प्रस्तावना
शुक्रवार दि.२९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी मुंबई येथिल पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन रोड स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृत व्यक्तिंच्या भावना अचूक शब्दात मांडून, खेड्यापाड्यातून टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तिचं स्वप्न आणि त्याच्या वाट्याला आलेले अर्थातच नियतीलादेखिल मान्य नसणारं दु:ख काय असते याची जाणीव करून देणारी काव्यरचना परखड मताचे कवी राजू झंजे यांनी त्यांच्या "काय चुकले माझे?" या काव्यात केली आहे. खरंतर हे नुसते काव्य (कविता) नसून त्या प्रत्येक मुंबईकरांच्या ह्रदयातील जणू भावना आहेत. हे काव्य वाचल्यावर रसिकमित्रांच्या डोळ्यांत नक्कीच पाणी उभे राहील.
✍️नितीनराजे अनुसे
(लेखक व व्याख्याते)
७६६६९९४१२३
काय चुकले माझे ???
काय चुकले माझे ?
घडला काय माझा गुन्हा ?
कोणी शासनावर ओरडा आता ,
कोणी रेल्वे प्रशासनाला कुचकामी म्हणा ;
पण माझे जीवन आता नाही पुन्हा !
टीचभर पोटाची खळगी भरण्या ,
दूर गावावरून आलो होतो ;
धकाधकीच्या जीवनात एकरूप होऊन ,
पक्का मुंबईकर झालो होतो !
गोरगरिबीतच वाढलो ,
पण स्वप्ने खूप पाहिली होती ;
जन्मदात्या मात्या - पित्यांना अजून ,
"मुंबई" दाखवायची राहिली होती !
आता कसली मुंबई ,
अन कसले काय ;
हंबरडा फोडून रडत असेल ,
आता माझी माय !
खूप कष्टाने वाढवले होते तिने ,
स्वतःच्या पोटाला चिमटा काढून ;
शक्य असते तर आलो असतो ग आई ,
तुझ्यासाठी हे आस्मान फाडून !
माफ कर आई मला ,
तुझी स्वप्न पूर्ण करू शकलो नाही ;
राब - राब राबायचो आई या मुंबापुरीत ,
पण कधीच थकलो नाही !
पण आज मी थकलो आई ,
असंख्य पायदळी तुडवला गेलो ;
गोऱ्यापान अंगाचा मी
आज काळा - निळा झालो !
उसंत हि मिळाली नाही ,
क्षणभर कण्हण्यासाठी ;
तोंड हि उघडता येईना मला ,
शेवटचे " आई" म्हणण्यासाठी !
आता नेमतील समित्या ,
दुर्घटनेतील सत्य जाणण्यासाठी ;
पण मुंबईकरांचा जीव नेहमीच मुठीत आहे ,
"काय चुकले माझे?" म्हणण्यासाठी !
कवी राजू दादासाहेब झंजे
९५९४८१५५८५
All the best!
ReplyDeletethanks a lot of
ReplyDelete