आरेवाडीचा दसरा मेळावा आणि सामाजिक सलोखा
✍️नितीनराजे अनुसे
अखंड धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या आरेवाडीच्या बिरोबा बनात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा तसेच आंध्रप्रदेश या राज्यातून लाखो समाजबांधव बिरोबाच्या बनात एकत्रित येऊन मेंढपाळांच्या राजाची मनोभावे सेवा करत असतात. दरवर्षी हे मेंढपाळ बांधव एकत्रित येतात आणि यात्रा झाली की आपापल्या घराकडे, जिथे मुक्काम असेल तिकडे आपापल्या वाड्यावर निघून जात असतात. असेच हे दरवर्षी चालत राहिले तर समाजाचे वैचारिक प्रबोधन कधी होणार? असा विचार नकळतपणे आल्याने जर आपण आरेवाडी येथे दरवर्षी जर दसरा आयोजित केला तर विखुरलेल्या धनगर समाजाचे वैचारिक प्रबोधन करू शकतो अशी संकल्पना महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ मा. गोपीचंद पडळकर साहेब यांना सुचली आणि २०१६ पासून दसरा मेळाव्याला सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे २०१७ ला देखील दसरा मेळावा पार उत्साहात पार पडला धनगर समाजाचे सर्व नेते त्या दसरा मेळाव्याला उपस्थित होते. खरंतर हा दसरा मेळावा म्हणजे धनगर समाजाचे वैचारिक प्रबोधन तथा मंथन असल्याने तेथे एक कार्यकर्ता या नात्याने सर्व समाजबांधवांनी दसरा मेळाव्याला यावे असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी २०१७ मध्ये केले होते आणि सर्वांना निमंत्रण देखील दिले होते. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी देखील त्यांनी औरंगाबाद येथील "आरक्षणाचा अखेरचा लढा" या जाहीर सभेतून दसरा मेळावा आयोजित करत असल्याचे सांगत त्या दसरा मेळाव्याला सभामंचावर कोणत्याही नेत्यांसाठी अथवा पाहुण्यांसाठी खुर्ची ठेवली जाणार नाही तर समाजातील जो कोणी जेष्ठ तथा बुजुर्ग समाजबांधव उपस्थित असेल तो सदरच्या दसरा मेळाव्याचा अध्यक्ष असेल असेही जाहीर केले होते जसे औरंगाबाद येथील सभामंचावर उपस्थितांपैकीच एका बुजुर्ग व्यक्तीला बसवले होते कारण निमंत्रण देऊनही काही कारणास्तव आदरणीय आमदार गणपतराव उर्फ आबासाहेब देशमुख उपस्थित राहू शकले नव्हते. त्याचप्रमाणे आरेवाडीचा दसरा मेळावा त्याच प्रमाणे साजरा करायचा परंतु त्यामध्ये धनगर समाजाच्या हितासाठी जो ज्वलंत प्रश्न सध्या महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या भावनेचा विषय बनला आहे त्या प्रश्नाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे या विचाराचे सर्वजण सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत यात शंकाच नाही. परंतु ज्या तरूणाने पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी गुजरातमध्ये लढा पुकारला होता त्या मोर्चाचे नेतृत्व हार्दिक पटेल नावाचा एक तरुण पोरगा करत होता त्या हार्दिक पटेल ला जर धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यात बोलावलं म्हणजे याचा तसा अर्थ होत नाही की धनगर समाजाचे नेतृत्व हार्दिक पटेल करेल... धनगर समाजाचे नेतृत्व हे धनगर समाजातीलच पोरं करू शकतात. दुसरा तिसरा चौथा कोणी धनगर समाजाचे प्रश्न सोडवू शकत नाही कारण शेळ्या-मेंढ्यांची अर्थातच मुक्या जणावरांची तहान-भूक हा धनगरच जाणू शकतो. हार्दिक पटेल मुळे महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमांचे लक्ष आरेवाडीच्या दसरा मेळाव्याकडे केंद्रीत करण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर यांनी केला असावा. त्यामुळे आरेवाडीच्या दसरा मेळाव्याचे प्रक्षेपण, बातम्या अखंड देशभरातील टीव्ही चैनलवरती दिसतील त्यामुळे केंद्र अशी अपेक्षा त्यांना होती.