Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Wednesday 25 November 2015

आरक्षण एक घटनादत्त अधिकार...

आरक्षण घटनादत्त अधिकार
आरक्षण म्हटलं की आजकाल काही लोक सनातनी आणि बाजारबुणग्या  बांडगुळांचे ऐकूण लंगड्यासाठी जशा कुबड्या असतात जणू तसाच काहीसा अर्थ काढतात आणि उगंच काहीतरी वाचाळ बडबड करत बसतात. आरक्षण म्हणजे समाजाच्या विकासासाठी वापरल्या जाणार्या कुबड्या नसून भारतीय राज्यघटनेत समाजव्यवस्थेतील प्रत्येक जाती/जमातीला दिलेला घटनादत्त अधिकार आहे ही भावना सर्वांमध्ये रुजायला हवी. यासाठी भारतीय संविधानाची ओळख असणे फार गरजेचे आहे. खरंतर आरक्षणाची सुरवात ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून झाली नाही तर स्वातंत्र्यपूर्व काळात १८९३ मध्ये आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या छत्रपति राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरवात केली होती. त्याकाळी ब्राह्मणेत्तर मागासवर्गीयांना त्यांनी शिक्षण, शिष्यवृत्ती, नोकरी अशा विवीध क्षेत्रामध्ये ५०% आरक्षण लागू केले होते.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ९ मे १९१६ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात "बाबासाहेब डॉ.अम्बेडकर वाङमय" नावाचा प्रबंध सादर केला होता. त्या वाङमय मधील खंड क्र.१ मध्ये "भारत में जातिप्रथा, संरचना, उत्पत्ति और विकास" या भागात पृष्ठ क्र २३४ आणि २३५ वरती सर्व जाती जमातींचा लोकसंख्येसह उल्लेख केलेला आहे. कोल्हापुरचे राजे छत्रपति राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षण पद्धत लागू केल्याने भारतीय समाजव्यवस्थेमध्ये झालेला बदल लक्ष्यात घेऊन तसेच अन्य देशातील संविधानांचा अभ्यास करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहली आणि भारतीय समाजव्यवस्थेचे चार वर्ग करुन त्या त्या वर्गाला लोकसंख्येच्या तसेच सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर आणि निकषावर भारतीय राज्यघटनेत समाजव्यवस्थेचे १)खुला वर्ग २)इतर मागास वर्ग ३)अनुसुचित जाती ४)अनुसुचित जमाती असे एकूण चार वर्ग करून सर्वांना त्या त्या निकषावर आरक्षण लागू केले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय राज्यघटना १९५० साली आमलात आली. तिथून पुढे देशाचा राज्यकारभार अगदी सुरळितपणे चालू लागला पण धनगर समाजावर मात्र फार मोठा अन्याय झाला. भारतीय राज्यघटनेमध्ये अनुसुचित जमातीच्या कलम क्र ३४२ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्ठात अ.क्र.३६ वरती ओरॉन,धनगर ऐवजी ओरॉन, धनगड असा उल्लेख झाल्याने गेल्या ६५ वर्षापासून हा धनगर समाज अन्याय सहन करतोय. "धनगर" चा "धनगड" अर्थात "र" चा "ड" झाल्यामुळे सगळा राडा झाला आहे असे म्हणायला मला काही वावगं वाटणार नाही. खरंतर राज्यघटनेत उल्लेख केल्याप्रमाणे धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात कोठेही आढळून येत नाही, या जमातीची एकही व्यक्ति नाही त्यांचा इतिहास सुद्धा नाही हे बाबासाहेब डॉ अंम्बेडकर या वाङमयावरून सिद्ध होते आहे. याशिवाय ज्या ज्या वेळी धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी रस्त्यावर उतरला तेव्हा धनगड नावाच्या जमातीचा एकही व्यक्ति धनगर समाजाच्या विरोधात रस्त्यावर आला नाही. जर "धनगड" नावाच्या जमातीचा एक जरी व्यक्ति रस्त्यावर उतरला असता तर "धनगर" समाजाने अनुसुचित जमातीची अंमलबजावणीबाबत मागणी केलीच नसती.
