Where the words for justice runs like swords ... जिथे शब्द देखिल अन्यायाविरोधात तलवारीप्रमाणे चालू लागतात...
Featured post
आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे
आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Saturday, 11 October 2025
आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे
आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे
खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक परिवर्तन असा आहे. क्रांती हा शब्द राजकीय संदर्भात किंवा राज्येतिहासाच्या संदर्भात अधिक वापरला जातो. प्रसिद्ध जर्मन तत्ववेत्ता कार्ल मार्क्स त्याच्या तत्वज्ञानात क्रांतीची व्याख्या सांगताना म्हणतो की 'क्रांती ही एक इतिहास घडवणारी अद्भुत शक्ती आहे'. तर शहीद भगतसिंहांनी त्यांच्यावरील खटल्यादरम्याण एक ऐतिहासिक निवेदन दिले होते त्यात केलेली क्रांतीची व्याख्या अशी होती ती म्हणजे "क्रांतीसाठी रक्तरंजित युद्ध अनिवार्य नाही, तसेच यामध्ये व्यक्तिगत प्रतिहिंसेला कसलेही स्थान नाही. क्रांती म्हणजे केवळ बॉम्ब व पिस्तुले यांचा पंथ नव्हे. तर आमच्या मते क्रांती (Revolution) म्हणजे अन्यायावर आधारलेल्या प्रचलित समाजव्यवस्थेत अमुलाग्र परिवर्तन होय. क्रांतीची पूर्वतयारी म्हणजे प्रगती, स्वातंत्र्य व सामाजिक न्याय यांची नेत्यांच्या व जनतेच्या मनात उत्पन्न झालेली तीव्र जाणीव आणि त्याचप्रमाणे जुलूम, भ्रष्टाचार, जीर्ण झालेली सामाजिक व राजकीय चौकट यांच्याविरुद्ध प्रखर असंतोष होय. या पूर्वतयारीनंतरच नेते क्रांतीचा उठाव करू लागतात.
अशाप्रकारे क्रांती ची खूप काही उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. मुंबईच्या ICT महाविद्यालयातून फर्स्ट क्लास केमीकल इंजिनिअर ही पदवी घेणाऱ्या बापूसाहेब कोकरे यांनी देखील धनगर समाजावरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सन १९८९ साली 'क्रांती' चा लढा पुकारला आणि यशवंत सेना या संघटनेची स्थापना करून क्रांतीची चळवळ उभा केली. बघता बघता कोणतेही दळणवळणाचे साधन नसताना त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. अज्ञानाची घोंगडी पांघरून गाढ निद्रावस्थेत झोपलेल्या धनगर समाजाला जागं केलं. राज्य घटनेत नमूद करण्यात आलेल्या अनुसुचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला मिळाव्यात यासाठी त्यांनी आवाज उठवला. देशाला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे उलटली तरी समाजव्यवस्थेपासून कोसो दूर असलेल्या धनगर जमातीला त्यांचे हक्क दिले जात नाहीत यासाठी त्यांनी लढा पुकारला आणि तो लढा म्हणजे एक धनगर समाजासाठी नवीन 'क्रांती' होती. त्या क्रांतीच्या लढ्यामुळे धनगर समाज जागा झाला परंतु प्रस्थापित व्यवस्थेतील प्रस्थापित नेत्यांनी (ज्यांना धनगर समाज जागा होऊ नये असे वाटत होते) धनगर समाजातील काही लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बी के कोकरे साहेबांचा राजकीय तथा सामाजिक घात केला आणि समाजाला राज्य घटनेत असलेल्या 'अनुसूचित जमाती'च्या आरक्षणाऐवजी महाराष्ट्र राज्यापूरतेच 'भटक्या जमाती -क' मध्ये अडकवून ठेवले. पुढे अशाच घातपातातून २८ जून २००५ रोजी त्यांचा शंकास्पद मृत्यू झाला आणि हे प्रत्येक क्रांतीकारकांच्या बाबतीत घडले आहे याचा देखील इतिहास आहे. परंतु त्यांनी सुरू केलेली क्रांतीची चळवळ आजही जिवंत आहे. म्हणून क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेब यांच्या क्रांतीकारी विचारांनी पेटलेली ती धगधगती क्रांतीची मशाल आजही पेटतीच राहिली आणि पुढे भविष्यात देखील अशीच पेटत राहणार.
आजही धनगर समाजावर अन्याय अत्याचार होतोय, अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याऐवजी दुसऱ्याच योजना देवून समाजाची बोळवण केली जात आहे. धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर राजकीय, शैक्षणिक, आर्थिक तथा सामाजिक क्षेत्रात त्याचा फायदा होऊन वर्षानुवर्षे मागासलेली, अन्याय अत्याचाराच्या रहाटगाडग्यात खचलेली पिचलेली धनगर जमात प्रगतिपथावर येईल आणि त्याचा फायदा हा राष्ट्राच्या उन्नती साठी होईल. परंतु इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला, प्रस्थापित नेत्यांना ते मान्य नाही. त्यासाठी क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेब यांचा क्रांतीचा लढा, क्रांतीची चळवळ आणि त्यांच्या विचारांची क्रांतीची मशाल ज्वलंत आणि जिवंत ठेवणं आणि धनगर समाजाला न्याय मिळवून देणं हे धनगर जमातीतील प्रत्येक युवकांचे आद्यकर्तव्य आहे. आजची 'क्रांती' हा उद्याचा इतिहास घडवू शकते तर 'मशाल' ही अज्ञानरूपी अंधकाराला चिरून तिथे ज्ञानरूपी प्रकाश पाडते.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
9531869923
nitinrajeanuse123.blogspot.com
Subscribe to:
Posts (Atom)