Where the words for justice runs like swords ... जिथे शब्द देखिल अन्यायाविरोधात तलवारीप्रमाणे चालू लागतात...
Featured post
आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे
आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...
Saturday, 17 September 2022
आद्य महिला स्वातंत्र्यसेनानी वीरांगना भिमाई होळकर... ✍️नितीनराजे अनुसे
Saturday, 13 August 2022
लोकराज्ञी राजयोगिणी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांचा आज स्मृतिदिन... ✍️नितीनराजे अनुसे
Thursday, 11 August 2022
आजची भारतीय शिक्षणपद्धती आणि आपण... ✍️लेखन - नितीनराजे अनसे
Tuesday, 2 August 2022
पान टपरी वाल्या संकेत सरगर ने रोवला देशाच्या शिरपेचात माणदेशी तुरा ... ✍️नितीनराजे अनुसे
![]() |
| माणदेशी सुपुत्र संकेत महादेव सरगर |
पान टपरी वाल्या संकेत सरगर ने रोवला देशाच्या शिरपेचात माणदेशी तुरा ... ✍️नितीनराजे अनुसे माणदेशातील आटपाडी तालुक्याच्या मातीतला तळेवाडी गावचा सुपुत्र म्हणजे सध्या चर्चित असलेला सांगलीतील चहावाल्याचा मुलगा वेटलिफ्टर संकेत सरगर याने भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. 55 किलो वजनी गटात 248 किलो वजन उचलत रौप्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे, त्याचे सुवर्णपदक फक्त एक किलोने हुकले.
उज्वल भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, आशिया खंडावरती प्रभुत्व गाजवणाऱ्या चक्रवर्ती सम्राट द ग्रेट अशोक पासून होळकरशाहीच्या गौरवशाली इतिहासाचा आणि जाज्वल्य परंपरेचा वारसा लाभलेली ही पोरं भारताला एकटं दुकटं रौप्य पदक नव्हे तर अशी अनेक सुवर्णपदकं देऊ शकतात. परंतु इथे त्यांना गरज त्यांच्यातील टॅलेंट ओळखून मार्गदर्शन करण्याची, गरज आहे सहकार्याची, प्रेमाची आणि आपुलकीची.
![]() |
| कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिले रौप्य पदक मिळवून देणारा संकेत सरगर |
वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या माणमातीनं आपलं इमान कधीच ढळू दिलं नाही. आम्ही दुष्काळात होरपळलो तरीही या माणमातीनं ग.दि.माडगुळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, ना सि इनामदार असे सातासमुद्रापार विख्यात तथा प्रख्यात साहित्यिक या महाराष्ट्राला परिणामी भारतभूमीला दिले, ११ वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम प्रस्थापित करणारे आदर्श संसदपटू माजी आमदार स्व भाई गणपरावजी देशमुख उर्फ आबासाहेब, आज कॉमनवेल्थ गेम्स मध्ये रौप्य पदक देणारा संकेत सरगर सुद्धा याच माणमातीनं दिला पण माणदेशाच्या वाट्याला काय आले? हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर येतं ते म्हणजे बारमाही दुष्काळ... आणि कधीही न संपणारा संघर्ष... जेव्हा सांगली कोल्हापूर ला पूर येतो आणि ओला दुष्काळ जाहीर होतो तेव्हा राज्य सरकारच्या अगोदर याच माणदेशी मातीतील वाघ त्यांच्या मदतीसाठी धावून जातात. मात्र पाण्याविना आमची पिकं जळून जातात, जनावरे तडफडून मरतात, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, पायऱ्या नसलेल्या खोल विहीरीतून पाणी काढण्यासाठी जीव पणाला लावून कसरत करावी लागते. तेव्हा कोणीच आम्हाला हातभार लावायला येत नाही म्हणून धडपड आम्ही कधी थांबवली नाही.
![]() |
| पान टपरी चालवणारा ते रौप्य पदक 🏅 (Silver Medal) जिंकणारा जिद्दी योद्धा |
शेळ्या -मेंढ्या च्या पोटाची खळगी भरण्यासाठी मग भटकंती करावी लागते, भटकंती करत असताना तेथील स्थानिक शेतकऱ्यांचा शिव्याशाप, मारहाण सहन करून मग पारंपरिक व्यवसायाला पूर्ण विराम देत महादेव सरगर सारखी अनेक माणदेशी मातीतील माणसं शहराच्या ठिकाणी स्थलांतरित होतात तिथेच छोटा मोठा व्यवसाय सुरू करून, चहाचा गाडा, पानाची टपरी सुरू करतात आणि आपल्या पोरांना देशासाठी रौप्य पदक, सुवर्ण पदक मिळावं म्हणून घडवतात. भलेही राज्य सरकार, केंद्र सरकार, इथली प्रशासकीय व्यवस्था माणदेशाच्या दुष्काळ निवारणासाठी काही करू शकत नसेल, नद्या जोड प्रकल्प करू शकत नसतील म्हणून इथला माणदेशी माणूस कधी हरला नाही, दुष्काळाशी दोन हात करत तो नेहमीच जिंकत आला आहे. त्यामुळे एकच काय असे हजारो संकेत सरगर या माणदेशी मातीतून पुढे येतील आणि भारतासाठी पदकांचा पाऊस पाडतील. कष्टातून, संघर्षातून संकेत ला घडवणाऱ्या त्याच्या आई -वडिलांना आणि आई-वडिलांच तथा गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं परिणामी भारताचं नाव उंचावणाऱ्या या माणदेशी सुपुत्राचे (संकेत महादेव सरगर चे) त्रिवार अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
जय मल्हार जय! अहिल्या!! जय यशवंतराजे!!!
✍️नितीनराजे अनुसे
(अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली)
📱 8530004123
Tuesday, 21 June 2022
"झुंज" दिलीस तु आता "झेप" घे ... ✍️नितीनराजे अनुसे
![]() |
| हेमंत बिरा मुढे इयत्ता दहावी मध्ये ९१.८०% गुण मिळवून समाजासमोर आदर्श ठेवणारा शेंडगेवाडी ता.आटपाडी जि.सांगली येथील होतकरू विद्यार्थी |
Saturday, 9 April 2022
माझ्या सहचारिणीस लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा 💐💐💐... ✍️नितीनराजे अनुसे
![]() |
| माझ्या सहचारीणीस लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 |
Saturday, 19 March 2022
चांगभलं बिरोबा अन् आरक्षणाचा खेळखंडोबा... ✍️नितीनराजे अनुसे
Wednesday, 16 March 2022
इंदोर नरेश माळवाधिपती श्रीमंत थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती
| इंदोर नरेश माळवाधिपती श्रीमंत थोरले सुभेदार राजे मल्हारराव होळकर |
सळसळत्या रक्ताच्या आणि मनगटाच्या जोरावर तसेच धारदार तलवारीच्या टोकावर दुश्मनांना कोलून टाकणाऱ्या, स्वकर्तृत्वावर आणि स्वबळावर स्वतःचे साम्राज्य उभे करत करत शिवछत्रपतींनी उभा केलेल्या मराठ्यांचे साम्राज्य अबाधित राखणाऱ्या तसेच त्याचा विस्तार वाढवत आजच्या पाकिस्तानातील पेशावर, अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या रणमर्दास अर्थातच थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना त्यांच्या ३२९ व्या जयंतीनिमीत्त मानाचा जय मल्हार कोटी कोटी प्रणाम. घोड्यांच्या टापांनी अख्खा हिंदूस्तान ढवळून काढणाऱ्या मल्हाररावांना युद्धतंञात पारंगत असलेला एक धुरंदर लढवय्या म्हणून ओळखले जाते ते त्यांच्या अंगी असलेल्या कुशल "मल्हारतंत्र" आणि "मल्हारनीती"मुळेच...
एके दिवशी मामाच्या मेंढ्या चारायला घेऊन गेल्यानंतर मल्हाररावांनी पाहिले की मामाच्या शेतामधून सजवलेल्या अंबारीचे हत्ती, घोडे सैनिक शेतातील पिकाची नासधूस करत पिक तुडवत चालले होते तेव्हा त्यांनी त्याच रानातील एक ढेकुळ उचलला तो सरळ सजवलेल्या हत्तीवर अंबारीत बसलेल्या पेशव्याच्या पाठीत मारला. धनगरांच पोर ते रक्तातच धनगरी बाणा जसाच्या तसाच.... डोळ्यात निखारा जसाच्या तसाच.... निर्भिडही तेवढाच.... मल्हारवांनी पेशव्यांस ढेकुळ मारला तसे सर्वजण अवाक् झाले एवढी हिम्मत झाली कोणाची असा प्रश्न पेशव्यांच्या सरदारांना पडला, पेशव्याचे काही सैनिक मल्हाररावांकडे धावून गेले पण त्या धनगराच्या पोराचे धाडस पाहून पेशवा देखिल हडबडून गेला होता. त्याचे हे धाडस पाहून त्याला सरदार बारगळांनी स्वताच्या सेवेत सामिल करून घेतले ती टोळी होती दाभाड्यांच्या कंठाजी कदमबांडेंची आणि तेथूनच शिपाईगिरी करत असतानाच स्वताची स्वतंत्र फौज उभा करून आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर मल्हाररावांनी माळवा प्रांतांत स्वताच्या हिंमतीवर आणि स्वकर्तृत्वावर अनेक लढाया गाजवल्या बड्या बड्या शत्रुंना मल्हाररावांनी तलवारींचे पाणी पाजले हे पाहून बाळाजी विश्वनाथांनी (पेशव्यांनी) मल्हाररावांशी तह करून माळवा प्रांतांची जबाबदारी सोपवली. त्याचे कारण असे होते की दयाबहादूर हा एकेकाळी माळव्याचा सुभेदार असताना शेतकरी रयतेस नाहक त्रास देत असे दयाबहादूर व त्याच्या हाताखालचे मुनीम शेतकऱ्यांना रयतेला पिळत होते. तेव्हा मराठ्यांना बोलवले तर ते प्रजेची मदत करतील असा सल्ला जयपूरच्या राजाने दिल्यावर माळवा प्रांतात उतरून धारजवळील तिर येथे मल्हाररावांनी फौजेसरशी लढाईला आलेल्या दयाबहादूराला मारून माळवा प्रांत हस्तगत केला त्यांच्या शौर्याची दखल घेत बाजीराव पेशव्यांनी २६ मे १७२९ ला त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. अशा प्रकारे एक धनगरांचे पोर काठीने मेंढ्या हाकता हाकता स्वराज्यासाठी तलवारीने शत्रुंना कधी हाकू लागले तेच समजले नाही.
