Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Tuesday, 14 May 2019

आज वाढदिवस लाडक्या अभिनेत्याचा... ✍️नितीनराजे अनुसे



अभिनेता शरद गोयेकर (टिंग्या)


             मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला एक सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य अभिनेता, ज्याने "टिंग्या" या चित्रपटाच्या माध्यमातून अगदी कमी वयातच २००६-०७ च्या दरम्यान अखंड महाराष्ट्राला हसायला लावलं, रडायला लावलं आपल्या अभिनयाने भावनिक आणि हळवं करून सोडले. त्या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे शरद गोयेकरला माजी राष्ट्रपती मा.प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अशा माझ्या छोट्या भावाला अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या टिंग्याला जन्मदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा💐💐
💐

             मध्यतंरीच्या काळात राष्ट्रपती पुरस्कार विजेता कसलेला टिंग्या हा मराठी चित्रपट सृष्टीतील काही जातीयवादी समिकरणांमुळे मराठी पडद्यावरुन गायब झाला होता. कितीही धर्मनिरपेक्ष भारत देश म्हंटले तरी भारतात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक समाजात जातियवाद ठासून भरला आहे. आजकाल शैक्षणिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक तथा व्यवसायिक क्षेत्र जसे की चित्रपट सृष्टी असो प्रत्येक क्षेत्रात जातियवादाचा नंगानाच चालू असल्याने एका उत्कृष्ट अभिनेत्याला चित्रपटात अभिनय करण्यापासून कित्येक वर्षे वाट पहावी लागते. शरद गोयेकरला सुद्धा याचा सामना करावा लागला परंतु जवळपास ८-९ वर्ष प्रतिक्षा केल्यानंतर त्याने स्वतःचा बब्या चित्रपट चित्रपट प्रदर्शित करायचे ठरवले परंतु काही आर्थिक अडचणींमुळे टिंग्याला त्याचे चित्रीकरण नाइलाजाने थांबवावे लागले.
         शरद गोयेकर अर्थातच टिंग्या हा सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने संघर्ष त्याच्या वाट्याला आला आहे तरीही तो डगमगला नाही पुन्हा एकदा तो स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. येत्या २६ जून २०१९ रोजी शरद गोयेकरचा "माझ्या प्रेमा" हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यासाठी माझ्याकडून टिंग्याला आणि त्याच्या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
                    निकलता हुआ सूरज दुआ दे आपको,
खिलता हुआ फूल खुशबू दे आपको,

हम तो कुछ देने के काबिल नहीं

खुदा हज़ार खुशियां दे आपको.

!!हैप्पी बर्थडे टिंग्या!!


जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.com

Monday, 13 May 2019

राष्ट्रमातेच्या जयंती निमित्त वेगवेगळे उपक्रम राबवावेत... ✍️नितीनराजे अनुसे

राष्ट्रमाता रणरागिणी अहिल्याई होळकर


           अठराव्या शतकातील जगातील एकमेव महान अशी आदर्श राज्यकर्ती तथा प्रशासनकर्ती म्हणून जगाने ज्या मायमाऊलीचा गौरव त्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची  जयंती जवळ येऊन ठेपली आहे. ३१ मे २०१९ रोजी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा २९४ वा जयंती उत्सव संपूर्ण भारतभर साजरा होत असला तरी जयंती साजरी करताना काही गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा असे मला वाटते.
            राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्यासारखे जगातील अनमोल रत्न भारतामध्ये जन्माला यावे हे एकट्या महाराष्ट्रातील जनतेलाच नव्हे तर विषेशतः अखंड भारतवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. अहिल्याई होळकर या नुसत्या राज्यकर्त्या/प्रशासनकर्त्या नव्हत्या तर त्या प्रजेच्या, मुक्या पशुपक्ष्यांच्या मायमाऊलीच होत्या. एखाद्या व्यक्त्तीची ओळख ही त्याच्या नावावरून होत नसते तर ती त्याच्या कार्यातून होत असते त्यापैकीच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर या एकमेव होत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे जागविती। या तुकोबारायांच्या अभंगातून बोध घेत राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी आपल्या राज्यात झाडे लावण्याचे व ती जगवण्याचे फर्मान काढले होते. वड, आंबा, चिंच, फणस अशा सावली देणाऱ्या शिवाय ज्यापासून उत्पन्न मिळेल अशी झाडे लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले होते त्याबदल्यात शेतसारा म्हणून १२ झाडापैकी ७ झाडांपासून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांनी स्वतःकडे ठेवायचे तर उर्वरित ५ झाडांचे उत्पन्न महसूल म्हणून सरकारी खात्यात जमा करायचे तीच ही आजची ७/१२ची पद्धत... अशी योजना राबवून राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी खऱ्या अर्थाने सृष्टीचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना राबवल्या होत्या आणि आमलात सुद्धा आणल्या होत्या. आजचे राज्यकर्ते/प्रशासनकर्ते हे एसी रूम मध्ये बसून कागदावरच अशा योजना राबवतात आणि कचरा कुंडीत फेकून देतात त्यामुळे आजची ही भयानक परिस्थिती उद्भवली आहे.
        राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी याव्यतिरिक्त अनेक जनविकासाची कामे अखंड भारतभर केली. दुष्काळ परिस्थितीमुळे अन्नाशिवाय लोक भुकेने मरत होते त्यांच्या हाताला कामे देऊन अहिल्याईंनी दुष्काळाला आवाहन देण्यासाठी वायफळ पाणी अडवून ठेवण्यासाठी शेतामध्ये बांध घातले, अनेक शेततळी, विहिरी, बारवे बांधून घेतले, वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जागोजागी पाणपोई बांधून घेतल्या शिवाय वाटसरूंची गैरसोय होऊ नये म्हणून धर्मशाळा उभारल्या अन्नछत्र सुरू केली . दुष्काळात पशूपक्षांसाठी धान्याची अनेक शेती मोकळ्या करून ठेवल्या होत्या. याव्यतिरिक्त अहिल्याईंनी जगातील पहिल्यांदाच न्यायव्यवस्था सुरू केली. विधवांना व निपुत्रिकांना मुल दत्तक घेण्याचा अधिकार दिला. स्वराज्यात अस्पृश्यतेचे उच्चाटन केले. सतीप्रथेस विरोध केला. राज्यात दारूबंदी हुंडाबंदी कायदा लागू केला.
     राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी फक्त एकाच राज्यापुरते, एकाच जाती-धर्मापुरते काम केले नाही तर त्या पलीकडे जाऊन त्यांनी धर्मनिरपेक्षतेने अखंड भारतभर काम केले आहे. प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महारानी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महारानी मार्गारेट यांच्यापेक्षा अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या राष्ट्रमातेने जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्रमाता रणरागिणी महारानी अहिल्याई होळकर होत. अशा राष्ट्रमातेची जयंती साजरी करत असताना समाजबांधवांनी, सामाजिक संघटनांनी पैशाची वारेमाप उधळपट्टी न करता, डीजे डॉल्बी अशा अवाजवी साधनांचा अवलंब न करता त्याच पैशाचा वापर करून राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर समाजोपयोगी उपक्रम राबवून सृष्टीचा समतोल राखण्यास मदत करावी व अहिल्याईंचे विचार लोकांच्या डोक्यात पेरावेत हीच नम्र विनंती.
कृपया व्याख्यात्यांनी/लेखकांनी/विचारवंतांनी विशेषतः या गोष्टींवर भर द्यावा.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

