
धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो असे जाहीर वक्तव्य स्वता देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणातून करतात कदाचित फसणवीसांची धनगर समाजाला फसवण्याची ही वेगळीच खेळी असू शकते. पण खैर त्याच सत्ताधारी पक्षामध्ये ना.प्रा.राम शिंदे साहेब आणि ना.महादेव जानकर साहेब हे कॅबिनेट मंत्री आहेत ते फक्त आणि फक्त माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजामुळे आहेत हे विसरून चालणार नाही. *धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही* हे मंत्री महोदय ना.जानकर साहेबांनी जे विधान केले ते त्यावरती गेल्या आठवड्यापासून उलट सुलट चर्चा ऐकायला भेटतात परंतु हे समाजाच्या भावना दुखावणारे विधान ना.जानकर साहेबांना भविष्यात महागात पडू शकते यात काही शंकाच नाही. ना.जानकर साहेबांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी हे विधान केले असेल ते त्यांच्या परीने योग्य आहे कारण एकट्या धनगर समाजाच्या जोरावर पक्ष चालवणे हे शक्य नाही. त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे आणि जानकर साहेब हे बहुजनांचे नेते आहेत ते एकट्या धनगर समाजाचे नेते नाहीत. म्हणून त्यांनी केलेल्या विधानाकडे राजकीय वर्तुळातून पाहिल्यास काहीच गैर नाही पण सामाजिक वर्तुळातून त्याकडे जर कटाक्ष टाकला तर ते विधान माझ्या धनगर समाजाच्या जिव्हारी लागल्याशिवाय राहणार नाही.
१९९३ नंतर जेव्हा स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या यशवंत सेनेचा सरसेनापती होण्यासाठी मुलाखती घेतल्या गेल्या तेव्हा जानकर साहेबांना सरसेनापती घोषित करण्यात आले त्यानंतर सामाजिक चळवळीत झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या प्रचार व प्रसारासाठी निधी उभा केला तो केवळ धनगर समाजामुळेच... यशवंत सेना गावागावत वाडीवस्तीवर पोहचली होती ती केवळ धनगर समाजामुळेच... आटपाडीमधील कार्यकर्त्यांनी विटा.ता.खानापूर जि.सांगली येथे यशवंत सेना सरसेनापती जानकर साहेब यांना स्काॅर्पियो प्रदान करण्यात आली होती ती केवळ धनगर समाजबांधवांनी दिलेल्या निधीमुळेच... २००३ साली त्याच यशवंत सेनेचे राष्ट्रीय समाज पक्षात विलीनीकरण केले गेले तेव्हा राज्यभर आणि महाराष्ट्र राज्याबाहेर जानकर साहेब दौरे करायचे ते ही धनगर समाजातील समाजबांधवांनी पेट्रोलसाठी स्वताच्या खिशातून शंभर-दोनशे रूपये दिल्यामुळेच... जोपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाने बाळसे धरले नव्हते तोपर्यंत धनगर समाजातील कार्यकर्त्यांनीच स्वताच्या खिशाला झळ लावली, ऐन दुष्काळात जनावरांसाठी छावण्या असताना देखिल आपलाच माणुस म्हणून जानकर साहेबांना दौऱ्यासाठी पेट्रोलसाठी खिसे रिकामे केले आणि जानकर साहेब राज्यभर नव्हे तर अखंड देशभर पक्षाचा प्रचार व प्रसार करू लागले तेही धनगर समाजामुळेच... जसजसा पक्ष वाढला तसतशी राजकारणाची हुकी आलेले धनगर व धनगरेतर बलाढ्य, धनाढ्य नेते पक्षप्रवेश करून पक्षाला पैसा पुरवू लागले तेव्हा आजपर्यंत यशवंत सेनेसाठी आणि राष्ट्रीय समाज पक्षासाठी झिजलेले हाडामांसाचे धनगर समाजातील कार्यकर्ते हळूहळू बाजूला होत गेले व इतर समाजातील धनाढ्य बलाढ्य पैसेवाले राजकीय नेते जानकर साहेबांच्या जवळ जाऊ लागले मागेपुढे करू लागले त्यातूनच बहुजनांचा पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष अशी ओळख आम्हीच म्हणजे धनगर समाजातील कार्यकर्ते सांगू लागलो.
आज राष्ट्रीय समाज पक्ष लहानाचा मोठा झाला, हाडामांसाचे चळवळीत झिजलेले कार्यकर्ते पैशाने गरीब असल्याने आपोआप बाजूला वळचणीला पडले ते फक्त झेंडे वागवण्यासाठीच... पण झेंडा खाली तरी कसा टाकणार कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे झाड हे खडकावर लावल्याने फळे उशिरा येतील पण ज्यांना लवकर फळे चाखायची असतील ते पक्षातून बाहेर पडतील असा समज राष्ट्रीय समाज पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आहे पण २० फेब्रुवारी २०१३ रोजीचा कटगुण जि.सातारा येथील (कार्यक्रमास मी स्वता उपस्थित होतो) तो प्रसंग आठवला तर मला तो 'लवकर अथवा उशिरा फळांबाबतचा' जो समज आहे असे काही वाटतच नाही. कारण ज्या पश्चिम महाराष्ट्र राज्यातून यशवंत सेना व तद्नंतर राष्ट्रीय समाज पक्षाच्या चळवळीचा जन्म झाला त्या पश्चिम महाराष्ट्रातून सर्वप्रथमता निधी जमा करून जानकर साहेबांना गाडी प्रदान केली त्याच पश्चिम महाराष्ट्रातील धनगर समाजाला गाडी (एसटी) गेल्यावर गाडीला हात करायची सवय आहे या जानकर साहेबांच्या वक्तव्यानेच मला हैरान केले होते कारण गाडी (एस टी) आल्यानंतर सर्वात पहिले तिकीट काढलेला पश्चिम महाराष्ट्रातील माझा भोळा भाबडा धनगर समाज सढळ हातानेच पक्षासाठी खिशातून पैसा काढत होता. मग आजपर्यंत चळवळीत संघटनेसाठी आणि पक्षासाठी झिजलेल्या कार्यकर्त्यांची काय किंमत राहिली?? असो... हा लेख त्यांना विरोध करण्यासाठी अथवा समर्थन करण्यासाठी नसून वस्तुस्थिती सांगण्यासाठी आहे कोणीही वाईट घेऊ नये.
पण गेल्यावर्षी एका ठुकार पत्रकाराने बातमी दिली की जानकर साहेब म्हणताहेत "धनगर समाजाने मला फसवले" या बातमी नंतर आम्ही त्या ठुकार पत्रकाराचा चांगलाच समाचार घेतला होता, भगवानगडावरील पवारांच्या विरोधातील वक्तव्यांने अख्खा महाराष्ट्र उलट सुलट चर्चा करत असताना जानकर साहेबांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असे ब्लाॅगच्या माध्यमातून जानकर साहेबांवर केलेले आरोप आम्ही खोडून काढले http://nitinrajeanuse.blogspot.in/2016/10/blog-post.html?m=1 महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज तेव्हा जानकर साहेबांचे समर्थन करत होता. जेव्हा जेव्हा धनगर समाजाचे नाव पुढे करून जानकर साहेबांना अडवण्याचे घाणेरडे राजकारण केले जायचे तेव्हा दुसरे कोणी नव्हे तर धनगर समाजातील कार्यकर्ते आपापल्या परीने लढायचे आणि आजही लढताहेत. १५ जुलै ते २१ जुलै २०१४ आरक्षण दींडी निघाल्यानंतर आमरण उपोषण सोडण्याच्या दिवशी स्वता देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट मध्ये धनगर जमातीला आरक्षण देणार असल्याचे कबुल केले तेव्हा आरक्षण दिंडी मध्ये स्वता जानकर साहेब देखिल सामिल झाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाने एकगठ्ठा मतदान धनगर समाजातील नेत्यांमुळेच भाजपाच्या पारड्यात टाकले आणि भाजपला सत्तेवर आणले. भाजपासोबत युती झाली असल्याने व धनगर समाजामुळेच मी मुख्यमंत्री झालो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते शिवाय धनगर समाजाला दोन कॅबिनेट मंत्री पद द्यायची बोलणी देखिल झाली असल्याने त्यानुषंगाने भाजपचेच विधानसभा सदस्य ना.प्रा.राम शिंदे हे गृहराज्य मंत्री असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष असलेल्या जानकर साहेबांना कॅबिनेट मंत्री पद देणे उचित वाटत नव्हते. म्हणून प्रथमता ना.प्रा.राम शिंदे साहेब यांना कॅबिनेट मंत्री व तद्नंतर ना.महादेवजी जानकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. हे सर्व झाले ते फक्त धनगर समाजामुळेच झाले कारण भाजप सरकारला आणि परिणामी आघाडी सरकारला देखिल कळून चुकले होते की धनगर समाज मनात आणलं तर काय करू शकतो आणि काय नाही... त्यामुळे धनगर समाजामुळे मी मंत्री झालो नाही हे विधान सामाजिक वर्तुळातून समाजाच्या भावना दुखावणारे आहे.
