Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Tuesday, 2 August 2022

पान टपरी वाल्या संकेत सरगर ने रोवला देशाच्या शिरपेचात माणदेशी तुरा ... ✍️नितीनराजे अनुसे

       

माणदेशी सुपुत्र संकेत महादेव सरगर

          पान टपरी वाल्या संकेत सरगर ने रोवला देशाच्या शिरपेचात माणदेशी तुरा ... ✍️नितीनराजे अनुसे माणदेशातील आटपाडी तालुक्याच्या मातीतला तळेवाडी गावचा सुपुत्र म्हणजे सध्या चर्चित असलेला सांगलीतील चहावाल्याचा मुलगा वेटलिफ्टर संकेत सरगर याने भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. 55 किलो वजनी गटात 248 किलो वजन उचलत रौप्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे, त्याचे सुवर्णपदक फक्त एक किलोने हुकले.

         उज्वल भारताचे स्वप्न पाहणाऱ्या आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, आशिया खंडावरती प्रभुत्व गाजवणाऱ्या चक्रवर्ती सम्राट द ग्रेट अशोक पासून होळकरशाहीच्या गौरवशाली इतिहासाचा आणि जाज्वल्य परंपरेचा वारसा लाभलेली ही पोरं भारताला एकटं दुकटं रौप्य पदक नव्हे तर अशी अनेक सुवर्णपदकं देऊ शकतात. परंतु इथे त्यांना गरज त्यांच्यातील टॅलेंट ओळखून मार्गदर्शन करण्याची, गरज आहे सहकार्याची, प्रेमाची आणि आपुलकीची. 

कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताला पहिले रौप्य पदक मिळवून देणारा संकेत सरगर 

        वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या माणमातीनं आपलं इमान कधीच ढळू दिलं नाही. आम्ही दुष्काळात होरपळलो तरीही या माणमातीनं ग.दि.माडगुळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात, ना सि इनामदार असे सातासमुद्रापार विख्यात तथा प्रख्यात साहित्यिक या महाराष्ट्राला परिणामी भारतभूमीला दिले, ११ वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रम प्रस्थापित करणारे आदर्श संसदपटू माजी आमदार स्व भाई गणपरावजी देशमुख उर्फ आबासाहेब, आज कॉमनवेल्थ गेम्स मध्ये रौप्य पदक देणारा संकेत सरगर सुद्धा याच माणमातीनं दिला पण माणदेशाच्या वाट्याला काय आले? हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर येतं ते म्हणजे बारमाही दुष्काळ... आणि कधीही न संपणारा संघर्ष... जेव्हा सांगली कोल्हापूर ला पूर येतो आणि ओला दुष्काळ जाहीर होतो तेव्हा राज्य सरकारच्या अगोदर याच माणदेशी मातीतील वाघ त्यांच्या मदतीसाठी धावून जातात. मात्र पाण्याविना आमची पिकं जळून जातात, जनावरे तडफडून मरतात, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, पायऱ्या नसलेल्या खोल विहीरीतून पाणी काढण्यासाठी जीव पणाला लावून कसरत करावी लागते. तेव्हा कोणीच आम्हाला हातभार लावायला येत नाही म्हणून धडपड आम्ही कधी थांबवली नाही.

पान टपरी चालवणारा ते रौप्य पदक 🏅 (Silver Medal) जिंकणारा जिद्दी योद्धा 

        शेळ्या -मेंढ्या च्या पोटाची खळगी भरण्यासाठी मग भटकंती करावी लागते, भटकंती करत असताना तेथील स्थानिक शेतकऱ्यांचा शिव्याशाप, मारहाण सहन करून मग पारंपरिक व्यवसायाला पूर्ण विराम देत महादेव सरगर सारखी अनेक माणदेशी मातीतील माणसं शहराच्या ठिकाणी स्थलांतरित होतात तिथेच छोटा मोठा व्यवसाय सुरू करून, चहाचा गाडा, पानाची टपरी सुरू करतात आणि आपल्या पोरांना देशासाठी रौप्य पदक, सुवर्ण पदक मिळावं म्हणून घडवतात. भलेही राज्य सरकार, केंद्र सरकार, इथली प्रशासकीय व्यवस्था माणदेशाच्या दुष्काळ निवारणासाठी काही करू शकत नसेल, नद्या जोड प्रकल्प करू शकत नसतील म्हणून इथला माणदेशी माणूस कधी हरला नाही, दुष्काळाशी दोन हात करत तो नेहमीच जिंकत आला आहे. त्यामुळे एकच काय असे हजारो संकेत सरगर या माणदेशी मातीतून पुढे येतील आणि भारतासाठी पदकांचा पाऊस पाडतील. कष्टातून, संघर्षातून संकेत ला घडवणाऱ्या त्याच्या आई -वडिलांना आणि आई-वडिलांच तथा गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं परिणामी भारताचं नाव उंचावणाऱ्या या माणदेशी सुपुत्राचे (संकेत महादेव सरगर चे) त्रिवार अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

जय मल्हार जय! अहिल्या!! जय यशवंतराजे!!! 

           ✍️नितीनराजे अनुसे

  (अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली)

          📱 8530004123

Tuesday, 21 June 2022

"झुंज" दिलीस तु आता "झेप" घे ... ✍️नितीनराजे अनुसे


हेमंत बिरा मुढे इयत्ता दहावी मध्ये ९१.८०% गुण मिळवून समाजासमोर आदर्श ठेवणारा शेंडगेवाडी ता.आटपाडी जि.सांगली येथील होतकरू विद्यार्थी 

        तसं पूर्वीपासूनच आमच्या हातात लगाम आलेत, मग ते परंपरेने असो अथवा स्वकर्तृत्वावर, स्वबळावर, जिद्ध तथा चिकाटीच्या जोरावर आमच्या पूर्वजांनी इथल्या जुलमी व्यवस्थेला लावलेले लगाम असोत... आणि हो त्याला इतिहास साक्षी आहे. तद्नंतर आमच्या बापजाद्यांच्या अज्ञानामुळे, भोळ्याभाबड्या स्वभावामुळे आज इथे तर उद्या तिथे अशाप्रकारे पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेल्या भटकंती दरम्यान अर्ध्या आयुष्याचं ओझं वाहणाऱ्या घोड्यांचे लगाम तेवढे हाती राहिले. पण आम्हाला कधी लगाम खेचायची गरजच भासली नाही कारण घोड्यावर मांड टाकली तर घोडे देखील आपोआपच उधळतात आणि वायू वेगाने धुरळा उडवत पाहतो न पाहतो तोच क्षणात ध्येयाकडे झेप घेऊन निघून जातात.
         हेमंत बिरा मुढे आज परिस्थितीशी "झुंज" देत इयत्ता दहावी मध्ये ९१.८०% मिळवून तु सुध्दा अशीच एक ध्येयवेडी "झेप" घेतली आहेस की तुझ्या यशाकडे पाहून सर्वांच्याच माना उंचावल्या आहेत. शेळ्या -मेंढ्यांची पोटं भागली तर आपली पोटं भागतील आणि आपली लेकरं दोन शब्द शिकली तर आईबापाला सुख लावतील हे स्वप्न उराशी बाळगून काट्याकुट्याच्या वाटा तुडवून, अनवाणी पायानं दगडधोंड्यातून, कड्याकपाऱ्यांतून डोंगरदऱ्यांतून रक्तबंबाळ पायानं ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता दिवसरात्र मेंढ्यांचे रक्षण करणाऱ्या आई बापांनी पायाच्या पार नडग्या वाळवून घेतल्या त्यांची आणि त्यांनी केलेल्या कष्टाची आज तु किंमत राखलीस गड्या... 
         शेळ्या -मेंढ्या घेऊन भटकंती करताना कधी काय परिस्थिती ओढवेल त्याचा काही नेम नसतो हे मी देखील स्वानुभवातून चांगलेच ओळखतो. परिस्थिती माणसाला कसं जगायचं ते शिकवते हे ओळखून तु आज दहावीच्या परिक्षेतून दाखवून दिले आहेस. पण एवढ्यावरच आता थांबायचं न्हाय गड्या, तुला अजून खूप संघर्ष करायचाय. तसाही संघर्ष आपल्या पाचवीलाच पुजलाय आणि तो आपण कोळून प्यायलो आहे. आज तु जे यश संपादन केले आहेस त्याचे तुझ्या आईवडिलांच्या कष्टाला, शाळेतील शिक्षकांच्या कष्टाला, मार्गदर्शनाला आणि तुझ्या प्रचंड जिद्धीला मिळालेलं फळ आहे. अज्ञानी परंपरेने चालत आलेल्या काळोख्याच्या वस्तीत परिस्थितीच्या छाताडावर नाचून भविष्यात तु अशीच उज्वल तथा उत्तुंग भरारी घेऊन यशाच्या शिखरावर तुझ्या ज्ञानरूपी उजेडाचा झेंडा डौलाने फडकव जेणेकरून हा भोळा भाबडा समाज, समाजातील युवा पिढी तुझ्या पाऊलांवर पाऊल ठेवून त्या यशाच्या शिखरावर पोहोचेल. तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, परंतु यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी अथांग पसरलेल्या आकाशाला पायदळी तुडवण्यासाठी तुला भरभरून शुभेच्छा 💐💐💐
         ✍️नितीनराजे अनुसे
(तुझ्यासारखाच एक मेंढपाळ पुत्र)
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली


Saturday, 9 April 2022

माझ्या सहचारिणीस लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा 💐💐💐... ✍️नितीनराजे अनुसे

माझ्या सहचारीणीस लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
दूर असो अथवा जवळ, तरीही काळजी करतेस रात्रंदिनी ।
प्रेमाचा अथांग सागर असणारी अशी तु माझी अर्धांगिनी ।।

सातजन्माची शपथ घेऊनी हात दिलास तु मज हाती ।
प्रतिज्ञेला अंगीकृत करून सुख-दुःखातही तु माझ्या सोबती ।।

गुणदोषांसह स्विकारलेस गं सहचारिणी तु मजला ।
प्रत्येक संकटातही लाभते तुझीच गं साथ मजला ।।

