Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday 25 April 2019

इतिहासाची छेडछाड कराल तर याद राखा... ✍नितीनराजे अनुसे


पानिपतचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना नितीनराजे अनुसे यांचे पत्र          
प्रति,
आशुतोष गोवारीकर
(चित्रपट दिग्दर्शक,
निर्माते, लेखक
एवं अभिनेते)

          विषय :- पानिपत या चित्रपटात मराठ्यांच्या इतिहासचे विद्रुपीकरण करून थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या भूमिकेबद्दल अपरिहार्य लेखन(स्क्रिप्ट)/चित्रीकरण करत असल्याबद्दल...

आदरणीय सर,
          तुम्ही फार मोठे दिग्दर्शक आहात त्याशिवाय निर्माते,अभिनेते आणि एक लेखक सुद्धा आहात. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका मराठी कुटुंबातील तुमचा जन्म, शिवाय एक मराठी भाषिक असल्याने माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठी माणसाला तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलायला काहीच हरकत नाही. अर्थातच सदरचे पत्र पाठवत आहे त्यामागच्या आमच्या भावना तुम्ही नक्कीच समजून घ्याल.
         वरील उपरोक्त विषयास अनुसरून तुम्ही "पानिपत" हा चित्रपट प्रदर्शित करणार आहात असे समजले आणि त्या चित्रपटासाठी संदर्भ म्हणून तुम्ही ज्या अविश्वसनीय साधनांचा म्हणजेच विश्वास पाटील यांची "पानिपत" ही कादंबरी आणि "भाऊसाहेबांची बखर" याचा आधार घेऊन चित्रपट निर्मिती करत आहात. चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत आमचे काहीच दूमत नाही. कारण १४ जानेवारी १७६१ रोजी ऐन संक्रांतीच्या दिवशी जे पानिपत घडले त्या पानिपतमध्ये महाराष्ट्रातील लाखों कुटुंबावर संक्रांत कोसळली होती. प्रत्येक माजघरातला कुंकवाचा करंड पानिपतावर लवंडला होता. जेव्हा शत्रु चाल करून येतो तेव्हा राष्ट्रसंकट उद्भवल्यावर शत्रुंशी लढायचे कसे? शत्रुंना भिडायचे कसे? याचा धडा ज्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी गिरवला त्या युद्धात महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला वीर कोसळला होता ती रक्ताने माखलेली पानिपतची माती पवित्र होऊन त्याचे आज पवित्र भस्मात रूपांतर झाले आहे. ऐन संक्रांतीदिवशी अफगाणिस्तानचा घुसखोर अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्याण १४ जानेवारी १७६१ ला झालेले पानिपत सारखे युद्ध त्यागोदर आणि त्यानंतरही कधीच इतिहासात घडले नाही. मध्यमयुगाच्या कालखंडात सकाळी नऊ वाजलेपासून ते सायंकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत एकाच दिवसाच्या अल्पावधीत असं आक्राळवीक्राळ, भयंकर, घनघोर, जीवघेणं युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही फौजांची दीड लाख माणसं आणि ऐंशी हजार जणावरं मेल्याचे दुसरे उदाहरण कोणते नाही.
       त्यामुळे तुम्ही चित्रपट निर्मीतीचा घेतलेला निर्णय हा खरंतर कौतुकास्पद असला तरी ज्या कादंबरीचा आणि बखरीचा संदर्भ तुम्ही घेतला आहे त्यामध्ये अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य अबाधित राखणाऱ्या लढवय्यावरती अर्थातच थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावरती नाहक आरोप केले आहेत. तीच री ओढून ताणून तुम्ही मराठ्यांचा इतिहास अखंड भारतात तसेच जगभरात मलीन करत आहात असे आम्हाला वाटते. कारण चित्रपट हे एक प्रतिबिंब असते तुम्ही जसे प्रेक्षकांवरती बिंबवणार त्यालाच अनुसरून प्रेक्षक आपल्या मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आपापले मत बनवणार यामध्ये काहीच शंका नाही.
           त्यासाठी तुम्ही पानिपतवरती, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावर नव्याने संशोधन करणाऱ्या इतिहासकारांशी चर्चा करून योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा. कारण अविश्वसनीय साधन असलेल्या विश्वास पाटील यांची "पानिपत" कादंबरी आणि "भाऊसाहेबांची बखर" यामध्ये मल्हारराव होळकर यांच्यावरती झालेल्या/केलेल्या आरोपांचे खंडण जेष्ठ लेखक/इतिहास संशोधक आदरणीय संजय सोनवणी सर, संजय क्षिरसागर सर यांनी केले असून त्यांनी संशोधित केलेला इतिहास खोडायचे आवाहन आजपर्यंत कोणीच स्विकारले नाही अथवा त्यावरती कोणी प्रतिवाद देखील सादर केला नाही. महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानच्या वतीने वरील इतिहास संशोधकांसह प्रकाश खाडे सर यांच्या सहीचे पत्र तुम्हाला मिळालेच असेल शिवाय क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या क्रांतीकारी विचारावर मार्गक्रमण करणाऱ्या "महाराष्ट्र यशवंत सेनेच्या वतीने संघटनेचे प्रमुख मा.सुरेशभाऊ होलगुंडे", "यशवंतराव होळकर प्रतिष्ठान चिंचवण चे अध्यक्ष मा.दत्ता वाकसे" यांचेही पत्र मिळाले असेलच.
      मल्हारराव होळकर हे एक मराठ्यांचे मुत्सद्दी लढवय्ये होते, त्यांनी स्वबळावर साम्राज्य उभा केले होते शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य अबाधित राखण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर त्यांनी अटकेपार झेंडे फडकवले होते हे तमाम महाराष्ट्र वाशीयांना अभिमानास्पद आहे. पानिपतच्या युद्धानंतर उत्तर भारतात मराठ्यांच्या साम्राजाचा विस्तार त्यांनी केला होता. त्यामुळे उपरोक्त विषयास अनुसरून तुम्ही प्रदर्शित करू इच्छित असलेल्या "पानिपत" या चित्रपटात मराठ्यांच्या इतिहासाचे  विकृत दर्शन घडवून थोरले सुभेदार मल्हारराव होळकर हे पानिपतच्या युद्धातून पळून आल्याचे खोटे आरोप करून पानिपतच्या पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले आहे. त्या अविश्वसनीय साधनांचा वापर करून मल्हारराव होळकर यांच्याबद्दल चुकीचे चित्रीकरण केल्यास महाराष्ट्र राज्यातील अखंड मराठ्यांच्या भावना दुखावतीलच शिवाय मल्हारराव होळकरांचे वारसदार असलेला महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज हे कदापि सहन करणार नाही. त्यासाठी इतिहासाचे अभ्यासक, संशोधक, विचारवंत यांच्याशी या संबंधित चर्चा करावी आणि मल्हारराव होळकर यांच्यावरती जे अपरिहार्य लेखन(स्क्रिप्ट)/चित्रिकरण झाले आहे त्यात बदल करावा अन्यथा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मराठी माणूस इतिहासाच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरून तुम्ही दिग्दर्शन करत असलेला "पानिपत" हा चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच प्रदर्शित होऊ देणार नाहीत याची तुम्ही नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
        आम्हा सर्वसामान्य मराठी माणसांच्या भावना समजून तुम्ही योग्य आणि सकारात्मक निर्णय घ्याल एवढीच प्रामाणिक अपेक्षा....
  कळावे
          -नितीनराजे अनुसे (लेखक व व्याख्याते)
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Sunday 14 April 2019

