Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Saturday, 28 September 2019

समाजाबरोबरच धनगर नेत्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करावे ✍️नितीनराजे अनुसे




         भारत देश हा खरंतर लोकशाही प्रदान देश असून इथे प्रत्येकाला सरकारविरोधात न्यायासाठी आवाज उठवण्याचा, अन्यायाविरुद्ध लिहण्याचा आणि बोलण्याचा देखील अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत दिला आहे. गेल्या ७२ वर्षांपासून धनगर समाज आपल्या न्याय व हक्कासाठी लढतोय झगडतोय, संघर्ष करतोय पण सत्ताधाऱ्यांना याचे काहीच सोयरसुतक नाही. आजच्या या संघ पुरस्कृत हिटलरशाहीत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल असे मला तरी वाटत नाही.... असो.
          एकेकाळी राजा समाज असणारी ही जमात आज गुलामगीरीचं जगणं जगत आहे. मनगटाच्या जोरावर अन् तलवारीच्या धारेवर या मातीवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या चारी मुंड्या चित करणाऱ्या थोर महापुरुषांच्या जमातीत जन्माला आलेल्या औलादी आज आपला दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहास विसरून निमूटपणे अन्याय सहन करत बसले आहेत. इथे मेंढपाळांवरती अन्याय होतोय, समाजातील माता-भगिनींवर अन्याय अत्याचार होतोय, समाजातील विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय हे सांगायचे कोणाला आणि बोलायचे तरी कोणाला? धनगर समाजातील नेते मात्र स्वार्थासाठी समाजाला प्रस्थापितांंच्या दावणीला बांधायचे काम करताहेत मग तिथे कोणीही असो... सत्तेमध्ये असलेले आणि नसलेले देखील सर्व सारखेच, सर्वजण एकाच माळेचे मणी.
        घशात घातलेली चराऊ कुरणे, गायरानं मेंढपाळांसाठी सरकारने मोकळी केली असती तर रोज मेंढपाळांना भटकंती करावी लागली नसती ना कोणा शेतकऱ्यांचा मार खावा लागला असता. अन् नाही समाजातील माता-भगिनी वासनाधीन लांडग्यांच्या शिकार बनल्या असत्या. मेंढपाळांची भटकंती थांबली असती तर मेंढपाळांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची वाताहत झालीच नसती. मेंढपाळांना पुढे करून त्यांच्याच जीवावर आणि आरक्षण प्रश्नावर राजकारण करणारे आणि करू पाहणारे आज कुठेतरी प्रस्थापितांच्या ताटाखालचे मांजर होऊन बसलेत असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात धनगर समाजाचे दोन दोन मंत्री असताना देखील समाजाचे प्रश्न सुटत नसतील तर लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. नुसत्या योजना जाहीर केल्या परंतु त्या किती धनगर बांधवांपर्यंत पोहचल्या अथवा किती धनगरांना त्याचा लाभ झाला? सत्ताधारी पक्षाची आणि प्रस्थापित नेत्यांची धोतरं सांभाळण्यासाठी दाखवलेल्या गाजराच्या (१००० कोटी रुपये आणि त्या घोषित केलेल्या २२ योजनांच्या) जाहिराती सोशल मिडियावरून चांगल्याच प्रकाशित झाल्या आणि त्यांचा प्रचार सुद्धा झाला पण त्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रशासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवता झिजवता पायातील पायथान कधी झिजले ते माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला कळलेच नाही. परंतु तेच पायथान हातात घेऊन प्रस्थापितांच्या आणि त्या प्रस्थापित सत्ताधाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या धनगर नेत्यांच्या मुस्काटात मारली असती तर कदाचित त्या सोशल मिडियावरून पसरवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहचून त्याचा लाभ समाजबांधवांना झाला असता.
        गेल्या कित्येक वर्षांपासून एमपीएससी, युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार त्यांचे दुखणे मांडून मांडून थकले पण त्यांची साधी दखल कोणत्याही नेत्याने घेऊ नये एवढे दुर्दैव समाजाचे... लोकसंख्येच्या मानाने दोन नंबरची जमात असलेल्या धनगर जमातीसाठी महाराष्ट्र राज्यापुरते केवळ आणि केवळ ३.५% आरक्षण असताना त्यातही अनेक कुरघोड्या... ओपन मधून जरी अर्ज केला तरी पुन्हा जातीच्या आधारावरच त्या जागा भरल्या जातात मग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या इतर उमेद्वारांनी करायचे काय? गेल्या पाच-सहा वर्षांपासून मी माझ्या डोळ्याने पाहतोय आणि त्यांचे दुखणे ऐकतोय. धनगर समाजातील तरुण हजारो-लाखो रूपये खर्चून सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या आणि प्रशासकीय सेवेच्या हलगर्जीपणामुळे जागांच्या अभावी खचून जातोय याकडे धनगर नेत्यांनी दुर्लक्ष करावं ही किती लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. पदं भेटली, खुर्च्या भेटल्या म्हणून समाजाचा विकास झाला असे होत नाही तर समाजाचे दुखणे विधानभवनात, संसदभवनात मांडून समाजाच्या न्याय व हक्कासाठी कायदे बनवून घेणे आवश्यक आहे तरच समाजाचा विकास होईल नाहीतर ये रे माझ्या मागल्या... असेच होईल. ज्या ज्या पक्षांना लोकसभेसाठी धनगर उमेद्वार चालत नाहीत अशी प्रस्थापित व्यवस्था धनगर समाजाला काय न्याय देईल? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण होळकरांनी दान केलेल्या जमिनीवर जे संसद भवन आणि राष्ट्रपती भवन दिमाखात उभे आहे ती संसद ही देशाची तिजोरी तर आहेच परंतु जिथे कायदे बनवले जातात त्या कायदेमंडळात कायदे बनवण्यासाठी संघ पुरस्कृत सत्ताधारी सरकारला तसेच अन्य प्रस्थापित व्यवस्थेला धनगर समाजाची माणसं चालत नसतील तर ते काय धनगर समाजाला खाक न्याय देणार आहेत का?
       या गोष्टीचे समाजाबरोबरच धनगर नेत्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण तथा आत्मचिंतन करावे कारण गेल्या पाच-सहा वर्षांपासून मिळेल त्या वेळेत शक्य तेवढे समाजप्रबोधन करतोय. त्यामुळे जास्त काही सांगायचे नाही. तसे तुम्ही सुज्ञ आहातच....
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
       ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      +91 853 000 4123

No comments:

Post a Comment