Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday 26 October 2019

धनगरांनो आतातरी डोळ्यावरचं घोंगडं बाजूला करा : नितीनराजे अनुसे



       भारत हा तसा सर्वात मोठी लोकशाही असलेला लोकशाही प्रदान देश आहे. हे आजपर्यंत नागरिकशास्त्रात वाचायला भेटायचे परंतु खरंतर लोकशाही (?) म्हटलं की आता प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. खरंच इथे लोकशाही आहे का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य दिले, मतदानाचा अधिकार दिला परंतु आम्हाला त्याचा योग्य वापरच करता येत नसेल तर त्या व्यक्तिस्वातंत्र्याला आणि मतदानाच्या दिलेल्या अधिकाराला अर्थच काय उरतो बरे?
       असो आता थोडसं मी माझ्या धनगर समाजाकडे वळतो. कदाचित काहीजण मला जातीयवादी म्हणतील सुद्धा... पण हरकत नसावी कारण या भारत देशात मला कळतंय असे जातपात विरहित आणि धर्मनिरपेक्ष पणे राज्यकारभार चाललेला कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे मला जातीयवादी म्हणणारे अगोदरच जातीयवादी असतील त्यात तीळमात्र शंका नसेल. एकेकाळी राजा समाज असणाऱ्या या धनगर जमातीने आज स्वतःचीच अवस्था काय करून ठेवली आहे ते लोकसभा आणि विधानसभेच्या निकालातून स्पष्ट दिसून आलेच असेल. इ.स.च्या पूर्वीपासून या धनगर जमातीने हिंदुस्थानच नव्हे तर आशिया खंडाच्या विशाल भूभागावर जवळपास १८०० वर्षे राज्यकारभार केला होता. त्यावेळची सत्ताधारी आणि शक्तिशाली असलेली ही धनगर जमात आज गुलामगीरीचं जगणं जगत बसली आहे यापेक्षा सर्वात मोठे दुर्दैव काहीच नसावे.
       जेव्हा बापूसाहेब कोकरे अर्थातच धनगरांचा क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब नावाचे वादळ महाराष्ट्र राज्यात घोंघावत होते. तेव्हा त्या माणसाने स्वतःच्या घरादाराची राखरांगोळी करून यशवंत सेना स्थापन केली आणि त्या माध्यमातून बी.के.कोकरे साहेब महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाजाला जागे करत होते तेव्हा एका माजी मुख्यमंत्र्याला भरसभेतून सांगावे लागले की "बाबांनो या महाराष्ट्र राज्यातील जो धनगर समाज आहे तो धनगर समाज शांत निपचित झोपला आहे. त्या समाजाला तसेच झोपू द्या, हवं तर एकाऐवजी दोन दोन घोंगडी टाकून तसेच झोपी घाला. नाहीतर तो धनगर समाज जर जागा झाला आणि राजकारणात/सत्ताकारणात येऊ लागला तर आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना राजकारण करता येणार नाही." त्या गुरूचे शब्द शिष्याने नीट ध्यानात ठेवले आणि पहिला बळी घेतला तो क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांचा... प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या एखाद्या समाजाला अजून ४०-५० वर्ष मागे फेकायचे असेल तर त्या समाजाच्या नेतृत्वाचे खच्चीकरण करायचे आणि नेतृत्व संपवायचे ही चाणक्य नीती नव्हे तर पवार नीती आहे. असे इतिहासातील कितीतरी दाखले देता येतील. त्यातीलच एक म्हणजे खुद्द चाणक्याने चंद्रगुप्त मौर्य यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मगधचा राजा धनानंदाचा नाश केला. आजही महाराष्ट्र राज्यातील चाणक्याच्या वारसदारांनी धनगरांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून धनगरांचेच नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला तो तर उघडच आहे.
         खरंतर आम्ही अभिमानाने सांगतो की कधीकाळी अर्धा संसार घोड्याच्या पाठीवर लादलेल्या त्या घोड्याचा लगाम हातात धरून आई-बापासोबत माळराने, दगडधोंडे तुडवत, काट्याकुट्यातून अनवाणी पायाने वाट काढत चालणारी धनगर समाजातील युवा पिढी शिकली/सवरली आहे तीच युवा पिढी आज समाजाला आंधकारातून आणि अज्ञानाच्या खाईतून बाहेर काढेल. परंतु तसे झाले नाही उलट त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना दोन-चार शब्द शिकायला शाळेत पाठवणाऱ्या त्या आई-बापाचा विश्वासघात झाला आहे असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही. अरे ज्या बापाने पायाच्या नडग्या वाळवत माळरानं तुडवली, जो पहाडासारखा शेळ्या-मेंढ्यामागे उभा राहिला. ऊन पाहिले नाही, वारा पाहिला नाही ना पाऊस... धो धो कोसळणाऱ्या पावसात सुद्धा तो उभा राहून मेंढ्या राखत होता तो दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी नव्हे तर माझा पोरगा शिकला तर सावलीतली ती पण खुर्चीवरची नोकरी करून आम्हाला सुख लावेल म्हणून... भरपावसात त्या बापाने घेतला असता थोडासा अडोसा आणि घेता ही आला असता, झोपला असता डेरेदार वृक्षाच्या सावलीखाली शांत निपचित पण काय करणार एखादा गावगुंड आला तर कोकरू उचलून घेऊन जाइल, एखादा लांडगा आला तर मेंढरू पळवून घेऊन जाइल मग मी माझ्या पोराला शिकवायचा कसा? त्याला अधिकारी बनवायचा कसा? पोरीचं लग्न करायचं कसं? हा विचार करत करत पोटाच्या तुंबड्या भरण्यासाठी आज इथे तर उद्या तिथे, जिथे रात्र होईल तिथे तीन दगडाच्या चुलीवर स्वयपाक करून अर्धीकोर खाऊन जमिनीचे अंथरूण आणि आकाशाचं पाघरून करून दगड उशाला घेऊन झोपणारे व पाऊस आला तर भरपावसात चवढ्यावर बसून रात्र रात्र काढणारे आई-बाप आमच्या समाजातील पोरांना आठवले नाहीत मात्र पुढच्या सात पिढ्या राजकारणातून बरबाद होऊ नयेत म्हणून एकदाच पावसात भिजत भाषण ठोकणारे शरद पवार त्या पोरांना बाप वाटले. इथंच आमच्या पोरांच्या शिक्षणाचा आणि त्यांनी शिक्षण घेऊन प्रगती करावी म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, त्यांच्यासाठी भर उन्हातान्हात, भर पावसात ठेचा खाणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचा पार सत्यानाश झाला.
          समाजाला काय हवं आहे आणि काय दिले आहे प्रस्थापित नेत्यांनी? याचा आम्ही कधी विचार केलाच नाही ना...? कदाचित करणार पण नाही कारण आम्ही आमची बुद्धी दुसऱ्यांच्या बुटाखाली गहाण ठेवली आहे. म्हणूनच... या महाराष्ट्र राज्यात कोपर्डी मध्ये ज्या बहिणीची हत्या झाली तिच्या समर्थनार्थ प्रत्येक जिल्ह्यातून क्रांती मोर्चा, मूक मोर्चा निघाला त्या कोपर्डी घटनेचा निषेध आम्हीही केला, आमचेही धनगर समाजबांधव त्यात सहभागी झाले. कारण विषय माणूसकीच्या नात्याचा आणि कोपर्डीच्या बहिणीचा होता. मग पुरंदर येथे आमच्या मेंढपाळांच्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा कोणी साधा निषेधही करत नाही. तेव्हा कुठे जाते माणूसकी? तेव्हा कुठे असतात पावसात चिंब भिजून मजा घेत भाषण करणारे नेते? कुठे असतात जिजाऊंच्या लेकी? ज्या लोकसभा मतदारसंघात ती घटना घडली त्या मतदारसंघाची खासदार सुप्रिया सुळे कुठे होती? एक स्त्री असूनसुद्धा ती कधी विचारायला तरी तिथपर्यंत गेली का? धनगर नेत्यांच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा कोणी मॉसाहेबा जिजाऊचा शिवबा तिथे गेलाच नाही, नाही शिवबाचा मावळा तिथे पोहचला. मग त्या पिडीतांना कोण कोण भेटायला गेले होते, ज्या मेंढपाळांना मारहाण झाली त्यांना कोणी भेटी दिल्या? ज्यांच्या मेंढ्या कोणी उचलून नेल्या होत्या त्यांच्या मेंढ्या कोणामुळे परत मिळाल्या? कोण कोण मुंबईच्या विधनभवनात घुसून पुरंदरच्या ताईला न्याय मागत होते, कोणा-कोणावरती त्यासंदर्भात केसेस झाल्या ते बातम्या काढून बघा,  मग विचार करा धनगर नेत्यांव्यतिरीक्त कोणी केसेस घ्यायला का नाही आला? ज्यांच्यावर केसेस झाल्या त्या महाराष्ट्र यशवंत सेनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रक प्रकाशित करून सांगितले होते की बाबांनो धनगरांचे राजकीय आस्तित्व धोक्यात आहे त्यामुळे धनगर उमेदवारांना निवडून आणा... मग कितीजणांनी त्याचे आचरण केले? का त्यांनीच काय मक्ता घेतलाय का? घरात बसून सोशल मीडियावर गप्पा मारायला कोणालाही आणि खूप जमतं पण... ग्राउंड लेव्हलला कधी तुम्ही संघर्ष केला आहे का? जो धनगर समाजातील प्रत्येक नेत्यांनी केला आहे. कोणी मदतीला आला नाही कोणी निषेध करायलाही आला नाही तरीसुद्धा त्या धनगर नेत्यांनी घातलेली बिरोबाची शपथ तुम्हाला आठवते पण धनगर समाजाचं वाटोळं ज्या प्रस्थापितांनी केले तेच तुम्हाला बाप वाटतात वाह! रे पोट्टे हो... आणि पुन्हा सांगत बसता बिरोबाने कोप केला म्हणून...? तुमच्या लाचारीचे, तुमच्या उचलेगिरीचे, अन्याय अत्याचार सहन करण्याचे बिरोबाला तरी चांगले वाटते का? पण काय बिरोबाच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहचलेले धनगर नेते दिसत नाहीत, बिरोबाच्या रूपाने विधानभवनात घुसून न्यायासाठी घोषणा केलेले महाराष्ट्र यशवंत सेनेचे मावळे कदाचित दिसले नसतील. कारण त्या पुरंदरच्या घटनेतील ती बहिण आम्हाला आमची कधी दिसलीच नाही पण तेव्हा नक्कीच दिसेल जेव्हा तुमच्या-आमच्या पैकी स्वतःची बहिण तीच्या जागी असेल... तेव्हा धनगर नेत्यांच्या नावाने खडे फोडू नका म्हणजे झालं. परंतु इथून पुढच्या काळात एखाद्या मेंढपाळाची मेंढरं एखाद्याच्या शेतात गेली तर मारहाण झाल्यावर मुडदे जरी पडले तर कोण येणार आहे का विचारायला? तुमच्या-आमच्या आई-बहिणींची जरी अबू लुटली तर कोण येणार आहे का वाचवायला? तुमच्या जमिनी लुबाडल्या नरडीवरुन फासाचा नांगर जरी चढवला तर आता कोण आहे का तुम्हाला विचारायला? एकवेळ अशी होती जेव्हा ना.