संघर्षपुत्रा तु विजयी भवः ✒नितीनराजे अनुसे

काही तांत्रिक अडणींमुळे हा ब्लॉग लिहायला तसा फारच उशिरच झाला तरीही जो अवधी मिळाला त्यामध्ये केलेला हा खटाटोप...
         माणदेशाच्या दुष्काळी पट्ट्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका तसा आजही संघर्षाच्या कथाच गिरवतोय. इथला शेतकरी स्वातंत्र्य पूर्व काळापासून दुष्काळाशी दोन हात करून आजही टिचभर पोटाच्या तुमड्या अर्धीकोर खाऊन कसाबसा जगतोय म्हणजेच संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे. याच मातीतील थोर साहित्यकार  ग.दि.माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, तराळ-अंतराळचे कादंबरीकार शंकरराव खरात, ना.सि.इनामदार अशा प्रख्यात लेखकांनी, कादंबरीकरांनी संघर्षातूनच संघर्ष गाथा गिरवल्या आणि त्या गाथा साता-समुद्रापार ऐकवल्या.
      तेव्हाचा तो आटपाडी तालुका तसेच जत, कवठेमहांकाळ व खानापूरचा काही भाग आजही दुष्काळाच्या छत्रछायेखाली असून त्या झळया सोसतोय. परंतु इथली हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रस्थापित घराणी सोडली तर प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष आणि संघर्षच आला आहे. स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर स्व.नागनाथअण्णा नायकवडी यांनी आटपाडी तालुक्यासाठी पाण्याचा संघर्ष सुरू केला. त्यांना स्वातंत्र्य सैनिक स्व.जी डी बापू लाड, जेष्ठ अभिनेते स्व.निळू फुले तसेच जेष्ठ नेते आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचीही साथ मिळाली. दरवर्षी २६ जून ला पाणी परिषद व्हायची परंतु क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या निधनानंतर ती पाणी परिषद बंद झाली. आटपाडी, सांगोला, जत, माण तालुक्यातून, प्रत्येक गावागावांतून हजारोंच्या संख्येने लोक एकत्रित यायचे, पाण्यावरती चर्चा व्हायची, मनोगते व्हायची, उन्हातान्हात मिळेल त्या जागेवर बसून लोक सभा ऐकायचे सभा संपायची आणि सगळे जिकडच्या तिकडे निघून जायचे. परंतु प्रस्थापित व्यवस्था राज्य सरकार याची दखल घेत नव्हते. अथक प्रयत्नानंतर संघर्षानंतर १९९६ साली मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली परंतु २३ वर्षे उलटून देखील ही योजना अजून पुर्णत्वास आली नाही हे आटपाडी तालुक्याचेच नव्हे तर सांगली जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. आजपर्यंतच्या लोकसभा/विधानसभा निवडणूक या केवळ आणि केवळ पाण्यावरतीच झाल्या परंतु जातपातीचे/गुंडगिरीचे/जिरवाजिरवीचे राजकारण करण्यापलीकडे एकानेही सांगलीचा खऱ्या अर्थाने विकास केला नाही.
    जर जनतेला न्याय द्यायचा असेल तर संघर्षाशिवाय दुसरा तिसरा चौथा कोणता मार्ग शिल्लकच नाही असा विचार करून सांगली आटपाडी तालुक्यातील झरे गावच्या नैऋत्येस असलेल्या पडळकरवाडी गावचे सुपूत्र गोपीचंद कुंडलिक पडळकर या तरूणाने २००७ मध्ये राजकारणात पाय ठेवला. वक्तृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर हे उमदे नेतृत्व पुढे आले. खरंतर जन्मापासूनच या तरूणाने संघर्ष कोळून प्याला आहे. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच ब्रेन ट्यूमर सारख्या भयंकर आजाराने वडिलांचे छत्र हरपले. वडिलांची सेवा करता करता मोठे बंधू देखील देवाघरी गेले. आई सोबत मोलमजुरी करून प्राथमिक-माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढे द्वितीय बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी गलाई दुकानदारी केली त्यातून उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षण पूर्ण करून नागज फाटा येथे  ढाबा सुरू केला. त्यातून हळूहळू व्यवसायात प्रगती होत गेली आणि २००७ साली ना.महादेवजी जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याची राष्ट्रीय समाज पक्षाची धुरा खांद्यावर घेतली. बघता बघता गोपीचंद पडळकरांची तोफ सांगली जिल्हाभर धडकू लागल्या, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी जागृत होऊ लागला, सर्वसामान्य जनतेच्या मनात स्वाभिमान धडधडू लागला तशी आटपाडी तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली, पडळकरांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी मेळावे, चारा छावण्यांसाठीची आंदोलने, मोर्चे होऊ लागले तसतसे दुखलेले खुपलेले लोक पडळकरांच्या भोवती गोळा होऊ लागले नव्हे तर गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील युवकांच्या गळ्यातील ताइथ बनले. पुढे अल्पावधीतच २००९ साली विधानसभेची निवडणूक लढवून जवळपास २०,००० हजाराच्या संख्येने मतदान खेचून आणले आणि तिसऱ्या नंबरचे दखलपात्र नेते ठरले. याची धास्ती प्रस्थापितांनी घेतली आणि त्यांच्यावर खोट्या केसेस घालण्यात आल्या. पुढे २०१२ ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकांत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे मतदान पडळकरांच्या पैनल कडे होते त्यामुळे प्रस्थापितांची अजूनच डोकेदुखी वाढली आणि मग पुन्हा सुरू झाल्या चोरीच्या खोट्या केसेस. पुढे २०१३  साली तालुक्यातील २० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर पडळकरांच्या नेतृत्वाखाली रासपचा झेंडा फडकवला आणि युवकांना सोबत घेऊन पाण्याचा संघर्ष हाती घेऊन तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील यांची गाडी आडवणे, शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून टेंभू कार्यालय फोडले,
आटपाडी तालुक्याला पाणी मिळावे म्हणून राजेवाडीचा उजवा कालवा फोडला अशी एक ना अनेक जनतेच्या हिताचे प्रश्न हाती घेऊन पडळकर यांनी संघर्ष केला परंतु त्यांच्यावर अनेक खोट्या केसेस दाखल केल्यामुळे त्यांना जिल्हा हद्दपारीचे नोटीस बजावली परंतु वैयक्तिक कारणासाठी त्यांनी आंदोलन मोर्चे केले नव्हते तर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सुखात जगता यावे त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, न्याय मिळावा या हेतूसाठी त्यांच्यावर केसेस झाल्या असल्याने प्रांताधिकाऱ्यांनी त्या केसेस हटवायला लावून जिल्हा तडीपार रद्द झाले. जिथं तिथं संघर्ष आणि संघर्षच अनुभवायला आल्याने गोपीचंद पडळकर एक संघर्ष रत्न म्हणून नावारूपास येऊ लागले.

       पुढे २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटावर त्यांनी विधानसभा लढवली आणि तब्बल ४५००० हजारांचे मताधिक्य मिळवून स्वताला संघर्ष पुत्र म्हणून सिद्ध केले पण एवढ्यावरच त्यांनी हार मानली नाही. आमदार नसताना देखील मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवून आटपाडी-खानापूर मतदासंघातील रस्त्यांसाठी भरघोस निधी त्यांनी आणला, आटपाडी तालुक्यासाठी एमआयडीसी, तसेच एकूण २६ बंधारे मंजूर करून आणले. जी कामे आमदारांनी करायची होती ती कामे पडळकरांनी आमदार/खासदार नसताना देखील केली त्यामुळे जनतेच्या मनात गोपीचंद पडळकर हे आमदार/खासदार/मंत्री म्हणून मिरवू लागले. टेंभूच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी भुमिपूजनासाठी मंत्री महोदयांना ते घेऊन आले शिवाय इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आले ते पडळकरांमुळेच.

     गोपीचंद पडळकरांनी नाम फौंडेशनच्या माध्यमातून, लोकसहभागातून अनेक कामे करून घेतली शिवाय निधीअभावी रखडलेल्या टेंभूच्या अर्धवट कालव्याचे काम स्वखर्चाने पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. जनता हेच माझे मायबाप म्हणून पडळकर अहोरात्र जनतेसाठी काम करतात आणि आजपर्यंत त्यांनी स्वार्थासाठी काहीच केले नाही. जर खरोखरच पढळकरांना स्वार्थ साधायचा असता तर भाजपच्या मोठ्या ऑफर्स धुडकावून ते स्वाभिमानाने खासदारकीसाठी उभे राहिले नसते. गोपीचंद पडळकर हे सांगली लोकसभा निवडणूक केवळ आणि केवळ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, न्याय व हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या संघर्षाचा अनुभव हा सर्वात मोठा गुरु त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या संघर्षात साथ देणारे सर्वसामान्य तरूण, शेतकरी, कष्टकरी हे त्यांच्या हातात हात देऊन काम करत आहेत त्यामुळे कष्टाला हाल होतात पण हार होत नाही हे ब्रीदवाक्य घेऊन पडळकरांचा संघर्षरथ दिवसेंदिवस मजल मारत पुढे चालला आहे.

     फक्त नम्र विनंती एवढीच राहील की आजपर्यंत समज गैरसमज करून काहीजण त्यांच्यापासून दूर झाले, दुखावले गेले असतील तरी जनतेचा एक सच्चा सेवक म्हणून एक पाऊल मागे घ्या. कमीपणा घेतला तर मोठ्या मनाचा मान मिळतो तो मोठेपणा अंगीकृत करून २०१९ च्या या सांगली लोकसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना संसदेत पाठवा जिथे सर्वसामान्यांसाठी कायदे बनवले जातात त्या निर्णय प्रक्रियेत आपल्या हक्काचा, शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा पोरगा असायला हवा आणि हे सर्वसामान्यांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून गोपीचंद पडळकर साहेब हे संसदेत नक्कीच स्वतःला सिद्ध करून दाखवतील या तळमळीपोटी केलेला आणि वाढत गेलेला हा लेखप्रपंच इथेच थांबवून संघर्षरथाचे मानकरी संघर्षपुत्र गोपीचंद पडळकर साहेब यांना शुभेच्छा देतो.
संघर्षपुत्रा तु विजयी भवः
          ✒नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
            853 000 4123
https://nitinrajeanuse123.blogspot.com

Tuesday 9 April 2019

माझी अर्धांगिनी माझी ताकद ✒नितीनराजे अनुसे

प्रिय अर्धांगिनी...
         आज दि. ९ एप्रिल, आपल्या सुखी संसाराला आज दोन वर्ष पूर्ण झाली. कळालेच नाही की संसाराचा गाडा ओढता ओढता दोन वर्ष कधी उलटून गेली. खरंतर मी खूप नशिबवान आहे की मला तुझ्यासारखी प्रत्येक पावलोपावली, सुखदुःखात साथ देणारी, माझी सावली बनून राहणारी आणि जवळ असो अथवा दूर तरीही क्षणोक्षणी काळजी करणारी अर्धांगिनी मिळाली. खरंतर तुझ्यासाठी जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे म्हणून जास्त काही नाही पण खालील ओळी तुझ्यासाठी समर्पित करतोय...



दूर असो अथवा जवळ, तरीही काळजी करतेस रात्रंदिनी ।
प्रेमाचा अथांग सागर असणारी अशी तु माझी अर्धांगिनी ।।

सातजन्माची शपथ घेऊनी हात दिलास तु मज हाती ।
प्रतिज्ञेला अंगीकृत करून सुख-दुःखातही तु माझ्या सोबती ।।

गुणदोषांसह स्विकारलेस गं सहचारिणी तु मजला ।
प्रत्येक संकटातही लाभते तुझीच गं साथ मजला ।।

दुःखातही संकटांना तोंड द्यायला बनतेस तु रणरागिणी ।
परिस्थीतीलाही लाजवतेस अशी पत्नी माझी स्वाभिमानी।।

सासू-सासऱ्यांनाही आपलंसं केलंस तु माता-पिता समजूनी ।
हसून-खेळून राहतेस नातेवाईकामध्ये कसे येते उमजूनी ।।