मल्हार आया मल्हार आया म्हटलं तरी उत्तर भारतालाच नव्हे तर अफगाणिस्तानच्या अब्दालीला देखील कापरं भरायची. मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापांचे जरी आवाज ऐकायला आले तरी कित्येक गावंच्या गावं ओस पडायची हीच त्यांची धमक होती अन् हाच त्यांचा दरारा. आजही उत्तर भारतीयांच्या कानात मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापाचे आणि येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजराचे आवाज निनादत असतील... लढाईत सर्वात पुढे राहून राहून, सैन्यांचे नेतृत्व करून मुसंडी मारत शत्रुंना वायूवेगाने कापत सुटणाऱ्या मल्हाररावांचा दबदबा एवढा होता की शत्रुपुढे "मल्हार" जरी नाव उच्चारले तरी त्यांची पळता भुई थोडी व्हायची. मल्हाररावांचा स्वभाव जितका प्रेमळ होतका तितकाच राकटसुद्धा. एकदा कुंभेरीच्या लढ्यामध्ये सुरजमल जाटाने किल्ल्याला वेढा घातला होता मल्हाररावांचे सुपुत्र शुरवीर खंडेराव होळकर माचावर लढत सैन्यांचे नेतृत्व करत शत्रुंना तोंड देत होते इतक्यात सुरजमल जाटाकडून जेजाल्याचा गोळा आला आणि खंडेरावांच्या छाताडावर आदळला , खंडेराव धारातीर्थी कोसळले. स्वतःच्या मुलाला डोळ्यासमोर ठार केलेलं पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली नसानसात रक्त सळसळू लागले डोळे लालबुंद झाले हाताच्या मुठी आवळल्या गेल्या अन् त्यांनी मल्हारी मार्तंडाची शपथ घेतली की या सुरजमल जाटाचा शिरच्छेद करून, कुंभेरीची माती खणून यमूनेत टाकेन तरच दक्षिणेला (महाराष्ट्रात) परत जाइन. पण भयभीत झालेल्या सुरजमल जाटाला काय करावे सुचत नव्हते तेवढ्यात सुरजमल जाटाची पत्नी हंसिका हिने जयाप्पा शिंद्यांशी बोलणी करून सुरजमल जाटाचा पेशव्यांसोबत सुलुख घडवून आणला. तेव्हापासूनच मल्हाररावांचा पेशव्यांवरील अन् पेशव्यांचे हुजरे असलेल्या शिंद्यावरील विश्वास उडाला होता त्याचा प्रत्यय १८ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणि १९ व्या शतकाच्या पहिल्या दशकात येतो जेव्हा राष्ट्रमाता अहिल्याई होळकर स्वतंत्रपणे माळव्याचा राज्यकारभार पाहत होत्या आणि महाराजाधिराज शुरवीर योद्धा यशवंतराव होळकर राष्ट्रासाठी स्वतंत्रपणे इंग्रजांशी झुंज देत होते तेव्हा पेशवे आणि शिंदे हे दोन्ही होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी खटाटोप करत होते. एवढेच नव्हे तर यशवंतराव पुण्यावर चालून आले तेव्हा शेपटी गुंडाळून पळपुटा पेशवा जेव्हा कोकणात पळून गेला आणि कोकणातून पत्रव्यवहार करून त्यांनी यशवंतराव होळकरांना सांगितले होते की होळकरांचं राज्य या राष्ट्राच्या मातीवरती अन्याय व अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश सरकारकडे विलीन करावं. याचाच अर्थ मल्हाररावांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली ती म्हणजे "एकवेळ दुश्मनांवरती विश्वास ठेवला तरी चालेल पण पाठीत खंजीर खूपसणाऱ्या शिंद्यांवरती अन् पेशव्यांवरती कधीच विश्वास ठेवायचा नाही".
सांगायचा मथित अर्थ एवढाच की आजही आम्ही विनाकारण शेंडीने गळा कापणाऱ्या मॉडर्न पेशव्यांच्या आहारी जाऊन समाजाचे आणि परिणामी देशाचे वाटोळे करून घेतोय हे आम्हाला अजूनही कळत नाही आणि कळले तर वळत नाही. आजची युवा पिढी भलतीकडेच भरकटत चाललीय. ज्या लोकांना आपला इतिहासच माहित नाही, आपण कोण होतो त्याची त्यांना जाणीव नाही अशी लोकं भविष्यात दुसऱ्यांची चाकरी आणि गुलामगिरी करू शकतात पण इतिहासाचा वसा आणि वारसा जपू शकत नाहीत. त्यामुळे आजच्या युवा पिढीसमोर आवाहन आहे की एकेकाळी राजा समाज असणाऱ्या आपल्या जमातीला इतिहास कोळून कोळून पाजावा लागेल तेव्हा आणि तेव्हाच आपण प्रगती करू शकतो नाहीतर दुसऱ्यांची धोतरं बडवत बसाल. आज १६ मार्च १६९३ हा दिवस म्हणजे तमाम मराठेशाहीचा, मल्हारशाहीचा एक नवीन सुर्योदय म्हणाल तरी ऐतिहासिकदृष्ट्या ते वावगं ठरणार नाही. तसेही काही ब्रिटिश लेखकांची री ओढत इथल्या मातृभूमीमधील काही नालायक तथा जातीयवादी इतिहासकारांनी जाणूनबुजून थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास मलिन करण्याचे पाप केले. परंतु कोंबडा कितीही झाकून ठेवला तरी सुर्य उगवायचा काही थांबणार नाही तशाच प्रकारे चुकीच्या इतिहासकारांनी कितीही चुकीचा इतिहास लिहिला तरी समाजातील महापुरुषांचा खरा इतिहास समोर आल्याशिवाय राहणार नाही. अठराव्या शतकात आजच्या पाकिस्तानमधील अटकेपार मराठेशाहीचा झेंडा डौलाने फडकवणाऱ्या आणि मराठेशाहीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या रणझुंजार अशा रणमर्दाची आज ३२९ वी जयंती त्यानिमीत्त थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा विनम्र जय मल्हार...
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1827627237429824&id=305578499634713
Saturday, 4 September 2021
इंटरनेट एक 'माया'जाळ... ✍️नितीनराजे अनुसे
इंटरनेट एक 'माया'जाळ... ✍️नितीनराजे अनुसे
दि.०४ सप्टेंबर २०२१
आजच्या एकविसाव्या शतकात अर्थातच तंत्रज्ञान विकसित युगात इंटरनेट हे एक महत्त्वाचे म्हणण्यापेक्षा दैनंदिन जीवनातील खूप गरजेचे साधन झालेले आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. इंटरनेटची कल्पना काय आताच जन्माला आली नाही तर १९६९ मध्ये अमेरिकन लष्कराने संदेशवहनासाठी आर्पानेट नावाचे पायाभूत नेटवर्क सुरू केले होते. कालांतराने नवनवीन संशोधन व माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी या नेटचा वापर करण्यात आला. म्हणजेच १९६९ साली इंटरनेट चा खरा जन्म झाला परंतु भारतात शिक्षणासाठी तसेच संशोधनासाठी इंटरनेटचा वापर १९८८ पासून सुरू झाला. तसे पाहिले तर इंटरनेट मुळे सर्व काही सोयिस्कर झाले आहे असे वाटते कारण इंटरनेट मुळे इ मेल - माहितीची देवाण घेवाण- जगभरच्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी वा नातेवाईकांशी आपण संपर्क ठेवू शकतो. जगातील कोणत्याही संगणकावर आपणास काम करता येते व तेथे आपले प्रोग्रॅम चालवून पहाता येतात. आपल्या संशोधन प्रबंधासाठी वा व्यापार उद्योगासाठी आपण इंटरनेटचा उपयोग करू शकतो. इंटरनेटमुळे जगातील वृत्तपत्रे, मासिके, लायब्ररीतील पुस्तके, म्युझियम, संगीत यांचा लाभ मिळू शकतो. शिवाय करमणुकीसाठी नवीन साधने देखील इंटरनेट वरती सहजपणे उपलब्ध होतात. काही सेकंदाच्या आतमध्ये ऑनलाईन पैसे देखील सहजपणे पाठवू शकतो.
परंतु अलीकडच्या काळात इंटरनेट जेवढे फायद्याचे झाले आहे तेवढेच नुकसानदायक देखील ठरते आहे. आजची युवा पिढी या इंटरनेटच्या 'माया'जाळात सहजपणे अडकत चालल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. हल्ली कोरोना विषाणू रोगामुळे लॉकडाउन काळात तर इंटरनेटच्या वापराचा कहरच झाला. लॉकडाउनमुळे चार भिंतीत कंटाळवाणे जीवन जगण्याऱ्यांना करमणुकीसाठी म्हणून दूरदर्शन व्यतिरिक्त इंटरनेटचा वापर करणे स्वाभाविक होते परंतु यामध्ये भरडली गेली ती आजची युवा पिढी आणि उद्याच्या भारताचं उज्वल भविष्य... लॉकडाउनमुळे शाळा, विद्यालय, महाविद्यालयांना लॉक (टाळे) लागले मग विद्यार्थ्यांच्या भवितव्याला टाळे लागणार नाहीत तर आणखी काय होणार? बर लॉकडाउनमुळे ऑनलाईन शिक्षण पद्धत चालू केली चांगली गोष्ट आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातोय त्याबद्दल दुमत नाही. परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हातात स्मार्टफोन/लॅपटॉप/नोटपॅड आले आणि शिक्षण राहिले बाजूला परंतु विदेशी कंपन्यांनी भरमसाठ एप्लिकेशन्स बनवून ठेवलेल्या गेम्स खेळण्यात आणि नको ते व्हिडिओ पाहण्यातच भारताचं उज्वल भवितव्य व्यस्त झालेलं दिसून येते. तर दुसरीकडे आजची युवा पिढी नेट सर्फिंगमुळे भलतीकडेच जास्त आकर्षित झालेली दिसून येते. इंटरनेटचे फायदे बाजूला ठेवून सोशल मिडिया (समाज माध्यमा) वरती फालतू गोष्टींमध्ये अग्रेसर असल्याचे देखील दिसून येते. मग फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम याव्यतिरिक्त व्हिडिओ चॅटिंग च्या माध्यमातून लैंगिक शिक्षण व लैंगिक आकर्षणाकडे इंटरनेटच्या आहारी गेलेल्या किशोरवयीन युवक युवतींचे प्रमाण आपसूकच वाढले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम वरती रील्स/व्हिडिओ पोस्ट करून लाइक्स, फॉलोअर्स च्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याकडे आजच्या युवा पिढीचा कल जास्त आहे. रात्र रात्रभर जागरण करणे, व्हिडिओ चॅटिंग, व्हिडिओ सर्फिंग केल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक तथा शारिरीक संतुलन बिघडत असून शैक्षणिक ज्ञानावर भर देण्यापेक्षा किशोरवयीन मुला-मुलींचा लैंगिक आकर्षणाकडे जास्त भर असतो आणि सर्रास कंपन्या, वेबसाइट्स त्यांच्या अश्लीलतेच्या जाहिराती विकायला कुठेच कमी पडत नाहीत. इंटरनेट वरती महत्वाची माहिती पाहत असले तरी त्यावरती नको त्या जाहिराती दाखवल्या जातात. त्यामुळे पालकांनी जर आपल्या पाल्यांवरती वेळीच अंकुश ठेवला नाही तर पाल्यांचं उद्याचं भविष्य हे इंटरनेटच्या मायाजाळात अडकून अंधारातच राहील. कारण योग्य वापर केल्यास इंटरनेट जेवढे फायद्याचे आहे तेवढेच त्याचा गैरवापर केला तर ते खूप आणि खूपच नुकसानदायक आहे.सदरच्या ब्लॉगमधून समाजप्रबोधन व्हावे हीच प्रामाणिक तळमळ आहे.
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
nitinrajeanuse123@gmail.com
Thursday, 3 December 2020
जातीयवाद्यांच्या तावडीत सापडलेला महान द्रष्टा योद्धा ✍ लेखन - नितीनराजे अनुसे
![]() |
| राष्ट्रपुरुष धुरंधर लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर |
होय, मराठ्यांच्या इतिहासात मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर शत्रूंच्या चारी मुंड्या जीत करणाऱ्या, मराठ्यांचा इतिहास जाज्वल्यमान आणि दैदिप्यमान करणाऱ्या धुरंधर योद्ध्यांचा विसर मराठी माणसांना पडणे हे मराठी माणसांचेच नव्हे तर सबंध हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महा'राष्ट्रा'चे दुर्देवच म्हणावे लागेल. परंतु त्यापलीकडे जाऊन मी हेच म्हणेन की मराठ्यांच्या इतिहासात मर्दुमकी गाजवणऱ्या बहुजन समाजातील अशा धुरंधर योद्ध्यांचा इतिहास न अभ्यासने म्हणजेच त्या त्या मराठी माणसांना कदाचित जातीयवादाची झालेली कावीळ असावी...
असेच धुरंधर लढवय्ये, शुन्यातून विश्व निर्माण करणारे होळकर साम्राज्याचे सुभेदार तुकोजीराव होळकर यांचे धाकटे सुपूत्र म्हणजेच सळसळत्या रक्ताची आणि लखलखत्या तलवारीची धार असलेले धुरंधर योद्धे, एक महान तथा द्रष्टा योद्धा चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर. तत्कालीन हिंदुस्तानचा अर्थातच अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील क्रमांक एकचा शत्रू कोण असेल तर ब्रिटीशांचे नाव समोर येते. परंतु छत्रपती शिवरायांपाठोपाठ असा एकला महाराजा यशवंतराव होळकर लढवय्या होता की ज्यांना स्वराज्यातीलच काही लालची शिलेदार आणि सरदारांकडून तितकाच अन्याय झाला जितका ब्रिटिशांनी या हिंदुस्तानच्या मातीवर केला.
तसे पहायला गेले तर तो काळ फार अंदाधुंदींचा होता, कोणाचा पायपोस कोणाच्याच पायात नव्हता. रणांगणात रक्त सांडून उभा केलेली होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी पेशव्यांचेच सरदार होळकरांचे सोबती अलिजाबहाद्दर दौलतराव शिंदे टपून होते आणि पेशवे देखील मागचा पुढचा विचार न करता त्यांस भरीस पडत गेले. अशातच भांबुर्ड्याच्या मैदानात काशीराव होळकरांना भरीस घालून शिंद्यांनी साखरझोपेत असतानाच तुकोजी बाबांचे द्वितीय सुपुत्र महाराजा मल्हारराव होळकर (द्वितीय) यांची हत्या केली तर यशवंतराव सुखरूपपणे तिथून निसटले. अशी दुर्बुद्धी सुचलेल्या शिंद्यांना आणि पेशव्यांना समजावून सांगणारा जाणकार कोणी या स्वराज्यात नव्हता जे होते त्या नाना फडणिसांना पेशव्यांनी कैदेत ठेवले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. परंतु पुण्यातील पेशव्यांच्या व शिंद्यांच्या अशा कुटील राजकारणामुळे संपूर्ण रयत जात्यात भरडावी अशी भरडली जात होती. त्यात पेशव्यांच्या सरदारांनी खुद्द पेशव्यांच्या आज्ञेनुसार महाराजा यशवंतराव होळकर यांचे थोरले बंधू महाराजा विठोजीराजे होळकर यांना सूडबुद्धीने अटक करून हत्तीच्या पायी दिले. एखादा कसाब जनावरांना जेवढा त्रास देत नाही त्यापेक्षा क्रुर पद्धतीने विठोजीराजेंना ठार मारले ते छत्रपती शिवरायांनी स्थापित केलेल्या स्वराज्याच्या हिताचे मुळीच नव्हते. अशा वेळी शिंद्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊन होळकरांची गादी राहावी की नको याची शहानिशा करण्यासाठी समोरासमोर पेशव्यांशी मसलत करण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर दक्षिणेकडे कुच करतात. शिंद्यांची राजधानी उज्जैन काबीज करून वाटेत येणारी त्यांची ठाणी व महाल ताब्यात घेत नाशिक, बारामती सुद्धा महाराजांच्या फौजेने ताब्यात घेतली. यालाच या मातीतले काही चुकीचे जन्माला आलेले जातीयवादी इतिहासकार म्हणतात 'होळकरी दंगा'. परंतु होळकरांचे महाल शिंद्यांनी घशात घातले होते, मल्हारराव होळकर द्वितीय यांची शिंद्यांनी हत्या केली पुढे महाराजा विठोजीराजे होळकर यांना देखील हत्तीच्या पायी देऊन क्रुर रित्या ठार मारले तेव्हा शिंद्यांचा आणि पेशव्यांचा दंगा इथल्या जातीयवादी आणि नालायक इतिहासकारांना दिसला नाही का?
असो किमान यानंतर तरी पेशव्यांनी समजदारीने विचार विनिमय करायला हवा होता परंतु 'विनाशकाली विपरीत बुद्धी' या म्हणीप्रमाणे महाराजा यशवंतराव होळकरांच्या फौजेला अडवण्यासाठी पेशव्यांनी शिंद्यांच्या आणि त्यांच्या कारभाऱ्यांच्या सांगण्यावरून सदाशिवराव बक्षी यांची कसलेली फौज उत्तरेतून बोलवली. राजधानीत रयतेच्या हिताची खलबते व्हायच्या ऐवजी होळकरांना कसं संपवायचे याचेच विडे उचलले जात होते. मराठ्यांच्या दौलतीत ज्या होळकरांनी भर घातली, उत्तर हिंदूस्थान घोड्याच्या टापांखाली आणून दिल्लीचे तख्तच नव्हे तर ज्या होळकरांनी अटकेपार मराठ्यांचे झेंडे फडवले त्या होळकरांना संपवायची कटकारस्थाने शिंद्यांनी चालवली होती. परंतु रणांगणातून माघार घेइन तो जातीवंत योद्धा कसला? यशवंतराव होळकर देखील काय कमी नव्हते, ऐन पंचविशीतलं रांगडं धनगराचे पोरगं ते, अख्ख्या हिंदूस्थानभर गाजलेली नावाजलेली फौज यशवंतरावांकडे होती. हडपसरच्या माळावर महाराजा यशवंतराव होळकर यांची छावणी पडली होती. पाराजीपंतांनी समजावून सांगूनही पेशव्यांनी शिंद्यांच्याच कारभाऱ्यांचे ऐकून घेतले आणि तिथेच छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याचा घात झाला. शेवटी ऐन दिवाळीला अभ्यंगस्नानादिवशी सकाळी सकाळी लढाईला तोंड फुटले सरकारी फौजेकडून (शिंदे व पेशव्यांच्या फौजेकडून) वीस-पंचवीस तोफांचे बार उडाल्यानंतरच यशवंतरावांनी त्यांना प्रत्युत्तर द्यायला आपल्या फौजेला हुकूम दिला आणि बघता बघता होळकरांच्या फौजेने शिंद्यांची-पेशव्यांची फौज कापत ती वानवडी पर्यंत रेटत नेली. होळकरांचे सरदार आपापले मोर्चे शिताफीने सांभाळत शत्रूंवर चाल करत होते. मार्तंड मार्तंड असा जयघोष करत फौजेला प्रोत्साहित करत महाराजांनी लंकेवरून (महाराजा यशवंतराव होळकर यांची घोडी- लंका) खाली उडी मारली आणि दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन शिंद्यांच्या फौजेत घुसले आणि बघतो न बघतो तोपर्यंत सपासप वार करत हजार दोन हजार फौज त्यांनी कापून काढली होती. महाराजांची फौज देखील महारांजांचे अनुकरण करत शत्रूंवर तुटून पडत होते. त्याच आवेशात महाराजांनी विंचूरकरांना ओरडून सांगितले की तुम्ही माघारी फिरा तुम्ही आमचे शत्रू नाही तर शिंदे आणि शिंद्यांचे सरदार आमचे शत्रू आहेत. तोच विंचूरकरांना त्यांच्या फौजेने माघारी ओढले तोपर्यंत महाराजांच्या दांडपट्ट्याच्या फटक्यात सदाशिवराव बक्षींचे शिर धडावेगळे झाले. सगळीकडे शिंद्यांच्या-पेशव्यांच्या सैनिकांची हाडे पसरली होती. शेवटी शिंदे-पेशव्यांचे काही सरदार रणांगणातूनच पळून गेले. यशवंतरावांच्या तोफांच्या माऱ्याने पुणे जळले, आगीचे लोळ आकाशात उंच उंच दिसत होते. तोपर्यंतच कोण जिंकले कोण हारले हे न बघता भितीपोटी खुद पेशवा आणि बाळोजी हे मल्हारबाबांचा(द्वितीय) पुत्र खंडेराव होळकर (द्वितीय) यांना घेऊन कोकणात पळून गेले. ते पुन्हा यशवंतराव होळकरांनी विनवणी करून देखील माघारी आलेच नाहीत. शेवटी फौजेच्या दाणागोट्यासाठी, अन्नपाण्यासाठी मंदिरातील पैसा बाहेर काढावा लागला. 
वसई ला जाऊन पेशव्यांनी गोऱ्यांशी तह करून महाराजा यशवंतराव होळकर यांना होळकर दौलत ब्रिटीशांच्या स्वाधीन करण्याची पत्रे पाठवली तेव्हा महाराजा यशवंतराव होळकर संतापले. पेशव्यांच्या तहानुसार ब्रिटिश फौज पुण्यावर चालून येत आहे असे समजताच त्यांच्या फौजेस फुटकी कवडी देखील मिळू नये या उद्देशाने व राष्ट्र बांधणी साठी फौजेच्या लष्करी खर्चासाठी मंदिरातील दाग दागिने पैसा महाराजा यशवंतराव होळकर यांनी बाहेर काढला, पेशव्यांची राजधानी असलेला शनिवार वाडा सोडला तर इतर सरदारांचे महाल लुटून फस्त केले. याचाच इतिहासात उल्लेख करताना तेव्हाचा शत्रू असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, लेखकांनी महाराजा यशवंतराव होळकर यांना बंडखोर लुटारू, होळकरी दंगा अशी विभूषणं लावून महाराजांना बदनाम करण्याची एकही कसर सोडली नाही आणि त्यांचीच री ओढत खोलात जाऊन अभ्यास न करता इथल्या जातीयवादी लेखकांनी इतिहासकारांनी यशवंतराव होळकर यांना तीच विभूषणं लावून त्यांचा खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला.
