Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Sunday 28 October 2018

छत्रपतींच्या स्मृतींंना उजाळा, रणझुंजार योद्ध्याची कडवी झुंज ✍️नितीनराजे अनुसे

छत्रपतींच्या स्मृतीदिनानिमीत्त उजाळा
   रणझुंजार योद्ध्याची कडवी झुंज
                     ✍️नितीनराजे अनुसे
          इतिहासाच्या पाना-पानावर दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचा पाढा वाचायला भेटतो ऐकायला भेटतो. तसे पाहायला गेले तर या जगाच्या पाठीवर अनेक शुरवीर योद्धे जन्माला आले आणि गेले त्यातीलच एक रणधुरंधर लढवय्या म्हणजेच रक्तरंजित इतिहासाचा बादशहा असे म्हंटले तरी काही वावगे ठरणार नाही. खरंतर मराठी इतिहासकारांनी खरंतर या योद्ध्याला इतिहासातून उपेक्षित ठेवले, डावलले हे त्या त्या  इतिहासकारांच्या संकुचित बुद्धीचा प्रश्न होता शिवाय खरंतर धर्माच्या ठेकेदारांनी चालवलेला हा जातीयवादाचा नंगानाच होता. परंतु कोंबडा झाकून ठेवला म्हणजे सुर्य उगवायचा राहत नसतो त्याप्रमाणे संकुचित बुद्धीच्या जातीयवादी इतिहासकांनी राष्ट्र प्रेमी असलेल्या या रणधुरंदर लढवय्याचा अर्थातच उघड उघडपणे धनगरांचा खरा इतिहास कितीही लपवायचा, झाकायचा प्रयत्न केला तरी लपत नसतो उगवणाऱ्या सुर्याप्रमाणे  सत्य हे कधी ना कधी पुढे येतच असते हे कोणीही नाकारू शकत नाही.
       भांबुर्ड्याच्या मैदानात मल्हारराव होळकर (दुसरे) यांची छावणी पडली असताना मध्यरात्री नंतरच्या प्रहरी अलिजाबहाद्दर दौलतराव शिंद्यांनी मल्हारराव होळकर यांचे सख्खे भाऊ काशीराव होळकर यांच्या मदतीने छावणीवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात मल्हारराव होळकर घोड्याखाली आले तर यशवंतरावांची तलवार अंधारात कुठे निसटून पडली कोणास ठाऊक, त्यातच भाल्याची जखम गहरी त्यामुळे यशवंतराव होळकर यांचा मांडचोळणा फाटून त्याच्या चिंध्या चिंध्या झालेल्या आणि पोटरीत घुसलेली बंधूकीची गोळी त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत फाटलेल्या डगळ्यासह निशस्त्र यशवंतराव शहरात पोहचले पाठोपाठ धर्मा कुंवर देखील आला. धर्माने खूप विनंत्या केल्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांना वस्त्र लपेटून घोड्यावर पुढे घेतले आणि वाटेत भेटणाऱ्या व यशवंतराव होळकर यांची विचारपूस करणाऱ्या शिंद्याच्या सैन्यांना त्यांच्या पैकीच एका जखमीला चालवले असल्याचे सांगत कुंट्याच्या वाड्यात शिरला. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री धर्मा बातमी घेऊन आला आणि सर्वनाश झाल्याचे सांगू लागला. मल्हाररावबाबा तलवारीला बळी पडले तर शिंद्यांच्या सांगण्यावरून सुभेदार म्हणजेच काशीराव होळकर हे बाईसाहेब (यमुनाबाई), गरोदर असलेल्या जयाबाई (मल्हारराव होळकर दुसरे यांच्या धर्मपत्नी), लाडाबाई (यशवंतराव होळकर यांच्या पत्नी) व भिमाई यांसह सर्व कुटूंबकबिल्याला पकडून घेऊन गेले. आता मल्हाररावबाबा गेले म्हणून दु:ख करावे की सर्व कुटूंबकबिल्याला शिंदे घेऊन गेले म्हणून दु:ख करावे याबद्दल यशवंतरावांना काहीच सुचत नव्हते. डोळ्यासमोर अंधार दाटला होता हातात ना भाला ना तलवार, ना बसायला घोडे. त्यातच धाकले बंधू विठोजीराजे निसटून गेले ते नक्की कुठे गेले? शिंद्यांचे सैन्य चौकाचौकात यशवंतरावांची चौकशी करत होते. या सर्व घटनेवरून मराठी सैन्यामध्ये द्विधा अवस्था निर्माण झाली होती. छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या साम्राज्याला कोण्या फिरंग्यांची नव्हती लागली तर स्वराज्यातील मराठ्यांचीच नजर लागली होती. पेशव्यांनी मात्र यावरती काहीच पाऊले उचलली नव्हती ना निर्णय घेतला. यावरून तरी असेच वाटते की मराठ्यांच्या राजकारणात स्वबळावर ठसा उमटवलेल्या होळकरांची दौलत, होळकरांचे राज्य हे आजच्या सारख्याच सत्तापिपासू मराठावादी तथा भटजातवादी पेशव्यांना आणि मराठ्यांना गिळंकृत करायचे होते.
   परंतु माघार घेईल तो धनगर कसला? उत्तर भारतात आपल्या स्वबळावर मराठ्यांचे राज्य स्थापित करणाऱ्या, अटकेपार मराठ्यांचे झेंडे फडकवणाऱ्या थोरले सुभेदार तथा राजे मल्हारराव होळकर यांचाच वसा आणि वारसा अंगिकारलेल्या यशवंतराव होळकर यांनी शुन्यातून पुन्हा विश्व निर्माण केले होते. सुरवतातीला धार च्या पवारांनी त्यांना आपल्या मदतीला बोलावले व त्यांनी पेंढाऱ्यांच्या विरोधात जी तलवार गाजवली त्याला प्रभावित होऊन धारच्या पवारांनी त्यांना दिवाण नेमायची तयारी केली होती. परंतु आम्हाला आमची अनेक कर्तव्यं आहेत. शिंद्यांनी होळकरांचे एकेक महाल घशात घालून परगणे उजाड करायला सुरुवात केली आहे. लाखेरीच्या लढाई पासून आमचे अवसान खचले असून सरदार हा नाश उघड्या डोळ्यांनी पाहाताहेत असे सांगून आम्हाला निरोप द्यावा असे पवारांना बोलून दाखवले शेवटी पवार तयार झाले. पेंढाऱ्यांकडून काही बंदूका तलवारी मिळाल्या होत्या तर चार हजार रूपये पवारांनी दिले त्यावरच माणसं जमवायची आणि शिंद्यांना अद्दल घडवायची असा पण करून यशवंतराव होळकर हे धर्मा कुंवर, शामराव महाडिक व भवानीशंकर यांच्यासोबत निघाले. यशवंतराव होळकरांनी धार ला जो पराक्रम गाजवला ते ऐकून हळूहळू होळकरांचे विस्कळीत झालेले सैन्य यशवंतराव होळकर यांना मिळू लागले. मोठा फौजफाटा तयार झाला, अलिजाबहाद्दर दौलतराव शिंदे व सुभेदार काशीराव होळकर यांना यशवंतराव होळकरांची धास्ती वाटू लागली त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हजार बाराशे सैन्य धाडण्यात आले तरीही यशवंतराव होळकर यांचु जरब कमी होत नव्हती. काही काळानंतर धारच्या पवारांनी पुन्हा यशवंतराव होळकर यांच्या स्वागतासाठी निमंत्रण धाडले, सोबत पालखी आणि वस्त्रं पाठवून दिली. तोपर्यंत अंगावर फाटका डगळा घालून घालून त्याच्या पार झालेल्या होत्या. पुढे पवारांनी शेपाचशे फौजफाटा यशवंतरावांच्या दिमतीला दिला. इंदौर मधील होळकरांची गादी रिकामी होती भारमलदादा आणि हरकुंवरबाई (मावशी) यांच्या आग्रहाखातर खंडेराव होळकर (दुसरे) यांच्या नावाने यशवंतरावांनी राज्यकारभार सुरु केला, फत्तेसिंग माने यांच्यासह होळकरांचे अनेक जुने सरदार येऊन त्यांना मिळाले मात्र अचानक पाराजीपंतांचा खलिता घेऊन एक सांडणीस्वार तिथे आला. शिंद्यांनी आणि पेशव्यांनी यशवंतराव होळकरांचे मोठे बंधू विठोजीराजे होळकर यांची क्रुर हत्या केल्याचा तो खलिता होता. एखाद्या कसाबाला लाजवेल असे वर्तन बाळोजीने केले होते. विठोजीराजे यांन बापू गोखल्याने पकडून शनिवार वाड्यावर आणलं, शे-दोनशे कमच्या मारल्या हत्तीच्या पायाला बांधून हत्तीवर माहुत बसला त्यामागे बाळोजी कुंजर बसला आणि वाड्यापुढच्या पटांगणात हत्तीला फिरवले, हत्तीमागे विठोजीराजे यांची पत्नी कडेवर लेकरू घेउन विनवणी करत होती, वाटेल तो दंड घ्या, मी तुमची बटीक होऊन राहील पण माझं कुंकू कायम ठेवा असं बाळाजी कुंजर ला विनवणी करीत होती पण कोणीच पुढे येत नव्हता. पेशवा हा नंगानाच उघड्या डोळ्यांनी नगरखान्याच्या मोठ्या खिडकीतून बघत होता मात्र "सुभेदारी पाहिजे ना मग घे सुभेदारी" म्हणून विठोजीराजे यांना फरपटत होता. शनिवारवाड्यासमोरची माती पार लाल झाली होती आणि बाळोजी मात्र मोठमोठ्याने हसत होता. पेशव्या सोबतचे शिंद्यांसह बाकी सरदार मोठ्याने ओरडून बाळोजींना सांगत होते की "हत्ती तसाच जोरात चालू द्या, सुभेदारीची वस्त्रं चांगली लेवू द्या, पुरा लोळागोळा झाल्याशिवाय हत्ती थांबवू नका." शेवटी विठोजीराजेंचा आत्मा शांत झाला, डोक्याचा चेंदामेंदा झाला होता, हातपाय तुटून मैदानात पडले होते. ते मांगाकडून गोळा करून शनिवार वाड्यात पुढच्या चौकात उघड्यावर ठेवले, जाता येता "सुभेदार" असं हेटाळणीनं म्हणून त्यावर थुंकत होते. शेवटी पाराजीपंतांनी विनवणी करून तो मुडदा ताब्यात घेऊन दहनकर्म केला.
       एवढे ऐकून यशवंतराव होळकरांचाच काय कोणत्याही मराठ्यांचा संताप वाढला असता, सोबत्यांनी शेवटी डाव साधला त्यामुळे आता रडत बसायचे नाही, पेशव्यांच्या सल्लागारांनी-शिंद्यांनी पेशव्यांना भरीस घातले असून आता शिंद्यांना चांगला धडा शिकवलाच पाहिजे. श्रीमंतांची भेट घेऊनच शिंद्यांना समोरासमोर घेऊन शहानिशा करावी लागेल की होळकरांची गादी राहीली पाहिजे का नाही ते... पण पुढे काय झाले ते माहीतच आहे. पुण्याजवळ यशवंतरावांची छावणी पडली होती. मसलतीसाठी शिंदे-पेशवे एकत्रित येत नव्हते उलट यशवंतरावांचा बंदोबस्त करण्यासाठी पाऊले उचलली जात होती. शेवटी हडपसर येथे शिंद्यांचे-पेशव्यांचे सैन्य तोफासहित यशवंतराव होळकरांच्या स्वागताला उभे होते. यशवंतराव होळकर देखील काय कमी नव्हते अख्ख्या हिंदूस्थानभर गाजलेली नावाजलेली फौज यशवंतरावांकडे होती. शिंदे-पेशव्यांकडून पंचवीस तोफा सोडल्यानंतरच यशवंतरावांनी त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरवात केली. आणि बघता बघता शिंद्यांची-पेशव्यांची फौज कापत ती वानवडी पर्यंत रेटत नेली. सगळीकडे शिंद्यांच्या-पेशव्यांच्या सैनिकांची हाडे पसरली होती. शेवटी शिंदे-पेशव्यांचे काही सरदार रणांगणातूनच पळून गेले. यशवंतरावांनी पुणे जाळले तोपर्यंतच कोण जिंकले कोण हारले हे न बघता भितीपोटी खुद पेशवा आणि बाळोजी हे मल्हारबाबांच्या खंडेराव होळकर यांना घेऊन कोकणात पळून गेले. ते पुन्हा यशवंतराव होळकरांनी विनवणी करून देखील माघारी आलेच नाहीत. शेवटी फौजेच्या दाणागोट्यासाठी, अन्नपाण्यासाठी मंदिरातील पैसा बाहेर काढावा लागला त्याबद्दल काही जातीयवादी इतिहासकार यशवंतराव होळकर यांना बंडखोर, चोर, लुटारू असे संबोधून त्यांना इतिहासात बदनाम करून टाकले आणि ज्यांना खरंच बदनाम करायला हवं होतं त्या शिंद्यांना आणि पेशव्यांना डोक्यावर घेतले हा कोणता इतिहास आहे?
       वसईच्या तहानंतर खुद पेशव्यांनी यशवंतराव होळकर यांना पत्र लिहून सांगितले होते की होळकरांचे राज्य इंग्रज अधिकाऱ्याच्या स्वाधीन करावे, मात्र राष्ट्रप्रेमी असलेल्या यशवंतरावांना पेशव्यांकडून हे अपेक्षित नव्हते. यशवंतरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जे ब्रिटिश या भारतात हळूहळू पाय पसरू लागले आहेत त्यांना हाकलून लावायचे सोडून त्यांचे गुलाम बनण्यापर्यंत पेशव्यांची मजल जाते. यशवंतराव संतापले आणि त्यांनी इंग्रजांच्या विरोधात रणशिंग फुंकले मग सुरू झाली स्वातंत्र्याची लढाई, इंग्रजांना सळो की पळो करून सोडून अक्षरशः त्यांना रणांगणात कापुन काढून ब्रिटिशांना गुडघे टेकायला भाग पाडणारा यशवंतराव होळकरांव्यतिरीक्त दुसरा तिसरा कोणी जन्माला आलाच नाही. कोसो कोसो पाठलाग करून गणिमी काव्याने हल्ले करण्याचा सपाटा यशवंतराव होळकर यांनी चालवला होता त्यामुळे फिरंगी (ब्रिटिश फौज) मेटाकुटीला आले होते. अशा प्रकारे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल एकोणीस लढायांमध्ये इंग्रजांना हरवणारा भारताचा हा नेपोलियन बोनापार्ट नावारूपास आला. परंतु हे दोघेही समकालीन असल्याने छत्रपती यशवंतराव होळकर हे एकमेवाद्वितीय अजिंक्य योद्धे ठरले. अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज फौजांची इभ्रत (इज्जत) जगाच्या वेशीवर टांगणारा जगाच्या पाठीवर होऊन गेलेला एकमेव महायोद्धा म्हणून छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांना ओळखले जाऊ लागले अशा महायोद्ध्याचा आज  २०७ वा स्मृतीदिन त्यानिमित्त माझ्यासारख्या पामराकडून अशा या महान योद्ध्याला विनम्र अभिवादन...
रणधुरंदर लढवय्या, रणझुंजार योद्धा
असा राष्ट्रप्रेमी जातीवंत ।।
स्वकीयांसह ब्रिटीशांनाही पुरून उरला
माझा महाराजा यशवंत ।।
शत: शत: नमन करूनी वंदितो तुजला
तुझ्या चरणाची मी धूळ भाग्यवंत ।।
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123

Wednesday 17 October 2018

आरेवाडीच्या दसरा मेळाव्यातून बिरूबाला साकडं ✍️नितीनराजे अनुसे

आरेवाडीच्या बिरोबा बनात दसरा मेळाव्यासाठी एकवटलेला धनगर समुदाय
आरेवाडीच्या दसरा मेळाव्यातून बिरूबाला साकडं ✍️नितीनराजे अनुसे
      काल दि १६ ऑक्टोबर २०१८ रोजी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील धनगर समाजाचा दसरा मेळावा साजरा झाला. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून अखंड धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेल्या आरेवाडी येथील बिरोबाच्या बनात महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ मा.गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तमराव जानकर साहेब यांनी पुकारलेल्या आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याला आणखीनच बळ मिळाले. गेल्या ७० वर्षांपासून प्रस्थापितांच्या अन्यायाखाली खचलेल्या पिचलेल्या, अन्यायाच्या भयानक उन्हात होरपळलेल्या धनगर समाजाला आजही न्याय हक्कापासून वंचित ठेवायचे पाप इथली प्रस्थापित व्यवस्था करत आहे. ज्या धनगर समाजाच्या जीवावर प्रस्थापित नेते मोठे झाले, सत्ता उपभोगली, त्यांना सत्तेची चरबी चढली ती चरबी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उतरवली आणि भाजप ला सत्तेत बसवले परंतु पाठीमागच्या आघाडी सरकारप्रमाणेच हे भटजातीचे सरकार नपुंसक निघाले. ज्या धनगर समाजाने त्यांना सत्तेत बसवले त्यांच्यावरच उलथले. सत्तेत आल्यावर १५ दिवसांत, पहिल्या कैबिनेट मध्ये आरक्षणाचा प्रश्न सोडवू म्हणणारे फसणवीस सरकार वेळकाढूपणा करत आरक्षणाचा अभ्यास करू लागले आणि अभ्यास करता करता टिस चे भूत मानगुटीवर आणून बसवले. राज्यात धनगड नावाची जमात आस्तित्वात नसताना, राज्यघटनेत दिल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टातील धनगड जमातीची एखादी व्यक्ती औषधाला देखील शोधून सापडत नाही मग असे असताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सारख्या खाजगी संस्था धनगर आणि धनगड वेगळे असल्याचे (कोणाचे ऐकुन) कसे काय सांगते कोणास ठाऊक? हा कोणता जावई शोध म्हणायचा?
       मग धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर हे नक्की काय म्हणताहेत? तर ज्या धनगड या शब्दामुळे महाराष्ट्र राज्यात धनगर आणि धनगड चा घोळ घालून दीड ते दोन कोटी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवले गेले आहे त्या धनगड जमातीच्या लोकांचा ठावठिकाणा द्या नाहीतर धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या. जर धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले तर शैक्षणिक क्षेत्रात, शासकीय नोकरीत तर मेंढपाळांच्या पोरांना फायदा होईलच परंतु राजकीय क्षेत्रांत जर धनगर जमातीचे लोकसंख्येच्या आधारावर म्हणजेच जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी या गणिताने धनगर जमातीची कमीत कमी ३५-४० पोरं विधासभेत जातील शिवाय जास्त नाही तर किमान १० तरी खासदार महाराष्ट्र राज्यातून संसदेत जातील यासाठी धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती हव्या आहेत. परंतु धनगरांची पोरं जर राजकाणात आली, प्रशासनात आली तर प्रस्थापितांना रस्त्यावर भिक मागत बसायची वेळ येईल म्हणून धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या जात नाहीत.
       त्यासाठी धनगर समाजाने आपल्याच नेत्यांना सर्व गुणदोषांसह स्विकारले पाहिजे. जर कोणी चुकत असेल तर त्याला चुकतोय म्हणून सांगितले पाहिजे. जो चांगले काहीतरी करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि धनगर नेत्यांनाही समाजाच्या उपकाराची जाणीव पाहिजे तर आणि तरच धनगर समाजातील आमदार खासदारांचा टक्का वाढेल. काहीजण म्हणतात की नुसत्या सभा घेऊन आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. तर बरोबर आहे की नुसत्या घेऊन आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही परंतु सभा घेऊन त्या त्या विधानसभा/लोकसभा मतदारसंघातून एखादे नेतृत्व पुढे करायला पाहिजे जे नेतृत्व समाजासाठी लायक असेल. काल आरेवाडीत बिरोबाच्या बनात लाखोंच्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी झाले होते त्या सर्वांनी मिळून बिरोबासमोर साकडं घातलं आहे की या इढा पिढा टळू दे आणि धनगर जमतीला न्याय व हक्क मिळू दे. गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तमराव जानकर साहेब यांनी जो धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा उभा केला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे परंतु या लढ्याच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे प्रतिनिधित्व तयार करायला हवे तर आणि तरच आरक्षणाच्या अखेरच्या लढ्यातून धनगर समाजाची तरूण पोरं विधासभेत आणि संसदेत अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतील आणि धनगरांच्या न्याय व हक्कासाठी भांडतील...
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
   📧nitinrajeanuse123@gmail.com


Monday 15 October 2018

आरेवाडीचा दसरा मेळावा आणि सामाजिक सलोखा ✍️नितीनराजे अनुसे

आरेवाडीचा दसरा मेळावा आणि सामाजिक सलोखा 
                                  ✍️नितीनराजे अनुसे
          अखंड धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या आरेवाडीच्या बिरोबा बनात महाराष्ट्र,  कर्नाटक, गोवा तसेच आंध्रप्रदेश या राज्यातून लाखो समाजबांधव बिरोबाच्या बनात एकत्रित येऊन मेंढपाळांच्या राजाची मनोभावे सेवा करत असतात. दरवर्षी हे मेंढपाळ बांधव एकत्रित येतात आणि यात्रा झाली की आपापल्या घराकडे, जिथे मुक्काम असेल तिकडे आपापल्या वाड्यावर निघून जात असतात. असेच हे दरवर्षी चालत राहिले तर समाजाचे वैचारिक प्रबोधन कधी होणार? असा विचार नकळतपणे आल्याने जर आपण आरेवाडी येथे दरवर्षी जर दसरा आयोजित केला तर विखुरलेल्या धनगर समाजाचे वैचारिक प्रबोधन करू शकतो अशी संकल्पना महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ मा. गोपीचंद पडळकर साहेब यांना सुचली आणि २०१६ पासून दसरा मेळाव्याला सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे २०१७ ला देखील दसरा मेळावा पार उत्साहात पार पडला धनगर समाजाचे सर्व नेते त्या दसरा मेळाव्याला उपस्थित होते. खरंतर हा दसरा मेळावा म्हणजे धनगर समाजाचे वैचारिक प्रबोधन तथा मंथन असल्याने तेथे एक कार्यकर्ता या नात्याने सर्व समाजबांधवांनी दसरा मेळाव्याला यावे असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी २०१७ मध्ये केले होते आणि सर्वांना निमंत्रण देखील दिले होते.  ३१ ऑगस्ट २०१८ रोजी देखील त्यांनी औरंगाबाद येथील "आरक्षणाचा अखेरचा लढा" या जाहीर सभेतून दसरा मेळावा आयोजित करत असल्याचे सांगत त्या दसरा मेळाव्याला सभामंचावर कोणत्याही नेत्यांसाठी अथवा पाहुण्यांसाठी खुर्ची ठेवली जाणार नाही तर समाजातील जो कोणी जेष्ठ तथा बुजुर्ग समाजबांधव उपस्थित असेल तो सदरच्या दसरा मेळाव्याचा अध्यक्ष असेल असेही जाहीर केले होते जसे औरंगाबाद येथील सभामंचावर उपस्थितांपैकीच एका बुजुर्ग व्यक्तीला बसवले होते कारण निमंत्रण देऊनही काही कारणास्तव आदरणीय आमदार गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख उपस्थित राहू शकले नव्हते. त्याचप्रमाणे आरेवाडीचा दसरा मेळावा त्याच प्रमाणे साजरा करायचा परंतु त्यामध्ये धनगर समाजाच्या हितासाठी जो ज्वलंत प्रश्न सध्या महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या भावनेचा विषय बनला आहे त्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे या विचाराचे सर्वजण सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत यात शंकाच नाही. परंतु ज्या तरूणाने पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी गुजरातमध्ये लढा पुकारला होता त्या मोर्चाचे नेतृत्व हार्दिक पटेल नावाचा एक तरुण पोरगा करत होता त्या हार्दिक पटेल ला जर धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यात बोलावलं म्हणजे याचा तसा अर्थ होत नाही की धनगर समाजाचे नेतृत्व हार्दिक पटेल करेल... धनगर समाजाचे नेतृत्व हे धनगर समाजातीलच पोरं करू शकतात. दुसरा तिसरा चौथा कोणी धनगर समाजाचे प्रश्न सोडवू शकत नाही कारण शेळ्या-मेंढ्यांची अर्थातच मुक्या जणावरांची तहान-भूक हा धनगरच जाणू शकतो. हार्दिक पटेल मुळे महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमांचे लक्ष आरेवाडीच्या दसरा मेळाव्याकडे केंद्रीत करण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर यांनी केला असावा. त्यामुळे आरेवाडीच्या दसरा मेळाव्याचे प्रक्षेपण, बातम्या अखंड देशभरातील टीव्ही चैनलवरती दिसतील त्यामुळे केंद्र अशी अपेक्षा त्यांना होती.
         मग माशी कुठे शिंकली कोणास ठाऊक? दरवर्षी प्रमाणे यंदा देखील परंतु त्यापेक्षाही अतिशय चांगल्या पद्धतीने दसरा मेळावा साजरा व्हायला हवा होता पण तसे झाले नाही. एकाच समाजाचे, एकाच दिवशी दोन दोन दसरा मेळावे होणे म्हणजेच सरळसरळ धनगरांच्याच अधोगतीचे लक्षण असल्याचे दिसून येते. यामागची कारणं शोधायला गेले तर सर्वप्रथम अहंकार हेच दोन्ही दसरा मेळाव्याचे सर्वात मोठे कारण आहे असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही. गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र राज्यातील नेत्यांना निमंत्रण न देता हार्दिक पटेल यालाच का निमंत्रण दिले? धनगर नेते महाराष्ट्रात नाहीत का? असा सूर सहजपणे मला ऐकायला मिळाला. यात गोपीचंद पडळकर यांचीच चुकी असल्याचे माजी आमदार प्रकाश (आण्णा) शेंडगे यांच्या समर्थकांनी मला सांगितले. तेव्हा मलाही वाटणे स्वाभाविकच होते की एक आयोजक नव्हे तर कार्यकर्ता या नात्याने गोपीचंद पडळकर साहेब यांनी सर्व धनगर नेत्यांना निमंत्रण द्यायला हवे होते. ती त्यांची चूक आहे परंतु औरंगाबाद येथील अखेरच्या आरक्षण लढ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आबासाहेबांना बोलावले होते परंतु ते आले नाहीत त्यामुळे कदाचित गोपीचंद पडळकर यांनी सर्व नेत्यांना वैयक्तिक निमंत्रण न देता अखंड धनगर समाजाला दसरा मेळाव्याला येण्याचे आवाहन केले असावे (त्यात नेते आलेच). दुसरीकडे धनगर समाजातील तर माजी मंत्री शिवाजी(बापू)शेंडगे यांचे सुपूत्र असलेल्या माजी आमदार प्रकाश (आण्णा) शेंडगे यांना राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वांनी उठवून बसवले असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर साहेबांच्या समर्थकांमधून होत आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांपूर्वी पासून त्यांना दसरा मेळावा आयोजित करता आला नाही का? २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावरच दुसरा मेळावा आयोजित करण्याचे सुचलेच कसे? असेही आरोप त्यांच्यावर केले जात आहेत.
       खरंतर दोघांवरही झालेले भयानक आरोप हे समाजाला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाणारे आहेत आणि सदरचा एकमेकांवर चिखलफेक करण्याचा जो प्रकार झाला त्यामुळे धनगर समाज इतरांपेक्षा अजूनही १०० वर्ष पाठीमागे असल्याचे समजायला फार वेळ लागत नाही. खरंतर एकमेकांवरती केलेल्या आरोपांचे खंडण करण्यासाठी माझा लेखप्रपंच नाही कारण दसरा मेळावा एकच व्हायला हवा या विचाराचा मी होतो आणि आजही आहे. परंतु कोणीतरी एक पाऊल मागे घेतले असते अथवा कोणीतरी दाखल्या बापाचे झाले असते आणि एकच मेळावा घेण्यासाठी प्रयत्न केले असते तर भविष्यात सर्वच धनगर नेत्यांना (एक-दोघांनाच नव्हे) मानसन्मान मिळाला असता. धनगर एकीचे बहुजन समाजातून कौतुक झाले असते. अथवा आमुक आमक्या नेत्याने मोठ्या मनानं समाज एकीकरणासाठी एक पाऊल माघारी घेतले म्हणून समाजातून त्याची वाहवा झाली असती पण माघारी घेणार कोण? तिथे प्रतिष्ठेचा विषय होता, अहंकाराचा प्रश्न होता. परंतु त्यापलीकडे जाऊन विचार करण्याची अथवा ऐकून घेण्याची सहनशीलता नसल्याने कोणीही माघारी घेतली नाही. त्याचा परिणाम येत्या निवडणूकीत दिसून येईलच आणि फटका एकदोघाला नाही तर अखंड धनगर समाजाला बसणार आहे.
       असो धनगरी जत्रा कारभारी सतरा ही म्हण सार्थ करून दाखवण्यासाठी जी चढाओढ लागली होती ती काय संपुष्टात येणार नाही असे दिसत आहे तरीही शक्य झाल्यास अजूनही प्रयत्न होऊ शकतात कारण एका रात्रीत विरोधकांची मतं फोडली जातात, ग्रामपंचायत सदस्य फोडले जातात एवढेच काय तर आमदार खासदार पण फोडले जातात मग धनगर समाजाच्या हिताचा निर्णय व्हावा असे जर खरोखरच वाटत असेल तर एकाच रक्ताची अन् हाडामांसाची आपण माणसं आहोत मग समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एकमेकांच्या हातात देऊन एकच दसरा मेळावा व्हायला हवा यासाठी का प्रयत्न करू नयेत? आजकाल सोशल मिडिया हे एक असे माध्यम आहे की एकच दसरा मेळावा म्हंटलं तर दहा मिनिटांत अख्ख्या महाराष्ट्राला हा एकीचा संदेश जाऊ शकतो आणि पेटलेले राजकारण संपुष्टात येऊ शकते हे मात्र नक्की...
असो तरीही सर्व धनगर समाजबांधवांनी आपल्या सर्वांचे आराध्यदैवत असलेल्या आरेवाडीच्या बिरोबा बनात येऊन विचाराचं, प्रबोधनाचं सोनं लुटून धनगर समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी हातभार लावावा व कोणावरही टीकाटिप्पणी न करता सामाजिक सलोखा राखावा ही नम्र विनंती...
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
   📧nitinrajeanuse123@gmail.com

