Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 4 August 2015

चेष्टा लावलीय का धनगर जमातीची?


मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस काय चेष्टा लावलीय का तुम्ही धनगर समाजाची?? आपण कायदेपंडित आहात, आपणास कायद्याचं उत्तम ज्ञान आहे त्यामुळे आपणास असं करणं शोभत नाही. या राज्यातील जनतेला परिणामी ज्या धनगर समाजानं तुम्हाला सत्तेत आणून बसवलं त्या धनगर समाजाला आपल्याकडून खूप अपेक्षा असताना तुम्ही वेडेपणाचे भोळेपणाचे सोंग घेऊन आम्हाला फसवायचे धोरण आखताय ते कशासाठी?? आणि कोणाच्या सांगण्यावरुन?? शरद पवारांचे जातियत्व  स्विकारुन तुम्ही धनगर समाजावरती अन्याय करत आहात याचं भान राहुद्या. एखाद्या जमातीवरती गेल्या ६५ वर्षापासून विनाकारण अन्याय होत असेल आणि त्या जमातीला जर त्यांच्या हक्कापासून दूर ठेवलं जात असेल तर तुमच्यावरती देशद्रोहाचा खटला भरायला पाहिजे का??
धनगर समाजाची स्पष्ट मागणी अशी आहे की, भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या कलम क्र ३४२ वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अ.क्र. ३६ वरती ओरॉन, धनगड (धनगर) असा स्पष्ट उल्लेख आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात प्रकाशित होणार्या २००७-०८ व २००९-१० या वार्षिक अहवालात ३६ क्रमांकावर ओरॉन, धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याशिवाय राज्यघटनेत धनगड असे टायप आहे त्यासाठी हिंदी शब्दकोश चाळा हिंदीमधील "ड" चा उच्चार मराठीत "र" असाच होतो आहे. म्हणून धनगड आणि धनगर या वेगळ्या जमाती नसून एकच "धनगर" नावाची जमात आहे. राज्यघटना अमलात आल्यापासून म्हणजे १९५० पासून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून दूर ठेवले आहे त्या सवलती धनगर समाजाला त्वरित लागू कराव्यात त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून केंद्र सरकारला फक्त अशी शिफारस पाठवायची आहे की "राज्यघटनेतील कलम ३४२ वरील अनुसुचित जमातीच्या महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टातील अ.क्र.३६ वरील ओरॉन, धनगड मधील "धनगड" ही जमात महाराष्ट्र राज्यात कोठेही वास्तव्यास नसून ती  "धनगर" हीच जमात आहे आणि गेल्या ६५ वर्षापासून या धनगर जमातीला "र" ऐवजी "ड" झाल्यामुळे सवलती देण्यात आल्या नाहीत त्या सवलती त्वरित लागू कराव्यात".
धनगर जमातीची मागणी साधी आणि सरळ असताना देवेंद्रजी फडणवीस तुमचे विधानभवनातील (पावसाळी अधिवेशनातील) विधान म्हणजे शरद पवारांचे जातियत्व स्विकारल्याचे समजून येते.  मुळात धनगर आणि धनगड या जमाती वेगवेगळ्या नसून धनगर ही नावाची एकच जमात आहे. (त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण  वाङमय खंड-१ दि ९ मे १९१६ हा संदर्भ तपासावा).  "भारत में जातिप्रथा संरचना, उत्पत्ति और विकास" या खंडामध्ये  डॉ बाबासाहेबांनी जातींच्या व जमातींच्या लोकसंख्येचा अहवाल सादर केला होता त्या अहवालामध्ये  पान क्र २३५ वरती "धनगर"  या जमातीचा स्पष्ट उल्लेख आहे याशिवाय धनगड या जमातीचा कोठेही उल्लेख नाही. महाराष्ट्र राज्यात परिणामी भारतात धनगड जमात आहे तरी कोठे?? काल-परवा बिहार सरकारने धनगड व धनगर वेगळे नसून एकच असल्याची घोषणा केली व बिहार मधील धनगर जमातीला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू केल्या.