सन १९५० साली राज्यघटना आमलात आणल्यापासून आज २०१५ पर्यंत जवळ जवळ ६५ होऊन गेली तरी अनुसुचित जमातीच्या यादीमधील  या धनगर समाजाच्या नावे येणारा करोडो रूपयांचा वार्षिक विकास निधी मग शैक्षणिक निधी असो अथवा सामाजिक निधी तो धनगर समाजापर्यंत पोहचलाच नाही. प्रस्तापित नेते आणि आदीवाशी मंत्री यांनी हा निधी लाटायचं काम केले. कधीकधी हा निधी वापरला न गेल्याने जसाच्या तसा सरकार दरबारी परत गेला आणि धनगर समाजाच्या वाट्याला मात्र पाचवीलाच पुजलेली भटकंती आली केवढी मोठी ही शोकांतिका.
संसदीय वाद-विवाद "राज्य सभा" अधिकारीय प्रतिवेदन २२ डिसेंबर १९८९ भारत सरकार मार्फत प्रकाशित होणारे हे प्रतिवेदन अभ्यासले तर कळेल की राज्य सभेमध्ये खा.सुर्यकांता पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना तत्कालीन राज्यसभेचे सभापती रामविलास पासवान यांनी सुद्धा कबूल केले होते की राज्यघटनेत नमूद केलेली जमात ही "धनगड" अथवा "धांगड" नसून ती धनगर हीच जमात आहे. संबधित धनगर जमातीला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळायला हव्यात यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला फक्त  एक शिफारस पत्र पाठवण्याची आवश्यकता आहे. याशिवाय महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार १२ जुलै १९९६ व महाराष्ट्र शासन राजपत्र सोमवार १९ मार्च २००१, त्याचप्रमाणे जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००७-०८ व जनजातीय कार्य मंत्रालय भारत सरकार २००९-१० या सर्व महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या राजपत्रामध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वर ओरॉन, धनगर असा स्पष्ट उल्लेख सुद्धा आहे.
तद्नंतर १९८९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारला अशी कोणतीही शिफारस न पाठवता धनगर समाजावर अन्यायाची टांगती तलवार ठेवली. कारण जर धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू केल्या तर महाराष्ट्र राज्यातील अनेक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ धनगर समाजासाठी राखीव होतील त्यामुळे प्रस्थापित नेत्यांचे धनगर समाजाच्या जीवावर पोट भरण्याचे धंदे बंद पडतील अर्थातच त्यांचे भवितव्य धोक्यात येईल. याशिवाय महाराष्ट्र राज्यातील एकूण विधानसभा मतदारसंघापैकी १४६ मतदारसंघामध्ये धनगर समाजाचे मताधिक्य जास्त आहे आणि धनगर समाजानं जर मनात घेतलं तर राज्याचा मुख्यमंत्री धनगर समाजाचा होऊ शकतो हे त्रिकालबाधित सत्य आहे असे म्हटलं तरी हरकत नाही. पण धनगर समाजातील अज्ञानामुळे या गोष्टी धनगर समाजाला माहीत नाहीत. आज राज्यातील जनगननेच्या उपक्रमामध्ये जनावरांची जनगनना होते पण धनगर समाजाची जनगनना होत नाही. जर धनगर समाजाची जनगनना झाली तर राज्यातच नव्हे तर भारतातील एक नंबरची लोकसंख्या फक्त धनगर समाजाची असेल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजातील आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणाचा विचार करून सर्वांना समानतेने वागणूक मिळावी या उद्देशाने आरक्षणाची अंमलबजावणी केली होती. पण केवळ शब्दच्छल झाल्याने धनगर समाजावार फार मोठा अन्याय झाला. धनगर समाजाला पुर्वीपासूनच सवलतींचा लाभ झाला असता तर आज धनगर समाजातील मुले-मुली आय ए एस, आय पी एस, आय एफ एस, तहसीलदार, डॉक्टर, इंजिनीयर, वकिल झाली असती. राजकारणाचा विचार केला असता तर केंद्रात आणि राज्यात कमीत कमी १० ते १२  कैबिनेटमंत्री  व राज्यमंत्री असते. अर्थात भारताच्या राजकारणात आणि प्रशासनात धनगर समाजाची पोरं चमकली असती. उद्योग, व्यापार, नोकरी या क्षेत्रात धनगर समाजाची पोरं उठून दिसली असती, भारताचं प्रशासन धनगर समाजाच्या ताब्यात असतं हे नाकारू शकत नाही. पण प्रस्तापीत व्यवस्थेला हे मान्य नव्हते. केवळ "र" चा "ड" झाल्याने किती मोठा राडा झाला आहे याचा नुसता  विचार जरी केला तर तळपायाची आग मस्तकापर्यंत जाते मग डोक्यात विचारांचे थैमान माजले जाते आणि नकळत शब्द बाहेर पडतात की जर आमचा समाज अज्ञानाच्या आणि सनातनी व भोंदूबाबांच्या विळख्यात सापडला नसता तर या देशावर पुन्हा एकदा आम्हीच राज्य केलं असतं.
