Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Tuesday, 13 August 2019

समाजासाठी आक्रमक होऊन नेहमीच आंदोलन करणारे सुरेश होलगुंडे,शांततेच्या मार्गाने उपोषण करत जीवाची बाजी लावताहेत, सुरेश होलगुंडे आणि सर्व उपोषणकर्त्यांंना सलाम.....

महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे


            समाजाच्या न्याय व हक्कासाठी आमदार-खासदारांच्या गाड्या आडवणारे, न्याय व हक्कासाठी भांडणारे महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे हे एक हसतमुख चेहऱ्याचे व्यक्तिमत्त्व असून धनगर आरक्षण लढ्यातील एक संघर्षमय नेतृत्व सुद्धा आहे. १४ ऑगस्ट २०१४ रोजी धनगर आरक्षण संदर्भात महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले सुरेश(भाऊ) होलगुंडे हे निस्वार्थीपणे या आंदोलनात धनगर समाजाचे नेतृत्व केले होते. याच धनगर समाजाच्या आंदोलनात मुंबईची Life Line अर्थातच जीवन रेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे आडवण्यात मा.सुरेश भाऊ यांचा सिंहाचा वाटा होता. अधिवेशन काळात विधानभवनाला घेराव घालून प्रत्येक आमदारांना गुलाब पुष्प देत आरक्षणाच्या संदर्भात विधानसभेत आवाज उठवण्याचे गांधी मार्गाने केलेल्या आंदोलनात शिवाय त्यानंतरच्या अधिवेशन काळात विधानसभेत घुसून सरकार विरोधात आरक्षणाच्या घोषणा देऊन यळकोट यळकोट जय मल्हार चा गजर करण्यात देखील ते हिरारीने सहभागी झाले होते. धनगर आरक्षण संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मधुकर पिचड याचा निषेध करत राष्ट्रवादी भवनावर जे आंदोलन झाले होते त्यातही मधुकर पिचड च्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलनात मा.सुरेश भाऊ होलगुंडे सहभागी होते. अशा एक ना अनेक आंदोलनात मोर्चात सहभागी होऊन समाजहितासाठी निस्वार्थीपणे कार्य करणारे नेतृत्व, गावभागातून मुंबई मध्ये येणाऱ्या तरूणांना मार्गदर्शन तथा मदत करणाऱ्या सर्वच जाती-धर्मातील युवकांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा सांभाळणाऱ्या महाराष्ट्र यशवंत सेना प्रमुख मा.सुरेश(भाऊ) होलगुंडे यांच्या नेतृत्वाखाली पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र यशवंत सेनेच्या शिलेदारांनी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आणि पुरंदरच्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी विधानभवनाच्या प्रांगणात गोंधळ घालून घोषणाबाजी केली होती त्याच महाराष्ट्र यशवंत सेनेचे प्रमुख मा.सुरेश (भाऊ) होलगुंडे हे धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पंढरपूर येथे सलग पाचव्या दिवशीही सहकाऱ्यांसह केवळ आणि केवळ समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अन्न त्यागून आमरण उपोषणात ते देखील कोणत्याही उपचाराशिवाय बसले आहेत. सुरेशभाऊ सलाम तुमच्या कार्याला
        सरकार या आंदोलनाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असले तरी धनगर समाजाने आणि समाजातील नेत्यांनी गांभीर्याने लक्ष घालून त्या ९ योद्ध्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Sunday, 11 August 2019

लढाई हक्काच्या आरक्षणाची... ✍️नितीनराजे अनुसे

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषणास बसलेले वाघ

   भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे होत आली तरी राज्यघटनेने बहाल केलेला घटनादत्त अधिकार अर्थातच धनगर जमातीच्या हक्काचे अनुसूचित जमातीचे आरक्षण आजपर्यंत समाजाला मिळू शकले नाही हे भारत नावाच्या महा'राष्ट्रा'तील सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. वर्षानुवर्षे इथल्या प्रस्थापित औलादी आश्वासने देऊन, धनगर समाजाच्या मतांच्या जोरावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर पुन्हा त्याच समाजाची ससेहोलपट करतात हे कधीपर्यंत चालायचं?
        आजपर्यंत जे झाले गेले ते इतिहासात जमा झाले परंतु इथून पुढे तरी सर्वांनी कंबर कसून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लढायला सज्ज व्हायला हवे. नाहीतर धनगर समाजाची आणि समाजातील नेत्यांची "एक ना धड भाराभर चिंध्या" अशीच अवस्था होईल.  धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र हवे आहे जेणेकरून पुढच्या पिढ्या तरी स्वाभिमानाने जगतील नाहीतर आजच्या पिढीच्या तोंडात शेण घालायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळाले तरच समाजाची प्रगती होऊ शकते. १००० कोटी रूपयांचे गाजर दाखवून धनगर समाजाची बोळवण केली जात आहे जे राज्यघटनेत नाही.
        जुलै २०१४ च्या बारामतीच्या आंदोलनात तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते ते फडणवीस यांनी पाळले नाही उलट पुन्हा अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी अन्य आश्वासनांचे, सवलतींचे गाजर दाखवले आहे त्याविरोधात ९ ऑगस्ट या क्रांतीदीवशी धनगर समाजातील पांडुरंग मेरगळ (दौंड), सुरेश होलगुंडे(मुंबई), विजय तमनर (राहुरी), सतीश झंजे(माळशिरस), प्रकाश थाडके (नांदेड), धनाजी बंडगर (सांगोला), गंगाप्रसाद खारोडे (हिंगोली), राजेंद्र तागड (अ.नगर) आणि नागुराव बारसे(नांदेड) ९ लढवय्ये पंढरपूर येथे आमरण उपोषण करत आहेत. धनगर समाजाला आणि समाजातील प्रत्येक नेत्यांना, कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्या ९ योद्ध्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. आजच गंगाप्रसाद खारोडे या उपोषणकर्त्यास पोलिस जबरदस्तीने उपचारासाठी घेऊन गेले त्यावरून असे दिसते आहे की हे आंदोलन चिरडण्यासाठी फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे परंतु जोपर्यंत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवायची जबाबदारी तुमची आमची आहे. त्यासाठी पेटून उठणे ही काळाची गरज आहे अन्यथा भविष्यात कोणीही धनगर समाजाची दखल घेणार नाही हे लक्षात ठेवा.
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

