Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday, 21 January 2016

आक्रोश मेंढपाळांचा...


एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या औलादी माझ्याच समाजावरती एवढा अन्याय करत असतील असे कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. पण स्वार्थी विचाराने बरबटलेल्या धनगर समाजातील नेत्यांनी(अपवाद वगळून) समाजाचे भांडवल आणि बाजारीकरण करून धनगर समाजाला देशोधडीस लावण्याचा जणू काय ठेकाच उचललाय की काय? या प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी आनंद नामदेव कोकरे यांसारखे सुशिक्षित मेंढपाळ वाचा फोडण्यासाठी पुढे सरसावत आहेत पण धनगर समाजातील ठराविक सोडले तर बाकीचे उच्चशिक्षित उच्चविभुषित इंजिनीयर, डॉक्टर, एडव्होकेट प्रशासकीय अधिकारी मात्र हातावर हात ठेवून मौनवृत्त धारण करून धनगर नेत्यांनी आणि प्रस्तापितांनी चालवलेला नंगानाच उघड्या डोळ्यांनी बघत बसलेत याचेच दुख होते.
धनगर समाजाच्या वाट्याला आलेली भटकंती ही जणू काय पाचवीलाच पुजलेली आहे. आज इथे तर उद्या तिथे रात्रंदिवस रानोमाळी डोंगरदरीतून सावजा-माजरांचा, साप-विंचू यांचा विचार न करता दगडधोंडे आणि काटेकुटे तुडवत ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता पायाच्या नडग्या वाळवणार्या माझ्या धनगर समाजातील मायबापांचा विचार करायला आज कोणाकडे फुरसतही नाही. मी ज्या धनगर समाजात जन्माला आलो, ज्या वातवरणात शिकलो सवरलो खेळलो-बागडलो लहानाचा मोठा झालो त्या धनगर समाजाचे मी काहीतरी देणे लागतो याचा साधा पुसटसा विचारसुद्वा मनात न येणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीच्या लढ्यात धनगर समाज जागृत होताना दिसताच प्रस्तापितांच्या तुकड्यावर तुटून पडलेल्या नेत्यांना धनगर समाज दिसू लागला. तापलेल्या तव्यावरती स्वताची भाकरी भाजून घ्यावी याच विचारात काही महाबहाद्दर राजकारणात उतरले तर काही मोर्चे आंदोलने करू लागले. प्रत्येकजण ओरडतोय बोंबलतोय आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी पण धनगर म्हणून एकत्रित येण्याची त्यांची लायकी नाही कारण आरक्षणाचे श्रेय माझ्याच पारड्यात कसं पडेल अशा भ्रमात आरक्षणाचा खेळखंडोबा करणारे दुसरे तिसरे कोणी नसून धनगर समाजातील स्वताला विद्वान समजून घेणारे सर्वच नव्हे तर काही अपवाद सोडले तर बाकीचे नेतेच जबाबदार आहेत असे म्हणायला काही वावगे वाटणार नाही.
समाजसेवक मेंढपाळ आनंद कोकरे यांनी जे विश्लेषण केले याचे धनगर समाजातील नेत्यांनी, बुद्धिजीवी वर्ग तसेच उच्चशिक्षित, उच्चविभुषितांनी चिंतन, मनन आणि आत्मरिक्षण करायला हवे. धनगर समाजबांधव आजही भटकंती करत या गावावरुन त्या गावाला पायपीट करत असतात. घोड्याच्या पाठीवर आयुष्याचा संसार लादून करडा-कोकरांचं आणि पोराबाळांच लटांबण सोबत घेऊन पोटाची खळगी भरत असतात. भारत सरकारने ६-१४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली हे खरं पण मेंढ्यामागे आईबापांसोबत गावंच्या गावं पालथी घालणार्या धनगर समाजाच्या पोरांनी नेमकं शिक्षण घ्यायचं कुठं?? रहायचं कुठं?? खायचं काय ? याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. अनुसुचित जमातीचे आरक्षण हा एक डॉ. बाबासाहेबांनी दिलेला घटनादत्त अधिकार आहेच आहे पण त्यासाठी नेत्यांनी कोणीतरी धाकल्या बापाचं होऊन एकत्रित यायला हवं होतं पण तसे होत नाही आणि याच कारणामुळे धनगर समाजाच्या करोडो नव्हे तर अब्जावधी रूपयांचा चक्काचूर होतो आणि शेवटी हातात राहतो तो म्हणजेच बाबाजीचा ठुल्लू. पाठीमागच्या हिवाळी अधिवेशनात नेमकं तेच घडलं पण नेत्यांना याचे काय देणे घेणे?? आश्वासनांवरती आश्वासनं दिली जातात आणि त्याचा पाठपुरावा करण्यातच चार-पाच पिढ्या बरबाद होतात याला कारणीभूत म्हणजे समाजातील नेत्यांचा मनभेद-मतभेद आणि स्वार्थी भावना. या सर्व कारणामुळेच मग घोडं पेंड खाऊ लागतं... त्यासाठी एक व्हा आणि  नेक व्हा असं बुद्धिजीवी वर्ग सांगून सांगून थकला पण पालत्या घड्यावर पाणी ओतावं त्यातला प्रकार आजपर्यंत पहावयास मिळाला. एकत्रित येऊन  संघर्ष कराल तर कोई माई का लाल इस दुनिया मे पैदा नही हुआ जो धनगर समाज को रोख दे।
धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे सरकारणे स्वताच्या घशात घालून घेतलीत एकीककडे जंगलच्या जंगल उध्वस्त करून कारखाने, सुतगिरण्या तर रासायनिक प्रकियेमुळे जिवित हानी पोहचवणार्या केमीकल कंपन्या उभारल्या जातात तर दुसरीकडे शेळ्या-मेंढ्यां, गाई-म्हैसीसाठी असलेली चराऊ कुरणे औद्योगिक संस्थांसाठी वापरली जातात मग शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करून पोट भरण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो मग धनगर समाजातील मुलं-मुली आई-वडिलांसोबतच जातात त्यांच्या शिक्षणासाठी, राहण्यासाठी निष्क्रीय सरकार काही करू शकत नाही पण करोडो अब्जो रूपयांची राखरांगोळी करणार्या नेत्यांनी मी धनगर मी धनगर म्हणून उदो उदो करत बसण्यापेक्षा तुमच्या आंदोलनात, मोर्चात साध्या चहाची सुद्धा अपेक्षा न ठेवता प्राणपणाने झटणार्या आणि झगडणार्या भटकंती करणार्या मेंढपाळांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली तर सोन्याहून पिवळं.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

1 comment: