सळसळत्या रक्ताच्या आणि मनगटाच्या जोरावर तसेच धारदार तलवारीच्या टोकावर दुश्मनांना कोलून टाकणाऱ्या, स्वकर्तृत्वार आणि स्वबळावर स्वताचे साम्राज्य उभे करत करत मराठ्यांचे साम्राज्य अबाधित राखणाऱ्या आणि अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या रणमर्दास अर्थातच थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना त्यांच्या ३२४ व्या जयंतीनिमीत्त मानाचा जय मल्हार कोटी कोटी प्रणाम. घोड्यांच्या टापांनी अख्खा हिंदूस्तान ढवळून काढणाऱ्या मल्हाररावांना युद्धतंञात पारंगत असलेला एक धुरंदर लढवय्या म्हणून ओळखले जाते ते त्यांच्या अंगी असलेल्या कुशल "मल्हारतंत्र" आणि "मल्हारनीती"मुळेच...
एके दिवशी मामाच्या मेंढ्या चारायला घेऊन गेल्यानंतर मल्हाररावांनी पाहिले की मामाच्या शेतामधून सजवलेल्या अंबारीचे हत्ती, घोडे सैनिक शेतातील पिकाची नासधूस करत पिक तुडवत चालले होते तेव्हा त्यांनी त्याच रानातील एक ढेकुळ उचलला तो सरळ सजवलेल्या हत्तीवर अंबारीत बसलेल्या पेशव्याच्या पाठीत मारला. धनगरांच पोर ते रक्तातच धनगरी बाणा जसाच्या तसाच.... डोळ्यात निखारा जसाच्या तसाच.... निर्भिडही तेवढाच.... मल्हारवांनी पेशव्यांस ढेकुळ मारला तसे सर्वजण अवाक् झाले एवढी हिम्मत झाली कोणाची असा प्रश्न पेशव्यांच्या सरदारांना पडला, पेशव्याचे काही सैनिक मल्हाररावांकडे धावून गेले पण त्या धनगराच्या पोराचे धाडस पाहून पेशवा देखिल हडबडून गेला होता. त्याचे हे धाडस पाहून त्याला सरदार बारगळांनी स्वताच्या सेवेत सामिल करून घेतले ती टोळी होती दाभाड्यांच्या कंठाजी कदमबांडेंची आणि तेथूनच शिपाईगिरी करत असतानाच स्वताची स्वतंत्र फौज उभा करून आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर मल्हाररावांनी माळवा प्रांतांत स्वताच्या हिंमतीवर आणि स्वकर्तृत्वार अनेक लढाया गाजवल्या बड्या बड्या शत्रुंना मल्हाररावांनी तलवारींचे पाणी पाजले हे पाहून बाळाजी विश्वनाथांनी (पेशव्यांनी) मल्हाररावांशी तह करून माळवा प्रांतांची जबाबदारी सोपवली. त्याचे कारण असे होते की दयाबहादूर हा एकेकाळी माळव्याचा सुभेदार असताना शेतकरी रयतेस नाहक त्रास देत असे दयाबहादूर व त्याच्या हाताखालचे मुनीम शेतकऱ्यांना रयतेला पिळत होते. तेव्हा मराठ्यांना बोलवले तर ते प्रजेची मदत करतील असा सल्ला जयपूरच्या राजाने दिल्यावर माळवा प्रांतात उतरून धारजवळील तिर येथे मल्हाररावांनी फौजेसरशी लढाईला आलेल्या दयाबहादूराला मारून माळवा प्रांत हस्तगत केला त्यांच्या शौर्याची दखल घेत बाजीराव पेशव्यांनी २६ मे १७२९ ला त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली. अशा प्रकारे एक धनगरांचे पोर काठीने मेंढ्या हाकता हाकता स्वराज्यासाठी तलवारीने शत्रुंना कधी हाकू लागले तेच समजले नाही.
मल्हार आया मल्हार आया म्हटलं तरी उत्तर भारतालाच नव्हे तर अफगाणिस्तानच्या अब्दालीला देखील कापरं भरायचं. मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापांचे जरी आवाज ऐकायला आले तरी कित्येक गावंच्या गावं ओस पडायची हीच त्यांची धमक होती अन् हाच त्यांचा दरारा. आजही उत्तर भारतीयांच्या कानात मल्हाररावांच्या घोड्यांच्या टापाचे आणि येळकोट येळकोट जय मल्हार च्या गजराचे आवाज निनादत असतील... लढाईत सर्वात पुढे राहून राहून, सैन्यांचे नेतृत्व करून मुसंडी मारत शत्रुंना वायूवेगाने कापत सुटणाऱ्या मल्हाररावांचा दबदबा एवढा होता की शत्रुपुढे "मल्हार" जरी नाव उच्चारले तरी त्यांची पळता भुई थोडी व्हायची. मल्हाररावांचा स्वभाव जितका प्रेमळ होतका तितकाच राकटसुद्धा. एकदा कुंभेरीच्या लढ्यामध्ये सुरजमल जाटाने किल्ल्याला वेढा घातला होता मल्हाररावांचे सुपुत्र शुरवीर खंडेराव होळकर माचावर लढत सैन्यांचे नेतृत्व करत शत्रुंना तोंड देत होते इतक्यात सुरजमल जाटाकडून जेजाल्याचा गोळा आला आणि खंडेरावांच्या छाताडावर आदळला , खंडेराव धारातीर्थी कोसळले. स्वतःच्या मुलाला डोळ्यासमोर ठार केलेलं पाहून मल्हाररावांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली नसानसात रक्त सळसळू लागले डोळे लालबुंद झाले हाताच्या मुठी आवळल्या गेल्या अन् त्यांनी मल्हारी मार्तंडाची शपथ घेतली की या सुरजमल जाटाचा शिरच्छेद करून, कुंभेरीची माती खणून यमूनेत टाकेन तरच दक्षिणेला (महाराष्ट्रात) परत जाइन. पण भयभीत झालेल्या सुरजमल जाटाला काय करावे सुचत नव्हते तेवढ्यात सुरजमल जाटाची पत्नी हंसिका हिने जयाप्पा शिंद्यांशी बोलणी करून सुरजमल जाटाचा पेशव्यांसोबत सुलुख घडवून आणला. तेव्हापासूनच मल्हाररावांचा पेशव्यांवरील अन् पेशव्यांचे हुजरे असलेल्या शिंद्यावरील विश्वास उडाला होता त्याचा प्रत्यय १७ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात आणि १८ व्या शतकाच्या पहिल्या दशकात येतो जेव्हा महाराजाधिराज शुरवीर योद्धा यशवंतराव होळकर राष्ट्रासाठी स्वतंत्रपणे इंग्रजांशी झुंज देत होते तेव्हा पेशवे आणि शिंदे हे दोन्ही होळकरांची दौलत घशात घालण्यासाठी खटाटोप करत होते. एवढेच नव्हे तर यशवंतराव पुण्यावर चालून आले तेव्हा शेपटी गुंडाळून पळपुटा पेशवा जेव्हा कोकणात पळून गेला आणि कोकणातून पत्रव्यवहार करून त्यांनी यशवंतराव होळकरांना सांगितले होते की होळकरांचं राज्य या राष्ट्राच्या मातीवरती अन्याय व अत्याचार करणाऱ्या ब्रिटिश सरकारकडे विलीन करावं. याचाच अर्थ मल्हाररावांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली ती म्हणजे "एकवेळ दुश्मनांवरती विश्वास ठेवला तरी चालेल पण पाठीत खंजीर खूपसणाऱ्या शिंद्यांवरती अन् पेशव्यांवरती कधीच विश्वास ठेवायचा नाही".
सांगायचा मथित अर्थ एवढाच की आजही आम्ही विनाकारण शेंडीने गळा कापणाऱ्या मॉडर्न पेशव्यांच्या आहारी जाऊन समाजाचे आणि परिणामी देशाचे वाटोळे करून घेतोय हे आम्हाला अजूनही कळत नाही आणि कळले तर वळत नाही.
आज १६ मार्च हा एक ऐतिहासिक आनंदाचा दिवस म्हणजेच सतराव्या शतकात आजच्या पाकिस्तानमधील अटकेपार मराठेशाहीचा झेंडा डौलाने फडकवणाऱ्या रणझुंजार रणमर्दाची ३२४ वी जयंती त्यानिमीत्त थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा विनम्र जय मल्हार.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
https://nitinrajeanuse123.blogspot.com
No comments:
Post a Comment