोण जागं करणार???"
महाराजांना काय उत्तर द्यायचं मलाच सुचत नव्हतं. माझे ओठ पुटपुटत होते तेवढ्यात महाराज पुन्हा गरजले "अरे काय दातखीळी बसली की काय?? मी विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर हवंय...
मी बोललो की महाराज आजचा धनगर समाज अजून गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय ही गोष्ठ खरी आहे याची मला खंत देखिल वाटते आणि त्यांना जागं करायचा मी पुरेपूर प्रयत्न सुद्धा करतोय. पण काहीजण जागे आहेत त्यांनी मात्र झोपेचं सोंग घेतलंय. महाराज एक म्हणसुद्धा आहे की "एकवेळ झोपलेल्यांना जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेणार्यांना जागं करता येत नाही."
तेवढ्यात महाराज ओरडले "अरे झोपेचं सोंग घेणार्यांना लाथा घालून उठवायचं असतं, एवढीपण अक्कल नाही का???. " वेड्याला जोड्याचा मार अन शहाण्याला शब्दांचा मार द्यायचा असतो."
मी पुन्हा बोललो "महाराज हा आपला पुर्वीचा धनगर समाज नाही राहिला की ज्याला अन्यायाची जाण, लढण्याची हिंमत आणि स्वाभिमानाची किंमत होती. आज या महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज प्रस्थापितांच्या दावणीला बांधला गेलाय. महाराज आजचा धनगर समाज स्वाभिमानाची भाषाच विसरून गेलाय. अन्यायाच्या विरोधात कसे पेटून उठायचे तेच आमच्या मावळ्यांना समजत नाही. का आजच्या धनगर समाज बांधवांमध्ये लढण्याची हिंमतच नाही तेच मला समजत नाही. जो धनगर समाज बांधव स्वतःचा स्वाभिमान दुसर्यांच्या बुटाखाली गहाण टाकतोय त्याला मी कसं जागं करू??? ज्या धनगर समाजाला आपला इतिहासच माहीत नाही ते काय इतिहास घडविणार???
पहाटेचे वातावरण एकदम शांत असताना महाराज एकाएकी कडाडले शांतता दुभांगल्यागत झाले आणि आगीचे लोळ जसे बाहेर पडावेत तसे महाराज आग ओकू लागले "अरे आम्ही घडवलेला इतिहास जर तुम्हाला आठवत नसेल तर मग तुम्ही धनगरांचे वारसदार कशासाठी म्हणवून घेता?? हाडाची काडं करून आपले वंशज ते बहाद्दर लढले होते अन आम्हीसुद्धा तलवारीच्या टोकावर दुश्मनांना नाचवलं होतं तेव्हा रक्ताचं पाटच्या पाट पाण्यासारखं वाहत होतं एवढं बलिदान नेमकं कोणासाठी होतं?? छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर लढलेल्या महापुरुषांची अन पुर्वजांनी सांडलेल्या रक्ताचीच जाणीव जर आजच्या धनगर समाजाला नसेल तर या गोष्ठीची आपल्या पुर्वजांना देखिल लाज वाटत असेल की आरे आपण कोणत्या समाजात जन्माला आलो?? आणि याचा देखिल त्यांना खेद वाटत असेल"
महाराजांचे डोळे लालबुंद झाले होते आणि महाराज खरोखरच जाम चिडले होते.
धनगर समाजानं ३५० वर्षापेक्षा अधिक काळ या हिंदुस्थानावर केलेलं राज्य मग आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्या पासून राजा बिंदुसार, राजा सम्राट अशोका ते राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी अहिल्यामाई होळकर, शुरवीर राजे यशवंतराव होळकर तुकोजीराव होळकर विरांगणा भिमाई होळकर यांचा राष्ट्राप्रती बलिदान दिलेला सुवर्णाक्षरात कोरलेला धनगर समाजाचा इतिहास ते माझ्यासमोर मांडत होते. तलवारीच्या जोरावर मिळवलेल्या यशाच्या गाथा गिरवत होते. स्वातंत्र्यासाठी लढणारे आद्यप्रणेते राजे यशवंतराव होळकरच होते, हे आम्हापासून लपवून ठेवलं गेलं आणि चुकीचा इतिहास लिहला गेला कारण इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते.
