Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Tuesday, 19 June 2018

ओबीसी विद्यार्थ्यांनी आता काय भिक मागायची का? ✍️नितीनराजे अनुसे


       काल परवा अनेक वर्तमानपत्रातून तसेच टीव्ही चैनेल वरतून बातम्या झळकल्या की वैद्यकीय प्रवेशासाठी ओबीसींना नियमानुसार असलेल्या २७% आरक्षणाऐवजी केवळ २ % एवढेच आरक्षण मिळणार आहे आणि उर्वरित २५% आरक्षण हे  खुल्या वर्गाला म्हणजेच ब्राह्मण आणि मराठा समाजाकडे वळविण्यात आले आहे. म्हणजेच डॉक्टर व्हायचे असेल तर  जवळ जवळ १०० % ओबीसी विद्यार्थ्यांपैकी केवळ ७.४०% ओबीसी विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश घेऊ शकणार आणि उर्वरित ९२.६०%  टक्के विद्यार्थी हे वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहणार हे नरेंद्राचे आणि देवेंद्राचे अजब धोरण आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात २१ महाविद्यालयात तर ओबीसी वर्गाला कसलेही आरक्षण नाही ही महाराष्ट्र राज्यातील ओबीसी साठी म्हणजेच बहुजन समाजासाठी खरी चिंतेची बाब आहे. देशभरात १७७ वैद्यकीय महाविद्यालयात ३७११ जागा असताना त्यातील २७% आरक्षणानूसार १००२ जागा ह्या एकट्या ओबीसींना मिळायला हव्या होत्या परंतु त्यामध्ये कपात करून २% आरक्षणाप्रमाणे केवळ ७४ जागा ओबीसींना उपलब्ध करून देण्यात आल्या आणि त्याखालोखाल अनुचित जाती या वर्गाला ५५५ तर अनुसूचित जमातीला २७७ जागा आहेत. ओबीसींच्या २७% आरक्षणानूसारच्या जागांपैकी २५% जागा खुल्या वर्गाकडे वळविल्याने खुल्या वर्गासाठी तब्बल २८११ जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. म्हणजेच ओबीसींच्या वाट्याच्या २४५७ जागा खुल्या वर्गाला देण्यात आल्या आहेत मग बहुजनांच्या वाट्याला काय?
        गेल्या काही वर्षांपूर्वी ओबीसी वर्गाच्या शिष्यवृत्त्या बंद केल्यानंतर ओबीसी वर्गाने कुठेतरी आवाज उठवला खरा पण तो आवाज कसा बंद झाला कोणास ठाऊक? त्यानंतरही ओबीसी विद्यार्थ्यांवरती शैक्षणिक क्षेत्रात फार मोठा अन्याय झाला आणि ओबीसी वर्गाने तो निमूटपणे सहन केला . अन्याय करणारे अन्याय करतच राहिले आणि सहन करणारे निमूटपणे सहण करत राहिले. मग अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा खरा गुन्हेगार ठरतो मुर्ख. ठरतो. ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केल्यानंतर ओबीसींच्या म्हणजेच बहुजनांच्या वाट्याला जर अन्याय आणि अन्यायच येत असेल तर मग ओबीसी मंत्रालय ओबीसींच्या काय कामाचे? ओबीसी नेते झोपा काढत आहेत आणि सरकार मात्र हिटलरशाहीत वागत आहे त्यासाठी ओबीसी वर्गाने वेळीच जागे व्हायला हवे... बहुजन समाजातील युवक वर्ग शिकला सवरला असून योग्य काय आणि अयोग्य काय याची चाचपणी करून लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. सर्व संघटनांनी एकत्रित येऊन राज्यव्यापी आंदोलन उभा करायला हवे आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायला हवा नाहीतर येणाऱ्या काळात बहूजन समाजातील विद्यार्थ्यांना हातात वाडगा घेऊन भिक मागायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही याचा गांभीर्याने विचार बहुजन समाजाने करायला हवा.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
        ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com


Sunday, 10 June 2018

धनगर समाजातील आजची नेतृत्वाची शोकांतिका : नितीनराजे अनुसे

        एकेकाळी राजा समाज म्हणून जन्माला आलेली आमची जमात म्हणजेच धनगर ही आदिम जमात आज कोणतं जगण जगत आहे यावरती चिंतन केले तर आमचीच आम्हाला लाज वाटावी? कोणाच्या उपकारातून अथवा परंपरागत नव्हे तर स्वकर्तृत्वावर, स्वबळावर तलवार गाजवून आणि रक्त सांडून मिळवलेली राजेशाही मग ती आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी स्थापन केलेले मौर्य साम्राज्य (Mourya Density) अथवा मराठी साम्राजाचे आधारस्तंभ तथा थोरले सुभेदार श्रीमंत राजे मल्हारराव होळकर यांनी स्थापन केलेली होळकरशाही (Holkar Density) तसेच शुन्यातून विश्व निर्माण करणारे, स्वबळावर पुनः राज्य स्थापून इंग्रज अधिकाऱ्यांचा थरकाप उडवून त्यांच्याच शिस्तबद्ध फौजेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करून घेणारे चक्रवर्ती सम्राट छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची राजेशाही ती काय भिक मागून मिळवली नव्हती तर स्वकर्तृत्वावर आणि स्वबळावर रक्त सांडून उभा केलेली राजेशाही तथा राजवैभव आजचा धनगर समाज मात्र विसरूनच गेला आहे. ज्या राष्ट्रमाता अहिल्याईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युरोपातली राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली त्याच अहिल्याईंचा महाराष्ट्र, त्याच अहिल्याईंचा भारत देश आज अधोगतीच्या मार्गावर आहे त्याचे कारण असे की आम्ही राष्ट्रमाता अहिल्याईंना विचारांची नव्हे मंदिरातील देवी (मुर्ती) बनवून टाकले, आम्ही अहिल्याईंना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेतले आणि जयंती निमित्त डीजे लावून धांगडधिंगा घालून आपल्याच इतिहासाचे हसू करून घेतले म्हणून आज धनगर समाजाची ही अवस्था झाली आहे.
      Ahilyabai Holkar was the greatest Administrator of the 18th Century म्हणजेच अठराव्या शतकातील उत्तम प्रशासक उत्तम राज्यकर्ती म्हणून जगाने माझ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा गौरव केला. पण आज एकविसाव्या शतकात राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या विचारातून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या महाराष्ट्र राज्यात परिणामी भारतात एकही लायक नेतृत्व तयार झाले नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. जर तसे नेतृत्व तयार झाले असते तर ज्या मायमाऊलीने खचलेल्या पिचलेल्या जनतेला, गोरगरीब प्रजेला न्याय मिळावा म्हणून अखंड भारतभर सर्वप्रथम न्यायालये उभा केली त्या मायमाऊलीच्या जन्मभूमीत ३१ मे २०१८ रोजी समाजासाठी न्याय मागणाऱ्या समाजबांधवांवरती निष्ठूर लाठीमार झालाच नसता. एकीकडे अहिल्याईंच्या माहेरकडील वारसदार म्हणून मिरवणारे धनगर समाजाचेच मंत्री समाजाला न्याय मिळवून देऊ शकत नसतील आणि उलट समाजबांधवांनाच अडचणीत टाकत असतील तर समाजाने न्याय नक्की मागायचा तरी कोणाला? जर आपल्याच समाजाचे मंत्री आपला राजेशाही इतिहास डोळ्यासमोर ठेऊन समाजाला न्याय देऊ शकत नसतील, समाजाचे प्रश्न सोडवू शकत नसतील म्हणजेच आपल्या इतिहासाला साजेसे नेतृत्व करू शकत नसतील तर समाजाचे ते नेतृत्व समाजासाठी लायक नाही असे म्हणायला वावगे ठरणार नाही. काही समाजबांधवांच्या मते ज्या ठिकाणी गोंधळ झाला तो दिवस आणि ते ठिकाण चुकीचे होते मग समाजबांधवांनी न्याय कुठे आणि कोणाकडे मागायचा होता? ज्या मायमाऊलीने जात धर्म न पाहता सर्वांना समान न्याय दिला त्या मायमाऊलीच्या जन्मभूमीत न्याय मागितला तर काय गुन्हा? मग धनगरांच्या शंभर काय पुढच्या पिढ्या बरबाद झाल्या तरी बेहत्तर पण आश्वासन द्यायचे कधीच थांबणार नाही आणि अंमलबजावणी कधी करणार नाही अशी भुमिका आजपर्यंत मराठावादी आणि ब्राह्मणवादी राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी तशीच कायम ठेवली आणि त्यात उड्या मारून धनगर समाजाच्या मतदानावर समाजाचे बाजारीकरण आणि भांडवलीकरण करायचे काम धनगर नेत्यांनी चोखपणे केले असे म्हणायला काही वावगे ठरणार नाही.
          स्वताचा स्वाभिमान दुसऱ्याच्या बुटाखाली गहाण ठेवून समाजाचे जिव्हाळ्याचे प्रश्न न सोडवता समाजाला प्रस्थापितांच्या म्हणजेच लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम धनगर समाजातील नेते खासदार आमदार मंत्री करत असतील तर कित्येक पिढ्या बरबाद झाल्या तरी समाजाला न्याय मिळणार नाही. त्यासाठी धनगर समाजातील सामाजिक संघटनांनी जबाबदारी घेऊन समाजातून एक नव्हे तर अनेक नवनवीन नेतृत्व घडवून त्यांना राजप्रवाहात आणायला हवे. परंतु जे नेतृत्व आपण घडवतोय त्याला आई-वडिलांच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची जान आणि समाजावरती होणाऱ्या अन्यायाचे भान असायला हवे तर आणि तरच ते नेतृत्व समाजासाठी लायक ठरेल आणि धनगर समाजातील आजच्या नेतृत्वाची शोकांतिका दूर होईल.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
        ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
Email :- nitinrajeanuse123@gmail.com

Monday, 21 May 2018

...तर मग तिसऱ्या आघाडीचा पर्याय योग्यच - ✍️नितीनराजे अनुसे

पंढरपूर येथील धनगर समाज आयोजित सत्ता संपादन निर्धार महामेळाव्यास उपस्थित जनसमुदाय

     गेल्या ७० वर्षांपासून कॉंग्रेस राष्ट्रवादी यांनी मिळून धनगर समाजेत्तर इतर बहुजन समाजाचा वापर करून त्यांना सत्तेपासून राजकारणापासून उपेक्षितच ठेवले आहे त्यातच पंढरपूर-बारामतीच्या आरक्षण दींडी मुळे बारामती मध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून धनगर समाजाची जी आक्रमता व्यक्त केली त्याची सहानुभूती दाखवून भाजप सरकारने धनगर समाजाच्या मतावर डोळा ठेवून सत्ता हस्तगत केली मात्र धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून आघाडी सरकार प्रमाणेच वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या....
     माझा भोळा धनगर समाज हा धनगर समाजातील नेत्यांच्या भूलथापांना बळी पडला, गेल्या ७० वर्षांपासून प्रस्तापित मस्तवाल नेत्यांच्या अन्यायाखाली पिचत पडलेला समाज हा कवडस्यातून पडलेल्या आशेच्या किरणाप्रमाणे समाजाचा कुठेतरी विकास होईल म्हणून देवेंद्र फसणवीस यांच्या गुळमुळीत भाषणाला भुलून आगीतून उठला खरा पण पुन्हा फुफाट्यातच पडला. आघाडी सरकार प्रमाणेच केंद्र सरकारला धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीची साधी शिफारस न पाठवणारे हे भाजप-शिवसेना सरकार देखील नपुंसक ठरले. मग धनगर समाजाने बघायचे कोणाकडे? त्यात धनगर समाजाचे नेते देखील त्याच लायकीचे एखादे आमदारकीचे, खासदारकीचे, मंत्रीपदाचे हाडूक चाटायला भेटले तर विधानसभेत, राज्यसभेत आरक्षण प्रश्नावर साधा ब्र देखील काढायचा नाही आणि निवडणुकीत मात्र ह्यांना धनगर समाज हवा असतो तो फक्त मतदानापुरताच... पाठीमागे काहीजण विचारत होते की धनगर समाजाला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार नको, भाजप-शिवसेना युती नको तर पर्याय तरी कळवा...  तर मग हा घ्या तिसऱ्या आघाडीचा पर्याय डॉ बाळासाहेब आंबेडकर यांचा भारिप आणि धनगर समाज मिळून सत्ता हस्तगत करा... काहीजण म्हंटले डॉ बाळासाहेब आंबेडकर नको. तर का नको? तुम्हाला धनगर समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणारे नेते चालतात ज्यांनी धनगर आणि धनगड चा घोळ घालून केंद्र सरकारला उलट-सुलट रिपोर्ट पाठवले... तुम्हाला ते नेते चालतात जिथे गरज नसताना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कडून अहवाल मागविले जातात आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवायचे षडयंत्र रचतात मग भारिप का नको? चाखू द्या ना त्यांना सत्तेची फळं... बाकीच्यांनी सत्तेची फळं चाखली तर ती तुम्हाला चालतात मात्र इथेच का तुमच्या जातीयवादाचे घोडे पेंड खात बसले आहे. ज्यांनी मानवतेला लाजवणारी मनुस्मृती जाळून देशाचे संविधान लिहिले आणि माणसासारखे जगायला शिकवले त्यांच्या वारसदारांनी फळे चाखली तर मनुवाद्यांच्या आणि त्यांची विचारसरणी जोपासणाऱ्यांच्या पोटात माथेसुळ उठणारच यात काही शंकाच नाही.
         आघाडी सरकार आणि युती सरकार यांना त्रासलेल्या धनगर समाजाचा असंतोष शिगेला पोहोचण्याचे कारण म्हणजे आजपर्यंत धनगर समाजाची झालेली फसवणूक त्यामुळे तिसरी आघाडी धनगर समाजाला सत्तेत घ्यायला तयार आहे पण धनगर समाजातील किती नेतृत्व यासाठी पणाला लागणार आहे याचा देखील करणे गरजेचं आहे. आजपर्यंत धनगर समाजातील सामाजिक संघटनांनी आणि बोटावर मोजण्याइतपत धनगर नेत्यांनी धनगर समाजातून लोकसंख्येच्या तुलनेने पाहिजे असे सक्षम नेतृत्वच घडवले नाही उलट एखादे तयार होत असेल तर माझ्यापेक्षा तो मोठा होईल या भितीने हातातोंडाशी आलेले नेतृत्व बाद करण्याचेच राजकारण केले त्यामुळे धनगर समाजाचा विधानसभेतील आणि लोकसभेतील टक्का वाढलाच नाही. एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या आणि एकमेकांच्या उरावर बसण्याच्या स्पर्धेत धनगर नेत्यांनी धनगर समाजाचे फार मोठे वाटोळे केले आहे.
      काल पंढरपूर येथील धनगर समाज आयोजित सत्ता संपादन निर्धार महामेळाव्यात प्रचंड संख्येने धनगर समाजेत्तर बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता तेव्हा आंबेडकर म्हणाले की धनगर समाजाने आता सावज न होता शिकारी बनायला हवं. मग आता धनगर समाजातील संघटनांनी धनगर समाजातील नेत्यांनी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायला हवे की जर धनगर समाजाला शिकारी व्हायचेच असेल कोण-कोणत्या आणि किती विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातून तुम्ही शिकार करणार? कोण आणि कशी करणार? कारण निवडणूका तर जवळ आल्यात... आणि एवढ्या अल्पावधीतच समाजातून किती नेतृत्व घडणार या प्रश्नांनी डोक्यात नुसता धुमाकूळ घातलाय.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Monday, 14 May 2018

