Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Monday, 13 May 2019

राष्ट्रमातेच्या जयंती निमित्त वेगवेगळे उपक्रम राबवावेत... ✍️नितीनराजे अनुसे

राष्ट्रमाता रणरागिणी अहिल्याई होळकर


           अठराव्या शतकातील जगातील एकमेव महान अशी आदर्श राज्यकर्ती तथा प्रशासनकर्ती म्हणून जगाने ज्या मायमाऊलीचा गौरव त्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांची  जयंती जवळ येऊन ठेपली आहे. ३१ मे २०१९ रोजी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा २९४ वा जयंती उत्सव संपूर्ण भारतभर साजरा होत असला तरी जयंती साजरी करताना काही गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा असे मला वाटते.
            राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्यासारखे जगातील अनमोल रत्न भारतामध्ये जन्माला यावे हे एकट्या महाराष्ट्रातील जनतेलाच नव्हे तर विषेशतः अखंड भारतवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. अहिल्याई होळकर या नुसत्या राज्यकर्त्या/प्रशासनकर्त्या नव्हत्या तर त्या प्रजेच्या, मुक्या पशुपक्ष्यांच्या मायमाऊलीच होत्या. एखाद्या व्यक्त्तीची ओळख ही त्याच्या नावावरून होत नसते तर ती त्याच्या कार्यातून होत असते त्यापैकीच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर या एकमेव होत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे जागविती। या तुकोबारायांच्या अभंगातून बोध घेत राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी आपल्या राज्यात झाडे लावण्याचे व ती जगवण्याचे फर्मान काढले होते. वड, आंबा, चिंच, फणस अशा सावली देणाऱ्या शिवाय ज्यापासून उत्पन्न मिळेल अशी झाडे लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात आले होते त्याबदल्यात शेतसारा म्हणून १२ झाडापैकी ७ झाडांपासून मिळणारे उत्पन्न शेतकऱ्यांनी स्वतःकडे ठेवायचे तर उर्वरित ५ झाडांचे उत्पन्न महसूल म्हणून सरकारी खात्यात जमा करायचे तीच ही आजची ७/१२ची पद्धत... अशी योजना राबवून राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी खऱ्या अर्थाने सृष्टीचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना राबवल्या होत्या आणि आमलात सुद्धा आणल्या होत्या. आजचे राज्यकर्ते/प्रशासनकर्ते हे एसी रूम मध्ये बसून कागदावरच अशा योजना राबवतात आणि कचरा कुंडीत फेकून देतात त्यामुळे आजची ही भयानक परिस्थिती उद्भवली आहे.
        राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी याव्यतिरिक्त अनेक जनविकासाची कामे अखंड भारतभर केली. दुष्काळ परिस्थितीमुळे अन्नाशिवाय लोक भुकेने मरत होते त्यांच्या हाताला कामे देऊन अहिल्याईंनी दुष्काळाला आवाहन देण्यासाठी वायफळ पाणी अडवून ठेवण्यासाठी शेतामध्ये बांध घातले, अनेक शेततळी, विहिरी, बारवे बांधून घेतले, वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून जागोजागी पाणपोई बांधून घेतल्या शिवाय वाटसरूंची गैरसोय होऊ नये म्हणून धर्मशाळा उभारल्या अन्नछत्र सुरू केली . दुष्काळात पशूपक्षांसाठी धान्याची अनेक शेती मोकळ्या करून ठेवल्या होत्या. याव्यतिरिक्त अहिल्याईंनी जगातील पहिल्यांदाच न्यायव्यवस्था सुरू केली. विधवांना व निपुत्रिकांना मुल दत्तक घेण्याचा अधिकार दिला. स्वराज्यात अस्पृश्यतेचे उच्चाटन केले. सतीप्रथेस विरोध केला. राज्यात दारूबंदी हुंडाबंदी कायदा लागू केला.
     राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी फक्त एकाच राज्यापुरते, एकाच जाती-धर्मापुरते काम केले नाही तर त्या पलीकडे जाऊन त्यांनी धर्मनिरपेक्षतेने अखंड भारतभर काम केले आहे. प्रशासनकर्ता हा जनतेच्या पैशाचा मालक नसतो तर तो त्यांचा विश्वस्त असतो. त्यामुळे पैशाची उधळपट्टी करण्याचा त्याला काहीएक अधिकार नसून त्या पैशाचा योग्य विनिमय व्हायला हवा एवढे मोठे तत्त्वज्ञान अहिल्याईंचे होते. ब्रिटनच्या लॉरेन्स या ब्रिटिश लेखकाने रशियाची महारानी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची महारानी मार्गारेट यांच्यापेक्षा अहिल्याई होळकर या जगात श्रेष्ठ आहेत असे म्हंटले आहे. जागतिक किर्तीच्या राष्ट्रमातेने जात, धर्म, पंथ, संप्रदाय, राज्य, साम्राज्य यांच्या पलिकडे जाऊन समस्त भारतात जनकल्याणकारी कामे करून आदर्श राज्यकारभाराचे उदाहरण दिले. "Ahilyadevi Holkar was the greatest Administrator of the 18th century in the world"  अर्थातच १८व्या शतकातील जगातील एकमेव आदर्श महिला प्रशासक म्हणून जगाने जिला गौरवले त्या राष्ट्रमाता रणरागिणी महारानी अहिल्याई होळकर होत. अशा राष्ट्रमातेची जयंती साजरी करत असताना समाजबांधवांनी, सामाजिक संघटनांनी पैशाची वारेमाप उधळपट्टी न करता, डीजे डॉल्बी अशा अवाजवी साधनांचा अवलंब न करता त्याच पैशाचा वापर करून राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर समाजोपयोगी उपक्रम राबवून सृष्टीचा समतोल राखण्यास मदत करावी व अहिल्याईंचे विचार लोकांच्या डोक्यात पेरावेत हीच नम्र विनंती.
कृपया व्याख्यात्यांनी/लेखकांनी/विचारवंतांनी विशेषतः या गोष्टींवर भर द्यावा.
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

No comments:

Post a Comment