Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Wednesday, 20 July 2016

धनगर बांधवांनो गांभीर्य लक्षात घ्या...


   अज्ञानाच्या खाईत बुडलेल्या अन् अंधश्रद्धेत गुरफटलेल्या समाजाला ज्ञानरूपी कंदिलाची आवश्यकता आहे. आज जर पाहिले तर शहरापासून दूर  रानावनात डोंगरदऱ्यातून भटकंती करण्यामुळे शिक्षणाचे प्रमाण समाजात फार कमी आहे त्यातूनही आजचा युवा वर्ग सुशिक्षीत झाला शिकला सवरला, लिहायला लागला, वाचायला लागला बोलायला लागला. अन्यायाच्या विरोधात पेटून उठू लागला. धनगर समाजाचा खरा इतिहास जाणूनबुजून लपवून ठेवला गेला यापाठीमागे सनातन्यांचे आणि प्रस्तापितांचे फार मोठे षड्यंत्र आहे. तरीही धनगर समाजाच्या इतिहासावरती संशोधन झाले लपवून ठेवलेला धनगर समाजाचा खरा इतिहास समाजासमोर आला. आज धनगर समाजातील वक्ते, व्याख्याते जीव तोडून समाजाला इतिहास सांगतात आणि समाजप्रबोधन करतात.  इतिहासकार, लेखक, विचारवंत आपला अमुल्य वेळ काढून निस्वार्थीपणाने समाजाचे प्रबोधन करण्यासाठी अहोरात्र झटत असतात. विस्कटलेला अन् विखुरलेला धनगर समाज आज कुठेतरी एकत्रित येतोय, महापुरूषांच्या जयंत्या साजऱ्या करून युवा वर्ग एकोप्याचे दर्शन घडवून आणतात.
पण समाजातील काही लोक जरा प्रमाणापेक्षाही जास्तच शिकले आणि अतिशहाणे झाले असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. कदाचित माझ्या या बोलण्याचा कोणालाही राग येऊ शकतो पण त्याची मला पर्वा नाही. कारण कालपरवा आयबीएन लोकमत वरती "जानकर हे हटकर तर राम शिंदे खुटेकर" या आशयाची बातमी पाहिली अन् माझ्या मस्तकाची शिरच उठली. आजपर्यंत नव्हते पण आता कुठेतरी धनगर समाजातील नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. एकीकडे अहिल्यामाईंचे माहेरकडील वंशज मा.ना.प्रा.राम शिंदे साहेब यांची राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्रिपदावरती वर्णी लागली तर दुसरीकडे २५ वर्ष वणवण फिरून बहुजन समाजाला न्याय मिळावा म्हणून घरादाराचा त्याग करणाऱ्या मा.ना.महादेवजी जानकर साहेबांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले, मेंढपाळाचा पोरगा राज्याचा मंत्री बनला. धनगर समाजातील दोन नेते कॅबिनेट मंत्री झाले या पण नेत्यांना पोटजातीत अडकवायचे काम समाजातील खूप शिकलेले अतिशहाणे लोक करताहेत तेव्हा नाइलाजाने म्हणावेसे वाटते की शिकलेल्यापेक्षा जर हे लोक अडाणी असते तर कमीत कमी पोटजातीचा डंका पिटून समाजाचं वाटोळं करून घ्यायची दुर्बुद्धी त्यांना सुचली नसती. आज पोटजातीत विखुरलेला धनगर समाज एकत्रित यावा म्हणून समाजातील इतिहासकार, लेखक, विचारवंत हे वारंवार सांगतात की पोटजाती सोडून "धनगर" म्हणून एकत्रित या पण समाजातील अतिशहाणे लोक मात्र पोटजातीचा डंका पिटत आम्हीच कसे काय श्रेष्ठ हे सांगत जुन्या विचारातच गुरफटलेले दिसून येतात. पण त्यांना पोटजातीचा एवढा डंका पिटून नक्की काय साद्य करायचे आहे राम जाणं....
     माझ्या या बोलण्याचा काहीजणांना राग आला असेल, काहींना पटलेही नसेल पण माझे विचार सर्वांनाच पटावेत असे काही बंधन नाही. मी हटकर, मी खुटेकर, सनगर, झेंडे, बंडे, डंगे अहिर तर कोणी म्हणतो घोंगडी धनगर असे म्हणण्यात व आम्ही श्रेष्ठ की तुम्ही श्रेष्ठ करण्यातच आमचे आयुष्य संपले आणि पोटजातीत विभागला गेल्यामुळे धनगर समाज आजपर्यंत मागासलेलाच राहिला. समाजाला प्रगतीपथावर घेवून जाणाची भाषा करत असतानाच नेत्यांना पोटजातीत अडकवून समाजाला विभागायची भाषा करणारे सुद्धा आपल्याच रक्ताचे आपलेच सगेसोयरे करताहेत याचेच दुःख वाटते. एकाच आईची लेकरं एकाच रक्ताची माणसं हाडवैरी कशी काय बनताहेत?? तेच कळत नाही. ज्याप्रमाणे घरातील गोष्टी चव्हाट्यावर येतात त्याचप्रमाणे आपआपसांत पोटजातीत भांडत बसलेल्या आपल्याच माणसांमुळे आयबीएन लोकमत सारखी प्रसिद्धी माद्यमे (Electronic media, print media, Social media) ही आपल्या धनगर समाजातील नेत्यांना पोटजातीच्या चौकटीत अडकवताहेत. पोटजातीचा अहंकार बाळगणाऱ्यांना हे पाहायला कदाचित आज बरं वाटत असेल पण पोटजातीला खतपाणी घालत बसलो तर उद्या भविष्यात धनगर समाजातील नेत्यांना आपल्याच धनगर समाजबांधवांच्या मतांची भिक मागावी लागेल हे भयानक आणि कटू सत्य आहे. जानकर साहेबांना हटकर मद्ये तर राम शिंदे साहेबांना खुटेकर मद्ये अडकवून आपण आपल्याच पायावर दगड मारतोय याची जाणीव ठेवा. घराला घरपण तेव्हाच असतं जेव्हा घरातील प्रत्येक सदस्य घराशी एकरूप झालेला असतो आणि घरातील एखाद्या सदस्यावर जर अन्याय झाला तर घरातील सर्व सदस्य एकत्रित येतात पण जर घरात एकमेकांचे पटत नसेल, या ना त्या कारणावरून वाद होत असतील तर तुमच्या घराचं वाटोळं करायला टपलेल्या गिधाडांना आयतीच संधी मिळते मग ते तुमच्या घरातील समस्यांचा कसा वापर करून घेतील आणि तुमच्या घराचं कसं वाटोळं करतील ते सांगता येणार नाही. म्हणूनच ओरडून ओरडून सांगतोय की धनगर समाजबांधवांनो पोटजातीत भांडत बसण्यापेक्षा "धनगर" म्हणूनच सर्वांनी एकत्रित या, समाजाचा विकास करा नाहीतर समाजाचं वाटोळं करायला बाकीची गिधडं टपूनच बसलेत याची जाणीव असुद्या. आपापल्यातील पोटजातीचा वाद विकोपाला जाऊ शकतो त्यातून भविष्यात आपलेच नुकसान होईल याचं गांभीर्य जरा लक्षात घ्या.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment