Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 26 December 2017

स्व बी के कोकरे साहेबांची विचारधारा

     
क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांची विचारधारा
          ज्या माणसानं स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करून महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाजाला जागं केलं, स्वाभिमानानं आणि वाघासारखं जगायला शिकवलं आणि आमच्या सारख्या युवकांच्या हातात क्रांतीची मशाल दिली ते माझे आदर्श, धनगर समाजाचं आराध्य दैवत, धनगर आरक्षण चळवळीचे जनक, प्रस्तापित व्यवस्थेला भिडून त्यांच्याशी लढून धनगर समाजात क्रांती करून जाणारे असे क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या जिवनावर मी लिहलेले पुस्तक आज पुर्णत्वास आले त्या स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या जीवनचरित्रातील माझी ही एक भावपूर्ण कविता क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांना प्राणपणाने अर्पण...
-नितीनराजे अनुसे (लेखक व्याख्याते)

तुम्ही झटला अन् झगडला सामाजासाठी,
ना स्वार्थासाठी लढला ना सत्ता-संपत्तिसाठी,
बी के साहेब तुम्हीच जागविला अखंड समाज सारा,
साहेब आज समाजात पेरतोय मी तुमचीच विचारधारा.

अन्यायाच्या विरोधात तुम्हीच आसूड उगारला,
प्रस्थापितांच्या विरोधात तुम्हीच लढा पुकारला,
आकाशाला गवसणी घालणारा असा 'वादळ-वारा',
साहेब आज समाजात पेरतोय मी तुमचीच विचारधारा.

जागृत केला समाज तेव्हा पेटून उठू लागला
म्हणून प्रस्थापितांना तुमचा द्वेष वाटू लागला
झाला प्रचंड दबदबा आणि वाढला तुमचा दरारा
साहेब आज समाजात पेरतोय मी तुमचीच विचारधारा.

जातीसाठी माती खाणारे तुम्ही ठरलात खूप  महान
लाचारीला झिडकारून समाजात जागविला स्वाभिमान
समाजासाठी लढणारा तुम्हीच एक तेजस्वी अंगारा
साहेब आज समाजात पेरतोय मी तुमचीच विचारधारा.

स्वाभिमानी विचारांनी पेटविला होता तुम्ही भडाका
अन् प्रस्थापित घराणेशाहीला दिला होता तुम्ही तडाखा
नाही कोणी जन्माला येणार तुमचे विचार संपविणारा
साहेब आज समाजात पेरतोय मी तुमचीच विचारधारा.

तुमच्यावरती केला शारिरीक आणि मानसिक हल्ला,
मग समाजातील संधीसाधूंनी मारला सत्तेवर डल्ला,
आज नसूनसुद्धा तुमच्याच नावाचा वाहतोय वारा
साहेब आज समाजात पेरतोय मी तुमचीच विचारधारा.
जय मल्हार!! जय अहिल्या!! जय यशवंत!!
         -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३

Email:- nitsanuse123@gmail.com

Friday, 22 December 2017

तुम्हा सर्वांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन... - नितीनराजे अनुसे

तुम्हा सर्वांचे हर्दिक अभिनंदन... -नितीनराजे अनुसे
           महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात आजपर्रंत केवळ दोनच विद्यापीठाच्या नामांतरणासाठी लढा उभारावा लागल्याचे उदाहरण सापडते त्यातील पहिले म्हणजे सन १९५८ मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्नपुर्ती होऊन जे मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले. पण त्या विद्यापीठाला काय नाव द्यावं यासाठी दोन नावे समोर आली होती. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे म्हणजे शिक्षणाचा मसिहा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. परंतू १९६२ मध्ये स्थापन झालेल्या कोल्हापूर येथील विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असे नाव अगोदरच दिल्याने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी  राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात दि.२७ जुलै १९७८ रोजी ठराव संमत झाला असताना मनुवाद्यांच्या/जातीयवाद्यांच्या पोटातील पित्त खवळून उठले आणि त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाला विरोध केला होता मग दि.४ आॅगस्ट १९७८ पासून सुरू झाली ती दलितांची विद्यापीठ नामांतरणाची लढाई. या लढाईमध्ये कित्येक दलित बांधव शहीद झाले, कोणी भरचौकात स्वताला जाळून घेतले तर काहीठिकाणी याच जातीय दंगलीचा फायदा घेऊन जातीयवाद्यांनी कित्येक दलित माता-भगिनींवरती अन्याय अत्याचार बलात्कार केले, दलितांची घरे जाळली, दलित बंधू-भगिनींच्या उघड्या-नागड्या धिंडी काढल्या तरीही दलित बांधव नामांतरणाच्या लढाईपासून परावृत्तीत झाले नव्हते. शेवटी तब्बल १७ वर्षाच्या लढाईनंतर १४ जानेवारी १९९४ रोजी दलितांच्या एकजुटीला, दलिंताच्या लढ्याला यश आले आणि मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण होऊन ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे झाले.
         दुसरे उदाहरण म्हणजे सोलापूर विद्यापीठाची स्थापना दि.१ आॅगस्ट २००४ रोजी झाली तर त्याचे रीतसर उद्घाटन हे ३ आॅगस्ट २००४ रोजी झाले त्यानंतर लगेच ४ आॅगस्ट २००४ रोजी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे अशी धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्याई होळकर प्रेमींनी मागणी केली होती परंतू जातीयवादी कुलगुरूंनी सिनेटच्या नावाखाली ती मागणी डावलली तद्नंतर या मागणीसाठी अनेक मोर्चे निघाले शिवाय पत्रव्यवहार देखिल झाला परंतू शासन दरबारी त्याबद्दल कोणतीही दखल घेतली गेली नाही. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे ७ जुलै २०१४ साली पुणे विद्यापीठाचे नामकरण हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे करण्यासाठी कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झाले असातानाच सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे अशी मागणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानंतर भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर दि.२६ मे २०१६ रोजी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर असे नामकरण करण्याची तत्वता मान्यता राज्य सरकारने दिली खरी पण त्याची अंमलबजावणी झालीच नव्हती. परंतू जर सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असा जावई शोध विद्यापीठ प्रशासनाने काढला तर कॅबिनेट मध्ये शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी मागचा पुढचा विचार न करता ज्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी पारदर्शक राज्यकारभार व उत्तम प्रशासन व्यवस्थेचा आदर्श जगासमोर ठेवला, जात-पात, धर्म, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन विकासकामांचा डोंगर रचणारी व १८ शतकातील एकमेव आदर्श प्रशासनकर्ती म्हणून जगाने त्या मातेचा गौरव केला हा इतिहास ज्ञात असताना देखिल राष्ट्रामाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ निर्माण होईल असे जाहिरपणे वक्तव्य विधीमंडळात केले होते. त्यानंतर धनगर समाजाचा संयम सुटला आणि २८ आॅगस्ट २०१७ ला लाखोंच्या संख्येने धनगर समाजबांधव सोलापुरात दाखल झाले होते तरीही सरकारने काही ठोस पाऊले न उचलल्याने धनगर समाजबांधवांची उदासीनता आणि संताप वाढत चालला होता. शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमासाठी गेले त्या त्या ठिकाणी त्यांच्या निषेधात त्यांच्यावर भंडारा फेकून बुक्का (अबीर) फेकून सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरण प्रकरणी समाजबांधवांनी रोष व्यक्त केला होता. त्या कृत्याबद्दल काही समाजबांधवांवरती पोलिस केसेस देखिल पडल्या परंतू कोणी हार मानली नाही. पुढे नागपूर येथील आरक्षण निर्णायक मेळाव्यात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाला नाव देणार असल्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते तेव्हा कुठेतरी आमचा पारा कमी झाला होता परंतू काही दिवसांपूर्वीच अचानक शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांनी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव देणार नसल्याचे वक्तव्य केले तेव्हा धनगर समाजाचा उतरलेला पारा पुन्हा वायूवेगाने चढला. ज्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे आणि भाजप सरकारच्या निषेधाचा दणका सुरू झाला. सोशल मिडीयावरती तर पिवळे वादळ आगच ओकू लागले होते. सर्वत्र नाराजीचा सुर उमटलेला दिसून येत होता. अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे साहेब यांच्याशी सोमवार दि. १८ डिसेंबर २०१७ रोजी निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली आणि नागपूर येथिल अधिवेशनातच शिक्कामोर्तब करू असे आश्वासन दिले.
आज दि. २२ डिसेंबर २०१७ रोजी मंत्रिमंडळात ठराव झाला आणि सोलापूर विद्यापीठाचे आगामी नाव हे राष्ट्रमाता अहिल्याई होळकर विद्यापीठ सोलापूर असा ठराव संमत झाला आणि राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला दिल्याबाबत शिक्कामोर्तब झाला. सदरचा विद्यापीठ नामांतरण लढा हा कोण्या एकट्या-दुकट्याचा नव्हता तर तो लढा अखंड धनगर समाजाचा होता. प्रत्येकाचे यामध्ये काही ना काही योगदान आहेच. त्यामुळे राज्यसरकार असो, नोकरदार वर्ग असो अथवा सामान्यातील असामान्य असे माझे मेंढपाळ बांधव असोत आपण सर्वांनी ही लढाई ज्याला जमेल त्या पद्धतीने पण प्रामाणिकपणे लढली आणि आपल्या सर्वांच्या विद्यापीठ नामांतरण लढ्याला यश प्राप्त झाले. म्हणून सोशल मिडीया असो अथवा रस्त्यावरची लढाई असो प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या लढ्यात सहभागी झालेल्या/न झालेल्या सर्व एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या माझ्या सर्व समाजबांधवांचे आणि सर्व माता-भगिनींचे हर्दिक हर्दिक अभिनंदन...
लेखक व व्याख्याते
     ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           ७६६६९९४१२३
Email:- nitsanuse123@gmail.com

Wednesday, 20 December 2017

स्वच्छतेचे खरे जनक श्री संत गाडगे बाबा

माणसात देव शोधणारा संत
हल्ली स्वच्छता अभियान राबवणाऱ्याला स्वच्छतेचे जनक म्हणून संबोधले जाते एवढेच नव्हे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखिल गांधीजींचा फोटो वापरून स्वच्छ भारत अभियान सुरू केले. खरंतर टिका करायचा माझा उद्देश नाही परंतू गांधीजींनी कधी झाडू घेऊन साफसफाई केल्याचे उदाहरण इतिहासात तरी कुठे वाचायला मिळाले नाही. असो, ज्या माणसानं हातात झाडू घेऊन गावंच्या गावं साफ केली ते म्हणजे श्री संत गाडगे महाराज त्यांचा जन्म शेगांंव (अंजनगाव), कोल्हट सुर्जी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्र येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला तर मृत्यू २० डिसेंबर इ.स. १९५६ साली वलगांव (अमरावती) येथे झाला. गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे याची नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.
"तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |"
असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
संत गाडगे बाबांनी हातात झाडू घेऊन दिवसभर गावं साफ केली तर रात्री देवळात मुक्काम करून तेथे किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ केली. दिनदुबळ्यांची सेवा करताना त्यांनी समाजासमोर काही संदेश दिले आहेत ते खालीलप्रमाणे.
1. भुकेलेल्यांना = अन्न
2. तहानलेल्यांना = पाणी
3. उघड्यानागड्यांना = वस्त्र
4. गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
5. बेघरांना = आसरा
6. अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
7. बेकारांना = रोजगार
8. पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
9. गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
10. दुःखी व निराशांना = हिंमत
11. गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती आहे!
गाडगे बाबांचे बालपण
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी गावकर्‍यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्‍न केले.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्‍न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वर्‍हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आले आहे.
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
* ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
* १९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
* १९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.
* १९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
* "मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
* फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
* गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
* १९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
* गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
* "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.[१]
* आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
* १९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
* १९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
* गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
* डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
* २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.
* नाशिक येथील गॊदावरी नदीवरील पुलाला गाडगे महाराजांचे नाव दिले आहे.
* श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट हा गाडगे महाराजांनी बांधलेल्या धर्मशाळांची व्यवस्था पाहतो.

             १४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.
श्री संत गाडगे महाराज हे कधीही शाळेत अशिक्षित होते परंतू त्यांचे कार्य इतके महान आहे की अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर गाडगे बाबांनी फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर ज्या शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या. त्यांच्याच शिक्षण संस्थेतील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी (रहिमतपूर) ता.कोरेगाव जि.सातारा या शाळेचा माजी विद्यार्थी या नात्याने स्वच्छतेचे खरे जनक असलेले श्री संत गाडगे महाराज यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम...
        ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१८५३०००४१२३
https://nitinrajeanuse123.blogspot.in

Friday, 15 December 2017

महाराष्ट्र देशा! जातीयवाद्यांच्या देशा! तरी तु महान? : नितीनराजे अनुसे

महाराष्ट्र देशा! जातीयवाद्यांच्या देशा! तरी तु महान?

महाराष्ट्राला संतांची भुमी म्हणून संबोधले जाते पण याच मातीने अनेक थोर राजा-महाराजांना, महापुरूषांना त्याचप्रमाणे समाजाचा उद्धार करणाऱ्या थोर समाजप्रबोधकांना/समाजसुधारकांना देखिल जन्म दिला त्यांचा इतिहास लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना ज्ञात आहे शिवाय अनेक जेष्ठ साहित्यकार, इतिहास संशोधक, विचारवंत अभ्यासक यांच्या अथक प्रयत्नातून तसेच संशोधनातूनही उर्वरित इतिहास तमाम महाराष्ट्र वासियांसमोर येत आहे.
पण फक्त महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड भारतमातेच्या भुमीत जन्माला आलेल्या थोर महापुरूषांना राजा-महाराजांना जातीयतेच्या चौकटीत बसवण्याचे काम हे जाणूनबूजून व एका विशिष्ट वर्गाने अर्थातच मनुवाद्यांनी/पुरोगाम्यांनी/पुरोहितांनी केले आणि त्यामुळेच आजचा जातीयवाद उफाळला जातोय हे कोणी नाकारू शकत नाही. महाराष्ट्राचे सुपूत्र कवि गोविंदाग्रज यांनी त्यांच्या काव्यात महाराष्ट्र देशाचे जे वर्णन केले आहे ते उल्लेखनीय अप्रतिम आणि वंदनीय अाहेच परंतू,
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!!
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा!!
असे कवि गोविंदाग्रज यांनी वर्णन केलेला त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आणि त्याबद्दलची ही भावनाच मुळात महाराष्ट्र वाशियांच्यातून लोप पावत चालली आहे असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. आज महाराष्ट्र राज्यात एक वेगळेच चित्र पहावयास मिळते ते म्हणजे ज्या महापुरूषांनी जात-पात, धर्म, संप्रदाय, प्रांत, साम्राज्य यापलीकडे जाऊन अखंड भारतवाशीयांसाठी विकासकामांचा डोंगर रचला त्या त्या महापुरूषांना त्यांच्या जन्म कुळानुसार जातीयतेच्या चौकटीत डांबले जातेय आणि त्यांना जातीयवादाच्या चौकटीत डांबण्याचे काम हे खरंतर पुरोहितवाद्यांनी/मनुवाद्यांनी केले आणि आज पुरोगाम्यांचा बुरखा पांघरणारे देखिल जातीयवादाचे भांडवलीकरण करत बसले आहेत ही या महाराष्ट्र देशाची फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. इतिहासाची पाने चाळली तर हा जातीयवादाचा प्रकार लक्षात यायला फार वेळ लागणार नाही... कारण जात-पात-धर्मांची सुरवात ही तथाकथित गौतम बुद्धांच्या जीवनकाळापासून चालत आली आहे आणि त्या जातीयवादाचे मुळ कारण दुसरे कोणी नसून फक्त आणि फक्त ब्राह्मणच होते आणि कोणताही इतिहासकार हे नाकारू शकत नाही.
आज महाराष्ट्र राज्यात शिक्षणाची गंगा घरोदारी पोहचावी म्हणून अनेक विद्यापीठांची स्थापना केली आणि त्या त्या विद्यापीठांना महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या महापुरूषांची नावे दिली आहेत हे खरंतर कौतुकास्पद आहे. पण त्यातही शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जातीयवाद उफाळतो हे मात्र नवलच म्हणावे लागेल. विद्यापीठांच्या यादीपैकी सर्वप्रथमता मराठवाडा विद्यापीठाच्या नांमातरणासाठीच मोर्चे आंदोलने करावी लागल्याची नोंद इतिहासात आहे. त्यानंतर सोलापूर विद्यापीठाचा प्रश्न काही मनुवाद्यांमुळेच ऐरणीवर आल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील ठराविक विद्यापीठांची यादी खालीलप्रमाणे आहे त्यात जुनी आणि रूढ नावे आणि (बदललेली नावे) या सर्वांचा उल्लेख आहे.
* अमरावती विद्यापीठ (कर्मयोगी गाडगेबाबा विद्यापीठ), अमरावती
* औरंगाबाद विद्यापीठ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)
* कालिदास विद्यापीठ (कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय), रामटेक
* कोल्हापूर विद्यापीठ (शिवाजी विद्यापीठ, विद्यानगर), कोल्हापूर
* गोंडवाना विद्यापीठ ((नव्याने सुचविलेले नाव - आदिवासी समाजातील क्रांतिकारी नेते बिरसा मुंडा विद्यापीठ), गडचिरोली.
* जळगाव विद्यापीठ (उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), (नव्याने सुचविलेले नाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ), जळगाव
* दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर
* नागपूर विद्यापीठ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,) नागपूर
* श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई
* नांदेड विद्यापीठ (स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ), नांदेड
* नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठ
* पुणे विद्यापीठ (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), पुणे
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड
* भारतीय विद्यापीठ व्यवस्थापन संस्था, कोल्हापूर
* मराठवाडा विद्यापीठ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
* महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा
* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
* महाराष्ट्र पशुवैद्यकीय आणि मत्स्य विद्यापीठ, नागपूर
* मुंबई विद्यापीठ, (नव्याने सुचविलेले नाव - राजमाता जिजाऊ विद्यापीठ), मुंबई
* नाशिक मुक्त विद्यापीठ (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ), नाशिक
* श्रमिक विद्यापीठ, नागपूर
* श्रमिक विद्यापीठ (नव्याने सुचविलेले नाव - ???), निगडी
* श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.
* सोलापूर विद्यापीठ, (नव्याने सुचविलेले नाव - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ), सोलापूर

महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठांची यादी
* अकोला कृषी विद्यापीठ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ), अकोला
* दापोली कृषी विद्यापीठ (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ), दापोली, जिल्हा रत्‍नागिरी
* परभणी कृषी विद्यापीठ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ), परभणी
* राहुरी कृषी विद्यापीठ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ), राहुरी, जिल्हा अहमदनगर
शिक्षण हे मागासवर्गीय समाजासाठी अन्य कोणत्याही भौतिक लाभांपेक्षाही सर्वाधिक महत्वाचा लाभ असून दबलेल्या नि पिचलेल्या मागासवर्गीय समाजाने शिक्षण घेतले तरच त्यांचा उत्कर्ष आहे व तेही सर्वोच्च शिक्षण , उच्च शिक्षण घेतले तरच ते प्रगतीपथावर जाऊ शकतात. या विचाराने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे १९५० साली मिलिंद विद्यालयाची स्थापना केली त्यानंतर तिथे विद्यापीठ देखिल व्हायला हवे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली व वरील विद्यापीठांच्या यादीपैकी १९५८ मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्नपुर्ती होऊन मराठवाडा विद्यापीठ स्थापन झाले. पण त्या विद्यापीठाला काय नाव द्यायचं यासाठी दोन नावे समोर आली एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे म्हणजे शिक्षणाचा मसिहा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर. परंतू १९६२ मध्ये स्थापन झालेल्या कोल्हापूर येथील विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असे नाव अगोदरच दिल्याने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी  राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात दि.२७ जुलै १९७८ रोजी ठराव संमत झाला असताना मनुवाद्यांच्या/जातीयवाद्यांच्या पोटातील पित्त खवळून उठले आणि त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाला विरोध केला. मग दि.४ आॅगस्ट १९७८ पासून सुरू झाली ती दलितांची विद्यापीठ नामांतरणाची लढाई. या लढाईमध्ये कित्येक दलित बांधव शहीद झाले, कोणी भरचौकात स्वताला जाळून घेतले तर काहीठिकाणी याच जातीय दंगलीचा फायदा घेऊन जातीयवाद्यांनी कित्येक दलित माता-भगिनींवरती अन्याय अत्याचार बलात्कार केले, दलितांची घरे जाळली, उघड्या-नागड्या धिंडी काढल्या तरीही दलित बांधव नामांतरणाच्या लढाईपासून परावृत्तीत झाले नाहीत शेवटी तब्बल १७ वर्षाच्या लढाईनंतर १४ जानेवारी १९९४ रोजी दलितांच्या एकजुटीला, दलिंताच्या लढ्याला यश आले आणि मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण होऊन ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे झाले.
सोलापूर विद्यापीठाची स्थापना दि.१ आॅगस्ट २००४ रोजी झाली तर त्याचे रीतसर उद्घाटन हे ३ आॅगस्ट २००४ रोजी झाले त्यानंतर लगेच ४ आॅगस्ट २००४ रोजी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे अशी धनगर समाजाच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्याई होळकर प्रेमींनी जातीयवादी कुलगुरूंनी सिनेटच्या नावाखाली डावलली तद्नंतर या मागणीसाठी अनेक मोर्चे निघाले शिवाय पत्रव्यवहार देखिल झाला परंतू शासन दरबारी त्याबद्दल कोणतीही दखल घेतली गेली नाही. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे ७ जुलै २०१४ साली पुणे विद्यापीठाचे नामकरण हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे करण्यासाठी कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब झाले असातानाच सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे अशी मागणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानंतर भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर दि.२६ मे २०१६ रोजी सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर असे नामकरण करण्याची तत्वता मान्यता राज्य सरकारने दिली खरी पण त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झालीच नाही. परंतू जर सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असा जावई शोध विद्यापीठ प्रशासनाने काढला तर कॅबिनेट मध्ये शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे हे मागचा पुढचा विचार न करता ज्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांनी पारदर्शक राज्यकारभार व उत्तम प्रशासन व्यवस्थेचा आदर्श जगासमोर ठेवला, जात-पात, धर्म, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन विकासकामांचा डोंगर रचणारी व १८ शतकातील एकमेव आदर्श प्रशासनकर्ती म्हणून जगाने त्या मातेचा गौरव केला हा इतिहास ज्ञात असताना देखिल राष्ट्रामाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ निर्माण होईल असे जाहिरपणे वक्तव्य विधीमंडळात करतात. याचा मथितार्थ म्हणजे राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांना केवळ धनगर जमातीच्या चौकटीत अडकवण्यासाठी लोकप्रतिनिधींचा हा घाणेरडा प्रकार चालू आहे. मग राज्य सरकार आणि राज्य सरकार मधील जातीयवादी आमदार/मंत्री गण काय भांग पिऊन कॅबिनेट चालवतात का? असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्यांना पडतो. परंतू त्याच कॅबिनेटमध्ये असलेले राष्ट्रमाता अहिल्याईंचे अनुयायी म्हणून मिरवणारे आणि ज्या महाराष्ट्राच्या मातीत राष्ट्रमाता अहिल्याई जन्माला आल्या त्याच महाराष्ट्राच्या मातीतले आमदार/मंत्री मात्र आळी मिळी गुप चिळीची भुमिका घेऊन त्यावरती एकही प्रतिक्रिया न देता एक ब्र देखिल न काढतां केवळ लोकप्रतिनिधींनी चालवलेला तमाशा बघत बसतात हेच आमच्या महाराष्ट्र राज्याचे सर्वात मोठं दुर्दैव म्हणावे लागेल. म्हणूनच महाराष्ट्र देशा आणिक जातीयवाद्यांच्या देशा तरी तु महान? कसा काय? असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही.
परंतू विधीमंडळात अशी विधाने करून लोकप्रतिनिधींना नक्की काय साध्य करायचे आहे असा पुसटसा विचार मनात का येऊ नये? मराठवाडा विद्यापीठाच्या नामंतरणाच्या लढाईचा ज्वलंत इतिहास ज्ञात असताना देखिल, हजारो दलितांची घरे जळून खाक झाली हे माहित असताना देखिल, त्या नामांतरण लढाईचा गैरफायदा घेऊन पुरोगाम्यांनी/पुरोहितवाद्यांनी दलित माता-भगिनींवर अन्याय अत्याचार व बलात्कार केला शिवाय कित्येक दलित बांधवांनी भर चौकात स्वताला पेटवून घेतले हे माहित असताना देखिल सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणासाठी जातीय रंग देण्याचा प्रकार जर विद्यापीठ प्रशासन व त्यापाठोपाठ राज्य सरकार स्वता करत असेल तर त्यापाठीमागचा राज्य सरकारचा उद्देश हा स्पष्ट आहे की पुन्हा एकदा जातीय दंगल व्हावी, अनेक मोर्चे निघावेत, आंदोलने व्हावीत, धनगरांची घरे जळून खाक व्हावीत उद्वस्त व्हावीत, पुरोगाम्यांनी/पुरोहितवाद्यांनी/मनुवाद्यांनी या आंदोलनाचा/जातीय दंगलीचा फायदा उठवून माता भगिनींवर अन्याय अत्याचार करावेत व त्यांचा आळ धनगरांवरती यावा शिवाय अनेक धनगर बांधव या दंगलीत मारले जाऊन धनगर समाजाचे नेतृत्व दिशाहीन व्हावे व ज्याप्रमाणे बारामतीच्या आरक्षण आंदोलनाप्रमाणे धनगरांना सहानुभुति देऊन आम्हीच तुमचे नेते आहोत असा विश्वास देऊन पुरोगाम्यांनी/मनुवाद्यांनी/पुरोहितवाद्यांनी धनगरांच्या जिवावर राज्यकारभार करावा हा आरएसएसच्या विचारावर चाललेल्या सरकारचा स्पष्ट छुपा उद्देश तर नसावा ना? आणि जरी असेल तरी राज्य सरकारचा हा उद्देश कधीही लयाला जाऊ न देता सोलापूर विद्यापीठाला रणधुरंदर, रणरागीणी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव सन्मानानेच लावून घेण्यासाठी धनगर समाजातील सर्व संघटना एकत्रित येत आहेत. प्रत्येक नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात त्याप्रमाणे धनगर समाजाचे देखिल आहे. एका बाजूने प्रामाणिकपणा इमानदारपणा असला तरी दुसऱ्या विनाकारण अन्याय करणाऱ्यांचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची छातीत जिगर धमक ठेवतात त्याला हजारो वर्षांचा इतिहास साक्ष आहे.
लेखक व व्याख्याते
     ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           ७६६६९९४१२३
Email:- nitsanuse123@gmail.com