Friday, 10 May 2019

खाकी वर्दीतही माणूसकी जपणारा अधिकारी ✒नितीनराजे अनुसे

API Namdev Shinde

        पोलिस म्हंटले की सर्वसामान्य माणसांच्या मनात एक विलक्षण भिती निर्माण होते, क्रुर, निष्ठुर, निर्दयी, दगडाच्या काळजाचा माणूस असे चित्र डोळ्यासमोर ठेऊन सर्वसामान्य माणसं पोलिसांबद्दल नाना तर्हेचे विचार करत बसतात.  परंतु सध्या जयसिंगपूर येथे कार्यरत असणारे सहायक पोलिस निरीक्षक मा. नामदेव शिंदे साहेब याला अपवाद आहेत. 
         व्हाटसप च्या माध्यमातुन समाजजागृती करत असताना २०१५ मध्ये शिंदे साहेबांशी माझी ओळख झाली.  तेव्हा ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात वेळापूर पोसिस स्थानकात सहायक निरीक्षक म्हणून कार्यरत होते. अधूनमधून फोन कॉल व्हायचे तेव्हा शिंदे साहेब मोठ्या भावाच्या नात्याने  मला म्हणायचे की वेळापूरला कधी आला तर अवश्य भेट घे. २९ मार्च २०१६ रोजी तसा योग आला. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी चौंडी ला जात असताना शिंदे साहेबांना फोन करून त्यासंदर्भात सांगितले आणि मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपून परत येताना साहेबांची भेट घ्यायला वेळापूर मध्ये थांबलो सायंकाळच्या साडेसात वाजून गेल्या होत्या तरी शिंदे साहेब अजूनही ऑफिस मध्ये होते.  शिंदे साहेबांनी पोलिस स्थानकात ऑफिस मध्ये यायला सांगितले.  सोबत मित्र विक्रम देवडकर, चुलत भाऊ सुनिल, आई-वडिल होते.  खरंतर आई- वडिलांनी कधी पोलिस स्टेशन अथवा कोर्ट कधी पाहिलेच नव्हते. परंतु आयुष्यात ते पहिल्यांदाच एका पोलिस अधिकारी सोबत त्यांच्या ऑफिसमध्ये  मनमोकळेपणाने दिलखुलास गप्पा मारत होते. माझ्या आई-तात्यांनी जसे परिस्थितिचे चटके खाऊन मला शिकवलं लहानाचं मोठं केलं तशाच परिस्थितितून शिंदे साहेब पुढे आले आहेत. ते शिंदे साहेब आज एक कर्तव्यदक्ष,  कार्यक्षम अधिकारी आहेत, तसा वेळापूर पंचक्रोशित त्यांचा दबदबा देखिल होता.  परंतु मनमोकळ्या स्वभावामुळे स्थानिक नागरिकांच्या मनात त्यांनी घर निर्माण केले होते.  सदैव हसतमुख राहणारे शिंदे साहेबांचे व्यक्तिमत्व हे लहान-थोरांना भाळवणारे आहे. जिथे जिथे शिंदे साहेब जायचे तेथील अवैध धंद्यांना ते पाबंदी लावत असत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळे. पोलिस हा जनतेचा शत्रु नसून मित्र आहे हे विचार त्यांनी नागरिकांच्या मनावर बिंबवले आहेत आणि त्या विचाराने ते प्रामाणिकपणे अविरत कार्य करत असतात. गडचिरोली सारख्या ठिकाणी नक्षलवादी भागात देखील मा. नामदेव शिंदे साहेब यांनी कर्तव्य बजावले  परंतु  त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांना तिथे कधीच त्रास झाला नाही. उलट शिंदे साहेबांनी पोलिस म्हणून नव्हे तर एक आदर्श नागरिक या नात्याने तेथील युवकांना चांगली शिकवन दिली आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित केले. वेळापूर नंतर शिंदे साहेबांची बदली मंगळवेढा (सोलापूर),  हुपरी (कोल्हापूर) व सध्या जयसिंगपूर येथे कार्यरत आहेत.  शिंदे साहेब कितीही मोठ्या पदावर असले तरी त्यांनी अजूनही माणूसकी जपून ठेवली आहे.  सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबातून पुढे आलेले हे व्यक्तिमत्व आहे.  आजपर्यंत त्यांनी कधीच पदाचा आणि वर्दीचा गैरवापर केला नाही शिवाय गर्वही केला नाही.  पोलिस प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातुन नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवतात. आजपर्यंत त्यांना अनेक सामाजिक संस्थांनी आदर्श पोलिस अधिकारी म्हणून सन्मानित केले आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दित त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखत त्यांच्या अखत्यारित येणार्या विभागातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे हा त्यांच्या यशाचा आलेख असाच दिवसें-दिवस वाढत राहो हीच त्यांच्या जन्मदिनानिमीत्त माझ्याकडून मल्हारी मार्तंड चरणी प्रार्थना... 
मा. नामदेव शिंदे साहेब तुम्ही औक्षवंत व्हा
तुमच्या यशाचे आभाळ दिवसें-दिवस वाढत जावो याच तुम्हाला जन्मदिनाच्या शुभेच्छा... 
       -नितीनराजे अनुसे 
        8530004123 

Thursday, 25 April 2019

इतिहासाची छेडछाड कराल तर याद राखा... ✍नितीनराजे अनुसे


पानिपतचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना नितीनराजे अनुसे यांचे पत्र          
प्रति,
आशुतोष गोवारीकर
(चित्रपट दिग्दर्शक,
निर्माते, लेखक
एवं अभिनेते)

          विषय :- पानिपत या चित्रपटात मराठ्यांच्या इतिहासचे विद्रुपीकरण करून थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या भूमिकेबद्दल अपरिहार्य लेखन(स्क्रिप्ट)/चित्रीकरण करत असल्याबद्दल...

आदरणीय सर,
          तुम्ही फार मोठे दिग्दर्शक आहात त्याशिवाय निर्माते,अभिनेते आणि एक लेखक सुद्धा आहात. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका मराठी कुटुंबातील तुमचा जन्म, शिवाय एक मराठी भाषिक असल्याने माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठी माणसाला तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलायला काहीच हरकत नाही. अर्थातच सदरचे पत्र पाठवत आहे त्यामागच्या आमच्या भावना तुम्ही नक्कीच समजून घ्याल.
         वरील उपरोक्त विषयास अनुसरून तुम्ही "पानिपत" हा चित्रपट प्रदर्शित करणार आहात असे समजले आणि त्या चित्रपटासाठी संदर्भ म्हणून तुम्ही ज्या अविश्वसनीय साधनांचा म्हणजेच विश्वास पाटील यांची "पानिपत" ही कादंबरी आणि "भाऊसाहेबांची बखर" याचा आधार घेऊन चित्रपट निर्मिती करत आहात. चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत आमचे काहीच दूमत नाही. कारण १४ जानेवारी १७६१ रोजी ऐन संक्रांतीच्या दिवशी जे पानिपत घडले त्या पानिपतमध्ये महाराष्ट्रातील लाखों कुटुंबावर संक्रांत कोसळली होती. प्रत्येक माजघरातला कुंकवाचा करंड पानिपतावर लवंडला होता. जेव्हा शत्रु चाल करून येतो तेव्हा राष्ट्रसंकट उद्भवल्यावर शत्रुंशी लढायचे कसे? शत्रुंना भिडायचे कसे? याचा धडा ज्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांनी गिरवला त्या युद्धात महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातला वीर कोसळला होता ती रक्ताने माखलेली पानिपतची माती पवित्र होऊन त्याचे आज पवित्र भस्मात रूपांतर झाले आहे. ऐन संक्रांतीदिवशी अफगाणिस्तानचा घुसखोर अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्याण १४ जानेवारी १७६१ ला झालेले पानिपत सारखे युद्ध त्यागोदर आणि त्यानंतरही कधीच इतिहासात घडले नाही. मध्यमयुगाच्या कालखंडात सकाळी नऊ वाजलेपासून ते सायंकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत एकाच दिवसाच्या अल्पावधीत असं आक्राळवीक्राळ, भयंकर, घनघोर, जीवघेणं युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही फौजांची दीड लाख माणसं आणि ऐंशी हजार जणावरं मेल्याचे दुसरे उदाहरण कोणते नाही.
       त्यामुळे तुम्ही चित्रपट निर्मीतीचा घेतलेला निर्णय हा खरंतर कौतुकास्पद असला तरी ज्या कादंबरीचा आणि बखरीचा संदर्भ तुम्ही घेतला आहे त्यामध्ये अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य अबाधित राखणाऱ्या लढवय्यावरती अर्थातच थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावरती नाहक आरोप केले आहेत. तीच री ओढून ताणून तुम्ही मराठ्यांचा इतिहास अखंड भारतात तसेच जगभरात मलीन करत आहात असे आम्हाला वाटते. कारण चित्रपट हे एक प्रतिबिंब असते तुम्ही जसे प्रेक्षकांवरती बिंबवणार त्यालाच अनुसरून प्रेक्षक आपल्या मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आपापले मत बनवणार यामध्ये काहीच शंका नाही.
           त्यासाठी तुम्ही पानिपतवरती, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यावर नव्याने संशोधन करणाऱ्या इतिहासकारांशी चर्चा करून योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा. कारण अविश्वसनीय साधन असलेल्या विश्वास पाटील यांची "पानिपत" कादंबरी आणि "भाऊसाहेबांची बखर" यामध्ये मल्हारराव होळकर यांच्यावरती झालेल्या/केलेल्या आरोपांचे खंडण जेष्ठ लेखक/इतिहास संशोधक आदरणीय संजय सोनवणी सर, संजय क्षिरसागर सर यांनी केले असून त्यांनी संशोधित केलेला इतिहास खोडायचे आवाहन आजपर्यंत कोणीच स्विकारले नाही अथवा त्यावरती कोणी प्रतिवाद देखील सादर केला नाही. महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानच्या वतीने वरील इतिहास संशोधकांसह प्रकाश खाडे सर यांच्या सहीचे पत्र तुम्हाला मिळालेच असेल शिवाय क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या क्रांतीकारी विचारावर मार्गक्रमण करणाऱ्या "महाराष्ट्र यशवंत सेनेच्या वतीने संघटनेचे प्रमुख मा.सुरेशभाऊ होलगुंडे", "यशवंतराव होळकर प्रतिष्ठान चिंचवण चे अध्यक्ष मा.दत्ता वाकसे" यांचेही पत्र मिळाले असेलच.
      मल्हारराव होळकर हे एक मराठ्यांचे मुत्सद्दी लढवय्ये होते, त्यांनी स्वबळावर साम्राज्य उभा केले होते शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य अबाधित राखण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर त्यांनी अटकेपार झेंडे फडकवले होते हे तमाम महाराष्ट्र वाशीयांना अभिमानास्पद आहे. पानिपतच्या युद्धानंतर उत्तर भारतात मराठ्यांच्या साम्राजाचा विस्तार त्यांनी केला होता. त्यामुळे उपरोक्त विषयास अनुसरून तुम्ही प्रदर्शित करू इच्छित असलेल्या "पानिपत" या चित्रपटात मराठ्यांच्या इतिहासाचे  विकृत दर्शन घडवून थोरले सुभेदार मल्हारराव होळकर हे पानिपतच्या युद्धातून पळून आल्याचे खोटे आरोप करून पानिपतच्या पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले आहे. त्या अविश्वसनीय साधनांचा वापर करून मल्हारराव होळकर यांच्याबद्दल चुकीचे चित्रीकरण केल्यास महाराष्ट्र राज्यातील अखंड मराठ्यांच्या भावना दुखावतीलच शिवाय मल्हारराव होळकरांचे वारसदार असलेला महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाज हे कदापि सहन करणार नाही. त्यासाठी इतिहासाचे अभ्यासक, संशोधक, विचारवंत यांच्याशी या संबंधित चर्चा करावी आणि मल्हारराव होळकर यांच्यावरती जे अपरिहार्य लेखन(स्क्रिप्ट)/चित्रिकरण झाले आहे त्यात बदल करावा अन्यथा महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मराठी माणूस इतिहासाच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरून तुम्ही दिग्दर्शन करत असलेला "पानिपत" हा चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रात कुठेच प्रदर्शित होऊ देणार नाहीत याची तुम्ही नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
        आम्हा सर्वसामान्य मराठी माणसांच्या भावना समजून तुम्ही योग्य आणि सकारात्मक निर्णय घ्याल एवढीच प्रामाणिक अपेक्षा....
  कळावे
          -नितीनराजे अनुसे (लेखक व व्याख्याते)
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           853 000 4123
nitinrajeanuse123@gmail.com

Sunday, 14 April 2019

संघर्षपुत्रा तु विजयी भवः ✒नितीनराजे अनुसे

काही तांत्रिक अडणींमुळे हा ब्लॉग लिहायला तसा फारच उशिरच झाला तरीही जो अवधी मिळाला त्यामध्ये केलेला हा खटाटोप...
         माणदेशाच्या दुष्काळी पट्ट्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका तसा आजही संघर्षाच्या कथाच गिरवतोय. इथला शेतकरी स्वातंत्र्य पूर्व काळापासून दुष्काळाशी दोन हात करून आजही टिचभर पोटाच्या तुमड्या अर्धीकोर खाऊन कसाबसा जगतोय म्हणजेच संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे. याच मातीतील थोर साहित्यकार  ग.दि.माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, तराळ-अंतराळचे कादंबरीकार शंकरराव खरात, ना.सि.इनामदार अशा प्रख्यात लेखकांनी, कादंबरीकरांनी संघर्षातूनच संघर्ष गाथा गिरवल्या आणि त्या गाथा साता-समुद्रापार ऐकवल्या.
      तेव्हाचा तो आटपाडी तालुका तसेच जत, कवठेमहांकाळ व खानापूरचा काही भाग आजही दुष्काळाच्या छत्रछायेखाली असून त्या झळया सोसतोय. परंतु इथली हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रस्थापित घराणी सोडली तर प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष आणि संघर्षच आला आहे. स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर स्व.नागनाथअण्णा नायकवडी यांनी आटपाडी तालुक्यासाठी पाण्याचा संघर्ष सुरू केला. त्यांना स्वातंत्र्य सैनिक स्व.जी डी बापू लाड, जेष्ठ अभिनेते स्व.निळू फुले तसेच जेष्ठ नेते आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचीही साथ मिळाली. दरवर्षी २६ जून ला पाणी परिषद व्हायची परंतु क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या निधनानंतर ती पाणी परिषद बंद झाली. आटपाडी, सांगोला, जत, माण तालुक्यातून, प्रत्येक गावागावांतून हजारोंच्या संख्येने लोक एकत्रित यायचे, पाण्यावरती चर्चा व्हायची, मनोगते व्हायची, उन्हातान्हात मिळेल त्या जागेवर बसून लोक सभा ऐकायचे सभा संपायची आणि सगळे जिकडच्या तिकडे निघून जायचे. परंतु प्रस्थापित व्यवस्था राज्य सरकार याची दखल घेत नव्हते. अथक प्रयत्नानंतर संघर्षानंतर १९९६ साली मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली परंतु २३ वर्षे उलटून देखील ही योजना अजून पुर्णत्वास आली नाही हे आटपाडी तालुक्याचेच नव्हे तर सांगली जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. आजपर्यंतच्या लोकसभा/विधानसभा निवडणूक या केवळ आणि केवळ पाण्यावरतीच झाल्या परंतु जातपातीचे/गुंडगिरीचे/जिरवाजिरवीचे राजकारण करण्यापलीकडे एकानेही सांगलीचा खऱ्या अर्थाने विकास केला नाही.
    जर जनतेला न्याय द्यायचा असेल तर संघर्षाशिवाय दुसरा तिसरा चौथा कोणता मार्ग शिल्लकच नाही असा विचार करून सांगली आटपाडी तालुक्यातील झरे गावच्या नैऋत्येस असलेल्या पडळकरवाडी गावचे सुपूत्र गोपीचंद कुंडलिक पडळकर या तरूणाने २००७ मध्ये राजकारणात पाय ठेवला. वक्तृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर हे उमदे नेतृत्व पुढे आले. खरंतर जन्मापासूनच या तरूणाने संघर्ष कोळून प्याला आहे. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच ब्रेन ट्यूमर सारख्या भयंकर आजाराने वडिलांचे छत्र हरपले. वडिलांची सेवा करता करता मोठे बंधू देखील देवाघरी गेले. आई सोबत मोलमजुरी करून प्राथमिक-माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढे द्वितीय बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी गलाई दुकानदारी केली त्यातून उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षण पूर्ण करून नागज फाटा येथे  ढाबा सुरू केला. त्यातून हळूहळू व्यवसायात प्रगती होत गेली आणि २००७ साली ना.महादेवजी जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याची राष्ट्रीय समाज पक्षाची धुरा खांद्यावर घेतली. बघता बघता गोपीचंद पडळकरांची तोफ सांगली जिल्हाभर धडकू लागल्या, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी जागृत होऊ लागला, सर्वसामान्य जनतेच्या मनात स्वाभिमान धडधडू लागला तशी आटपाडी तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली, पडळकरांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी मेळावे, चारा छावण्यांसाठीची आंदोलने, मोर्चे होऊ लागले तसतसे दुखलेले खुपलेले लोक पडळकरांच्या भोवती गोळा होऊ लागले नव्हे तर गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील युवकांच्या गळ्यातील ताइथ बनले. पुढे अल्पावधीतच २००९ साली विधानसभेची निवडणूक लढवून जवळपास २०,००० हजाराच्या संख्येने मतदान खेचून आणले आणि तिसऱ्या नंबरचे दखलपात्र नेते ठरले. याची धास्ती प्रस्थापितांनी घेतली आणि त्यांच्यावर खोट्या केसेस घालण्यात आल्या. पुढे २०१२ ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकांत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे मतदान पडळकरांच्या पैनल कडे होते त्यामुळे प्रस्थापितांची अजूनच डोकेदुखी वाढली आणि मग पुन्हा सुरू झाल्या चोरीच्या खोट्या केसेस. पुढे २०१३  साली तालुक्यातील २० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर पडळकरांच्या नेतृत्वाखाली रासपचा झेंडा फडकवला आणि युवकांना सोबत घेऊन पाण्याचा संघर्ष हाती घेऊन तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील यांची गाडी आडवणे, शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून टेंभू कार्यालय फोडले,
आटपाडी तालुक्याला पाणी मिळावे म्हणून राजेवाडीचा उजवा कालवा फोडला अशी एक ना अनेक जनतेच्या हिताचे प्रश्न हाती घेऊन पडळकर यांनी संघर्ष केला परंतु त्यांच्यावर अनेक खोट्या केसेस दाखल केल्यामुळे त्यांना जिल्हा हद्दपारीचे नोटीस बजावली परंतु वैयक्तिक कारणासाठी त्यांनी आंदोलन मोर्चे केले नव्हते तर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सुखात जगता यावे त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, न्याय मिळावा या हेतूसाठी त्यांच्यावर केसेस झाल्या असल्याने प्रांताधिकाऱ्यांनी त्या केसेस हटवायला लावून जिल्हा तडीपार रद्द झाले. जिथं तिथं संघर्ष आणि संघर्षच अनुभवायला आल्याने गोपीचंद पडळकर एक संघर्ष रत्न म्हणून नावारूपास येऊ लागले.

       पुढे २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटावर त्यांनी विधानसभा लढवली आणि तब्बल ४५००० हजारांचे मताधिक्य मिळवून स्वताला संघर्ष पुत्र म्हणून सिद्ध केले पण एवढ्यावरच त्यांनी हार मानली नाही. आमदार नसताना देखील मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवून आटपाडी-खानापूर मतदासंघातील रस्त्यांसाठी भरघोस निधी त्यांनी आणला, आटपाडी तालुक्यासाठी एमआयडीसी, तसेच एकूण २६ बंधारे मंजूर करून आणले. जी कामे आमदारांनी करायची होती ती कामे पडळकरांनी आमदार/खासदार नसताना देखील केली त्यामुळे जनतेच्या मनात गोपीचंद पडळकर हे आमदार/खासदार/मंत्री म्हणून मिरवू लागले. टेंभूच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी भुमिपूजनासाठी मंत्री महोदयांना ते घेऊन आले शिवाय इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आले ते पडळकरांमुळेच.

     गोपीचंद पडळकरांनी नाम फौंडेशनच्या माध्यमातून, लोकसहभागातून अनेक कामे करून घेतली शिवाय निधीअभावी रखडलेल्या टेंभूच्या अर्धवट कालव्याचे काम स्वखर्चाने पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. जनता हेच माझे मायबाप म्हणून पडळकर अहोरात्र जनतेसाठी काम करतात आणि आजपर्यंत त्यांनी स्वार्थासाठी काहीच केले नाही. जर खरोखरच पढळकरांना स्वार्थ साधायचा असता तर भाजपच्या मोठ्या ऑफर्स धुडकावून ते स्वाभिमानाने खासदारकीसाठी उभे राहिले नसते. गोपीचंद पडळकर हे सांगली लोकसभा निवडणूक केवळ आणि केवळ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, न्याय व हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या संघर्षाचा अनुभव हा सर्वात मोठा गुरु त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या संघर्षात साथ देणारे सर्वसामान्य तरूण, शेतकरी, कष्टकरी हे त्यांच्या हातात हात देऊन काम करत आहेत त्यामुळे कष्टाला हाल होतात पण हार होत नाही हे ब्रीदवाक्य घेऊन पडळकरांचा संघर्षरथ दिवसेंदिवस मजल मारत पुढे चालला आहे.

