Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday, 8 September 2018

शिक्षकांना संरक्षणाची मागणी का करावी लागते? :नितीनराजे अनुसे

शिक्षकांना संरक्षणाची मागणी का करावी लागते?
                       लेखन :- ✍️नितीनराजे अनुसे
     काल परवाच्या वर्तमानपत्रात मला वाचायला मिळाले की ५ सप्टेंबर रोजी जो शिक्षकदिन देशभर साजरा झाला त्यामध्ये शिक्षकांनी सरकारकडे संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. खरंतर भारत देशाव्यतीरिक्त अन्य काही देशांमध्ये गुरूंना (शिक्षकांना) सर्व क्षेत्रात व्ही आय पी दर्जा दिला जातो  परंतु त्याउलट भारतातील शिक्षकांना संरक्षण मिळावे अशी मागणी का करावी लागली? याचा विचार करत असतानाच गुलामांचा मुक्तिदाता म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे असे अमेरिकेचे ख्यातनाम माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहाम लिंकन यांनी त्यांच्या मुलाच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना एक राष्ट्राध्यक्ष नव्हे तर एका वडिलांच्या नात्याने लिहलेले पत्र मला आठवले आणि त्यातील उपदेशात्मक शब्द आजच्या काळात उचित ठरणारे आहेत. ते पुढीलप्रमाणे...
        "अजून त्याला खूप शिकायचे आहे. प्रत्येक माणूस प्रामाणिक आणि सत्यवचनी असू शकत नाही हे मी जाणतो; पण शक्य असेल तर, पुस्तकांमध्ये किती जादू असते हे त्याच्या लक्षात आणून द्या. तसेच, निसर्गाच्या अनाकलनीयतेबद्दल विचार करायला त्याला वेळ द्या. पक्षी कसे उडतात, सूर्यप्रकाशात मधमाशा कशा गुणगुणतात आणि हिरवाईने नटलेल्या डोंगरावर फुले कशी फुलतात, याचा विचार करायला त्याला प्रवृत्त करा. दुसऱ्याची फसवणूक करून, लबाडी करून यश मिळवण्यापेक्षा अपयशी झालेले चांगले, हे त्याला शिकवा. त्याचे विचार सगळ्या जगाने जरी मान्य केले, तरीही त्याला मनापासून काय वाटते यावरच विश्वास ठेवायला त्याने शिकलेच पाहिजे. सभ्य माणसांशी सभ्यतेने वागायचे आणि असभ्य माणसांशी कठोरपणे वागायचे, हे त्याला शिकवा. सामान्य लोकांच्या कळपात मेंढरासारखे न राहता, त्या गर्दीपासून वेगळा एकटेपणाने तो ताठ उभा राहू शकेल, एवढा त्याला कणखर बनवा. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घ्यायचे; पण त्यातले जे म्हणणे सत्याच्या कसोटीवर उतरणारे आणि योग्य असेल, तेच स्विकारायचे हे त्याला शिकवा.
         समोर उभ्या ठाकलेल्या संकटाचा हसतमुखाने सामना करायचा आणि डोळ्यातून आपसूकच ओघळणाऱ्या अश्रूंची शरम बाळगायची नाही, हे त्याला शिकवा. तऱ्हेवाईक माणसांशी जशास तसे वागायला आणि साखरपेरणी करत बोललेल्या शब्दांपासून सावध राहायला त्याला शिकवा. त्याचे सामर्थ्य आणि त्याची बुद्धी त्याला त्याने महत्त्वाचे स्थान दिलेच पाहिजे; पण कुठल्याही परिस्थितीत त्याने आपले मन आणि आत्मा यांची फसवणूक करता कामा नये. स्वतःचे म्हणणे, वागणे बरोबर आहे याची त्याला खात्री असेल, तर त्याविरुद्ध उठवल्या जाणाऱ्या गदारोळाकडे त्याने दुर्लक्ष करायला हवे, हे त्याला समजावून सांगा. त्याच्याशी हळूवारपणे वागा; पण त्याला अवाजवी संरक्षण देऊ नका; कारण फक्त दु:खात आणि कठीण प्रसंगातच माणसातले उत्तम गुण झळाळून उठू शकतात.