सामाजिक संघटनांनी आत्मपरिक्षण करावे : नितीनराजे अनुसे

        समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक संघटनांची उभारणी करण्यात येते स्थापना करण्यात येते परंतु संघटनेचे मुळ उद्धिष्ट बाजूला राहून समाजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी नुसती बैनरबाजी आणि स्वतःची प्रसिद्धी करण्यात व्यस्त असलेल्या मंडळींना/संघटनांना समाजाकडे वळून पाहायला आज फुरसत देखील नाही. सामाजिक संघटनेच्या माध्यमातून धनगर समाजातून नवनवीन नेतृत्व घडायला हवे होते पण तसे झाले नाही. स्वताच नेते बनून एखादी विधानपरिषद मिळतेय का .. यावरती डोळा ठेवून असलेले संघटनांचे नेते समाजाचा काय खाक विकास करणार का? काल परवा कोणीतरी म्हंटले आमचा इतिहास आमूक आहे आमचा इतिहास तमूक आहे म्हणून आमच्याकडे नेतृत्व द्या... अरे नेतृत्व हे काय मागून घ्यायची गोष्ट आहे का? राजसत्ता आणि राजपथ हा मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. आज तुम्ही ज्या संघटना उभा केल्या आहेत त्यातून नेतृत्व घडवा आणि त्या त्या नेतृत्वाखाली समाजाचे प्रश्न सोडवा , मेंढपाळांचे प्रश्न सोडवा, मेंढपाळांच्या पोरांचे, शिक्षणाचे, नोकरीचे तसेच पारंपरिक व्यवसायाचे प्रश्न सोडवा तर आणि तरच समाज तुमचे नेतृत्व मान्य करेल आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तयार झालेले नेतृत्व विधानसभेत आणि लोकसभेत लोकप्रतिनिधी म्हणून जातील तेव्हाच धनगर समाजाचा टक्का लोकसभेत आणि विधानसभेत वाढेल.
         समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, समाजाच्या एकत्रिकरणासाठी जर सामाजिक संघटना कार्यरत नसतील अथवा एकत्रित येत नसतील समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार वरती दबाव आणू शकत नसतील तर त्या संघटना काय जाळायला काढल्यात का? हा प्रश्न मला एकट्याला पडत नाही तर प्रत्येक धनगर समाजबांधवांना पडतोय म्हणून सामाजिक संघटनांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करून समाजहितासाठी कार्यरत रहावे. धनगर समाजाचे नेतृत्व जर मजबूत आणि लायक असेल तर धनगर समाजाला कोणाकडे भिक मागायची गरज पडणार नाही.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Friday, 27 April 2018

धनगर नेत्यांनी राजकारण सोडावे का? ✒नितीनराजे अनुसे



धनगर नेत्यांनी राजकारण सोडावे का?
खरंतर हा एक चिंतेचा विषय बनून गेला आहे. कालपरवा मी मुद्दामहून दोन पोस्ट टाकल्या होत्या त्यातील पहिली म्हणजे "धनगर नेत्यांनो तुम्ही आमच्यामुळे मोठे झाला आणि गाजला पण धनगर समाजाचे प्रश्न न सोडवताच तुम्ही एवढे कसे काय माजला?" आणि कालची दुसरी पोस्ट म्हणजे "तर धनगर समाज आक्रमक होणारच " या आशयाचा लेख लिहून समाजातील समाजबांधवांच्या आणि सामाजिक संघटनांच्या भावना जाणून घेतल्या. तो लेख लिहण्यापाठीमागे कोणाचे समर्थन करणे, कोणाला शिव्या देणे हा उद्देश्य नव्हता तर धनगर समाजातील सामाजिक संघटनांचे धनगर नेत्यांबद्दल नक्की काय विचार आहेत? धनगर नेत्यांबद्दल त्यांचा किती रोष आहे?  या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी मला हे पाऊल उचलावे लागले त्यातून ज्यांनी ज्यांनी सकारात्मक आणि नकारात्मक विचार करून त्यावर मत मांडले त्याबद्दल त्यांचे खरंतर आभार.
     आता धनगर नेत्यांनी राजकारण सोडावे का?  हा प्रश्न मला एकट्यालाच नव्हे तर तळागळातील सर्व समाजबांधवांना आणि युवा वर्गाला पडलेला दिसतोय. आंबेडकरांची तिसरी आघाडी ही धनगर समाजाला कशावरून आरक्षण देऊ शकते हे आंबेडकरांनाच विचारायला हवं पण तत्पूर्वी त्या मंत्रिमंडळात धनगर समाजाच्या वाट्याला लोकसंख्येच्या तुलनेत किती विधानसभेच्या किती जागा मिळतील? धनगर समाजाचे किती मंत्री आंबेडकरांच्या मंत्रिमंडळात असतील? या बद्दल शहानिशा करणे उचित वाटते. तसे पाहायला गेले तर सध्य परिस्थितिला आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचा सांगोला विधानसभा मतदारसंघ सोडला तर अन्य कोणत्याही धनगर नेत्यांसाठी सुरक्षित असा मतदारसंघ दिसत नाही. करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील व आमदार अनिल (आण्णा)  गोटे यांचा देखिल मतदारसंघ पूर्णतः नव्हे तर काहीअंशी सुरक्षित आहे. पदुम मंत्री ना.महादेवजी जानकर साहेब, जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे साहेब, माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे, मा. गोपीचंद पडळकर साहेब, आमदार दत्ता (मामा) भरणे, आमदार रामहरी रूपनर (आप्पा), आमदार रामराव वडकुते साहेब,  माजी आमदार भदे साहेब, प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर या बोटावर मोजण्याइतपत धनगर नेत्यांना तरी सुरक्षित असा लोकसभा/विधानसभा मतदारसंघ कुठेच सुरक्षित दिसत नाही. मग तिसरी आघाडी एका वर्षात असे कोणते नेतृत्व तयार करणार आहे हे राम जाने... आणि तसेही रिडालोस (रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी) धनगर समाजाचे किती आमदार निवडून आणू शकले? एकही नाही कारण धनगर समाजातील नेत्यांसाठी एकही मतदारसंघ सुरक्षित नाही असे असताना आजपर्यंत कोणत्याही सामाजिक संघटनांनी नविन नेतृत्व बळकट करण्याचे अथवा तयार करण्याचे प्रयत्न केले नाहीत उलट धनगर समाजाचे जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचे खच्चीकरण करण्याशिवाय दुसरे उद्योग त्यांना जमलेच नाही. मग तिसरी आघाडी म्हणुन मिरवल्या जाणार्या आंबेडकरांच्या मंत्रिमंडळात नक्की कोणतं नेतृत्व पुढे येणार हे कोणास ठाऊक?
         आजकाल तास अर्ध्या तासात अनेक स्वयंघोषित व बालिश नेतृत्व तयार होतात पण ज्याप्रमाणे लाल मातीत अंग घोसळलेल्या, मल्लविद्यामध्ये पारंगत असलेल्या पैलवानाला जसा पट्टीचा खेळाडू, कुस्तिपट्टू बनायला जसा काळ लागतो तसाच पट्टीचा राजकीय नेता बनायला देखिल काळ वेळ लागतो. त्यासाठी राजकीय डावपेच खेळायला जमलं पाहिजे तर आणि तरच विधानसभेत आणि लोकसभेत धनगर आमदार खासदारांचा टक्का वाढेल यासाठी सामाजिक संघटनांची भूमिका नेतृत्व घडविण्यासाठी उपयोगात यायला हवी होती पण तसे न करता सामाजिक संघटनांनी आणि संघटनांच्या पदाधिकारी यांनी धनगर नेत्यांचेच पाय ओढण्यासाठी उर्जा व्यर्थ खर्च केली म्हणून धनगर समाजाचे नेतृत्व ना घडले ना बळकट झाले.
      एखादा प्रस्थापित नेता स्टेजवर येऊन आपल्या धनगर समाजाच्या नेत्यांना शिव्या घालत असतो तेव्हा धनगर समाजातील खाली बसलेली मंडळी तसेच युवा वर्ग हा टाळ्या वाजवत बसतो हे चित्र जरा विचित्रच दिसतं. खरंतर तेव्हा लाज वाटते धनगर म्हणवून घ्यायची... पण जेव्हा तीच टाळ्या वाजवणारी तरणीबांड पोरं जेव्हा हातात चप्पल घेऊन त्या शिव्या देणार्या प्रस्थापित मस्तावलेल्या नेत्यांच्या दिशेने भिरकवतील तेव्हाच खर्या अर्थाने धनगर समाज राजकीय क्षेत्रात मुसंडी मारेल व नवनविन नेतृत्व तयार होऊन लोकसभेतील आणि विधानसभेतील सदस्यांचा टक्का वाढेल. पुढे कोणाच्या बापाची देखिल हिम्मत होणार नाही धनगर नेत्यांना शिव्या घालायची.... ज्या उद्देशाने पावलापावलावर संघटनांच्या स्थापना झाल्या तो उद्देश्य धुळीस मिळवून नेतृत्व घडविण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी अपयशी ठरलेल्या संघटना मात्र नेत्यांना शिव्या घालत आपल्याच धनगर नेत्यांच्या विरोधात दंड थोपटून उभा आहेत. आणि नेते देखिल समाजाकडे पाठ फिरवताहेत अशाने धनगर नेेतृत्वांचे नामोनिशान मिटून जाईन. ही खेकडा प्रवृति जो पर्यंत समाजातून हद्दपार होत नाही आणि धनगर नेतृत्व ना वाढणार ना बळकट होणार. त्यासाठी धनगर समाजातील युवक-युवतींनी विचार करून त्यावर आत्मचिंतन करायला हवं आणि धनगर नेतृत्व मात्र अबाधित राखायला हवं.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंराजे
✒नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
📞+918530004123
📨 nitinrajeanuse123@gmail.com

Wednesday, 21 March 2018

शुभेच्छांचा अभिप्राय - ✍️ नितीनराजे अनुसे

माझ्या वाढदिवसानिमीत्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल अभिप्राय...
काल दि २० मार्च रोजी माझ्या वाढदिवसानिमीत्त अखंड देशभरातून माझे आप्त, मित्रपरिवार, सहकारी वर्ग, वर्गमित्र तसेच महाराष्ट्र राज्यातील ज्ञात/अज्ञात तमाम लहानथोर समाजबांधवांनी फोन वरून, प्रत्यक्ष भेटून तसेच व्हाटसॲप फेसबुकच्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरित्या माझ्यावरती जो शुभेच्छांचा वर्षाव केला त्याबद्दल आणि जे शुभेच्छा देऊ शकले नाहीत त्याबद्दल देखिल तुम्हा सर्वांचा मी ह्रदयाच्या अंतकारणापासून खूप खूप आभारी आहे. मला शुभेच्छा दिल्या नाहीत असे महाराष्ट्र राज्यातील एकही गाव नाही. कारण जिथे साधे वर्तमानपत्र पोहचत नाही दूरदर्शन तरी खूप दूरची गोष्ट अशा डोंगरदऱ्यात राहणाऱ्या समाजबांधवांपर्यंत २६०० पेक्षाही जास्त व्हाटसॲप ग्रुपच्या माध्यमातून माझे समाजप्रबोधनाचे लेख त्यांच्यापर्यंत पोहचत असतात आणि ते मला नेहमी अवर्जून कळवतात देखिल.... अशा प्रत्येक वाड्या-वस्त्यावरून समाजकार्याच्या चळवळीत असलेल्या एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या समाजबांधवांनी शुभेच्छांच्या माध्यमातून माझ्यावरती जे प्रेम व्यक्त केले त्यातून समाजासाठी सत्कार्य करण्याची मला फार मोठी ताकद मिळते/प्रेरणा मिळते. खरंतर मी काही फार मोठा लेखक, वक्ता, व्याखाता, तत्ववेत्ता अथवा फार मोठा काही विचारवंत देखिल नाही परंतू माझ्या भोळ्या-भाबड्या समाजावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे न्यायासाठी/हक्कासाठी लढणे, झटणे आणि झगडणे हे आमच्या रक्तातच असल्याने तो अन्यायाच्या विरोधातील आवाज मी माझ्या लेखणीच्या माध्यमातून स्वाभिमानी समाजमनापर्यंत पोहोचवतो आणि मी ते माझे आद्यकर्तव्य समजतो.
     काही कारणास्तव मी महाराष्ट्र राज्याबाहेर असल्याने सर्वांची भेट घेणे, सामाजिक कार्यक्रम, जयंती सोहळा असो, समाजाचे कोणतेही आंदोलन अथवा मोर्चा असो मला प्रत्यक्षरित्या त्यामध्ये सहभागी होता येत नाही तरी माझा वर्गमित्र राहूल जावीर (RJ) याने काल सांगितल्याप्रमाणे व्हाटसॲप, फेसबुक, ट्विटर, हाइक, गुगल, ब्लाॅगर यांसारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मी प्रत्येक समाजबांवांशी (24*7) संपर्कात असतो. धनगर समाजातीलच काही महान व्यक्ती मला म्हणाल्या की तुम्ही जातीयवाद करता... परंतू जर मला जातीयवाद करायचा असता किंवा करत असलो तर मग  जीवाला जीव देणारे अन्य जाती-धर्मातील माझे मित्र माझ्यापासून कधीच दूर झाले असते. त्यांच्या मनात देखिल असा विचार कधीच आला नाही तर मग हा न्यूनगंड माझ्याच धनगर समाजात का? असा प्रश्न मला नेहमीच पडतो... असो क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या विचारधारेतून प्रेरित होऊन समाजप्रबोधनाच्या चळवळीतील एक सर्वसामान्य मेंढपाळ कुटूंबातील एक छोटासा कार्यकर्ता नव युवा लेखक म्हणून मला जी ओळख मिळाली त्यात माझ्या आई-तात्यांसोबतच तुम्हा सर्वांचं देखिल फार मोठं योगदान आहे. त्याच जोरावर आणि माझे गुरू प्रा.श्रीकृष्ण पडळकर सर (M.Phil) यांच्या मार्गदर्शनातून अन्यायाच्या खाईत होरपळलेल्या/खचलेल्या/पिचलेल्या तसेच अंधकारात गुरफटलेल्या धनगर समाजासपुन्हा एक नवी दिशानावाचं पुस्तक येत्या एप्रिल मध्ये प्रकाशित करून वाचकांसमोर ठेवतोय. तसेच महाराष्ट्राबाहेर असल्याने फार दिवसांपासून प्रलंबित असलेले चरित्र म्हणजेच ज्या माणसानं स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करून अखंड धनगर समाजाला जागं केलं त्या क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे त्यांचे जीवन चरित्र प्रिंटींग होत असून लवकरच ते देखिल प्रकाशित होईल आणि जेव्हा मी महाराष्ट्रात येईन तेव्हा ते समाजबांधवांच्या हातात असेल
असो तुम्ही मला शुभेच्छा देऊन माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल पुनश: एकदा मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१८५३०००४१२३

Saturday, 17 March 2018

धनगरांच्या अर्ध्या भाकरीचा चंद्र...