नशिबवान मी मला मिळाली, तु जणू अहिल्या माझी गुणी।
जन्मोजन्मी तूच मिळू दे, प्रार्थना मल्हारी मार्तंड चरणी ।।
Happy Marriage Anniversary My Sweetheart
-Nitinraje Anuse
   8530004123


Saturday 6 April 2019

बाजूला सारून परंपरागत रूढी, उभारलीस तु यशाची गुढी ✒नितीनराजे अनुसे

कु स्नेहल नानासाहेब धायगुडे, मु.पो.बोरी ता.खंडाळा जि.सातारा
युपीएससी स्पर्धा परिक्षेत भारतातून १०८ क्रमांक 


           एके काळी राजा समाज असलेली जमात आज  गुलामगिरीचे जगणे जगत आहे याची कधी कधी स्वत:लाच लाज वाटते. कारण ख्रिस्त पूर्व काळापासून धनगरपुत्र आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांनी जी राजसत्ता गाजवली त्यांच्या प्रशासकीय कामकाजाचे दाखले आजही जगभरात दिले जातात. कित्येक राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये मौर्य राजवंशाच्या राजकीय तथा प्रशासकीय कार्यावरती डॉक्टरेट (पीएचडी) केली जातेय. आज भारतात यूपीएससी, एमपीएससी तसेच अन्य नागरी स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासक्रमात सुरवातीलाच धनगरपुत्र आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, राजा सम्राट अशोक यांचा जीवनक्रम, राजकारण, प्रशासन यावरती भर दिला जातो यावरून तरी धनगर समाज एकेकाळी अव्वल क्रमांकावरची राजा समाज असणारी जमात होती हे सर्वमान्य आहे.
त्यापुढील काळात सातवाहन, चोळ, हक्कबुक्क राय, होळकर, गायकवाड अशी राजघराणी उदयास आली परंतु जातीयवादी इतिहासकारांनी षड्यंत्र रचून त्यांचा इतिहासच लपवून ठेवला. परंतु कोंबडा झाकून ठेवला म्हणून सुर्य काही उगवायचा राहत नाही त्याप्रमाणे धनगरांचा गौरवशाली इतिहास लपवून ठेवला तरी खरा इतिहास समोर आल्याशिवाय राहत नसतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे 
       असो भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७२ वर्षे होत आली तरी धनगर समाजाला राजकीय प्रशासकीय पदापर्यंत पोहचू द्यायचे नाही या देशाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूरच ठेवायचे असा चंग बांधून बसलेली जातीय व्यवस्था ही राष्ट्राला लागलेली खरंतर सर्वात मोठी किड आहे. आज भारतीय प्रशासकीय सेवा हे भारत देशातील सर्वोच्च पातळीवरील महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. खरंतर ती चौकट तोडायला देशातील लाखोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी दिवसरात्र एक करत असतात. परंतु तुझ्यारखे क्वचितच विद्यार्थी ही स्टील फ्रेम तोडून भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होतात हे माझ्यारख्याने दोन-चार शब्दात लिहून सांगता येत नाही. 
        खरंतर इतर समाजबांधवांप्रमाणेच कु.स्नेहल नानासाहेब धायगुडे तु सुद्धा ती स्टील फ्रेम तोडायला किती कष्ट घेतले हे तुला आणि तुझ्या कुटूंबातील सदस्यांना माहीत कारण ही स्टील फ्रेम तोडणे म्हणजे अनन्यसाधारण व्यक्तीचे काम नव्हे. त्यामुळे गेल्या ७० वर्षात धनगरांची अवस्था एवढी बिकट झाल्याचे पाहून क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून क्रांतीची मशाल युवकांच्या हातात दिली तीच पेटती आणि धगधगती मशाल घेऊन समाजाला उजेडाकडे घेउन जायचा प्रयत्न करतोय, अंधकार आणि अंधश्रद्धेत गुरफटलेल्या समाजात दिव्यरूपी  ज्ञानाचा उज्वल भविष्याचा उजेड गेल्या ५-६ वर्षांपासून  पसरवतोय आणि क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांचे विचार पेरतोय. आणि खरोखरच आजकाल समाजातील तरूण-तरुणींचे प्रशासकीय सेवेत (सनदी सेवेत) वाढत चाललेले प्राबल्य पाहून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे माझ्या लेखणीचे सार्थक झाले असेच मी समजतो.
      पिढ्यानपिढ्या अन् पारंपरिक व्यवसायाचा चालत आलेला रहाट, अन्याय अत्याचाराचे खाचखळगे आज कुठे तरी बाजूला सारून तुझ्या सारख्या भगिनी तसेच धनगर समाजातील तरुण बांधव बुद्धिचातुर्याच्या जोरावर भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होतात त्यामुळे खरोखरच गर्वाने माझा ऊर भरून येतो. तु जे यश संपादन केलेस त्याबद्दल अखंड महाराष्ट्र राज्यातून असंख्य समाजबांधव कौतुक करत आहेत, शुभेच्छा देत आहेत परंतु तुझ्यापासून कितीजण प्रेरणा घेऊन प्रशासकीय सेवेत दाखल होतात याची चाचपणी मी करत असलो तरी एक सामाजिक बांधिलकी या नात्याने या माझ्या भोळ्याभाबड्या समाजातील अन्य तरुण-तरूणींना तु तुझ्या कार्याने प्रेरित करणे आवश्यक आहे. त्यांना प्रेरणा देणे मार्गदर्शन करणे याची एक जबाबदारी आता तुझ्या खांद्यावर आहे. अठराव्या शतकात जगातील एक उत्तम प्रशासक म्हणून ज्या राष्ट्रमातेचा, रणरागिणीचा गौरव जगाने केला त्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अहिल्याईंची प्रशासन व्यवस्था फक्त इतिहासात न राहता त्याचा आजच्या घडीला अवलंब करावा याच माझ्या सदिच्छा आणि पुनश्च एकदा परंपरागत रूढी बाजूला सारून यशाची खरी गुढी उभारलीस आणि अगदी वयाच्या २१ व्या वर्षी भारतातून युपीएससी स्पर्धा परिक्षेत १०८ व्या क्रमांकाने यशस्वी झालेस त्याबद्दल स्नेहल तुझे आणि तुझ्या घरातील सर्वांचे त्रिवार अभिनंदन.
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
          ✒नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +91 853 000 4123
https://nitinrajeanuse123.blogspot.com

Tuesday 2 April 2019

माझा बाप माझा खरा मार्गदर्शक... ✒नितीनराजे अनुसे

माझा बाप... माझा खरा मार्गदर्शक...
         फार काही शिकला नाही हो माझा बाप,
पण जीवनात मला त्यांनी खूप काही शिकवलं.
फक्त एकच दिवस शाळेची पायरी चढली होती त्यांनी पण आपल्या पोरांना शिकवायला ते कधीच कमी पडले नाहीत. १९८०-८५ च्या कारकिर्दीत मुंबईच्या वडगादी पासून कुर्ला भांडूप पर्यंत हातगाडीवर माल वाहून नेण्याचे कष्टाचे काम त्यांनी केले. कालांतराने गावाकडे येऊन परंपरागत व्यवसाय असलेली मेंढरं वळली आणि आजही मेंढपाळ व्यवसाय हा अखंड आणि अवीरतपणे चालू आहे. खरंतर आमच्या तात्यांच्या कष्टाला मुळात तोडच नाही.
    तसे पाहायला गेले तर शिकायची इच्छा असूनही तात्यांना शाळेत शिकायला भेटले नव्हते कारण तेव्हाची परिस्थितीच वेगळी होती त्यांना लिहायला वाचायला येत नव्हते पण आज तात्या लिहू शकतात आणि मात्र मी लिहलेले "पुन्हा एक नवी दिशा" हे पुस्तक मात्र खडानखडा वाचतात.
       समाजातील एक लेखक म्हणून नव्हे तर तात्या एक मुलगा या नात्यानं मला तुमचा फार अभिमान वाटतो.
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
          ✒नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
            853 000 4123
https://nitinrajeanuse123.blogspot.com