दुःखातही संकटांना तोंड द्यायला बनतेस तु रणरागिणी ।
परिस्थीतीलाही लाजवतेस अशी पत्नी माझी स्वाभिमानी।।

सासू-सासऱ्यांनाही आपलंसं केलंस तु माता-पिता समजूनी ।
हसून-खेळून राहतेस नातेवाईकामध्ये कसे येते उमजूनी ।।

नशिबवान मी मला मिळाली, तु जणू अहिल्या माझी गुणी।
जन्मोजन्मी तूच मिळू दे, प्रार्थना मल्हारी मार्तंड चरणी ।।


Happy 5th Anniversary of Marriage to My Sweetheart
-Nitinraje Anuse

Saturday, 19 March 2022

चांगभलं बिरोबा अन् आरक्षणाचा खेळखंडोबा... ✍️नितीनराजे अनुसे

खरंतर ६-७ वर्षांपूर्वी लिहलेला हा ब्लाॅग https://nitinrajeanuse123.blogspot.com/2015/12/blog-post_14.html आज मुद्दामहून पुन्हा प्रकाशित करतोय.... वस्तुस्थिती अजून काही बदललेली दिसतच नाही. पिवळं वादळ कुठेतरी क्षमलं आहे, ती धमक, ते मोर्चे सगळे मूग गिळून गप्प बसले आहेत. आरक्षणाचा ब्र ही आजकाल ऐकायला भेटत नाही. सगळीकडे शांतता आणि शांतताच... पण त्या भयाण शांततेत मनात उठलेले वादळ कसं शांत बसणार म्हणूनच आजचा हा उपद्व्याप... डॉ बाबासाहेबांनी धनगर समाजाला राज्यघटनेत कलम ३४२ च्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अ.क्र.३६ वरती आरक्षण दिलेले आहे. केवळ शब्दच्छल झाल्याने अर्थातच “धनगर” ऐवजी “धनगड” (र चा ड) झाल्याने सगळा राडा झाला आहे. गेल्या ७०- ७५ वर्षापासून धनगर समाज अनुसुचित जमातीच्या सवलतींपासून वंचित असल्याने धनगर समाजाचे झालेले नुकसान पुढील ६० ते ७० वर्षातसुद्धा भरून न येणारे आहे. यास रानोमाळी डोंगरदरीतून भटकणाऱ्या धनगर समाजाचे अज्ञान जरी कारणीभूत असले तरी संविधानाच्या/राज्यघटनेच्या आधारावरती राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याहून अधिक जबाबदार आहे. धनगर समाजाला खरंतर जाणूनबुजून अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचं काम प्रस्तापित व्यवस्था आणि परिणामी पाठीमागचे आणि सद्याचे राज्यसरकार करत आहे. धनगर समाज जर निद्रावस्थेतून जागा झाला तर या प्रस्तापितांना त्यांची लायकी दाखवून देईल परंतू झोपेचं सोंग घेणाऱ्या समाजाचं कसं होईल हे राम जाणे? ज्या समाजाची लोकसंख्या जास्त आहे त्या समाजाची सत्ताकारणात भागीदारी लोकसंख्येच्या आधारवर तितकीच असणार आहे परंतू धनगर समाज अज्ञानाच्या खाईत होरपळला गेल्याने सत्ताकारणापासून ही जमात थोडी नाही तर खूपच दूर राहीली. गेल्या ६५ वर्षापासून या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती अन्याय करण्याचा नंगानाच या महाराष्ट्र राज्यातील प्रस्तापित व्यवस्थेने आणि सदरच्या राज्य सरकारने चालवला आहे. धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्याच्या कानाकोऱ्यात कुठेही पहावयास मिळत नसताना, धनगड नावाची जमातच आस्तित्वात नसताना महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात धनगड जमातीचा उल्लेख करायला डॉ.बाबासाहेब आंबेडकर काय मुर्ख होते का? हा माझा खडा सवाल मुख्यमंत्र्यांना, धनगर समाजाच्या या मागणीचा विरोध करणाऱ्या त्या त्या आदिवाशी मंत्र्यांना आणि मेंदूला वाळवी लागलेल्या त्या वळवीला, पिचडला विचारायचा आहे. त्या वळवीचे म्हणणे आहे की राज्यघटनेत ३४२ च्या अनुछैद वरती ९ व्या परिशिष्टातील ३६ नंबर वरतीची जमात ही धांगड आहे आणि धांगड ही ओरॉनची तत्सम जात आहे. मग त्या वळवीने अभ्यास करावा की धांगड अथवा धनगड नावाची जमात या महाराष्ट्र राज्यात कधीही जन्माला आली नव्हती मग डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जी राज्यघटनेची मसूदा समिती होती त्यांनी काय मुर्ख म्हणून अहवाल सादर केले होते का? एखादी जमात आस्तित्वातच नसेल तर मग राज्यघटनेत नमूद केलेल्या त्या जमातीबद्दल प्रतिवाद देखिल करता येतो. जसे Acre चे एकड होते, Chattisgarh चे छत्तीसगड होते, Gurgaon चे गुडगाव होते, Hawrah चे हावडा होते त्याचप्रमाणे Dhangar चे धनगड असे झाले आणि म्हणून त्याचाच परिणाम असा की महाराष्ट्र राज्यातील दीड ते दोन कोटी धनगर समाजबांधवांचे भविष्य अंधारातच राहिले. धनगर समाजाची हजारो पोरं आइ ए एस, आइ पी एस, डॉक्टर, इंजिनीयर, एडव्ह़केट होण्यापासून वंचित राहिली याला सर्वस्वी जबाबदार आजपर्यंतचे राज्य सरकार आहे राज्यघटनेचा अवमान करणार्या त्या त्या नेत्यांवरती देशद्रोहाचा देखिल खटला भरायला हवा. आज इथे तर उद्या तिथे अशा प्रकारचे जीवन जगणारी धनगर जमात ही भटकी जमात असल्यामुळे १९९१ साली धनगर समाजाला अनुसुचित जमातीची मागणी डावलून महाराष्ट्र राज्यापुरतं भटक्या जमाती क मध्ये टाकण्याचे पाप पवारांनी केलं पण त्या पवारांना उचलू लागायला आमच्याच समाजाचे अज्ञानी महाबहाद्दरच पुढे होते. थोडक्यात काय तर चोर तर चोरी करायच्या हेतूनेच येतो आणि चोरी करणे त्याचा धर्म मग चोरालाच स्वतःच्या घरात चोरी करण्यासाठी मदत करणारे आणि त्यांना स्वतःच्या काहीतरी स्वार्थी हेतूंसाठी त्यांना उचलू लागणारे महाबहाद्दर आमच्या समाजात जन्माला येतात हे आमच्या समाजाचं दुर्देव... राज्यघटनेतील आदिवाशी असल्याचे निकष:- राज्यघटना मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि समितीकडून राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ ला अडॉप्ट केली होती आणि २६ जानेवारी १९५० साली आमलात आणली. २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसाच्या प्रदीर्घ काळानंतर म्हणजे जवळ जवळ ३ वर्षाचाच कालावधी लागला होता भारतीय संविधान लिहायला. राज्यघटना लिहताना त्यावेळी धनगर जमात ही माळोरानी डोंगर दरीतून भटकंती करत शेळ्या-मेंढ्यांची परिणामी स्वताच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत असते याचा अभ्यास करूनच मसूदा समितीने आदिवाशी समाजबांधवांपेक्षा अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या जमातीला राज्यघटनेच्या अनुसुचित जमातीच्या यादीत अगोदरच सामाविष्ट केलेली आहे. 1. धनगर समाज ही आदिम जमात आहे शेळ्या मेंढ्या राखणे गाई-म्हैसी पाळणे हे आदिम जमातीचे व्यवसाय आहेत. (मग धनगर समाज शेळ्या मेंढ्या राखतो, गाई-म्हैसी पाळतो आणि जोडव्यवसाय म्हणून शेती पण करतो) 2. आदिम वैशिष्ट्ये/प्राचीन जीवनमान याचा अभ्यास केला तर डोंगरदरी माळरानावर जाऊन बघा शेळ्या-मेंढ्या राखणार्या समाजबांधवांची एकदा विचारपुस करून बघा मग समजतील आदिम वेशिष्ट्ये. 3. संस्कृति: धनगर जमातीची आदिवाशी जमातीसारखीच संस्कृति आहे खंडोबा, बिरोबा, धुळोबा हे धनगरांचे देव तसेच ढोल वाजवणे, धनगरी गजी नृत्य, धनगरी ओव्या यातून धनगर समाजाच्या संस्कृतिचा अभ्यास करता येतो. ओरॉन धनगर जमातीचे देव सुद्धा सारखेच आहेत. 4. भौगोलिक पृथक्करण: आदिवाशी जमात डोंगरदरीमध्ये जंगलामध्ये पाड्यावरती एकाच ठिकाणी स्थायिक राहते पण धनगर जमात ही डोंगर दरीमध्ये रानोमाळी, जंगलामध्ये आज इथे तर उद्या तिथे असे मुक्काम करत, अख्खा संसार घोड्याच्या पाठीवर लादून कोकरा-करडांचं आणि लेकराबाळाचं लटांबण घोड्याच्या पाठीवरील माचोळीवर बांधून तळहातावर पोट भरणारी धनगर जमात अभ्यासून पाहा. 5. लाजरे बुजरेपणा धनगर समाजातील बांधव जास्त लोकवस्तीत येत नाहीत समूहाने राहतात नागरी वस्तीत मिळत नाहीत मिसळत नाहीत कारण दिवसभर मेंढ्यांच्या पाठी पायाच्या नडग्या वाळवण्यातच कितीतरी पिढ्या बरबाद झाल्या त्यामुळे धनगर जमातीत अजूनही लाजरे बुजरे पणा तसाच आहे. संघटितपणे लढाई महत्वाची :धनगर समाजाला राज्यघटनेत अधिकार दिले असताना आदिवाशी पेक्षाही अत्यंत बिकट आणि हालाखीचे जीवन जगणारी धनगर जमात ही अनुसुचित जमातीमध्ये मोडत नाही असे ओरडून सांगणाऱ्या अर्धवटांचे मला हसू येते. धनगर जमात ही भटकी जमात आहेच आहे आणि महाराष्ट्र राज्यात फक्त (केंद्रात नव्हे) धनगर जमात ही भटक्या जमाती -क मध्ये आहे. ते पण वक्रतुंडाच्या अवकृपेने १९९१ पासून पण आमच्या धनगर समाजाचं संघटन मजबूत असतं तर आज यशवंत सेना संस्थापक स्व बी के कोकरे साहेबांच्या प्रयत्नातून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती कधीच मिळाल्या असत्या आणि आजच्या प्रस्तापितांचे तळवे चाटणार्या नेत्यांना भिक मागायची वेळ आली नसती. आज आदिवाशी समाजातील काही पोरं कोणाच्यातरी सांगण्यावरून लिहू लागतात की धनगर समाजातील लोक र चा ड झाला असे सांगत रडत बसलेत पण त्या वळवी ला माझे सांगणे आहे की आम्ही रडणाऱ्यांपैकी नाहीये. जर मनात आणलं तर क्षणात उध्वस्त करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आजपर्यंत अन्यायाच्या विरोधात रणशिंग फुंकणारे फक्त धनगरच आहेत याचा विसर कोणास पडू नये. धनगर समाजात अज्ञान पसरवण्यास प्रस्तापित व्यवस्थाच जबाबदार असून धनगर समाजाने यास बळी न पडता सर्वानी एकजुटीने/संघटितपणे आपले हक्क हिसकावून घ्यायला हवेत नाहीतर पुढची पीढी आपल्या तोंडात शेण घालेल याचा विचार करा. खरी चूक कोणाची? देशाच्या स्वातंत्र्यानंतरच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून धनगर समाजावरती सतत अन्याय होत आला आहे. आदीवाशीपेक्षाही धनगर समाज आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असताना धनगड नावाची जमात महाराष्ट्रात नसताना राज्यघटनेत धनगड नावाचा उल्लेख करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना चुकीचे ठरवायचे की सर्वानुमते २६ जानेवारी १९५० ला आमलात आणलेल्या राज्यघटनेवरती आजचा राज्यकारभार चालवणारे राज्य सरकार चुकीचे ठरवायचे? धनगड नावाची जमात महाराष्ट्र राज्यात नाही शिवाय धनगर आणि धनगड हे वेगळे नसून एकच असल्याचे संशोधकीय अहवाल असताना देखिल धनगर समाज आदिवाशींचे निकष पुर्ण करतो की नाही यासाठी टाटा इंन्सटीट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेला ६५ वर्षानंतर सर्वे करायला सांगणारे राज्य सरकार धनगर समाजाचे आरक्षण घशातून काढण्याचा प्रयत्न तरी करत नाही ना.? अशी शंका कोणाच्याही मनात गोंधळ निर्माण करणारी आहे. यामुळे मागले तसेच म्होरले ही म्हण सार्थ ठरते की काय याचाच विचार सतत मनात घोळत असतो. धनगर समाजात नेतृत्वाचा अभाव आहे शिवाय जे जे नेतृत्व करत आहेत ते देखिल समाजाचे भांडवलीकरण करून स्वताचा स्वार्थ साधत आहेत अशीच परिस्थिती आजही पाहायला भेटते आहे. समाजाच्या नावावरती ज्यांना आमदारक्या, मंत्रीपदं मिळाली, खासदारकी मिळाली त्यांना कधी समाजाची आठवण झालीच नाही. अगोदरच्या कॉंग्रेस-रा.कॉंग्रेसची तर मानसिकताच नव्हती त्यात भाजप सत्तेवर आल्यावर पहिल्या कॅबिनेट मध्येच आरक्षणाची तरतुद करू म्हणणाऱ्या फसणवीसांचा ५ वर्ष उलटून गेली तरी अजून अभ्यास चालूच होता त्यात देखिल गरज नसताना TISS चे भूत मानगुटीवर बसवले त्याला धनगर समाजातील संबंधित निष्क्रिय नेते जबाबदार आहेत. आणि तेच नेते चांगभलं बिरोबा म्हणत आरक्षणाचा खेळखंडोबा करत बसलेत. आणि आता तीन तिघाडी काम बिघाडी सरकार सत्तेवर आले असले तरी त्यांची काही मानसिकता दिसत नाही. त्यामुळे समाजाचा आक्रोश अजून दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसुचित जमातीच्या सवलती अजून समाजाला न मिळाल्याने समाजाचे वाटोळे झाले आहे मग ते लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी बुद्धीजीवी वर्ग झटत असताना झगडत असताना समाजाची बाजू मांडणारेच लेखक हे विनाकारण बुद्धी पाजळवत आहेत असे मत समाजातील काही नेत्यांची धोतरं सांभाळणाऱ्यांचे आहे ते खरंतर चुकीचे ठरते असे म्हणायला मला वावगं वाटणार नाही. कदाचित माझ्या या वाक्याचा काहीजनांना राग येईल पण मला त्याची पर्वा नाही. कारण समाजापेक्षा कोणतीही व्यक्ति थोर नाही. आजची युवा पिढी भलतीकडेच भरकटत चाललीय त्यांना योग्य समाजप्रबोधनाची, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तरच समाज प्रगतीपथावर वाटचाल करेल... 
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!! 
         ✍️नितीनराजे अनुसे 
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
            +919531966943 
 nitinrajeanuse123.blogspot.com

Wednesday, 16 March 2022

इंदोर नरेश माळवाधिपती श्रीमंत थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांची आज जयंती

 

इंदोर नरेश माळवाधिपती श्रीमंत थोरले सुभेदार राजे मल्हारराव होळकर
दि.१६ मार्च २०२२

      सळसळत्या रक्ताच्या आणि मनगटाच्या जोरावर तसेच धारदार तलवारीच्या टोकावर दुश्मनांना कोलून टाकणाऱ्या, स्वकर्तृत्वावर आणि स्वबळावर स्वतःचे साम्राज्य उभे करत करत शिवछत्रपतींनी उभा केलेल्या मराठ्यांचे साम्राज्य अबाधित राखणाऱ्या तसेच त्याचा विस्तार वाढवत आजच्या पाकिस्तानातील पेशावर, अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या रणमर्दास अर्थातच थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना त्यांच्या ३२९ व्या जयंतीनिमीत्त मानाचा जय मल्हार कोटी कोटी प्रणाम. घोड्यांच्या टापांनी अख्खा हिंदूस्तान ढवळून काढणाऱ्या मल्हाररावांना युद्धतंञात पारंगत असलेला एक धुरंदर लढवय्या म्हणून ओळखले जाते ते त्यांच्या अंगी असलेल्या कुशल "मल्हारतंत्र" आणि "मल्हारनीती"मुळेच...

एके दिवशी मामाच्या मेंढ्या चारायला घेऊन गेल्यानंतर मल्हाररावांनी पाहिले की मामाच्या शेतामधून सजवलेल्या अंबारीचे हत्ती, घोडे सैनिक शेतातील पिकाची नासधूस करत पिक तुडवत चालले होते तेव्हा त्यांनी त्याच रानातील एक ढेकुळ उचलला तो सरळ सजवलेल्या हत्तीवर अंबारीत बसलेल्या पेशव्याच्या पाठीत मारला. धनगरांच पोर ते रक्तातच धनगरी बाणा जसाच्या तसाच.... डोळ्यात निखारा जसाच्या तसाच.... निर्भिडही तेवढाच.... मल्हारवांनी पेशव्यांस ढेकुळ मारला तसे सर्वजण अवाक् झाले एवढी हिम्मत झाली कोणाची असा प्रश्न पेशव्यांच्या सरदारांना पडला, पेशव्याचे काही सैनिक मल्हाररावांकडे धावून गेले पण त्या धनगराच्या पोराचे धाडस पाहून पेशवा देखिल हडबडून गेला होता. त्याचे हे धाडस पाहून त्याला सरदार बारगळांनी स्वताच्या सेवेत सामिल करून घेतले ती टोळी होती दाभाड्यांच्या कंठाजी कदमबांडेंची आणि तेथूनच शिपाईगिरी करत असतानाच स्वताची स्वतंत्र फौज उभा करून आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर मल्हाररावांनी माळवा प्रांतांत स्वताच्या हिंमतीवर आणि स्वकर्तृत्वावर अनेक लढाया गाजवल्या बड्या बड्या शत्रुंना मल्हाररावांनी तलवारींचे पाणी पाजले हे पाहून बाळाजी विश्वनाथांनी (पेशव्यांनी) मल्हाररावांशी तह करून माळवा प्रांतांची जबाबदारी सोपवली. त्याचे कारण असे होते की दयाबहादूर हा एकेकाळी माळव्याचा सुभेदार असताना शेतकरी रयतेस नाहक त्रास देत असे दयाबहादूर व त्याच्या हाताखालचे मुनीम शेतकऱ्यांना रयतेला पिळत होते. तेव्हा मराठ्यांना बोलवले तर ते प्रजेची मदत करतील असा सल्ला जयपूरच्या राजाने दिल्यावर माळवा प्रांतात उतरून धारजवळील तिर येथे मल्हाररावांनी फौजेसरशी लढाईला आलेल्या दयाबहादूराला मारून माळवा प्रांत हस्तगत केला त्यांच्या शौर्याची दखल घेत बाजीराव पेशव्यांनी २६ मे १७२९ ला त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. अशा प्रकारे एक धनगरांचे पोर काठीने मेंढ्या हाकता हाकता स्वराज्यासाठी तलवारीने शत्रुंना कधी हाकू लागले तेच समजले नाही.


मल्हार आया मल्हार आया म्हटलं तरी उत्तर भारतालाच नव्हे तर अफगाणिस्तानच्या अब्दालीला देखील कापरं भरायची. मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापांचे जरी आवाज ऐकायला आले तरी कित्येक गावंच्या गावं ओस पडायची हीच त्यांची धमक होती अन् हाच त्यांचा दरारा. आजही उत्तर भारतीयांच्या कानात मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापाचे आणि येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजराचे आवाज निनादत असतील... लढाईत सर्वात पुढे राहून राहून, सैन्यांचे नेतृत्व करून मुसंडी मारत शत्रुंना वायूवेगाने कापत सुटणाऱ्या मल्हाररावांचा दबदबा एवढा होता की शत्रुपुढे "मल्हार" जरी नाव उच्चारले तरी त्यांची पळता भुई थोडी व्हायची. मल्हाररावांचा स्वभाव जितका प्रेमळ होतका तितकाच राकटसुद्धा. एकदा कुंभेरीच्या लढ्यामध्ये सुरजमल जाटाने किल्ल्याला वेढा घातला होता मल्हाररावांचे सुपुत्र शुरवीर खंडेराव होळकर माचावर लढत सैन्यांचे नेतृत्व करत शत्रुंना तोंड देत होते इतक्यात सुरजमल जाटाकडून जेजाल्याचा गोळा आला आणि खंडेरावांच्या छाताडावर आदळला , खंडेराव धारातीर्थी कोसळले. स्वतःच्या मुलाला डोळ्यासमोर ठार केलेलं पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली नसानसात रक्त सळसळू लागले डोळे लालबुंद झाले हाताच्या मुठी आवळल्या गेल्या अन् त्यांनी मल्हारी मार्तंडाची शपथ घेतली की या सुरजमल जाटाचा शिरच्छेद करून, कुंभेरीची माती खणून यमूनेत टाकेन तरच दक्षिणेला (महाराष्ट्रात) परत जाइन. पण भयभीत झालेल्या सुरजमल जाटाला काय करावे सुचत नव्हते तेवढ्यात सुरजमल जाटाची पत्नी हंसिका हिने जयाप्पा शिंद्यांशी बोलणी करून सुरजमल जाटाचा पेशव्यांसोबत सुलुख घडवून आणला. तेव्हापासूनच मल्हाररावांचा पेशव्यांवरील अन् पेशव्यांचे हुजरे असलेल्या शिंद्यावरील विश्वास उडाला होता त्याचा प्रत्यय १८ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणि १९ व्या शतकाच्या पहिल्या दशकात येतो जेव्हा राष्ट्रमाता अहिल्याई होळकर स्वतंत्रपणे माळव्याचा राज्यकारभार पाहत होत्या आणि महाराजाधिराज शुरवीर योद्धा यशवंतराव होळकर राष्ट्रासाठी स्वतंत्रपणे इंग्रजांशी झुंज देत होते तेव्हा पेशवे आणि शिंदे हे दोन्ही होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी खटाटोप करत होते. एवढेच नव्हे तर यशवंतराव पुण्यावर चालून आले तेव्हा शेपटी गुंडाळून पळपुटा पेशवा जेव्हा कोकणात पळून गेला आणि कोकणातून पत्रव्यवहार करून त्यांनी यशवंतराव होळकरांना सांगितले होते की होळकरांचं राज्य या राष्ट्राच्या मातीवरती अन्याय व अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश सरकारकडे विलीन करावं. याचाच अर्थ मल्हाररावांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली ती म्हणजे "एकवेळ दुश्मनांवरती विश्वास ठेवला तरी चालेल पण पाठीत खंजीर खूपसणाऱ्या शिंद्यांवरती अन् पेशव्यांवरती कधीच विश्वास ठेवायचा नाही".   

          सांगायचा मथित अर्थ एवढाच की आजही आम्ही विनाकारण शेंडीने गळा कापणाऱ्या मॉडर्न पेशव्यांच्या आहारी जाऊन समाजाचे आणि परिणामी देशाचे वाटोळे करून घेतोय हे आम्हाला अजूनही कळत नाही आणि कळले तर वळत नाही. आजची युवा पिढी भलतीकडेच भरकटत चाललीय. ज्या लोकांना आपला इतिहासच माहित नाही, आपण कोण होतो त्याची त्यांना जाणीव नाही अशी लोकं भविष्यात दुसऱ्यांची चाकरी आणि गुलामगिरी करू शकतात पण इतिहासाचा वसा आणि वारसा जपू शकत नाहीत. त्यामुळे आजच्या युवा पिढीसमोर आवाहन आहे की एकेकाळी राजा समाज असणाऱ्या आपल्या जमातीला इतिहास कोळून कोळून पाजावा लागेल तेव्हा आणि तेव्हाच आपण प्रगती करू शकतो नाहीतर दुसऱ्यांची धोतरं बडवत बसाल. आज १६ मार्च १६९३ हा दिवस म्हणजे तमाम मराठेशाहीचा, मल्हारशाहीचा एक नवीन सुर्योदय म्हणाल तरी ऐतिहासिकदृष्ट्या ते वावगं ठरणार नाही. तसेही काही ब्रिटिश लेखकांची री ओढत इथल्या मातृभूमीमधील काही नालायक तथा जातीयवादी इतिहासकारांनी जाणूनबुजून थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास मलिन करण्याचे पाप केले. परंतु कोंबडा कितीही झाकून ठेवला तरी सुर्य उगवायचा काही थांबणार नाही तशाच प्रकारे चुकीच्या इतिहासकारांनी कितीही चुकीचा इतिहास लिहिला तरी समाजातील महापुरुषांचा खरा इतिहास समोर आल्याशिवाय राहणार नाही. अठराव्या शतकात आजच्या पाकिस्तानमधील अटकेपार मराठेशाहीचा झेंडा डौलाने फडकवणाऱ्या आणि मराठेशाहीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या रणझुंजार अशा रणमर्दाची आज ३२९ वी जयंती त्यानिमीत्त थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा विनम्र जय मल्हार...

जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥

         ✍️नितीनराजे अनुसे✍️

   अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1827627237429824&id=305578499634713

Saturday, 4 September 2021

इंटरनेट एक 'माया'जाळ... ✍️नितीनराजे अनुसे

 


इंटरनेट एक 'माया'जाळ... ✍️नितीनराजे अनुसे

दि.०४ सप्टेंबर २०२१

           आजच्या एकविसाव्या शतकात अर्थातच तंत्रज्ञान विकसित युगात इंटरनेट हे एक महत्त्वाचे म्हणण्यापेक्षा दैनंदिन जीवनातील खूप गरजेचे साधन झालेले आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. इंटरनेटची कल्पना काय आताच जन्माला आली नाही तर १९६९ मध्ये अमेरिकन लष्कराने संदेशवहनासाठी आर्पानेट नावाचे पायाभूत नेटवर्क सुरू केले होते. कालांतराने नवनवीन संशोधन व माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी या नेटचा वापर करण्यात आला. म्हणजेच १९६९ साली इंटरनेट चा खरा जन्म झाला परंतु भारतात शिक्षणासाठी तसेच संशोधनासाठी इंटरनेटचा वापर १९८८ पासून सुरू झाला. तसे पाहिले तर इंटरनेट मुळे सर्व काही सोयिस्कर झाले आहे असे वाटते कारण इंटरनेट मुळे इ मेल - माहितीची देवाण घेवाण- जगभरच्या मित्रांशी, सहकाऱ्यांशी वा नातेवाईकांशी आपण संपर्क ठेवू शकतो. जगातील कोणत्याही संगणकावर आपणास काम करता येते व तेथे आपले प्रोग्रॅम चालवून पहाता येतात. आपल्या संशोधन प्रबंधासाठी वा व्यापार उद्योगासाठी आपण इंटरनेटचा उपयोग करू शकतो. इंटरनेटमुळे जगातील वृत्तपत्रे, मासिके, लायब्ररीतील पुस्तके, म्युझियम, संगीत यांचा लाभ मिळू शकतो. शिवाय करमणुकीसाठी नवीन साधने देखील इंटरनेट वरती सहजपणे उपलब्ध होतात. काही सेकंदाच्या आतमध्ये ऑनलाईन पैसे देखील सहजपणे पाठवू शकतो.

          परंतु अलीकडच्या काळात इंटरनेट जेवढे फायद्याचे झाले आहे तेवढेच नुकसानदायक देखील ठरते आहे. आजची युवा पिढी या इंटरनेटच्या 'माया'जाळात सहजपणे अडकत चालल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते. हल्ली कोरोना विषाणू रोगामुळे लॉकडाउन काळात तर इंटरनेटच्या वापराचा कहरच झाला. लॉकडाउनमुळे चार भिंतीत कंटाळवाणे जीवन जगण्याऱ्यांना करमणुकीसाठी म्हणून दूरदर्शन व्यतिरिक्त इंटरनेटचा वापर करणे स्वाभाविक होते परंतु यामध्ये भरडली गेली ती आजची युवा पिढी आणि उद्याच्या भारताचं उज्वल भविष्य... लॉकडाउनमुळे शाळा, विद्यालय, महाविद्यालयांना लॉक (टाळे) लागले मग विद्यार्थ्यांच्या भवितव्याला टाळे लागणार नाहीत तर आणखी काय होणार? बर लॉकडाउनमुळे ऑनलाईन शिक्षण पद्धत चालू केली चांगली गोष्ट आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातोय त्याबद्दल दुमत नाही. परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हातात स्मार्टफोन/लॅपटॉप/नोटपॅड आले आणि शिक्षण राहिले बाजूला परंतु विदेशी कंपन्यांनी भरमसाठ एप्लिकेशन्स बनवून ठेवलेल्या गेम्स खेळण्यात आणि नको ते व्हिडिओ पाहण्यातच भारताचं उज्वल भवितव्य व्यस्त झालेलं दिसून येते. तर दुसरीकडे आजची युवा पिढी नेट सर्फिंगमुळे भलतीकडेच जास्त आकर्षित झालेली दिसून येते. इंटरनेटचे फायदे बाजूला ठेवून सोशल मिडिया (समाज माध्यमा) वरती फालतू गोष्टींमध्ये अग्रेसर असल्याचे देखील दिसून येते. मग फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम याव्यतिरिक्त व्हिडिओ चॅटिंग च्या माध्यमातून लैंगिक शिक्षण व लैंगिक आकर्षणाकडे इंटरनेटच्या आहारी गेलेल्या किशोरवयीन युवक युवतींचे प्रमाण आपसूकच वाढले आहे. फेसबुक, इंस्टाग्राम वरती रील्स/व्हिडिओ पोस्ट करून लाइक्स, फॉलोअर्स च्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याकडे आजच्या युवा पिढीचा कल जास्त आहे. रात्र रात्रभर जागरण करणे, व्हिडिओ चॅटिंग, व्हिडिओ सर्फिंग केल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक तथा शारिरीक संतुलन बिघडत असून शैक्षणिक ज्ञानावर भर देण्यापेक्षा किशोरवयीन मुला-मुलींचा लैंगिक आकर्षणाकडे जास्त भर असतो आणि सर्रास कंपन्या, वेबसाइट्स त्यांच्या अश्लीलतेच्या जाहिराती विकायला कुठेच कमी पडत नाहीत. इंटरनेट वरती महत्वाची माहिती पाहत असले तरी त्यावरती नको त्या जाहिराती दाखवल्या जातात. त्यामुळे पालकांनी जर आपल्या पाल्यांवरती वेळीच अंकुश ठेवला नाही तर पाल्यांचं उद्याचं भविष्य हे इंटरनेटच्या मायाजाळात अडकून अंधारातच राहील. कारण योग्य वापर केल्यास इंटरनेट जेवढे फायद्याचे आहे तेवढेच त्याचा गैरवापर केला तर ते खूप आणि खूपच नुकसानदायक आहे.सदरच्या ब्लॉगमधून समाजप्रबोधन व्हावे हीच प्रामाणिक तळमळ आहे. 

                         ✍️नितीनराजे अनुसे

                         अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली

                         nitinrajeanuse123@gmail.com

Thursday, 3 December 2020

जातीयवाद्यांच्या तावडीत सापडलेला महान द्रष्टा योद्धा ✍ लेखन - नितीनराजे अनुसे

राष्ट्रपुरुष धुरंधर लढवय्या महाराजा यशवंतराव होळकर

        होय, मराठ्यांच्या इतिहासात मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर शत्रूंच्या चारी मुंड्या जीत करणाऱ्या, मराठ्यांचा इतिहास जाज्वल्यमान आणि दैदिप्यमान करणाऱ्या धुरंधर योद्ध्यांचा विसर मराठी माणसांना पडणे हे मराठी माणसांचेच नव्हे तर सबंध हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महा'राष्ट्रा'चे दुर्देवच म्हणावे लागेल. परंतु त्यापलीकडे जाऊन मी हेच म्हणेन की मराठ्यांच्या इतिहासात मर्दुमकी गाजवणऱ्या बहुजन समाजातील अशा धुरंधर योद्ध्यांचा इतिहास न अभ्यासने म्हणजेच त्या त्या मराठी माणसांना कदाचित जातीयवादाची झालेली कावीळ असावी...
       असेच धुरंधर लढवय्ये, शुन्यातून विश्व निर्माण करणारे  होळकर साम्राज्याचे सुभेदार तुकोजीराव होळकर यांचे धाकटे सुपूत्र म्हणजेच सळसळत्या रक्ताची आणि लखलखत्या तलवारीची धार असलेले धुरंधर योद्धे, एक महान तथा द्रष्टा योद्धा चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर. तत्कालीन हिंदुस्तानचा अर्थातच अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील क्रमांक एकचा शत्रू कोण असेल तर ब्रिटीशांचे नाव समोर येते. परंतु  छत्रपती शिवरायांपाठोपाठ असा एकला महाराजा यशवंतराव होळकर लढवय्या होता की ज्यांना स्वराज्यातीलच काही लालची शिलेदार आणि सरदारांकडून तितकाच अन्याय झाला जितका ब्रिटिशांनी या हिंदुस्तानच्या मातीवर केला. 
           तसे पहायला गेले तर तो काळ फार अंदाधुंदींचा होता, कोणाचा पायपोस कोणाच्याच पायात नव्हता. रणांगणात रक्त सांडून उभा केलेली होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी पेशव्यांचेच सरदार होळकरांचे सोबती  अलिजाबहाद्दर दौलतराव शिंदे टपून होते आणि पेशवे देखील मागचा पुढचा विचार न करता त्यांस भरीस पडत गेले. अशातच  भांबुर्ड्याच्या मैदानात काशीराव होळकरांना भरीस घालून शिंद्यांनी साखरझोपेत असतानाच तुकोजी बाबांचे द्वितीय सुपुत्र महाराजा मल्हारराव होळकर (द्वितीय) यांची हत्या केली तर यशवंतराव सुखरूपपणे तिथून निसटले. अशी दुर्बुद्धी सुचलेल्या शिंद्यांना आणि पेशव्यांना समजावून सांगणारा जाणकार कोणी या स्वराज्यात नव्हता जे होते त्या नाना फडणिसांना पेशव्यांनी कैदेत ठेवले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. परंतु पुण्यातील पेशव्यांच्या व शिंद्यांच्या अशा कुटील राजकारणामुळे संपूर्ण रयत जात्यात भरडावी अशी भरडली जात होती. त्यात पेशव्यांच्या सरदारांनी खुद्द पेशव्यांच्या आज्ञेनुसार महाराजा यशवंतराव होळकर यांचे थोरले बंधू महाराजा विठोजीराजे होळकर यांना सूडबुद्धीने अटक करून हत्तीच्या पायी दिले. एखादा कसाब जनावरांना जेवढा त्रास देत नाही त्यापेक्षा क्रुर पद्धतीने विठोजीराजेंना ठार मारले ते छत्रपती शिवरायांनी स्थापित केलेल्या स्वराज्याच्या हिताचे मुळीच नव्हते. अशा वेळी शिंद्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊन होळकरांची गादी राहावी की नको याची शहानिशा करण्यासाठी समोरासमोर पेशव्यांशी मसलत करण्यासाठी महाराजा यशवंतराव होळकर दक्षिणेकडे कुच करतात. शिंद्यांची राजधानी उज्जैन काबीज करून वाटेत येणारी त्यांची ठाणी व महाल ताब्यात घेत नाशिक, बारामती  सुद्धा महाराजांच्या फौजेने ताब्यात घेतली. यालाच या मातीतले काही चुकीचे जन्माला आलेले जातीयवादी इतिहासकार म्हणतात 'होळकरी दंगा'. परंतु होळकरांचे महाल शिंद्यांनी घशात घातले होते, मल्हारराव होळकर द्वितीय यांची शिंद्यांनी हत्या केली पुढे महाराजा विठोजीराजे होळकर यांना देखील हत्तीच्या पायी देऊन क्रुर रित्या ठार मारले तेव्हा शिंद्यांचा आणि पेशव्यांचा दंगा इथल्या जातीयवादी आणि नालायक इतिहासकारांना दिसला नाही का? 

            असो किमान यानंतर तरी पेशव्यांनी समजदारीने विचार विनिमय करायला हवा होता परंतु 'विनाशकाली विपरीत बुद्धी' या म्हणीप्रमाणे महाराजा यशवंतराव होळकरांच्या फौजेला अडवण्यासाठी पेशव्यांनी शिंद्यांच्या आणि त्यांच्या कारभाऱ्यांच्या सांगण्यावरून सदाशिवराव बक्षी यांची कसलेली फौज उत्तरेतून बोलवली. राजधानीत रयतेच्या हिताची खलबते व्हायच्या ऐवजी होळकरांना कसं संपवायचे याचेच विडे उचलले जात होते. मराठ्यांच्या दौलतीत ज्या होळकरांनी भर घातली, उत्तर हिंदूस्थान घोड्याच्या टापांखाली आणून दिल्लीचे तख्तच नव्हे तर ज्या होळकरांनी अटकेपार मराठ्यांचे झेंडे फडवले त्या होळकरांना संपवायची कटकारस्थाने शिंद्यांनी चालवली होती. परंतु रणांगणातून माघार घेइन तो जातीवंत योद्धा कसला?  यशवंतराव होळकर देखील काय कमी नव्हते, ऐन पंचविशीतलं रांगडं धनगराचे पोरगं ते, अख्ख्या हिंदूस्थानभर गाजलेली नावाजलेली फौज यशवंतरावांकडे होती. हडपसरच्या माळावर महाराजा यशवंतराव होळकर यांची छावणी पडली होती. पाराजीपंतांनी समजावून सांगूनही पेशव्यांनी शिंद्यांच्याच कारभाऱ्यांचे ऐकून घेतले आणि तिथेच छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याचा घात झाला. शेवटी ऐन दिवाळीला अभ्यंगस्नानादिवशी सकाळी सकाळी लढाईला तोंड फुटले सरकारी फौजेकडून (शिंदे व पेशव्यांच्या फौजेकडून) वीस-पंचवीस तोफांचे बार उडाल्यानंतरच यशवंतरावांनी त्यांना प्रत्युत्तर द्यायला आपल्या फौजेला हुकूम दिला आणि बघता बघता होळकरांच्या फौजेने शिंद्यांची-पेशव्यांची फौज कापत ती वानवडी पर्यंत रेटत नेली. होळकरांचे सरदार आपापले मोर्चे शिताफीने सांभाळत शत्रूंवर चाल करत होते. मार्तंड मार्तंड असा जयघोष करत फौजेला प्रोत्साहित करत महाराजांनी लंकेवरून (महाराजा यशवंतराव होळकर यांची घोडी- लंका) खाली उडी मारली आणि दोन्ही हातात दांडपट्टे घेऊन शिंद्यांच्या फौजेत घुसले आणि बघतो न बघतो तोपर्यंत सपासप वार करत हजार दोन हजार फौज त्यांनी कापून काढली होती. महाराजांची फौज देखील महारांजांचे अनुकरण करत शत्रूंवर तुटून पडत होते. त्याच आवेशात महाराजांनी विंचूरकरांना ओरडून सांगितले की तुम्ही माघारी फिरा तुम्ही आमचे शत्रू नाही तर शिंदे आणि शिंद्यांचे सरदार आमचे शत्रू आहेत. तोच विंचूरकरांना त्यांच्या फौजेने माघारी ओढले तोपर्यंत महाराजांच्या दांडपट्ट्याच्या फटक्यात सदाशिवराव बक्षींचे शिर धडावेगळे झाले. सगळीकडे शिंद्यांच्या-पेशव्यांच्या सैनिकांची हाडे पसरली होती. शेवटी शिंदे-पेशव्यांचे काही सरदार रणांगणातूनच पळून गेले. यशवंतरावांच्या तोफांच्या माऱ्याने पुणे जळले, आगीचे लोळ आकाशात उंच उंच दिसत होते. तोपर्यंतच कोण जिंकले कोण हारले हे न बघता भितीपोटी खुद पेशवा आणि बाळोजी हे मल्हारबाबांचा(द्वितीय) पुत्र  खंडेराव होळकर (द्वितीय) यांना घेऊन कोकणात पळून गेले. ते पुन्हा यशवंतराव होळकरांनी विनवणी करून देखील माघारी आलेच नाहीत. शेवटी फौजेच्या दाणागोट्यासाठी, अन्नपाण्यासाठी मंदिरातील पैसा बाहेर काढावा लागला. 

       वसई ला जाऊन पेशव्यांनी गोऱ्यांशी तह करून महाराजा यशवंतराव होळकर यांना होळकर दौलत ब्रिटीशांच्या स्वाधीन करण्याची पत्रे पाठवली तेव्हा महाराजा यशवंतराव होळकर संतापले. पेशव्यांच्या तहानुसार ब्रिटिश फौज पुण्यावर चालून येत आहे असे समजताच त्यांच्या फौजेस फुटकी कवडी देखील मिळू नये या उद्देशाने व राष्ट्र बांधणी साठी फौजेच्या लष्करी खर्चासाठी मंदिरातील दाग दागिने पैसा महाराजा यशवंतराव होळकर यांनी बाहेर काढला, पेशव्यांची राजधानी असलेला शनिवार वाडा सोडला तर इतर सरदारांचे महाल लुटून फस्त केले. याचाच इतिहासात उल्लेख करताना तेव्हाचा शत्रू असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, लेखकांनी महाराजा यशवंतराव होळकर यांना बंडखोर लुटारू, होळकरी दंगा अशी विभूषणं लावून महाराजांना बदनाम करण्याची एकही कसर सोडली नाही आणि त्यांचीच री ओढत खोलात जाऊन अभ्यास न करता इथल्या जातीयवादी लेखकांनी इतिहासकारांनी यशवंतराव होळकर यांना तीच विभूषणं लावून त्यांचा खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला.
         परंतु महाराजा यशवंतराव होळकर काही कमी नव्हते. जे इंग्रज भारतभुमीवर पाय पसरू लागले होते त्यांच्या विरोधात स्वकर्तृत्वावर दंड थोपटून ते उभे राहिले. भानपुऱ्यात त्यांनी तोफांचा आणि गोळाबारूदांचा कारखाना सुरू करून लढाईची धोरणं आखली. थोरले सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर म्हणायचे की गादीचा खरा वारसदार तोच असतो जो मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर लढाया मारून, कर्तृत्व गाजवून स्वराज्याचे रक्षण करतो. महाराजा यशवंतराव होळकर हे त्याच तालमीतून पुढे आलेला एक द्रष्टा योद्धे. होळकर साम्राज्याच्या, स्वराज्याच्या पलिकडे जाऊन त्यांनी ब्रिटीशांना मातृभूमीतून हाकलून लावण्यासाठी हिंदूस्थान अवघे एक राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून तलवारीची मूठ घट्ट पकडली आणि घोड्याच्या पाठीवर मांड टाकून डोळ्यांच्या पापण्या पडायच्या आत समोरासमोरील लढाईत जगभर गाजलेल्या ब्रिटिश फौजेला कापून काढत, इंग्रज अधिकाऱ्यांना गुडघे टेकायला भाग पाडून त्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या आणि अशा शिस्तबद्ध अजिंक्य मानल्या जाणाऱ्या ब्रिटीश कवायती फौजेची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली. एक नव्हे, दोन नव्हे तर ब्रिटीश फौजेशी मुकाबला करत तब्बल एकणिस लढायांमध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांनी विजय मिळवला होता. समोरासमोरील लढाईत तर कधी कधी सपाट मैदानावर देखील गणिमी काव्याने ब्रिटीश फौजेवर चढाई करणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या फौजेसमोर नवनवीन शस्त्रं असलेल्या ब्रिटिश फौजेचा टिकाव लागत नव्हता तेव्हा ब्रिटीशांनी होळकरांच्या सरदारांना फंद फितुरी करून होळकरांची फौज कमी करायला सुरुवात केली. हिंदूस्थातील सर्व राजा महाराजांना पत्रं पाठवून, विनवणी करून देखील एकही खरा माइचा लाल इंग्रजांच्या विरोधात लढायला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या सोबत आला नाही हे या राष्ट्राचे दुर्दैव होते. अन्यथा गोऱ्यांनी भारतावर कधीच राज्य केले नसते. योगायोगाने युरोपात नेपोलियन बोनापार्ट याची सुद्धा लढाई ब्रिटीशांच्या विरोधात होती. त्यावर सुप्रसिद्ध शाहीर अमर शेख पोवाडा गाताना म्हणतात की,
"करीन रक्तबंबाळ देश मी ब्रिटीशानो तुमचा,
भारत भुमीच्या तसुतसुवर हक्क फक्त अमुचा.
फंदफितुरी बंद करा अन या मैदानाला,
मेल्या आईचे दुध होळकर नाही हो प्याला.
नेपोलियन युरोपात... ह्यो होळकर हिकडं...
अडकित्यातील जशी सुपारी करु तुकडं तुकडं"
      पुढे शाहीर म्हणतात की
शिवरायांमागे राजा एकला यशवंतराव
ज्याचं नाव पोवाड्यातून गावं आणि शाहीरानं डोक्यावर घेऊन नाचावं...
डोक्यावर घेऊन नाचावं... 

      अशा मुत्सद्दी योद्ध्याचा जन्म पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे वाफगावच्या भुईकोट किल्ल्यात दि. ३ डिसेंबर १७७६ रोजी झाला. आज महाराजा यशवंतराव होळकर यांची २४४ वी जयंती आहे. त्यामुळे द्रष्टा योद्धा तथा राष्ट्रपुरुष महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास खोलात जाऊन अभ्यासने व राष्ट्र उभारणी साठी त्यांच्या दूरदृष्टीचा अवलंब करणे हे आजच्या युवा वर्गासमोर एक आवाहन आहे.
जय मल्हार। जय अहिल्या। जय यशवंतराजे।
          ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +91 853 000 4123

Saturday, 16 May 2020

आम्ही नेमकं चुकतोय कुठे?