Saturday, 6 July 2019

आम्हाला न्याय द्या... खेकड्यांची आर्त किंकाळी... ✍️नितीनराजे अनुसे


      गावाकडे आल्यावर काल वडिलांना पेरणीसाठी जायचे असल्याने मी मेंढरं घेऊन शेताकडे गेलो. काही दिवस अगोदर पडलेल्या थोड्याफार पावसामुळे शिवार हिरवंगार झालं होतं. ओल्या गवतामुळे तशी मेंढरांना लवकर तहान लागत नाही म्हणून दुपारपर्यंत मेंढरं चारून पाण्यावर घालायची म्हणून खाली विहीरीवर घेऊन गेलो. विहीर तशी फार खोल नव्हती अगदी परूसभर सुध्दा नाही आणि त्यात पाणी सुद्धा जेमतेमच होते. थोड्याफार तहानलेल्या मेंढ्या पळतच विहीरीत उतरल्या आणि गटागटा पाणी पिऊन बाहेर पडायला लागल्या. तेवढ्यात कसलातरी आवाज यायला लागला म्हणून कान टवकारून त्या दिशेने बघतो तर काय विहीरीच्या आसपास असलेल्या बिळांमधून एकेक खेकडा बाहेर पडू लागला. मला वाटलं की मुके प्राणी आहेत बिचारे, मेंढ्यांच्या पळण्याच्या आवाजाने घाबरले असतील नाहीतर अन्नाच्या शोधात बाहेर पडत असतील. पण वास्तविक पाहता तसे काही नव्हते. सर्व खेकडे माझ्या भोवती गोळा झाले. कसलातरी विचित्र आवाज करत ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करत करत होते. खरंतर त्यांच्या भावनेतूनच त्यांची भाषा आता स्पष्टपणे ऐकायला येत होती. काल परवाच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याच्या दुर्गम भागातील तिवरे (भेंडवाडी) गावानजीक असलेले तिवरे धरण फुटून जवळपास २४ जण बेपत्ता झाले त्यातील आतापर्यंत ६ जणांचेच मृतदेह सापडले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तेथील स्थानिकांनी त्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. परंतु त्यावर गांभीर्याने लक्ष न देता गावकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी म्हणून त्या धरणातील गाळ उपसून डागडुजी करण्यात आली होती. मात्र धरण कसे फुटले त्याबद्दलचा अहवाल मागितल्यानंतर जंलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी चक्क सांगितले की निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे नव्हे तर खेकड्यांच्या प्रादुर्भावामुळे तिवरे धरण फुटले. माझ्या अंदाजानुसार जगाच्या इतिहासातील ही एकमेव घटना असावी की खेकड्यांमुळे धरण फुटले थोडक्यातच त्याचा अर्थ असा होतो की खेकड्यांनीच तिवरे धरण फोडले.
         म्हणूनच की काय ते सर्व खेकडे माझ्या भोवती गोळा झाले होते. त्यांच्या जमातबांधवांवरती धरण फोडल्याचे आरोप झाले होते. त्यामुळे प्रत्येकजण जणू काय आपले जमातबांधव निर्दोष असल्याची विनवणी करत माणसं कशी स्वार्थी आहेत ते सांगत होता. तेवढ्यात मध्येच एकजण म्हातारा खेकडा समोर आला आणि सांगू लागला की "हे बघा, आमच्या बापजाद्यांपासून आमची खेकडा जमात ही अखंड भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात आहे. तिथे तिथे आमची ही जमात सुखासमाधानाने जगत आहे. जगभरात असंख्य धरणे आहेत. एवढेच काय तर भारतात सुद्धा आहेत. राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी सुद्धा धरणे बांधून ठेवली आहेत. तद्नंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा राधानगरीचे धरण बांधले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या आराखड्यानुसार गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण असो अथवा त्याव्यतिरिक्त इंग्रजांच्या काळात बांधलेली अनेक धरणे आहेत. अगोदरच्या बांधलेल्या धरणाजवळ देखील आमची खेकडा मोठ्या प्रमाणात जमात वास्तव्यास आहे हवे तर त्यासंदर्भात तुम्ही अहवाल मागवू शकता. मात्र विचार करण्याची गोष्ट एवढीच आहे की त्याकाळी बांधलेली धरणे अजून जशीच्या तशीच आहेत मग आता २००४ साली कार्यान्वित करण्यात आलेले तिवरे धरणच आम्ही कसे काय फोडले? निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून माणसांच्या जीवाशी खेळ चाल्लाय हे माणसांना कसं काय दिसत नाही?"
          तेवढ्यात दुसरा एक खेकडा मध्येच उभा राहिला आणि म्हणाला की, "आम्ही बोलू शकत नाही हे मान्य आहे त्यामुळे आमच्यावर आरोप प्रत्यारोप होतील परंतु बोलत्या-चालत्या ज्या माणसांचे जीव गेले आहेत, त्यांचे काय? काही गुन्हा नसताना त्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे ते सुद्धा बोलत्या-चालत्या माणसांमुळेच... मग आमच्यावर आरोप करण्यागोदर कमीत कमी माणूसकीची लाज वाटून तरी संबंधितांनी स्वतःच्या हलगर्जीपणाची लाज बाळगायला हवी होती. परंतु माणूसकी हरवलेल्या या जगात मुक्या प्राण्यांवर आरोप करून बाजूला होणारी हीच माणूसकी आज आम्ही नव्याने पाहतोय. हेच का ते कलियुग? जर आम्हा खेकड्यांना धरणे फोडायची असती तर आजपर्यंत एकही धरण ठेवले नसते सगळी धरणे फोडली असती. तसंही त्या तिवरे (भेंडवाडी) गावच्या ग्रामस्थांनी आमचे काही बिघडवले नव्हते. त्यामुळे संबंधित जलसंधारण मंत्र्यांनी जबाबदार अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार जे कोणी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. माणसांचा जीव काय असतो हे आम्हाला चांगलंच माहीत आहे कारण आम्हीच त्यांच्या आजारावर उपयोगी येतो, माणसांच्या आरोग्यासाठी आम्ही आमचे जीव देतो. मग आम्ही कशाला त्या गोरगरिबांचे जीव घेऊ? माणसातील माणूसकी शिल्लक राहिली नसल्यानेच माणसंच माणसांचा जीव घेत आहेत, खून करत आहेत, अन्याय अत्याचार करत आहेत. मग त्यांच्या चुकीसाठी आम्हाला का जबाबदार धरले जातेय...? जनाची राहीली कमीत कमी मनाची लाज बाळगून आम्हा मुक्या प्राण्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनवणी आहे."
     खेकड्यांच्या त्या विनवण्या ऐकून खरंतर मलाच माणूसकीची लाज वाटायला लागली. स्वतःच्या नपुंसकतेमुळे मुक्या प्राण्यांवर आरोप करून स्वतःला सुरक्षित ठेवणाऱ्या औलादी खरंच माणूसकीच्या नावाला लागलेला एकप्रकारचा कलंक आहे. मेंढरामागेच या गावावरून त्या गावाला भटकंती करत असताना तत्कालीन परिस्थिती पाहून आमचे तात्या कधीकधी एक गाणं गुणगुणत होते त्या गाण्याच्या पहिल्या ओळी आज स्पष्टपणे आठवताहेत त्या म्हणजे "कलियुगात झाली भेळ, लावली रताळं आली केळं" या वरून तरी असंच वाटतंय की सध्याच्या युगात माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाला जबाबदार धरेल आणि काय करेल हे सांगणे अशक्य आहे. कारण या जगात माणूसकी शिल्लक राहिली आहे की नाही? असा प्रश्न पडतोय....
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Monday, 17 June 2019

षंढ लोकप्रतिनिधींकडून समाजाने काय अपेक्षा ठेवाव्यात? ✍️नितीनराजे अनुसे

पुरंदर येथे मेंढपाळाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अतिप्रसंग घटनेबद्दल....


       खरंतर लहान तोंडी मी मोठा घास घेतोय... परंतु आसपासच्या वातावरणातील वस्तुस्थिती पाहीली तर माझ्याच काय प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. ज्या सह्याद्रीच्या कुशीत आणि मुशित असलेल्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शंभूराजांचा जन्म झाला ती पुरंदर तालुक्याची माती खरंतर पवित्र असायला हवी होती परंतु कसली पवित्र म्हणायची? त्याच मातीत दि.१० जून २०१९ रोजी एका मेंढपाळाच्या एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग होतो आणि शिवछत्रपतींचा वारसा सांगणारा, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा म्हणवून घेणारा एकही मर्द पुढे येऊन निषेध करू शकला नाही. यासारखी दुसरी लाजीरवाणी गोष्ट काय असावी? या घटनेची तक्रार नोंदवण्यासाठी एका मेंढपाळास पुढे यावे लागते मग बाकीचे लोक, नेते, समाज काय झोपा काढताहेत का?  म्हणजे कोपर्डी सारखे प्रकरण घडल्यावरच सबंध महाराष्ट्र मूक मोर्चे काढणार आणि मेंढपाळांच्या पोरी काय रस्त्यावर पडल्यात काय म्हणून तुम्ही हातात बांगड्या भरून षंढ होऊन घरात बसणार? जातीयवादाचे बुरखे पांघरूण बसणाऱ्या औलादी आज इतरांना धर्मनिरपेक्षतेचे धडे शिकवतात हाच का महाराष्ट्रातील मावळ्यांना लाभलेला शिवछत्रपतींचा वसा आणि वारसा? कारण ज्या मतदारसंघात ही घटना घडली त्या मतदारसंघाची खासदार ही सुद्धा एक महिला असूनसुद्धा साधी चौकशी करायला येत नसेल तर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे की असे जातीयवादी लोकप्रतिनिधी आरोपींना पाठीशी घालताहेत.
          आज इथे तर उद्या तिथे असे भटके जीवन जगत पोटाची खळगी बडवणाऱ्या मेंढपाळांनी आता जगायचं कसं आणि मरायचं तरी कसं? असा प्रश्न पडतोय. समाजातील संघटना नुसत्या प्रसिद्धीसाठीच स्थापन करण्यात येतात काय? ज्या समाजाच्या न्याय हक्कासाठी म्हणून डंका पिटला जातोय त्या संघटनांकडून आणि ज्या मेंढपाळांच्या नावाने जे नेते आरक्षण मागताहेत ते नेते जर एका मेंढपाळाच्या मुलीला न्याय देऊ शकत नसतील तर त्या नेत्यांकडून समाजाने काय अपेक्षा कराव्यात? स्वतःची खळगी भरली म्हणून, पं.समिती सदस्य, जि.प.सदस्य, आमदार, खासदार, मंत्री झाला म्हणून समाजाला वाऱ्यावर सोडून देणार का? आज एका मेंढपाळाची मुलगी नव्हे तर तुमची आमची भगिनी अतिप्रसंगास बळी पडली आहे त्याविरोधात तुम्ही आवाज उठवू शकत नसाल तर उद्या तुमच्यापैकीच तुमच्या रक्ताची आई, बहिण, बायको, मुलगी अशा अतिप्रसंगास बळी पडू शकते त्यावेळी कितीही बोंबलत बसला तरी तुमचं कोणी ऐकून घेणार नाही ही गोष्ट नीट लक्षात ठेवा.
अधिक माहितीसाठी संपर्क
मेंढपाळ आनंद कोकरे : +91 87887 97032
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Friday, 31 May 2019

डोळ्यांत अंजन घालणारी काव्यरचना ✍️कवी राजू झंजे

जय मल्हार.....
     आज  तुझी  जयंती  माउली  ,
      दाही  दिशा साजरी होणार ;
      बेंबीच्या देठापासून  ,
     " जय अहिल्या" नारे देणार !

       चौका-चौकात  अभिवादनाचे ,
        मोठं  मोठाले  बॅनर  लागतील ;
        वर्षभर  "झोपलेले  " ,
       आज  " जातीसाठी ?" जागतील !
 
       समाज  "माझा"च ,
        अशी स्पर्धा देखील लागतेय आता ;
       मीच "मालक" यांचा ,
        काही "मंडळी" अशी वागतेय आता !
 
        जयंतीच  "व्यासपीठ "माउली आता,
        "अस्तित्व" दाखवण्याचं ठिकाण झालंय;
         समाज तुझा काही  "व्यापारियांचे"
        ठरलेले "दुकान " झालंय !
 
          या  दुकानातूनच आम्हांला,
          कोणालाही  विकलं  जातंय  ;
           वापरून झालं कि ,
          पुन्हा कुठेही टाकलं जातंय !

           राज्यकर्ती जमात माउली ,
           आज  लाचारीच जिणं  जगतेय  ;
          देण्याची  दानत  ठेवणारी  ,
           आज  लाचार  होऊन  मागतेय !
   
          साधा भोळा समाज भरडला  जातोय
          काही  नसतानाहि  गुन्हा  ;
          प्रस्थापितांनीहि आरक्षणाचा ,
         मोडून ठेवलाय कणा ;
          शासनाचा  चालू  आहे  इथे  ,
         हुकूमशाही  बाणा ;
    हे माऊली ... प्रशासन  कसे असावे हे दाखवण्यासाठी तरी ,
          जन्म घे पुन्हा....जन्म घे  पुन्हा !

देवी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त विनम्र    अभिवादन!

                 कवी. राजु दादासाहेब झंजे
                       ९५९४८१५५८५

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची आज २९४ वी जयंती... ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या २९४ व्या जयंती निमित्त मानाचा जय मल्हार