इंग्रजांनी भारतावर आक्रमण केलं होतं. अनेक संस्थानांच्या राजांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली होती, महाराज प्रत्येक संस्थानाच्या राजांना पत्र लिहून इंग्रजांविरूद्ध एकत्र लढण्याचे आवाहन करत होते. एवढेच नव्हे तर शिख आणि मुस्लिम धर्म स्विकारणार असे महाराजांनी जाहीर केले होते ते फक्त त्या त्या धर्माच्या राजा-महाराजांनी फीरंग्यांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्रित यावे म्हणून पण प्रत्येक संस्थानच्या राजा महाराजांना देशाबद्धल काही सोयरसुतक नव्हतं तर प्रत्येकजण स्वतापुरतं पहात होता. अख्खा हिंदुस्थान इंग्रजांपुढे झुकला गेला होता पण माझा राजा कोणापुढे न झुकता ताठ मानेनं कोरीव मिश्यांना ताव देत स्वाभिमानानं जगत होता, झुंजत होता १८ लढायामध्ये इंग्रजांना पराभूत करत वायूवेगाने इंग्रजांच्या सैन्याना कापत सुटायचा, कधीकधी इंग्रज अधिकारी देखिल यशवंतराव होळकरांपुढे नतमस्तकी व्हायचे तर कधी काही इंग्रज अधिकारी रणांगणातून माघारी पळ काढायचे.
हीच ती धमक होती आणि हाच त्यांचा शूरबाणा आणि मनगटाच्या जोरावर शत्रुंना चारीमुंड्या चीत करणारी त्यांची ती तलवार माझ्या मातीवर अत्याचार करणार्यांना कापत सुटायची.
महाराज बोलत होते मी मात्र सुन्न होऊन त्यांच्या शौर्यगाथा ऐकत होतो, एकाएकी अंगावर रोमांच उठायचे, अंग शहारून निघायचे माझ्याही हाताच्या मुठी आवळल्या जायच्या पुन्हा एकदा हातात तलवार घेऊन रणांगणात उतरावं, जो माझ्या मातीवरती समाजावरती अन्याय करतोय त्याला उभाच चिरून टाकावं अशी अवस्था झाली होती.
माझ्या ओठातून शब्द फुटले "महाराज मला आज्ञा द्या मी नेमकं काय करु??"
महाराज मला खडसावतच बोलले "आज समाजावरती अन्याय करणार्या  प्रस्थापितांना जर धाक दावायचा असेल तर धनगर समाजाला जागं करावं लागेल, जे जागे आहेत त्यांना उठवून उभा करावं लागेल, जे उठलेत त्यांना चालतं कर बोलतं कर लेखणीरूपी धारदार शब्दांच्या तलवारी प्रत्येकाच्या हातात दे की जे शब्द एकेकाची काळीजं चिरत जातील.
एखाद्या पिकाची मशागत करायची असेल तर अगोदर शेत नांगरावं लागतं, पिकाला वेळेवर खत पाणी द्यावं लागतं तरच पिक जोमानं वाढतं त्याचप्रमाणे अगोदर माझ्या धनगर समाजाचं डोकं नांगरलं आणि वेळेवर समाजप्रबोधनाचं खतपाणी घातलं तर भविष्यात माझ्या धनगर समाजाला कोणाकडेही गहाण पडायची वेळ येणार नाही."
जो समाज आपला इतिहास विसरतो त्या समाजाची कधीच प्रगती होत नाही. कारण इतिहास घडवणारे इतिहास विसरू शकत नाहीत अन् इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत हा एक फार मोठा इतिहास आहे. त्यासाठी आपला इतिहास सर्वांसमोर यायला हवा. आजच्या समाजाला जर जागं करून एकत्रित करायचे असेल तर इतिहासाचीच सांगड घालून द्यावी लागेल अन्यथा या स्वार्थी आणि मतलबी प्रवृत्तीच्या जगात समाजासाठी धडपडणार्यांची संख्या फारच कमी आहे. प्रत्येकजण स्वतापुरतं जगतोय, आपले पुर्वज देखिल जर राष्ट्रासाठी लढण्यापेक्षा स्वतासाठी लढले असते तर आज त्यांचा इतिहास समोर आलाच नसता. आणि इतिहासकारांनी याची दखल घेतली नसती. पण पुरोगामी विचारांच्या आणि पाखंडी पंडितांसारख्यांनी आपल्या पुर्वजांचा आणि राजा महाराजांचा इतिहास आम्हापासून दूर ठेवण्याचे कुटिल कारस्थान केले.
आज समाजावरती अन्याय व अत्याचार होत असताना माझ्याच समाजातील काही लोक हाताची घडी घालून तमाशा बघत बसताहेत तर काहीजण अवर्जून या तमाशाचे आयोजन करतात हे सांगायला देखिल मला खंत वाटते आणि त्या समाजद्रोह्यांची कीव येते. राजा महाराजांच्या जातीत जन्माला आलेल्या औलादी आज समाजावर अन्याय व अत्याचार करत असलेल्या प्रस्थापित नेत्यांच्या दावणीला कसे काय बांधले जातात तेव्हा महाराज म्हणाले... खरा इतिहास जर वेळीच समोर आला असता तर आज ही वेळ आली नसती. इतिहासाचे अज्ञान असल्याने समाजाची अधोगती झाली त्यासाठी आता समाजातील युवकांसमोर आपल्या पुर्वजांचा इतिहास मांडायला हवा. थोर महापुरूषांच्या जयंत्या साजर्या करून समाजाला एकत्रित करून इतिहासाची माहीती द्यावी. नुसतंच डीजे लावून धांगडधिंगा घालून जयंत्या साजर्या करायच्या असतील तर एकवेळ जयंत्या नसलेल्याच बरे. कारण त्या माध्यमातून समाजप्रबोधन होणे फार गरजेचे आहे. महाराजांचे शब्द ना शब्द मी मनात साठवून घेत होतो. महाराज जेवढे राकट स्वभावाचे होते तेवढेच राष्ट्रापती बलिदान देणारे  प्रेमळ स्वभावाचे होते. राजे यशवंतराव होळकरांचे नाव ऐकले तर इंग्रज अदिकार्यांना कापरं भरायचं. भांबुर्ड्याच्या लढाईत मल्हारतंत्राचा अवलंब करत लाखो माल्कमच्या सैन्यांना कापूण काढले होते तेव्हा एक इंग्रज अधिकारी त्याच्या सोबत्यांना म्हणाला की "ये यशवंतराव हुलकर आसमान से तो नहीं ना गिरा??" अशा पद्धतीने इंग्रजावरती मल्हारनीतीचा अवलंब करत हल्ले करणारे राजे यशवंतराव यांनी दुश्मनांवरती वचक बसविली होती. महाराज बोलतच होते आणि मी फक्त होतो. मात्र आता ऐकण्याची मनस्थीती नव्हती तर पुन्हा तीच तलवार घेऊन माझ्या समाजावर अन्य्य व अत्याचार करणार्यांची डोकी उडवायची होती पण अगोदर समाजाची डोकी नांगरांयची होती म्हणून महाराजांना सांगितले महाराज मी आज शपथ घेतोय की, "आज धनगर समाजाला जागं करून प्रत्येकाची डोकी नांगरल्याशिवाय मी शांत बसणार नाय. मग तिथं मला कोणीही आडवा तर त्याला तिथंच उभा चिरणार अन जर कोणी हात जोडून आला तर त्याला लोटांगण घालणार.
कारण जर आमच्या वाटेला कोणी आला तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतनार नाय हा आमुचा इतिहास आहे."
समाजबांधवांनी इतिहास जाणून घेण्यासाठी
1) झुंज : ना.सि.इनामदार
2) स्वातंत्र्य प्रणेते: संजय सोनवनी सर
3) वीरांगणा भीमाई: होमेश भुजाडे सर
4)धनगरांचा गौरवशाली इतिहास: संजय सोनवनी सर
5) होळकरांची कैफीयत: प्रा.निलेश शेळके सर
6)क्रांतीची मशाल पेटवा: ए.एस.बरींगे सर
7) थोरले सुभेदार मल्हारराव होळकर: संजय सोनवनी सर
8) The Vintage of Indore.
तसेच होळकरशाहीचा इतिहास अन्य पुस्तकांतून, संदर्भातून अभ्यासावा ही विनंती.
आज दि.३ डिसेंबर रोजी महापराक्रमी शुरवीर लढवय्या राज राजेश्वर सिहासनाधिष्ट महाराजाधिराज राजे श्रीमंत यशवंतराव होळकर यांची जयंती त्यानिमीत्त राष्ट्रापती बलिदान देणारे स्वातंत्र्याचे प्रणेते आद्य क्रांतीवीर राजे यशवंतराव होळकर यांना विनम्र जय मल्हार!!!
 कोटी कोटी प्रणाम!!!
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com