Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday 3 December 2020

जातीयवाद्यांच्या तावडीत सापडलेला महान द्रष्टा योद्धा ✍ लेखन - नितीनराजे अनुसे

राष्ट्रपुरुष धुरंधर लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर

        होय, मराठ्यांच्या इतिहासात मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर शत्रूंच्या चारी मुंड्या जीत करणाऱ्या, मराठ्यांचा इतिहास जाज्वल्यमान आणि दैदिप्यमान करणाऱ्या धुरंधर योद्ध्यांचा विसर मराठी माणसांना पडणे हे मराठी माणसांचेच नव्हे तर सबंध हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महा'राष्ट्रा'चे दुर्देवच म्हणावे लागेल. परंतु त्यापलीकडे जाऊन मी हेच म्हणेन की मराठ्यांच्या इतिहासात मर्दुमकी गाजवणऱ्या बहुजन समाजातील अशा धुरंधर योद्ध्यांचा इतिहास न अभ्यासने म्हणजेच त्या त्या मराठी माणसांना कदाचित जातीयवादाची झालेली कावीळ असावी...
       असेच धुरंधर लढवय्ये, शुन्यातून विश्व निर्माण करणारे  होळकर साम्राज्याचे सुभेदार तुकोजीराव होळकर यांचे धाकटे सुपूत्र म्हणजेच सळसळत्या रक्ताची आणि लखलखत्या तलवारीची धार असलेले धुरंधर योद्धे, एक महान तथा द्रष्टा योद्धा चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर. तत्कालीन हिंदुस्तानचा अर्थातच अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील क्रमांक एकचा शत्रू कोण असेल तर ब्रिटीशांचे नाव समोर येते. परंतु  छत्रपती शिवरायांपाठोपाठ असा एकला महाराजा यशवंतराव होळकर लढवय्या होता की ज्यांना स्वराज्यातीलच काही लालची शिलेदार आणि सरदारांकडून तितकाच अन्याय झाला जितका ब्रिटिशांनी या हिंदुस्तानच्या मातीवर केला. 
           तसे पहायला गेले तर तो काळ फार अंदाधुंदींचा होता, कोणाचा पायपोस कोणाच्याच पायात नव्हता. रणांगणात रक्त सांडून उभा केलेली होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी पेशव्यांचेच सरदार होळकरांचे सोबती  अलिजाबहाद्दर दौलतराव शिंदे टपून होते आणि पेशवे देखील मागचा पुढचा विचार न करता त्यांस भरीस पडत गेले. अशातच  भांबुर्ड्याच्या मैदानात काशीराव होळकरांना भरीस घालून शिंद्यांनी साखरझोपेत असतानाच तुकोजी बाबांचे द्वितीय सुपुत्र महाराजा मल्हारराव होळकर (द्वितीय) यांची हत्या केली तर यशवंतराव सुखरूपपणे तिथून निसटले. अशी दुर्बुद्धी सुचलेल्या शिंद्यांना आणि पेशव्यांना समजावून सांगणारा जाणकार कोणी या स्वराज्यात नव्हता जे होते त्या नाना फडणिसांना पेशव्यांनी कैदेत ठेवले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. परंतु पुण्यातील पेशव्यांच्या व शिंद्यांच्या अशा कुटील राजकारणामुळे संपूर्ण रयत जात्यात भरडावी अशी भरडली जात होती. त्यात पेशव्यांच्या सरदारांनी खुद्द पेशव्यांच्या आज्ञेनुसार महाराजा यशवंतराव होळकर यांचे थोरले बंधू महाराजा विठोजीराजे होळकर यांना सूडबुद्धीने अटक करून हत्तीच्या पायी दिले. एखादा कसाब जनावरांना जेवढा त्रास देत नाही त्यापेक्षा क्रुर पद्धतीने विठोजीराजेंना ठार मारले ते छत्रपती शिवरायांनी स्थापित केलेल्या स्वराज्याच्या हिताचे मुळीच नव्हते. अशा वेळी शिंद्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊन होळकरांची गादी राहावी की नको याची शहानिशा करण्यासाठी समोरासमोर पेशव्यांशी मसलत करण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर दक्षिणेकडे कुच करतात. शिंद्यांची राजधानी उज्जैन काबीज करून वाटेत येणारी त्यांची ठाणी व महाल ताब्यात घेत नाशिक, बारामती  सुद्धा महाराजांच्या फौजेने ताब्यात घेतली. यालाच या मातीतले काही चुकीचे जन्माला आलेले जातीयवादी इतिहासकार म्हणतात 'होळकरी दंगा'. परंतु होळकरांचे महाल शिंद्यांनी घशात घातले होते, मल्हारराव होळकर द्वितीय यांची शिंद्यांनी हत्या केली पुढे महाराजा विठोजीराजे होळकर यांना देखील हत्तीच्या पायी देऊन क्रुर रित्या ठार मारले तेव्हा शिंद्यांचा आणि पेशव्यांचा दंगा इथल्या जातीयवादी आणि नालायक इतिहासकारांना दिसला नाही का? 