काहीजण म्हणाले की जर शरद पवार यांनी असे मराठा समाजाबद्दल वक्तव्य केले असते तर मराठा समाजबांधवांनी अभिमानाने सांगितले असते की आमचा नेता अठरा पगड जातीला सोबत घेऊन जातो पण हे नुसतेच बोलून नव्हे तर कृतीतून दाखवून द्यायचे असते. शरद पवारांनी बहुजनांच्या नावाखाली सत्ता गाजवली पण कामं फक्त त्यांच्याच जातीतील पाहुण्याराऊळ्यांचीच केली. त्यांनी आपापली आणि आपापल्या बगलबच्च्यांची घरे भरली आहेत आणि त्यांचे बगलबच्चे देखिल तीच पवार नीती वापरत आहेत म्हणून त्यांना फरक पडत नाही तर फरक पडतो तो आपल्या शेळ्या-मेंढ्या राखून पायाच्या नडग्या वाळवणाऱ्या माझ्या वडिलधारांना मेंढपाळांना... ज्यांनी ऊन वारा पावसाचा विचार न करता पै पै कमवली होती ती चळवळीसाठी पक्षासाठी दिली... फरक पडतो त्या हाडामांसाच्या कार्यकर्त्यांना ज्यांनी काॅलेज शाळा बुडवून पक्षाचा प्रचार प्रसार केला जे आज बेरोजगारीच्या नावखाली सडत पडलेले दिसतात.... फरक पडतो त्या तरूणांना जे पक्षाच्या प्रचार व प्रसारासाठी नोकरीवर टांगती तलवार ठेवून घरादाराचा विचार न करता पक्षासाठी रस्त्यावर उतरतात... राजकारण हे नेहमीच राजकारणाच्या पद्धतीनेच चालावे व समाजकारण हे समाजकारणाच्याच पद्धतीने... पण जर राजकारण करत असताना समाजबांधवांच्या भावना समजून घेणे फार महत्वाचे असते. ना.जानकर साहेबांच्या या वक्तव्याचे समर्थन करताना आणि या वक्तव्याचा विरोध करताना दोन्हीकडील कार्यकर्ते कोणत्या थराला जाऊन समर्थन करत आहेत याचे भान त्यांना राहत नाही म्हणून मला थोडंफार लिहावसं वाटलं.
खरंतर कोणीही या बाबतीत गैरसमज करून घेऊन नये कारण सांगायची वस्तुस्थिती अशी की नेता अथवा मंत्री मग तिथे कोणीही असो ज्या समाजात तो जन्माला आला आहे त्या समाजाशी त्याची नाळ जोडलेली असते हे सर्वज्ञात असतेच पण उगाचच केवळ राजकारणासाठी मी या समाजामुळे मंत्री झालो नाही त्या समाजामुळे झालो नाही असे जाहीर वक्तव्य करू नये. अशा वक्तव्यातून तुम्हाला इथपर्यंत पोहचवणाऱ्या माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाच्या भावना दुखवू नयेत अन्यथा हा भोळा भाबडा धनगर समाज जवळ यायच्या ऐवजी तुमच्यापासून खूप दूर जाईल अर्थातच हा समाज पुन्हा जर का अंधकारात ढकलला गेला तर या समाजाला पुन्हा प्रकाशात यायला फार काळ लागेल.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
https://m.facebook.com/nitinrajeanuse123/