     फक्त नम्र विनंती एवढीच राहील की आजपर्यंत समज गैरसमज करून काहीजण त्यांच्यापासून दूर झाले, दुखावले गेले असतील तरी जनतेचा एक सच्चा सेवक म्हणून एक पाऊल मागे घ्या. कमीपणा घेतला तर मोठ्या मनाचा मान मिळतो तो मोठेपणा अंगीकृत करून २०१९ च्या या सांगली लोकसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना संसदेत पाठवा जिथे सर्वसामान्यांसाठी कायदे बनवले जातात त्या निर्णय प्रक्रियेत आपल्या हक्काचा, शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा पोरगा असायला हवा आणि हे सर्वसामान्यांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून गोपीचंद पडळकर साहेब हे संसदेत नक्कीच स्वतःला सिद्ध करून दाखवतील या तळमळीपोटी केलेला आणि वाढत गेलेला हा लेखप्रपंच इथेच थांबवून संघर्षरथाचे मानकरी संघर्षपुत्र गोपीचंद पडळकर साहेब यांना शुभेच्छा देतो.
संघर्षपुत्रा तु विजयी भवः
          ✒नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
            853 000 4123
https://nitinrajeanuse123.blogspot.com

Tuesday, 9 April 2019

माझी अर्धांगिनी माझी ताकद ✒नितीनराजे अनुसे

प्रिय अर्धांगिनी...
         आज दि. ९ एप्रिल, आपल्या सुखी संसाराला आज दोन वर्ष पूर्ण झाली. कळालेच नाही की संसाराचा गाडा ओढता ओढता दोन वर्ष कधी उलटून गेली. खरंतर मी खूप नशिबवान आहे की मला तुझ्यासारखी प्रत्येक पावलोपावली, सुखदुःखात साथ देणारी, माझी सावली बनून राहणारी आणि जवळ असो अथवा दूर तरीही क्षणोक्षणी काळजी करणारी अर्धांगिनी मिळाली. खरंतर तुझ्यासाठी जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे म्हणून जास्त काही नाही पण खालील ओळी तुझ्यासाठी समर्पित करतोय...



दूर असो अथवा जवळ, तरीही काळजी करतेस रात्रंदिनी ।
प्रेमाचा अथांग सागर असणारी अशी तु माझी अर्धांगिनी ।।

सातजन्माची शपथ घेऊनी हात दिलास तु मज हाती ।
प्रतिज्ञेला अंगीकृत करून सुख-दुःखातही तु माझ्या सोबती ।।

गुणदोषांसह स्विकारलेस गं सहचारिणी तु मजला ।
प्रत्येक संकटातही लाभते तुझीच गं साथ मजला ।।

दुःखातही संकटांना तोंड द्यायला बनतेस तु रणरागिणी ।
परिस्थीतीलाही लाजवतेस अशी पत्नी माझी स्वाभिमानी।।

सासू-सासऱ्यांनाही आपलंसं केलंस तु माता-पिता समजूनी ।
हसून-खेळून राहतेस नातेवाईकामध्ये कसे येते उमजूनी ।।

नशिबवान मी मला मिळाली, तु जणू अहिल्या माझी गुणी।
जन्मोजन्मी तूच मिळू दे, प्रार्थना मल्हारी मार्तंड चरणी ।।
Happy Marriage Anniversary My Sweetheart
-Nitinraje Anuse
   8530004123


Saturday, 6 April 2019

बाजूला सारून परंपरागत रूढी, उभारलीस तु यशाची गुढी ✒नितीनराजे अनुसे

कु स्नेहल नानासाहेब धायगुडे, मु.पो.बोरी ता.खंडाळा जि.सातारा
युपीएससी स्पर्धा परिक्षेत भारतातून १०८ क्रमांक 


           एके काळी राजा समाज असलेली जमात आज  गुलामगिरीचे जगणे जगत आहे याची कधी कधी स्वत:लाच लाज वाटते. कारण ख्रिस्त पूर्व काळापासून धनगरपुत्र आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, चक्रवर्ती सम्राट राजा अशोक यांनी जी राजसत्ता गाजवली त्यांच्या प्रशासकीय कामकाजाचे दाखले आजही जगभरात दिले जातात. कित्येक राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये मौर्य राजवंशाच्या राजकीय तथा प्रशासकीय कार्यावरती डॉक्टरेट (पीएचडी) केली जातेय. आज भारतात यूपीएससी, एमपीएससी तसेच अन्य नागरी स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासक्रमात सुरवातीलाच धनगरपुत्र आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, राजा सम्राट अशोक यांचा जीवनक्रम, राजकारण, प्रशासन यावरती भर दिला जातो यावरून तरी धनगर समाज एकेकाळी अव्वल क्रमांकावरची राजा समाज असणारी जमात होती हे सर्वमान्य आहे.
त्यापुढील काळात सातवाहन, चोळ, हक्कबुक्क राय, होळकर, गायकवाड अशी राजघराणी उदयास आली परंतु जातीयवादी इतिहासकारांनी षड्यंत्र रचून त्यांचा इतिहासच लपवून ठेवला. परंतु कोंबडा झाकून ठेवला म्हणून सुर्य काही उगवायचा राहत नाही त्याप्रमाणे धनगरांचा गौरवशाली इतिहास लपवून ठेवला तरी खरा इतिहास समोर आल्याशिवाय राहत नसतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे 
       असो भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७२ वर्षे होत आली तरी धनगर समाजाला राजकीय प्रशासकीय पदापर्यंत पोहचू द्यायचे नाही या देशाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूरच ठेवायचे असा चंग बांधून बसलेली जातीय व्यवस्था ही राष्ट्राला लागलेली खरंतर सर्वात मोठी किड आहे. आज भारतीय प्रशासकीय सेवा हे भारत देशातील सर्वोच्च पातळीवरील महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद आहे. खरंतर ती चौकट तोडायला देशातील लाखोंच्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी दिवसरात्र एक करत असतात. परंतु तुझ्यारखे क्वचितच विद्यार्थी ही स्टील फ्रेम तोडून भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होतात हे माझ्यारख्याने दोन-चार शब्दात लिहून सांगता येत नाही. 
        खरंतर इतर समाजबांधवांप्रमाणेच कु.स्नेहल नानासाहेब धायगुडे तु सुद्धा ती स्टील फ्रेम तोडायला किती कष्ट घेतले हे तुला आणि तुझ्या कुटूंबातील सदस्यांना माहीत कारण ही स्टील फ्रेम तोडणे म्हणजे अनन्यसाधारण व्यक्तीचे काम नव्हे. त्यामुळे गेल्या ७० वर्षात धनगरांची अवस्था एवढी बिकट झाल्याचे पाहून क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून क्रांतीची मशाल युवकांच्या हातात दिली तीच पेटती आणि धगधगती मशाल घेऊन समाजाला उजेडाकडे घेउन जायचा प्रयत्न करतोय, अंधकार आणि अंधश्रद्धेत गुरफटलेल्या समाजात दिव्यरूपी  ज्ञानाचा उज्वल भविष्याचा उजेड गेल्या ५-६ वर्षांपासून  पसरवतोय आणि क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांचे विचार पेरतोय. आणि खरोखरच आजकाल समाजातील तरूण-तरुणींचे प्रशासकीय सेवेत (सनदी सेवेत) वाढत चाललेले प्राबल्य पाहून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे माझ्या लेखणीचे सार्थक झाले असेच मी समजतो.
      पिढ्यानपिढ्या अन् पारंपरिक व्यवसायाचा चालत आलेला रहाट, अन्याय अत्याचाराचे खाचखळगे आज कुठे तरी बाजूला सारून तुझ्या सारख्या भगिनी तसेच धनगर समाजातील तरुण बांधव बुद्धिचातुर्याच्या जोरावर भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होतात त्यामुळे खरोखरच गर्वाने माझा ऊर भरून येतो. तु जे यश संपादन केलेस त्याबद्दल अखंड महाराष्ट्र राज्यातून असंख्य समाजबांधव कौतुक करत आहेत, शुभेच्छा देत आहेत परंतु तुझ्यापासून कितीजण प्रेरणा घेऊन प्रशासकीय सेवेत दाखल होतात याची चाचपणी मी करत असलो तरी एक सामाजिक बांधिलकी या नात्याने या माझ्या भोळ्याभाबड्या समाजातील अन्य तरुण-तरूणींना तु तुझ्या कार्याने प्रेरित करणे आवश्यक आहे. त्यांना प्रेरणा देणे मार्गदर्शन करणे याची एक जबाबदारी आता तुझ्या खांद्यावर आहे. अठराव्या शतकात जगातील एक उत्तम प्रशासक म्हणून ज्या राष्ट्रमातेचा, रणरागिणीचा गौरव जगाने केला त्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अहिल्याईंची प्रशासन व्यवस्था फक्त इतिहासात न राहता त्याचा आजच्या घडीला अवलंब करावा याच माझ्या सदिच्छा आणि पुनश्च एकदा परंपरागत रूढी बाजूला सारून यशाची खरी गुढी उभारलीस आणि अगदी वयाच्या २१ व्या वर्षी भारतातून युपीएससी स्पर्धा परिक्षेत १०८ व्या क्रमांकाने यशस्वी झालेस त्याबद्दल स्नेहल तुझे आणि तुझ्या घरातील सर्वांचे त्रिवार अभिनंदन.
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
          ✒नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +91 853 000 4123
https://nitinrajeanuse123.blogspot.com

