Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday, 23 May 2015

आमच्या पाचवीलाच पुजलेली "भटकंती" : नितीनराजे अनुसे


          धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणी वरती अजूनही भिजत घोंगडे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच १९५० साली राज्यघटनेत धनगर(धनगड) समाजासाठी अनुसुचित जाती मध्ये कलम ३४२ मध्ये तरदूत करून सुद्धा धनगर समाज आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाही असे बोंबलणार्यांनी खरंच याचा अभ्यास केला आहे का? की कोणाच्या तरी सांगण्यावरतून फालतू बडबड करत बसले आहात??"
मुंबई-पुणे यांसारख्या शहरातील दोन-चार कुटूंबांचा सर्वे केला म्हणजे धनगर समाज आदीवासी असल्याचे निकष पूर्ण करत नाही. धनगर समाजाला ST आरक्षणाची गरज नाही. असे खोटे अहवाल सादर करून ST आरक्षणासाठी आडकाठी आणण्याचे असले तुमचे उद्योगधंदे बंद करा. हजारो वर्षांपासून जंगलामध्ये वास्तव्य करून रानावनात दरी-खोर्यांत ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता पायांच्या नडग्या वाळेपर्यंत शेळ्या-मेंढ्या राखणार्या खेड्या-पाड्यातील वाड्या -वस्त्यांवरील माझ्या धनगर समाजाचा सर्वे करून बघा मग तुम्हाला कळेल की धनगर समाज कुठे राहतो आणि कसा जगतो ते...
         शेळ्या-मेंढ्यांच्या राखणीसाठी आणि त्यांच्या जडणघडणीसाठी पुरक असे वातावरण मिळावे म्हणून भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन धनगर समाज बांधव शहरांपासून दूर वाड्या-वस्त्यांवरती वास्तव्य करून आपल्या पोटाची खळगी भरू लागले. यासाठी विशेषता धनगर समाजबांधवांनी दलदलीचा भाग सोडून माळरानांचा अवलंब केला जेणेकरुन दलदलीसारख्या ठिकाणी मेंढ्यांच्या नख्यामध्ये चिखल (Mud) जर अडकला तर शेळ्या-मेंढ्यांच्या नख्या सडतात तसेच अन्य रोग उद्भवतात म्हणूनच धनगर समाज माळरानांवरती विसावला आहे. पण शेळ्या-मेंढ्यांसाठी माळरानाची निवड केल्याने निसर्गाच्या बदलत्या अवतारामुळे तिथे मुबलक प्रमाणात चारा आणि पाणी मिळू शकले नाही म्हणून धनगर समाजाला "भटकंती"साठी स्वतःचं घरदार आणि गाव सोडून या गावावरुन त्या गावी जाण्याचा अजूनही आणि आजही प्रवास करावा लागतोय म्हणजेच  हे जणू काय आमच्या पाचवीलाच पुजले आहे.
         आमची भटकंती कधी जवळून पाहिलीत का?" आमच्या भावना कधी समजून घेतलेत का? आमच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून आमच्यावर अन्याय करताना मागचा पुढचा कधी विचार केलात का??? पोटाची खळगी भरण्यासाठी ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता उपाशी-तापाशी शेळ्या-मेंढ्यामागे उभी ठाकणारी आमची जमात. टीचभर पोट भरण्यासाठी जीवनासोबत आयुष्याचा जुगार खेळावा असंच धनगर समाजाचं जगणं, निम्म्याहून अधिक आयुष्याचा संसार घोड्याच्या पाठीवर लादून आज इथे तर उद्या तिथे असंच जगणं आमच्या वाट्याला आले आहे आणि आजही तिच परिस्थिति असताना खोटे अहवाल सादर करून आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवलं जातंय. कपाळी भंडारा लेवून रानोमाळी भटकत पोरा-लेकरांचं आणि करडा-कोकर्यांचं लटांबणं सोबत घेवून जगताना समोरच्या परिस्थितिवर मात करून जीवन जगताना नाकी नऊ येतो. घोड्याच्या पाठीवर लादलेल्या माचोळीवर नुसतं धान्यच नव्हे तर अर्ध्या आयुष्याचा अख्खा संसार रचलेला असतो, माचोळीच्या बाजूला टांगलेल्या पिशव्यांमध्ये कोकरी करडं हिंदकळत असतात तर माचोळीवरती बांधलेल्या कोंबड्या आणि पाण्यासाठी भली मोठी घागर घोड्याच्या पाठीवर लटकत असते. त्याचप्रमाणे भल्यामोठ्या पाठीमध्ये संसारोपयोगी साहित्य म्हणजे पोटाची आग विझवण्यासाठी थोडीसीच पण गरजेपुरती भांडी-कुंडी डोक्यावरती घेवून मेंढकीण झपाझप पाऊले टाकत या गावावरुन त्या गावाला असा मेंढक्यासोबत प्रवास करत तीन दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करून पोटाची भुख भागवावी लागते ते पण रोजच आणि प्रवास सुद्धा  रोजचाच तसेच जीवनाचा संसार ज्या घोड्याच्या पाठीवरती लादला जातो त्या घोड्याची लगाम माझ्या चिमुरड्या भावंडांच्या हातात असते, अनवानी पायाची, आईबापासोबत भटकंती करणं लहाणपणापासूनच आमच्याच वाट्याला का??? त्या शेळ्या-मेंढ्या आणि घोड्यासोबत प्रवास करणार्या माझ्या चिमुरड्या भावंडांना शिक्षणापासून देखिल वंचित रहावं लागतं मग भारत सरकार तर्फे ६-१४ वयोगटातल्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जात असेल तर त्याचा माझ्या धनगर समाजाला काय फायदा?? होस्टेल्स आणि बोर्डिंग आमच्या सारख्याच भटकंती करणार्यांच्या मुला-मुलींसाठी आहेत काय?? मग तुमची मुलं मुली फुल्ल सेक्यूरिटी असलेल्या आणि फुल्ल एसी असलेल्या आलिशान गाड्यांत आणि बंगल्यात राहतात मग आमच्या सारख्या आयुष्यभर भटकंती करणार्या समाजबांधवांनी नक्की काय पाप केलंय???
          आमच्या समाजातील लहान मुले आई-वडिलांसोबत घोड्याचा लगाम धरून वनवन फिरतात याचा कोणीच कसा काय विचार करत नाही?? पुरावे पाहिजे असतील तर  nitinrajeanuse123.blogspot.com ला भेट द्या मग वास्तव समजेल तुम्हाला.. असं आमचं जगणं आदिवासी सारखं नव्हे त्यांच्यापेक्षाही अतिशय हालाकीचं जगणं असताना आमच्या हक्काच्या ST आरक्षणावरती गदा आणायचा प्रकार कुठपर्यंत चालणार??
         परवा मी एका मेंढ्याच्या कळपाजवळ जाऊन फोटो घेण्यासंबधी  विनंती केली तेव्हा त्या अशिक्षित मेंढक्याच्या तोंडून ऐकलेलं वाक्य हृदयावरती घाव घालण्यासारखं आहे. फोटो कशाला काढताय??? यावरती मी सांगितले की आपल्या समाजाला ST आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्हाला धनगर समाजाच्या भटकंतीवरतीच्या फोटोंचे प्रेजेंटेशन सादर करायचे आहे. हे सांगितल्यानंतर त्या युवकानं विचारलेला प्रश्न तो असा की "आरक्षण म्हंजी काय असतं? ते भेटल्यावर आपल्याला काय फायदा व्हल का??"  याचा अर्थ असा होतो की आमचा धनगर समाज अजूनही अज्ञान आणि अशिक्षित आहे. यातून मला सांगायचा मुद्दा असा की सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या माझ्या धनगर समाजाला ST आरक्षणाच्या अंमलबजावणीपासून का वंचित ठेवलं जातंय??? आणि हे कुठपर्यंत??? आज आमच्या धनगर समाजाची हजारो पोरं IAS/IPS बनण्यापासून वंचित राहिली त्याला जबाबदार कोण?? त्यासाठी आपलीच माणसं विधानभवनात आणि संसदभवनात पाठवा ज्यांच्यामुळे धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी कायदे बनवले जातील. त्यामुळे आपल्यांचे दु:ख काय असते ते फक्त आपल्यानाच कळते इतरांना नाही.
जय मल्हार। जय अहिल्या।। जय यशवंतराजे
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१८५३०००४१२३
 nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................

No comments:

Post a Comment