Saturday 13 October 2018

शेवटी टीस चे भूत धनगरांच्याच मानगुटीवर, क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांचे स्वप्न अधुरे : ✍️नितीनराजे अनुसे

शेवटी टीस चे भूत धनगरांच्याच मानगुटीवर
क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांचे स्वप्न अधुरे
                 ✍️नितीनराजे अनुसे


          जंगल वनात, डोंगर-दऱ्या-खोऱ्यात, माळरानावर भटकंती करणारी धनगर जमात ही आदिम जमात आहे. आदिवासींपेक्षाही बिकट परिस्थीतीचे जगणे ही धनगर जमात जगत आहे. एकवेळ आदिवासी हे स्थायिक स्वरूपाचे जगणे जगताहेत परंतु धनगर ही जमात आज इथे तर उद्या तिथे, जिथे शेळ्या-मेंढ्यांना मुबलक प्रमाणात चारा-पाणी मिळेल तिकडे लेकराबाळाचं आणि करडा-कोकरांचं लटांबणं घेऊन, घोड्याच्या पाठीवर अर्ध्या आयुष्याचा संसार लादून, रात्र होईल तिथे मुक्काम करायचा, तीन दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करून पोटाची खळगी भरायची, रोजच्या रात्रीच्या रात्री विंचू-काट्यांच्या गराड्यात तर हिंस्र पशूंच्या सान्निध्यात घालवायच्या ही काही साधीसुधी गोष्ट नव्हे. तरीही पोटच्या पोरांसारख्या असलेल्या शेळ्या-मेंढ्यांचे संरक्षण करून रोजचा दिवस सारखा जगत आणि प्रत्येक दिवस पुढे ढकलत संघर्षात्मक जगणं जगायचं असे जीवन जगणारी धनगरांव्यतिरीक्त दुसरी तिसरी चौथी अशी कोणतीही जात अथवा जमात शोधूनही सापडणार नाही.
        मुळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी रात्रीच्या रात्री धनगरवाड्यावर घालवून, धनगरांच्या सान्निध्यात राहून भौगोलिक स्थितींचा अभ्यास करत जीवनमान, राहणीमान, चालीरीती, संस्कृती, लाजरे-बुजरेपणा जे काही अनुभवले त्या आधारे बाबासाहेबांनी धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये सामाविष्ट केले होते. परंतु धनगर या शब्दाचा  शब्दच्छल झाल्याने र चा ड झाला आणि धनगर जमातीवर गेल्या ७० वर्षांपासून एवढा प्रचंड अन्याय झाला की तेवढा अन्याय महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर अखंड भारतदेशातील कोणत्याही जमातीवर झाला नाही. धनगर जमातीचे गेल्या ७० वर्षामध्ये जे काही नुकसान झाले आहे ते पुढच्या १०० वर्षात देखील भरून निघणार नाही. तसे पाहायला गेले तर भटकंती पाचवीलाच पुजलेली असल्याने धनगर जमातीमध्ये शिक्षणाचे प्रमाण फारच कमी आहे. राज्यघटनेत झालेला सावळा गोंधळ लवकर लक्षात आला नाही. जेव्हा काही लोक शिकले सवरले तेव्हा हा राज्यघटनेतील सावळा गोंधळ काहीजणांच्या लक्षात आला मात्र झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी धनगर जमातीचे प्रतिनिधित्व करणारे म्हणावे असे नेतृत्वच नव्हते. सर्वप्रथम क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांनी याविरोधात आवाज उठवला मात्र शरद पवारांसारख्या प्रस्थापित नेत्यांनी धनगर समाजातील काही लोकांना सोबत घेऊन धनगर समाजाचे सक्षम  नेतृत्व होऊ पाहणाऱ्या क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेब यांची राजकीय हत्याच केली. धनगर समाजातील नेत्यांनी खरंतर अनुसूचित जमातीच्या सवलती मिळवण्यासाठी क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांना साथ द्यायला हवी होती परंतु तसे झाले नाही आजच्यासारखेच तेव्हाही मंत्रीपदाची स्वप्नं पाहणाऱ्यांनी धनगर समाजाच्या शत्रूंना साथ दिली ज्यांनी धनगर समाजाची मूळ मागणी लाथाडून धनगरांच्या पाठीत खंजीर खूपसला, माजी पंतप्रधान राजीव गांधींना सांगलीत बोलावून धनगर आरक्षणाचा ढोल बडवायला दिला आणि पदरात काय पडले तर अनुसूचित जमातीच्या सवलतींची मागणी असताना नव्यानेच वेगळी सुची बनवून धनगर जमातीला भटक्या जमाती क मध्ये घातले. त्यातही अनेक जाचक अटी होत्या वर्षातील नऊ महिने घरदार सोडून भटकंती करणाऱ्यांनाच प्रमाणपत्र देण्याची अट होती. पुढे क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांनी वारंवार आदोलने, मोर्चे करून ती अट सहा महिन्यांवरून तीन महिन्यांवर तर कालांतराने ती अट रद्द करायला लावली. क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेबांचा लढा हा अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी होता, त्या लढ्याला जर सर्व धनगर समाजाने आणि धनगर समाजातील नेत्यांनी एकत्रित येऊन एकमुठीने साथ दिली असती तर आजच्या आणि उद्याच्या पिढीला भीक मागायची गरज पडली नसती.
          खरंतर धनगर जमात ही अगोदरपासूनच अनुसूचित जमातीच्या यादीत आहे शिवाय महाराष्ट्र राज्यात धनगड नावाची जमात देखील आस्तित्वात नाही अन्यथा धनगर जमातीच्या मागणी विरोधात एक तरी धनगड रस्त्यावर आला असता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता परंतु जी जमात आस्तित्वातच नव्हती त्या जमातीमधील कोणी कसे पुढे येणार? राहिला प्रश्न TISS च्या अहवालाचा... तर त्याचे असे आहे की एखाद्या जातीला/जमातीला नव्यानेच अनुसूचित जातीच्या/जमातीच्या यादीत सामाविष्ट करायचे असल्यास संबंधित राज्य सरकार हे संबंधित शासकीय अथवा खाजगी सामाजिक संस्थांकडून अहवाल मागवू शकते. परंतु धनगर ही जमात अगोदरपासूनच अनुसूचित जमातीच्या यादीत असेल तर संबंधित राज्य सरकारने केंद्र सरकारला फक्त दोन ओळींचे शिफारस पत्र पाठवायचे आहे त्यासाठी पुढचे संदर्भ अभ्यासावे लागतील...
संसदीय वाद-विवाद राज्यसभा प्रतिवेदन दि २२ डिसेंबर  १९८९ हे भारत सरकार मार्फत प्रसिद्ध होणारे राज्यसभेचे प्रतिवेदन अभ्यासले तर कळेलच की राज्यसभेमध्ये खा. सुर्यकांता पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तत्कालीन  राज्यसभेचे  सभापति महोदय  रामविलास पासवान  यांनी सुद्धा कबूल केले होते की "राज्यघटनेत महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये  अ. क्र. ३६ वरती नमूद केलेली जमात ही धांगर अथवा धनगड नसून ती धनगर अशी आहे. महाराष्ट्र राज्यातील संबंधित धनगर समाजाला राज्यघटनेनूसार अनुसूचित जमातीच्या सवलती मिळायला हव्यात त्यासाठी राज्यसरकारने केंद्र सरकारला तसे शिफारस पत्र पाठवायला हवे." याशिवाय महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार दि १२ जुलै १९९६ व महाराष्ट्र शासन राजपत्र सोमवार दि १९ मार्च २००१ त्याचप्रमाणे जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००७-०८ व जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००९-१० या सर्व शासकीय राजपत्रांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमद्ये अ. क्र. ३६ वरती ओरॉन, धनगर असा स्पष्ट आणि शुद्ध उल्लेख आहे. परंतु आदिवासी विकास संस्था आणि आदिवासी मंत्रालय सांगते की  तो उल्लेख धनगड असा आहे आणि धनगड ही जमात आजही महाराष्ट्र राज्यात आहे. तर बुद्धि पाजळणारे पुण्यातील काही प्राध्यापक बरळतात की "धनगड जमात महाराष्ट्र राज्यात नसून नमूद केलेली जमात ही धनगर हीच आहे" असा धनगर समाजाचा दावा चुकीचा आहे. पुढे तेच दिडशहाणे स्पष्टीकरण देताना म्हणतात की 'पूर्वी महाराष्ट्र राज्यात धनगड ही जमात होती ती १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याचे विभाजन झाल्याने ती जमात मध्य प्रदेश मध्ये गेली त्यामुळे महाराष्ट्र राज्यात धनगड जमात सापडत नाही.'  मग त्या प्राध्यापकांना माझे सांगणे आहे की आदिवासी विकास संस्थेचा अहवाल तुम्ही वाचला आहे का नाही कोणास ठाऊक ज्यांच्या रेकॉर्डनूसार एका व्यक्तिपासून १० वर्षात ७० हजाराच्या वरती धनगड जमात तयार होते हे काय गौडबंगाल आहे?  अशी कोणती प्रजनन क्षमता असलेली विशेष जमात आहे.  बर १९६० साली जर धनगड जमात मध्यप्रदेशात गेली तर मग १९९६,  २००१, २००७-०८२००९-१० या शासकीय राजपत्रांमध्ये ओरॉन, धनगर हा उल्लेख कसा काय येतोय?   सरकार काय भांग पिऊन राज्यकारभार करतंय का? की त्या त्या विभागाचे सचिव दुधखुळे आहेत? जर खरंच धनगड ही जमात मध्य प्रदेशात गेली असेल अथवा नामशेष झाली असेल तर मग महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीसाठी जो काही कोट्यवधींचा शैक्षणिक, सामाजिक विकास निधी येतोय त्यामध्ये धनगर/धनगड जमातीसाठी सुद्धा निधी येत असेल तर मग गेल्या ७० वर्षापासून त्या  धनगर/धनगड जमातीच्या निधीचे नक्की काय झाले?  कोणाच्या घशात तो निधी गेला?  गेल्या ७० वर्षापासून आजपर्यंत आदिवासी विकास मंत्रालय विभागातील सर्व आजी/माजी मंत्र्यांची आणि आयुक्तांची यादी काढून (जे हयात आहेत) त्यांना जाब विचारला तर सत्य बाहेर पडेल. आणि जर खरंच धनगड जमात महाराष्ट्र राज्यात असेल तर धनगर समाज आपली मागणी माघारी घेईल नसेल तर संबंधित आदिवासी विकास संस्था, आदिवासी विकास मंत्रालय आणि धनगर समाजाची फसवणूक करणाऱ्या आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांवरती देशद्रोहाचा खटला धनगर समाजाच्या वतीने दाखल करण्यात येईल. कारण थोर समाजसुधारक अब्राहम लिंकन म्हणतात की "लोकांनी लोकांच्या हीतासाठी, लोकांकरीता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय."  मग लोकशाहीत एखाद्या जमातीवर वर्षानुवर्ष विनाकारण अन्याय अत्याचार होत असेल,  एखाद्या जमातीला ७० वर्ष न्याय मिळत नसेल तर त्या त्या राज्याचा प्रतिनिधी त्यासाठी जबाबदार ठरतो. म्हणुन आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांवरती देशद्रोहाचा खटला दाखल करायला हवा.
     आज गोपीचंद पडळकर साहेब आणि उत्तमराव जानकर साहेब यांनी राज्यभर 'अखेरचा लढा आरक्षणाचा' हा राज्यव्यापी लढा पुकारला आहे त्यापाठीमागे त्यांचे राजकारण नक्कीच आहे आणि असायला हवे, सर्व धनगर नेत्यांनी मिळून स्वतः देखील मोठे व्हावे आणि समाजाला देखील न्याय मिळवून द्यावा. तसंही धुतल्या तांदळासारखा कोणताच धनगर नेता सोज्वळ आणि निस्वार्थी नाही. असो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो परंतु आज समाजातील सर्व स्थरातून आरक्षणाच्या अखेरच्या लढ्याचे स्वागत होत आहे मात्र आजच्या धनगर नेत्यांची भुमिका पाहून एकाच गोष्टीची भिती वाटते आणि राहून राहून एकच प्रश्न डोक्यात गोंधळ उडवून जातोय की धनगरांच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या, लढणाऱ्या तथा धडपडणाऱ्या पडळकरांचा आणि जानकरांचा पुन्हा बी के कोकरे तर होणार नाही ना?
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
   📧nitinrajeanuse123@gmail.com

Sunday 7 October 2018

धनगर नेत्यांनो एक व्हा, तुमाला बिरूबाची आण हाय।। ✍️नितीनराजे अनुसे

शेळ्या-मेंढ्या राखतू आमी
ही आम्हा धनगरांची ओळख हाय
रातंदिस भटकतू आमी
पण पायाला आमच्या पाय नाय
धनगर नेत्यांनो एक व्हा
तुमाला बिरूबाची आण हाय ।।
पोटाची खळगी बडवतू आमी
लेकरा-बाळाला साळत घालाय
आज हिथं तर उद्या तिथं
जगणंच आमचं असं हाय
धनगर नेत्यांनो एक व्हा
तुमाला बिरूबाची आण हाय ।।
येगयेगळ्या चुली मांडून
संसार करणं तसं बरं नाय
काय बी झालं तरी
आपली अहिल्याई एकच माय
धनगर नेत्यांनो एक व्हा
तुमाला बिरूबाची आण हाय।।
राजकारण करा समाजकारण करा
आमी तुमच्या सोबत हाय
पण मोठ्या मनानं कमीपणा घ्या
त्यातच समाजाचं भलं हाय
धनगर नेत्यांनो एक व्हा
तुमाला बिरूबाची आण हाय।।
तुमाला बिरूबाची आण हाय।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123