Tuesday, 2 April 2019

माझा बाप माझा खरा मार्गदर्शक... ✒नितीनराजे अनुसे

माझा बाप... माझा खरा मार्गदर्शक...
         फार काही शिकला नाही हो माझा बाप,
पण जीवनात मला त्यांनी खूप काही शिकवलं.
फक्त एकच दिवस शाळेची पायरी चढली होती त्यांनी पण आपल्या पोरांना शिकवायला ते कधीच कमी पडले नाहीत. १९८०-८५ च्या कारकिर्दीत मुंबईच्या वडगादी पासून कुर्ला भांडूप पर्यंत हातगाडीवर माल वाहून नेण्याचे कष्टाचे काम त्यांनी केले. कालांतराने गावाकडे येऊन परंपरागत व्यवसाय असलेली मेंढरं वळली आणि आजही मेंढपाळ व्यवसाय हा अखंड आणि अवीरतपणे चालू आहे. खरंतर आमच्या तात्यांच्या कष्टाला मुळात तोडच नाही.
    तसे पाहायला गेले तर शिकायची इच्छा असूनही तात्यांना शाळेत शिकायला भेटले नव्हते कारण तेव्हाची परिस्थितीच वेगळी होती त्यांना लिहायला वाचायला येत नव्हते पण आज तात्या लिहू शकतात आणि मात्र मी लिहलेले "पुन्हा एक नवी दिशा" हे पुस्तक मात्र खडानखडा वाचतात.
       समाजातील एक लेखक म्हणून नव्हे तर तात्या एक मुलगा या नात्यानं मला तुमचा फार अभिमान वाटतो.
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
          ✒नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
            853 000 4123
https://nitinrajeanuse123.blogspot.com

Saturday, 16 March 2019

आज जयंती मुत्सद्दी तथा धुरंधर यौद्ध्याची... ✒नितीनराजे अनुसे

मराठ्यांचे साम्राज्य अबाधित राखणारा धुरंधर लढवय्या,
थोरले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर
आज जयंती मुत्सद्दी तथा धुरंधर योद्ध्याची  
      सळसळत्या रक्ताच्या आणि मनगटाच्या जोरावर तसेच धारदार तलवारीच्या टोकावर दुश्मनांना कोलून टाकणाऱ्या, स्वकर्तृत्वावर आणि स्वबळावर स्वतःचे साम्राज्य उभे करत करत मराठ्यांचे साम्राज्य अबाधित राखणाऱ्या आणि अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या रणमर्दास अर्थातच थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना त्यांच्या ३२६ व्या जयंतीनिमीत्त मानाचा जय मल्हार कोटी कोटी प्रणाम. घोड्यांच्या टापांनी अख्खा हिंदूस्तान ढवळून काढणाऱ्या मल्हाररावांना युद्धतंञात पारंगत असलेला एक धुरंदर लढवय्या म्हणून ओळखले जाते ते त्यांच्या अंगी असलेल्या कुशल "मल्हारतंत्र" आणि "मल्हारनीती"मुळेच...

एके दिवशी मामाच्या मेंढ्या चारायला घेऊन गेल्यानंतर मल्हाररावांनी पाहिले की मामाच्या शेतामधून सजवलेल्या अंबारीचे हत्ती, घोडे सैनिक शेतातील पिकाची नासधूस करत पिक तुडवत चालले होते तेव्हा त्यांनी त्याच रानातील एक ढेकुळ उचलला तो सरळ सजवलेल्या हत्तीवर अंबारीत बसलेल्या पेशव्याच्या पाठीत मारला. धनगरांच पोर ते रक्तातच धनगरी बाणा जसाच्या तसाच.... डोळ्यात निखारा जसाच्या तसाच....  निर्भिडही तेवढाच.... मल्हारवांनी पेशव्यांस ढेकुळ मारला तसे सर्वजण अवाक् झाले एवढी हिम्मत झाली कोणाची असा प्रश्न पेशव्यांच्या सरदारांना पडला, पेशव्याचे काही सैनिक मल्हाररावांकडे धावून गेले पण त्या धनगराच्या पोराचे धाडस पाहून पेशवा देखिल हडबडून गेला होता. त्याचे हे धाडस पाहून त्याला सरदार बारगळांनी स्वताच्या सेवेत सामिल करून घेतले ती टोळी होती दाभाड्यांच्या कंठाजी कदमबांडेंची आणि तेथूनच शिपाईगिरी करत असतानाच स्वताची स्वतंत्र फौज उभा करून आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर मल्हाररावांनी माळवा प्रांतांत स्वताच्या हिंमतीवर आणि स्वकर्तृत्वावर अनेक लढाया गाजवल्या बड्या बड्या शत्रुंना मल्हाररावांनी तलवारींचे पाणी पाजले हे पाहून बाळाजी विश्वनाथांनी (पेशव्यांनी) मल्हाररावांशी तह करून माळवा प्रांतांची जबाबदारी सोपवली. त्याचे कारण असे होते की दयाबहादूर हा एकेकाळी माळव्याचा सुभेदार असताना शेतकरी रयतेस नाहक त्रास देत असे दयाबहादूर व त्याच्या हाताखालचे मुनीम शेतकऱ्यांना रयतेला पिळत होते. तेव्हा मराठ्यांना बोलवले तर ते प्रजेची मदत करतील असा सल्ला जयपूरच्या राजाने दिल्यावर माळवा प्रांतात उतरून धारजवळील तिर येथे मल्हाररावांनी फौजेसरशी लढाईला आलेल्या दयाबहादूराला मारून माळवा प्रांत हस्तगत केला त्यांच्या शौर्याची दखल घेत बाजीराव पेशव्यांनी २६ मे १७२९ ला त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. अशा प्रकारे एक धनगरांचे पोर काठीने मेंढ्या हाकता हाकता स्वराज्यासाठी तलवारीने शत्रुंना कधी हाकू लागले तेच समजले नाही.

मल्हार आया मल्हार आया म्हटलं तरी उत्तर भारतालाच नव्हे तर अफगाणिस्तानच्या अब्दालीला देखील कापरं भरायचं. मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापांचे जरी आवाज ऐकायला आले तरी कित्येक गावंच्या गावं ओस पडायची हीच त्यांची धमक होती अन् हाच त्यांचा दरारा. आजही उत्तर भारतीयांच्या कानात मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापाचे आणि येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजराचे आवाज निनादत असतील... लढाईत सर्वात पुढे राहून राहून, सैन्यांचे नेतृत्व करून मुसंडी मारत शत्रुंना वायूवेगाने कापत सुटणाऱ्या मल्हाररावांचा दबदबा एवढा होता की शत्रुपुढे "मल्हार" जरी नाव उच्चारले तरी त्यांची पळता भुई थोडी व्हायची. मल्हाररावांचा स्वभाव जितका प्रेमळ होतका तितकाच राकटसुद्धा. एकदा कुंभेरीच्या लढ्यामध्ये सुरजमल जाटाने किल्ल्याला वेढा घातला होता मल्हाररावांचे सुपुत्र शुरवीर खंडेराव होळकर माचावर लढत सैन्यांचे नेतृत्व करत शत्रुंना तोंड देत होते इतक्यात सुरजमल जाटाकडून जेजाल्याचा गोळा आला आणि खंडेरावांच्या छाताडावर आदळला , खंडेराव धारातीर्थी कोसळले. स्वतःच्या मुलाला डोळ्यासमोर ठार केलेलं पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली नसानसात रक्त सळसळू लागले डोळे लालबुंद झाले हाताच्या मुठी आवळल्या गेल्या अन् त्यांनी मल्हारी मार्तंडाची शपथ घेतली की या सुरजमल जाटाचा शिरच्छेद करून, कुंभेरीची माती खणून यमूनेत टाकेन तरच दक्षिणेला (महाराष्ट्रात) परत जाइन. पण भयभीत झालेल्या सुरजमल जाटाला काय करावे सुचत नव्हते तेवढ्यात सुरजमल जाटाची पत्नी हंसिका हिने जयाप्पा शिंद्यांशी बोलणी करून सुरजमल जाटाचा पेशव्यांसोबत सुलुख घडवून आणला. तेव्हापासूनच मल्हाररावांचा  पेशव्यांवरील अन् पेशव्यांचे हुजरे असलेल्या शिंद्यावरील विश्वास उडाला होता त्याचा प्रत्यय १७ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणि १८ व्या शतकाच्या पहिल्या दशकात येतो जेव्हा महाराजाधिराज शुरवीर योद्धा यशवंतराव होळकर राष्ट्रासाठी स्वतंत्रपणे इंग्रजांशी झुंज देत होते तेव्हा पेशवे आणि शिंदे हे दोन्ही होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी खटाटोप करत होते. एवढेच नव्हे तर यशवंतराव पुण्यावर चालून आले तेव्हा शेपटी गुंडाळून पळपुटा पेशवा जेव्हा कोकणात पळून गेला आणि कोकणातून पत्रव्यवहार करून त्यांनी यशवंतराव होळकरांना सांगितले होते की होळकरांचं राज्य या राष्ट्राच्या मातीवरती अन्याय व अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश सरकारकडे विलीन करावं. याचाच अर्थ मल्हाररावांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली ती म्हणजे "एकवेळ दुश्मनांवरती विश्वास ठेवला तरी चालेल पण पाठीत खंजीर खूपसणाऱ्या शिंद्यांवरती अन् पेशव्यांवरती कधीच विश्वास ठेवायचा नाही".                  सांगायचा मथित अर्थ एवढाच की आजही आम्ही विनाकारण शेंडीने गळा कापणाऱ्या मॉडर्न पेशव्यांच्या आहारी जाऊन समाजाचे आणि परिणामी देशाचे वाटोळे करून घेतोय हे आम्हाला अजूनही कळत नाही आणि कळले तर वळत नाही.     आज १६ मार्च हा एक ऐतिहासिक आनंदाचा दिवस म्हणजेच  सतराव्या शतकात आजच्या पाकिस्तानमधील अटकेपार मराठेशाहीचा  झेंडा डौलाने फडकवणाऱ्या रणझुंजार रणमर्दाची ३२६ वी जयंती त्यानिमीत्त थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा विनम्र जय मल्हार
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
         ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५३०००४१२३
https://nitinrajeanuse123.blogspot.com


