जय मल्हार योद्ध्यांनो
पाठीमागे राज्यभरातील सर्व समाजबांधवांच्या प्रतिक्रीया मिळवून मी एक सर्वे केला होता त्यामध्ये ९३.७५% समाजबांधव वेगवेगळ्या मोर्चात सहभागी होणार नसून एकच मोर्चा असावा असे त्यांचे मत होते. आज अशा प्रतिक्रीया देणार्या समाजबांधवांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून त्यांची सरासरी ९६% वरती पोहचली आहे. वेगवेगळे मोर्चे आयोजित करणार्या नेत्यांनी याची दखल घ्यायला हवी कारण भविष्यात तुमचं नेतृत्व धोक्यात येण्याची चिन्हे आज दिसू लागली आहेत. डोळ्यावरती नव्हे तर नेत्यांनी स्वताच्या इगोवरती (अहंकारावरती) घोंगडी पांघरूण घालून डोळे उघडे ठेवून पुढे वाटचाल करावी तरच तुमचं आणि समाजाचं भविष्य उज्वल ठरेल अन्यथा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थीती होईल.
धनगर समाजातील सर्व समाजबांधवांनी व नेत्यांनी एकत्रित येऊन आरक्षण अंमलबजावणीसाठी संघटनातून संघर्ष करावा यासाठी प्रबोधनाच्या आणि समाजजागृतीच्या माध्यमातून आज बुद्धीजीवी वर्ग पोटतिडकीने आणि तळमळीने काम करतो आहे. सर्व बुद्धीजीवी वर्ग हा निस्वार्थीपणे समाजासाठी झटत आणि झगडत असल्याने आजच्या ९६% धनगर समाजबांधवांचा विश्वास हा बुद्धीजीवी वर्गावर असून समाजातील विचारवंत, तज्ञ, लेखक जो निर्णय घेतील तो समाजाच्या हीताचा असणार आहे. म्हणून वेगवेगळे मोर्चे काढणार्या नेत्यांनी या गोष्टीची दखल घ्यायला हवी.
यशवंत सेनेचे संस्थापक स्व बी के कोकरे साहेब यांच्या क्रांतीकारी चळवळीनंतर समाजाला योग्य दिशादर्शक नसल्याने समाज अंधार्या रात्रीच्या दिशाहीन जहाजाप्रमाणे वाटेल तिकडे भरकटत गेला आहे. प्रस्थापितांची चमचेगीरी अन् गुलामगीरी करत धनगर समाजाच्या नेत्यांनी समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचं महापाप केलेले आहे. आज खरंच समाजामध्ये स्व बी के कोकरे साहेबांची उणीव भासते आहे. जोपर्यंत या महाराष्ट्रातील युवकांच्या डोक्यात स्व. बी के कोकरे साहेबांची विचारधारा पेरली जाणार नाही तोपर्यंत हा समाज पेटून उठणार नाही अन् एकत्रितही येणार नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. ज्यादिवसी हा अखंड धनगर समाज पेटून उठेल तेव्हाच आपली कुठेतरी दखल घेतली जाईल. एवढंच नव्हे तर सांगलीमध्ये कार्यक्रमात बोलताना मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी सुद्धा स्व.बी.के.कोकरे साहेब आज समाजात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
समाजाचे नुकसान.....
८ आणि १० डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर दोन वेगवेगळे मोर्चे घेऊन जाण्यासाठी धनगर नेते कंबर कसून उभे राहीलेत खरे पण या वेगवेगळ्या मोर्चातून काही साध्य होणार नाही उलट धनगर समाजाचे आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे याचा अभ्यास बुद्धीजीवी वर्गासोबत नेत्यांनी सुद्धा करायला हवा.
१)आर्थिक नुकसान:- महाराष्ट्रातून धनगर समाजबांधव वेगवेगळ्या मोर्चात सहभागी झालाच तर पश्चिम महाराष्ट्रातून नागपूरमध्ये येण्यासाठी एका समाजबांधवाला कमीत कमी २००० रुपये खर्च येतो.
१ समाजबांधव =२०००
१००×२०००=२०००००
१०००×२०००= २००००००
१००००×२०००= २०००००००
फक्त दहा हजार समाजबांधव पश्चिम महाराष्ट्रातून नागपूरमधील वेगवेगळ्या मोर्चात सहभागी झाला तर येण्या-जाण्याचे दोन कोटी रुपये खर्च होतील. मग लाखो समाजबांधव फक्त पश्चिम महाराष्ट्रातून गेले तर २० कोटी रुपये खर्च होतील मग उर्वरीत कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून समाजबांधव नागपूरमध्ये आला तर अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान होईल आणि त्याशिवाय समाजबांधवांच्या जेवणखाण्याचा खर्च, समाजबांधवांनी घेतलेल्या रजा(सुट्ट्या), त्यांच्या कामांचे खाडे याचा हिशोब केला तर हा आकडा कुठच्या कुठे जाईल ते सांगता येणार नाही.
२) सामाजिक नुकसान:- वेगवेगळे मोर्चे काढल्याने शेता-मळ्यात तसेच रानावनात शेळ्या मेंढ्यांची राखण करून तळहातावरती पोट भरणारा समाजबांधव आरक्षणाच्या नावाखाली नागपूर मध्ये येणार पण त्यांच्या पदरात नेमकं पडणार तरी काय?? नेत्यांचीच अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य समाजबांधवांच्या नशीबी नुसती निराशाच येईल आणि नेत्यांच्या या विश्वासघातकी प्रवृत्तीमुळे पुढे भविष्यात होणार्या सामाजिक कार्यक्रमात, मोर्चे असो अथवा आंदोलन त्यामध्ये सर्वसामान्य धनगर समाज सामील होणार नाही हे सामाजिक नुकसान पुन्हा कधीही भरून काढता येणार नाही.
३) राजकीय नुकसान:- वेगवेगळे मोर्चे आयोजित केल्याने नक्की कोणत्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं असा समाजबांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित नेत्यांनी इगो बाजूला ठेवून आरक्षणाचा श्रेयवाद, राजकीय स्वार्थ, मोठेपणा तसेच त्यांच्या पक्षश्रेष्ठींना खूश करण्याची उठाठेव बंद करून एकच मोर्चा आयोजित करावा अन्यथा कोणत्याच मोर्चात सहभागी होणार नाही असे ९६% समाजबांधवांचे मत आहे. मग पुढच्या विधानसभा/लोकसभा निवडणूकीत मत मागताना नेमकं काय म्हणून मत मागणार?? जिथे धनगर समाज तुमच्या सोबत नसेल तर बाकीच्या समाजाकडे काय म्हणून भिक मागणार? आणि अशामुळे त्या संबंधित नेत्यांचेच नव्हे तर सर्व धनगर नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येणार हे सर्वात मोठे राजकीय नुकसान आहे.
अशा प्रकारे आर्थिक, समाजिक आणि राजकीय नुकसान फार मोठ्या प्रमाणात होईल पण तसे त्यातून वेगवेगळे मोर्चे काढले तर एक-दोन तासापुरती सभा अन् तद्नंतर निवेदन घोषणा दिल्या की तिथंच समारोप करुन मोर्चा संपला असं जाहीर करणार असाल तर Output=Zero असणार आहे. समाजाचं भांडवल करून तुम्ही स्वताच्या नावावर जर समाजाचा बाजार मांडत असाल तर समाज तुम्हाला साथ देणार नाही. आणि कधी माफही करणार नाही. आज धनगर समाजातील युवा तरूण वर्ग सुशिक्षित सुज्ञ आणि जागृत झालेला असून बुद्धीजीवी वर्ग जो निर्णय घेईल तो मान्य करून संघर्ष करण्यासाठी तयार आहेत पण श्रेयवादापोटी आणि राजकीय स्वार्थापोटी समाजात विभाजन करू पाहणार्या नेत्यांना अद्दल घडवली पाहीजे. वेगवेगळ्या मोर्चाचे नेतृत्व करणार्यांपैकी कोणीतरी वैयक्तिक स्वार्थ आणि श्रेयवाद बाजूला ठेवून दोन पाउले मागे घ्यावीत आणि एकाच मोर्चाचे आयोजन करून समाजकार्यात भर घालावी असे माझे वैयक्तिक मत असून यात समाजाचे परिणामी धनगर नेत्यांचे भले आहे अन्यथा "मलाही नको अन् नको तुला तर घाल कुत्र्याला" अशी अवस्था होईल. धनगर समाजातील नेत्यांनी वरील सर्व गोष्टींचे भान ठेऊन विचारविनीमय करावा. आज राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात मीटींग घेऊन तुमचे पैसे खर्च करण्यात काही अर्थ नाही फक्त तुम्ही एकत्रित येऊन एकाच मोर्चाचा एकच दिवस निश्चित करा तर आम्ही पंचवीस लाखाच्या वरती नागपूरमध्ये पोहचू हवं तर मी ती सर्व जबाबदारी घेतो अन्यथा वेगवेगळ्या मोर्चात सहभागी होणे म्हणजे समाजाचे विभाजन करणे होय. मोर्चे जर वेगवेगळे असतील तर मी सुद्धा कोणत्याच मोर्चात सहभागी होणार नाही.
जय मल्हार जय!! अहिल्या!!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
........................................................
No comments:
Post a Comment