मग माशी कुठे शिंकली कोणास ठाऊक? दरवर्षी प्रमाणे यंदा देखील परंतु त्यापेक्षाही अतिशय चांगल्या पद्धतीने दसरा मेळावा साजरा व्हायला हवा होता पण तसे झाले नाही. एकाच समाजाचे, एकाच दिवशी दोन दोन दसरा मेळावे होणे म्हणजेच सरळसरळ धनगरांच्याच अधोगतीचे लक्षण असल्याचे दिसून येते. यामागची कारणं शोधायला गेले तर सर्वप्रथम अहंकार हेच दोन्ही दसरा मेळाव्याचे सर्वात मोठे कारण आहे असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही. गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र राज्यातील नेत्यांना निमंत्रण न देता हार्दिक पटेल यालाच का निमंत्रण दिले? धनगर नेते महाराष्ट्रात नाहीत का? असा सूर सहजपणे मला ऐकायला मिळाला. यात गोपीचंद पडळकर यांचीच चुकी असल्याचे माजी आमदार प्रकाश (आण्णा) शेंडगे यांच्या समर्थकांनी मला सांगितले. तेव्हा मलाही वाटणे स्वाभाविकच होते की एक आयोजक नव्हे तर कार्यकर्ता या नात्याने गोपीचंद पडळकर साहेब यांनी सर्व धनगर नेत्यांना निमंत्रण द्यायला हवे होते. ती त्यांची चूक आहे परंतु औरंगाबाद येथील अखेरच्या आरक्षण लढ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आबासाहेबांना बोलावले होते परंतु ते आले नाहीत त्यामुळे कदाचित गोपीचंद पडळकर यांनी सर्व नेत्यांना वैयक्तिक निमंत्रण न देता अखंड धनगर समाजाला दसरा मेळाव्याला येण्याचे आवाहन केले असावे (त्यात नेते आलेच). दुसरीकडे धनगर समाजातील तर माजी मंत्री शिवाजी(बापू)शेंडगे यांचे सुपूत्र असलेल्या माजी आमदार प्रकाश (आण्णा) शेंडगे यांना राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वांनी उठवून बसवले असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर साहेबांच्या समर्थकांमधून होत आहे. शिवाय गेल्या दोन वर्षांपूर्वी पासून त्यांना दसरा मेळावा आयोजित करता आला नाही का? २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावरच दुसरा मेळावा आयोजित करण्याचे सुचलेच कसे? असेही आरोप त्यांच्यावर केले जात आहेत.
खरंतर दोघांवरही झालेले भयानक आरोप हे समाजाला वेगवेगळ्या दिशेने घेऊन जाणारे आहेत आणि सदरचा एकमेकांवर चिखलफेक करण्याचा जो प्रकार झाला त्यामुळे धनगर समाज इतरांपेक्षा अजूनही १०० वर्ष पाठीमागे असल्याचे समजायला फार वेळ लागत नाही. खरंतर एकमेकांवरती केलेल्या आरोपांचे खंडण करण्यासाठी माझा लेखप्रपंच नाही कारण दसरा मेळावा एकच व्हायला हवा या विचाराचा मी होतो आणि आजही आहे. परंतु कोणीतरी एक पाऊल मागे घेतले असते अथवा कोणीतरी दाखल्या बापाचे झाले असते आणि एकच मेळावा घेण्यासाठी प्रयत्न केले असते तर भविष्यात सर्वच धनगर नेत्यांना (एक-दोघांनाच नव्हे) मानसन्मान मिळाला असता. धनगर एकीचे बहुजन समाजातून कौतुक झाले असते. अथवा आमुक आमक्या नेत्याने मोठ्या मनानं समाज एकीकरणासाठी एक पाऊल माघारी घेतले म्हणून समाजातून त्याची वाहवा झाली असती पण माघारी घेणार कोण? तिथे प्रतिष्ठेचा विषय होता, अहंकाराचा प्रश्न होता. परंतु त्यापलीकडे जाऊन विचार करण्याची अथवा ऐकून घेण्याची सहनशीलता नसल्याने कोणीही माघारी घेतली नाही. त्याचा परिणाम येत्या निवडणूकीत दिसून येईलच आणि फटका एकदोघाला नाही तर अखंड धनगर समाजाला बसणार आहे.
असो धनगरी जत्रा कारभारी सतरा ही म्हण सार्थ करून दाखवण्यासाठी जी चढाओढ लागली होती ती काय संपुष्टात येणार नाही असे दिसत आहे तरीही शक्य झाल्यास अजूनही प्रयत्न होऊ शकतात कारण एका रात्रीत विरोधकांची मतं फोडली जातात, ग्रामपंचायत सदस्य फोडले जातात एवढेच काय तर आमदार खासदार पण फोडले जातात मग धनगर समाजाच्या हिताचा निर्णय व्हावा असे जर खरोखरच वाटत असेल तर एकाच रक्ताची अन् हाडामांसाची आपण माणसं आहोत मग समाजाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एकमेकांच्या हातात देऊन एकच दसरा मेळावा व्हायला हवा यासाठी का प्रयत्न करू नयेत? आजकाल सोशल मिडिया हे एक असे माध्यम आहे की एकच दसरा मेळावा म्हंटलं तर दहा मिनिटांत अख्ख्या महाराष्ट्राला हा एकीचा संदेश जाऊ शकतो आणि पेटलेले राजकारण संपुष्टात येऊ शकते हे मात्र नक्की...
असो तरीही सर्व धनगर समाजबांधवांनी आपल्या सर्वांचे आराध्यदैवत असलेल्या आरेवाडीच्या बिरोबा बनात येऊन विचाराचं, प्रबोधनाचं सोनं लुटून धनगर समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी हातभार लावावा व कोणावरही टीकाटिप्पणी न करता सामाजिक सलोखा राखावा ही नम्र विनंती...
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
- नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com
No comments:
Post a Comment