महाराष्ट्र राज्यातील धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती न मिळाल्यामुळे धनगर जमातीची राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात पीछेहाट झाल्याने या जमातीचे पुढच्या ५०-६०  वर्षात सुद्धा न भरून येणारे नुकसान झाले आहे. आणि या सर्व नुकसानीस महाराष्ट्र राज्यातील प्रस्थापित व्यवस्था जबाबदार आहे आणि तुम्ही सुद्धा यास जबाबदार रहाल.
देवेंद्र फसणवीस तुम्ही विधानभवनात विधान केले की, "धनगर" आणि "धनगड' या जमाती एक आहेत की वेगवेगळ्या याची पडताळणी करण्यासाठी  टाटा रिसर्च इंन्स्टिट्यूट अॉफ सोशल सायन्स मुंबई आणि अदिवाशी विकास व प्रशिक्षण संस्था पुणे या दोन्ही संस्थांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्या त्या संस्थांनी अहवाल सादर केल्यानंतर अहवाल जर सकारात्मक आले तर धनगर जमातीला अनुसुचित जमातीमध्ये सामाविष्ट करण्यात येईल.  पण राज्यघटनेनुसार जर एखाद्या जमातीला अनुसुचित जमातीच्या यादीत सामाविष्ट करायचे असेल तर वरील संस्था अहवाल सादर करून ती संबंधित जमात त्या त्या प्रवर्गाचे निकष पुर्ण करते की नाही हे कळवतात तद्नंतर त्या जमातींना सामाविष्ट करायचे का नाही हा प्रश्न उपस्थित होतो.
पण एखादी जमात जर संविधानानुसार भारतीय राज्यघटनेत अगोदरच सामाविष्ट केली गेलेली असेल तर राज्य सरकारने केंद्र सरकारला फक्त शिफारस करायची आहे की ज्या जमाती अनुसुचित जमातीच्या यादीत सामाविष्ट आहेत त्या त्या जमातींना त्यांच्या सवलती व लाभ द्यायला पाहिजेत म्हणून धनगर ही जमात अगोदरच अनुसुचित जमातीमध्ये आहे त्याचे भक्कम आणि सबळ पुरावे उपलब्ध असताना मुख्यमंत्र्यांनी धनगर जमातीची घोर फसवणूक करू नये अन्यथा आम्हाला आमच्या औकातीवर यायला वेळ लागणार नाही.
आमची मागणी धनगर जमातीला आरक्षण द्या किंवा अनुसूचित जमातीमध्ये सामाविष्ट करा अशी नसून अगोदरच अनुसुचित जमातीमध्ये असलेल्या आमच्या धनगर जमातीला आमच्या हक्काच्या सवलती लागू कराव्यात आणि केंद्र सरकारकडे तशी शिफारस पाठवावी एवढीच आमची मागणी आहे. यासाठी
१) कोणत्याही संस्थेकडून अहवाल मागवण्याची गरज नाही.
२) यासाठी कोणतीही समिति नेमण्याची गरज नाही.
 मुख्यमंत्री महोदय तुम्ही वेळकाढूपणा करून धनगर समाजाला बोहल्यावर चढवण्याचा प्रकार करू नका आणि ते आता सहनसुद्धा केले जाणार नाही. आम्ही अगोदरच अनुसुचित जमातीमध्ये आहोत त्या अनुषंगाने त्वरित शिफारस करून आम्हाला आमच्या सवलती त्वरित लागू कराव्यात नाहीतर मग आम्हाला रस्त्यावर उतरायला क्षणमात्रही वेळ लागणार नाही. आतापर्यंत आम्ही शांत होतो पण तुम्ही आमचा अंत पाहू लागलात. आता आर या पार नाहीतर करो या मरो उद्धीष्ट डोळ्यासमोर ठेवून उद्या महाराष्ट्र पेटवायला आम्हाला वेळ लागणार नाही.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
             -नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment