आरक्षणाबद्दल धनगर नेत्यांची भूमिका... ✍️ नितीनराजे अनुसे |
ज्या प्रमाणे महाराजाधिराज राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट छत्रपति यशवंतराव होळकर यांनी शिस्तबद्ध असलेल्या इंग्रजांच्या आब्रूची (इभ्रतीची) लख्तरं जशी जगाच्या वेशीवर टांगली होती तशीच माझ्याच धनगर समाजातील नेत्यांनी देखिल आपल्याच धनगर समाजाच्या आब्रूची लख्तरं देशाच्या वेशीवर नेऊन टांगली आहेत. एकेकाळी स्वाभिमानानं जगायची भाषा शिकवणारे नेते आज एखाद्या पदासाठी, आमदारकी साठी, खासदारकी साठी, मंत्री पदासाठी लाचार होऊन प्रस्थापितांचे बुट चाटत बसले आहेत. कदाचित माझ्या या बोलण्याचा राग त्यांना येऊ शकतो आणि आला तर बेहत्तर... ज्या समाजाचा हजारो वर्षांचा क्रांतीकारक असलेला जाज्वल्य आणि दैदिप्यमान इतिहास आजच्या नव तरूणांचे डोळे दिपवू शकतो, समाजातील युवा वर्गाला स्वाभिमानाने जगायला प्रोत्साहित करत असतो त्याच धनगर समाजातील नेते मात्र आज लाचारीसाठी स्वार्थासाठी समाजाचा वापर करून समाजाचे भांडवलीकरण आणि बाजारीकरण करून समाजातील युवकांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. धनगर समाजातील युवकांचे मनोबल वाढवण्याऐवजी ते ढासळण्याचेच काम धनगर समाजातील नेते जाणूनबुजून करत असल्याचे आज दिसून येते.
धनगर आरक्षण हा धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला असून धनगर समाजाला गेल्या ६८ वर्षापासून अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या नाहीत. राज्यघटनेने दिलेले हक्काचे अनुसुचित जमातीचे आरक्षण जर धनगर समाजाला मिळत नसेल तर समाजाचा नेमका काय विकास झाला? यावरती आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायला देखिल धनगर समाजातील नेत्यांकडे कसला वेळच नाही. निवडणूका आल्या की लगेच हे बहाद्दर काखेत झोळी बांधून माजलेल्या प्रस्थापित नेत्यांसाठी, प्रस्थापित व्यवस्थेसाठी आरक्षणाच्या नावाने मताची भिक मागत बसतात याबाबतीत धनगर समाजातील नेते सर्वात पुढे असतात. आम्ही हे करू ते करू आमुक करू तमूक करू पण निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर, आमदार, खासदार झाल्यानंतर, मंत्रीपद मिळाल्यानंतर मात्र आरक्षणावर एकही ब्र काढायचा नाही अशीच जणू काय शपथ घेऊन हे धनगर समाजातील नेते आळी मिळी गुप चिळी चा संदेश देत आहेत. धनगर समाजाचे भले व्हावे, धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले हक्क मिळावेत असे जर धनगर समाजातील नेत्यांना वाटत असते तर ते मूग गिळून गप्प बसले नसते. आ.ॲड. रामहरी रूपनर साहेब सोडले तर आजपर्यंत एकाही धनगर समाजाच्या आमदाराने विधानसभेत/विधानपरिषदेत, लोकसभेत/राज्यसभेत धनगर समाजामाच्या आरक्षणासंदर्भात ठामपणे कोणीच समाजाची बाजू मांडल्याचे तर मला आठवत नाही. मग नुसतेच महापुरूषांच्या जयंती सोहळ्यात स्टेजवरून मोठमोठाले भाषण ठोकायचे अन् विधानभवनात/संसदभवनात मात्र शेपूट *** घालून बसायचे अशी अवस्था धनगर नेत्यांची असेल तर मग माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला लवकरच अनुसुचित जमातीच्या सवलती भेटतील...
धनगर समाजातील कित्येक पिढ्या बरबाद झाल्या तरी धनगर समाजातील नेत्यांना याचे काही सोयरसुतक पडणार नाही कारण स्वार्थासाठी जगणारे हे डोमकावळे आहेत असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही. आणि खरंच जर सोयरसुतक असतेच तर १० दिवसात, १५ दिवसांत, महिन्याभरात, ९ महिन्यात, ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत आरक्षणाच्या सवलती देऊ असे म्हणणाऱ्या आणि खोटी आश्वासने देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या थोबाडीत कधीच मारली असती, टाटा इंन्स्टीट्यूट ओफ सोशल सायन्स ला अहवाल सादर करायला लावलेच नसते पण खैर... “सर्व एकाच माळेचे मणी आणि ओवायला नाही कोणी” अशी धनगर नेत्यांची अवस्था झाली आहे. एकमेकांच्या उरावर बसायचे आणि एकमेकांची जिरवाजिरवी करायची याशिवाय धनगर समाजातील नेत्यांना दुसरं जमतं तरी काय कोणास ठाऊक?
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
No comments:
Post a Comment