धनगर म्हणजे धगधगणारा पिवळा ज्वालामुखी
या जगाच्या पाठीवर हजारो वर्षापेक्षाही जास्त काळ राज्यकारभार केलेल्या थोर महापुरूषांच्या जातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी, धुरंदर लढवय्यांचे शुरवीरांचे आम्ही वारसदार पण आज आम्ही कोणतं जगणं जगतोय ते पाहून खरोखरंच लाज वाटतेंय. अरे एकेकाळी राजा समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी आज गुलामगीरीतलं जगणं जगतोय याची जरा तरी लाज वाटायला हवी का नको?? मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर शत्रुंना तोलून त्यांच्या छाताडावर थायथाय नाचणाऱ्या थोर महापुरूषांच्या जातीत जन्माला यायला नशिब लागतं त्याच वाघाच्या काळजाच्या आम्ही औलादी, शत्रूंच्या चिंद्या चिंद्या उडवून  स्वबळावर अनेक किल्ले, परगणे, महाल हासील करून साम्राज्य उभे करणाऱ्यांपैकी आम्ही आज आमच्या हक्काच्याच आरक्षणाची भिक मागत बसलोय याचीच लाज वाटतेंय. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले पण आमच्या अज्ञानपणामुळे त्या अनुसुचित जमातीच्या सवलतींचा आम्ही लाभ घेऊ शकलो नाही त्यातच मस्तावलेल्या आणि माजलेल्या प्रस्तापित औलादी "धनगड" आणि "धनगर" एकच असताना ते वेगळे असल्याचे उलट-सुलट रिपोर्ट देऊन धनगर आरक्षणाचं घोंगडं भिजत ठेवायला यशस्वी झाले
आज तेच लोक त्यांचे सरकार ढासळल्यानंतर आम्ही आरक्षण देणार आरक्षण देणार असा दिंडोरा पिटू लागलेत. त्यांना जाऊन सांगा कोणीतरी आरं आम्हाला नव्याने कोणते आरक्षण नको आहे पण आम्हाला जे राज्यघटनेत दिले आहे त्याची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. आज महाराष्ट्र राज्यात दीड-दोन कोटींच्या घरात अर्थातच एकूण लोकसंख्येच्या १७-१८ % धनगर समाजाची लोकसंख्या असताना धनगर समाजाला मात्र .% मद्ये अडकवून ठेवायचे काम पवारांनी केले. मुळात धनगर अनुसुचित जमातीमद्ये असताना त्या सवलती लागू कराव्यात यासाठी स्व.बी.के.कोकरे साहेबांनी खंबाटकीच्या घाटात जेव्हा आंदोलन केले तेव्हा त्या आंदोलनाची दखल घेत धनगर समाजाचा शत्रू असलेल्या पवारांनी धनगर समाजातील नेत्यांना हाताशी धरून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू करण्याऐवजी धनगर समाजाला महाराष्ट्र राज्यात भटक्या जमाती () मद्ये वेगळी सुची बनवून दिली. त्यामुळे केंद्रात धनगर समाजाला ओबीसी मद्ये अडकविल गेलं. धनगर समाजाला अनुसुचित जमातीऐवजी महाराष्ट्र राज्यात भटक्या जमाती () तर केंद्रात ओबीसी मद्ये घालून पवारांनी फार मोठे पाप केले. गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाज या सवलतीला मुकल्यामुळे धनगर समाज आर्थिकदृष्ट्या तर मागासच राहिला शिवाय राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्याही धनगर समाजाची वाताहात झाली. धनगर समाजाचे आजपर्यंत जे वाटोळं झालं ते धनगर समाजातील नेत्यांमुळेच झाले ज्यांनी पवारांवरती विश्वास ठेवला आणि आजही तेच दौंडी पिटताहेत की पवार देणार पवार देणार पण त्यांना हे कुठे माहितीय की एका बाजूला पिचडला धनगर समाजाच्या विरोधात बोलायला लावायचं आणि दुसऱ्या बाजूला धनगर समाजातील नेत्यांना पुढे करून धनगर समाजाला फसवायचं ही पवारांची राजनीती आमच्या धनगर समाजबांधवांना कोण समजावून सांगणार?? पाठीमागच्या सरकार प्रमाणेच आताचे भाजप सरकार देखिल तितकेच नपूसंक ठरले धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून आश्वासनांवरती आश्वासनांचा पाऊस पाडून महाराष्ट्रात देवेंद्र आणि देशात नरेंद्र हे धनगरांच्या हक्काच्या अर्ध्या भाकरीचा चंद्र हिसकावून घेण्याचा आणि धनगर समाजाला नागविण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. आता हे कुठेतरी थांबायला हवं यासाठी आरक्षण चळवळीत सहभागी व्हा संघटना कोणतीही असो उद्देश मात्र समाजाच्या विकासाचा असला पाहिजे ज्या संघटना स्वार्थासाठी आणि श्रेयासाठी काम करतात त्यांना समाजाचे काहीही पडलेले नसते. एखादा कोणी चांगले काम करत असेल तर संघटनेच्या नावाखाली त्याला फोन करून धमक्या देणे, टीका करणे, त्याच्या पायात पाय अडकवणे असे प्रकार चालू आहेत. अरे संघटना या समाजाच्या विकासासाठी असतात चांगले काम करणाऱ्यांना धमकवण्यासाठी नव्हे. कुठलीतरी स्टंटबाजी केली म्हणजे तुम्ही समाजासाठी काम करताय असे होत नाही. त्यातून फलित काय झाले हे महत्वाचे असते... अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या राजा मल्हारराव होळकरांचे आम्ही मावळे, राष्ट्रमाता अहिल्याई होळकरांचे आम्ही भक्त, महाराजा यशवंतराव होळकरांचे आम्ही वारसदार अशा धुरंदर लढवय्यांच्या जातीत जन्माला आलेली माणसं राजकारणावेळी राजकारण अवश्य करावे पण धनगर समाजाचा जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित होईल जेव्हा जेव्हा धनगर समाजावर अन्याय होईल तेव्हा आपापल्या नेत्यांची आपापल्या पक्षांची धोतरं सांभाळत बसण्यापेक्षा समाजासाठी, समाजाच्या न्याय हक्कासाठी एकत्रित येवून लढा द्या हीच नम्र विनंती.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१८५३०००४१२३

https://nitinrajeanuse123.blogspot.com