            असो किमान यानंतर तरी पेशव्यांनी समजदारीने विचार विनिमय करायला हवा होता परंतु 'विनाशकाली विपरीत बुद्धी' या म्हणीप्रमाणे महाराजा यशवंतराव होळकरांच्या फौजेला अडवण्यासाठी पेशव्यांनी शिंद्यांच्या आणि त्यांच्या कारभाऱ्यांच्या सांगण्यावरून सदाशिवराव बक्षी यांची कसलेली फौज उत्तरेतून बोलवली. राजधानीत रयतेच्या हिताची खलबते व्हायच्या ऐवजी होळकरांना कसं संपवायचे याचेच विडे उचलले जात होते. मराठ्यांच्या दौलतीत ज्या होळकरांनी भर घातली, उत्तर हिंदूस्थान घोड्याच्या टापांखाली आणून दिल्लीचे तख्तच नव्हे तर ज्या होळकरांनी अटकेपार मराठ्यांचे झेंडे फडवले त्या होळकरांना संपवायची कटकारस्थाने शिंद्यांनी चालवली होती. परंतु रणांगणातून माघार घेइन तो जातीवंत योद्धा कसला?  यशवंतराव होळकर देखील काय कमी नव्हते, ऐन पंचविशीतलं रांगडं धनगराचे पोरगं ते, अख्ख्या हिंदूस्थानभर गाजलेली नावाजलेली फौज यशवंतरावांकडे होती. हडपसरच्या माळावर महाराजा यशवंतराव होळकर यांची छावणी पडली होती. पाराजीपंतांनी समजावून सांगूनही पेशव्यांनी शिंद्यांच्याच कारभाऱ्यांचे ऐकून घेतले आणि तिथेच छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याचा घात झाला. शेवटी ऐन दिवाळीला अभ्यंगस्नानादिवशी सकाळी सकाळी लढाईला तोंड फुटले सरकारी फौजेकडून (शिंदे व पेशव्यांच्या फौजेकडून) वीस-पंचवीस तोफांचे बार उडाल्यानंतरच यशवंतरावांनी त्यांना प्रत्युत्तर द्यायला आपल्या फौजेला हुकूम दिला आणि बघता बघता होळकरांच्या फौजेने शिंद्यांची-पेशव्यांची फौज कापत ती वानवडी पर्यंत रेटत नेली. होळकरांचे सरदार आपापले मोर्चे शिताफीने सांभाळत शत्रूंवर चाल करत होते. मार्तंड मार्तंड असा जयघोष करत फौजेला प्रोत्साहित करत महाराजांनी लंकेवरून (महाराजा यशवंतराव होळकर यांची घोडी- लंका) खाली उडी मारली आणि दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन शिंद्यांच्या फौजेत घुसले आणि बघतो न बघतो तोपर्यंत सपासप वार करत हजार दोन हजार फौज त्यांनी कापून काढली होती. महाराजांची फौज देखील महारांजांचे अनुकरण करत शत्रूंवर तुटून पडत होते. त्याच आवेशात महाराजांनी विंचूरकरांना ओरडून सांगितले की तुम्ही माघारी फिरा तुम्ही आमचे शत्रू नाही तर शिंदे आणि शिंद्यांचे सरदार आमचे शत्रू आहेत. तोच विंचूरकरांना त्यांच्या फौजेने माघारी ओढले तोपर्यंत महाराजांच्या दांडपट्ट्याच्या फटक्यात सदाशिवराव बक्षींचे शिर धडावेगळे झाले. सगळीकडे शिंद्यांच्या-पेशव्यांच्या सैनिकांची हाडे पसरली होती. शेवटी शिंदे-पेशव्यांचे काही सरदार रणांगणातूनच पळून गेले. यशवंतरावांच्या तोफांच्या माऱ्याने पुणे जळले, आगीचे लोळ आकाशात उंच उंच दिसत होते. तोपर्यंतच कोण जिंकले कोण हारले हे न बघता भितीपोटी खुद पेशवा आणि बाळोजी हे मल्हारबाबांचा(द्वितीय) पुत्र  खंडेराव होळकर (द्वितीय) यांना घेऊन कोकणात पळून गेले. ते पुन्हा यशवंतराव होळकरांनी विनवणी करून देखील माघारी आलेच नाहीत. शेवटी फौजेच्या दाणागोट्यासाठी, अन्नपाण्यासाठी मंदिरातील पैसा बाहेर काढावा लागला. 

       वसई ला जाऊन पेशव्यांनी गोऱ्यांशी तह करून महाराजा यशवंतराव होळकर यांना होळकर दौलत ब्रिटीशांच्या स्वाधीन करण्याची पत्रे पाठवली तेव्हा महाराजा यशवंतराव होळकर संतापले. पेशव्यांच्या तहानुसार ब्रिटिश फौज पुण्यावर चालून येत आहे असे समजताच त्यांच्या फौजेस फुटकी कवडी देखील मिळू नये या उद्देशाने व राष्ट्र बांधणी साठी फौजेच्या लष्करी खर्चासाठी मंदिरातील दाग दागिने पैसा महाराजा यशवंतराव होळकर यांनी बाहेर काढला, पेशव्यांची राजधानी असलेला शनिवार वाडा सोडला तर इतर सरदारांचे महाल लुटून फस्त केले. याचाच इतिहासात उल्लेख करताना तेव्हाचा शत्रू असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, लेखकांनी महाराजा यशवंतराव होळकर यांना बंडखोर लुटारू, होळकरी दंगा अशी विभूषणं लावून महाराजांना बदनाम करण्याची एकही कसर सोडली नाही आणि त्यांचीच री ओढत खोलात जाऊन अभ्यास न करता इथल्या जातीयवादी लेखकांनी इतिहासकारांनी यशवंतराव होळकर यांना तीच विभूषणं लावून त्यांचा खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला.
         परंतु महाराजा यशवंतराव होळकर काही कमी नव्हते. जे इंग्रज भारतभुमीवर पाय पसरू लागले होते त्यांच्या विरोधात स्वकर्तृत्वावर दंड थोपटून ते उभे राहिले. भानपुऱ्यात त्यांनी तोफांचा आणि गोळाबारूदांचा कारखाना सुरू करून लढाईची धोरणं आखली. थोरले सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर म्हणायचे की गादीचा खरा वारसदार तोच असतो जो मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर लढाया मारून, कर्तृत्व गाजवून स्वराज्याचे रक्षण करतो. महाराजा यशवंतराव होळकर हे त्याच तालमीतून पुढे आलेला एक द्रष्टा योद्धे. होळकर साम्राज्याच्या, स्वराज्याच्या पलिकडे जाऊन त्यांनी ब्रिटीशांना मातृभूमीतून हाकलून लावण्यासाठी हिंदूस्थान अवघे एक राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून तलवारीची मूठ घट्ट पकडली आणि घोड्याच्या पाठीवर मांड टाकून डोळ्यांच्या पापण्या पडायच्या आत समोरासमोरील लढाईत जगभर गाजलेल्या ब्रिटिश फौजेला कापून काढत, इंग्रज अधिकाऱ्यांना गुडघे टेकायला भाग पाडून त्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आणि अशा शिस्तबद्ध अजिंक्य मानल्या जाणाऱ्या ब्रिटीश कवायती फौजेची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली. एक नव्हे, दोन नव्हे तर ब्रिटीश फौजेशी मुकाबला करत तब्बल एकणिस लढायांमध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांनी विजय मिळवला होता. समोरासमोरील लढाईत तर कधी कधी सपाट मैदानावर देखील गणिमी काव्याने ब्रिटीश फौजेवर चढाई करणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या फौजेसमोर नवनवीन शस्त्रं असलेल्या ब्रिटिश फौजेचा टिकाव लागत नव्हता तेव्हा ब्रिटीशांनी होळकरांच्या सरदारांना फंद फितुरी करून होळकरांची फौज कमी करायला सुरुवात केली. हिंदूस्थातील सर्व राजा महाराजांना पत्रं पाठवून, विनवणी करून देखील एकही खरा माइचा लाल इंग्रजांच्या विरोधात लढायला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या सोबत आला नाही हे या राष्ट्राचे दुर्दैव होते. अन्यथा गोऱ्यांनी भारतावर कधीच राज्य केले नसते. योगायोगाने युरोपात नेपोलियन बोनापार्ट याची सुद्धा लढाई ब्रिटीशांच्या विरोधात होती. त्यावर सुप्रसिद्ध शाहीर अमर शेख पोवाडा गाताना म्हणतात की,
"करीन रक्तबंबाळ देश मी ब्रिटीशानो तुमचा,
भारत भुमीच्या तसुतसुवर हक्क फक्त अमुचा.
फंदफितुरी बंद करा अन या मैदानाला,
मेल्या आईचे दुध होळकर नाही हो प्याला.
नेपोलियन युरोपात... ह्यो होळकर हिकडं...
अडकित्यातील जशी सुपारी करु तुकडं तुकडं"
      पुढे शाहीर म्हणतात की
शिवरायांमागे राजा एकला यशवंतराव
ज्याचं नाव पोवाड्यातून गावं आणि शाहीरानं डोक्यावर घेऊन नाचावं...
डोक्यावर घेऊन नाचावं... 

      अशा मुत्सद्दी योद्ध्याचा जन्म पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे वाफगावच्या भुईकोट किल्ल्यात दि. ३ डिसेंबर १७७६ रोजी झाला. आज महाराजा यशवंतराव होळकर यांची २४४ वी जयंती आहे. त्यामुळे द्रष्टा योद्धा तथा राष्ट्रपुरुष महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास खोलात जाऊन अभ्यासने व राष्ट्र उभारणी साठी त्यांच्या दूरदृष्टीचा अवलंब करणे हे आजच्या युवा वर्गासमोर एक आवाहन आहे.
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
          ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +91 853 000 4123