Sunday, 10 March 2019

दिशादर्शक असलेल्या धनगर समाजाची दिशाभूल... ✒नितीनराजे अनुसे

दिशादर्शक धनगरांची दिशाभूलच...
             -नितीनराजे अनुसे
         काही तांत्रिक तथा वैयक्तिक अडचणींमुळे गेल्या काही महिन्यांपासून मी सोशल मिडियापासून दूर होतो. आज वेळ मिळाला म्हणून केलेली ही खटाटोप...
        धनगर समाज एक आदिम जमात असून पशु (धन) साठा (आगार) पाळून असलेली भोळी-भाबडी धनगर जमात. इंग्रजी शब्दकोशात Shepherd (धनगर) या शब्दाचा सरळ सरळ अर्थ Guide (मार्गदर्शक), Director (दिशादर्शक) असा होतो. तर मग आजच्या धनगर समाजाची दशा पाहता सहजच प्रश्न उपस्थित होत आहे की दिशादर्शकच स्वतःचा मार्ग तर चुकत नाही ना? अथवा दिशादर्शक तथा मार्गदर्शक असलेल्या धनगरांची दिशाभूल तर केली जात नाही ना?
         होय राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून धनगर समाजाची दिशाभूल होत आहे आणि जाणूनबुजून ती केली जात आहे. मात्र माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाचा बळी जात असताना आळी मीळी गुप चीळी ची भूमिका घेऊन हातावर हात ठेवून बसलेल्या धनगर नेत्यांना याची जाणीव न होणे हे खरंतर अज्ञानपणाचे लक्षण असू शकते अथवा स्वार्थासाठी विकल्या गेलेल्या नेत्यांनी या गोष्टींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले असावे असे मला वाटते. गेल्या ७० वर्षापासून या राज्यातील तथा देशातील प्रस्थापित व्यवस्थेने या समाजावर वारंवार अन्याय व अत्याचार केला. राज्यघटनेने बहाल केलेल्या अधिकारांपासून हा समाज आजपर्यंत वंचित राहिला आणि आजही तीच उपेक्षा समाजाच्या पदरी पडली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा सामावेश राज्यघटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीत महाराष्ट्र राज्याच्या नवव्या परिशिष्टात अनु.क्र ३६ वरती ओरॉन, धनगर (Oron, Dhangad) असा केला असताना वक्रतुंडासारख्या प्रस्थापित नेत्यांनी "धनगर व धनगड" एक नसून वेगवेगळे आहेत असा घोळ घालून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवले. त्याविरोधात यशवंत सेना संस्थापक क्रांतीसुर्य स्व बी के कोकरे साहेब यांनी १९८९-९० मध्ये सर्वप्रथम आरक्षण चळवळ जन्माला घातली, खंबाटकीच्या घाटात लाखो यशवंत सैनिकांना घेऊन रास्तारोको केला होता. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच बारामतीच्या शरद पवारांनी याची दखल घेत समाजातीलच काही मोहरे पुढे करून १९९१ साली सांगली येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना बोलावून धनगर समाजाच्या आरक्षणाचा ढोल बडवला आणि धनगर समाजाची सर्वात मोठी दिशाभूल केली ती म्हणजे घटनाबाह्य तिसरी सूची बनवली. भटक्या जमाती -क (Nomadic Tribes - C). त्यातही अनेक जाचक अटी लावल्या जेणेकरून धनगर समाजाला त्यातच व्यस्त करून सत्तेचा मलिदा खायचा अशी पवारनीती होती ज्यामध्ये १६-१७℅ लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाला फक्त ३.५% मध्ये गुंडाळून ठेवले आणि समाजातील त्याच मोहऱ्यांना पुढे करून स्व बी के कोकरे साहेबांची राजकीय हत्या केली परंतु ही गोष्ट भोळ्या भाबड्या धनगर समाजाच्या आणि समाजातील नेत्यांच्या लक्षात आली नाही.  पुढे १९९५ साली तत्कालीन यशवंत सेना सरसेनापती व सध्याचे पदूम मंत्री ना.महादेव जानकर साहेब यांनी दिल्लीमध्ये संसद भवनेवर मोर्चा काढला तेव्हा देखील त्याच पवारांनी केंद्रात गरळ ओकली आणि धनगरांची दिशाभूल केली.
           त्यानंतर अनेक छोटे मोठे मोर्चे झाले, आंदोलने झाली, उपोषण झाले पण कोणत्याही राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही. १५ जुलै २०१४ रोजी पंढरपूर-बारामती धनगर आरक्षण पदयात्रा निघाली व २१ जुलै रोजी बारामती मध्ये दाखल झाली दहा-पंधरा जणांनी पंढरपूर मधून सुरू केलेल्या आरक्षण पद यात्रेत बघता बघता पाच-सहा लाख धनगर समाज बांधव बारामती मध्ये पोहचला, सर्वांचा रोष पवारांवरती होता, पवारांचे धाबे दणाणले होते त्यामुळे मोर्चा समोर येऊन आश्वासनं द्यायचा अथवा सहानुभूती द्यायचा धोका त्यांनी पत्करला नव्हता त्याचा फायदा विरोधी पक्षाने घेतला. तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर १५ दिवसांत , पहिल्याच कैबिनेटमध्ये आरक्षण देऊ असे आश्वासन दिले आणि तिथेही धनगर समाजाची दिशाभूल झाली. कारण आज फडणवीस सरकार सत्तेत येऊन ५ वर्षे पूर्ण होत आली, प्रत्येक कैबिनेटमध्ये त्यांनी वेळकाढूपणा केला. यादरम्यान मा.विकास महात्मे साहेब यांनी नागपूर येथे मोर्चे काढले त्याव्यतिरिक्त अनेक धनगर समाजातील नेत्यांनी पुढे येऊन पुणे, बारामती, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, बीड, यवतमाळ अशा अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चे काढले तिकडे देवेंद्र फडणवीस फिरकले नाहीत. ऑगस्ट २०१८ पासून मा.गोपीचंद पडळकर साहेब व मा.उत्तमराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा अखेरचा लढा उभा राहिला. बघता बघता त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला, रैपिड एक्शन प्रमाणे सभांचा सपाटा चालूच ठेवला, सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध केला तर कर्यकर्त्यांवर केसेस दाखल झाल्या, नागज फाटा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करण्याची घोषणा करणाऱ्या समाजबांधवांना एक दिवस अगोदर पोलिस ठाण्यात कोंडले, तर काहींना साधं नोटीस न देता हिटलर शाहीनं कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचलले. शेवटी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चवदार तळ्याच्या पाण्यासाठी संघर्ष केला त्या चवदार तळ्याचे पाणी कलशात घेऊन फडणवीस सरकारला आंघोळ घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाजबांधव शेळ्या मेंढ्यासह मुंबईकडे पायपीट करत निघाला. ऊन, थंडी वारा याचा विचार न करता अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी सर्व काही सहन करत धनगर समाजाचा आरक्षणाचा अखेरचा लढा नवी मुंबईत मुंबईत दाखल झाला. मात्र हाय अलर्ट असल्याने मोर्चेकरांना पाबंधी लावली गेली. परंतु भाजप सरकारची अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये विजयी संकल्प रैली देशभरात फिरत होती. त्यावेळी मात्र कुठला हाय अलर्ट नाही. म्हणजे इथे देखील धनगरांची दिशाभूलच... त्यावेळी धनगर समाजातील मंत्र्यांना पुढे करून अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राशिवाय फडणवीस सरकारने इतर आश्वासनांचा पाऊस पाडला. आदिवासी प्रमाणेच शैक्षणिक सवलती (शैक्षणिक आरक्षण नव्हे), दहा हजार घरे बांधून देणार, शेळी मेंढी महामेष योजनचा निधी वाढवण्यात आला, आदिवासी प्रमाणेच कृषी सवलती, आदिवासी प्रमाणेच विद्यार्थी वसतिगृह इत्यादी... अखेरच्या आरक्षण लढ्याचा धसका घेऊन हे निर्णय घेण्यात आले.  परंतु मा.गोपीचंद पडळकर साहेब व मा. उत्तमराव जानकर साहेब यांचा आरक्षणाचा अखेरचा लढा पूर्णपणे यशस्वी झाला नसला तरी वरील घोषणा या अखेरच्या आरक्षण लढ्याच्या धर्तीवर देण्यात आल्या आणि त्या एकादृष्टीने धनगरांच्याच फायद्याच्या ठरल्या हे सर्वात मोठे यश आहे.  सोलापूर विद्यापीठाचे नामांतरण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर असे केले असले तरी ही धनगर समाजाची बोळवण झाली. समाजाची मूळ मागणी काय आहे याचा विचार सरकारने आणि धनगर समाजातील नेत्यांनी/लोकप्रतिनिधींनी करायला हवा. अनुसूचित जमातीचे सर्टिफिकेट मिळाले तर धनगर समाजासाठी राजकीय आरक्षण (मतदारसंघ राखीव होतील),  शैक्षणिक आरक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, एट्रॉसिटी एक्ट लागू होईल. अर्थातच आदिवासीच्या ज्या काही सवलती आहेत जशाच्या तशाच सवलती राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे धनगरांनाही मिळतील. परंतु धनगर समाजासाठी मतदारसंघ राखीव झाले तर प्रस्थापित नेत्यांनी जायचे कुठे? हा प्रश्न प्रस्थापित नेत्यांना भेडसावत असेल. जर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परिक्षांतून धनगरांची पोरं प्रशासनात आली तर धनगर विरोधी व्यवस्थेच्या पोटात दुखेल. म्हणूनच की काय इतर घोषणा (आश्वासने) देऊन धनगर समाजाची दिशाभूल केली गेली.
        एका दिशादर्शक असलेल्या, मार्गदर्शक असलेल्या समाजाला उल्लू बनवले जाते आहे, धनगर समाजाची दिशाभूल केली जात आहे आणि धनगर नेते मात्र हातावरती हात ठेवून अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राऐवजी अन्य घोषणांवरती नंदीबैलासारख्या मुंड्या हालवताहेत या गोष्टींचे वाईट वाटते. धनगर व धनगड एक असल्याचे स्पष्ट केले असले तरी न्यायालयीन आदेश १२ मार्च रोजी काय सांगतोय हे कळेलच. मात्र जर निकाल धनगरांच्या बाजूने आला नाही तर सर्व धनगर नेत्यांनी धनगर या शब्दाचा खरा अर्थ लक्षात घेऊन, सर्वांनी एकत्रित येऊन फडणवीस सरकारच्या विरोधात दंड थोपटून स्वतःचे सरकार स्थापन करण्याची घोषणा करावी, सबंध धनगर समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
          ✒नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
            853 000 4123
nitinrajeanuse123.blogspot.com