Thursday, 14 December 2017

आता टोलनाक्यावर देखिल भारतीय सैनिकांना सॅल्यूट मिळणार...



आपल्या जिवाची पर्वा न करता ऊन, वारा, पाऊस असो अथवा सियाचीन सारखा बर्फाच्छादित प्रदेश असो जंगल दऱ्याखोऱ्यात देशरक्षणासाठी सीमेवरती उभ्या ठाकलेल्या सैनिकांना टोलनाक्यावरती मिळणारी अपमानास्पद वागणूक लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या वतीने भारतीय सैनिकांना टोल नाक्यांवरती सलाम (सॅल्यूट) करण्याचा आदेश टोल नाका स्टाफ ला देण्यात आला आहे. भारत देश सोडला तर अन्य देशांमध्ये देशरक्षक आणि शिक्षक यांना व्ही आय पी दर्जा देण्यात येतो त्याउलट भारतामध्ये सैनिकांची अवहेलना करण्यात येते. भूदल (आर्मी), नौदल (नेव्ही) तसेच वायुदल (एअरफोर्स) या भारतीय सशस्त्र दलामधील मधील मातृभूमीचे आणि तमाम भारतवासीयांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना भारतीयांकडूनच अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर त्यांनी देशसेवा करावी की करू नये असा प्रश्न उपस्थित होतो. एखादा सैनिक रेल्वेने प्रवास करत असला तरी त्याला रेल्वेच्या पॅसेज मध्ये खाली बसून प्रवास करावा लागतो परंतू भारतीय नागरिक आरामात बसून प्रवास करत असतात मग त्या सैनिकांनी नक्की आराम कधी करायचा? रात्री-अपरात्री एखादा टिकेट चेकर समोरचा व्यक्ति फौजी आहे सैन्यदलातील आहे हे माहित असून देखिल त्याच्याशी उद्धटपणे वागतो, अपमानास्पद वागणूक देऊन एका डब्ब्यातून दुसऱ्या डब्ब्यात पाठवतो तेथेही एखादी रिकामी अथवा बसण्यापूरती जागा असेल तरीदेखिल तेथिल लोक त्याला उठवून लावतात हे अनेक वेळा अनुभवलेले आणि मी पाहिलेले आहे. कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कार्यालयात एखादा सैनिक वैयक्तिक कामासाठी ड्युटीवरून वेळ काढून गेला तरी त्याचे काम वेळेत पूर्ण होत नाही. सैनिक जर ड्युटीवर तैनात असेल तर त्यांच्या कुटूंबियांना जमिन अथवा घराच्या वादातून नाहक त्रास मिळत असतो. एक भारतीय या नात्याने प्रत्येक सैनिकाला मान सन्मान मिळायला हवा. इतर राष्ट्राप्रमाणेच भारतामध्ये देखिल शिक्षक व फौजी यांना व्ही आय पी दर्जा मिळायला हवा तरच देशासाठी जीव द्यायला अनेक तरून युवक देशरक्षणासाठी भारतीय सैन्य दलात भरती होतील.
असो National Highway Authority of India च्या वतीने टोलनाक्यावरील स्टाफ ला तसे ट्रेनिंग देण्यात येणार असल्याचे NHAI चे चेअरमन मा.दिपक कुमार यांनी सांगितले अाहे. जर भारतीय सशस्त्र सैन्यदलाचा  सैनिक टोलनाका क्राॅस करून जात असेल तर त्याला मार्क आॅफ रिस्पेक्ट अर्थातच सॅल्यूट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबद्दल NHAI चे हर्दिक आभार. प्रत्येक क्षेत्रात सैनिकांना असाच मानसन्मान मिळावा ही एक भारतीय भारतीय नागरिक या नात्याने प्रामाणिक अपेक्षा.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

आता याला आमदार म्हणायचं की भिताड?


गोरगरीब जनतेचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा विकास व्हावा म्हणून विधानसभा मतदारसंघांची निर्मीती करून त्या त्या प्रत्येक मतदारसंघातून एकेक लोकप्रतिनीधी निवडला जातो त्यालाच विधानसभा सदस्य अर्थातच आमदार म्हंटलं जातं. आमदार हा जनतेचा सेवक असतो जनतेवरील होणाऱ्या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून सरकार दरबारी आपल्या मतदार संघातील जनतेसाठी न्याय मागत असतो पण आमच्या खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून आमच्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी विश्वास ठेवून एक आगळा वेगळाच गडी आमदार म्हणून विधानसभेत पाठवला पण त्या आमदाराने त्यांच्या मतदारसंघातील जनतेच्या हिताचा एकही प्रश्न विधानसभेत उपस्थित केला नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. परंतू जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांनी दुष्काळात होरपळलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी असंख्य प्रश्न निर्माण केलेत. माणदेशातील आटपाडी तालुका हा बारमाही दुष्काळी असतो ही एक तालुक्याची वेगळीच ओळख महाराष्ट्र राज्यात असताना शेतीसाठी जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची दैना होत असताना यावरती एकही उपाययोजना करण्याचे कार्य येथील निष्क्रीय आमदार अनिल बाबर यांनी कधीच केले नाही.
"पोरगं कोणाचं आणि पेढं वाटतंय कोण?" अशा आशयाचा ब्लाॅग मी गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रकाशित केला होता त्याचे कारण असे होते की युवह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या फंडातून आटपाडी तालुक्यांतील रस्त्यांसाठी भरघोस निधी मिळाला असताना तो निधी आम्हीच आणला असल्याचा कांगावा करत वर्तमानपत्रातून बातम्या देऊन व रस्त्यांचे भुमिपूजन करून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सध्याचे निष्क्रीय आमदार अनिल बाबर व त्यांची पिलावळ करत होती म्हणून पोरगं कोणाचं आणि पेढं वाटतंय कोण असे म्हणायला काही वावगे वाटले नाही.
पण आता तर या आमदारांनी तर हद्दच पार झाली राव... कारण २७ आॅक्टोबर २०१५ रोजी मुख्यमंत्री आटपाडी-खानापूर दौऱ्यावर आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वता अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी तब्बल ४ कोटी निधी मंजूर केला होता. पण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकण्यास गावागावात जाऊन अनिल बाबर यांनी लोकांना प्रवृत्त केले होते अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या शिवाय काळ्या फिती बांधून कशासाठी त्यांनी निषेध केला होता हे देव जाणे बुवा?? पण असे आमदार काय कामाचे?? मुख्यमंत्र्यांनी अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी ४ कोटीचा निधी मंजूर केल्यानंतर युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी लोकसहभागातून आणि शासनाच्या वतीने पाठपुरावा करून अग्रणी नदीवर आतापर्यंत एकून ११ बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण केले असताना त्याच अग्रणी नदीवरील दोन बंधाऱ्याचे काम आमदार अनिल बाबर यांनी होऊनच दिले नव्हते. मग आमदार नक्की कशासाठी असतो तेच मला कळेना? जनतेच्या विकासासाठी की मतदारसंघाच्या भकासासाठी?? ऐन दुष्काळात जनता पाण्यावाचून तडफडत असताना, मुकी जणावरं ही धगधगत्या उन्हात होरपळत असताना याच मतदारसंघाच्या आमदारांनी नदीच्या काठावर वसलेल्या बलवडी (खा) व अन्य गावांसाठी बंधाऱ्याचे काम होऊ दिले नाही ही त्यांच्यासाठी आणि लोकशाहीसाठी सर्वात मोठी लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. लोकसहभागातून आणि शासनाच्या वतीने अग्रणी नदीवर एकूण ११ बंधारे बांधण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वीच आणखीन तीन बंधाऱ्यांचे भुमिपूजन नुकतेच मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या हस्ते झाले होते परंतू आमदार अनिल बाबर यांची पिलावळ मात्र जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी जे बंधारे अडवून धरले होते ते बंधारे आम्हीच मंजूर करून आणले आहेत असे सांगत अडवलेल्या दोन बंधाऱ्यांचे स्वता भुमिपूजन करून वर्तमानपत्रात बातम्या छापून द्यायचा घाणेरडा उद्योग आणि घाणेरडे राजकारण निष्क्रीय आमदार अनिल बाबर आणि त्यांच्या पिलावळीने केले. त्यांच्या असल्या उद्योगाचे हसू खानापूर मधील जनतेला आलं होत.
आज मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी बांधव, गोरगरीब जनता ही अज्ञानी राहीली नसून सुशिक्षीत झालेली आहे त्यामुळे जनतेच्या प्रतिनीधींनी असे उलट-सुलट प्रकार करून स्वताच्या प्रसिद्धीसाठी उतावीळ होऊ नये. खरी समाजसेवा ही रक्तातच असावी लागते नुसताच दिखाऊपणा करून विकासकामे होत नाहीत तर विकासकामे करण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो. युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी मंत्रालयाच्या पायऱ्या कोणत्याही पदासाठी अथवा दिखाऊगीरी करण्यासाठी झिजवल्या नाहीत तर त्यांनी कोणतेही पद नसताना जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडले आहेत प्रत्यक्ष जलसंधारण मंत्री, जलसंपदा मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांशी भेटून जल शिवार योजनेतून बंधारे, तलाव, शेततलाव यांना मंजूरी मिळवून आणली कारण दुष्काळात उमललेलं एक संघर्ष फूल म्हणूनच पडळकर साहेबांची ओळख महाराष्ट्र राज्यभर आहे आणि पडळकर साहेब देखिल वरील दिलेल्या उपाधीस त्यांच्या कार्यातून पात्र ठरतात.
असो, पोरगं कोणा दुसऱ्यांच असताना या लोकांना पेढं वाटण्यात का आनंद वाटतो याचं गणित आम्हासारख्या सर्वसामान्य जनतेला न कळण्या इतपत आम्ही काय बोळ्याने दुध पित नाही त्यामुळे त्या आमदारांना आणि त्यांच्या पिलावळीस आतातरी शहाणपण यायला हवे. कालच हा आमदार नागपूर येथिल हिवाळी अधिवेशनात बोलताना सभागृहातच गोंधळून गेला. कारण ५१ लाखांचा निधी गोपीचंद पडळकर साहेबांच्या विशेष प्रयत्नातून मतदारसंघासाठी मिळाला असताना त्याचे श्रेय लाटण्यासाठी हा आमदार गडी सभागृहातच बरळायला लागला. ५१ लाखांचा निधी पाहून त्याला विश्वासच बसला नाही चष्मा चढवून/उतरवून पाहिलं तरी आकडा तोच होता पण कोणत्या गावांसाठी किती निधी आणला आहे हे त्याला सांगता आलं नाही याचं गणित त्याची त्याला उमजलं नाही. म्हणून काल दिवसभर उपाशी राहून हा गडी विचार करत बसला होता की "सर्वसामान्य घराण्यातलं कालचं तरूण पोरगं प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून राजकारणात येतं आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा" मानून दिवसरात्र दुष्काळात होरपळलेल्या जनतेसाठी राबराब राबतंय. ना कोणते पद ना स्वार्थ, केवळ जनतेचा विकास हात ध्यास मनात ठेवून पायाला भिंगरी, तोंडात साखर तर वेळप्रसंगी अन्यायाच्या विरोधात मुखातून आगीचे लोळ फेकणारे व्यक्तिमत्व आणि जनतेसाठी अखंड अविरतपणे झटणारे असे मुर्तिमंत उदाहरण उभ्या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. निष्क्रिय आमदारांना आता पुढच्या आमदारकीचे चांगलेच डोहाळे लागले आहेत त्यामुळे गोरगरीब जनतेच्या हीतासाठी शेतकऱ्यांसाठी एखादी उपाययोजना राबवतां आली नाही म्हणून ज्या योजना युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून राबवल्या गेल्या त्या कशा हायजॅक करून पुढच्या विधानसभा डोळ्यांसमोर ठेऊन बंधाऱ्यांचे तसेच रस्त्यांचे भुमिपूजन करायचे असा प्रकार निष्क्रीय आमदारांनी चालवला आहे पण काल मात्र ५१ लाखांचा निधी स्वता आणल्याचे सांगतानाच गड्याची मात्र बोबडी वळाली. मग अशा लोकप्रतिनिधींना आमदार म्हणायचं की भिताड? जनता आता दुधखूळी राहीली नसून ती सतर्क आणि सुज्ञ झाली आहे याचा गांभिर्याने विचार करावा शिवाय धमक असेल तर त्यांनी जनतेच्या हीताचं गोरगरीबांच्या हीताचं राजकारण करावं अन्यथा तसे जमत नसल्यास राजकारणातून संन्यास घ्यावा ही विनंती.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
      *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

Saturday, 9 December 2017

आम्हीच आमच्या मनाचे राजे....

काल कोणीतरी म्हंटलं...
हातात तलवारी घेऊन आणि नावांपुढे सरदार, सरकार, राजे लावणारे आज आमुक आमक्याचे आणि तमुक तमक्याचे वारसदार/वंशज म्हणून सांगताहेत... याबद्दल माझा काहीच आक्षेप नाही कारण आम्ही त्या त्या महापुरूषांच्या वंशावळ मध्ये आहोत की नाही हे पुराव्यांशिवाय तरी स्पष्ट सांगू शकत नाही.
पण...
आम्ही कुरूवंशीय धनगर पुत्र भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट राजा ययाति, सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली भारताचे स्वप्न पाहणारे धनगरपुत्र आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, महायोद्धा धनगरपुत्र चक्रवर्ती सम्राट राजा अशोक, क्षत्रिय कुलवंतस छत्रपती शिवाजी महाराज, होळकरशाहीचे संस्थापक अटकेपार झेंडे फडकवणारे थोरले श्रीमंत राजे मल्हारराव होळकर, राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई होळकर, महापराक्रमी योद्धा चक्रवर्ती सम्राट छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर अशा धुरंदर लढवय्यांच्या समाजात जन्माला आलेले आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. महत्वाचं म्हणजे वारसा हा फक्त वंशावळ पद्धतीचा नसतो तर तो विचारांचा देखिल असतो हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. अरे आम्ही त्या त्या महापराक्रमी महापुरूषांचे वारसदार आहोत हे सांगायला आम्हाला कशाची लाज आणि कोणाची भिती वाटत नाही. आजही जर राजेशाही पुन्हा जन्माला आली तर छाती ठोकपणे सांगतो की नुसते नावांपुढेच राजे लावून नव्हे तर सळसळत्या रक्ताचे आम्ही वारसदार छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर तलवार गाजवून आम्ही राजे बनू शकतो आणि ती धमक आणि तोच दरारा आजही आमच्यात आहे हे कोणीही विसरू नका. त्यामुळे नावांपुढचं काय घेऊन बसलाय? कोणाच्या चहाच्या मिंद्यात न राहणारे आम्ही आमच्या स्वताच्या हिंमतीवर स्वकर्तृत्वाच्या जोरावर स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगणारे आम्हीच आमच्या मनाचे राजे आहोत. आणखी एक गोष्ट लक्षात असुद्या पुन्हा सांगितलं नाय म्हणून सांगायचं नाय... जोपर्यंत वाघ शांत आहे तोपर्यंत तो शांतच असतो पण एकदा का जर वाघाला डिवचलं तर तो सरळ फाडून टाकतो.
त्यामुळे आम्हाला कोणीही विनाकारण डवचू नका🙏
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
          ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
Email:- nitsanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.in