आरक्षणाच्या लढाईसाठी यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांनी डिसेंबर १९८९ मध्ये सातारा-पुणे महामार्गावर लाखो यशवंत सैनिकांच्या उपस्थितीमध्ये तीव्र रास्तारोखो करून तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या नाकात दम ठोकला होता. बारामतीमधूनच तयार झालेला स्व.बी.के.कोकरे साहेबांचा झंजावात आणि दबदबा पाहून शरद पवारांनी संभाव्य धोका ओळखला आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या धनगर समाजातीलच स्व शिवाजी बापू शेंडगे यांना पुढे करून सांगली मध्ये २१ जानेवारी १९९० रोजी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा ढोल पवारांनी बडवला व २३ मे १९९० रोजी धनगर समाजाची मुळ मागणी लाथाडून राजकीय कपटाच्या दृष्टीने पवारांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती देण्याऐवजी भटक्या जमाती (क) च्या वेगळ्या यादीमध्ये धनगर समाजाचा सामावेश केला.
धनगर समाजाला भटक्या जमाती (क) मध्ये सामाविष्ट करून ३.५% आरक्षण लागू केले ते फक्त महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादितच. पण केंद्रातील अनुसुचित जमातीच्या सवलती डावलून महाराष्ट्र राज्यापुरत्या सवलती लागू केल्याने धनगर समाजातील विद्यार्थ्यांना लोकसेवा परिक्षेसाठी तसेच राज्याबाहेरील परीक्षेसाठी नोकरीसाठी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागते. लोकसंख्येच्या मानाने १६ ते १७% धनगर समाजाला लोकसंख्येच्या निमपट म्हणजे ५०% च्या हिशोबाने किमान ८% आरक्षण हवे असताना भ.ज.(क) मध्ये ३.५% आक्षण देऊन उर्वरित ५६.२५% धनगर समाजावर उपासमारीची वेळ आणायचे काम प्रस्तापित व्यवस्थेने केले. याच कारणामुळे धनगर समाजातील हजारो पोरं आय ए एस, आय पी एस होण्यापासून वंचित राहिली आणि पारंपरिक शेळ्या मेंढ्या व सोबत शेतीचा जोडधंदा हे व्यवसाय करू लागली.
आज धनगर समाज आरक्षण या मुद्द्यावर चांगलाच पेटून उठला असला तरी सत्ताधारी पक्ष आणि प्रस्तापित व्यवस्थेला हे होऊ द्यायचे नाही. धनगर समाजातील ज्या काही संघटना, चळवळी आरक्षणाच्या मुद्द्यावरती पुढे येतील त्यांच्यामध्ये फुट पाडण्याचे काम प्रस्तापित व्यवस्था चोखपणे बजावत आहे. पण माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाच्या मात्र हे लक्षात सुद्धा येत नाही ही फार दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. सुशिक्षीत आणि सुज्ञ बुद्धीजीवी वर्ग यासाठी प्राणपणाने पोटतिडकीने आणि तळमळीने कार्य करताहेत त्यासाठी समाजातील तरुण युवकांनी सामाजिक बांधीलकी जोपासत बुद्धीजीवी वर्गासोबत राहून  रस्त्यावरची त्याचप्रमाणे न्यायालयीन लढाईसाठी हातभार लावावा तरच उद्याची पीढीला अशा अन्यायांना सामोरे जावे लागणार नाही, अन्यथा उद्याची पीढी आपल्या तोंडात शेण घालेल यासाठी गाफील न राहता सर्वांनी सक्रीय होऊन खारीचा वाटा उचलला तर आरक्षणाची अंमलबजावणी काही दूर नाही हे मात्र निश्चित. धनगर समाज कोणाच्या खिशातले मागत नाही तर स्वताच्या हक्काचे मागतोय हे जोपर्यंत सरकारच्या आणि प्रस्थापितांच्या कानठाळीत मारून आरक्षणाची अमलबजावणी व्हावी असे त्यांच्या डोक्यात आपण घालत नाही तोपर्यंत आपला कोणीही विचार करणार नाही. त्यासाठी एक व्हा आणि नेक व्हा.
उठ धनगरा जागा हो। आरक्षणाचा धागा हो।
जय मल्हार!! जय अहिल्या!! जय यशवंत!!
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday 19 November 2015

