
खरंतर ६-७ वर्षांपूर्वी लिहलेला हा ब्लाॅग https://nitinrajeanuse123.blogspot.com/2015/12/blog-post_14.html आज मुद्दामहून पुन्हा प्रकाशित करतोय.... वस्तुस्थिती अजून काही बदललेली दिसतच नाही. पिवळं वादळ कुठेतरी क्षमलं आहे, ती धमक, ते मोर्चे सगळे मूग गिळून गप्प बसले आहेत. आरक्षणाचा ब्र ही आजकाल ऐकायला भेटत नाही. सगळीकडे शांतता आणि शांतताच... पण त्या भयाण शांततेत मनात उठलेले वादळ कसं शांत बसणार म्हणूनच आजचा हा उपद्व्याप... डॉ बाबासाहेबांनी धनगर समाजाला राज्यघटनेत कलम ३४२ च्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अ.क्र.३६ वरती आरक्षण दिलेले आहे. केवळ शब्दच्छल झाल्याने अर्थातच “धनगर” ऐवजी “धनगड” (र चा ड) झाल्याने सगळा राडा झाला आहे. गेल्या ७०- ७५ वर्षापासून धनगर समाज अनुसुचित जमातीच्या सवलतींपासून वंचित असल्याने धनगर समाजाचे झालेले नुकसान पुढील ६० ते ७० वर्षातसुद्धा भरून न येणारे आहे. यास रानोमाळी डोंगरदरीतून भटकणाऱ्या धनगर समाजाचे अज्ञान जरी कारणीभूत असले तरी संविधानाच्या/राज्यघटनेच्या आधारावरती राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याहून अधिक जबाबदार आहे. धनगर समाजाला खरंतर जाणूनबुजून अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचं काम प्रस्तापित व्यवस्था आणि परिणामी पाठीमागचे आणि सद्याचे राज्यसरकार करत आहे. धनगर समाज जर निद्रावस्थेतून जागा झाला तर या प्रस्तापितांना त्यांची लायकी दाखवून देईल परंतू झोपेचं सोंग घेणाऱ्या समाजाचं कसं होईल हे राम जाणे? ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्या समाजाची सत्ताकारणात भागीदारी लोकसंख्येच्या आधारवर तितकीच असणार आहे परंतू धनगर समाज अज्ञानाच्या खाईत होरपळला गेल्याने सत्ताकारणापासून ही जमात थोडी नाही तर खूपच दूर राहीली.
गेल्या ६५ वर्षापासून या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती अन्याय करण्याचा नंगानाच या महाराष्ट्र राज्यातील प्रस्तापित व्यवस्थेने आणि सदरच्या राज्य सरकारने चालवला आहे. धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोऱ्यात कुठेही पहावयास मिळत नसताना, धनगड नावाची जमातच आस्तित्वात नसताना महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात धनगड जमातीचा उल्लेख करायला डॉ.बाबासाहेब आंबेडकर काय मुर्ख होते का? हा माझा खडा सवाल मुख्यमंत्र्यांना, धनगर समाजाच्या या मागणीचा विरोध करणाऱ्या त्या त्या आदिवाशी मंत्र्यांना आणि मेंदूला वाळवी लागलेल्या त्या वळवीला, पिचडला विचारायचा आहे. त्या वळवीचे म्हणणे आहे की राज्यघटनेत ३४२ च्या अनुछैद वरती ९ व्या परिशिष्टातील ३६ नंबर वरतीची जमात ही धांगड आहे आणि धांगड ही ओरॉनची तत्सम जात आहे. मग त्या वळवीने अभ्यास करावा की धांगड अथवा धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्यात कधीही जन्माला आली नव्हती मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी राज्यघटनेची मसूदा समिती होती त्यांनी काय मुर्ख म्हणून अहवाल सादर केले होते का?
एखादी जमात आस्तित्वातच नसेल तर मग राज्यघटनेत नमूद केलेल्या त्या जमातीबद्दल प्रतिवाद देखिल करता येतो. जसे Acre चे एकड होते, Chattisgarh चे छत्तीसगड होते, Gurgaon चे गुडगाव होते, Hawrah चे हावडा होते त्याचप्रमाणे Dhangar चे धनगड असे झाले आणि म्हणून त्याचाच परिणाम असा की महाराष्ट्र राज्यातील दीड ते दोन कोटी धनगर समाजबांधवांचे भविष्य अंधारातच राहिले. धनगर समाजाची हजारो पोरं आइ ए एस, आइ पी एस, डॉक्टर, इंजिनीयर, एडव्ह़केट होण्यापासून वंचित राहिली याला सर्वस्वी जबाबदार आजपर्यंतचे राज्य सरकार आहे राज्यघटनेचा अवमान करणार्या त्या त्या नेत्यांवरती देशद्रोहाचा देखिल खटला भरायला हवा.
आज इथे तर उद्या तिथे अशा प्रकारचे जीवन जगणारी धनगर जमात ही भटकी जमात असल्यामुळे १९९१ साली धनगर समाजाला अनुसुचित जमातीची मागणी डावलून महाराष्ट्र राज्यापुरतं भटक्या जमाती क मध्ये टाकण्याचे पाप पवारांनी केलं पण त्या पवारांना उचलू लागायला आमच्याच समाजाचे अज्ञानी महाबहाद्दरच पुढे होते. थोडक्यात काय तर चोर तर चोरी करायच्या हेतूनेच येतो आणि चोरी करणे त्याचा धर्म मग चोरालाच स्वतःच्या घरात चोरी करण्यासाठी मदत करणारे आणि त्यांना स्वतःच्या काहीतरी स्वार्थी हेतूंसाठी त्यांना उचलू लागणारे महाबहाद्दर आमच्या समाजात जन्माला येतात हे आमच्या समाजाचं दुर्देव...
राज्यघटनेतील आदिवाशी असल्याचे निकष:-
राज्यघटना मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि समितीकडून राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ ला अडॉप्ट केली होती आणि २६ जानेवारी १९५० साली आमलात आणली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर म्हणजे जवळ जवळ ३ वर्षाचाच कालावधी लागला होता भारतीय संविधान लिहायला. राज्यघटना लिहताना त्यावेळी धनगर जमात ही माळोरानी डोंगर दरीतून भटकंती करत शेळ्या-मेंढ्यांची परिणामी स्वताच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत असते याचा अभ्यास करूनच मसूदा समितीने आदिवाशी समाजबांधवांपेक्षा अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या जमातीला राज्यघटनेच्या अनुसुचित जमातीच्या यादीत अगोदरच सामाविष्ट केलेली आहे.
1. धनगर समाज ही आदिम जमात आहे शेळ्या मेंढ्या राखणे गाई-म्हैसी पाळणे हे आदिम जमातीचे व्यवसाय आहेत. (मग धनगर समाज शेळ्या मेंढ्या राखतो, गाई-म्हैसी पाळतो आणि जोडव्यवसाय म्हणून शेती पण करतो)
2. आदिम वैशिष्ट्ये/प्राचीन जीवनमान याचा अभ्यास केला तर डोंगरदरी माळरानावर जाऊन बघा शेळ्या-मेंढ्या राखणार्या समाजबांधवांची एकदा विचारपुस करून बघा मग समजतील आदिम वेशिष्ट्ये.
3. संस्कृति: धनगर जमातीची आदिवाशी जमातीसारखीच संस्कृति आहे खंडोबा, बिरोबा, धुळोबा हे धनगरांचे देव तसेच ढोल वाजवणे, धनगरी गजी नृत्य, धनगरी ओव्या यातून धनगर समाजाच्या संस्कृतिचा अभ्यास करता येतो. ओरॉन धनगर जमातीचे देव सुद्धा सारखेच आहेत.
4. भौगोलिक पृथक्करण: आदिवाशी जमात डोंगरदरीमध्ये जंगलामध्ये पाड्यावरती एकाच ठिकाणी स्थायिक राहते पण धनगर जमात ही डोंगर दरीमध्ये रानोमाळी, जंगलामध्ये आज इथे तर उद्या तिथे असे मुक्काम करत, अख्खा संसार घोड्याच्या पाठीवर लादून कोकरा-करडांचं आणि लेकराबाळाचं लटांबण घोड्याच्या पाठीवरील माचोळीवर बांधून तळहातावर पोट भरणारी धनगर जमात अभ्यासून पाहा.
5. लाजरे बुजरेपणा धनगर समाजातील बांधव जास्त लोकवस्तीत येत नाहीत समूहाने राहतात नागरी वस्तीत मिळत नाहीत मिसळत नाहीत कारण दिवसभर मेंढ्यांच्या पाठी पायाच्या नडग्या वाळवण्यातच कितीतरी पिढ्या बरबाद झाल्या त्यामुळे धनगर जमातीत अजूनही लाजरे बुजरे पणा तसाच आहे.
संघटितपणे लढाई महत्वाची :धनगर समाजाला राज्यघटनेत अधिकार दिले असताना आदिवाशी पेक्षाही अत्यंत बिकट आणि हालाखीचे जीवन जगणारी धनगर जमात ही अनुसुचित जमातीमध्ये मोडत नाही असे ओरडून सांगणाऱ्या अर्धवटांचे मला हसू येते. धनगर जमात ही भटकी जमात आहेच आहे आणि महाराष्ट्र राज्यात फक्त (केंद्रात नव्हे) धनगर जमात ही भटक्या जमाती -क मध्ये आहे. ते पण वक्रतुंडाच्या अवकृपेने १९९१ पासून पण आमच्या धनगर समाजाचं संघटन मजबूत असतं तर आज यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांच्या प्रयत्नातून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती कधीच मिळाल्या असत्या आणि आजच्या प्रस्तापितांचे तळवे चाटणार्या नेत्यांना भिक मागायची वेळ आली नसती.