Old Post...
आज जनावरांची म्हणजेच कुत्र्या-मांजरांची जनगनना होते पण माझ्या धनगर समाजाची जनगनना होत नाही. का होत नाही? कशासाठी होत नाही?? असा आम्ही कधी विचारच केला नाही. कारण तितका विचार करण्याइतपच आमची बुद्धि पार भ्रष्ट झाली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
आज देशामध्ये गाई-म्हैसी, कुत्री-मांजरे एवढंच नव्हे तर जंगली प्राण्याची देखिल जनगनना होते. कुठे आणि कधी मोजायला जातात ते कोणास ठाऊक? म्हणजे भारत सरकारला जनावरांची जनगनना करायला वेळ, पैसा सर्व काही आहे पण माणसांची म्हणजे माझ्या धनगर समाजाची जनगनना करायला त्यांना सवड नाही.
जनगनना न झाल्याचा परिणाम काय? तर
राज्य घटनेत बाबासाहेबांनी कलम ३४२ मध्ये क्र ३६ वरती धनगड(धनगर) समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये १९५० साली सामावेश केला असून आमच्या अज्ञानपणामुळे आम्हाला ते माहीत नव्हते.  आज धनगर समाजाची जनगनना न झाल्याने धनगर समाजाची खरी लोकसंख्या कीती आहे हे अजूनही अंधारातच आहे. "र" आणि "ड" च्या फरकामुळे धनगर आणि धनगड हे एकच आहेत त्यासाठी अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी म्हणून खंबाटकीच्या घाटामध्ये स्व बी के कोकरे साहेबांनी सर्वप्रथम रास्तारोखो केल्यानंतर सांगली मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीच्या उपस्थिति मध्ये धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी करण्याऐवजी धनगर समाजाला भटक्या जमाती-क मध्ये घातलं. आज धनगर समाज हा राज्य पातळीवरती भटक्या जमाती-क (Nomadic Tribes-C) च्या सवलतींचा लाभ घेतोय तर महाराष्ट्राबाहेर हा धनगर समाज इतर मागास वर्ग  (Other Backward Class) च्या सवलतींचा लाभ घेतोय. त्यावेळी राज्य पातळीवरती धनगर समाजातील लोकसंख्येचा विचार करून (धनगर समाजातील पोटजातींचा विचार न करता) भटक्या जमाती-क मध्ये ३.५% आरक्षण दिले. पण धनगर समाजाच्या अनेक पोटजाती या महाराष्ट्र राज्यात आहेत त्यां सर्वांची जर जनगनना केली तर फक्त महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये धनगर समाज हा सर्वात जास्त आणि लोकसंख्येने १ क्रमांकाचा समुह असणारी जमात आहे. पण निश्चित लोकसंख्या ही सर्व जनगनना झाल्यानंतरच समजेल. मग सरकार जाणूनबुजून धनगर समाजाची जनगनना का करत नाही?? त्याचं उत्तर असं आहे की महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज हा भटक्या जमाती-क मध्ये आहे आणि पोटजातींचा विचार न करता भ.ज.-क (NT-C) चे ३.५% आरक्षण धनगर समाजाला दिलं गेलं आणि आमच्यातल्या आमच्यातच पोटजातींमध्ये भांडण लावायचं काम प्रस्थापितांनी केलं. याचा अर्थ असा की या राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक १ वरती असणार्या धनगर समाजाला फक्त ३.५% मध्ये गुंतवायचं आणि बाकीचा मलिदा इतरमागास वर्गातील व खुल्या वर्गातील समाजाला द्यायचा ही रणनीति आम्ही कधी अभ्यासणार???
एकुण लोकसंख्येच्या टक्केवारीवरुन त्याच्या निमपट आरक्षण द्यायचं अशी तरतूद असताना ३.५% आरक्षण म्हणजे महाराष्ट्र राज्यात धनगर समाज फक्त ७% एवढाच आहे का?? आज जर जनगनना केली तर धनगर समाज १७% नव्हे तर त्याहूनही अधिक आहे मग आमच्या बांधवांनी फक्त ३.५% मध्येच स्पर्धा करायची का??
धनगर, हटकर, व्हटकर, खुटकर, कुचेकर, सनगर, झेंडे धनगर, बंडी धनगर, खांडा धनगर अजूनही अधिक पोटजाती धनगर समाजात आहेत या सर्वांना महाराष्ट्र राज्यात फक्त ३.५% मध्ये अडकवलंय आणि बाकीचा इमाव मध्ये कमी लोकसंख्या असणारा समाज उरलेलेल्या २३.५%चा मलिदा खातोय त्याचाच परिणाम माळोरानी, रानावनातून भटकणार्या धनगर समाजाला याचा लाभच घेता आला नाही. आमचा धनगर समाज डोंगरदरी आणि दूर माळोरानी वास्तव्य करत आहे. काही ठिकाणी धनगर समाजाच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथे ना विजेची सोय आहे ना पाण्याची सोय  नाही शिक्षणाची व्यवस्था. त्यांच्याजवळ मी भारतीय आहे असे दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी साधं रेशन कार्ड सुद्धा नाही. भारतामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही. विजेची सोय नसल्यामुळे टीवी (दुरदर्शन), वृत्तपत्र  काय असतं तेच त्यांना माहीत नाही.
मग त्या आमच्या धनगर समाजबांधवांची जनगनना झाली का?? आणि झाली तर जनगनना कधी होणार?? तोपर्यंत आमची पुढची पीढी बरबाद करायचं सरकारचं धोरण आहे का?? कधी जाऊन तर बघा त्या ठिकाणी मग कळेल त्या सावरा-पिचड-मोघे-पुरकेला की हा धनगर समाज आदिवासी पेक्षाही अत्यंत हालाखीचं जीवन जगतोय की नाही ते... नुसत्याच शहरातील चार दोन कुटुंबांचा सर्वे करून हे भुंकु लागलेत.
 आज राष्ट्र पातळीवरती आमच्या समाजातील युवकांना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागतेय हे कीती दुर्दैव म्हणावे लागेल. आज राज्यघटनेत बाबासाहेबांनी तरतूद केल्याप्रमाणे जर अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळाले तर धनगर समाजाची पोरं राखीव आरक्षणातून राज्य आणि राष्ट्र पातळीवर नक्कीच पुढे येतील आणि शैक्षणिक राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदावरती पोहचतील. आज दहावी-बारावीचे निकाल झाले सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या तरी सरकार आल्यावर १० दिवसात आणि तद्नंतर १५ दिवसांत निर्णय घेणार असे म्हणनारे मुख्यमंत्री धनगर आरक्षणावरती कसली पीएचडी करताहेत तेच समजत नाही?? आज धनगर समाजातील हजारो विद्यार्थ्यांना ३.५% स्पर्धा करावी लागणार आणि खुल्या वर्गात तर आमच्या पोरांना संधीच देत नाहीयेत मग कुठल्यातरी खाजगी विद्यालयात लाखो रूपये डोनेशन फी भरून प्रवेश घ्यावा लागणार हे मात्र नक्की पण आर्थिक मागासलेपणा असलेला समाज एवढे पैसे आणणार कुठून??? जर आरक्षण दिले तर महाराष्ट्र राज्यात शरद पवाराच्या पै-पाहुण्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना पैसे कोठून भेटणार याचं गणित तुमच्या डोक्यात कसं काय येत नाही??? आम्ही अशा गोष्टींचा विचार करत नसलेमुळे आम्हा स्वतःचे व पर्यायानं धनगर समाजाचे फार मोठं नुकसान झाले आहे. यासाठी आमची जनगनना व्हायला हवी म्हणून सरकारवरती जर दबाव आणला तर आपले हक्क आपल्याला मिळतील व त्याचा लाभ माझ्या धनगर समाजातील गोरगरीब समाजबांधवाला नक्कीच होईल  हे सांगायला मला काही वावगं वाटणार नाही. आम्ही आजपर्यंत चुकत आलोय कारण आम्ही अज्ञानी होतो आणि अज्ञानपणामुळं आमच्या मागण्या काय आहेत हे आम्ही सांगू शकलो नाही. पण आता आम्ही शिकलो-सवरलो एवढंच नव्हे तर लिहायला लागलो आणि बोलायला देखिल लागलो. आता येथून पुढे पोटजाती बाजूला ठेवून अखंड धनगर समाजबांधवांनी फक्त "धनगर" म्हणून एकत्रित यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. तरच आम्ही सरकारला गुडघ्यावर टेकायला भाग पाडू आता आम्ही नुसतंच मागत बसणार नाही तर आमच्या हक्काचं हिसकावून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही ही आमची धनगराची औलाद आहे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         8530004123
 nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................


एकेकाळी या हिदूस्थानावर ३५० वर्षापेक्षा अधिक काळ राज्य करणारी आमची औलाद म्हणजेच राजा समाज असणारी आमची जमात गतकाळी अज्ञानपणामुळे गुलामगीरीत जगतेय. जगजेत्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावर्तित करणार्या भारताचे आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, अखंड भारत आणि ईशान्येकडील नेपाळ, भूटान आणि अफगानिस्तान आपल्या अधिपत्याखाली आणणर्या राजा सम्राट अशोकाचे आम्ही वारसदार आज आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून लढतोय आणि झगडतोय. धनगरपुत्र राजा सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील "अशोक स्तंभ" हा आज प्रत्येक भारतीयाच्या खिशात असलेल्या प्रत्येक नाण्यावर अभिमानानं दिसतो कारण हे भारताचं बोधचिन्ह म्हणून गौरवण्यात आलं. तद्नंतर भारतामध्ये तसेच देशोविदेशात जो भारतीय झेंडा डौलाने आणि अभिमानाने फडकतो त्यावरील जे निळसर अशोकचक्र आहे ते सुद्धा धनगरपुत्र राजा सम्राट अशोक यांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची आठवण आम्हा भारतीयांना करुन देतं. आणि आज हीच राजा समाज असलेली आमची औलाद आज गुलामगीरीचं जीवन जगतेय याचं दुख मनोमन होतंय. या राजा समाजाला आपले हक्क मागावे लागतात अशी वेळ का आली?? याला नेमकं जबाबदार कोण असेल तर माझ्याच धनगर समाजातील नेते यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आमचं नेतृत्व जर सक्षम असतं तर आमच्यावर भिक मागायची वेळ आलीच नसती.
गेल्या वर्षी १५ जुलै २०१४ रोजी ता पंढरपूर जि सोलापूर येथून आरक्षण दिंडी पदयात्रा निघाली  अन् २१ जुलै २०१४ रोजी बारामतीला येवून धडकली होती आणि तिथंच अखंड महाराष्ट्रातील ४ लाखांवरती धनगर समाज ठिय्या मांडून आमरण उपोषणासाठी बसला होता. तत्कालीन सरकारने अन्याय तर केलाच होता पण सदरच्या भाजप सरकारने महाराष्ट्रात सरकार आल्यावर १० दिवसात आरक्षणाची अमलबजावणी करू असं आश्वासन दिलं होतं पण आज भाजपचं सरकार आलं १० दिवस दूरची गोष्ट पण १० महिने नव्हे तर ११ महिने उलटून गेलेे पण अजूनही आमच्या वाट्याला तोच अन्याय आणि पोकळ आश्वासनं एवढंच आले आहे. एक म्हण आहे की "आजा मेला अन् नातू झाला घरात माणसं तेवढीच" पाठीमागचं  सरकार त्या लायकीचं होतं आणि आजचं पण त्याच लायकीचं म्हणायची वेळ आली आहे.  "धनगर" आणि "धनगड" या दोन्ही जमाती वेग-वेगळ्या नसून ती एकच "धनगर" जमात आहे असे वैज्ञानिक अहवाल सादर केले. शिवाय धनगड नावाची जमातच या महाराष्ट्रात नाही हे सुद्धा सिद्ध केलं तरीही आमच्यावर अन्याय का??
मुख्यमंत्री महोदय मा देवेंद्र फडणवीस म्हणतात की धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी यावरती अभ्यास चालू आहे. अहो फडणवीस साहेब यावरती पीएचडी केली असती एखाद्यानं अन् तुम्ही अभ्यासच कसे काय करताय अजून? आज दहावी-बारावीचे निकाल झाले त्यांची प्रवेश प्रक्रिया सुद्धा संपत आली मग आमच्या धनगर समाजातील मुला-मुलींना अगोदरच राज्यघटनेत असलेल्या डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या सवलती कधी देणार?? आजपर्यंत आमच्यावर अन्याय होत आला आहे आणि अजूनही असंच रहाट गाडगं चालू राहिलं तर आमची पोरं आइ ए एस , आइ पी एस कधी होणार?? जर आम्हाला अनुसुचित जमातीच्या सवलती द्यायला तुम्हाला एवढा अभ्यास करावा लागत असेल तर मग तुम्ही बाबासाहेबांना चुकीचं समजता का?? त्यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये राज्यघटनेच्या कलम ३४२ मध्ये क्र ३६ वर सामाविष्ट केले आहे. फक्त शब्दविवेचन करताना त्याचे टायपिंग करताना र ऐवजी ड झाला आणि या र ड मुळे माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा सगळा राडा च झाला. आज (Chattisgarh)छत्तीसगर ला हिंदीमध्ये छत्तीसगढ़ म्हणतात, (Gurgaon)गुरगाव ला गुढगाव म्हणतात, (Ekar)एकर ला एकर त्याचप्रमाणे (Dhangar)धनगर चा धनगड(Dhangad) झाला आणि आज ६५ वर्षे आमच्यावरती अन्यायच अन्याय झाला मग हा अन्याय आमच्यावरती बाबासाहेबांनीच केला का??
राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करण्याचा अधिकार जर सर्वोच्च न्यायालयाला असेल तर मग न्यायदेवतेनं डोळ्यावरची पट्टी काढून आंधळेपणा बंद करावं, महाराष्ट्र राज्यात एकही धनगड समाजाची व्यक्ति नसताना आमच्या हक्काचं अनुसुचित जमातीचं आरक्षण आम्हास देऊन आम्हाला न्याय द्यावा. त्यासाठी राज्य सरकारने जी शिफारस करावयाची आहे ती शिफारस लवकरात लवकर करावी यासाठी धनगर समाजातील पक्षविरहीत समाजबांधवांनी १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन केले आहे.
धनगर समाजातील लाखो समाजबांधव दि १५ जुलैला आरक्षणाची ज्योत पेटती ठेवण्यासाठी पंढरपूर येथे उपस्थित राहणार आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने घेतलेला हा निर्णय आहे आणि सर्व बुद्धिजीवी वर्गाने या आंदोलनाचे आयोजन केले आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अथवा राजकीय दृष्टीकोणातून आयोजित केलेले हे आंदोलन नाही. आजपर्यंत निमूटपणे आपण अन्याय सहन करत आलो आहोत हे कुठेतरी थांबायला पाहिजे, आपल्या इतिहासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून आपली ओळख काय आहे आणि आपण काय करतोय याचा गांभिर्यानं विचार करुन उद्याच्या पीढीवर अन्याय सहन करायची वेळ येवू देवू नका यासाठी जातीवंत धनगर सभाजबांधवांनी पुनःशा संघटित होऊन आपल्या हक्कासाठी एकत्रित पणे लढाई लढावी. ज्या सरकारला धनगर समाजानं एक गठ्ठा मतदान केलं आणि सत्तेत आणलं ते सरकार आज चांगलंच झोपलंय आणि या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी दि १५ जुलै रोजी अखंड महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती...