येळकोट येळकोट जय मल्हार

मल्हाररावांचे मर्द मावळे आम्ही,
महाराणी अहिल्यामाईचे भक्त।

नसानसात सळसळतंय आमच्या,
शुरवीर यशवंतरावांचेच रक्त।

भिडतात तलवारीला तलवारी तेव्हा,
दुश्मनांना आम्ही रणांगणातच कापतो।

कारण लाव्हारस आमच्या रक्तातला,
आजही तसाच उफाळतो।

पोलादी छातीवरती झेलतो आम्ही,
तीक्ष्ण तलवारीचे वार।

कपाळी भंडारा लेवून गरजतो,
येळकोट येळकोट जय मल्हार।

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday 13 November 2015

समाजबांधवांनो प्रवाहात सामील व्हा...


ज्या प्रमाणे कडक उन्हाळ्यानंतर वळव्याच्या पावसाचे वातावरण तयार होते अचानक आकाशात ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट सुरू होतो शांतप्रीय वातावरण दुभंगून जाते जिकडे तिकडे आहाकार माजतो आणि हळूच पावसाचे थेंब एकेक करून जमिनीवरती कोसळू लागतात, ऊनाने तापलेली माती पावसाच्या थेंबाच्या स्पर्शाने हवेत सुगंध पसरवते. वातावरण अगदी त्या मातीच्या सुगंधाने दरवळून जाते आणि मनाला सुखद आणि विलक्षण आनंद देऊन जाते.
 मग पावसाचे पडलेले थेंब हळू हळू एकत्रित येतात, तिथे मोठा पाण्याचा साठा तयार होतो. जमिनीवरती एकत्रित झालेले पाणी उताराकडच्या दिशेने वाहायला लागते. त्याचा एक छोटासा प्रवाह तयार होतो. असे अनेक छोटे मोठे प्रवाह ओढ्या-वगळीकडच्या दिशेने वाहू लागतात आणि शेवटी नाले, विहरी, तलाव तुडूंब भरून जातात. हा प्रवाह असाच पुढे गेला तर नदी देखिल ओसांडून वाहू लागते तो प्रवाह साधा सुधा नसतो तर कधी कधी त्या नदीच्या पाण्याला अडवण्यासाठी बांधलेले बंदारे देखिल प्रवाहाबरोबर वाहून जातात आणि सरतेशेवटी तो प्रवाह समुद्राला जाऊन मिळतो. तिथेपण त्या प्रवाहाचे पाणी कधी शांत नसते कधी भरती तर कधी ओहोटी. कधी मोठाल्या लाटा धपकण किणार्यावर आदळतात तर कधी कधी कित्येक जहाजे आणि जीव सागरामध्ये गुडुप होऊन जातात.
आज धनगर समाजाला देखिल अशाच तीव्र प्रवाहाची गरज भासतेय. तो प्रवाह दुसरा तिसरा कोणता नसून स्वताच्या संसाराची राखरांगोळी करून स्व बी के कोकरे साहेबांनी स्थापण केलेली आक्रमक संघटना म्हणजेच एक आक्रमक प्रवाह तो म्हणजे यशवंत सेनेचा. यशवंत सेनेच्या सुरवातीला सर्वात अगोदर पावसाच्या थेंबा थेंबा प्रमाणे समाजबांधवांना एकत्रित केले. शेतीच्या मशागतीसारखी समाजबांधवांची डोकी नांगरून त्यामध्ये अन्याय व अत्याचाराच्या विरोधात पेटून उठण्याचे "प्रबोधन"रूपी बियाणे पेरले गेले. निद्रावस्थेत झोपी गेलेला धनगर समाजातील यूवा वर्ग कडाडून जागा झाला. आज एक एक करून सर्व एकत्रित येऊ लागले त्याचा एक प्रवाह तयार झाला. अनेक छोटे मोठे प्रवाह एकत्रित आल्यानंतर त्यातूनच एक भले मोठे संघटन उभे राहीले होते. हळू हळू तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्र पातळीवर हे संघटन आणि संघटनेतील यशवंत सैनिक आक्रमकपणे, निस्वार्थीपणे समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढू लागले.
ज्याप्रमाणे पाणी आडवण्यासाठी बांधलेला बंदारा एखाद्या तीव्र प्रवाहासमोर गुडघे टेकतो त्याला भेगा पडतात त्याचप्रमाणे स्व बी के कोकरे साहेबांच्या विचारधारेवरती चालणारी यशवंत सेना हा एक तीव्र प्रवाह आहे आणि या प्रवाहासमोर प्रस्तापीत यंत्रणा गुडघे टेकायला भाग पडेल पण त्यासाठी आपली आक्रमकता, तीव्रता, जिद्ध व चिकाटी महत्वाची आहे. समाजात एकी होणे गरजेचे आहे. कारण एकीचे बळ ही कथा तुम्हा-आम्हाला माहीतच आहे. स्व बी के कोकरे साहेबांची यशवंत सेना आज मुंबईमधून चालू झाली अनेक जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते तयार झाले अन् कामालाही लागले. यशवंत सरसेनापती मा.माधव (भाऊ) गडदे यांच्या नेतृत्वाखाली  आजचा युवा वर्ग एकत्रित येतोय. यासाठी समाजातील समाजबांधवांनी तसेच छोट्या मोठ्या संघटनांनी यशवंत सेनेच्या या तीव्र आणि आक्रमक प्रवाहात सामील झाल्यास समाजचे ध्येय फार दूर नसेल. आज समाजात अनेक छोट्या मोठ्या संघटना आहेत आणि संघटना त्या त्या संस्थापकांच्या मालकीच्या असल्या तरी संघटनांनी एकमेकांसी सहाय्य करून चालल्यास प्रस्तापितांना सळो की पळो करू शकतो. यासाठी एक प्रवाह असणे गरजेचे आहे म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की समाजबांधवांनी सामाजिक बांधीलकी जोपासून मी समाजाचे काहीतरी देणं लागतो, मला समाजासाठी काहीतरी करायचे आहे असा प्रत्येकाने विचार करायला हवा आणि एका तीव्र प्रवाहात सामील व्हायला हवे.
एक व्हा समाजासाठी नेक व्हा.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday 3 November 2015

धनगर नेत्यांचे भविष्य धोक्यात येणार...


गेल्या ६५ वर्षापासून माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजावर अन्याय होत आलेला आहे. भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या ३४२ कलम वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्ठात अ.क्र.३६ वरती धनगड(धनगर), ओरॉन  असा उल्लेख करुन डॉ. बाबासाहेबांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत अगोदरच स्माविष्ट केलेले आहे. पण "धनगर" (Dhangar) या शब्दाचे चे हिंदी टायपींग "धनगड"(Dhangar) {जसे की उदा.१) एकरAcre चे हिंदीमध्ये एकड, २)गुरगाव Gurgaon चे गुडगाव, ३) रेवारी Rewari चे रेवाडी} त्याचप्रमाणे "धनगर" चे "धनगड" असे झाल्याने महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित रहावे लागले अर्थातच आमच्या अज्ञानपणामुळे आमच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे. एखाद्या समाजावरती विनाकारण अन्याय होत असेल तर संबंधितांवर देशद्रोहाचा खटला भरायला हवा.
आज महाराष्ट्र राज्यातील अल्पांशीच धनगर समाज सुज्ञ आणि सुशिक्षित झाल्याने आमची खरी मागणी काय आहे याचे भान समाजातील काही नेत्यांना व समाजबांधवांना नाहीये. आम्ही नवीन आरक्षण मागतोय किंवा आम्हाला सामाविष्ट करा ही आमची मागणी नाही तर राज्यघटनेत आम्हाला दिलेलं आमच्या हक्काचं अनुसुचित जमातीच्या आरक्षण आणि अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात ही आमची मागणी आहे.

