Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday, 16 May 2019

लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर (पुष्प दुसरे) ✍️नितीनराजे अनुसे

लोककल्याणकारी राष्ट्रमाता महाराणी अहिल्याई होळकर

क्रमशः....  पुष्प दुसरे💐 दि.१६ मे २०१९
महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण
       अहिल्याई तशा हुशार होत्या. ज्याकाळी बुरसटलेले विचार समाजात रूजवणाऱ्या सनातनी व्यवस्थेने स्री शिक्षणासाठी निर्बंध लादले होते त्याकाळी म्हणजे अठराव्या शतकात माणकोजी शिंदे यांनी अहिल्याईंना थोडेफार का होईना पण लिहायला वाचायला शिकवले होते. त्यामुळे अहिल्याईंकडे ज्ञानाचे जणू भांडारच होते त्यामुळे आत्मविश्वास असणे साहजिकच होते. मल्हारराव होळकरांना अहिल्याईंच्या डोळ्यातील ते तेज पाहून, तो करारी बाणा, धाडसीपणा आणि पेशव्यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराचा स्पष्टपणा आणि निडरपणा पाहून मल्हारराव होळकर प्रभावित झाले आणि हीच मुलगी आपल्या राज्याचे/साम्राज्याचे रक्षण/पालन/पोषण करेल अशी खात्री त्यांना झाली म्हणून अहिल्याईंना सून करून घेण्याचे ठरवले. लागलीच माणकोजी शिंदे यांच्याशी बोलणी करून मारूतीच्या मंदिरात सुपारी फोडली. पुण्यात मोठ्या धुमधडाक्यात अहिल्याई व युवराज खंडेराव होळकर यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. तो सोहळा पाच दिवस चालला होता. त्यासाठी खुद्द सवाई बाजीराव पेशवे स्वतः जातीने हजर राहून लक्ष घालत होते. मराठी साम्राजाचे तसेच अनेक प्रमुख सरदार येऊन त्यांना शुभेच्छा व भेटवस्तू देऊन जात होते. छोट्याशा चौंडी गावची, सीना नदीच्या वाळूत खेळणारी बागडणारी अहिल्या आता माळवाधिपती सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांची सून तथा युवराज खंडेराव होळकर यांची धर्मपत्नी झाली होती.
           सासरी गेल्यानंतर अहिल्याईंना सर्वांचे प्रेम मिळाले. मनमिळाऊ स्वभावामुळे अहिल्याईंनी सासरकडच्या सर्वांचीच मने जिंकून घेतली होती. वडील माणकोजी शिंदे यांच्याप्रमाणेच मल्हारराव होळकर यांनी अहिल्याईंना सुनेप्रमाने नव्हे तर पोटच्या पोरीसारखा जीव लावला. वाचन लेखन याप्रमाणेच अहिल्याईंना मल्हारराव होळकर यांनी राजनीती व युद्धनीतीचे धडेही शिकवले शिवाय भालाफेक, तलवारबाजी, दांडपट्टा तसेच घोडेस्वारी शिकवली आणि विशेषतः हे सर्व शिकणाऱ्या अहिल्याई या प्रथम महिला होत. आज एकविसाव्या शतकात आपले सरकार अनेक योजना राबवत असते परंतु त्या आमलात आणण्यासाठी कोणीच सकारात्मक पाऊले उचलत नाही. "बेटी बचाओ, बेटी पढाओ", महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण या योजना आणि घोषणा मात्र हवेतच विरून जातात. एखाद्या मुलीवर, माता-भगिनीवर अन्याय अत्याचार झाला तरच या गोष्टी हळूच वरती डोकावतात, सोशल मीडियावर तर अशा गोष्टींना उधानच येते परंतु जशी एखादी घटना घडून भूतकाळात जाईल तसा त्या घटनांचा विसर पडतो मग जोपर्यंत दुसरी एखादी घटना घडत नाही तोपर्यंत सगळीकडेच शांतता आणि शांतताच... मात्र अठराव्या शतकात माणकोजी शिंद्यांनी आपल्या मुलीला शिकवले, सासरे मल्हारराव होळकर यांनी आपल्या सुनेला पोटच्या पोरीसारखा जीव लावून तलवारबाजी, भालाफेक, दांडपट्टा, घोडेस्वारी असे मर्दानी खेळ शिकवले आणि अहिल्याईंनी देखील तज आत्मसात केले, शिवाय एक आदर्श पती या नात्याने युवराज खंडेराव होळकर यांनी देखील सततच्या मोहिमांतून अहिल्याईंना सहकार्य करून त्यांच्या राजनीतीचा, युद्धनीतीचा सन्मानच केला. जर खरोखरच महिला सबलीकरणासाठी आणि महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्न करायचे असतील तर प्रत्येकाने माणकोजी शिंदे, सुभेदार थोरले मल्हारराव होळकर, युवराज खंडेराव होळकर यांच्यासारखेच स्वतःच्या घरातून सुरुवात केली तर "बेटी बचाओ, बेटी पढाओ" म्हणायचे दुर्दैव भारतासारख्या विशाल देशावर ओढवणार नाही.
क्रमशः.....
जय मल्हार।। जय अहिल्या।। जय यशवंत।।
         ✍️ नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +918530004123
📧nitinrajeanuse123@gmail.com

No comments:

Post a Comment