प्रा.राम शिंदे साहेब आणि ना.महादेवजी जानकर साहेब मंत्री होते तेव्हा मी स्वतः मंत्रालयात जाऊन त्यांच्या ऑफिसमधून फोन करायला लावले होते. पण आता अशा घटना घडल्यानंतर सांगायचे कोणाला? बोलायचे कोणाला? पावसात भिजत भाषण ठोकणाऱ्यां त्या बापाला धनगरांची एवढी काळजी असती तर स्वतःच्या पोरीला पुरंदरच्या त्या आमच्या ताईची विचारपूस पाठवले नसते का?
         दोन-चार शब्द लिहायला वाचायला शिकला, पुण्या-मुंबई सारख्या शहरात राहिला, दोन-चार रूपडं कमवायला लागला म्हणजे तुम्हाला फार मोठी अक्कल यायला लागली असे होत नाही. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असला तरी ५ वरून १ वरती येणे म्हणजे परिवर्तन नव्हे तर राजकारणापासून परावर्तन होय. राजकारण हे राजकारणाच्याच पद्धतीने जाऊ द्यायचे असते भले ते भावनिकतेवरती चालत नसते हे जरी मान्य असले तरी प्रस्थापितांच्या गुलामगीरीचं ओझं कधीपर्यंत वाहायचं, अन्याय अत्याचाराच्या रहाटगाडग्यात कधीपर्यंत पिचत राहायचे? हे जर समजत नसेल तर त्या शिक्षणाचा काय अर्थ? जे शिक्षण आई-वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुम्हा-आम्हाला दिले. इथली प्रस्थापित व्यवस्था धनगर समाजातील नेतृत्व संपवण्यासाठी चंग बांधून बसली होती हे सर्वज्ञात असताना आपल्याच समाजातील खुळचट मंडळी स्वतःचाच आणि स्वतःच्या समाजाचा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहत बसत असतील तर धनगर समाजाचे २०१४ ला ५ आमदार विधानसभेत गेले होते त्यावरून ते २०१९ ला १ वरतीच येणार आणि हे असेच जर चालत राहिले तर २०२४ ला इतिहासात जमा होणार. राजकारणाच्या चाली एकट्या पवारांनी अथवा पेशव्यांच्या औलादींनी खेळाव्या असे नाही तर धनगर समाजाचा एखादा नेता अशी चाल खेळला तर भावनिक व्हायचे नसते. वस्तुस्थिती अशी आहे की धनगर
नेत्याचे आपणच असे खच्चीकरण करत असतो की शरद पवारांची आणि ब्राह्मणांची चाणक्य नीती आपल्यावर कधी लागू झाली तेच कळत नाही. कारण आम्ही अभ्यास करत नाही, इतिहास वाचत नाही. फक्त तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळे होतो आणि निकाल हाती आल्यावर त्याच धनगर नेत्यांच्या नावाने तुणतुणे वाजवत बसतो हीच का आमची राजकीय प्रगल्भता? हीच का आमची सामाजिक आणि वैचारिक प्रगल्भता? यास नेते सुध्दा अपवाद नाहीत ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत जेवढा समाज जबाबदार आहे... एखादा सांगायला गेला तर तो फार शहाणा वाटतो परंतु जो सांगतोय तो अभ्यास करूनच विचार करूनच सांगतोय याकडे लक्ष नसते. फक्त अहंकार नसानसात ठासून भरलेला असतो. आणि तोच अहंकार आज धनगर समाजाचा सर्वात मोठा शत्रू होऊन बसलाय.
         खरंतर संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व कधी संपत नाही. जरी धनगर समाजातील नेते निवडणुकीत पडले असतील पण ते हरले नाहीत आणि हरणार सुद्धा नाहीत. खरंतर प्रस्थापितांच्या पवार नीतीमुळे नेत्यांचेच नाही तर अखंड धनगर समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे हे जर शिकलेल्या सवरलेल्या युवा पिढीला कळत नसेल, अन्यायची चीड येत नसेल तर काबाडकष्ट करून, भटकंती करण्यासाठी गेल्यावर शेतकऱ्यांच्या शिव्याशाप खाऊन तुम्हा-आम्हाला शहाणपण यावं म्हणून शिकवणाऱ्या आई-बापाचं कष्ट हे निरर्थक म्हणावे लागेल. जर समाजाचा विकास करायचा असेल/प्रगतीपथावर जायचे असेल तर समाजाला राजकारणाशिवाय दुसरा तिसरा कोणताही मार्ग नाही. अजून कधीपर्यंत झोपेचं सोंग घेऊन बसणार आहात? अजून कधीपर्यंत अन्याय सहन करणार आहात? आतातरी डोळ्यावरचं घोंगडं बाजूला करा आणि घोंगड्याची ताकद दाखवून द्या. त्यासाठी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र नेहमी लक्षात ठेवूनच एक व्हा, नेक व्हा.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंत!
     ✍️️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+918530004123

