![]() |
पानिपतचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना नितीनराजे अनुसे यांचे पत्र |
आशुतोष गोवारीकर
(चित्रपट दिग्दर्शक,
निर्माते, लेखक
एवं अभिनेते)
विषय :- पानिपत या चित्रपटात मराठ्यांच्या इतिहासचे विद्रुपीकरण करून थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या भूमिकेबद्दल अपरिहार्य लेखन(स्क्रिप्ट)/चित्रीकरण करत असल्याबद्दल...
आदरणीय सर,
तुम्ही फार मोठे दिग्दर्शक आहात त्याशिवाय निर्माते,अभिनेते आणि एक लेखक सुद्धा आहात. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका मराठी कुटुंबातील तुमचा जन्म, शिवाय एक मराठी भाषिक असल्याने माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठी माणसाला तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलायला काहीच हरकत नाही. अर्थातच सदरचे पत्र पाठवत आहे त्यामागच्या आमच्या भावना तुम्ही नक्कीच समजून घ्याल.
वरील उपरोक्त विषयास अनुसरून तुम्ही "पानिपत" हा चित्रपट प्रदर्शित करणार आहात असे समजले आणि त्या चित्रपटासाठी संदर्भ म्हणून तुम्ही ज्या अविश्वसनीय साधनांचा म्हणजेच विश्वास पाटील यांची "पानिपत" ही कादंबरी आणि "भाऊसाहेबांची बखर" याचा आधार घेऊन चित्रपट निर्मिती करत आहात. चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत आमचे काहीच दूमत नाही. कारण १४ जानेवारी १७६१ रोजी ऐन संक्रांतीच्या दिवशी जे पानिपत घडले त्या पानिपतमध्ये महाराष्ट्रातील लाखों कुटुंबावर संक्रांत कोसळली होती. प्रत्येक माजघरातला कुंकवाचा करंड पानिपतावर लवंडला होता. जेव्हा शत्रु चाल करून येतो तेव्हा राष्ट्रसंकट उद्भवल्यावर शत्रुंशी लढायचे कसे? शत्रुंना भिडायचे कसे? याचा धडा ज्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी गिरवला त्या युद्धात महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला वीर कोसळला होता ती रक्ताने माखलेली पानिपतची माती पवित्र होऊन त्याचे आज पवित्र भस्मात रूपांतर झाले आहे. ऐन संक्रांतीदिवशी अफगाणिस्तानचा घुसखोर अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्याण १४ जानेवारी १७६१ ला झालेले पानिपत सारखे युद्ध त्यागोदर आणि त्यानंतरही कधीच इतिहासात घडले नाही. मध्यमयुगाच्या कालखंडात सकाळी नऊ वाजलेपासून ते सायंकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत एकाच दिवसाच्या अल्पावधीत असं आक्राळवीक्राळ, भयंकर, घनघोर, जीवघेणं युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही फौजांची दीड लाख माणसं आणि ऐंशी हजार जणावरं मेल्याचे दुसरे उदाहरण कोणते नाही.
त्यामुळे तुम्ही चित्रपट निर्मीतीचा घेतलेला निर्णय हा खरंतर कौतुकास्पद असला तरी ज्या कादंबरीचा आणि बखरीचा संदर्भ तुम्ही घेतला आहे त्यामध्ये अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य अबाधित राखणाऱ्या लढवय्यावरती अर्थातच थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावरती नाहक आरोप केले आहेत. तीच री ओढून ताणून तुम्ही मराठ्यांचा इतिहास अखंड भारतात तसेच जगभरात मलीन करत आहात असे आम्हाला वाटते. कारण चित्रपट हे एक प्रतिबिंब असते तुम्ही जसे प्रेक्षकांवरती बिंबवणार त्यालाच अनुसरून प्रेक्षक आपल्या मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आपापले मत बनवणार यामध्ये काहीच शंका नाही.
त्यासाठी तुम्ही पानिपतवरती, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावर नव्याने संशोधन करणाऱ्या इतिहासकारांशी चर्चा करून योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा. कारण अविश्वसनीय साधन असलेल्या विश्वास पाटील यांची "पानिपत" कादंबरी आणि "भाऊसाहेबांची बखर" यामध्ये मल्हारराव होळकर यांच्यावरती झालेल्या/केलेल्या आरोपांचे खंडण जेष्ठ लेखक/इतिहास संशोधक आदरणीय संजय सोनवणी सर, संजय क्षिरसागर सर यांनी केले असून त्यांनी संशोधित केलेला इतिहास खोडायचे आवाहन आजपर्यंत कोणीच स्विकारले नाही अथवा त्यावरती कोणी प्रतिवाद देखील सादर केला नाही. महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानच्या वतीने वरील इतिहास संशोधकांसह प्रकाश खाडे सर यांच्या सहीचे पत्र तुम्हाला मिळालेच असेल शिवाय क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या क्रांतीकारी विचारावर मार्गक्रमण करणाऱ्या "महाराष्ट्र यशवंत सेनेच्या वतीने संघटनेचे प्रमुख मा.सुरेशभाऊ होलगुंडे", "यशवंतराव होळकर प्रतिष्ठान चिंचवण चे अध्यक्ष मा.दत्ता वाकसे" यांचेही पत्र मिळाले असेलच.
मल्हारराव होळकर हे एक मराठ्यांचे मुत्सद्दी लढवय्ये होते, त्यांनी स्वबळावर साम्राज्य उभा केले होते शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य अबाधित राखण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर त्यांनी अटकेपार झेंडे फडकवले होते हे तमाम महाराष्ट्र वाशीयांना अभिमानास्पद आहे. पानिपतच्या युद्धानंतर उत्तर भारतात मराठ्यांच्या साम्राजाचा विस्तार त्यांनी केला होता. त्यामुळे उपरोक्त विषयास अनुसरून तुम्ही प्रदर्शित करू इच्छित असलेल्या "पानिपत" या चित्रपटात मराठ्यांच्या इतिहासाचे विकृत दर्शन घडवून थोरले सुभेदार मल्हारराव होळकर हे पानिपतच्या युद्धातून पळून आल्याचे खोटे आरोप करून पानिपतच्या पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले आहे. त्या अविश्वसनीय साधनांचा वापर करून मल्हारराव होळकर यांच्याबद्दल चुकीचे चित्रीकरण केल्यास महाराष्ट्र राज्यातील अखंड मराठ्यांच्या भावना दुखावतीलच शिवाय मल्हारराव होळकरांचे वारसदार असलेला महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज हे कदापि सहन करणार नाही. त्यासाठी इतिहासाचे अभ्यासक, संशोधक, विचारवंत यांच्याशी या संबंधित चर्चा करावी आणि मल्हारराव होळकर यांच्यावरती जे अपरिहार्य लेखन(स्क्रिप्ट)/चित्रिकरण झाले आहे त्यात बदल करावा अन्यथा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मराठी माणूस इतिहासाच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरून तुम्ही दिग्दर्शन करत असलेला "पानिपत" हा चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच प्रदर्शित होऊ देणार नाहीत याची तुम्ही नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
आम्हा सर्वसामान्य मराठी माणसांच्या भावना समजून तुम्ही योग्य आणि सकारात्मक निर्णय घ्याल एवढीच प्रामाणिक अपेक्षा....
कळावे
-नितीनराजे अनुसे (लेखक व व्याख्याते)
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com