Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Monday 3 December 2018

एकमेवाद्वितीय अजिंक्य तथा बाहुबली योद्धा ।। महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर ।। ✍️नितीनराजे अनुसे


एकमेवाद्वितीय अजिंक्य तथा बाहुबली योद्धा
।। महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर ।।
          ✍️नितीनराजे अनुसे
     मराठेशाहीचा इतिहास म्हणजे खरंतर ती एक अंधाधुंदीच होती. त्या अंधाधुंदीच्या काळात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात होता हे कळायलाच मार्ग नव्हता. तमाम मराठ्यांचीच काय तर अखंड हिंदूस्थानातील राजा-महाराजांची देखील हीच अवस्था होती. परंतु हिंदूस्थानातील काही राजांनी केवळ स्वतःचेच राज्य न पाहता राष्ट्रप्रेमाने जो काही अद्भूत इतिहास रचला त्याला मुळात तोडच नव्हती. परंतु जातीयवादाच्या आणि श्रेयवादाच्या नादात शिकल्या सवरलेल्या जातीयवादी इतिहासकारांनी मातृभूमीतीलच महापराक्रमी योद्ध्यांना उपेक्षित ठेवले त्यातीलच एक म्हणजेच एकमेवाद्वितीय अजिंक्य योद्धा चक्रवर्ती सम्राट महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर होते त्यांची आज २५२ वी जयंती त्यानिमित्ताने केलेला हा छोटासा लेखप्रपंच....
         होळकरशाहीचे मुळपुरूष अर्थातच होळकरशाहीचे संस्थापक थोरले सुभेदार श्रीमंत राजे मल्हारराव होळकर यांनी उत्तरेत स्वतःच्या मनगटाच्या जोरावर गणिमी काव्याने  तलवार गाजवली, शत्रूंवरती मात करून अटकेपार झेंडे फडकवले, अनेक महाल परगणे आपल्या ताब्यात घेऊन स्वतःला मुत्सद्दी तथा धुरंधर योद्धा म्हणून सिद्ध केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य नुसते अबाधित राखले नाही तर केलेल्या स्वराजाच्या रोपट्याचे झाडात रूपांतर केले कालांतराने त्या वृक्षाच्या सावलीत अनेक रोपट्यांनी जन्म घेतला. परंतु जसजसा होळकरांच्या फौजांचा दबदबा वाढत चालला तसतसे होळकरांचे महाल, परगणे हे सोबत्यांच्या अर्थातच शिंद्यांच्या डोळ्यात सलू लागले. राजपुत्र खंडेराव होळकर यांच्या मृत्यूपाठोपाठ मल्हारराव होळकरांचाही मृत्यू झाला (काही इतिसाकारांच्या मते त्यांची हत्या झाली यावरती संशोधन होणे गरजेचे आहे) लागोलाग अहिल्याईंचा व राजपुत्र खंडेराव होळकर यांचा राजपुत्र राजे मालेराव होळकर हा देखील मृत्यू पावल्याने राज्यकारभाराची सर्व ती जबाबदारी अहिल्याईंवरती आली. डोळ्यादेखत पति, सासरे व पुत्र यांच्या मृत्यूने शोकसागरात बुडालेल्या अहिल्याई तशा सर्वसामान महिलांप्रमाणे खचल्या नाहीत तर समोर पोटच्या लेकरासारखी प्रजा असताना सगळे दुःख पोटात गिळून एक स्त्री असताना देखील त्या मायमाऊलीने जवळजवळ २८ वर्षे राज्यकारभार या देशाच्या विशाल भूभागावर राज्यकारभार केला याचा गर्व नुसत्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखंड भारतातील जनतेला वाटायला हवा होता पण खैर आजच्या जातीयवादाने बरबटलेल्यांना त्या मर्दानी महापराक्रमी रणरागिणीचा अर्थातच १८ व्या शतकातील जगातील सर्वोत्तम तथा आदर्श प्रशासक व राज्यकर्ती म्हणून जगाने जिचा गौरव केला अशा राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा इतिहास अभ्यासायला कुठेतरी लाज वाटत असावी....
     असो, अहिल्याईंनी सैन्याची/लष्कराची जबाबदारी होळकर कुटुंबातीलच तुकोजीराव होळकर यांच्यावर सोपवली होती. काही कालावधीतच काही शुल्लक कारणाने शिंद्यांचे व होळकरांचे वैर सुरू झाले. रक्ताचे पाणी करून लढाया मारणाऱ्या मल्हाररावांनी जे महाल परगणे होळकरशाहीच्या पदरात पाडले होते त्यावरती शिंद्यांचा डोळा होता. महाराजा तुकोजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा पुत्र अर्थातच विकलांग असलेल्या काशीराव होळकर यांना अलिजाबहाद्दर दौलतराव शिंद्यांनी पाठीशी घालून होळकर गादीसाठी वाद निर्माण केला व त्यात ते यशस्वी झाले. पुढे भांबुर्ड्याच्या मैदानात मल्हारराव होळकर (दुसरे) यांची छावणी पडली असताना मध्यरात्री नंतरच्या प्रहरी अलिजाबहाद्दर दौलतराव शिंद्यांनी मल्हारराव होळकर यांचे सख्खे भाऊ काशीराव होळकर यांच्या मदतीने छावणीवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात मल्हारराव होळकर (द्वितीय) घोड्याखाली आले तर यशवंतरावांची तलवार अंधारात कुठे निसटून पडली कोणास ठाऊक, त्यातच भाल्याची जखम गहरी त्यामुळे यशवंतराव होळकर यांचा मांडचोळणा फाटून त्याच्या चिंध्या चिंध्या झालेल्या आणि पोटरीत घुसलेली बंधूकीची गोळी त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत फाटलेल्या डगळ्यासह निशस्त्र यशवंतराव शहरात पोहचले पाठोपाठ धर्मा कुंवर देखील आला. धर्माने खूप विनंत्या केल्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांना वस्त्र लपेटून घोड्यावर पुढे घेतले आणि वाटेत भेटणाऱ्या व यशवंतराव होळकर यांची विचारपूस करणाऱ्या शिंद्याच्या सैन्यांना त्यांच्या पैकीच एका जखमीला चालवले असल्याचे सांगत कुंट्याच्या वाड्यात शिरला. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री धर्मा बातमी घेऊन आला आणि सर्वनाश झाल्याचे सांगू लागला. मल्हाररावबाबा (दुसरे) तलवारीला बळी पडले तर शिंद्यांच्या सांगण्यावरून सुभेदार म्हणजेच काशीराव होळकर हे बाईसाहेब (यमुनाबाई), गरोदर असलेल्या जयाबाई (मल्हारराव होळकर दुसरे यांच्या धर्मपत्नी), लाडाबाई (यशवंतराव होळकर यांच्या पत्नी) व भिमाई यांसह सर्व कुटूंबकबिल्याला पकडून घेऊन गेले. आता मल्हाररावबाबा गेले म्हणून दु:ख करावे की सर्व कुटूंबकबिल्याला शिंदे कैद करून घेऊन गेले म्हणून दु:ख करावे याबद्दल यशवंतरावांना काहीच सुचत नव्हते. डोळ्यासमोर अंधार दाटला होता हातात ना भाला ना तलवार, ना बसायला घोडे. त्यातच धाकले बंधू विठोजीराजे निसटून गेले ते नक्की कुठे गेले? शिंद्यांचे सैन्य चौकाचौकात यशवंतरावांची चौकशी करत होते. या सर्व घटनेवरून मराठी सैन्यामध्ये द्विधा अवस्था निर्माण झाली होती. छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या साम्राज्याला कोण्या फिरंग्यांची नव्हती लागली तर स्वराज्यातील मराठ्यांचीच नजर लागली होती. पेशव्यांनी मात्र यावरती काहीच पाऊले उचलली नव्हती ना निर्णय घेतला. यावरून तरी असेच वाटते की मराठ्यांच्या राजकारणात स्वबळावर ठसा उमटवलेल्या होळकरांची दौलत, होळकरांचे राज्य हे आजच्या सारख्याच सत्तापिपासू मराठावादी तथा भटजातवादी पेशव्यांना आणि मराठ्यांना गिळंकृत करायचे होते.
   परंतु माघार घेईल तो धनगर कसला? उत्तर भारतात आपल्या स्वबळावर मराठ्यांचे राज्य स्थापित करणाऱ्या, अटकेपार मराठ्यांचे झेंडे फडकवणाऱ्या थोरले सुभेदार तथा राजे मल्हारराव होळकर यांचाच वसा आणि वारसा अंगिकारलेल्या यशवंतराव होळकर यांनी शुन्यातून पुन्हा विश्व निर्माण केले होते. सुरवतातीला धार च्या पवारांनी त्यांना आपल्या मदतीला बोलावले व त्यांनी पेंढाऱ्यांच्या विरोधात जी तलवार गाजवली त्याला प्रभावित होऊन धारच्या पवारांनी त्यांना दिवाण नेमायची तयारी केली होती. परंतु आम्हाला आमची अनेक कर्तव्यं आहेत. शिंद्यांनी होळकरांचे एकेक महाल घशात घालून परगणे उजाड करायला सुरुवात केली आहे. लाखेरीच्या लढाई पासून आमचे अवसान खचले असून सरदार हा नाश उघड्या डोळ्यांनी पाहाताहेत असे सांगून आम्हाला निरोप द्यावा असे पवारांना बोलून दाखवले व शेवटी पवार तयार झाले. पेंढाऱ्यांकडून काही बंदूका तलवारी मिळाल्या होत्या तर चार हजार रूपये पवारांनी दिले त्यावरच माणसं जमवायची आणि शिंद्यांना अद्दल घडवायची असा पण करून यशवंतराव होळकर हे धर्मा कुंवर, शामराव महाडिक व भवानीशंकर यांच्यासोबत निघाले. यशवंतराव होळकरांनी धार ला जो पराक्रम गाजवला ते ऐकून हळूहळू होळकरांचे विस्कळीत झालेले सैन्य यशवंतराव होळकर यांना मिळू लागले. मोठा फौजफाटा तयार झाला, अलिजाबहाद्दर दौलतराव शिंदे व सुभेदार काशीराव होळकर यांना यशवंतराव होळकरांची धास्ती वाटू लागली. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हजार बाराशे सैन्य धाडण्यात आले तरीही यशवंतराव होळकर यांची जरब कमी होत नव्हती. काही काळानंतर धारच्या पवारांनी पुन्हा यशवंतराव होळकर यांच्या स्वागतासाठी निमंत्रण धाडले, सोबत पालखी आणि वस्त्रं पाठवून दिली. तोपर्यंत अंगावर फाटका डगळा घालून घालून त्याच्या पार झालेल्या होत्या. पुढे पवारांनी शेपाचशे फौजफाटा यशवंतरावांच्या दिमतीला दिला. इंदौर मधील होळकरांची गादी रिकामी होती भारमलदादा आणि हरकुंवरबाई (मावशी) यांच्या आग्रहाखातर खंडेराव होळकर (दुसरे) यांच्या नावाने यशवंतरावांनी राज्यकारभार सुरु केला, फत्तेसिंग माने यांच्यासह होळकरांचे अनेक जुने सरदार येऊन त्यांना मिळाले मात्र अचानक पाराजीपंतांचा खलिता घेऊन एक सांडणीस्वार तिथे आला. शिंद्यांनी आणि पेशव्यांनी यशवंतराव होळकरांचे मोठे बंधू विठोजीराजे होळकर यांची क्रुर हत्या केल्याचा तो खलिता होता. एखाद्या कसाबाला लाजवेल असे वर्तन पेशव्यांनी आणि बाळोजीने केले होते. विठोजीराजे यांन बापू गोखल्याने पकडून शनिवार वाड्यावर आणलं, शे-दोनशे कमच्या मारल्या हत्तीच्या पायाला बांधून हत्तीवर माहुत बसला त्यामागे बाळोजी कुंजर बसला आणि वाड्यापुढच्या पटांगणात हत्तीला फिरवले, हत्तीमागे विठोजीराजे यांची पत्नी कडेवर लेकरू घेउन विनवणी करत होती, वाटेल तो दंड घ्या, मी तुमची बटीक होऊन राहील पण माझं कुंकू कायम ठेवा असं बाळाजी कुंजर ला विनवणी करीत होती पण कोणीच पुढे येत नव्हता. पेशवा हा नंगानाच उघड्या डोळ्यांनी नगरखान्याच्या मोठ्या खिडकीतून बघत होता मात्र "सुभेदारी पाहिजे ना मग घे सुभेदारी" म्हणून विठोजीराजे यांना फरपटत होता. शनिवारवाड्यासमोरची माती पार रक्ताने लालभडक झाली होती आणि बाळोजी मात्र मोठमोठ्याने हसत होता. पेशव्या सोबतचे शिंद्यांसह बाकी सरदार मोठ्याने ओरडून बाळोजींना सांगत होते की "हत्ती तसाच जोरात चालू द्या, सुभेदारीची वस्त्रं चांगली लेवू द्या, पुरा लोळागोळा झाल्याशिवाय हत्ती थांबवू नका." शेवटी विठोजीराजेंचा आत्मा शांत झाला, डोक्याचा चेंदामेंदा झाला होता, हातपाय तुटून मैदानात पडले होते. ते मांगाकडून गोळा करून शनिवार वाड्यात पुढच्या चौकात उघड्यावर ठेवले, जाता येता "सुभेदार" असं हेटाळणीनं म्हणून त्यावर थुंकत होते. शेवटी पाराजीपंतांनी विनवणी करून तो मुडदा ताब्यात घेऊन दहनकर्म केला.
       एवढे ऐकून यशवंतराव होळकरांचाच काय कोणत्याही मराठ्यांचा संताप वाढला असता, सोबत्यांनी शेवटी डाव साधला त्यामुळे आता रडत बसायचे नाही, पेशव्यांच्या सल्लागारांनी-शिंद्यांनी पेशव्यांना भरीस घातले असून आता शिंद्यांना चांगला धडा शिकवलाच पाहिजे. श्रीमंतांची भेट घेऊनच शिंद्यांना समोरासमोर घेऊन शहानिशा करावी लागेल की होळकरांची गादी राहीली पाहिजे का नाही ते... पण पुढे पुण्यात जो होळकरी दंगा झाला त्याबद्दल सर्वांना माहीतच आहे. पुण्याजवळ यशवंतरावांची छावणी पडली होती. मसलतीसाठी होळकरशाहीचे एकेक महाल परगणे घशात घालू पाहणारे शिंदे-पेशवे एकत्रित येत नव्हते उलट यशवंतरावांचा बंदोबस्त करण्यासाठी पाऊले उचलली जात होती. शेवटी हडपसर येथे शिंद्यांचे-पेशव्यांचे सैन्य तोफासहित यशवंतराव होळकरांच्या स्वागताला उभे होते. यशवंतराव होळकर देखील काय कमी नव्हते अख्ख्या हिंदूस्थानभर गाजलेली नावाजलेली फौज यशवंतरावांकडे होती. शिंदे-पेशव्यांकडून पंचवीस तोफा सोडल्यानंतरच यशवंतरावांनी त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरवात केली. आणि बघता बघता शिंद्यांची-पेशव्यांची फौज कापत ती वानवडी पर्यंत रेटत नेली. सगळीकडे शिंद्यांच्या-पेशव्यांच्या सैनिकांची हाडे पसरली होती. शेवटी शिंदे-पेशव्यांचे काही सरदार रणांगणातूनच पळून गेले. यशवंतरावांनी पुणे जाळले तोपर्यंतच कोण जिंकले कोण हारले हे न बघता भितीपोटी खुद पेशवा आणि बाळोजी हे मल्हारबाबांचा(द्वितीय) पुत्र  खंडेराव होळकर (द्वितीय) यांना घेऊन कोकणात पळून गेले. ते पुन्हा यशवंतराव होळकरांनी विनवणी करून देखील माघारी आलेच नाहीत. शेवटी फौजेच्या दाणागोट्यासाठी, अन्नपाण्यासाठी मंदिरातील पैसा बाहेर काढावा लागला त्याबद्दल काही जातीयवादी इतिहासकार यशवंतराव होळकर यांना बंडखोर, चोर, लुटारू असे संबोधून त्यांना इतिहासात बदनाम करून टाकले आणि ज्यांना खरंच बदनाम करायला हवं होतं त्या शिंद्यांना आणि पेशव्यांना डोक्यावर घेतले हा कोणता इतिहास आहे?
       वसईच्या तहानंतर खुद पेशव्यांनी यशवंतराव होळकर यांना पत्र लिहून सांगितले होते की होळकरांचे राज्य इंग्रज अधिकाऱ्याच्या स्वाधीन करावे, मात्र राष्ट्रप्रेमी असलेल्या यशवंतरावांना पेशव्यांकडून हे अपेक्षित नव्हते. यशवंतरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जे ब्रिटिश या भारतात हळूहळू पाय पसरू लागले आहेत त्यांना हाकलून लावायचे सोडून त्यांचे गुलाम बनण्यापर्यंत पेशव्यांची मजल जाते. यशवंतराव संतापले आणि त्यांनी इंग्रजांच्या विरोधात रणशिंग फुंकले मग सुरू झाली स्वातंत्र्याची लढाई, इंग्रजांना सळो की पळो करून सोडून अक्षरशः त्यांना रणांगणात कापुन काढून ब्रिटिशांना गुडघे टेकायला भाग पाडणारा यशवंतराव होळकरांव्यतिरीक्त दुसरा तिसरा कोणी जन्माला आलाच नाही. कोसो कोसो पाठलाग करून गणिमी काव्याने हल्ले करण्याचा सपाटा यशवंतराव होळकर यांनी चालवला होता त्यामुळे फिरंगी (ब्रिटिश फौज) मेटाकुटीला आले होते. अशा प्रकारे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल एकोणीस लढायांमध्ये इंग्रजांना हरवणारा भारताचा हा नेपोलियन बोनापार्ट नावारूपास आला. परंतु छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर आणि नेपोलियन बोनापार्ट हे दोघेही समकालीन असल्याने छत्रपती यशवंतराव होळकर हे एकमेवाद्वितीय अजिंक्य योद्धे ठरले. अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज फौजांची इभ्रत (इज्जत) जगाच्या वेशीवर टांगणारा जगाच्या पाठीवर होऊन गेलेला एकमेव धुरंधर महायोद्धा म्हणून छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांना ओळखले जाऊ लागले.
     परकीयांप्रमाणेच छत्रपती यशवंतराव होळकर यांना स्वकीयांपासून देखील अनेक अडचणी आल्या होत्या तरीही न खचता न डगमगता मोठ्या धैर्याने आणि शौर्याने एक ना अनेक संकंटाचा सामना करत इंग्रज सैन्याला सळो की पळो करून सोडले आणि स्वतःला सम्राटांचा सम्राट चक्रवर्ती सम्राट म्हणून सिद्ध केले अशा या महायोद्ध्याचा जन्म ३ डिसेंबर १७६६ रोजी वाफगाव (राजगुरूनगर) ता.खेड जि.पुणे येथे झाला होता आज त्यांची २५२ वी जयंती त्यानिमित्त माझ्यासारख्या पामराकडून अशा या महान योद्ध्याला विनम्र अभिवादन... कोटी कोटी प्रणाम...
रणधुरंदर लढवय्या, रणझुंजार योद्धा
असा राष्ट्रप्रेमी जातीवंत ।।
स्वकीयांसह ब्रिटीशांनाही पुरून उरला
माझा महाराजा यशवंत ।।
शत: शत: नमन करूनी वंदितो तुजला
तुझ्या चरणाची मी धूळ भाग्यवंत ।।
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com