Saturday 19 October 2019

समाजाने सामाजिक आणि वैचारिक प्रगल्भता जोपासावी : ✍️नितीनराजे अनुसे



          राजसत्ता आणि राजपथ कधी मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो हे तत्त्व आदरणीय ना.महादेवजी जानकर साहेब आजही सांगतात.  शिवाय राजकारण हा विकासापर्यंत पोहचण्याचा एकमेव मार्ग आहे असे  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. *आजच्या राजकारणात समाजकारणात तुमच्या-आमच्या सारख्या सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या व्यक्तिंमुळे आणि सहकार्यामुळे समाजातून अशी कितीतरी नवनविन नेतृत्वं घडत असतात तयार होत असतात.* अपवादात्मक काहीजण त्याचा गैरवापर करून स्वताची घरं भरत असतात म्हणून त्याचा दोष उर्वरित इतरांना देऊन चालत नाही अथवा सत्तेचा वापर केवळ जनतेच्या विकासासाठीच करणारे नेतृत्व खोडून चालणार नाही कारण ते नेतृत्व घडण्यासाठी फार मोठा संघर्ष केलेला असतो फार मोठा लढा दिलेला असतो. प्रस्तापितांकडून होणाऱ्या त्रासाला न जुमानता नजरेस नजर मिळवून छातीठोकपणे त्यांच्या विरोधत त्यांच्या नाकात दम ठोकून तयार झालेली नेतृत्व सहजासहजी मिळत नाहीत. आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणीसाठीचा लढा अर्थातच धनगर समाजाचा जीवनमरणाचा, आत्मियतेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण सर्वजण आपापल्या परीने वेगवेगळ्या मार्गाने लढा उभारत आहोत. मग रस्त्यावरची लढाई असो अथवा ती न्यायालयीन लढाई असो. असे असताना आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकांमध्ये सर्वच पक्षातून तर कोणी अपक्ष मधून धनगर समाजाचे उमेद्वार जय्यत तयारी करून मैदानात उतरले आहेत. अर्थातच सामाजिक प्रबोधनातून जनजागृतीतून समाजात हळूहळू परिवर्तन होत चालल्यामुळे पुर्वीपेक्षा राजकारणात आणि समाजकारणात धनगर समाजाचा टक्का वाढतोय हे कोणीही नाकारू शकत नाही. पण एवढ्यावरच आपल्याला थांबून चालणार नाही तर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर जास्तीत जास्त उमेद्वार पाठवल्यानंतर विधानसभा/विधानपरिषद आणि लोकसभा/ राज्यसभा यांसारख्या ठिकाणी धनगर समाजाची माणसं पोहचणे आवश्यक आहे जेथून जनतेच्या विकासाच्या चाव्या फिरवल्या जातात. ज्याठिकाणी कायदे बनवले जातात त्याठिकाणी आपली माणसं असायला हवीत आणि ती काय सहजासहजी तयार होत नाहीत ते नेतृत्व घडावयास फार काळ लागतो मग *विधानसभेच्या निवडणूकांमधून आपल्याच माणसांना पाडायचा विचार करत असाल तर महाराष्ट्र राज्यातून परिणामी भारत देशातून कित्येक नेतृत्व उभे करायच्या ऐवजी जर ते खोडायचंच काम करणार असाल तर मग कशाला हवंय समाजप्रबोधन? कशाला पाहिजे समाजजागृती?? कशाला पाहिजे समाजाला सत्तेत वाटा?? जे आजपर्यंत पुर्वीपासून चालत आले आहे तेच चालुद्या ना मग...* आम्ही पाठीमागे आहोत आमचा समाज पाठीमागे आहे, आमचा विकास होत नाही, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये, विधानसभेत, लोकसभेत आजपर्यंत धनगर समाजाव्यतिरिक्त ज्याला ज्याला पाठवले त्यांनी समाजाचे नव्हे तर जनतेचे काहीच काम केले नाही या गोष्टी ओरडून ओरडून सांगायची गरजच काय? इतर नेते चुकीचे वागले तर त्यांची चुक पोटात घालून ठेवता मग धनगर नेत्यांकडून चुका झाल्या तर लगेच पित्त का खवळते? का तर आपला आहे म्हणूनच ना? मान्य आहे की आपला आहे म्हणून परंतु तुमची माथी भडकवणारी इतर जातीमधील लोकं आपल्याच समाजात भांडण लावताहेत हे कधी समजणार आपल्याला?
         आज कुठेतरी संघर्षात्मक लढा देऊन धनगर समाजातून तयार झालेले नेतृत्व उदयास येत असताना त्याचा फायदा समाजाला मिळेलच त्यात काही वाद नाही पण भाजपाने धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल काही पाऊले उचलली नाहीत म्हणून जर त्या पक्षातील आपल्याच जमातबांधवांना पाडणार असाल तर मग विरोधकांच्यात आणि आपल्यात फरक तर काय राहिला? असेही विरोधकांनी धनगर आरक्षणासाठी किती दिवे लावून ठेवलेत? एकीकडे इतर समाजातील काही मंडळी त्यांच्या आरक्षणासाठी जातबांधवांनाच मतदान करायचे ठरवून सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा कशा ताब्यात घेतां येतील याची व्यूहरचना आखून ते यशस्वी सुद्धा झाले, मग तो उमेद्वार कोणत्याही पक्षाचा असो एका पक्षातून मजबूत नेतृत्व उभा करायचे तर दुसऱ्या पक्षातून केवळ नाममात्र उमेद्वार द्यायचा जेणेकरून मजबूत आणि जनतेत ओळख असलेल्या उमेद्वारांना निवडून आणायचे ही त्यांची खेळी आहे. आपल्या समाजात मात्र तसे काही होताना दिसून येत नाही केवळ पाय ओढायचेच काम चालू आहे असे दिसून येतेय. मग आपल्यातलेच जमातबांधव आपल्यातल्याच जमातबांधवांना घरात बसवण्याच्या वल्गना करताना दिसून येतात यात कोणते शहाणपण आहे ते मला तर कळत नाही. मग कसा होणार समाजाचा विकास? कोण करणार समाजाचा विकास?? आजपर्यंत इतरांनी किती आपला विकास केला? म्हणून आता करणार आहेत? मग आपल्याच जमातबांधवांना घरात बसवून काय साध्य करणार आहात??
         बांधवांनो मी काही फार मोठा विचारवंत आहे अशातला विषय नाही पण मला जे विचार सुचले जे योग्य वाटले म्हणून ते मी या माध्यमातून मांडले. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात त्याबद्दल दुमत नाही पण आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत, रस्त्यावरची तसेच न्यायालयीन लढाईसाठी देखिल आपण सज्ज आहोत. जर अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर त्या आरक्षणाच्या आधारे अनेक राखीव जागा मिळतीलही पण आतापर्यंत संघर्षातून तयार झालेले आणि संघर्षातून, सामाजिक लढ्यांतून तयार होणारे नवयुवकांचे नेतृत्व खोडून टाकले तर ते पुन्हा तयार व्हायला, पुन्हा नेतृत्व घडायला फार वेळ लागेल आणि त्यामुळे अजून कितीतरी पिढ्या यामध्ये भरडल्या जातील या गोष्टीची जाण असायला हवी. *पायात पाय अडकवून पाडणाऱ्यांपेक्षा हातात हात देऊन पडलेल्यांना उठवण्यास मदत करणारा श्रेष्ठ असतो हे लक्षात असु द्या.*विधानसभेच्या माध्यमातून आपल्या समाजबांधवांच्या मुलभूत गरजांची पुर्तता आपण करू शकतो म्हणूनच मला म्हणायचे आहे की *एकवेळ जास्तीत जास्त उमेद्वार उभे करायला शिका एकवेळ नाही निवडून आले तरी चालतील पण तो केवळ भाजपाचा आहे, राष्ट्रवादीचा आहे आमुक पक्षाचा आहे तमूक गटांचा आहे म्हणून त्याला पाडायचा प्रयत्न करू नका एवढीच कळकळीची नम्र विनंती.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंत!
     *✍️️नितीनराजे अनुसे✍️️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+918530004123
nitinrajeanuse123.blogspot.com

Tuesday 15 October 2019

कोण आहेत गोपीचंद पडळकर? ✍️नितीनराजे अनुसे

कोण आहेत हे गोपीचंद पडळकर?