परंतु महाराजा यशवंतराव होळकर काही कमी नव्हते. जे इंग्रज भारतभुमीवर पाय पसरू लागले होते त्यांच्या विरोधात स्वकर्तृत्वावर दंड थोपटून ते उभे राहिले. भानपुऱ्यात त्यांनी तोफांचा आणि गोळाबारूदांचा कारखाना सुरू करून लढाईची धोरणं आखली. थोरले सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर म्हणायचे की गादीचा खरा वारसदार तोच असतो जो मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर लढाया मारून, कर्तृत्व गाजवून स्वराज्याचे रक्षण करतो. महाराजा यशवंतराव होळकर हे त्याच तालमीतून पुढे आलेला एक द्रष्टा योद्धे. होळकर साम्राज्याच्या, स्वराज्याच्या पलिकडे जाऊन त्यांनी ब्रिटीशांना मातृभूमीतून हाकलून लावण्यासाठी हिंदूस्थान अवघे एक राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून तलवारीची मूठ घट्ट पकडली आणि घोड्याच्या पाठीवर मांड टाकून डोळ्यांच्या पापण्या पडायच्या आत समोरासमोरील लढाईत जगभर गाजलेल्या ब्रिटिश फौजेला कापून काढत, इंग्रज अधिकाऱ्यांना गुडघे टेकायला भाग पाडून त्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आणि अशा शिस्तबद्ध अजिंक्य मानल्या जाणाऱ्या ब्रिटीश कवायती फौजेची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली. एक नव्हे, दोन नव्हे तर ब्रिटीश फौजेशी मुकाबला करत तब्बल एकणिस लढायांमध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांनी विजय मिळवला होता. समोरासमोरील लढाईत तर कधी कधी सपाट मैदानावर देखील गणिमी काव्याने ब्रिटीश फौजेवर चढाई करणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या फौजेसमोर नवनवीन शस्त्रं असलेल्या ब्रिटिश फौजेचा टिकाव लागत नव्हता तेव्हा ब्रिटीशांनी होळकरांच्या सरदारांना फंद फितुरी करून होळकरांची फौज कमी करायला सुरुवात केली. हिंदूस्थातील सर्व राजा महाराजांना पत्रं पाठवून, विनवणी करून देखील एकही खरा माइचा लाल इंग्रजांच्या विरोधात लढायला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या सोबत आला नाही हे या राष्ट्राचे दुर्दैव होते. अन्यथा गोऱ्यांनी भारतावर कधीच राज्य केले नसते. योगायोगाने युरोपात नेपोलियन बोनापार्ट याची सुद्धा लढाई ब्रिटीशांच्या विरोधात होती. त्यावर सुप्रसिद्ध शाहीर अमर शेख पोवाडा गाताना म्हणतात की,
"करीन रक्तबंबाळ देश मी ब्रिटीशानो तुमचा,
भारत भुमीच्या तसुतसुवर हक्क फक्त अमुचा.
फंदफितुरी बंद करा अन या मैदानाला,
मेल्या आईचे दुध होळकर नाही हो प्याला.
नेपोलियन युरोपात... ह्यो होळकर हिकडं...
अडकित्यातील जशी सुपारी करु तुकडं तुकडं"
पुढे शाहीर म्हणतात की
शिवरायांमागे राजा एकला यशवंतराव
ज्याचं नाव पोवाड्यातून गावं आणि शाहीरानं डोक्यावर घेऊन नाचावं...
डोक्यावर घेऊन नाचावं...
अशा मुत्सद्दी योद्ध्याचा जन्म पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे वाफगावच्या भुईकोट किल्ल्यात दि. ३ डिसेंबर १७७६ रोजी झाला. आज महाराजा यशवंतराव होळकर यांची २४४ वी जयंती आहे. त्यामुळे द्रष्टा योद्धा तथा राष्ट्रपुरुष महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास खोलात जाऊन अभ्यासने व राष्ट्र उभारणी साठी त्यांच्या दूरदृष्टीचा अवलंब करणे हे आजच्या युवा वर्गासमोर एक आवाहन आहे.
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+91 853 000 4123













