Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 22 September 2015

धनगर समाजातील यूवकांनो जागृत व्हा...

आज एकविसाव्या शतकातसुद्धा माझा धनगर समाज अज्ञानी आणि भोळा-भाबडाच राहिलेला दिसून येतोय आणि हे नाईलाजानं म्हणावं लागतंय. आज आम्हाला आमच्या थोर महापुरुषांनी तलवारीशी खेळून प्रसंगी रणांगणात रक्त सांडून सुवर्णाक्षरात कोरून ठेवावा असा इतिहास घडवला असताना त्याचा आम्हास विसर पडतो. खरंतर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरु शकत नाहीत अन् इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. मग या देशावर ३५० वर्षाहूनही अधिक आमच्या महापुरुषांनी राज्यकारभार केला असताना आम्ही आमच्या इतिहासापासून अजूनही वंचित का??  का आम्हाला आमच्या महापुरूषांची ओळख झाली नाही?? का आम्हाला त्यांचा इतिहास माहितच पडला नाही.??? एकीकडे युरोप खंडासारख्या तंत्रज्ञान विकसित देशामध्ये रणरागीणी कर्मयोगीणी लोककल्याणकारी महाराणी अहिल्यामाईंच्या प्रशासनाचा आदर्श समोर ठेवून त्या त्या देशांचे प्रशासन/राज्यकारभार सुरळितपणे चालवला जातो. पण ज्या देशात अहिल्यामाई जन्माला आल्या त्या देशामधील प्रशासनाची गोष्ट दूरच ठेवा पण अहिल्यामाईंच्या वारसदारांनादेखिल याबद्दल काहीच माहित नसावं??  अरे अटकेपार झेंडे फडकवले ते अभिमानाने सांगतो, मल्हार आया मल्हार आया असं म्हणताच दुश्मनांना कापरं भरायचं. एवढी ताकद मल्हाररावांच्या नावातच होती. पानीपतची लढाई मराठ्यांच्या जीवावर बेतली आणि त्याला सर्वस्वी पेशवे जबाबदार होते कारण पेशव्यांनी मल्हारतंत्र वापरले नाही. ही लढाई जिंकणारा अफगाणिस्तानचा अब्दाली मल्हाररावांच्या तलवारबाजीवर फिदा होऊन मल्हाररावांवर कौतुकास्पद लिहून जातो. पण भारतातले परिणामी महाराष्ट्रातील अतिज्ञानी जातीयवादी इतिहासकार धुरंदर लढवय्ये राजे मल्हारराव होळकरांवरती पाणीपतमध्ये झालेल्या पराभवाचे खापर फोडत बसतात. मग आम्हाला मल्हाररावांच्या गणिमीकाव्याची अर्थातच मल्हारतंत्राची जाणीव का नसावी?? आजच्या एकविसाव्या शतकात सुद्धा धनगर समाजाला खरोखरच मल्हारतंत्राची उणीव भासते आहे हे नाकारू शकत नाही.
आमचा खरा इतिहास लपवून ठेवल्याचं आम्ही वारंवार म्हणतो, इतरांना सांगतो आणि भरसभेतून  बोंबलतो आणि प्रस्तापित आणि सनातनी व्यवस्थेला दोषी ठरवतो. पण खरंच आमच्या समाजातील युवकांना इतिहासाचा अभ्यास करायची आवड आहे का?? समाजातील युवकांना इतिहास अभ्यासायची सवय आहे का?? इतिहास खरा लिहलेला असो अथवा खोटा, त्या त्या इतिहासकारांनी त्यांच्या स्वार्थापोटी लिहलेला इतिहास खरा की खोटा हे तेव्हाच समजणार जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू. पण जर लिहलेला इतिहास खोटा वाटत असेल तर मग खरा इतिहास काय आहे याचं संशोधन करून खरा इतिहास समाजासमोर मांडता येईल. पण उठ की सुठ प्रस्तापित आणि सनातनींना नावे ठेवण्यात काय अर्थ आहे?? मान्य आहे की त्यांनी आम्हावर अन्याय केला, जाणूनबुजून आमच्या पुर्वजांचा इतिहास लपवून ठेवला.पण अन्याय करणार्यांपेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार ठरतो. मग सदैव असंच अन्याय सहन करत रडत बसायचं का अन्यायाच्या विरोधात मुठ उगारायची??  आज संजय सोनवनी सर यांच्या सारख्या थोर इतिहासकारांनी "धनगरांचा गौरवशाली इतिहास" लिहून ठेवला आहे. विख्यात लेखक तथा इतिहासकार आदरनीय होमेश भुजाडे सर यांनी देखिल धनगर समाजातील महापुरुषांचा खरा इतिहास समाजासमोर ठेवला आहे. धनगर समाजातील बुद्धिजीवी वर्ग समाजप्रबोधन करण्यासाठी लेखणीरुपी तलवार घेऊन एकेकाची काळीजं चिरुन टाकावीत अशा सडेतोड शब्दात समाजाच्या अज्ञानपणावर प्रत्यक्ष अप्रत्यिक्षरित्या वार करून समाज जागृती करताहेत पण माझ्या धनगर समाजातील युवक/युवती तो खरा इतिहास आणि समाजप्रबोधनात्मक विचार कीती गांभीर्यानं अभ्यासणार, वाचणार आहेत याची शंका वाटते. कारण आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाचन करायला कोणाकडे वेळ आहे?? सर्वांकडे स्मार्ट फोन आल्याने या स्मार्ट दुनियेत वाचन करणारा युवा वर्ग फार कमी प्रमाणात आहे. या अत्याधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानाबरोबरच वाचन, चिंतन, मनन, आकलन व अवलोकन या पाच शस्त्रांचा दैनंदीन जीवनात वापर केला तर १००% आपल्या धनगर समाजातून लेखक/कवी/साहित्यिक तयार होतील, प्रत्येकामध्ये स्वाभिमानाची आग निर्माण होईल, प्रत्येकजण अन्यायाच्या विरोधात पेटून उठेल. थोर महापुरुषांचा इतिहास जर अभ्यासला तर प्रत्येकाच्या नसानसात थोर महापुरुषांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे धनगर समाजबांधवांची होणारी ससेहोलपटही थांबेल. धनगर समाजातील सुशिक्षित युवकांनी सुरवात स्वतापासून केली तर उद्या वाड्या वस्त्या, गाव तसेच शहरातील युवा वर्ग जागृत होईल अन् अन्यायाच्या विरोधात पेटून उठेल. यासाठी समाजबांधवांनी समाजोपयोगी पुस्तकं, कथा कादंबरी वाचाव्यात कारण जर मस्तकं सुधरायची असतील तर पुस्तकं वाचली पाहिजेत. तरच उद्या धनगर समाजातील पोरं देशाचं प्रशासन आणि राज्यकारभार चालवण्या लायक बनतील, अन्यथा दोन रूपयांची कवडी देणार्या नोकर्या आणि शेळ्या-मेंढ्यांची राखन करुन अविरत भटकंती करणं आमच्या पाचवीलाच पुजलेलं आहे. धनगर समाजातील युवकांनी थोर महापुरुषांच्या जयंत्या आज डी जे लावून साजर्या करण्यापेक्षा अहिल्यामाईंसारख्या महान जगविख्यात प्रशासक कशा होत्या, त्यांच्या विचारांचा,प्रशासनाच्या आणि राज्यकारभाराच्या कार्यपद्धतीचा आजच्या दैनंदीन जीवनात अवलंब कसा करता येईल यादृष्टीनं अभ्यास करुन त्यासंबंधी प्रबोधन केलं तर भारताचं प्रशासन धनगर समाजातील युवक/यूवती चालवतील यात काही तीळमात्रही शंका नाही.

।। जय मल्हार।। जय अहिल्या।।

         👉नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
        👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
  👆👆👆👆👆👆👆👆👆👆

No comments:

Post a Comment