         एकेकाळी कोणतेही वर्तमानपत्र अथवा मिडिया साधे ज्या माणसाचे नाव सुद्धा घ्यायला टाळत होती आणि आज मात्र महाराष्ट्र राज्यातील युवकांनी अगदी डोक्यावर घेतलेले व्यक्तिमत्त्व, टीव्ही चैनल्स, वर्तमानपत्र आणि समाज माध्यमांना गोपीचंद पडळकर यांच्या नावाची, घोषणेची दखल घेतल्याशिवाय त्यांची हेडलाईन बनत नाही असे गोपीचंद पडळकर आहेत तरी नक्की कोण? राजकारणात नावारूपाला आलेल्या पडळकर यांच्या कुटूंबाची पार्श्वभूमी आणि त्यांचा राजकीय प्रवास काय याबद्दल काहीजणांना उत्सुकता लागली असावी.
        माणदेश हा तसा दुष्काळी पट्टा म्हणून सर्वज्ञात आहे.          त्याच माणदेशाच्या दुष्काळी पट्ट्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका तसा आजही संघर्षाच्या कथाच गिरवतोय. तिथला शेतकरी स्वातंत्र्य पूर्व काळापासून दुष्काळाशी दोन हात करून आजही टिचभर पोटाच्या तुमड्या भरायला अर्धीकोर खाऊन कसाबसा जगतोय म्हणजेच संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे. याच मातीतील थोर साहित्यकार  ग.दि.माडगूळकर, बनगरवाडी या गाजलेल्या कादंबरीचे लेखक व्यंकटेश माडगूळकर, तराळ-अंतराळचे कादंबरीकार शंकरराव खरात, ना.सि.इनामदार अशा प्रख्यात लेखकांनी, कादंबरीकरांनी संघर्षातूनच संघर्ष गाथा गिरवल्या आणि त्या गाथा साता-समुद्रापार ऐकवल्या.
         तेव्हाचा तो आटपाडी तालुका तसेच जत, कवठेमहांकाळ व खानापूरचा काही भाग आजही दुष्काळाच्या छत्रछायेखाली असून त्या झळया सोसतोय. परंतु तिथली हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रस्थापित घराणी सोडली तर प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष आणि संघर्षच आला आहे. स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर स्व.नागनाथअण्णा नायकवडी यांनी आटपाडी तालुक्यासाठी पाण्याचा संघर्ष सुरू केला. त्यांना स्वातंत्र्य सैनिक स्व.जी डी बापू लाड, जेष्ठ अभिनेते स्व.निळू फुले तसेच जेष्ठ नेते आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचीही साथ मिळाली. दरवर्षी २६ जून ला पाणी परिषद व्हायची परंतु क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या निधनानंतर ती पाणी परिषद बंद झाली. आटपाडी, सांगोला, जत, माण तालुक्यातून, प्रत्येक गावागावांतून हजारोंच्या संख्येने लोक एकत्रित यायचे, पाण्यावरती चर्चा व्हायची, मनोगते व्हायची, उन्हातान्हात मिळेल त्या जागेवर बसून लोक सभा ऐकायचे सभा संपायची आणि सगळे जिकडच्या तिकडे निघून जायचे. परंतु प्रस्थापित व्यवस्था, राज्य सरकार याची दखल घेत नव्हते. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या अथक प्रयत्नानंतर/संघर्षानंतर १९९६ साली टेंभूसाठी (Tembhu Lift Irrigation Scheme) मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि स्व.नागनाथअण्णा नायकवडी हे टेंभू योजनेचे खरे जनक ठरले. परंतु २३ वर्षे उलटून देखील ही योजना अजून पुर्णत्वास आली नाही हे आटपाडी तालुक्याचेच नव्हे तर सांगली जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. आजपर्यंतच्या लोकसभा/विधानसभा निवडणूक या केवळ आणि केवळ पाण्यावरतीच झाल्या परंतु जातपातीचे/गुंडगिरीचे/जिरवाजिरवीचे राजकारण करण्यापलीकडे एकानेही सांगलीचा खऱ्या अर्थाने विकास केला नाही.
    जर जनतेला न्याय द्यायचा असेल तर संघर्षाशिवाय दुसरा तिसरा चौथा कोणता मार्ग शिल्लकच नाही असा विचार करून सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे गावच्या नैऋत्येस असलेल्या पडळकरवाडी गावचे सुपूत्र गोपीचंद कुंडलिक पडळकर या तरूणाने २००६ मध्ये राजकारणात पाय ठेवला. वक्तृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर हे उमदे नेतृत्व पुढे आले. खरंतर जन्मापासूनच या तरूणाने संघर्ष कोळून प्याला आहे. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच ब्रेन ट्यूमर सारख्या भयंकर आजाराने वडिलांचे छत्र हरपले. वडिलांची सेवा करता करता मोठे बंधू देखील देवाघरी गेले. आई सोबत मोलमजुरी करून प्राथमिक-माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढे द्वितीय बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी गलाई दुकानदारी केली त्यातून उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षण पूर्ण करून नागज फाटा येथे  ढाबा सुरू केला. त्यातून हळूहळू व्यवसायात प्रगती होत गेली आणि २००६ साली रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.महादेवजी जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याची राष्ट्रीय समाज पक्षाची धुरा खांद्यावर घेतली. बघता बघता गोपीचंद पडळकरांची तोफ सांगली जिल्हाभर धडकू लागली, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी जागृत होऊ लागला, सर्वसामान्य जनतेच्या मनात स्वाभिमान धडधडू लागला तशी आटपाडी तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली, पडळकरांच्या तोफांच्या माऱ्याने आगगोळे प्रस्थापितांवर दणादण आदळू लागले आणि त्या आगगोळ्याने प्रस्थापित, आमदार, खासदार, मंत्री देखील होरपळू लागले, पडळकरांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी मेळावे, चारा छावण्यांसाठीची आंदोलने, मोर्चे होऊ लागले तसतसे दुखलेले खुपलेले लोक पडळकरांच्या भोवती गोळा होऊ लागले नव्हे तर गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील युवकांच्या गळ्यातील ताइत बनले. पुढे अल्पावधीतच २००९ साली विधानसभेची निवडणूक लढवून जवळपास २०,००० हजाराच्या संख्येने मतदान खेचून आणले आणि तिसऱ्या नंबरचे दखलपात्र नेते ठरले. याची धास्ती प्रस्थापितांनी घेतली आणि त्यांच्यावर खोट्या केसेस घालण्यात आल्या. अगदी स्त्रियांच्या मंगळसूत्र चोरीच्या केसेस ज्यामधे गोपीचंद पडळकर यांना कोर्टाने निर्दोष सिद्ध केले. पुढे २०१२ ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकांत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे मतदान पडळकरांच्या पैनल कडे होते त्यामुळे प्रस्थापितांची अजूनच डोकेदुखी वाढली आणि मग पुन्हा सुरू झाल्या चोरीच्या खोट्या केसेस. पुढे २०१३  साली तालुक्यातील २० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर पडळकरांच्या नेतृत्वाखाली रासपचा झेंडा फडकवला आणि युवकांना सोबत घेऊन पाण्याचा संघर्ष हाती घेऊन तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील यांची गाडी आडवणे, शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून टेंभू कार्यालय फोडले, आटपाडी तालुक्याला पाणी मिळावे म्हणून राजेवाडीचा उजवा कालवा फोडला अशी एक ना अनेक जनतेच्या हिताचे प्रश्न हाती घेऊन पडळकर यांनी संघर्ष केला परंतु त्यांच्यावर अनेक खोट्या केसेस दाखल केल्यामुळे त्यांना जिल्हा हद्दपारीचे नोटीस बजावली होती. परंतु वैयक्तिक कारणासाठी त्यांनी आंदोलन मोर्चे केले नव्हते तर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सुखात जगता यावे, त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, न्याय मिळावा या हेतूसाठी त्यांच्यावर केसेस झाल्या असल्याने प्रांताधिकाऱ्यांनी त्या केसेस हटवायला लावून गोपीचंद पडळकर यांचे जिल्हा तडीपार रद्द झाले. जिथं तिथं संघर्ष आणि संघर्षच अनुभवायला आल्याने गोपीचंद पडळकर एक संघर्ष रत्न म्हणून नावारूपास येऊ लागले. 
तालुका दुष्काळात होरपळत असताना मागितले म्हणून पवाराच्या सरकारने लाठीचार्ज करायला पोलिसांना भाग पाडले होते.

       पुढे २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटावर त्यांनी विधानसभा लढवली आणि तब्बल ४५००० हजारांचे मताधिक्य मिळवून स्वताला संघर्ष पुत्र म्हणून सिद्ध केले पण एवढ्यावरच त्यांनी हार मानली नाही. आमदार नसताना देखील मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवून आटपाडी-खानापूर मतदासंघातील रस्त्यांसाठी भरघोस निधी त्यांनी आणला, आटपाडी तालुक्यासाठी एमआयडीसी, तसेच एकूण २६ बंधारे मंजूर करून आणले. जी कामे आमदारांनी करायची होती ती कामे पडळकरांनी आमदार/खासदार नसताना देखील केली त्यामुळे जनतेच्या मनात गोपीचंद पडळकर हे आमदार/खासदार/मंत्री म्हणून मिरवू लागले. टेंभूच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी भुमिपूजनासाठी मंत्री महोदयांना ते घेऊन आले शिवाय इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आले ते पडळकरांमुळेच.
कृषिमंत्री असताना पवारांनी आटपाडीला येण्याऐवजी दुरूनच पळ काढून तासगावला गेले होते.
   गोपीचंद पडळकरांनी नाम फौंडेशनच्या माध्यमातून, लोकसहभागातून अनेक कामे करून घेतली शिवाय निधीअभावी रखडलेल्या टेंभूच्या अर्धवट कालव्याचे काम स्वखर्चाने पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. जनता हेच माझे मायबाप म्हणून पडळकर अहोरात्र जनतेसाठी काम करतात आणि आजपर्यंत त्यांनी स्वार्थासाठी काहीच केले नाही. जर खरोखरच पडळकरांना स्वार्थ साधायचा असता तर भाजपच्या मोठ्या ऑफर्स धुडकावून ते स्वाभिमानाने खासदारकीसाठी उभे राहिले नसते. गोपीचंद पडळकर हे सांगली लोकसभा निवडणूक केवळ आणि केवळ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, न्याय व हक्कासाठी लढले होते आणि तब्बल ३ लाख २३४ मतदान त्यांनी स्वबळावर मिळवले होते. त्यांच्या आजपर्यंतच्या संघर्षाचा अनुभव हा सर्वात मोठा गुरु त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या संघर्षात साथ देणारे सर्वसामान्य तरूण, शेतकरी, कष्टकरी हे त्यांच्या हातात हात देऊन काम करत आहेत त्यामुळे "कष्टाने हाल होतात पण हार होत नाही" हे ब्रीदवाक्य घेऊन पडळकरांचा संघर्षरथ दिवसेंदिवस मजल मारत पुढे चालला आहे.
       आज गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार निवडणूक लढवताहेत. बारामती तालुक्यातील उपेक्षित बहुजन समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने दादागिरी, टगेगिरी, घराणेशाही मोडीत काढून सर्वसामान्यांचा पोरगा बारामतीची सुत्रे हलवणार हे काळ्या दगडावरची पांढरी आणि ठळक रेषा आहे. पवारांची उचलेगिरी करणारी मिडिया बारामती मतदारसंघातील जनतेमध्ये जातीच्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण करत असले तरी बारामती मधील जनता हुशार आहे. तेथील काही पत्रकार हे पवारांच्या दहशतीखाली त्यांची लाचारी करत असले तरी गोपीचंद पडळकर यांची सोशल मिडिया ही भारत देशातील सर्वात स्ट्राँग आणि निशुल्क काम करते त्यामुळे बारामती मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांचा विजय निश्चित आहे.
बारामती मधील जनतेनंच घेतलंय पडळकरांना डोक्यावर
संघर्षपुत्रा तु विजयी भवः
    ✍️नितीनराजे अनुसे (लेखक व व्याख्याते)
                8530004123