धनगर समाजातील नेत्यांचे भविष्य धोक्यात कसे काय येणार...????
तर दि ७ डिसेंबर २०१५ पासून नागपूर विधानभवनात हिवाळी अधिवेशनाची सुरवात होणार असून धनगर समाजातील नेत्यांनी नागपूर विधानभवनावर वेगवेगळे मोर्चे आयोजित कलेले आहेत. खरंतर सर्वांची मागणी एकच आहे मग मोर्चे वेगवेगळे का?? समाजबांधवांनी नक्की कोणत्या मोर्चात सहभागी व्हायचं?? का कोणत्याच मोर्चात सहभागी व्हायचं नाही. अशा संभ्रमावस्थेत असणार्या तळागळातील धनगर समाजबांधवांकडून मी प्रतिक्रीया मागून घेतल्या होत्या. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून दोन हजारपेक्षा जास्त प्रतिक्रीया मिळाल्या त्यान्वये त्याची टक्केवारी खालीलप्रमाणे
१) ९३.७५ %
समाजातील नेत्यांनी एकत्रित येवून चर्चा करावी. एकच दिवस व एकच तारीख निश्चित करून संघटितपणे मोर्चा काढला तरच आम्ही मोर्चात सहभागी होणार. अन्यथा कोणत्याही मोर्चात सहभागी होणार नाही. विचारवंत आणि समाजप्रबोधकांवर विश्वास असून बुद्धिजीवी वर्ग जो निर्णय घेईल त्यास सहमत असल्याचे समाजबांधवांनी आपापले मत स्पष्ट केले.

२) २.२५%
डॉ. विकास महात्मे सर यांनी अगोदर आयोजित केलेला  मोर्चा असून दि ८ डिसेंबर रोजीच्या मोर्चात सहभागी होणार. पण या २.२५% मधील बहुतांशी समाजबांधवांनी प्रतिक्रीया दीली की नेत्यांपेक्षा समाजप्रबोधकांवर विश्वास असून बुद्धिजीवी वर्ग जो निर्णय घेईल तसे आम्ही करु.

३) २ %
डॉ. महात्मे सर यांनी स्वताचेच नाव पुढे करून इतरांना काहीही न विचारता मोर्चाचा दिवस ठरवल्याने माजी आ.हरिदास भदे साहेब आणि सहकारी यांनी १० डिसेंबर चा मोर्चा आयोजित केला त्यामध्ये सहभागी होणार. या २ % मधीलसुद्धा अधिकतम समाजबांधवांनी नेत्यांपेक्षा समाजप्रबोधकांवर विश्वास असून बुद्धिजीवी वर्ग जो निर्णय घेईल तसे आम्ही करु असे मत स्पष्ट केले.
४) १.५० %
समाजबांधवांचा महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण कृति समितीसोबत मोर्चात सहभागी व्हायला हवे असे सांगितले.
५)  .५०%
मोर्चा काढून आरक्षण मिळेल असे वाटत नाही तर त्यासाठी कोर्टाची लढाई लढावी लागेल.
सदरची टक्केवारी ही २१०० ते २२०० समाजबांधवांनी व्हाटसप, मेसेजेस त्याचप्रमाणे कॉल करुन दिलेल्या या प्रतीक्रीया आहेत.
समाजातील सर्वच नेते मला जवळचे आहेत त्यात कोणी आपला परका असा भेदभाव केला जाणार नाही पण कोणत्याही एखाद्या नेत्याच्या विरोधात अथवा टिकात्मक बोलून अथवा लिहून माझ्याच समाजात फूट पाडावी असं सर्व बुद्धिजीवी वर्गाचं उद्दीष्ट नाही तर राजकारण, आमदारक्या स्वार्थ, मोठेपणा आणि उफाळलेला आरक्षण संदर्भातला श्रेयवाद या गौन गोष्टी बाजूला ठेऊन कमित कमी आरक्षण या मुद्द्यावरती धनगर समाजातील नेत्यांनी एकत्रित यावे. अन्यथा वेगवेगळे मोर्चे जर नागपूर विधानभवनावर घेऊन जात असाल तर आपलंच हसू होईल. कारण आजचे ९३.७५% नव्हे तर उद्याचे ९६-९७ % समाजबांधव वेगवेगळ्या मोर्चात सहभागी होणार नाहीत.  जर मोर्चा सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांसोबत  चर्चा करून संघटितपणे मोर्चा आयोजित करून एकच दिवस निश्चित केला तर २५००००० पंचवीस लाखांच्या वरती समाजबांधव नागपूरला एकत्रित येवून प्रशासन तसेच विधानभवन हादरवून टाकतील एवढी ताकत आपल्या समाजबांधवांमध्ये आहे. २५००००० यापेक्षाही जास्त समाजबांधव नागपूरला एकत्रित आणायची जबाबदारी माझी राहील.
पण जर वेगवेगळे मोर्चे काढून राज्यभरातील फक्त हजार दीड हजारच समाजबांधव तुमच्यामागे आला तर २०१९च्या विधानसभा निवडणूकीत आपल्या समाजाचं तर सोडाच पण इतर समाजबांधवांकडे तुम्ही काय म्हणून मत मागायला जाणार?? तुमचाच समाजबांधव तुमच्या पाठीशी नाही राहिला तर मग काही इज्जत राहील का??? त्यासाठी एकत्रित येऊन योग्य विचारविनीमय करुन एकच मोर्चा एकाच आयोजित केला तर महाराष्ट्रातील धनगर समाज तुमच्यासोबत राहील अन्यथा धनगर समाजातील नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येईल. याचा विचार सर्वांनी करायला हवा.
जय मौर्य!! जय मल्हार!! जय अहिल्या!!

           👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

समाजप्रबोधनाचे बीज... ✍️नितीनराजे अनुसे

       
        अज्ञानाचं घोंगडं पांघरुण निद्रावस्थेत गाढ झोपी गेलेल्या माझ्या धनगर समाजाला खरोखरंच आज प्रबोधनाची गरज आहे. ज्या प्रमाणे शेताची नांगरणी करून मशागत करून त्यामध्ये बियाणे पेरले जातात आणि त्याला वेळेवर खतपाणी घातले तरच पिक जोमाने वाढते आणि भरभरून उत्पन्न/धान्य मिळते. त्याचप्रमाणे आजच्या सनातन्यांच्या नादाला लागलेल्या, भोळ्या-भाबड्या आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्या, प्रस्थापितांच्या अन्याय अत्याचाराखाली खचलेल्या पिचलेल्या माझ्या धनगर समाजबांधवांची सर्वप्रथमता डोकी नांगरून त्यामद्ये समाजहीताचे बियाणे (बीज) पेरले आणि समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराची जाणीव करून देत त्यास समाज प्रबोधनाचे खतपाणी घातले तर उद्या माझ्या याच समाजातून अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारे, समाजप्रबोधन करणारे लाखो धनगर समाजबांधव तयार होतील. तरच धनगर समाज हा प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल. सत्ताकारणात, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये धनगर समाजाची पोरं चमकतील हे सांगायला कोणा विद्वानाची गरज नसावी. म्हणूनच समाजहीताचे विचार पेरत चला त्यातून समाजहीताचेच विचार उगवतील. इतिहासाला साक्षी ठेवून आजच्या अंधकारातून, बिकट परिस्थितीतून वाट काढत निघालो तर उद्या नक्कीच आपण प्रकाशाकडे पोहचू...
जय मल्हार!! जय अहिल्या!! जय यशवंत!!
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +918530004123
nitinrajeanuse123.blogspot.com