ना माझ्यासाठी ना माझ्या स्वार्थासाठी, नाही कोण्या व्यक्तिसाठी...

ही लढाई आहे फक्त आणि फक्त माझ्या धनगर समाजासाठी...

उठ धनगरा हो जागा अन् लढ तुझ्या हक्कासाठी..

उचल तलवार आणि उगार मुठ नाहीतर घे हाती काठी...

कर येळकोट येळकोटचा गजर अन् लाग प्रस्थापितांच्या पाठी...

अन्यायावरती उगार आसूड उद्याच्या भावी पीढीसाठी...

तुम्हावर अन्याय होत असेल तर अखंड समाज असेल तुमच्या पाठी...

हिम्मत हारू नकोस प्रयत्न सोडू नकोस जर
कितीही आणि कोणीही आले तुला आडवण्यासाठी,

फक्त एकदाच "जय मल्हार" बोल अन् लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी. फक्त लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी.

म्हणून आरक्षणाच्या या लढाई साठी दि १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर ता पंढरपूर जि सोलापूर येथे सामाजिक बांधीलकी लक्षात घेवून प्रत्येक समाजबांधवांनी सहभागी व्हावं...ही नम्र विनंती

जय मल्हार!! जय अहिल्या!!
             -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            8530004123
 nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................

Monday, 11 May 2020

गोपीचंद पडळकर साहेब आणि बिरोबा : ✍️नितीनराजे अनुसे

महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मान.आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे त्रिवार अभिनंदन 💐💐💐

(सदरच्या ब्लॉगमधून सामाजिक तथा मानसिक भावना दुखावण्याचा हेतू मुळीच नाही यातून बोध घेऊन समाजप्रबोधन व्हावे हीच अपेक्षा)
            लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जेव्हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेव्हा ज्यांना बिरोबा कुठे आहे? कसा आहे? नक्की कोणता देव आहे? हेच माहित नव्हते त्यांना लोकसभा निवडणुकीच्या अगोदर अखेरच्या धनगर आरक्षण लढ्यातील मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी घातलेली बिरोबाची शपथ आठवायला लागली, आयुष्यभर प्रस्थापितांची गुलामगिरी चमचेगिरी करणाऱ्यांना, प्रस्थापितांचे बूट चाटणाऱ्यांना, अंडी-दारू-मटणासाठी तडफडणाऱ्यांना, दोन-चार नोटासाठी प्रस्थापित नेत्यांसमोर लाळ गाळणाऱ्यांना आणि स्वतःचा तथा समाजाचा स्वाभिमान प्रस्थापितांच्या बुटाखाली गहाण टाकणाऱ्यांना धनगर समाजाचे दैवत असलेला बिरोबा आणि गोपीचंद पडळकर यांची बिरोबाची शपथ आठवायला लागली.  विधानसभेच्या निवडणूकांचे निकाल लागल्यावर गोपीचंद पडळकर यांच्यावर बिरोबा कोपला म्हणून बोंबलणाऱ्या औलादींना, आणि एकच छंद राजकारण बंद म्हणून पोटाची आतडी पिळवटणाऱ्यांना मला सांगायचं आहे की बाबांनो आज खऱ्या अर्थाने गोपीचंद पडळकर यांना बिरोबा पावला आहे हे विसरू नका.
          मी २००६ पासून अगदी जवळून पाहतोय की मा.गोपीचंद पडळकर साहेब नावाचा सर्वसामान्य कुटुंबातील हा युवक संघर्ष कोळून पितोय. संघर्ष जणू काय त्यांच्या पाचवीलाच पुजलाय, तरीही हा संघर्षयोद्धा कितीही संकटे आली तरी आजपर्यंत कधीही डगमगला नाही. गोपीचंद पडळकर यांना नामोहरम करण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेने कितीतरी षडयंत्र रचली, मंगळसूत्र चोरीसारख्या खोट्या केसेस दाखल केल्या, पोलिस कोठडीत ठेवले, शेवटी जिल्हा हद्दपारीचे नोटीस सुद्धा बजावले होते. तरी सुद्धा गोपीचंद पडळकर हा संघर्षयोद्धा थांबला नाही ना त्यांनी आपला संघर्षरथ थांबवला. तर हा योद्धा अन्यायाविरुद्ध लढला, प्रस्थापितांना भिडला आणि त्यांना अक्षरशः घामही फोडला. जेव्हा गोपीचंद पडळकर सांगलीच्या तुरूंगात होते तेव्हा हातात खुरपं घेऊन शेतात भांगलणारी याच संघर्षयोद्ध्याची आई म्हणाली होती की "कशाला राजकारणाच्या नादाला लागायचं, लोकं सुखानं जगू देत नाह्यती. पण पोरगं काय ऐकतच नाय." आज त्याच मायमाऊलीचं ते पोरगं, सर्वसामान्यांचं ते पोरगं शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज बनून बिनविरोध महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून आमदार झाले. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर बिरोबा कोपला नाही तर त्यांना बिरोबा पावला आहे असे म्हणायला मला वावगं वाटणार नाही.
          आज ज्यांना ज्यांना गोपीचंद पडळकर साहेबांनी घातलेली बिरोबाची शपथ आठवते त्यांनी हे पण आठवून पहा...
१) सोनलवाडी (सांगोला) येथील एका मेंढपाळाच्या मेंढ्या काही गावगुंड उचलून घेऊन गेले होते त्या मेंढ्या मेंढपाळाला परत करायला बिरोबाचं रूप घेऊन गोपीचंद पडळकर साहेबच धावले होते.
२) कोल्हापूरच्या बहिणीवरती अन्याय अत्याचार झाला होता तेव्हाही त्या बहिणीच्या पाठीशी भावाप्रमाणे ठामपणे उभा राहिलेले गोपीचंद पडळकर आठवून पहा.
३) पुरंदरच्या ताईवर अतिप्रसंग झाला होता तेव्हा बारामतीचा मोठा म्हसोबा, त्या लोकसभा मतदारसंघाची मरीआई तिथं पोहचली नाही ना साधा धीर दिला. परंतु बिरोबाच्याच रूपाने गोपीचंद पडळकरांनी भेट घेऊन पुरंदरच्या ताईला आणि तिच्या कुटुंबीयांना धीर दिला.
४) कराड परिसरात भटकंती करणाऱ्या मेंढपाळांच्या मेंढ्या काही गावगुंडांनी पळवल्या होत्या त्या पडळकर साहेबांमुळेच माघारी परत केल्या होत्या.
५) माणदेश परिसरात कोणावरही अन्याय अत्याचार झाला तर रात्री अपरात्री हाकेला धावून जाणारे गोपीचंद पडळकर साहेब माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला बिरोबाचेच रूप वाटतात. अशा कितीतरी एक ना अनेक कितीतरी घटना सांगता येतील.
त्यामुळे बिरोबा गोपीचंद पडळकर साहेबांना कोपला नाही तर पावला आहे. आणि बिरोबा खरंच कोपला असेल तर तो त्या समाजावर कोपला आहे जो अजूनही एकजूट एकसंघ होत नाही. बिरोबाची शपथ फक्त गोपीचंद पडळकर यांनीच पाळायची होती आणि समाजाने प्रस्थापितांच्या पारड्यात भरभरून मते द्यायची होती का?  हीच का बिरोबाच्या भक्तांची भक्ती? जर समाजानेही बिरोबाची शपथ पाळली असती, एकी दाखवली असती तर गोपीचंद पडळकर साहेब यांच्यासह अजून कित्येक धनगर नेते आज विधानपरिषदेतच काय तर लोकसभेत दिसले असते. कितीतरी आमदार विधानसभेत दिसले असते. परंतु समाजात एकी नसल्याने दिड-दोन कोटी धनगर समाजाचा केवळ एक आमदार विधानसभेत आणि आज एक विधान परिषदेवर ही वेळ समाजावर आली नसती.
          असो, बिरोबाच्याच आशिर्वादाने, लढाऊ प्रवृत्तीच्या आणि गोपीचंद पडळकर साहेबांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे आणि संघर्षामुळे संघर्षयोद्ध्याचा संघर्षरथ कधीही न थांबता अविरतपणे धावतच राहिला त्या संघर्षवेलीवर आज विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकीचे गोंडस फुल बहरून आले. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सदस्य मान.आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे त्रिवार अभिनंदन  व पुढील वाटचालीस अगणित शुभेच्छा. कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, मेढपाळांचे, युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मल्हारी मार्तंड, श्री बिरोबा आपणास बळ बुद्धी तथा चातुर्य देवो हीच प्रार्थना 💐💐💐
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com