Saturday 12 October 2019

संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व कधीच संपत नसते... ✍️नितीनराजे अनुसे


        लोकसभा झाल्या की लगेच विधानसभेच्या निवडणूकीचे पडघम वाजू लागल्याने राजकीय खेळींना आणि त्यावरती होणाऱ्या चर्चांना मात्र उधाण आले आहे. राजकारण म्हंटलं की चढ-वरचढ, हल्लाबोल-प्रतिहल्लाबोल, टिका-टिप्पणी इत्यादी इत्यादी आलेच. मग त्यातून काहीजण भाजून निघतात, पोळून निघतात तर काहीजण सुखावतात.
        पैशातून सत्ता मिळवून पुन्हा सत्तेतून पैसा मिळवणे व पुन्हा पुन्हा तेच चक्र चालू ठेवून काही ठराविक जातीतील प्रस्थापित नेत्यांनी राजकारण म्हणजे जणू काय परंपरागत व्यवसाय/साधन करून ठेवले आहे. मग त्यातूनच अहंकार, दादागिरी, टगेगिरी, गुंडगिरी, अरेरावी, शिवीगाळ, उगरटपणा/उर्मटपणा स्वाभाविकपणे येतोच कारण सत्तेचा आणि पैशाचा माज त्यांना चढलेला असतो. आणि विशेष म्हणजे अशी माजलेली आणि मस्तावलेली नेतृत्वं लवकर संपतात त्याचे एकमेव कारण म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र तो "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा त्याचप्रमाणे अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा." डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतूनच अशा लोकशाहीसाठी मारक असलेल्या तथा माजलेल्या आणि मस्तावलेल्या प्रस्थापित व्यवस्थेला राजकारणातून संपण्याशिवाय पर्याय नाही.
       मात्र जे जे नेतृत्व संघर्षातून, खाचखळग्यातून, काट्याकुट्यातून, दगडधोंडे तुडवत, डोंगर-दऱ्यांच्या कड्याकपाऱ्यांतून वाट काढत काढत पुढे आले आहे नेतृत्व कधीच संपणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अलिकडेच भाजप ने ना.महादेवजी जानकर साहेब यांना धोका देऊन रासपच्या उमद्वारांचा भाजपच्या ए बी फॉर्म वरती उमेद्वारी अर्ज भरल्याने महादेवजी जानकर साहेबांना समाजाने ट्रोल करत भाजपने फसवणूक केल्याबद्दल चिंता व्यक्त केली शिवाय काल परवा वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये गेलेले मा.गोपीचंद पडळकर साहेब यांना मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट बारामती विधानसभा लढण्यासाठी पाठवल्याने पडळकर साहेब हे सुद्धा चांगलेच ट्रोल झाले.
       खरंतर ही दोन्ही नेतृत्वंच नाही तर धनगर समाजातील अनेक नवनवीन नेतृत्वं ही संघर्षातूनच पुढे आलेली आहेत. पावलोपावली आस्मानी सुलतानी संकटांचा सामना करत हे नेते आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्य पटलावरती येऊन पोहचले आहेत. परंतु त्यासाठी त्यांना काही राजकीय चाली खेळाव्या लागल्या आणि स्वाभाविकच ते खेळले सुद्धा. ज्या प्रमाणे बुद्धीबळाच्या खेळात प्यादे, वजीर, घोडा, उंट, हत्ती (आणि शेवटी राजाचा चेकमेट असतो ) यांच्या प्रत्येकाच्या चाली वेगवेगळ्या असतात त्याचप्रमाणे उत्तम नेतृत्वाला राजकारणाच्या प्रत्येक चाली खेळाव्या लागतात आणि त्या चाली अगदी नियोजनबद्ध पद्धतीने ना.महादेवजी जानकर साहेब व मा.गोपीचंद पडळकर साहेब खेळत आहे असे म्हणायला काही हरकत नाही. काही लोकांना वाटते की त्यांनी समाजाला धोका दिला, समाजाशी गद्दारी केली पण अभ्यासाच्या आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास मला तर तसे काही दिसून आले नाही. त्यासाठी थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास वाचायला हवा. काहीजण म्हंटले महादेव जानकर संपणार त्यांचे रासप संपणार शिवाय गोपीचंद पडळकर यांना बारामती मध्ये उभा करून बळीचा बकरा बनवले आहे अशा प्रकारच्या चर्चांना सोशल मिडियावर खरंतर उधाण आले आहे. परंतु माणदेशी मातीतले हे दोन्ही वाघ कोणताही राजकीय वारसा नसताना आज राजकारणात आहेत शिवाय आज महाराष्ट्राचे राजकारण हे या दोन्ही नावाभोवती फिरतंय याचा अभ्यास आमचे समाजबांधव कधी करणार? ना भाऊ आमदार ना काका खासदार ना वडील पंचायत समिती/जिल्हा परिषदेत नाही आई ग्रामपंचायत सदस्य तर सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबातील प्रसंगी अनवाणी पायानं रस्ता तुडवून काट्याकुट्यातून, दगडधोंड्यातून, डोंगर-दरी-खोऱ्यांतून माळरानं तुडवलेली ही नेतृत्वं आहेत ज्यांच्यावर राजकारणाच्या सुरवातीलाच येथील मस्तवाल प्रस्थापित नेत्यांनी सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर दबावतंत्र वापरून छोट्या मोठ्या खोट्या केसेस घालून ही नेतृत्वं संपवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला पण "जो हार मानून माघारी घेईल तो धनगर कसला?" ह्या "झुंज" कादंबरीतीलच नव्हे दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासातील इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आद्यस्वातंत्र्यसेनानी एकमेवाद्वितीय राजाधिराज चक्रवर्ती महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांच्याप्रमाणेच या नेत्यांनी कधीच हार मानली नाही. ते लढत राहिले आणि आजही लढताहेत. मान्य आहे की इथली प्रस्थापित व्यवस्था धनगर नेत्यांचे खच्चीकरण करत आहेत, धनगर नेतृत्व संपवण्याचा घाट रचत आहेत. मग तिथे भाजप-शिवसेना असो अथवा कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असो हे जातीयवादी पक्ष  धनगर नेत्यांना काळाच्या ओघात राजकारणातून बाजूला फेकायचे बघत असले तरी धनगर नेतृत्व काय मेल्या आईचं नाहीत प्याले. संघर्षातून पुढे आलेले हे नेतृत्व संपत नाही तर ते उसाळी घेत असते फक्त योग्य काळाची आणि वेळेची गरज असते. हेच संघर्ष कोळून प्यालेले नेते त्याच प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून नक्कीच दिल्लीचे तख्त पुन्हा एकदा धनगरांच्या हातात घेऊन राजा सम्राट अशोकांचं, होळकरशाहीचे संस्थापक मल्हारराजे होळकर यांचे स्वप्न साकार करतील. धनगर समाज बांधवांनी संयम राखून आपल्याच माणसाला साथ द्यायचं व त्याचे मनोबल वाढवायचं आद्यकर्तव्य बजावायला हवे असे मला वाटते. समाजात अजूनही एकीचे बळ तयार झाले नाही परंतु ज्यादिवशी हे एकीचे बळ तयार होईल तेव्हा पौराणिक कथेतील ३३ कोटी देव जरी खाली उतरले तरी समाजाचे कोणी वाकडे करू शकणार नाही हे समाजबांधवांनी लक्षात घ्यायला हवं.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Tuesday 1 October 2019

आज वाढदिवस संघर्ष योद्ध्याचा :✍️नितीनराजे अनुसे

संघर्षयोद्धा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब


            माणदेशी मातीत जन्माला आलेलं संघर्ष रत्न म्हणून ओळखल्या युवक ह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज जन्मदिवस... सर्वसामान्य कुटुंबातील मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय ना. महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात सन २००६ ला प्रवेश केला. गेल्या १२-१३ वर्षांपासून जनतेत मिळून-मिसळून रात्री अपरात्री गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा, अत्याचारीत पिडीतांना न्याय मिळवून देणारा आणि जनतेच्या हितासाठी अहोरात्र संघर्ष करणारा एक संघर्ष योद्धा म्हणजेच गोपीचंद पडळकर साहेब अल्पावधीतच युवकांच्या गळ्यातील ताईत बनले.
          राजकारण हा नुसता खेळ नव्हे तर गोरगरिबांच्या/सर्वसामान्यांच्या विकासाचा तो दरवाजा आहे जो सर्वसामान्यांना डावलून प्रस्थापित व्यवस्थेने कपटी भावनेने फक्त पाहुण्याराऊळ्यांसाठीच उघडा ठेवला. तो दरावाजा तोडून त्याची कवाडे सर्वसामान्यांसाठी सदैव उघडी ठेवावीत याच उदात्त भावनेने गोपीचंद पडळकर साहेब यांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटले. परंतु लोकशाही प्रदान भारत देशामध्ये  अशा दरवाजाला प्रस्थापित व्यवस्थेने मात्र जातीयवादाचे भक्कम कुलूप लावून ठेवले आहे की ज्या कुलूपाची किल्ली मात्र त्याच विशिष्ट जातींच्या लोकांसाठी आणि त्यांच्याच कारखान्यात तयार होते. त्यामुळे जर सर्वसामान्यासांठी हा सत्तेचा दरवाजा सताड उघडा ठेवायचा असेल तर त्या कुलूपाच्या किल्लीऐवजी बहुजन समाजाला एकत्रित करून घनरुपी घाव घालून तो दरवाजा तोडावा लागेल यासाठी ते वंचित बहुजन आघाडीमधून सांगली लोकसभा निवडणूक लढले होते. परंतु "एसटी गेल्यावर हात करणे" या वाक्यप्रचाराप्रमाणे धनगर आणि धनगरेत्तर बहुजनांना कळून चुकले की जर त्यांचे बहुमोल मत हे पडळकरांच्या पारड्यात टाकले असते तर एक सर्वसामान्यांचे धडाकेबाज नेतृत्व संसदभवनात सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी तथा हितासाठी लढले असते.
            असे कितीतरी वेळा गोपीचंद पडळकर हा उमदा नेता जनतेच्या बाजूने, जनतेच्या पैशावर मातब्बर प्रस्थापितांच्या विरोधात लढला आणि लढता लढता पडला पण प्रस्थापितांना मात्र त्यांनी घामच फोडला. अर्थातच पडळकर साहेब लढता लढता मतपेटीतून हरले परंतु जनतेच्या मनात भरले.  मात्र "लढता हारलो तरी हरल्याची मला खंत नाही, पुन्हा उठून पुन्हा लढेन कारण शांत बसायला मी काही संत नाही." या विचाराने प्रेरित होऊन ते पुन्हा जनतेसाठी राजकारणाच्या रणांगणात प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून उभे असतात हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कालपरवा ते वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरती अनेकजणांचे मतभेद आहेत काहीजण राजकीय द्वेषापोटी तर काहीजण व्यक्तिदोषापोटी तोंडसुख घेताना पाहिले. परंतु एकमात्र नक्की आहे की मा.गोपीचंद पडळकर साहेब हे कोणत्याही पक्षातून निवडणूक लढले तरी ते लोक पडळकर साहेब यांच्यावर टिका करणारच... मग जानकर साहेबांच्या रासप मधून लढू द्या, भाजप-शिवसेनेतून लढू द्या नाहीतर कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस मधून अन्यथा वंचित मधून कोणतीही निवडणूक लढू द्या. गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर प्रेम करणारे सच्चे कार्यकर्ते हे कोणत्याही पक्षाला मानत नाहीत तर ते पडळकर साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहतात कारण त्यांच्या दृष्टीने मा.गोपीचंद पडळकर हाच त्यांच एकमेव आणि उत्तम पक्ष होय.
            अशा उमद्या आणि कणखर नेतृत्वाला अर्थातच सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणाऱ्या, लढणाऱ्या तथा झगडणाऱ्या संघर्षयोद्ध्याला जन्मदिवसाच्या अगणित शुभेच्छा। मल्हारी मार्तंड तुमच्या मनगटात बळ देवो, तुम्हास बुद्धी व चातुर्य देवो हीच प्रार्थना🙏
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123