Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 28 May 2019

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर (पुष्प चौथे) ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर

राज्यकारभार/सामाजिक कार्य/आर्थिक तथा सांस्कृतिक दूरदृष्टी
          माळवाधिपती थोरले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांनी सून अहिल्याई होळकर यांस युद्धनीती सोबतच राजकारणाचे धडे देखील शिकवल्यामुळे तथा पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मालेराव यांच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली होती. पुरूषप्रधान मानसिकता असलेल्या काहींनी अहिल्याईंनी शासन करण्यास (राज्य कारभार करण्यास) माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले,  हिंदूमंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली, माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.
           भारतीय संस्कृती कोशात धार्मिक कार्याबद्दल अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे-काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे.
आर्थिक दूरदृष्टी:- भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात आजपर्यंत अहिल्याई होळकर एकमेव अशा राज्यकर्त्या होत्या की ज्यांना सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता. अहिल्याईंची दुरदृष्टी पाहिल्यावर व्यावसायिक क्षेत्रात देखील त्या काही कमी नव्हत्या कारण आर्थिक क्षेत्रात राज्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी म्हणून त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी सुरू केली होती.
सामाजिक कार्य : राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी अनेक जनविकासाची कामे अखंड भारतभर केली. अठराव्या शतकात अहिल्याईंचे तत्त्वज्ञान किती महान होते हे त्यांच्या त्यावेळच्या शासन काळावरून लक्षात येते. दारूमुळे कितीतरी संसार उध्वस्त होत असल्याने अहिल्याईंनी दारूबंदी केली शिवाय हुंडाबळी थांबवण्यासाठी हुंडा पद्धत बंद करण्यासाठी कडक कायदे करणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर या पहिल्या राज्यकर्त्या होत्या. दुष्काळ परिस्थितीमुळे अन्नाशिवाय लोक भुकेने मरत होते तेव्हा त्यांच्या हाताला कामे देऊन अहिल्याईंनी दुष्काळाला आवाहन देण्यासाठी वायपट पाणी अडवून ठेवण्यासाठी शेतामध्ये बांध घातले, अनेक शेततळी, विहिरी, बारवे बांधून घेतले, वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जागोजागी पाणपोई बांधून घेतल्या शिवाय वाटसरूंची गैरसोय होऊ नये म्हणून धर्मशाळा उभारल्या अन्नछत्र सुरू केली . दुष्काळात पशूपक्षांसाठी धान्याच्या अनेक शेती मोकळ्या करून ठेवल्या होत्या. याव्यतिरिक्त अहिल्याईंनी जगातील पहिल्यांदाच न्यायव्यवस्था सुरू केली. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी त्या मंत्र्याला कडक शासन करून दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्याई होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला. अहिल्याईंच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास अहिल्याबाई होळकर असे नाव दिलेले आहे एवढेच नव्हे तर इंदौर हवाई अड्ड्याला (विमानतळाला) सुद्धा अहिल्याई होळकर यांचे नाव मध्यप्रदेश सरकारने दिले आहे.
           भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (ब्रिटिश लेखक) 'माल्कम' यांच्या मतानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.
सांस्कृतिक ठेवा:-  राष्ट्रमाता अहिल्याईंचे सांस्कृतिक कार्य म्हणाल तर महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. सदरची संस्कृती आणि संगीत व कलेचा वारसा जतन करण्यात अहिल्याईंचे फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. 
          एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. पृथ्वीवरील ज्या पाच लोकांना "पुण्यश्लोक" ही उपाधी दिली त्यात अहिल्याई होळकर यांचेही नाव सन्मानाने घेतले जाते. तर राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी फक्त एकाच राज्यापुरते, एकाच जाती-धर्मापुरते काम केले नाही तर त्या पलीकडे जाऊन त्यांनी धर्मनिरपेक्षतेने अखंड भारतभर काम केले आहे. प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महारानी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महारानी मार्गारेट यांच्यापेक्षा अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या राष्ट्रमातेने जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्रमाता रणरागिणी महाराणी अहिल्याई होळकर होत.
     राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी इंदौर राज्याव्यतिरीक्त काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तर गुजरात पासून आसाम पर्यंत विकासाचा अफाट डोंगर रचून ठेवला आहे. काही इतिहासकार, संशोधक, होळकरशाहीचे अभ्यासक त्यावरती संशोधन करत आहेत तथा समाजातील युवक-युवतींनी पुढे येऊन संशोधन करावे त्यामुळे येणाऱ्या काळात नव्याने काही घटनांची भर इतिहासात पडेल...
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

No comments:

Post a Comment