सोडून गेलात तुम्ही आम्हाला
असा काय घडला आमुचा गुन्हा...?
न्यायासाठी लढलात तुम्ही
मिटवल्या अन्यायाच्या पाऊलखुणा...
लेकीबाळी, सासुरवाशीणींचा आधारवड,
आप्पा तुम्ही जन्माला या पुन्हा....
- नितीनराजे अनुसे
ज्यांच्या जीवनावर जिवंतपणीच चित्रपट तयार होतात, तमाशामध्ये वगनाट्य सादर होतात, पोवाडे रचले जातात असा एकमेवाद्वितीय असलेला क्रांतीवीर, एकेकाळी कृष्णकाठचा भयावह पर्व म्हणून चांगलाच गाजला होता त्याची चर्चादेखिल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दूरवर पसरलेली आजही ऐकायला मिळते आणि पिढ्यांनपिढ्या त्या चर्चेची गुंज महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मातीच्या कणाकणात, प्रत्येक माणसाच्या मनामनात तशीच गर्जत राहील. तसाच भयावह पर्व प्रत्येकाच्या कानाकानात ऐकू येईल परंतू त्या भयावह पर्वाचा नायक म्हणजेच मांगाच्या पोरीची आब्रू वाचवण्यासाठी हातातील मेंढ्यांची काठी बाजूला फेकून जात-पात धर्म पंथ संप्रदाय याचा कसलाही विचार न करता केवळ आया-बहीणींची आब्रू वाचवण्यासाठी कुऱ्हाड हातात घेऊन रंग्याचा बेरंग करणारा महाराष्ट्राचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर ऊर्फ आमचे लाडके आप्पा मंगळवार दि.१६/०१/२०१७ रोजी आम्हाला सोडून अनंतात विलीन झाले. हजारो सासुरवाशीण, लेकीबाळी, आया-बहिणी आज दि.१६ जानेवारी २०१७ रोजी पोरक्या झाल्या.
धिप्पाडच्या धिप्पाड शरीरयष्टिचा पैलवान, वय शंभरीपार केलेले, तब्येत अजूनही आणि आजही ठणठणीत होती. बुद्धी अजूनही तल्लख, वागण्या-बोलण्यातही तीच तडफ होती, तीच धमक आणि तोच दरारा जसाच्या तसाच होता. १४ वर्ष तुरूंगात काढली अन् पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांच्या दोन्ही पायाच्या पाठीमागील बाजूच्या शिरा कापून टाकल्या होत्या तरीही चालताना मान खाली घालून नव्हे तर ताठ मानेनंच आणि स्वाभिमानानं चालणारा ढाण्या वाघ अख्ख्या महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यानं पाहिला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली होती. तरीही आप्पा कधीही डगमगले नाहीत. शस्त्रक्रीया करण्याअगोदर डॉक्टर म्हणाले होते वयोमानपरत्वे शक्य होणार नाही. आप्पा म्हणाले, काही घाबरू नका. काही होणार नाही, ...आप्पाचं सगळंच कसं अद्भुत नि अलौकिक होतं.... उभ्या आयुष्यात त्यांनी १२ खून (फूल मर्डर), ३५ हापमर्डर केले. जवळच्याच कोणीतरी गद्दारी केली आणि २५ वर्ष फरार असलेले आप्पा पोलिसांच्या सापडले पण त्यादिवशी हत्याराला (बंदूकीला) हात न लावायचा हे आप्पांचे व्रत असल्याने आप्पा अटक झाले होते नाहीतर त्या महाराष्ट्राच्या ढाण्या वाघाला पकडणारा अजून जन्माला यायचा होता हे त्रिकालबाधित सत्य होतं. १४ वर्ष तुरंगात घालवली पण एकही पुरावा पोलिसांच्या हाती सापडू दिला नाही शिवाय एकही साक्षिदार कोर्टात पोहचू दिला नाही. कारण आप्पांचा त्याग हा स्वार्थासाठी नव्हता तर तो त्याग सर्वसामान्यांच्या हितासाठी होता न्यायासाठी होता. एकदा आमच्या आटपाडीत स्टेजवरून बोलताना आप्पा सांगत होते की १२ खून ३५ हापमर्डर करून देखिल माझी जन्मठेपेची शिक्षा माफ होत असेल तर मग जर कोणी अन्याय करत असेल तर अन्याय करणाऱ्याचे हात वरच्या वरच कलम करा मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. परंतू नियतीला हे मान्य नव्हते, समाजाला ज्या ढाण्या वाघाचा आधार होता, लेकीबाळी, सासुरवाशीण पोरींचा जो आधारवड होता, आया-बहिणींच्या पदराचं रक्षण करणारा रक्षणकर्ता ताकद आम्हाला वाघासारखं जगायला शिकवून आमच्यातून कायमचाच निघून गेला.
एक बापू अर्थातच स्व.बी.के.कोकरे साहेब देखिल २००५ साली याच जानेवारी महिन्याच्या २८ ला आम्हाला सोडून गेले त्यानंतर हे बापू देखिल मंगळवार दि.१६ जानेवारी २०१८ रोजी आम्हाला सोडून अनंतात विलीन झाले. पण दोन्ही बापूंचा त्याग आम्ही कधीच विसरणार नाही. तुमचं विचार आमच्यातून कधीच जाणार नाहीत. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर आम्ही मार्गक्रमण करत राहील जर कोणी समाजावर अन्याय करत असेल जर कोणी माझ्या समाजातील आया-बहिणींच्या आब्रूला हात घालायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे नुसते हात कलम करणार नाहीत तर त्याला उभाच चिरण्याची ताकद तुम्ही आम्हाला देऊन गेलात. त्यामुळे तुमचा त्याग कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही अशी भिष्मप्रतिज्ञा करून आपणांस श्रद्धांजली अर्पन करतो.
जय मल्हार!! जय अहिल्या!! जय यशवंत!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
Email:- nitsanuse123@gmail.com
No comments:
Post a Comment