Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Sunday, 13 December 2015

आश्वासन मुख्यमंत्र्याचे पण नुकसान समाजाचे...


आरक्षणाचे नाव काढले की माझ्या तळपायाची आग अगदी मस्तकापर्यंत जाते अशीच अवस्था झाली आहे. आम्ही नक्की आमचे हक्क मागतोय की भिक मागतोय तेच आम्हाला कळेना आणि नेत्यांनाही समजेना. ज्याने त्याने उठायचे मोर्चे काढायचे आपल्या पाठीमागे कीती समाजबांधव आहे याचे शक्तिप्रदर्शन करायचे अन् मंत्र्यांना संत्र्यांना निवेदन द्यायचे त्या त्या सत्तापिपासू लोकांकडून आश्वासन घेतले की मोर्चा संपला असे जाहिर करत घराकडच्या दिशेने बोंबलत सुटायचे हेच आजपर्यंत चालत आले आहे यात वेगळे असे काहीच नाही.
आरक्षण अंमलबजावणीसाठी मोर्चे आंदोलने करणार्यांना मी विरोध करतोय अशातला विषय नाही तर राज्यघटनेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनादत्त अधिकार मिळवण्यासाठी धनगर  समाजाला ६५ वर्षानंतरही संघर्षच करावा लागतोय याचे दुख वाटते. आज स्व.बी.के.कोकरे साहेबांची खरोखरच खूप आठवण येते कारण तोच झंजावात जर आज असता तर आम्हाला भिक मागायची वेळ आलीच नसती हे शतप्रतिशत सत्य आहे आणि कोणीही नाकारू शकत नाही. १९८९ साली खंबाटकीच्या  घाटात लाखो यशवंत सैनिकांसोबत तीव्र रास्तारोखो आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांना याची दखल घ्यावी लागली आणि अनुसुचित जमातीच्या अंमलबजावणीची मागणी असताना पवारांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवत अज्ञानी नेत्यांना सोबत घेऊन धनगर समाजाला फक्त महाराष्ट्र राज्यापुरतंच भटक्या जमाती (क) NT-C मध्ये घातलं. पण केंद्रामध्ये असलेलं हक्काचं आरक्षण जाणूनबुजून डावलले गेले कारण धनगर समाजातील पोरं शिकली सवरली, आइ ए एस, आइ पी एस झाली तर भारताचं प्रशासन धनगर समाजातील पोरांच्या हातात जाईल या भीतीने वक्रतुंडाने खेळ मांडला आणि धनगर समाजातील लाखो युवकांना याचा फटका बसला.
२०१३ पासून पुन्हा नव्याने आरक्षण अंमलबजावणीसाठीची चळवळ महाराष्ट्रात पुन्हा थैमाण घालू लागली मग डिसेंबर २०१३ चे नागपूर अधिवेशन असो, १५-२१ जुलै २०१४ दरम्याणची पंढरपूर-बारामती आरक्षण दींडी आणि तद्नंतर ५-६ लाख समाजबांधवांचा बारामती येथिल ठिय्या आणि ९ दिवसाचे आमरण उपोषण, महाराष्ट्र राज्यभर आयोजित केलेला चक्काजाम, रास्तारोखो, तहसिल/जिल्हाधिकारी कार्यालयावरील आंदोलने मोर्चे, मुंबई मधील १ अॉगस्ट रोजीचा आझाद मैदानवरचा मोर्चा, १४ अॉगस्ट २०१४ रोजी धनहर समाजबांधवांनी केलेला रेल्वे रोखो, ४ जानेवारी २०१५ ची धनगर परिषद, २३ मार्च चा मोर्चा, ९ जुलै रोजी सर्व आमदारांना  व १५ जुलैला सर्व सर्व तहसिल/जिल्हाधिकार्यांना दिलेले निवेदन त्याचप्रमाणे १५ जुलै रोजी मंत्रालयासमोर गांधीगीरी मार्गाने केलेले आंदोलन. २१ जुलै चा बारामती येथील प्रेरणा दिवस आणि त्यानंतर ८ व १० डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावरील मोर्चा. अजून कीती मोर्चे काढायचे?? अजून कीती आंदोलने करायची?? तळहातावरती पोट भरणारे धनगर समाजबांधव उन वारा पाउसाचा विचार न करता आरक्षणाची अंमलबजावणी होईल माझ्या पोराला/पोरीला चांगलं शिक्षण देईल, समाजाला पुरेसा निधी मिळेल, मुलं/मुली शिकली सवरली तर आइ ए एस, आइ पी एस होतील डॉक्टर, इंजीनीयर होतील, यापेक्षा धनगर समाजालाच राजकीय क्षेत्रात आरक्षणामुळे संधी मिळेल व समाजाची प्रगती होईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी समाजव्यवस्थेतील समानता आणि डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांचे महासत्ता देश बनण्याचे स्वप्न साकार होईल या अनुषंगाने पोटात अन्नाचा कण नसताना नागपूरच्या त्या स्टेडियममध्ये कडाक्याच्या थंडीत कुडकुडत आरक्षणाची अंमलबजावणी होईल म्हणून चातकासारखी वाट पाहणार्या माझ्या समाजबांधवांवरती शेवटी आश्वासनांचीच टांगती तलवार आली.
सरकार आल्यावर १० दिवसात देतो, १५ दिवसात निर्णय घेतो, अजून अभ्यास करतोय आणि आज चक्क ९ महिन्याने निर्णय घेतो म्हणजे बाळंतपण करायचा विचार आहे की काय यांचा? स्वार्थी विचाराने बरबटलेले आरक्षणाचे श्रेय लाटण्यासाठी खटाटोप करणारे आमचे नेते जर शहाणे असते तर १० दिवसाचा १५ दिवसाचा जाब विचारला असता पण त्यांना समाजाशी आणि आरक्षण अंमलबजावणीशी काहीही घेणेदेणे नाही. पुन्हा ९ महिन्याची वाट बघायची का? TISS चे अहवाल नक्की काय सांगतील?? TISS वाले पुणे-मुंबई सारख्या ठिकाणच्या धनगर बांधवांचा सर्वे करून अहवाल सादर करणार की पोटाची खळगी भरण्यासाठी रानोमाळी, डोंगरदरीतून उन वारा पाउसाचा विचार न करता पायाच्या नडग्या वाळेपर्यंत मेंढ्यांची राखण करणार्या धनगर समाजाचा सर्वे करणार?? असे असंख्य प्रश्न सर्वसामान्य समाजबांधवांच्या डोक्यात गोंधळ करून बसलेत. जिथं अन्याय दिसेल तिथे लाथ मारणार्या राजामहाराजांच्या समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी आज मुकाटपणे अन्याय सहन करतोय याचीच खंत वाटतेय. आश्वासनांवरती आश्वासने देऊन धनगर समाजाची चक्क दिशाभूल केली जात आहे हे नेत्यांच्या ध्यानीमनी येत नाही प्रत्येकजण स्वार्थाने बरबटलेल्या विचारांची पेरण करत बसतोय मग बुद्धीजीवी वर्गाने नेमकी कोणती भुमिका घ्यावी यातच सगळा राडा होतोय आणि मग प्रस्थापितांचे फावतेय. सुशिक्षीत अर्थात शिकला सवरलेला धनगर समाजबांधव बिनढोक नेत्यांची ओझी वाहत बसल्यामुळे धनगर समाज अजूनही अंज्ञानाच्या खाईत ढकलला जातोय. त्यासाठी सुशिक्षीत सुज्ञान युवा वर्गाने समाजाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी.

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment