Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday, 13 August 2022

लोकराज्ञी राजयोगिणी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांचा आज स्मृतिदिन... ✍️नितीनराजे अनुसे

एक स्त्री असूनही तत्कालीन पुरूषप्रधान व्यवस्थेला चपराक देत सती प्रथेला न जुमानता एका हातात शास्त्र तर दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन भारताच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्षे राज्यकारभार करणाऱ्या प्रथम महिला राज्यकर्त्या, मायमाऊली अर्थातच लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना २२७ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम... खरंतर जातीयवादी इतिहासकारांनी बहुजन समाजातील महापुरुषांचा इतिहास विकृत करून त्याचे विद्रुपीकरण केले असताना आमच्यातील विचारवंत मात्र त्यांच्या उपाधी बद्दल मतांतरे करत बसलेत हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. अशा उपाधींपेक्षा त्यांचे अफाट प्रशासकीय, राजकीय, सामाजिक तथा धार्मिक कार्य समाजासमोर यावे या विचाराचा मी असल्यामुळे त्या विचारवंतांच्या मतानुसार इतिहास गढूळ होणे हे असंभव आहे. उदा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राष्ट्रमाता, लोकमाता, राजमाता, महाराणी, रणरागिणी, महापराक्रमी अशा कितीतरी बिरुदावल्या वापरल्या तरी त्या अहिल्याईंनी केलेल्या प्रजाहितदक्ष कार्य तथा राष्ट्रहिताच्या कार्यासमोर कमीच आहेत. जगाच्या इतिहासात अहिल्याईंना एक उत्तम तथा आदर्श राज्यकर्ती, प्रशासनकर्ती म्हणून ओळखले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. "प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा" एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. म्हणूनच की काय ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महाराणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महाराणी मार्गारेट यांच्यापेक्षाही अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या या महापराक्रमी महिलेने घरात एकही कर्ता पुरूष नसताना जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. अर्थातच चक्रवर्ती सम्राट राजा अशोकाच्या स्वप्नातील 'राष्ट्र' घडवण्यासाठी त्यांनी आपले जीवन व्यतीत केले म्हणून खऱ्या अर्थाने अहिल्याई होळकर या राष्ट्रमाता या उपाधीस सार्थ ठरतात. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world" अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्र निर्माण करणाऱ्या 'राष्ट्रमाता' अहिल्याई होळकर होत. ज्याप्रमाणे महान राजाला 'महाराजा' म्हंटले जाते त्याचप्रमाणे प्रजेसाठी महान कार्य करणारी, विकासाचा डोंगर रचणारी 'युवराज' शूरवीर तथा मुत्सद्दी योद्धा राजे खंडेराव होळकर यांची राणी म्हणजेच 'महाराणी' अहिल्याई होळकर होत. अहिल्याईंच्या प्रशासनाचा तथा राज्यव्यवस्थेचा आदर्श ठेवून विलायती राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली मात्र अहिल्याईंना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेतल्याने आणि अहिल्याईंचा इतिहास वाचण्यापेक्षा अहिल्याईंना नुसते पूजणाऱ्या आमच्या लोकांमुळे भारत नावाचा महा'राष्ट्र' अजूनही अधोगतीकडेच कूच करताना दिसतोय. लोक अहिंसावादी, शांतताप्रिय, प्रेमाची शिकवण देणाऱ्यांची पुजा करतात हे मान्य आहे तर मग महाभारतातील पांडव-कौरवांच्या महायुद्धात कुरूक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा आणि अर्जूनाचे मनोबल वाढवणारा श्री कृष्ण हा कोणत्या अहिंसेचे प्रतिक होता? अहिल्याई होळकर यांच्या उपाध्यांबद्दल चर्चा आणि संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आजच्या प्रशासकीय तथा राजकीय व्यवस्थेने जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन धर्मनिरपेक्षतेपणे राज्यकारभार करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची दूरदृष्टी किती महत्वाची आहे यावरती कटाक्ष टाकला तर अहिल्याईंचे स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही. अहिल्याईंनी प्रजेच्या हितासाठी अनेक कायदे बनवले होते त्यातील महत्वाचे म्हणजे अबला महिलांना सबला बनविण्यासाठी विधवांना त्यांच्या पतीच्या संपत्तीवर असलेला हक्क, निपुत्रिकांना दत्तक घेण्याचा अधिकार, हुंडाबळीच्या विरोधातील हुंडा पद्धत बंद केली, स्वतः मनुस्मृतीच्या रूढी लाथाडून सतीप्रथेला विरोध, अहिल्याईंनी दुष्काळ निर्मूलनासाठी त्यावेळी अनेक उपाय योजना केल्या होत्या. एकदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली तेव्हा अहिल्याईंनी भुकेने प्रजेचे हाल होत होते तेव्हा प्रजेच्या हाताला कामही मिळेल आणि दुष्काळावर मातही करता येईल म्हणून पाणी अडवण्यासाठी शेतांमध्ये बांध घालून घेतले होते. नद्यांवर बंधारे बांधले, याशिवाय धरणे, तलाव, शेततळी तर ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत बारवे बांधून ठेवली होती, निसर्गचक्रात बाधा येऊ नये म्हणून त्यांनी ७/१२ पद्धतीने शेतकऱ्यांना झाडे लावण्यास प्रवृत्त केले शिवाय त्यामाध्यमातून सरकारी खात्यात महसूल देखील जमा होत असे. अहिल्याईंच्या राज्यात प्रजा ही सुखी समाधानी तथा आनंदी होती. त्यांनी स्वतःच्या खाजगीतली रक्कम काढून अनेक विकास कामे केल्याने कोणत्याच गोष्टींची कमतरता नव्हती म्हणून त्यांना देवीचे स्थान दिले आहे. "पुण्यश्लोक" ही उपाधी त्याचेच एक द्योतक आहे. गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाचा आरखडा बनवताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अहिल्याईंच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. यावरूनच समजायला हवे की अहिल्याईंना देवी मानून नुसते नतमस्तक होण्यापेक्षा अहिल्याईंचे विचार मस्तकात घेऊन, समाजाने तथा आजच्या प्रशासनाने जर अहिल्याईंच्या विचारांचा, अहिल्याईंच्या प्रशासन व्यवस्थेचा अवलंब केला तर भारत देश हा नक्कीच पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत जगात अव्वल क्रमांकावर राहील. जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।। ✍️ नितीनराजे अनुसे अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली 8530004123

No comments:

Post a Comment