       एक स्त्री असूनही तत्कालीन पुरूषप्रधान व्यवस्थेला चपराक देत सती प्रथेला न जुमानता एका हातात शास्त्र तर दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन भारताच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्षे राज्यकारभार करणाऱ्या प्रथम महिला राज्यकर्त्या, मायमाऊली अर्थातच लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना २९४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम...
       खरंतर जातीयवादी इतिहासकारांनी बहुजन समाजातील महापुरुषांचा इतिहास विकृत करून त्याचे विद्रुपीकरण केले असताना आमच्यातील विचारवंत मात्र त्यांच्या उपाधी बद्दल मतांतरे करत बसलेत हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. अशा उपाधींपेक्षा त्यांचे अफाट प्रशासकीय, राजकीय, सामाजिक तथा धार्मिक कार्य समाजासमोर यावे या विचाराचा मी असल्यामुळे त्या विचारवंतांच्या मतानुसार इतिहास गढूळ होणे हे असंभव आहे. उदा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना राष्ट्रमाता, लोकमाता, राजमाता, महाराणी, रणरागिणी, महापराक्रमी अशा कितीतरी बिरुदावल्या वापरल्या तरी त्या अहिल्याईंनी केलेल्या प्रजाहितदक्ष कार्य तथा राष्ट्रहिताच्या कार्यासमोर कमीच आहेत. 
        जगाच्या इतिहासात अहिल्याईंना एक उत्तम तथा आदर्श राज्यकर्ती, प्रशासनकर्ती म्हणून ओळखले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. "प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा" एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. म्हणूनच की काय ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महाराणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महाराणी मार्गारेट यांच्यापेक्षाही अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या या महापराक्रमी महिलेने घरात एकही कर्ता पुरूष नसताना जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. अर्थातच चक्रवर्ती सम्राट राजा अशोकाच्या स्वप्नातील 'राष्ट्र' घडवण्यासाठी त्यांनी आपले जीवन व्यतीत केले म्हणून खऱ्या अर्थाने अहिल्याई होळकर या राष्ट्रमाता या उपाधीस सार्थ ठरतात. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्र निर्माण करणाऱ्या 'राष्ट्रमाता' अहिल्याई होळकर होत. ज्याप्रमाणे महान राजाला 'महाराजा' म्हंटले जाते त्याचप्रमाणे प्रजेसाठी महान कार्य करणारी, विकासाचा डोंगर रचणारी 'युवराज' शूरवीर राजे खंडेराव होळकर यांची राणी म्हणजेच 'महाराणी'  अहिल्याई होळकर होत.
      अहिल्याईंच्या प्रशासनाचा तथा राज्यव्यवस्थेचा आदर्श ठेवून विलायती राष्ट्रं प्रगतीपथावर पोहचली मात्र अहिल्याईंना डोक्यात घेण्याऐवजी डोक्यावर घेतल्याने आणि अहिल्याईंचा इतिहास वाचण्यापेक्षा अहिल्याईंना नुसते पूजणाऱ्या आमच्या लोकांमुळे भारत नावाचा महा'राष्ट्र' अजूनही अधोगतीकडेच कूच करताना दिसतोय. लोक अहिंसावादी, शांतताप्रिय, प्रेमाची शिकवण देणाऱ्यांची पुजा करतात हे मान्य आहे तर मग महाभारतातील पांडव-कौरवांच्या महायुद्धात कुरूक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा आणि अर्जूनाचे मनोबल वाढवणारा श्री कृष्ण हा कोणत्या अहिंसेचे प्रतिक होता? अहिल्याई होळकर यांच्या उपाध्यांबद्दल चर्चा आणि संभ्रम निर्माण करण्यापेक्षा आजच्या प्रशासकीय तथा राजकीय व्यवस्थेला जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन धर्मनिरपेक्षतेपणे राज्यकारभार करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची दूरदृष्टी किती महत्वाची आहे यावरती कटाक्ष टाकला तर अहिल्याईंचे स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागणार नाही.
     अहिल्याईंनी दुष्काळ निर्मूलनासाठी त्यावेळी अनेक उपाय योजना केल्या होत्या. एकदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली तेव्हा अहिल्याईंनी भुकेने प्रजेचे हाल होत होते तेव्हा प्रजेच्या हाताला कामही मिळेल आणि दुष्काळावर मातही करता येईल म्हणून पाणी अडवण्यासाठी शेतांमध्ये बांध घालून घेतले होते. नद्यांवर बंधारे बांधले, याशिवाय धरणे, तलाव, शेततळी बांधून ठेवली होती, निसर्गचक्रात बाधा येऊ नये म्हणून त्यांनी ७/१२ पद्धतीने शेतकऱ्यांना झाडे लावण्यास प्रवृत्त केले शिवाय त्यामाध्यमातून सरकारी खात्यात महसूल देखील जमा होत असे.  अहिल्याईंच्या राज्यात प्रजा ही सुखी समाधानी तथा आनंदी होती. त्यांनी स्वतःच्या खाजगीतली रक्कम काढून अनेक विकास कामे केल्याने कोणत्याच गोष्टींची कमतरता नव्हती म्हणून त्यांना देवीचे स्थान दिले आहे. "पुण्यश्लोक" ही उपाधी त्याचेच एक द्योतक आहे.  गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्पाचा आरखडा बनवताना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अहिल्याईंच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. यावरूनच समजायला हवे की अहिल्याईंना देवी मानून नुसते नतमस्तक होण्यापेक्षा अहिल्याईंचे विचार मस्तकात घेऊन, समाजाने तथा आजच्या प्रशासनाने जर अहिल्याईंच्या विचारांचा, अहिल्याईंच्या प्रशासन व्यवस्थेचा अवलंब केला तर भारत देश हा नक्कीच पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत जगात अव्वल क्रमांकावर राहील.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
 📧nitinrajeanuse123@gmail.com

Wednesday, 29 May 2019

उठ धनगरा आतातरी जाग। ✍️नितीनराजे अनुसे


उठ धनगरा आतातरी जाग।
तूच आहेस रे खरा ढाण्या वाघ ।।
उसळत्या लाव्हारसाची तूच तप्त आग।
खूप झाला रे अत्याचार येवू दे आता राग ।।
उठ धनगरा आतातरी जाग ॥धृ॥
         लखलखत्या विजेचा तूच कडकडाट ।
         बेभान ढगांचा तूच रे गडगडाट।।
         अन्यायाच्या विरोधात दे रे आता आरोळी।
         अंगी शुरता सिंहाची फोड तू डरकाळी।।
         कसा झालास तू इतका षंढ? येवू दे आता राग।
         उठ धनगरा आतातरी जाग॥१॥
शञूवरची चाल तू।
निधड्या छातीची ढाल तू।।
अहिल्यामातेची तलवार तू।
तळपत्या तलवारीची धार ही तू।।
पेटू दे तुझ्या नसानसात आग।
उठ धनगरा आतातरी जाग॥२॥
         आठव तुझ्या पुर्वजांचा इतिहास ।
         रचली होती त्यांनी शत्रूंच्या देहांची रास।।
         मनगटाच्या जोरावर लढले ते बहाद्दर खास ।
         तलवारीला असायची शत्रूच्या रक्ताची आस।।
         नडणाऱ्यांना एकदाचेच तू बजावून सांग।
         उठ धनगरा आतातरी जाग॥३॥
जाण असुदे सदैव धनगरांच्या इतिहासाची।
जरातरी लाज राख रे सळसळत्या रक्ताची।।
क्षणमाञही नकोस करू तू विचार ।
उपस आता तू म्याणातील तलवार ।।
राजा आहेस ना तू तर राजासारखंच वाग ।
उठ धनगरा आतातरी जाग॥४॥
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
         ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
        +91 853 000 4123
📧 nitinrajeanuse123@gmail.com

Tuesday, 28 May 2019

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर (पुष्प चौथे) ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर

राज्यकारभार/सामाजिक कार्य/आर्थिक तथा सांस्कृतिक दूरदृष्टी
          माळवाधिपती थोरले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सून अहिल्याई होळकर यांस युद्धनीती सोबतच राजकारणाचे धडे देखील शिकवल्यामुळे तथा पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मालेराव यांच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली होती. पुरूषप्रधान मानसिकता असलेल्या काहींनी अहिल्याईंनी शासन करण्यास (राज्य कारभार करण्यास) माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले,  हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली, माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.
           भारतीय संस्कृती कोशात धार्मिक कार्याबद्दल अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे.
आर्थिक दूरदृष्टी:- भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात आजपर्यंत अहिल्याई होळकर एकमेव अशा राज्यकर्त्या होत्या की ज्यांना सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता. अहिल्याईंची दुरदृष्टी पाहिल्यावर व्यावसायिक क्षेत्रात देखील त्या काही कमी नव्हत्या कारण आर्थिक क्षेत्रात राज्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी सुरू केली होती.
सामाजिक कार्य : राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी अनेक जनविकासाची कामे अखंड भारतभर केली. अठराव्या शतकात अहिल्याईंचे तत्त्वज्ञान किती महान होते हे त्यांच्या त्यावेळच्या शासन काळावरून लक्षात येते. दारूमुळे कितीतरी संसार उध्वस्त होत असल्याने अहिल्याईंनी दारूबंदी केली शिवाय हुंडाबळी थांबवण्यासाठी हुंडा पद्धत बंद करण्यासाठी कडक कायदे करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर या पहिल्या राज्यकर्त्या होत्या. दुष्काळ परिस्थितीमुळे अन्नाशिवाय लोक भुकेने मरत होते तेव्हा त्यांच्या हाताला कामे देऊन अहिल्याईंनी दुष्काळाला आवाहन देण्यासाठी वायपट पाणी अडवून ठेवण्यासाठी शेतामध्ये बांध घातले, अनेक शेततळी, विहिरी, बारवे बांधून घेतले, वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जागोजागी पाणपोई बांधून घेतल्या शिवाय वाटसरूंची गैरसोय होऊ नये म्हणून धर्मशाळा उभारल्या अन्नछत्र सुरू केली . दुष्काळात पशूपक्षांसाठी धान्याच्या अनेक शेती मोकळ्या करून ठेवल्या होत्या. याव्यतिरिक्त अहिल्याईंनी जगातील पहिल्यांदाच न्यायव्यवस्था सुरू केली. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी त्या मंत्र्याला कडक शासन करून दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्याई होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला. अहिल्याईंच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर असे नाव दिलेले आहे एवढेच नव्हे तर इंदौर हवाई अड्ड्याला (विमानतळाला) सुद्धा अहिल्याई होळकर यांचे नाव मध्यप्रदेश सरकारने दिले आहे.
           भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (ब्रिटिश लेखक) 'माल्कम' यांच्या मतानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.
सांस्कृतिक ठेवा:-  राष्ट्रमाता अहिल्याईंचे सांस्कृतिक कार्य म्हणाल तर महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. सदरची संस्कृती आणि संगीत व कलेचा वारसा जतन करण्यात अहिल्याईंचे फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. 
          एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. पृथ्वीवरील ज्या पाच लोकांना "पुण्यश्लोक" ही उपाधी दिली त्यात अहिल्याई होळकर यांचेही नाव सन्मानाने घेतले जाते. तर राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी फक्त एकाच राज्यापुरते, एकाच जाती-धर्मापुरते काम केले नाही तर त्या पलीकडे जाऊन त्यांनी धर्मनिरपेक्षतेने अखंड भारतभर काम केले आहे. प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महारानी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महारानी मार्गारेट यांच्यापेक्षा अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या राष्ट्रमातेने जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्रमाता रणरागिणी महाराणी अहिल्याई होळकर होत.
     राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी इंदौर राज्याव्यतिरीक्त काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तर गुजरात पासून आसाम पर्यंत विकासाचा अफाट डोंगर रचून ठेवला आहे. काही इतिहासकार, संशोधक, होळकरशाहीचे अभ्यासक त्यावरती संशोधन करत आहेत तथा समाजातील युवक-युवतींनी पुढे येऊन संशोधन करावे त्यामुळे येणाऱ्या काळात नव्याने काही घटनांची भर इतिहासात पडेल...
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Sunday, 26 May 2019

माळवाधिपती थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर ✍️नितीनराजे अनुसे

माळवाधिपती थोरले श्रीमंत राजे मल्हारराव होळकर


#होळकरशाहीची_स्थापना
दि.२६ मे १७२९
    मराठेशाहीचा इतिहास म्हणजे खरंतर ती एक अंधाधुंदीच होती. त्या अंधाधुंदीच्या काळात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात होता हे कळायलाच मार्ग नव्हता. तमाम मराठ्यांचीच काय तर अखंड हिंदूस्थानातील राजा-महाराजांची देखील हीच अवस्था होती. परंतु हिंदूस्थानातील काही राजांनी केवळ स्वतःचेच राज्य न पाहता राष्ट्रप्रेमाने जो काही अद्भूत इतिहास रचला त्याला मुळात तोडच नव्हती. परंतु जातीयवादाच्या आणि श्रेयवादाच्या नादात "ज्याच्या हाती ससा तोच पारधी" अशा प्रचलित म्हणीप्रमाणे शिकल्या सवरलेल्या जातीयवादी इतिहासकारांनी मातृभूमीतीलच महापराक्रमी योद्ध्यांना उपेक्षित ठेवले त्यातीलच एक म्हणजेच अटकेपार झेंडे फडकवणारे तथा छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेले स्वराज्य अबाधित राखणारे स्वबळावर आपले स्वराज्य उभा करणारे माळवाधिपती होळकरशाहीचे संस्थापक थोरले श्रीमंत राजे मल्हारराव होळकर.
            स्वताची स्वतंत्र फौज उभा करून आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर मल्हाररावांनी माळवा प्रांतांत स्वताच्या हिंमतीवर आणि स्वकर्तृत्वावर अनेक लढाया गाजवल्या बड्या बड्या शत्रुंना मल्हाररावांनी तलवारींचे पाणी पाजले हे पाहून बाळाजी विश्वनाथांनी (पेशव्यांनी) मल्हाररावांशी तह करून माळवा प्रांतांची जबाबदारी सोपवली. त्याचे कारण असे होते की दयाबहादूर हा एकेकाळी माळव्याचा सुभेदार असताना शेतकरी रयतेस नाहक त्रास देत असे दयाबहादूर व त्याच्या हाताखालचे मुनीम शेतकऱ्यांना रयतेला पिळत होते. तेव्हा मराठ्यांना बोलवले तर ते प्रजेची मदत करतील असा सल्ला जयपूरच्या राजाने दिल्यावर माळवा प्रांतात उतरून धारजवळील तिर येथे मल्हाररावांनी फौजेसरशी लढाईला आलेल्या दयाबहादूराचा सामना करत त्याला आस्मान दाखवले व माळवा प्रांत हस्तगत केला त्यांच्या शौर्याची दखल घेत बाजीराव पेशव्यांनी २६ मे १७२९ ला त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. तोच आजचा हा गौरवशाली दिवस त्याला २९० वर्षे पूर्ण झालीत आणि तोच होळकरशाहीचा गौरवशाली तथा जाज्वल्य इतिहास आज इतिहासाच्या पानावरती सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलाय.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Monday, 20 May 2019

आज स्मृतीदिन मुत्सद्दी तथा धुरंधर योद्ध्याचा... ✍️नितीनराजे अनुसे

माळवाधिपती श्रीमंत थोरले मल्हारराव होळकर

         सळसळत्या रक्ताच्या आणि मनगटाच्या जोरावर तसेच धारदार तलवारीच्या टोकावर दुश्मनांना तोलून टाकणाऱ्या, स्वकर्तृत्वावर आणि स्वबळावर स्वतःचे साम्राज्य उभे करत करत मराठ्यांचे साम्राज्य अबाधित राखणाऱ्या आणि अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या रणमर्दाचा अर्थातच थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांचा आज स्मृतीदिन त्यानिमीत्त माळवाधिपती सुभेदार थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मानाचा जय मल्हार कोटी कोटी प्रणाम. घोड्यांच्या टापांनी अख्खा हिंदूस्तान ढवळून काढणाऱ्या मल्हाररावांना युद्धतंञात पारंगत असलेला एक धुरंदर लढवय्या म्हणून ओळखले जाते ते त्यांच्या अंगी असलेल्या कुशल "मल्हारतंत्र" आणि "मल्हारनीती"मुळेच...
                एके दिवशी मामाच्या मेंढ्या चारायला घेऊन गेल्यानंतर मल्हाररावांनी पाहिले की मामाच्या शेतामधून सजवलेल्या अंबारीचे हत्ती, घोडे सैनिक शेतातील पिकाची नासधूस करत पिक तुडवत चालले होते तेव्हा त्यांनी त्याच रानातील एक ढेकुळ उचलला तो सरळ सजवलेल्या हत्तीवर अंबारीत बसलेल्या पेशव्याच्या पाठीत मारला. धनगरांच पोर ते रक्तातच धनगरी बाणा जसाच्या तसाच.... डोळ्यात निखारा जसाच्या तसाच....  निर्भिडही तेवढाच.... मल्हारवांनी पेशव्यांस ढेकुळ मारला तसे सर्वजण अवाक् झाले एवढी हिम्मत झाली तरी कोणाची? असा प्रश्न पेशव्यांच्या सरदारांना पडला, पेशव्याचे काही सैनिक मल्हाररावांकडे धावून गेले पण त्या धनगराच्या पोराचे धाडस पाहून पेशवा देखिल हडबडून गेला होता. त्याचे हे धाडस पाहून त्याला सरदार बारगळांनी स्वताच्या सेवेत सामिल करून घेतले ती टोळी होती दाभाड्यांच्या कंठाजी कदमबांडेंची आणि तेथूनच शिपाईगिरी करत असतानाच स्वताची स्वतंत्र फौज उभा करून आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर मल्हाररावांनी माळवा प्रांतांत स्वताच्या हिंमतीवर आणि स्वकर्तृत्वावर अनेक लढाया गाजवल्या बड्या बड्या शत्रुंना मल्हाररावांनी तलवारींचे पाणी पाजले हे पाहून बाळाजी विश्वनाथांनी (पेशव्यांनी) मल्हाररावांशी तह करून माळवा प्रांतांची जबाबदारी सोपवली. त्याचे कारण असे होते की दयाबहादूर हा एकेकाळी माळव्याचा सुभेदार असताना शेतकरी रयतेस नाहक त्रास देत असे दयाबहादूर व त्याच्या हाताखालचे मुनीम शेतकऱ्यांना रयतेला पिळत होते. तेव्हा मराठ्यांना बोलवले तर ते प्रजेची मदत करतील असा सल्ला जयपूरच्या राजाने दिल्यावर माळवा प्रांतात उतरून धारजवळील तिर येथे मल्हाररावांनी फौजेसरशी लढाईला आलेल्या दयाबहादूराला मारून माळवा प्रांत हस्तगत केला त्यांच्या शौर्याची दखल घेत बाजीराव पेशव्यांनी २६ मे १७२९ ला त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. अशा प्रकारे एक धनगरांचे पोर काठीने मेंढ्या हाकता हाकता स्वराज्यासाठी तलवारीने शत्रुंना कधी हाकू लागले तेच समजले नाही.
          मल्हार आया मल्हार आया म्हटलं तरी उत्तर भारतालाच नव्हे तर अफगाणिस्तानच्या अब्दालीला देखील कापरं भरायचं. मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापांचे जरी आवाज ऐकायला आले तरी कित्येक गावंच्या गावं ओस पडायची हीच त्यांची धमक होती अन् हाच त्यांचा दरारा. आजही उत्तर भारतीयांच्या कानात मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापाचे आणि येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजराचे आवाज निनादत असतील... लढाईत सर्वात पुढे राहून राहून, सैन्यांचे नेतृत्व करून मुसंडी मारत शत्रुंना वायूवेगाने कापत सुटणाऱ्या मल्हाररावांचा दबदबा एवढा होता की शत्रुपुढे "मल्हार" जरी नाव उच्चारले तरी त्यांची पळता भुई थोडी व्हायची. मल्हाररावांचा स्वभाव जितका प्रेमळ होता तितकाच राकटसुद्धा. एकदा कुंभेरीच्या लढ्यामध्ये सुरजमल जाटाने किल्ल्याला वेढा घातला होता मल्हाररावांचे सुपुत्र शुरवीर खंडेराव होळकर माचावर लढत सैन्यांचे नेतृत्व करत शत्रुंना तोंड देत होते इतक्यात सुरजमल जाटाकडून जेजाल्याचा गोळा आला आणि खंडेरावांच्या छाताडावर आदळला , खंडेराव धारातीर्थी कोसळले. स्वतःच्या मुलाला डोळ्यासमोर ठार केलेलं पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली नसानसात रक्त सळसळू लागले डोळे लालबुंद झाले हाताच्या मुठी आवळल्या गेल्या अन् त्यांनी मल्हारी मार्तंडाची शपथ घेतली की या सुरजमल जाटाचा शिरच्छेद करून, कुंभेरीची माती खणून यमूनेत टाकेन तरच दक्षिणेला (महाराष्ट्रात) परत जाइन. पण भयभीत झालेल्या सुरजमल जाटाला काय करावे सुचत नव्हते तेवढ्यात सुरजमल जाटाची पत्नी हंसिका हिने जयाप्पा शिंद्यांशी बोलणी करून सुरजमल जाटाचा पेशव्यांसोबत सुलुख घडवून आणला. तेव्हापासूनच मल्हाररावांचा  पेशव्यांवरील अन् पेशव्यांचे हुजरे असलेल्या शिंद्यावरील विश्वास उडाला होता त्याचा प्रत्यय १७ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणि १८ व्या शतकाच्या पहिल्या दशकात येतो जेव्हा महाराजाधिराज शुरवीर योद्धा यशवंतराव होळकर राष्ट्रासाठी स्वतंत्रपणे इंग्रजांशी झुंज देत होते तेव्हा पेशवे आणि शिंदे हे दोन्ही होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी खटाटोप करत होते. एवढेच नव्हे तर यशवंतराव पुण्यावर चालून आले तेव्हा शेपटी गुंडाळून पळपुटा पेशवा जेव्हा कोकणात पळून गेला आणि कोकणातून पत्रव्यवहार करून त्यांनी यशवंतराव होळकरांना सांगितले होते की होळकरांचं राज्य या राष्ट्राच्या मातीवरती अन्याय व अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश सरकारकडे विलीन करावं. याचाच अर्थ मल्हाररावांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली ती म्हणजे "एकवेळ दुश्मनांवरती विश्वास ठेवला तरी चालेल पण पाठीत खंजीर खूपसणाऱ्या शिंद्यांवरती अन् पेशव्यांवरती कधीच विश्वास ठेवायचा नाही". सांगायचा मथित अर्थ एवढाच की आजही आम्ही विनाकारण शेंडीने गळा कापणाऱ्या मॉडर्न पेशव्यांच्या आहारी जाऊन समाजाचे आणि परिणामी देशाचे वाटोळे करून घेतोय हे आम्हाला अजूनही कळत नाही आणि कळले तर वळत नाही.
         पानीपत युद्धाच्या संदर्भात आजही लोकांमध्ये संभ्रम आहे तो म्हणजे जातीयवादी इतिहासकारांनी मल्हारराव होळकर यांच्यावर केलेले खोटे आरोप. पानीपतच्या युद्धात शेवटपर्यंत मल्हारराव होळकर प्राणपणाने लढल्याचे पुरावे संशोधनातून पुढे आले आहेत. पानीपत मध्ये होळकरांची फौज अब्दालीच्या सैन्याशी अगदी चुरशीने आणि शेवटपर्यंत लढल्याचे दाखले असताना काही मराठी तर काही अमराठी इतिहासकारांनी मुत्सद्दी लढवय्या यांच्यावर आरोप करत पानीपतच्या पराभवाचे खापर फोडून मराठ्यांच्या इतिहासाचा एकप्रकारे विपर्यास केला आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत मल्हारराव होळकर हे मराठ्यांचे स्वराज्य अबाधित राखण्यासाठी लढत राहिले झुंजत राहिले परंतु एक हत्या की मृत्यू याचे गुढ आजही उकलले नाहीच अशा मुत्सद्दी योद्ध्याने २० मे १७६६ आपल्या प्राणांची आहुती दिली. आज दि.२० मे सतराव्या शतकात आजच्या पाकिस्तानमधील अटकेपार मराठेशाहीचा  झेंडा डौलाने फडकवणाऱ्या रणझुंजार रणमर्दाचा आज २५३ वा स्मृतीदिन त्यानिमीत्त थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा विनम्र जय मल्हार🙏
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
         ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
https://nitinrajeanuse123.blogspot.com