       त्याला इतका धीट, निर्भय बनवा की, प्रसंगी तो त्याचा आवाज उठवू शकेल आणि स्वतःची मर्दुमकी गाजवण्यासाठी निश्चयपूर्वक  प्रयत्न करेल. त्याला हेही शिकवा की, त्याने स्वतःवर विश्वास ठेवायला हवा, म्हणजे 'माणुसकी'वर तो विश्वास ठेवेल.
       माझ्या मुलाच्या बाबतीत माझ्या खूप आकांक्षा आहेत, त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या बाबतीत तुम्ही मला काय मदत करू शकता, हे पाहण्याची मला उत्सुकता आहे.
      माझा मुलगा हा एक गोड आणि उत्तम मुलगा आहे, यात शंकाच नाही."
                     -अब्राहम लिंकन
         कधीकाळी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अनुसेवाडी (निंबवडे) ता.आटपाडी जि.सांगली या शाळेत असताना गुरूजींनी भिंतीवर टांगलेल्या भल्यामोठ्या चार चार्टवरतीचं हे अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना लिहलेले पत्र आणि त्यावरची अक्षरे आज नकळतपणे आठवली. एक पालक अर्थातच वडील या नात्याने राष्ट्राध्यक्ष असताना अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना उपदेश केला होता. मात्र  दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखणाऱ्या, गावोगावी भटकंती करणाऱ्या आमच्या आई-वडिलांनी खरंतर शाळेचे तोंड कधीच पाहिले नव्हते अथवा अशाप्रकारचे पत्र त्यांना कोणी ऐकवले नव्हते तरीही त्यांचा शाळेतील गुरूजींवरती/मुख्याध्यापकांवरती एवढा विश्वास होता की गुरूजीच आपल्या पाल्याला उत्तम ज्ञान देऊ शकतात जे आपल्या पाल्याला व्यवहारीक जीवनात उपयोगी पडेल. त्या काळात जर पाल्याने अर्थातच मुलाने/मुलीने घरी अथवा इतरत्र कुठेही आणि काहीही चूक केली, बेशिस्तपणे वागला/वागली तर पालक स्वतःहून शाळेत येऊन गुरूजींकडे तक्रार करून त्या पाल्याला शिक्षा द्यायला सांगत होते. शिक्षकांनी शिक्षा दिल्यानंतर पाल्य पुन्हा तशी चूक करणे अथवा बेशिस्तपणे वागणे शक्यच नव्हते  कारण त्या काळात शिक्षकांना(गुरूजींना) पालकांचा पाठिंबा होता आणि त्यातूनच शिस्तबद्ध विद्यार्थी घडत होते. परंतु त्या तुलनेत आजच्या काळात शिक्षणाच्या बाबतीत काही बदल झाल्याची जाणीव न कळतपणे होऊन जाते. आजकाल जर शिक्षकांनी (सरांनी) जर विद्यार्थ्यांना केलेल्या चुकीबद्दल शिक्षा दिली अथवा अभ्यासासंदर्भात विद्यार्थ्यांनी काहीतरी नवीन शिकावे म्हणून शिक्षा दिली तर तो विद्यार्थी पालकांकडे तक्रार करतो आणि पाल्यांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांला का शिक्षा केली असा जाब विचारला जातो. शिवाय कधीकधी 'आमचा मुलगा शिकू अथवा न शिकू तुम्हाला पगार मिळतोय ना? कमी तर होत नाही ना? पुन्हा जर आमच्या मुलाल/मुलीला हात लावाल तर बघा? अशी धमकी देखील दिली जाते तेव्हा शिक्षक हा नावासाठीच 'गुरू' म्हणून शिल्लक राहतोय असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. कारण आजच्या पालकांचा जर शिक्षकांना पाठिंबा नसेल आणि स्वतःच्या पाल्यांना पाठिंबा असेल तर मग  शिक्षकांनी (गुरूंनी) काय फक्त पगारासाठी नोकऱ्या करायच्या का? असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या डोक्यात गोंधळ घालून बसलाय...
🙏माझ्या सर्व गुरूजनांना आणि सर्व पालकांना समर्पित🙏
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
https://nitinrajeanuse123.blogspot.com  

No comments:

Post a Comment