आज आदिवाशी समाजातील काही पोरं कोणाच्यातरी सांगण्यावरून लिहू लागतात की धनगर समाजातील लोक र चा ड झाला असे सांगत रडत बसलेत पण त्या वळवी ला माझे सांगणे आहे की आम्ही रडणाऱ्यांपैकी नाहीये. जर मनात आणलं तर क्षणात उध्वस्त करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आजपर्यंत अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकणारे फक्त धनगरच आहेत याचा विसर कोणास पडू नये. धनगर समाजात अज्ञान पसरवण्यास प्रस्तापित व्यवस्थाच जबाबदार असून धनगर समाजाने यास बळी न पडता सर्वानी एकजुटीने/संघटितपणे आपले हक्क हिसकावून घ्यायला हवेत नाहीतर पुढची पीढी आपल्या तोंडात शेण घालेल याचा विचार करा.
खरी चूक कोणाची?
देशाच्या स्वातंत्र्यानंतरच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनगर समाजावरती सतत अन्याय होत आला आहे. आदीवाशीपेक्षाही धनगर समाज आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असताना धनगड नावाची जमात महाराष्ट्रात नसताना राज्यघटनेत धनगड नावाचा उल्लेख करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चुकीचे ठरवायचे की सर्वानुमते २६ जानेवारी १९५० ला आमलात आणलेल्या राज्यघटनेवरती आजचा राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार चुकीचे ठरवायचे? धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात नाही शिवाय धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे संशोधकीय अहवाल असताना देखिल धनगर समाज आदिवाशींचे निकष पुर्ण करतो की नाही यासाठी टाटा इंन्सटीट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेला ६५ वर्षानंतर सर्वे करायला सांगणारे राज्य सरकार धनगर समाजाचे आरक्षण घशातून काढण्याचा प्रयत्न तरी करत नाही ना.? अशी शंका कोणाच्याही मनात गोंधळ निर्माण करणारी आहे. यामुळे मागले तसेच म्होरले ही म्हण सार्थ ठरते की काय याचाच विचार सतत मनात घोळत असतो.
धनगर समाजात नेतृत्वाचा अभाव आहे शिवाय जे जे नेतृत्व करत आहेत ते देखिल समाजाचे भांडवलीकरण करून स्वताचा स्वार्थ साधत आहेत अशीच परिस्थिती आजही पाहायला भेटते आहे. समाजाच्या नावावरती ज्यांना आमदारक्या, मंत्रीपदं मिळाली, खासदारकी मिळाली त्यांना कधी समाजाची आठवण झालीच नाही. अगोदरच्या कॉंग्रेस-रा.कॉंग्रेसची तर मानसिकताच नव्हती त्यात भाजप सत्तेवर आल्यावर पहिल्या कॅबिनेट मध्येच आरक्षणाची तरतुद करू म्हणणाऱ्या फसणवीसांचा ५ वर्ष उलटून गेली तरी अजून अभ्यास चालूच होता त्यात देखिल गरज नसताना TISS चे भूत मानगुटीवर बसवले त्याला धनगर समाजातील संबंधित निष्क्रिय नेते जबाबदार आहेत. आणि तेच नेते चांगभलं बिरोबा म्हणत आरक्षणाचा खेळखंडोबा करत बसलेत. आणि आता तीन तिघाडी काम बिघाडी सरकार सत्तेवर आले असले तरी त्यांची काही मानसिकता दिसत नाही. त्यामुळे समाजाचा आक्रोश अजून दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसुचित जमातीच्या सवलती अजून समाजाला न मिळाल्याने समाजाचे वाटोळे झाले आहे मग ते लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी बुद्धीजीवी वर्ग झटत असताना झगडत असताना समाजाची बाजू मांडणारेच लेखक हे विनाकारण बुद्धी पाजळवत आहेत असे मत समाजातील काही नेत्यांची धोतरं सांभाळणाऱ्यांचे आहे ते खरंतर चुकीचे ठरते असे म्हणायला मला वावगं वाटणार नाही. कदाचित माझ्या या वाक्याचा काहीजनांना राग येईल पण मला त्याची पर्वा नाही. कारण समाजापेक्षा कोणतीही व्यक्ति थोर नाही. आजची युवा पिढी भलतीकडेच भरकटत चाललीय त्यांना योग्य समाजप्रबोधनाची, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तरच समाज प्रगतीपथावर वाटचाल करेल...
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+919531966943
nitinrajeanuse123.blogspot.com
No comments:
Post a Comment